नमस्कार,
येत्या बुधवारी, म्हणजे ९ ऑगस्ट, २०१७ रोजी भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये या देशातले शास्त्रज्ञ, विज्ञानशाखेचे विद्यार्थी, शिक्षक आणि वैज्ञानिक मूल्यांवर प्रेम करणारे नागरिक एकत्र येऊन संचलन करणार आहेत. ’इंडिया मार्च फॉर सायन्स’ असं या संचलनाचं नाव आहे.
मुंबईतला कार्यक्रम दुपारी ४ वाजता ऑगस्ट क्रांती मैदानावर जमून तेथून विल्सन कॉलेजपर्यंत जायचं, असा आहे; तर पुण्यात दुपारी ५ वाजता रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या गांधी पुत़ळ्यापाशी जमून तेथून कलेक्टर कचेरीजवळील आंबेडकर पुत़ळ्यापर्यंत चालत जायचं, असा कार्यक्रम आहे. याविषयी अधिक माहिती - http://breakthrough-india.org/imfs2017/index.html - या दुव्यावर मिळू शकेल.
या संचलनाला आणि चळवळीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.
हे संचलन आम्ही ज्या मागण्यांसाठी करणार आहोत, त्या आमच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत -
(१) भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या, म्हणजे जीडीपीच्या, कमीत कमी ३% इतका निधी वैज्ञानिक व तांत्रिक संशोधनास, तर कमीत कमी १०% इतका निधी शिक्षणक्षेत्रास देण्यात यावा.
(२) अवैज्ञानिक आणि प्रतिगामी विचारांच्या, तसंच धार्मिक असहिष्णुतेच्या समाजातल्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यात यावा. वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवी मूल्यं आणि शोधक वृत्ती ही संवैधानिक मूल्यं आचरणात आणण्यावर भर देण्यात यावा.
(३) शिक्षणपद्धतीत फक्त वैज्ञानिक पुराव्यांचा आधार असलेल्या विचारांचा अंतर्भाव असावा.
(४) सरकारची धोरणं ही पुराव्यांनी शाबित विज्ञानावर आधारित असावीत.
या मागण्यांमागची आमची भूमिका अशी -
गरज ही शोधाची जननी आहे, असं म्हणतात. पण ते तितकंसं खरं नाही. आज आपल्याला जी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांतली प्रगती दिसते आहे, ती झाली आहे कुतूहलामुळे. का, कसं आणि कशामुळे हे प्रश्न अत्यंत मूलभूत आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं शोधणं म्हणजे मूलभूत संशोधन! ज्ञानप्राप्ती हा मूलभूत संशोधनामागचा मूळ हेतू असतो. आपल्या अवतीभवती जे घडतं, त्याचा अर्थ लावण्याचं काम मूलभूत विज्ञान करतं. नव्यानं समोर येणार्या घटना आणि त्या घटनांमागचा कार्यकारणभाव शोधण्याचं कुतूहल यांतून विज्ञानाची प्रगती होते. ही प्रगती देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची असते.
सफरचंद झाडावरून खाली का पडलं, असा विचार करताना न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला; एका पेट्रिडिशमध्ये सूक्ष्मजंतू वाढत असताना त्या डिशवर चुकून आलेल्या बुरशीनं त्या सूक्ष्मजंतूंची वाढ रोखली आणि या निरीक्षणामागचं कारण शोधताना अलेक्झांडर फ्लेमिंगना प्रतिजैविकांचा शोध लागला; या आणि अशा अनेक सुरस कथा आपण ऐकतो. मात्र नीट विचार करता हे शोध असे एका ओळीत मावतील इतके सोपे नसतात, हे आपल्याला जाणवतं. कारण विज्ञानाच्या मूलभूत शाखांमधलं संशोधन हे पूर्वसुरींच्या संशोधनाचा आधार घेत पुढे जाणारं असतं. आज मूर्त स्वरूपात दिसणारा एखादा शोध हा कित्येक दशकांच्या संशोधनामुळे आपल्यासमोर आलेला असतो. उदाहरणार्थ, फ्लेमिंग यांना पेनिसिलीन हे काही गोळीच्या रूपात हाती लागलं नाही. फ्लेमिंग यांना पेनिसिलीन नैसर्गिकरीत्या तयार करणारी बुरशी सापडली. त्या शोधानंतर त्या बुरशीपासून पेनिसिलीन शुद्ध स्वरूपात वेगळं करणं, पेनिसिलीनची रासायनिक रचना शोधून काढणं आणि प्रत्यक्ष माणसांवर प्रयोग, हे सारं एका माणसाचं काम नव्हतं. १९२८ साली फ्लेमिंग यांनी पेनिसिलीयम या बुरशीचा शोध लावला आणि १९४१ साली पेनिसिलीन हे द्रवरूपात रुग्णाला इंजेक्शन म्हणून उपलब्ध झालं. त्यावर आजही भरपूर संशोधन सुरू आहे.
म्हणजे मूलभूत संशोधनाची मुख्य वैशिष्ट्यं अशी सांगता येतील -
१. ज्ञानप्राप्ती / कुतूहल हा मूळ हेतू. त्यामुळे एखाद्या शोधाचा तत्काळ उपयोग असेलच, असं नाही.
२. अज्ञाताचा शोध घेताना अनेक प्रयोग अयशस्वी होणं – यशाचं अत्यल्प प्रमाण.
३. अनेको वर्षं, किंबहुना निरंतर चालणारं काम.
४. अनेकांच्या सहकार्यानं चालणारं काम.
मूलभूत संशोधनाला भरपूर पैसा लागतो. ही त्या देशाची दीर्घकालीन गुंतवणूक असते. मूलभूत संशोधनाचे फायदे लगेच दिसत नसले, तरी प्रत्येक नागरिकाच्या आरोग्यपूर्ण आणि सुखकर, संपन्न जगण्यासाठी संशोधन व त्यावर होणारा खर्च टाळणं शहाणपणाचं नसतं. अमेरिका त्यांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा २.७४२% वाटा विज्ञान-संशोधनासाठी राखून ठेवते. चीन आपल्या उत्पन्नाचा २.०४६% भाग संशोधनावर खर्च करतो. जगात संशोधनासाठी सर्वाधिक खर्च करणारा देश दक्षिण कोरिया असून तिथे या खर्चाचं प्रमाण ४.२९२% इतकं आहे. विकसनशील देशांमध्ये ब्राझील त्यांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या १.१५% वाटा संशोधनासाठी राखून ठेवतो. भारतात हे प्रमाण ०.८% इतकं आहे.
भारतानं संशोधनासाठी सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा ३% भाग राखून ठेवावा, अशी मागणी गेली अनेक दशकं शास्त्रज्ञ करत आहेत. आजवरच्या एकाही सरकारनं ही मागणी पूर्ण केलेली नाही. गेल्या दोन दशकांत हा खर्च वाढवण्याची आश्वासनं तीनदा दिली गेली, मात्र मूलभूत संशोधनाचं महत्त्व आणि त्यासाठी उपलब्ध असणारा निधी यांचं आपल्या देशातलं व्यस्त प्रमाण वारंवार सत्ताधार्यांच्या लक्षात आणून देऊनही हा खर्च वाढवण्याच्या दृष्टीनं कार्यवाही झाली नाही. यंदा देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षं पूर्ण होत असताना विज्ञानासाठी भरीव आर्थिक तरतूद नसणं, हे खेदकारक आहे.
त्यातच भारतातल्या प्रमुख संशोधनसंस्थांना मिळणारा निधी कमी होत जातो आहे. संशोधनासाठी उपलब्ध असलेल्या निधीत वाढ करण्याऐवजी देशभरातल्या संशोधनसंस्थांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं आणि संशोधनासाठी लागणारा काही निधी स्वत: उभारावा, असं सरकारचं मत आहे. त्या दिशेनं निधिकपातही लगेच सुरू झाली आहे. सीएसआयआर, म्हणजे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, त्यामुळे सध्या प्रचंड आर्थिक अडचणीत सापडली आहे. या संस्थेकडे संशोधनप्रकल्पांसाठी पुरेसा पैसा नाही. हीच कथा अणुऊर्जा आयोग, विज्ञान-तंत्रज्ञान विभाग, आयआयटी, आयसर, टीआयएफआर यांचीही आहे. या संस्थांमधले अनेक संशोधनप्रकल्प सध्या आर्थिक चणचणीमुळे खोळंबले आहेत. निधिकपातीमुळे आयआयटी, आयसर अशा संस्थांमधली विविध शुल्कही वाढली आहेत.
शास्त्रज्ञांनी दरवर्षी अमूक इतकी उत्पादनं / तंत्रज्ञानं बाजारात आणावी, त्यांनी सरकारी ध्येयधोरणांशी सुसंगत असं संशोधन करावं, असंही शास्त्रज्ञांना सांगण्यात आलं आहे. मुळात उपयोजित संशोधन हे मूलभूत संशोधनाच्या खांद्यावर उभं असतं. क्वांटम भौतिकीच्या सखोल अभ्यासाअभावी आपण लहानांत लहान सेमिकंडक्टर तयार करू शकलो नसतो. पुण्यात डॉ. मुरली शास्त्री यांनी चांदीचे नॅनोकण तयार करून त्यांचा अभ्यास केला नसता, तर ’टाटा स्वच्छ’सारखं कमी खर्चातलं पाणी शुद्ध करणारं यंत्र तयार होऊ शकलं नसतं. पण बाजारपेठेसाठी केवळ काही उत्पादनं निर्माण करणं, हे प्रत्येक शास्त्रज्ञाचं काम नाही. केवळ तंत्रज्ञान-विकास हा मूलभूत संशोधनाचा उद्देश नसतो. शास्त्रज्ञांनी सरकारी धोरणं आणि तत्कालीन सत्ताधीशांच्या आवडीचे राजकीय-सामाजिक कार्यक्रम पूर्ण करण्यासाठीच काम करणं, हे अन्यायकारक आहे. त्याच्या आवडीच्या विषयात मूलभूत संशोधन करणार्या शास्त्रज्ञाला अमूकच विषयात संशोधन करायला सांगणं, किंवा त्याला तसं संशोधन करावं लागेल, अशी परिस्थिती निर्माण करणं, हे घातक आहे.
सरकारनं दिलेल्या आर्थिक मदतीवर चालणार्या संशोधनसंस्थांमधल्या संशोधनामुळे देशातल्या नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करता याव्यात, ही अपेक्षा योग्य आहे आणि देशातल्या अनेक संस्था त्या दिशेनं काम करतही आहेत. मात्र नवी ’स्टार्टअप्स’ सुरू होणं म्हणजे वैज्ञानिक प्रगती नव्हे. शिवाय राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा किंवा टीआयएफआर अशा मूलभूत संशोधनासाठी नावाजल्या गेलेल्या संस्थांकडूनही असंच आणि इतकंच संशोधन व्हावं, ही अपेक्षा गैर आहे. या संस्थांमधल्या संशोधनावर किती पैसा खर्च झाला आणि त्यातून ’परतावा’ किती मिळाला, असा हिशेबही चुकीचा आहे. मूलभूत संशोधनावर होणारा खर्च आणि त्यातून होणारा ’फायदा’ हा एखाद्या आर्थिक वर्षातल्या नफ्यातोट्याच्या परिमाणात मोजायचा नसतो. त्या संशोधनाचे परिणाम दिसायला बराच कालावधी लागू शकतो, शिवाय त्याचं तत्काळ, ढोबळ मूल्यमापनही शक्य नसतं. कारखान्यांना आणि उद्योजकांना लावले जाणारे निकष मूलभूत संशोधनासाठी वापरणं हे नक्कीच योग्य नाही. या देशासमोर असलेले अन्नधान्याचे, आरोग्याचे प्रश्न किंवा नद्यांची आणि रस्त्यांची स्वच्छता यांसाठी तंत्रज्ञान विकसित करताना मूलभूत विज्ञानाचा बळी जाणं हितावह नाही.
देश स्वयंपूर्ण व्हावा, नवी तंत्रज्ञानं विकसित व्हावी या अपेक्षापूर्तीसाठी संशोधनाला पाठिंबा देऊन शास्त्रज्ञांना मोकळीक मिळायला हवी. विज्ञान - कला - संगीत - चित्रपट - खेळ अशा कुठल्याच क्षेत्रांतलं ’इनोव्हेशन’ आचार-विचारस्वातंत्र्याअभावी घडू शकत नाही. या बाबतीत रामानुजनचं उदाहरण बोलकं आहे. आगळ्यावेगळ्या पद्धतीनं गणित करणार्या रामानुजनला प्रचलित पद्धत शिकवायचा प्रयत्न हार्डीनं केला. परंतु ते मानवत नाही, हे ध्यानात येताच त्यानं पूर्ववत पद्धतीवर भर दिला. अशा परिपक्वतेची व लवचिकतेची आज गरज आहे.
विज्ञाननिष्ठ समाज हा नेहमी प्रगतिशील समाज असतो. ज्या देशांनी मूलभूत संशोधनात गुंतवणूक केली ते देश नेहमीच प्रगत झाले आहेत. अर्थात आपल्याला प्रगत व्हायचे असेल तर मूलभूत विज्ञानांतील गुंतवणुकीला पर्याय नाही.
मूलभूत संशोधनासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांच्या कमतरतेमागे निधीचा अभाव हे महत्त्वाचं कारण असलं, तरी त्या अभावामागे असलेलं वैज्ञानिक दृष्टीचा अभाव हे कारण अधिक गंभीर आहे. मूलभूत संशोधन महत्त्वाचं का, याचं उत्तर जर सामान्य जनतेला माहीत असेल, तर शास्त्रज्ञांना समाजातून आपोआप प्रोत्साहन मिळेल, शिवाय सरकारदेखील त्याकडे अधिक गांभीर्यानं बघेल. यासाठी मूलभूत संशोधनाला लोकाश्रय मिळायला हवा. विज्ञानाविषयी भारतीयांचा अत्यंत उदासीन असा दृष्टिकोन बदलण्याची नितांत गरज आहे. अर्थात याचं काही अपश्रेय शासनाच्या आणि खुद्द संशोधकांच्या माथी आहे. त्यांनी पुढाकार घेऊन आपलं संशोधन लोकांपर्यंत नेलं पाहिजे.
एकीकडे मूलभूत विज्ञानाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असताना छद्मविज्ञानाला राजाश्रय मिळणं ही गंभीर बाब आहे. या देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाची धोरणं आखणार्या, निर्णय घेणार्या आणि निधिवाटप करणार्या संस्था आणि संस्थाचालक छद्मविज्ञानाचा पुरस्कार करताना दिसून येतात. विज्ञानाशी संबंध नसलेल्या बिगरसरकारी संस्थाही सरकारी संशोधनसंस्थांच्या कामकाजात ढवळाढवळ करून छद्मविज्ञानाचा प्रचार करताना, त्यासाठी निधी मिळवताना दिसतात. विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार होणं हे जागृत आणि सक्षम समाजाच्या जडणघडणीसाठी एक अत्यावश्यक बाब आहे. हे घडण्यासाठी सामान्य नागरिकांना विज्ञान म्हणजे नेमकं काय, हे समजणं जसं महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे त्यांना कुठले दावे केवळ शास्त्राचा देखावा करीत आहेत, हे ओळखता येणंही गरजेचं आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांतील कालबाह्य, अतार्किक आणि प्रसंगी क्रूर अशा प्रथांना वैज्ञानिक अधिष्ठान मिळवून देण्याचा प्रयत्न सतत होतो आहे. त्याचबरोबर वेद-पुराण आणि महाकाव्यं यांतला प्रत्येक संदर्भ हा शास्त्रीय आधारावरच उभा आहे, हे ठसवण्याचा जोरकस प्रयासही चालू आहे.
छद्मविज्ञानी संस्था आणि त्यांचे दावे यांचं सर्वांत महत्त्वाचं लक्षण म्हणजे त्यांच्या राजकीय, धार्मिक अथवा सांस्कृतिक मतांचा त्यांच्या निष्कर्षांवर असलेला जबरदस्त पगडा. या मतांप्रमाणे संशोधनाचे निष्कर्ष आले नाहीत, तर त्यांच्यात अक्षम्य फेरफार केले जातात किंवा अस्तित्वात असलेल्या सिद्धांतालाच नाकारलं जातं. संशोधन करताना त्याचा निकाल आधीच ठरवून मग सुरुवात करण्याचा हा उरफाटा उद्योग आहे. आधीच ठरलेल्या निष्कर्षांना पूरक असलेली निरीक्षणं घेऊन केलेल्या वैज्ञानिक तपासणीमुळे झालेल्या नुकसानाची कितीतरी उदाहरणं आहेत.
छद्मविज्ञान हे ज्ञान आणि सत्य यांच्या मूलभूत संकल्पनेवरच हल्ला चढवत असतं. त्याचप्रमाणे खऱ्या शास्त्रीय संशोधनांवर जो पैसा आणि मनुष्यबळ खर्च होणं अपेक्षित आहे, त्याचा अपव्यय अशा निरर्थक ’शोधां’मुळे केला जातो. 'आपल्या महान, पुरातन परंपरेला सगळंच ठाऊक होतं, आपल्या पूर्वजांनी सगळेच शोध लावले होते', अशी भ्रामक अहंगंड जपणारी आणि स्वकष्टानं नवी ज्ञाननिर्मिती करण्यापासून परावृत्त करणारी घातक वृत्ती समाजात बोकाळणं, हा छद्मविज्ञानाचा सगळ्यांत मोठा धोका आहे.
भारतीय वैज्ञानिक परंपरेत अभिमान बाळगावा, अशा अनेक गोष्टी आहेत हे सत्य कुणीच नाकारणार नाही. परंतु त्या गोष्टींबद्दल न बोलता भलत्याच गोष्टींचा अभिमान बाळगावा, असा अभिनिवेश समाजात बोकाळला आहे. उदाहरणार्थ, डायोफंटाईन इक्वेशन्स सोडवण्यामध्ये ब्रह्मगुप्त आणि भास्कराचार्य यांसारखे भारतीय गणिती पाश्चात्य गणितज्ञांपेक्षा काही शतकं आघाडीवर होते. परंतु ब्रह्मगुप्ताची 'कुट्टक' किंवा भास्कराचार्यांची 'चक्रवाल' पद्धत यांविषयी भारतीयांना किंवा आपल्या नवीन पिढीला काहीच माहिती नाही. याउलट 'वैदिक'ही नसलेल्या व 'गणित'ही नसलेल्या काही क्लृप्त्या 'वैदिक गणित' मानून त्यालाच आपला वारसा मानण्याचं खूळ समाजात वेगानं पसरतं आहे. चरकसंहितेचा आधार घेऊन सूक्ष्मकणांवर आणि भस्मांवर संशोधन करणार्या नॅनोशास्त्रज्ञांचं, किंवा आवळ्याच्या रसामुळे गॅमा किरणांपासून होणारी हानी कमी होऊ शकते, असं संशोधन करणार्या भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांचं काम बघण्या-वाचण्यापेक्षा आपण ’गणपती आणि प्लास्टिक सर्जरी’ यांबद्दल बोलतो. याची परिणती आपल्या खर्याखुर्या ठेव्यावर प्रेम करणारी संयत राष्ट्रभक्ती सोडून एक भलताच आक्रमक व अनिष्ट राष्ट्रवाद वेगानं मूळ धरू लागण्यात होत आहे.
छद्मविज्ञानाला नाकारणं म्हणजे धर्माला नाकारणं आणि तसं करणं म्हणजे देशद्रोह अशीही विचारधारा मूळ धरू पाहत आहे. विज्ञानाची सांगड सातत्यानं धर्म आणि अध्यात्म यांच्याशी घातली जात आहे. धार्मिक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या दोन समांतर धारा आहेत, आणि त्या तशाच असाव्यात. धार्मिक ग्रंथांमधल्या साहित्यांत विज्ञान शोधण्याच्या प्रयत्न सगळ्याच धर्मांमध्ये केला जातो. पण विज्ञान आणि धर्म यांच्या आपल्या आयुष्यातल्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. विज्ञानाचा परीघ मोठा आणि सर्वसमावेशक आहे. त्याची तुलना कोणत्याही धर्माशी करून आपण विज्ञानाचं कार्य आणि व्याप्ती या दोहोंवर अन्याय करतो. पण विज्ञान आणि धर्म या दोहोंसाठी हानिकारक असा एक मानवी दुर्गुण आहे - असहिष्णुता.
अॅरिस्टोटल म्हणाला होता - एखादी गोष्ट पटत नसली तरी तिचा सगळ्या बाजूंनी विचार करणं, हे सुविद्य मनाचं लक्षण आहे. असहिष्णुता ही जशी सगळ्या धर्मांच्या मूलभूत शिकवणींवरच घाला घालते, तशीच ती वैज्ञानिक तपासाच्या पायावरही आघात करते. धार्मिक असहिष्णुतेमुळे हिंसाचार होतो, शांतता भंग होते. बौद्धिक असहिष्णुतेमुळे विज्ञानाचं नुकसान होतं. विज्ञानाची व्याप्ती मोठी असली तरी वैज्ञानिक होण्याआधी बरेचदा माणसाच्या मनावर धार्मिक संस्कार झालेले असतात. त्यातूनच विज्ञान आणि धर्म यांची सांगड घालायचा मोह निर्माण होतो. पण धार्मिक शिकवणीनं मन खुलं झालं असेल, तरच ते विज्ञानाला पोषक बनू शकतं. धार्मिक शिकवणीनं बंद झालेलं असहिष्णू मन हे विज्ञानासाठी धोकादायक आहेच, शिवाय धार्मिक संस्कारांच्या अंतिम ध्येयाला, म्हणजे वैयक्तिक मनःशांती आणि समाधान यांनासुद्धा असं मन पोषक नाही.
सहिष्णुतेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्वत:च्या श्रद्धेला असलेली संशयाची किनार. ही संशयाची किनार आपण स्वत:च द्यायची असते. स्वत:च्याच श्रद्धेकडे किंचित संशयानं, कणभर अविश्वासानं पाहणं म्हणजे तारेवरची कसरत. पण ही कसरत कशी करायची, हे विद्न्यानाकडून शिकता येतं. अशी धार्मिक श्रद्धा आपोआप सहिष्णुतेचा कित्ता गिरवते.
सारासार आणि तारतम्यानं विचार करणं या गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा गाभा होत. आपल्या आसपास होणार्या घटनांचे अर्थ लावताना त्यात हा सारासार विचार करता आला पाहिजे. हा अर्थ लावताना आपले पूर्वग्रह व आपल्या श्रद्धा खुलेपणानं मान्य करणं आवश्यक आहे. एखादं अनुमान काढताना आपली गृहितकं कोणती, ही बाबतर सतत तपासून पाहावी लागेल. त्या गृहितकांवर कोणी आक्षेप घेतला, तर त्या आक्षेपांना उत्तर देता आलं पाहिजे. उत्तर देणं व प्रतिक्रिया देणं यांत महदंतर आहे. प्रतिक्रिया देण्यात केवळ स्वतःच्या मतांच्या कातडीचा बचाव आहे. उत्तर देण्यात इतरांनी मांडलेल्या मुद्द्यांवर मनन अपेक्षित आहे. या मननात ’आपण ज्या गोष्टींना पुरावा समजतोय त्यांना पुरावा का मानले जावे?’, ’आपली गृहितकं कोणती?’, ’आपण जो निष्कर्ष काढला आहे, त्याच्या मर्यादा कोणत्या?’ या प्रश्नांची उत्तरं शोधणं अंतर्भूत आहे... हे खरं संशोधन होय. या गोष्टी विज्ञानजगतात कराव्या लागतात, त्यामुळे आपण त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो आणि या खंडनमंडनातून निघतं त्याला (आणि त्यालाच) संशोधनाचा दर्जा प्राप्त होतो.
जोपर्यंत समाजमानसिकतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन मोठ्या प्रमाणात स्वीकारला जात नाही, तोपर्यंत समाजशास्त्र, मानव्यशास्त्रे इत्यादी विद्वत्शाखांमध्येही मूलगामी, समाजोपयोगी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं संशोधन व त्याचे उपयोजित फायदे निर्माण होणं अशक्य आहे. विज्ञानसंशोधनाला पाठिंबा देताना त्यात सामाजिक व मानव्यशास्त्रेही अंतर्भूत आहेत, हे विसरता कामा नये. कारण वर्ण्य-विषय वेगळे असले, तरी संशोधन व ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया यांचे निकष व घटक समानच असतात.
वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं हे सर्वसामान्य नागरिकाला नक्कीच जमू शकतं. किंबहुना, असा दृष्टिकोन बाळगून सारासार विश्लेषण करता येणं, ही आपल्या हितासाठी आवश्यक गोष्ट ठरते. शास्त्रीय दृष्टिकोनाअभावी तरतमभाव येत नाही. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला सर्वच शास्त्रांचं ज्ञान नसतं, ते आवश्यकही नाही. आवश्यक आहे ती शास्त्रीय विचार करण्याची क्षमता आणि त्याहीपुढे जाऊन तसा विचार सातत्यानं करण्याची सवय. ज्या समाजाच्या नागरिकांना अशा पद्धतीच्या सारासारबुद्धीचं महत्त्व पटत नाही, त्या समाजाला अज्ञानामध्ये जखडून ठेवणं सोपं असतं, कारण अशा समाजाला वि-ज्ञान व छद्मज्ञान यांत फरक करता येत नाही. शास्त्रीय दृष्टिकोन न बाळगणारं राष्ट्र भावनिकतेच्या आहारी जाण्यात सुख मानतं. अशा राष्ट्राच्या अस्मितांची जपणूक न होता त्या अस्मितांचं रूपांतर दुराग्रहांमध्ये होतं. विज्ञान वापरणं म्हणजेच वैज्ञानिक विचारपद्धतीतून येणारी सारासारबुद्धी वापरणं नव्हे. केवळ विज्ञान वापरणारा समाज ज्ञानाधिष्ठित राहतो, पण ज्ञानोपासक बनत नाही. आपल्या संशोधनाचं, आपल्या मतांचं साक्षेपी खंडन होणं, हा आपल्या बुद्धीवर घेतला गेलेला संशय नसून सत्यान्वेषणाची ती अतिशय सशक्त पद्धत आहे. हे कळलं नाही तर ज्ञान / सत्य ’असं असतं’ आणि ’असं असायला पाहिजे’ यांतला फरकसुद्धा कळत नाही. हा भेद जेव्हा एखाद्या नागरिकसमूहाला कळेनासा होतो, त्या नागरिकसमूहात, पर्यायानं त्या राष्ट्रात 'सत्य काय' हे उचित व यथायोग्य अन्वेषणाआधीच ठरवलं जातं. अशा सत्यासाठी 'सत्यमेव जयते'चा घोष करणं ही त्या राष्ट्रानं स्वतःचीच केलेली घोर फसवणूक ठरते.
आपल्या राज्यघटनेतलं ५१अ हे कलम आपल्याला ज्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं त्यांचा आदर्श बाळगायला, आपल्या देशातल्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचं जतन करायला, पर्यावरणाचं संवर्धन करायला, धर्म-जात-भाषा-प्रांत यांत भेद न करता बंधुभाव वृद्धिंगत करायला सांगतं. घटनेचं हेच कलम वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शोधक वृत्ती विकसित करणं, हे आपलं मूलभूत कर्तव्य असल्याचं आपल्याला सांगतं.
भारतीय राज्यघटनेत सांगितल्याप्रमाणे या देशात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी प्रयत्न केले जावे, प्रश्न विचारण्याची, शंका घेण्याची प्रत्येकाला मुभा असावी, धर्म-जात-वंश-भाषा-लिंग यां भेदांपलीकडे जाऊन आचार-विचारस्वातंत्र्य असावं, अशी आमची इच्छा आहे.
आमच्या या मागण्यांसाठी आम्ही व आमच्यासारखे अनेक शास्त्रज्ञ - शिक्षक - विद्यार्थी - वैज्ञानिक मूल्यांचा आदर राखणारे नागरिक येत्या बुधवारी, म्हणजे ९ ऑगस्ट, २०१७ रोजी देशभरात संचलनात सहभागी होणार आहेत.
आमचा हा लढा कोणत्याही एका सरकारविरुद्ध किंवा राजकीय पक्षाविरुद्ध नाही. आमची बांधिलकी वैज्ञानिक दृष्टिकोनाशी, लोकशाहीशी आणि सहिष्णुतेशी आहे. आम्हांला ज्यांबद्दल मनस्वी आदर आणि प्रेम आहे, अशा वैज्ञानिक मूल्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत.
आपला पाठिंबा आम्हांला मिळाल्यास व आपणही या संचलनात सहभागी झाल्यास आमच्या लढ्यास बळकटी येईल.
धन्यवाद.
डॉ. आदित्य कर्नाटकी (भास्कराचार्य)
डॉ. आरती रानडे (रार)
केतन दंडारे (अरभाट)
डॉ. चिन्मय दामले (चिनूक्स)
डॉ. जिज्ञासा मुळेकर (जिज्ञासा)
वरदा खळदकर (वरदा)
डॉ. सई केसकर (सई केसकर)
सत्यजित सलगरकर (आगाऊ)
या मसुद्यातल्या डॉ. चिन्मय दामले यांच्या मतांशी मायबोली.कॉमचा संबंध नाही. ती त्यांची वैयक्तिक मतं आहेत.
<<मानवाला किती टक्के विज्ञान
<<मानवाला किती टक्के विज्ञान समजलंय? ५ टक्के ? >>
------- खरा विज्ञान-अभ्यासक अशा % मधे समज मोजणार नाही, तसे करताही येत नाही कारण आपल्याला विज्ञानाची व्याप्ती, खोली किती आहे हेच अजुन समजलेले नाही, पुढे समजणारही नाही. व्याप्ती आणि खोली सर्वकाळात "अज्ञात" आहे.
<<मग त्याच्या कक्षेतच आलेले अनुभव खरे व बाकी सर्व खरे नाहीत हा अट्टाहास विज्ञानवादी लोक का करतात हे समजत नाही. >>
------ त्याच्या कक्षेत आलेले अनुभव तावुन सुलाखुन अनेकवेळा, अनेकान्नी तपासल्यावरच मान्य होतात आणि विज्ञानाच्या कक्षेत खरे ठरतात.
याचा अर्थ बाकी अनुभव खरे नाहीत असे विज्ञान अभ्यासक म्हणत नाही, तसा आट्टाहासही ते करत नाही. पण ते त्या अनुभवान्ना मान्यता देत नाही. कारण ते 'अनुभव' हे विज्ञानच्या परिभाषित कक्षेत बसत नाहीत. मान्यता न देणे याचा अर्थ सरसकट अमान्य असा होत नाही. त्याना माहित नाही एव्हढाच अर्थ घ्यावा. "डोळ्यामधुन दगड काढता येतात", किव्वा "राजस्थान मध्ल्या अमक्या बाबाने तलवार फिरवल्यावर दुर्धर असा रोग (कॅन्सर, अजुन काही?) बरा होतो"... त्याने अन्गारा दिला आणि रोग पळाला..."पत्रिकेत मन्गळ आहे म्हणुन *** असे झाले", असे काही 'अनुभव' असतील तर ते विज्ञानात बसत नाही. विज्ञानात काय बसते, किव्वा कशाला म्हणाउयच म्हणायचे हे सान्गण्याचा एक छोटा प्रयत्न केला आहे. लेखनात त्रुटी असतील तर त्या दुर करेल पण वैचारिक घोळ टाळण्याचा प्रयत्न करेल.
https://www.maayboli.com/node/38056
<<उलट त्यांना सर्वात आधी कळायला हवे की हे जे आहे त्याचे कारण आजच्या विज्ञानाला सापडलेले नाही (नाकारण्यापेक्षा).>>
------- निसर्गाचे रहस्य जाणुन घेणे हा विज्ञानाचा मुख्य उद्देश आहे. विज्ञानाच्या स्वत: च्या कक्षा आहेत, मर्यादा आहेत आणि या मर्यादा आहेत म्हणुनच त्या मर्यादेत कक्षेत काही अनुभव बसणे शक्य नाही.
विज्ञानांत कुठलाही नियम/ तत्वे हा अंतिम सत्य नाही आहे. प्रत्येक तत्वाला सर्व काळात नव्या मिळत असलेल्या माहितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागते.
टण्या, त्यातले सटकलेले आणि अ
टण्या, त्यातले सटकलेले आणि अॅब्युजर्/गुन्हेगार जरा बाजूला ठेवू आर्ग्युमेण्टपुरते. पहिला जो देवावर विश्वास ठेवणारा वैज्ञानिक आहे तो दांभिक कसा? तो एरव्ही धार्मिक असेल, सकाळी स्तोत्र म्हणून नंतर इस्रो मधे जाउन त्याच्या कामाच्या बाबतीत पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टीकोनातून वागणारा असेल तर तो माझ्या मते दांभिक नाही. त्याच्या धार्मिक श्रद्धा जर त्याच्या कामावर परिणाम करू लागल्या तर ते चुकीचे होईल.
दांभिक शब्द जरा लूजली वापरला आहे असे मला वाटते. वरकरणी एक बोलणारा व छुपेपणाने (किंवा वैयक्तिक जीवनात, जेथे तसे वागल्याने स्वतःचे नुकसान होईल तेव्हा) त्याविरूद्ध वागणारा, तो दांभिक. इथे तो वैज्ञानिक मी माझ्या वैयक्तिक जीवनात फक्त आणि फक्त वैज्ञानिक दृष्टीकोनातून वागेन असे कोठे क्लेम करतो का? तसे असेल तर ठीक आहे.
मी जे पाहिले आहे त्यात असंख्य लोक इतर प्रोफेशन निवडतात तसे सायन्स शी संबंधित प्रोफेशन्स निवडतात आणि त्यांचे काम व वैयक्तिक श्रद्धा या स्वतंत्र मार्गावर राहतात (compartmentalized). त्याने त्यांच्या कामावर फरक पडत नाही.
दाम्भीक शब्द दोन परस्परविरोधी
दाम्भीक शब्द दोन परस्परविरोधी मूल्यव्यवस्थाप्रमाणे वर्तन करणारा या अर्थाने वापरला आहे. त्यातून वैयक्तिक स्वार्थ साधतो की नाही याच्याशी मला घेणे देणे नाही. मी तर वर दिलेल्या चार उदाहरणातल्या चौथ्या माणसालासुद्धा जज करत नाहीये. बाकी कामावर होणारा परिणाम वगैरेबद्दल तर मी आधी लिहिलेच आहे. ते तरीही स्पष्ट नसेल तर तो माझ्या लिखाणाचा दोष आहे असे मी समजेन कारण यापेक्षा अधिक सुस्पष्ट मला लिहिता येणार नाही.
उदय तुमच्या वरच्या पोस्टमध्ये
उदय तुमच्या वरच्या पोस्टमध्ये "कारण त्यान्ना तसा अनुभव आला नाही. " हे वाक्य बदलता का? त्यांना तसा अनुभव व त्यामागची कारणे अजून सिद्ध करता आली नाहीत अश्या केई अर्थाचे लिहा. नाहीतर आमच्या सद्गुरूंनी इसबगोल खाल्ले व माझा खडा सुटला हा मला आलेला अनुभव तुम्हाला आला नाही म्हणून फक्त खोटा का मानायचा असा वाद इथे सुरू होईल.
>>की हे असं असं आहे किंवा असं
>>की हे असं असं आहे किंवा असं असं झालं हे त्याने प्रामाणिक विज्ञानवादी राहूनही प्रामाणिकपणे स्वत:शी तरी मान्य करावं? इतकाच माझा प्रश्न आहे.
जर एखाद्या वैज्ञानिकाला अतर्क्य अनुभव आला (आणि येत राहिला) तर तो नाकारण्याचा प्रश्नच नाही. हाडाचा संशोधक त्या अनुभवामागाची कारणमीमांसा शोधून काढण्यासाठी झटेल. त्यासाठी प्रस्थापित विज्ञानाच्या नियमांना आव्हान द्यावे लागले तरी ते देऊन नवीन नियम सुचवेल. इथे अज्ञात शक्तीसमोर नतमस्तक होण्याचा (जो तुमचा मूळ प्रश्न होता) प्रश्नच नाही.
रस्त्यावरून चालताना डाव्या
रस्त्यावरून चालताना डाव्या बाजूनेच चालले म्हणजे यश मिळते यावर विश्वास ठेवणारा, घोड्याचे मूत हे सर्व रोगांवर अक्सीर इलाज आहेत व त्यामुळे बुद्धी तल्लख होते असे मानून ते रोज प्राशन करणारा आणि नुकत्याच वयात आलेल्या कुमारींशी संभोग केल्याने बुद्धी तल्लख राहते हा वैयक्तिक अनुभव (mri वगैरे झाल्यावर त्यापेक्षा भारी) आहे म्हणून कुमारी मुलींना अबुज करणे >>>> हे असलं उदाहरण म्हणून लिहायचाही विचार करू शकत नाही.
उदय धन्यवाद. कारण मायबोलीवरच
उदय धन्यवाद. कारण मायबोलीवरच विज्ञानाविषयी बोलताना उध्धटपणाकडे झुकतील असे प्रतिसाद वाचले जातात म्हणुन मी तो प्रतिसाद लिहिला होता. ५ टक्के असेच एक नंबर लिहिला होता की मानवाला निसर्गातले अजुन अफाट समजायचे आहे. त्यावर
टण्या, देव, महाराज वगैरे बाजुलाच ठेव , त्यावर मला बोलायचेच नव्हते. आणि २-४-५ टक्के समजलेल्या विज्ञानात इतके शोध लावुन मानवाची भरपुर पीडा दुर करण्याचे शास्त्रज्ञांनी जे अचाट काम केले आहे ते नाकारण्याचा कृतघनपणा माझ्यात नाही. आणि कसली विचित्र उदाहरणे दिली आहेस, माबोवर कोणीही असले लिहिले आहे का?
आपण आपआपसातील चर्चा पॉझ करून
आपण आपआपसातील चर्चा पॉझ करून धागाकर्त्याच्या स्टेटमेंट ची वाट पाहण्याची कल्पना कशी वाटते?
जर एखाद्या वैज्ञानिकाला
जर एखाद्या वैज्ञानिकाला अतर्क्य अनुभव आला (आणि येत राहिला) तर तो नाकारण्याचा प्रश्नच नाही. >>> हेच हवं होतं... पण त्याच बरोबर,
<<<कारणमीमांसा शोधून काढण्यासाठी झटेल. त्यासाठी प्रस्थापित विज्ञानाच्या नियमांना आव्हान द्यावे लागले तरी ते देऊन नवीन नियम सुचवेल. इथे अज्ञात शक्तीसमोर नतमस्तक होण्याचा (जो तुमचा मूळ प्रश्न होता) प्रश्नच नाही >>>> ह्याबाबत... काही गोष्टींमध्ये एखादा वैज्ञानिक कोणता नवीन नियम सुचवायला बघेल? असा प्रश्न पडतो आणि मग देवाचे अस्तित्व मान्य करावेसे वाटते. त्या गोष्टी इथे लिहीत नाहिये कारण धाग्याच्या मूळ विषयापासून आपण हळूहळू संबंधितच पण जराश्या वेगळ्या विषयाकडे जाऊ लागलोय.
जी गोष्ट नवा धागा काढून मला
जी गोष्ट नवा धागा काढून मला मांडायची होती, तीच्यावर इथेच चर्चा झाली.... असो
मला म्हणायचे होते की विचारसरणीने विज्ञानवादी - जसे अमितव यांनी म्हटले की रॅशनल विचार - असणे आणि व्यवसायने संशोधक/वैज्ञानिक असणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. गाडगेबाबा हे अशिक्षित असून विज्ञानवादी विचारांचे होते, तेच बालाजीच्या पुढे नतमस्तक होणारे इस्रोचे तंत्रज्ञ हे विज्ञानवादी नाहीत. प्रोफेशन म्हणून वैज्ञानिक आहे म्हणजे तो विज्ञानवादी असेलच असे नाही. नास्तिक म्हणजे काही भयंकर क्रूर गोष्ट असल्यासारखी का समजली जाते हे कळत नाही. अज्ञेयवादीपण असू शकतात. मी स्वतः एक अज्ञेयवादी आहे.
नास्तिक, अज्ञेयवादी हे विज्ञानवादी 'असू' शकतात, (असतीलच असे नाही) पण 'आस्तिक हे विज्ञानवादी नाहीतच' असे माझे स्पष्ट मत आहे. यावर पुढे चर्चा झाल्यास इतर सदस्यांची मते जाणून घेण्यास आवडेल...
भारताची मूलभूत विज्ञान, तंत्रज्ञानामध्ये इतर देशांसारखी प्रचंड प्रगती न होण्याचे कारण हीच मूलभूत अविज्ञानवादी भूमिका आहे. मूलभूत संशोधनासाठी लागणारे पैसे, सुविधा वगैरे ह्या तर फार नंतरच्या बाबी झाल्या, मुळात त्याची काही आवश्यकता असते हेच बहुसंख्य जनतेला ठावूक नाही. कारण आपला सामाजिक विचार ठेविले अनंते तैसेचि राहावे असा आहे. याच समाजातून येणारे व्यावसायिक संशोधक्/वैज्ञानिक, यांच्यावर कुठेतरी हा पगडा असतोच. त्यामुळे त्यांच्या मूलभूत संशोधकिय मानसिकतेला मर्यादा पडतात. आपण जे 'सरकार मदत करत नाही', 'आपल्या देशात संशोधनाला महत्त्व नाही' हे जेव्हा म्हणतो त्याच्या मुळाशी हीच मानसिकता कारणीभूत असते. एक समाज म्हणून आपल्याला येणार्या समस्यांवर समाधान शोधण्यापेक्षा "चलता है, हे असंच असतं, आपण काय करणार,. सिस्टीमच अशी आहे" हे जे विचार उद्भवतात हे पण यातुनच येतात.
"डोळ्यामधुन दगड काढता येतात",
"डोळ्यामधुन दगड काढता येतात", किव्वा "राजस्थान मध्ल्या अमक्या बाबाने तलवार फिरवल्यावर दुर्धर असा रोग (कॅन्सर, अजुन काही?) बरा होतो"... त्याने अन्गारा दिला आणि रोग पळाला..."पत्रिकेत मन्गळ आहे म्हणुन *** असे झाले", असे काही 'अनुभव' असतील >>> असलं काहीच नसेल तर!
आणि कसली विचित्र उदाहरणे दिली
आणि कसली विचित्र उदाहरणे दिली आहेस, माबोवर कोणीही असले लिहिले आहे का?
>>>
मुद्दामूनच ती उदाहरणे लिहिली आहेत. घोड्याच्या जागी गाय आली तर गोमूत्र विचित्र वाटत नाही, तो कंडिशनिंगचा भाग असतो. वर्जिनशी संभोग, लहान मुलांचा बळी ह्या तांत्रिक सबकल्चरमधल्या गोष्टी आजही घडतात. तो कुणाचा तरी धर्म/देवावरची श्रद्धाच असते.
जवळपास प्रत्येक धर्मात/पंथात बाबा/गॉडमॅन लोकांकडून अनुयायी स्त्रियांवर अत्याचार आजही होत आहेत. कित्येक उदाहरणात अनुयायांनी आपल्या स्वतः:च्या मुलींना या बाबांच्या हवाली केल्याची उदाहरणे दिसतात. त्याचे समर्थन देखील केले जाते. तो त्यांचा भौतिक अनुभवांपरे आलेला सच्चा अनुभवच असतो की.
बहुसंख्य विश्वास ठेवतात त्या देव या संकल्पनेवरचा विश्वास आणि हार्मलेस अश्या रस्त्यावर डाव्या बाजूने चालण्यावरचा विश्वास याचा धक्का बसत नाही. मात्र या चारही उदाहरणात 'विश्वास' ठेवण्याची जी क्रिया आहे व त्यामागचे असलेली 'श्रद्धे'ची भावना आहे ती समान आहे व आधुनिक विज्ञानाच्या प्रोसेसच्या विपरीत जाण्याचा जो मार्ग आहे तोदेखील चारही उदाहरणात समान आहे.
अगदी ते कोठा साफ होण्याचे उदाहरण मी स्वतः प्रत्यक्ष एका नातेवाईकांकडून ऐकलेले आहे.
आणि ही सर्व उदाहरणे वर चर्चेत आलेल्या विज्ञान, आस्तिक, देवावरची श्रद्धा या मुद्द्यांच्या सिमेंटिक्सच्या संदर्भात आहे. एखाद्याने श्रद्धा ठेवावी की नाही, ती वैयक्तिक असावी का समाजाला घातक असली तरी चालेल वगैरेबद्दल मी एकही शब्द बोलत नाहीये. आधुनिक विज्ञानाच्या पद्धतीने काम करणारा वैयक्तिक जीवनात देवावर श्रद्धा ठेवत असेल तर या दोन गोष्टी परस्परविरोधी आहेत. देवावरच्या श्रद्धेला विज्ञानाचा मुलामा देऊ नये इतकेच म्हणतोय. देवावरची श्रद्धा पार्टिवरच्या लोयल्टीने पण रिप्लेस करु शकता.
नानाकळा, दुसरा धागा काढा. इथे
नानाकळा, दुसरा धागा काढा. इथे अजून लिहीत नाही.
ओके.
ओके.
टवणे सर यांनी काही चुकीची
टवणे सर यांनी काही चुकीची उदाहरणे दिली नाहीत.
नास्तिक म्हणजे काही भयंकर
नास्तिक म्हणजे काही भयंकर क्रूर गोष्ट असल्यासारखी का समजली जाते हे कळत नाही. अज्ञेयवादीपण असू शकतात. >>> असं नाही हो नानाकळा. मी स्वत: आस्तिक आहे पण माझे कितीतरी नास्तिकांशी खूप चांगले जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मी आस्तिक असण्याने ते फारतर मलाच बिनडोक म्हणत असतील पण मी मनावर घेत नाही (स्वत:च्या मतांशी चिकटून राहाण्याची माझ्याकडे सबळ/चॅलेंज न करता येण्याजोगी कारणं आहेत. आणि विश्वास ठेवा, मी स्वत:च त्या कारणांना भरपूर चॅलेंज देवून झालेलं आहे सुरुवातीला... असो).
- - - -
मूलभूत संशोधनासाठी लागणारे पैसे, सुविधा वगैरे ह्या तर फार नंतरच्या बाबी झाल्या, मुळात त्याची काही आवश्यकता असते हेच बहुसंख्य जनतेला ठावूक नाही.>>>> मी अस्तिक असूनही मला ठाऊक आहे की! म्हणूनच सायन्स मार्चला पाठिंबा होता. मी एका पोस्ट मध्ये म्हटलंही आहे की आपल्याकडे बुद्धी व मेहनतीची कमतरता नाही, संशोधनकार्याला रेटा देण्याची गरज आहे. आपण कुठल्याकुठे जाऊ!
पंचगव्यावर संशोधन नका करू म्हणत नाहीये कारण त्यातूनही काही शोध लागू शकतोच. कुठे ना कुठे एखाद्या लॅब मध्ये हे होतच असेल. पण पहिलं हाती घेतलं पाहिजे नॅनोटेक्नॉलॉजीमध्ये खूप मोठ्याप्रमाणावर संशोधन. It's too late. जर भारताला जगातील विज्ञानात बलाढ्य असलेल्या राष्ट्रांच्या जवळपास जायचं असेल तर हा विषय तातडीने हाती घ्यायला हवाय. ब्रेनड्रेनमुळे already आपण खूप गमावलं आहे.
नवीन धागा काढलाय तिकडे चर्चा
नवीन धागा काढलाय तिकडे चर्चा घडवा....
टण्या, "ही सर्व उदाहरणे वर
टण्या, "ही सर्व उदाहरणे वर चर्चेत आलेल्या विज्ञान, आस्तिक, देवावरची श्रद्धा या मुद्द्यांच्या सिमेंटिक्सच्या संदर्भात आहे" >> ओके.
विज्ञान - कला - संगीत -
विज्ञान - कला - संगीत - चित्रपट - खेळ अशा कुठल्याच क्षेत्रांतलं ’इनोव्हेशन’ आचार-विचारस्वातंत्र्याअभावी घडू शकत नाही.
>>>>
कला/संगीत्/चित्रपट समजू शकतो मात्र आचार-विचार स्वातंत्र्यावर अनेक बंधने असलेल्या सोविएत राशियात वा आजच्या चीनमध्ये, अगदी नॉर्थ कोरियातदेस्खील काही विशिष्ट क्षेत्रात विज्ञान/तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झाली आहे. मुद्दाम विज्ञान/तंत्रज्ञान लिहितो आहे कारण सोविएत काळात सोविएत गणितींनी प्रगती चालूच ठेवली होती. गणित हे तरी किमान पूर्ण अमूर्त/उत्तरांचा थेट उपयोगाशी संबंध नसलेले शास्त्र आहे.
तेव्हा आचार/विचार स्वातंत्र्य वैज्ञानिक प्रगतीसाठी मँडेटरी 'प्रि-रेक्विझिट' आहे का?
एखाद्या संपूर्ण सहिष्णु, आचार-विचार स्वातंत्र्य देशांतर्गत असलेल्या देशाची परराष्ट्रनिती ही पूर्ण स्वार्थी असेल तर ते वातावरण वैज्ञानिक सृजनाला पोषक असेल का? उदा. देशात काहिही करा मात्र देशाबाहेर वागताना त्या देशाचा नेता हुकुमशहा, जुलमी राजवटी यांच्याशी बिनदिक्कत करार करत असेल, मदत करत/घेत असेल तर त्या देशात होणार्या वैज्ञानिकांच्या आउटपुटवर काही फरक पडेल का?
इथे धर्म आणि विज्ञानाच्या
इथे धर्म आणि विज्ञानाच्या आपल्या आयुष्यातल्या भूमिकेबद्दल गोंधळ होतोय.
माणसाची उत्क्रांती होत असताना, ज्या गोष्टींची उत्तरं नाहीत त्याला देवाचा आधार घेऊन धार्मिक कारण दिलं जायचं. हे अगदी आदिम काळापासून चालू होतं. उदाहरणार्थ, सुरुवातीला आगीची भीती असायची, पण नंतर आगीवर विजय मिळवून आणि आगीच्या साहाय्याने आपण कित्येक नवीन शोध लावले आणि आपले आयुष्य इतर प्राण्यांपेक्षा अधिक प्रगतिशील बनले.
पुढे येणाऱ्या प्रत्येक टप्प्यात विज्ञानाने अशा भीती, अंधश्रद्धांचे निर्मूलन केले आणि त्या भौतिक घटनेसाठी काय करणे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने दाखवून दिले. यातील महत्वाचा मुद्दा असा की वेगवेगळी धार्मिक करणे ज्या गोष्टींना दिली होती (वेगवेगळ्या धर्मांमध्ये), जसे की ग्रहण का होते याला, त्याला एकच सगळीकडे सिद्ध करण्यासारखे उत्तर विज्ञानाने दिले. म्हणून धार्मिक कारण निष्प्रभ ठरले.
पण सगळ्या धर्मांची जी युनिवर्सल प्रिन्सिपल्स आहेत, त्याला विज्ञान कसा तडा देऊ शकेल?
विज्ञानाचे ते ध्येय नाही किंवा तसे करायचे कारणही नाही. आत्मशोधासाठी, सुख आणि दुःखाच्या आंदोलनातून बाहेर पाडण्यासाठी,काम राग, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंशी प्रामाणिक झुंज देण्यासाठी माणसाला विज्ञान काय कामाचे?
आणि शास्त्रीय काम करणाऱ्या लोकांनी धार्मिक असू नये असे कुणाचेच म्हणणे नाहीये. फक्त धर्माचा विज्ञानात हस्तक्षेप असू नये. पण जिथे जिथे धार्मिक नियमांमुळे माणसाच्या जीवाची अकारण हानी होते आहे, किंवा त्याला रोजचे आयुष्य जगण्यामध्ये त्याच्या किंवा दुसऱ्या कोणत्याही धर्माच्या अतिरेकाचा अडथळा होतो आहे, तिथे वैज्ञानिक (रॅशनल) विचारांनी त्या अत्याचाराचे निर्मूलन व्हायला हवे. विज्ञानाला मॉरल नाहीत असे वर कुठेतरी म्हंटले होते. विज्ञानाला वजशी कधी कधी मॉरल्सची आठवण करून द्यावी लागते, आणि त्यासाठी वैज्ञानिकच पुढाकार घेतात (उदा: क्लोनिंग, सेक्स सिलेक्शन) तसेच धर्मालाही पुन्हा पुन्हा त्याच्या फॉऊंडिंग प्रिन्सिपलची आठवण करून द्यावी लागतेच. कारण मॉरल किंवा इथिक सोडून देणारे विज्ञानही नसते आणि धर्म सुद्धा नसतो. ते सोडून देणारा मनुष्य असतो. त्यामुळे धर्मात काय लिहिले आहे यापेक्षा, आपण आजच्या युगात जिथे विज्ञान आणि धर्म दोन्हीच्या खांद्यावर पाय ठेऊन उभे आहोत, तिथे धर्माचा आपल्या आयुष्यातील रोल नक्की काय आहे हे पुन्हा पुन्हा तपासून बघितले पाहिजे.
सई , प्रतिसाद आवडला
सई , प्रतिसाद आवडला
सई प्रतिसाद छान आहे. मी
सई प्रतिसाद छान आहे. मी दोन्ही धाग्यांवरची चर्चा वाचलेली नाही. पण तरीही माझे मत देते. हा प्रतिसाद तिकडेही दिला आहेच.
खरा विज्ञानवादी हा साशंक असतो. खर्या विज्ञानवाद्याला परमेश्वर आहेच किंवा नाहीच हे ठामपणे सांगता येणार नाही. कारण वैज्ञानिक दृष्टया काहीच सिद्ध झालेले नाही. सद्ध्या जे माहित आहे त्यापेक्षा कितीतरी गोष्टी अजून माणसाला अज्ञात आहेत त्यामुळे सद्ध्या माहित असणारी कोणतीही थियरी ही कधीही आऊटडेटेड होऊ शकते. माझ्या मते साशंक असणे हाच वैज्ञानिक प्रगतीचा आत्मा आहे.
धर्माचे म्हणाल तर धर्म (कोणताही असला तरीही) मॉरली कसे जगावे ते सांगतो. त्याचा परमेश्वराशी काहीही संबंध नाही. विज्ञान मॉरली कसे जगायचे ते सांगत नाही. ते फक्त ज्ञान देते. त्याचा वापर मॉरली कसा करायचा हे धर्म शिकवितो. त्यामुळे धर्म (मोरॅलिटी) आणि विज्ञान (ज्ञान) ह्यांची योग्य सांगड घालता आली पाहिजे. दोन्ही संकल्पना जर आपल्या डोक्यात सुस्पष्ट असतील तर त्या एकमेकांच्या कामात अडथळे आणणार नाहीत.
शास्त्रीय काम करणाऱ्या
शास्त्रीय काम करणाऱ्या लोकांनी धार्मिक असू नये असे कुणाचेच म्हणणे नाहीये. >>> सई, वरचे इतर प्रतिसाद वाचता, नॉट शुअर. वरती दांभिक वगैरे आले त्याबद्दलच.
<<<'आस्तिक हे विज्ञानवादी
<<<'आस्तिक हे विज्ञानवादी नाहीतच'>>>
मला नाही तसे वाटत. विज्ञानवादी सुद्धा कित्येक गोष्टी गृहित धरतात, त्या त्यांनी स्वतः सिद्ध केलेल्या नसतात. गरज पडली तर सगळी हातातली कामे बाजूला सारून ते त्या गोष्टींचे पुरावे शोधत बसतील, पण गरज नसेल तर ते खरे मानून पुढे जात रहातील.
आस्तिकतेबद्दलहि बरेच गृहित धरले आहे, आस्तिक असल्याने त्यांच्या विज्ञानविषयक कार्यात अडथळे येत नसतील तर काय हरकत आहे? मी परत एकदा मागे लिहीलेले उदाहरण लिहितो - क्रिकेटला क्रिकेटचे नियम, फुटबॉलला फुटबॉलचे नियम. ज्याला हे कळते तो हे दोन्ही खेळ खेळू शकतो. कित्येक नावाजलेले क्रिकेटर असतात, त्यांनी क्रिकेटखेरीज इतर काही करूच नये? त्यांनी फुटबॉल खेळताना क्रिकेटचे नियम पाळावे?
विज्ञानवादी मनुष्याचे मन काय एव्हढे संकुचित आहे की आपल्याला जे समजते तेच खरे, तेव्हढेच मी करणार, इतर कुठल्याहि गोष्टीच्या फंद्यात पडणारच नाही?
असे म्हणतात की जे वैज्ञानिक सिद्धांत असतात त्यांना अपवाद शोधणे हा हि एक विज्ञानवादातील भाग आहे. ते सिद्धांत खरे समजून वागायचे, बरेच प्रयोग करायचे नि अपवाद सापडले तर सिद्धांतात सुधारणा करायच्या. नाही सापडले तर ते मान्य करायचे पण केलेले प्रयोग करायलाच नको होते म्हणायचे?
आस्तिकवाद खोटा आहे किंवा विज्ञानिक रितीने त्याचा अभ्यास होऊ शकत नाही असे असले तरी विज्ञानवादी मनुष्य त्याचे प्रयोग केल्याशिवाय रहाणार नाही.
#२ मागणी नीटशी कळली नाही
#२ मागणी नीटशी कळली नाही
माझ्या शुभेच्छा!
नवी सायन्स काँग्रेस म्हणजे
नवी सायन्स काँग्रेस म्हणजे नवीन बकचोदी (sorry for this word, but this is the apt word for word going on) करायची संधी असा लोकांचा समज झाला आहे .
https://economictimes.indiatimes.com/news/science/scientists-slam-irrati...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला भारतीय विज्ञान काँग्रेसचे यजमानपद देण्यात आले आहे. यातील महिला विज्ञान काँग्रेसचे संयोजन विद्यापीठ शिक्षण मंचच्या कल्पना पांडे यांच्याकडे होते. याच्या उद्घाटनादरम्यान व्यासपीठावर आलेल्या महिलांचे हळदी-कुंकू करण्यात आले. उद्घाटनाला उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यां कांचन गडकरी यांनी घरासमोर रांगोळी काढा, असाही सल्ला दिला. रांगोळीतील आकृती दुष्टशक्तींना घरात येण्यापासून रोखतात, असा दावाही त्यांनी केला. विज्ञानावर कुठलेही भाष्य न करता, त्यांनी केवळ महिलांचे कर्तव्य आणि भारतीय संस्कार यावरच भाषण केले. आधीच्या काळात महिलांना आठ मुले व्हायची तरीही त्यांची प्रकृती सुदृढ राहत असे. मात्र, आताच्या महिलांना एक मूल झाले तरी त्यांना अनेक व्याधी सुरू होतात. याचे कारण म्हणजे, आधीच्या महिला या नियमित आयुर्वेदिक काढय़ाचे सेवन करीत होत्या. अध्यात्मात आणि आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या या गोष्टी आपण विसरत चालल्याने महिलांना नवनवीन आजारांना समोर जावे लागत असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
महिला विज्ञान काँग्रेसच्या संयोजिका डॉ. कल्पना पांडे यांनी प्रास्ताविकात वैज्ञानिक गोष्टीची माहिती न देता हळदीकुंकू आणि भारतीय संस्कृती याचे कसे नाते आहे हे सांगितले.
वरील अनेक प्रतिसादांतून
वरील अनेक प्रतिसादांतून पंचगव्यावर संशोधन झाले तर काय हरकत आहे ? असा प्रश्न विचारला गेला आहे.
ते का होऊ नये याचे उत्तरच गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांनी दिसून येते. एका पशु वैद्यकीय संशोधन संस्थेने गोमूत्रात अनेक घातक बॅक्टेरिया असतात असे संशोधन प्रसिद्ध केले. (खरे तर हे आम्हाला आधीच माहित होते , त्यासाठी पेपर वगैरे कशाला? पण ते असो) हे प्रसिद्ध झाल्या वर नोईडा चॅनेल वर मोदीस्तुतीचे काम करत असलेल्या एका अॅंकर चा तिळपापड झाला. हा सनातन संस्कृतीवर आघात वगैरे किंचाळू लागला. सोमीवर इतरही अनेक 'राष्ट्रधर्म सर्वोपरी' अशी टॅगलाईन मिरवणरे अद्वातद्वा बोलू लागले. पेटंट बद्दल नेहेमेच्या फेक न्यूज आल्या. अमेरिकेत इतके गोमूत्र भारतातून निर्यात होते वगैरे चर्वण झाले. हाच प्रॉब्लेम आहे. गोमूत्राचा काहीही उपयोग नाही, खरे तर सेवन घातकच आहे असा निष्कर्ष निघाला तर कितीजण तो डोळसपणे स्वीकारतील ? Are they asking in good faith ? गोमूत्र हा वैज्ञानिक कुतुहलाचा नव्हे तर श्रद्धेचा व अभिमानाचा विषय आहे. ( ही मागणी करणारे उच्चवर्णीय हिंदूच असतात हाही एक सोशल कंडिशनिंग चा भाग आहे. झम झम च्या पाण्यावर संशोधन व्हावे अशी मागणीही येइल. तीही अवैज्ञानिक आहे )
डार्विन चा सिद्धांत विविध कसोट्यावर खरा उतरला आहे. पण आजही तो खोटा आहे असे मानणार्यांची ( हे म्हणजे आर्य बाहेरून आलेच नव्हते असे मानणार्यांसारखे) कमतरता नाही. माजी केंद्रिय शिक्षण राज्य मंत्री त्यातलेच. आता NCERT शालेय पुस्तकातून डार्विन चा उल्लेखच वगळला गेला आहे. म्हणजे शालेय मुलांना डार्विनचे नावही कळणार नाही. कॉलेज मध्ये जीवशास्त्र घेतले तरच. काही दिवसानी उत्क्रांतीची दशावतार थिअरी शालेय पुस्तकात येइल.
एकेकाळी NCERT म्हणजे
एकेकाळी NCERT म्हणजे अभिमानाचा विषय असे. आम्ही शाळेत NCERT विज्ञान शिकलो. फारच छान !
NCERT चे चांद्रयानाबद्दलचे नवे मोड्युल आले आहे. त्यात मोदींची तोंड फाटेपर्यंत स्तुती आहे. चालायचेच. पण पुष्पक विमान वगैरे पौरणिक भाकडकथाही आहेत. धन्य तो नवा भारत !
सात वर्षे झाल्यावरही हा लेख
सात वर्षे झाल्यावरही हा लेख किती प्रासंगिक आहे याचे आणखी एक उदाहरण.
https://twitter.com/SohamShah07/status/1780650575215968744/photo/1
Pages