'इंडिया मार्च फॉर सायन्स' - निवेदन

Submitted by विज्ञानवादी on 6 August, 2017 - 00:16

नमस्कार,

येत्या बुधवारी, म्हणजे ९ ऑगस्ट, २०१७ रोजी भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये या देशातले शास्त्रज्ञ, विज्ञानशाखेचे विद्यार्थी, शिक्षक आणि वैज्ञानिक मूल्यांवर प्रेम करणारे नागरिक एकत्र येऊन संचलन करणार आहेत. ’इंडिया मार्च फॉर सायन्स’ असं या संचलनाचं नाव आहे.

मुंबईतला कार्यक्रम दुपारी ४ वाजता ऑगस्ट क्रांती मैदानावर जमून तेथून विल्सन कॉलेजपर्यंत जायचं, असा आहे; तर पुण्यात दुपारी ५ वाजता रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या गांधी पुत़ळ्यापाशी जमून तेथून कलेक्टर कचेरीजवळील आंबेडकर पुत़ळ्यापर्यंत चालत जायचं, असा कार्यक्रम आहे. याविषयी अधिक माहिती - http://breakthrough-india.org/imfs2017/index.html - या दुव्यावर मिळू शकेल.

या संचलनाला आणि चळवळीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.

हे संचलन आम्ही ज्या मागण्यांसाठी करणार आहोत, त्या आमच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत -

(१) भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या, म्हणजे जीडीपीच्या, कमीत कमी ३% इतका निधी वैज्ञानिक व तांत्रिक संशोधनास, तर कमीत कमी १०% इतका निधी शिक्षणक्षेत्रास देण्यात यावा.

(२) अवैज्ञानिक आणि प्रतिगामी विचारांच्या, तसंच धार्मिक असहिष्णुतेच्या समाजातल्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यात यावा. वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवी मूल्यं आणि शोधक वृत्ती ही संवैधानिक मूल्यं आचरणात आणण्यावर भर देण्यात यावा.

(३) शिक्षणपद्धतीत फक्त वैज्ञानिक पुराव्यांचा आधार असलेल्या विचारांचा अंतर्भाव असावा.

(४) सरकारची धोरणं ही पुराव्यांनी शाबित विज्ञानावर आधारित असावीत.

या मागण्यांमागची आमची भूमिका अशी -

गरज ही शोधाची जननी आहे, असं म्हणतात. पण ते तितकंसं खरं नाही. आज आपल्याला जी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांतली प्रगती दिसते आहे, ती झाली आहे कुतूहलामुळे. का, कसं आणि कशामुळे हे प्रश्न अत्यंत मूलभूत आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं शोधणं म्हणजे मूलभूत संशोधन! ज्ञानप्राप्ती हा मूलभूत संशोधनामागचा मूळ हेतू असतो. आपल्या अवतीभवती जे घडतं, त्याचा अर्थ लावण्याचं काम मूलभूत विज्ञान करतं. नव्यानं समोर येणार्‍या घटना आणि त्या घटनांमागचा कार्यकारणभाव शोधण्याचं कुतूहल यांतून विज्ञानाची प्रगती होते. ही प्रगती देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची असते.

सफरचंद झाडावरून खाली का पडलं, असा विचार करताना न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला; एका पेट्रिडिशमध्ये सूक्ष्मजंतू वाढत असताना त्या डिशवर चुकून आलेल्या बुरशीनं त्या सूक्ष्मजंतूंची वाढ रोखली आणि या निरीक्षणामागचं कारण शोधताना अलेक्झांडर फ्लेमिंगना प्रतिजैविकांचा शोध लागला; या आणि अशा अनेक सुरस कथा आपण ऐकतो. मात्र नीट विचार करता हे शोध असे एका ओळीत मावतील इतके सोपे नसतात, हे आपल्याला जाणवतं. कारण विज्ञानाच्या मूलभूत शाखांमधलं संशोधन हे पूर्वसुरींच्या संशोधनाचा आधार घेत पुढे जाणारं असतं. आज मूर्त स्वरूपात दिसणारा एखादा शोध हा कित्येक दशकांच्या संशोधनामुळे आपल्यासमोर आलेला असतो. उदाहरणार्थ, फ्लेमिंग यांना पेनिसिलीन हे काही गोळीच्या रूपात हाती लागलं नाही. फ्लेमिंग यांना पेनिसिलीन नैसर्गिकरीत्या तयार करणारी बुरशी सापडली. त्या शोधानंतर त्या बुरशीपासून पेनिसिलीन शुद्ध स्वरूपात वेगळं करणं, पेनिसिलीनची रासायनिक रचना शोधून काढणं आणि प्रत्यक्ष माणसांवर प्रयोग, हे सारं एका माणसाचं काम नव्हतं. १९२८ साली फ्लेमिंग यांनी पेनिसिलीयम या बुरशीचा शोध लावला आणि १९४१ साली पेनिसिलीन हे द्रवरूपात रुग्णाला इंजेक्शन म्हणून उपलब्ध झालं. त्यावर आजही भरपूर संशोधन सुरू आहे.

म्हणजे मूलभूत संशोधनाची मुख्य वैशिष्ट्यं अशी सांगता येतील -

१. ज्ञानप्राप्ती / कुतूहल हा मूळ हेतू. त्यामुळे एखाद्या शोधाचा तत्काळ उपयोग असेलच, असं नाही.

२. अज्ञाताचा शोध घेताना अनेक प्रयोग अयशस्वी होणं – यशाचं अत्यल्प प्रमाण.

३. अनेको वर्षं, किंबहुना निरंतर चालणारं काम.

४. अनेकांच्या सहकार्यानं चालणारं काम.

मूलभूत संशोधनाला भरपूर पैसा लागतो. ही त्या देशाची दीर्घकालीन गुंतवणूक असते. मूलभूत संशोधनाचे फायदे लगेच दिसत नसले, तरी प्रत्येक नागरिकाच्या आरोग्यपूर्ण आणि सुखकर, संपन्न जगण्यासाठी संशोधन व त्यावर होणारा खर्च टाळणं शहाणपणाचं नसतं. अमेरिका त्यांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा २.७४२% वाटा विज्ञान-संशोधनासाठी राखून ठेवते. चीन आपल्या उत्पन्नाचा २.०४६% भाग संशोधनावर खर्च करतो. जगात संशोधनासाठी सर्वाधिक खर्च करणारा देश दक्षिण कोरिया असून तिथे या खर्चाचं प्रमाण ४.२९२% इतकं आहे. विकसनशील देशांमध्ये ब्राझील त्यांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या १.१५% वाटा संशोधनासाठी राखून ठेवतो. भारतात हे प्रमाण ०.८% इतकं आहे.

भारतानं संशोधनासाठी सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा ३% भाग राखून ठेवावा, अशी मागणी गेली अनेक दशकं शास्त्रज्ञ करत आहेत. आजवरच्या एकाही सरकारनं ही मागणी पूर्ण केलेली नाही. गेल्या दोन दशकांत हा खर्च वाढवण्याची आश्वासनं तीनदा दिली गेली, मात्र मूलभूत संशोधनाचं महत्त्व आणि त्यासाठी उपलब्ध असणारा निधी यांचं आपल्या देशातलं व्यस्त प्रमाण वारंवार सत्ताधार्‍यांच्या लक्षात आणून देऊनही हा खर्च वाढवण्याच्या दृष्टीनं कार्यवाही झाली नाही. यंदा देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षं पूर्ण होत असताना विज्ञानासाठी भरीव आर्थिक तरतूद नसणं, हे खेदकारक आहे.

त्यातच भारतातल्या प्रमुख संशोधनसंस्थांना मिळणारा निधी कमी होत जातो आहे. संशोधनासाठी उपलब्ध असलेल्या निधीत वाढ करण्याऐवजी देशभरातल्या संशोधनसंस्थांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं आणि संशोधनासाठी लागणारा काही निधी स्वत: उभारावा, असं सरकारचं मत आहे. त्या दिशेनं निधिकपातही लगेच सुरू झाली आहे. सीएसआयआर, म्हणजे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, त्यामुळे सध्या प्रचंड आर्थिक अडचणीत सापडली आहे. या संस्थेकडे संशोधनप्रकल्पांसाठी पुरेसा पैसा नाही. हीच कथा अणुऊर्जा आयोग, विज्ञान-तंत्रज्ञान विभाग, आयआयटी, आयसर, टीआयएफआर यांचीही आहे. या संस्थांमधले अनेक संशोधनप्रकल्प सध्या आर्थिक चणचणीमुळे खोळंबले आहेत. निधिकपातीमुळे आयआयटी, आयसर अशा संस्थांमधली विविध शुल्कही वाढली आहेत.

शास्त्रज्ञांनी दरवर्षी अमूक इतकी उत्पादनं / तंत्रज्ञानं बाजारात आणावी, त्यांनी सरकारी ध्येयधोरणांशी सुसंगत असं संशोधन करावं, असंही शास्त्रज्ञांना सांगण्यात आलं आहे. मुळात उपयोजित संशोधन हे मूलभूत संशोधनाच्या खांद्यावर उभं असतं. क्वांटम भौतिकीच्या सखोल अभ्यासाअभावी आपण लहानांत लहान सेमिकंडक्टर तयार करू शकलो नसतो. पुण्यात डॉ. मुरली शास्त्री यांनी चांदीचे नॅनोकण तयार करून त्यांचा अभ्यास केला नसता, तर ’टाटा स्वच्छ’सारखं कमी खर्चातलं पाणी शुद्ध करणारं यंत्र तयार होऊ शकलं नसतं. पण बाजारपेठेसाठी केवळ काही उत्पादनं निर्माण करणं, हे प्रत्येक शास्त्रज्ञाचं काम नाही. केवळ तंत्रज्ञान-विकास हा मूलभूत संशोधनाचा उद्देश नसतो. शास्त्रज्ञांनी सरकारी धोरणं आणि तत्कालीन सत्ताधीशांच्या आवडीचे राजकीय-सामाजिक कार्यक्रम पूर्ण करण्यासाठीच काम करणं, हे अन्यायकारक आहे. त्याच्या आवडीच्या विषयात मूलभूत संशोधन करणार्‍या शास्त्रज्ञाला अमूकच विषयात संशोधन करायला सांगणं, किंवा त्याला तसं संशोधन करावं लागेल, अशी परिस्थिती निर्माण करणं, हे घातक आहे.

सरकारनं दिलेल्या आर्थिक मदतीवर चालणार्‍या संशोधनसंस्थांमधल्या संशोधनामुळे देशातल्या नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करता याव्यात, ही अपेक्षा योग्य आहे आणि देशातल्या अनेक संस्था त्या दिशेनं काम करतही आहेत. मात्र नवी ’स्टार्टअप्स’ सुरू होणं म्हणजे वैज्ञानिक प्रगती नव्हे. शिवाय राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा किंवा टीआयएफआर अशा मूलभूत संशोधनासाठी नावाजल्या गेलेल्या संस्थांकडूनही असंच आणि इतकंच संशोधन व्हावं, ही अपेक्षा गैर आहे. या संस्थांमधल्या संशोधनावर किती पैसा खर्च झाला आणि त्यातून ’परतावा’ किती मिळाला, असा हिशेबही चुकीचा आहे. मूलभूत संशोधनावर होणारा खर्च आणि त्यातून होणारा ’फायदा’ हा एखाद्या आर्थिक वर्षातल्या नफ्यातोट्याच्या परिमाणात मोजायचा नसतो. त्या संशोधनाचे परिणाम दिसायला बराच कालावधी लागू शकतो, शिवाय त्याचं तत्काळ, ढोबळ मूल्यमापनही शक्य नसतं. कारखान्यांना आणि उद्योजकांना लावले जाणारे निकष मूलभूत संशोधनासाठी वापरणं हे नक्कीच योग्य नाही. या देशासमोर असलेले अन्नधान्याचे, आरोग्याचे प्रश्न किंवा नद्यांची आणि रस्त्यांची स्वच्छता यांसाठी तंत्रज्ञान विकसित करताना मूलभूत विज्ञानाचा बळी जाणं हितावह नाही.

देश स्वयंपूर्ण व्हावा, नवी तंत्रज्ञानं विकसित व्हावी या अपेक्षापूर्तीसाठी संशोधनाला पाठिंबा देऊन शास्त्रज्ञांना मोकळीक मिळायला हवी. विज्ञान - कला - संगीत - चित्रपट - खेळ अशा कुठल्याच क्षेत्रांतलं ’इनोव्हेशन’ आचार-विचारस्वातंत्र्याअभावी घडू शकत नाही. या बाबतीत रामानुजनचं उदाहरण बोलकं आहे. आगळ्यावेगळ्या पद्धतीनं गणित करणार्‍या रामानुजनला प्रचलित पद्धत शिकवायचा प्रयत्न हार्डीनं केला. परंतु ते मानवत नाही, हे ध्यानात येताच त्यानं पूर्ववत पद्धतीवर भर दिला. अशा परिपक्वतेची व लवचिकतेची आज गरज आहे.

विज्ञाननिष्ठ समाज हा नेहमी प्रगतिशील समाज असतो. ज्या देशांनी मूलभूत संशोधनात गुंतवणूक केली ते देश नेहमीच प्रगत झाले आहेत. अर्थात आपल्याला प्रगत व्हायचे असेल तर मूलभूत विज्ञानांतील गुंतवणुकीला पर्याय नाही.

मूलभूत संशोधनासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांच्या कमतरतेमागे निधीचा अभाव हे महत्त्वाचं कारण असलं, तरी त्या अभावामागे असलेलं वैज्ञानिक दृष्टीचा अभाव हे कारण अधिक गंभीर आहे. मूलभूत संशोधन महत्त्वाचं का, याचं उत्तर जर सामान्य जनतेला माहीत असेल, तर शास्त्रज्ञांना समाजातून आपोआप प्रोत्साहन मिळेल, शिवाय सरकारदेखील त्याकडे अधिक गांभीर्यानं बघेल. यासाठी मूलभूत संशोधनाला लोकाश्रय मिळायला हवा. विज्ञानाविषयी भारतीयांचा अत्यंत उदासीन असा दृष्टिकोन बदलण्याची नितांत गरज आहे. अर्थात याचं काही अपश्रेय शासनाच्या आणि खुद्द संशोधकांच्या माथी आहे. त्यांनी पुढाकार घेऊन आपलं संशोधन लोकांपर्यंत नेलं पाहिजे.

एकीकडे मूलभूत विज्ञानाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असताना छद्मविज्ञानाला राजाश्रय मिळणं ही गंभीर बाब आहे. या देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाची धोरणं आखणार्‍या, निर्णय घेणार्‍या आणि निधिवाटप करणार्‍या संस्था आणि संस्थाचालक छद्मविज्ञानाचा पुरस्कार करताना दिसून येतात. विज्ञानाशी संबंध नसलेल्या बिगरसरकारी संस्थाही सरकारी संशोधनसंस्थांच्या कामकाजात ढवळाढवळ करून छद्मविज्ञानाचा प्रचार करताना, त्यासाठी निधी मिळवताना दिसतात. विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार होणं हे जागृत आणि सक्षम समाजाच्या जडणघडणीसाठी एक अत्यावश्यक बाब आहे. हे घडण्यासाठी सामान्य नागरिकांना विज्ञान म्हणजे नेमकं काय, हे समजणं जसं महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे त्यांना कुठले दावे केवळ शास्त्राचा देखावा करीत आहेत, हे ओळखता येणंही गरजेचं आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांतील कालबाह्य, अतार्किक आणि प्रसंगी क्रूर अशा प्रथांना वैज्ञानिक अधिष्ठान मिळवून देण्याचा प्रयत्न सतत होतो आहे. त्याचबरोबर वेद-पुराण आणि महाकाव्यं यांतला प्रत्येक संदर्भ हा शास्त्रीय आधारावरच उभा आहे, हे ठसवण्याचा जोरकस प्रयासही चालू आहे.

छद्मविज्ञानी संस्था आणि त्यांचे दावे यांचं सर्वांत महत्त्वाचं लक्षण म्हणजे त्यांच्या राजकीय, धार्मिक अथवा सांस्कृतिक मतांचा त्यांच्या निष्कर्षांवर असलेला जबरदस्त पगडा. या मतांप्रमाणे संशोधनाचे निष्कर्ष आले नाहीत, तर त्यांच्यात अक्षम्य फेरफार केले जातात किंवा अस्तित्वात असलेल्या सिद्धांतालाच नाकारलं जातं. संशोधन करताना त्याचा निकाल आधीच ठरवून मग सुरुवात करण्याचा हा उरफाटा उद्योग आहे. आधीच ठरलेल्या निष्कर्षांना पूरक असलेली निरीक्षणं घेऊन केलेल्या वैज्ञानिक तपासणीमुळे झालेल्या नुकसानाची कितीतरी उदाहरणं आहेत.

छद्मविज्ञान हे ज्ञान आणि सत्य यांच्या मूलभूत संकल्पनेवरच हल्ला चढवत असतं. त्याचप्रमाणे खऱ्या शास्त्रीय संशोधनांवर जो पैसा आणि मनुष्यबळ खर्च होणं अपेक्षित आहे, त्याचा अपव्यय अशा निरर्थक ’शोधां’मुळे केला जातो. 'आपल्या महान, पुरातन परंपरेला सगळंच ठाऊक होतं, आपल्या पूर्वजांनी सगळेच शोध लावले होते', अशी भ्रामक अहंगंड जपणारी आणि स्वकष्टानं नवी ज्ञाननिर्मिती करण्यापासून परावृत्त करणारी घातक वृत्ती समाजात बोकाळणं, हा छद्मविज्ञानाचा सगळ्यांत मोठा धोका आहे.

भारतीय वैज्ञानिक परंपरेत अभिमान बाळगावा, अशा अनेक गोष्टी आहेत हे सत्य कुणीच नाकारणार नाही. परंतु त्या गोष्टींबद्दल न बोलता भलत्याच गोष्टींचा अभिमान बाळगावा, असा अभिनिवेश समाजात बोकाळला आहे. उदाहरणार्थ, डायोफंटाईन इक्वेशन्स सोडवण्यामध्ये ब्रह्मगुप्त आणि भास्कराचार्य यांसारखे भारतीय गणिती पाश्चात्य गणितज्ञांपेक्षा काही शतकं आघाडीवर होते. परंतु ब्रह्मगुप्ताची 'कुट्टक' किंवा भास्कराचार्यांची 'चक्रवाल' पद्धत यांविषयी भारतीयांना किंवा आपल्या नवीन पिढीला काहीच माहिती नाही. याउलट 'वैदिक'ही नसलेल्या व 'गणित'ही नसलेल्या काही क्लृप्त्या 'वैदिक गणित' मानून त्यालाच आपला वारसा मानण्याचं खूळ समाजात वेगानं पसरतं आहे. चरकसंहितेचा आधार घेऊन सूक्ष्मकणांवर आणि भस्मांवर संशोधन करणार्‍या नॅनोशास्त्रज्ञांचं, किंवा आवळ्याच्या रसामुळे गॅमा किरणांपासून होणारी हानी कमी होऊ शकते, असं संशोधन करणार्‍या भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांचं काम बघण्या-वाचण्यापेक्षा आपण ’गणपती आणि प्लास्टिक सर्जरी’ यांबद्दल बोलतो. याची परिणती आपल्या खर्‍याखुर्‍या ठेव्यावर प्रेम करणारी संयत राष्ट्रभक्ती सोडून एक भलताच आक्रमक व अनिष्ट राष्ट्रवाद वेगानं मूळ धरू लागण्यात होत आहे.

छद्मविज्ञानाला नाकारणं म्हणजे धर्माला नाकारणं आणि तसं करणं म्हणजे देशद्रोह अशीही विचारधारा मूळ धरू पाहत आहे. विज्ञानाची सांगड सातत्यानं धर्म आणि अध्यात्म यांच्याशी घातली जात आहे. धार्मिक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या दोन समांतर धारा आहेत, आणि त्या तशाच असाव्यात. धार्मिक ग्रंथांमधल्या साहित्यांत विज्ञान शोधण्याच्या प्रयत्न सगळ्याच धर्मांमध्ये केला जातो. पण विज्ञान आणि धर्म यांच्या आपल्या आयुष्यातल्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. विज्ञानाचा परीघ मोठा आणि सर्वसमावेशक आहे. त्याची तुलना कोणत्याही धर्माशी करून आपण विज्ञानाचं कार्य आणि व्याप्ती या दोहोंवर अन्याय करतो. पण विज्ञान आणि धर्म या दोहोंसाठी हानिकारक असा एक मानवी दुर्गुण आहे - असहिष्णुता.

अ‍ॅरिस्टोटल म्हणाला होता - एखादी गोष्ट पटत नसली तरी तिचा सगळ्या बाजूंनी विचार करणं, हे सुविद्य मनाचं लक्षण आहे. असहिष्णुता ही जशी सगळ्या धर्मांच्या मूलभूत शिकवणींवरच घाला घालते, तशीच ती वैज्ञानिक तपासाच्या पायावरही आघात करते. धार्मिक असहिष्णुतेमुळे हिंसाचार होतो, शांतता भंग होते. बौद्धिक असहिष्णुतेमुळे विज्ञानाचं नुकसान होतं. विज्ञानाची व्याप्ती मोठी असली तरी वैज्ञानिक होण्याआधी बरेचदा माणसाच्या मनावर धार्मिक संस्कार झालेले असतात. त्यातूनच विज्ञान आणि धर्म यांची सांगड घालायचा मोह निर्माण होतो. पण धार्मिक शिकवणीनं मन खुलं झालं असेल, तरच ते विज्ञानाला पोषक बनू शकतं. धार्मिक शिकवणीनं बंद झालेलं असहिष्णू मन हे विज्ञानासाठी धोकादायक आहेच, शिवाय धार्मिक संस्कारांच्या अंतिम ध्येयाला, म्हणजे वैयक्तिक मनःशांती आणि समाधान यांनासुद्धा असं मन पोषक नाही.

सहिष्णुतेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्वत:च्या श्रद्धेला असलेली संशयाची किनार. ही संशयाची किनार आपण स्वत:च द्यायची असते. स्वत:च्याच श्रद्धेकडे किंचित संशयानं, कणभर अविश्वासानं पाहणं म्हणजे तारेवरची कसरत. पण ही कसरत कशी करायची, हे विद्न्यानाकडून शिकता येतं. अशी धार्मिक श्रद्धा आपोआप सहिष्णुतेचा कित्ता गिरवते.

सारासार आणि तारतम्यानं विचार करणं या गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा गाभा होत. आपल्या आसपास होणार्‍या घटनांचे अर्थ लावताना त्यात हा सारासार विचार करता आला पाहिजे. हा अर्थ लावताना आपले पूर्वग्रह व आपल्या श्रद्धा खुलेपणानं मान्य करणं आवश्यक आहे. एखादं अनुमान काढताना आपली गृहितकं कोणती, ही बाबतर सतत तपासून पाहावी लागेल. त्या गृहितकांवर कोणी आक्षेप घेतला, तर त्या आक्षेपांना उत्तर देता आलं पाहिजे. उत्तर देणं व प्रतिक्रिया देणं यांत महदंतर आहे. प्रतिक्रिया देण्यात केवळ स्वतःच्या मतांच्या कातडीचा बचाव आहे. उत्तर देण्यात इतरांनी मांडलेल्या मुद्द्यांवर मनन अपेक्षित आहे. या मननात ’आपण ज्या गोष्टींना पुरावा समजतोय त्यांना पुरावा का मानले जावे?’, ’आपली गृहितकं कोणती?’, ’आपण जो निष्कर्ष काढला आहे, त्याच्या मर्यादा कोणत्या?’ या प्रश्नांची उत्तरं शोधणं अंतर्भूत आहे... हे खरं संशोधन होय. या गोष्टी विज्ञानजगतात कराव्या लागतात, त्यामुळे आपण त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो आणि या खंडनमंडनातून निघतं त्याला (आणि त्यालाच) संशोधनाचा दर्जा प्राप्त होतो.

जोपर्यंत समाजमानसिकतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन मोठ्या प्रमाणात स्वीकारला जात नाही, तोपर्यंत समाजशास्त्र, मानव्यशास्त्रे इत्यादी विद्वत्‌शाखांमध्येही मूलगामी, समाजोपयोगी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं संशोधन व त्याचे उपयोजित फायदे निर्माण होणं अशक्य आहे. विज्ञानसंशोधनाला पाठिंबा देताना त्यात सामाजिक व मानव्यशास्त्रेही अंतर्भूत आहेत, हे विसरता कामा नये. कारण वर्ण्य-विषय वेगळे असले, तरी संशोधन व ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया यांचे निकष व घटक समानच असतात.

वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं हे सर्वसामान्य नागरिकाला नक्कीच जमू शकतं. किंबहुना, असा दृष्टिकोन बाळगून सारासार विश्लेषण करता येणं, ही आपल्या हितासाठी आवश्यक गोष्ट ठरते. शास्त्रीय दृष्टिकोनाअभावी तरतमभाव येत नाही. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला सर्वच शास्त्रांचं ज्ञान नसतं, ते आवश्यकही नाही. आवश्यक आहे ती शास्त्रीय विचार करण्याची क्षमता आणि त्याहीपुढे जाऊन तसा विचार सातत्यानं करण्याची सवय. ज्या समाजाच्या नागरिकांना अशा पद्धतीच्या सारासारबुद्धीचं महत्त्व पटत नाही, त्या समाजाला अज्ञानामध्ये जखडून ठेवणं सोपं असतं, कारण अशा समाजाला वि-ज्ञान व छद्मज्ञान यांत फरक करता येत नाही. शास्त्रीय दृष्टिकोन न बाळगणारं राष्ट्र भावनिकतेच्या आहारी जाण्यात सुख मानतं. अशा राष्ट्राच्या अस्मितांची जपणूक न होता त्या अस्मितांचं रूपांतर दुराग्रहांमध्ये होतं. विज्ञान वापरणं म्हणजेच वैज्ञानिक विचारपद्धतीतून येणारी सारासारबुद्धी वापरणं नव्हे. केवळ विज्ञान वापरणारा समाज ज्ञानाधिष्ठित राहतो, पण ज्ञानोपासक बनत नाही. आपल्या संशोधनाचं, आपल्या मतांचं साक्षेपी खंडन होणं, हा आपल्या बुद्धीवर घेतला गेलेला संशय नसून सत्यान्वेषणाची ती अतिशय सशक्त पद्धत आहे. हे कळलं नाही तर ज्ञान / सत्य ’असं असतं’ आणि ’असं असायला पाहिजे’ यांतला फरकसुद्धा कळत नाही. हा भेद जेव्हा एखाद्या नागरिकसमूहाला कळेनासा होतो, त्या नागरिकसमूहात, पर्यायानं त्या राष्ट्रात 'सत्य काय' हे उचित व यथायोग्य अन्वेषणाआधीच ठरवलं जातं. अशा सत्यासाठी 'सत्यमेव जयते'चा घोष करणं ही त्या राष्ट्रानं स्वतःचीच केलेली घोर फसवणूक ठरते.

आपल्या राज्यघटनेतलं ५१अ हे कलम आपल्याला ज्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं त्यांचा आदर्श बाळगायला, आपल्या देशातल्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचं जतन करायला, पर्यावरणाचं संवर्धन करायला, धर्म-जात-भाषा-प्रांत यांत भेद न करता बंधुभाव वृद्धिंगत करायला सांगतं. घटनेचं हेच कलम वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शोधक वृत्ती विकसित करणं, हे आपलं मूलभूत कर्तव्य असल्याचं आपल्याला सांगतं.

भारतीय राज्यघटनेत सांगितल्याप्रमाणे या देशात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी प्रयत्न केले जावे, प्रश्न विचारण्याची, शंका घेण्याची प्रत्येकाला मुभा असावी, धर्म-जात-वंश-भाषा-लिंग यां भेदांपलीकडे जाऊन आचार-विचारस्वातंत्र्य असावं, अशी आमची इच्छा आहे.

आमच्या या मागण्यांसाठी आम्ही व आमच्यासारखे अनेक शास्त्रज्ञ - शिक्षक - विद्यार्थी - वैज्ञानिक मूल्यांचा आदर राखणारे नागरिक येत्या बुधवारी, म्हणजे ९ ऑगस्ट, २०१७ रोजी देशभरात संचलनात सहभागी होणार आहेत.

आमचा हा लढा कोणत्याही एका सरकारविरुद्ध किंवा राजकीय पक्षाविरुद्ध नाही. आमची बांधिलकी वैज्ञानिक दृष्टिकोनाशी, लोकशाहीशी आणि सहिष्णुतेशी आहे. आम्हांला ज्यांबद्दल मनस्वी आदर आणि प्रेम आहे, अशा वैज्ञानिक मूल्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत.

आपला पाठिंबा आम्हांला मिळाल्यास व आपणही या संचलनात सहभागी झाल्यास आमच्या लढ्यास बळकटी येईल.

धन्यवाद.

डॉ. आदित्य कर्नाटकी (भास्कराचार्य)
डॉ. आरती रानडे (रार)
केतन दंडारे (अरभाट)
डॉ. चिन्मय दामले (चिनूक्स)
डॉ. जिज्ञासा मुळेकर (जिज्ञासा)
वरदा खळदकर (वरदा)
डॉ. सई केसकर (सई केसकर)
सत्यजित सलगरकर (आगाऊ)

***

या मसुद्यातल्या डॉ. चिन्मय दामले यांच्या मतांशी मायबोली.कॉमचा संबंध नाही. ती त्यांची वैयक्तिक मतं आहेत.

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'असहिष्णुतेच्या मुद्द्याचा आणि विज्ञानाचा संबंध काय' असं सकृतदर्शनी वाटू शकतं हे मान्य, परंतु ते पूर्णतः योग्य नाही, असं आम्हाला वाटतं. ह्यामागची कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी ह्या लेखाचा व एकंदरच आंदोलनाचा उद्देश पूर्णपणे समजून घ्यायला हवा. आतापर्यंतच्या प्रतिसादांत 'वैज्ञानिकांना मिळणारा निधी' ह्यावर काही चांगले मुद्दे दोन्ही बाजूंकडून उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर 'वैज्ञानिक विचारांवर आधारित धोरणे' या मुद्द्यालाही लोकांची बर्‍यापैकी संमती जाणवते. ह्या सर्व चर्चेचा रोख 'सरकारकडून विज्ञानक्षेत्राच्या असलेल्या अपेक्षा' ह्या सदरात मोडतो.

ह्या अपेक्षा ह्या थोड्या 'भौतिक' (material) स्वरूपाच्या आहेत. त्यांचा आणि विज्ञानाचा प्रत्यक्ष संबंध आहे. परंतु ह्या आंदोलनाद्वारे आम्हाला एवढ्याच अपेक्षांवर थांबायचं नाही. लेखात म्हटल्याप्रमाणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समाजमानसात प्रसार व्हावा, असंही आम्हाला वाटतं. इतकंच नव्हे तर असे संवैधानिक तत्व असलेला भारत हा जगातील मोजक्या देशांपैकी एक, कदाचित एकमेवदेखील, असावा. त्यामुळे भारतीय शास्त्रज्ञांच्या मागण्या ह्या इतर देशांपेक्षा थोड्या निराळ्या असू शकतात, नव्हे असाव्यात, ह्यात काही वावगं वाटत नाही.

ह्या भौतिक मागण्यांच्या पलीकडे जाऊन केलेली एक 'तात्विक' (philosophical) मागणी देशातील धार्मिक असहिष्णुतेबद्दल आहे. ह्याचं मुख्य कारण म्हणजे धार्मिक कट्टरवाद किंवा असहिष्णुता ही खरंतर वैचारिक सहिष्णुतेचा अभाव दर्शवते. 'माझ्या धर्मात जसं लिहिलं आहे तसंच सगळ्यांनी वागावं' ह्यासारखी अपेक्षा कुठल्याही धर्माकडून झाल्यास ती अवाजवी असते. 'माझ्या धर्मात पुरातन काळी लिहिलेल्या गोष्टीवर आधारित हे विज्ञान आहे असं मला माझ्या धर्माच्या अधिकारी माणसांनी सांगितलंय, मग ते चूक असूच शकत नाही' अश्यांसारख्या समजुती समाजात ह्या ना त्या कारणाने प्रचलित होत असतील, तर ही वेगळ्या विचारांबाबतची, तसेच पुराव्यांबाबतची असहिष्णुताच आहे. धार्मिक असहिष्णुतेमधून वैचारिक असहिष्णुता व्यक्त होत असते. थोडासा जरी वेगळा सूर लागला, तरी त्यास नावं ठेवणारी, रद्दबातल ठरवणारी अशी मानसिकता वैज्ञानिक दृष्टिकोनास पोषक आहे, असं आम्हाला वाटत नाही. विज्ञानाचा व सहिष्णुतेचा अगदी प्रत्यक्ष संबंध वाटत नसला, तरी दूरान्वयेही काही संबंध नाही, असं म्हणता येत नाही, असं आम्हाला वाटतं. विज्ञान संशोधनास योग्य निधी देऊन, व शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देऊन अल्पावधीसाठी फायदा होईल; परंतु दीर्घावधीमध्ये समाजमनात जर वैज्ञानिक मूल्ये रुजवायची असतील, तर विचारांची असहिष्णुता दूर झाली पाहिजे, असं आम्हाला वाटतं. ह्यासाठी हा प्रपंच आहे.

'असहिष्णुतेच्या मुद्द्याचा आणि विज्ञानाचा संबंध काय' असं सकृतदर्शनी वाटू शकतं हे मान्य, परंतु ते पूर्णतः योग्य नाही, असं आम्हाला वाटतं. ह्यामागची कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी ह्या लेखाचा व एकंदरच आंदोलनाचा उद्देश पूर्णपणे समजून घ्यायला हवा.
>>
तुम्हाला म्हणजे कोणाला? किती जण आहात तुम्ही? सही केलेले पत्र आहे का सगळ्यांचे?
हीच भुमीका का घ्यावी वाटली याचे प्रत्येकाचे वयक्तीक अभासु मत कुठे वाचायला मिळेल?

हे मोर्चा फ्लॉप जाण्याआधी, जेव्हा आम्ही सगळे विचारत होतो तेव्हाच का नाही सांगीतले? आता पडेल मोर्चाचे स्पष्टीकरण देऊन काय साध्य होणार?

इतकंच नव्हे तर असे संवैधानिक तत्व असलेला भारत हा जगातील मोजक्या देशांपैकी एक, कदाचित एकमेवदेखील, असावा.
>>
कौनसा संवैधानिक तत्व?
मुस्लीमांना वेगळा कायदा लावणारे तत्व? उच्चविर्णीयांना जातीवाचक अपमानाविरुद्ध संरक्षण न देणारे तत्व? अशे हजार मुद्दे निघतील.

ह्या भौतिक मागण्यांच्या पलीकडे जाऊन केलेली एक 'तात्विक' (philosophical) मागणी देशातील धार्मिक असहिष्णुतेबद्दल आहे. ह्याचं मुख्य कारण म्हणजे धार्मिक कट्टरवाद किंवा असहिष्णुता ही खरंतर वैचारिक सहिष्णुतेचा अभाव दर्शवते. 'माझ्या धर्मात जसं लिहिलं आहे तसंच सगळ्यांनी वागावं' ह्यासारखी अपेक्षा कुठल्याही धर्माकडून झाल्यास ती अवाजवी असते.
>>
मग हे तुम्हाला आत्ताच करावे का वाटले?
एवढी मोठी जमीन दोन नवे देश द्यायचे म्हणून उधळली,
वेगळा लॉ बोर्ड काढला,
शहाबानोत कायदा फिरवला,
एवढे बाँबस्फोट झाले,
काही संबंध नसतानामुंबईत हिंसक मोर्चे काढले गेले,
कारसेवकांची हत्या केली,
फाळीणीत जीवितहानी झाली,
शनिवारवाड्यामधे अनधिकृत प्रार्थनास्थळ उभारले व इतर हजारो घटना घडल्या तेव्हा तुम्ही काय केले असहिष्णूतेबद्दल?
की हे सर्व असहिष्णूता नव्हतेच "सायंटीस्टांच्या" मते?

अभिच क्यों?

अभिन_व,

सहमत !
उगा ताकाला जाऊन भांडे लपवायचा प्रकार आहे हा सगळा.

माझा ह्या मोर्चाला पाठींबाच होता. पण काहीतरी ठोस आणि सुस्पष्ट मागण्या झाल्या पाहिजेत असे मला वाटते.

विचारांची असहिष्णुता दूर झाली पाहिजे, असं आम्हाला वाटतं. ह्यासाठी हा प्रपंच आहे. >>>> विज्ञानवादी ह्यात सरकार काय करणार हे समजले नाही. म्हणजे कोणती ठोस पावले उचलावीत असे तुम्हाला वाटते? तुम्ही जी पोस्ट लिहिली आहे त्यापद्धतीची व्हेग मागणी निदान शास्त्रज्ञ, संशोधक किंवा वैज्ञानिकांकडून अपेक्षित नाही.

"सिमी दी फर्स्ट कनव्हिक्शन इन इंडिया" पुस्तक परिचय
https://www.maayboli.com/node/63412

जळगावातील निष्पाप तरुणवर्ग धार्मीक कट्टरवादाला बळी पडत असताना, त्यावेळच्या "सायंटीस्ट" वर्गाने या असहिष्णूतेविरोधात - जे की देशाविरुद्ध युद्ध पुकारणेही होते - त्याविरोधात काय ठोस पाउले उचलली ते माहिती करुन घ्यायचे आहे. याबद्दल कुट्ठे माहिती मिळेल?

एवढ्या प्रमाणात तरुण पिढी "विज्ञानाची" कास धरण्याएवजी कट्टर होऊन वाया गेली हे शोभते का "सायंटीस्टांना"?

धन्यवाद.

'माझ्या धर्मात जसं लिहिलं आहे तसंच सगळ्यांनी वागावं' ह्यासारखी अपेक्षा कुठल्याही धर्माकडून झाल्यास ती अवाजवी असते. 'माझ्या धर्मात पुरातन काळी लिहिलेल्या गोष्टीवर आधारित हे विज्ञान आहे असं मला माझ्या धर्माच्या अधिकारी माणसांनी सांगितलंय, मग ते चूक असूच शकत नाही' अश्यांसारख्या समजुती समाजात ह्या ना त्या कारणाने प्रचलित होत असतील, तर ही वेगळ्या विचारांबाबतची, तसेच पुराव्यांबाबतची असहिष्णुताच आहे.

<<

शरिया कायद्यात लिहिलेल्या प्रथा/कायदे, आज एकविसाव्या शतकात तुम्ही का पाळता असा प्रश्न भारतातील मुसलमान जनतेला विचारायचे किंव्हा या विरोधात एकादा मोर्चा काढायचे धाडस तुमच्यात आहे का ? की ही असहिष्णुता फक्त हिंदू धर्माबाबत आहे?

कट्टेकरी चांगल्या चालणार्या चर्चेची वाट लावायला इथेही आले का? सगळीकडे यांचे हेच चालू असते ..

अडमिन यांना आवरता येत नाही ?

सुमुक्ता, ज्या भौतिक मागण्या आहेत, त्या सरकारकडून आहेत, हे पहिल्याच परिच्छेदात स्पष्ट केलेले आहे. विचारांच्या सहिष्णुतेबद्दलची मागणी ही देशातल्या सगळ्यांनाच उद्देशून आहे, केवळ सरकारला उद्देशून नाही. हा लेख वाचणार्‍या सर्वांनीच त्यावर विचारविमर्श करावा, असं आम्हाला वाटतं. देशाचं संवैधानिक तत्व उचलून धरणारी मागणी ही व्हेग असली, तरी ती ग्राह्य आहे. ह्या मागणीबाबत उचलता येणारी ठोस पावले ही एका मोर्चाद्वारे पूर्णपणे सांगता येत नसली, तरी विविध लेख आणि भाषणे ह्यांतून ती स्पष्ट होत असतात. डॉक्टर सत्यजीत रथ ह्यांचे ह्यासंदर्भात यूट्यूबवर भाषण - What is scientific temper? Why should anyone care? by Dr. Satyajit Rath - उल्लेखनीय आहे.

त्याचबरोबर आमच्या मागील एका प्रतिसादातील हा भाग पुन्हा लिहावासा वाटतो -

"गेल्या काही वर्षांपर्यंत समाजमाध्यमांचा बोलबाला नव्हता. प्रसिद्धीची तंत्रंही वेगळी होती. पत्रकं काढून, वर्तमानपत्रांत किंवा जर्नलांमध्ये पत्र / निबंध लिहून मतभेद व्यक्त केला जाई. ’जर्नल ऑफ सायंटिफिक टेंपर’मध्येही अनेकदा सरकारवर टीका झालेली आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांचा विरोध एका वर्तुळापुरता मर्यादित राहिला असावा. अ-शास्त्रीय वक्तव्यं आणि वागणूक यांना विरोध हा आजच होतोय आणि तो फक्त याच सरकारला होतोय, असा समज खरा नाही. पूर्वीही विरोध होता. "

हा मोर्चा सरकारविरोधी नाही, हे लेखातही स्पष्ट केलेले आहे. ह्या मोर्चाचा एक उद्देश वैज्ञानिकांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचावा हाही आहे. वैज्ञानिकांनी फक्त सरकारकडे केलेल्या मागण्या, असं ह्या मोर्चाचं स्वरूप नाही, तर लोकाभिमुख होऊन लोकांशी संवाद वाढवावा, अश्या प्रकारचं आहे. हा लेख हादेखील अश्याच पुढाकारातून तयार झालेला आहे. अश्या संवादातून देशातल्या वैचारिक वातावरणाविषयी काय अपेक्षा आहेत, हे पुढे यावं, हे आम्हाला नैसर्गिक वाटतं.

तर लोकाभिमुख होऊन लोकांशी संवाद वाढवावा, अश्या प्रकारचं आहे. >>> मोर्चा काढून सरकारकडे मागण्या करता येतात पण समाज बदलता येत नाही. जनजागृतीचे काम एका दिवसात होत नसते. त्यासाठी खूप मोठा कालावधी जावा लागतो. खूप लोकांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे भविष्यात काय पावले उचलायची ह्याबद्दलसुद्धा काही रुपरेषा तयार केली असेल तर ती काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल.

हे मोर्चा फ्लॉप जाण्याआधी, जेव्हा आम्ही सगळे विचारत होतो तेव्हाच का नाही सांगीतले? >>> अभि_नव, तुम्ही इथे चर्चेत कोठे सामील झालात? इथे अनेकांनी एवढ्या मोठ्या लेखातील एक दोन वाक्ये उचलून हे सगळे भाजप/मोदी/हिंदू विरोधी आहे हा निष्कर्ष काढला आणि पुढे काहीच लिहीले नाही. निधी वाढवणे, संशोधनाबद्दलचा वैज्ञानिक दृष्टीकोन ई बद्दल तुम्ही लिहा अजूनही. मोर्चे काय होतच राहतील.

बाकी तुम्ही जे मुस्लिम लोकांनी केलेल्या काड्यांबद्दल लिहीले आहे ते त्या त्या वेळी नीट हॅण्डल केले नाही असे मीही तुमच्याइतकाच समजतो. पण त्याचा जाब इथे विचारून काय उपयोग? वरती "सर्वच धर्मातील" असा उल्लेख असताना तो केवळ हिंदूंना टार्गेट करण्याबद्दल आहे असे गृहीत का धरायचे?

सुमुक्ता - कारण हे फक्त सरकारबद्दल नाही. किंबहुना एखाद दोन मुद्देच सरकार बद्दल आहेत - बहुधा फक्त निधीचा. व्हॉट्सॅप वर जेव्हा एखादी गोष्ट शास्त्राने सिद्ध झालेली आहे असे ठोकून देणारे मेसेजेस येतात आणि आपण अनेक ग्रूप्स मधे अनेक लोक ते "अगदी खरं" म्हणून उत्तरे देताना व फॉरवर्ड करताना पाहतो, तेव्हा शास्त्र म्हणजे काय आणि सिद्ध म्हणजे काय या दोन्हीचा अर्थ लोकांपर्यंत पोहोचावा हा ही उद्देश मला इथे दिसतो.

आता हे वरच्या दोघांना उद्देशून नाही:
मी हिंदू आहे. मी बर्‍यापैकी धार्मिकही आहे. गणपती व इतर उत्सवात मी भरपूर रमतो, आणि स्वतःहून श्रद्धेने व तितक्याच आवडीने रमतो. मी स्वतः बीफ खात नाही. कधी खाईन असेही वाटत नाही. भारतीय सणांचे व परंपरेमधले एकूण सार्वजनिक उत्सवी स्वरूप मला खूप आवडते. जेव्हा मी इतर धर्मियांना असलेली बंधने, त्यांच्या धर्माबद्दल चर्चाही न करणे वगैरे प्रकार बघतो, तेव्हा एक हिंदू म्हणून मला असेलेले धार्मिक स्वातंत्र्य मला खूप आवडते. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली हिंदू लोकांना उगाच डिवचणे किंवा अतिरेकीपणा मधे उगाच equivalence शोधणे याच्या मी विरोधात आहे.

हे सगळे का लिहीले? तर मी एथिस्ट नाही. डाव्यांपैकी वगैरे तर चान्सच नाही. पण तरीही हा लेख व त्याचा उद्देश चांगला आहे. त्यातील काही मुद्द्यांना माझा पाठिंबा आहे (वरती पहिल्या पोस्ट मधे लिहीले आहे). ज्याला पूर्ण पाठिंबा नाही, जे मुद्दे संदिग्ध वाटले त्याबद्दलही वेगळे लिहीतो. पण हा लेख व मोर्चा हिंदू धर्माविरूद्ध नाही. हा लेख लिहीणारे लोक हिंदू धर्माविरूद्ध नाहीत असेच मी मला जितके माहीत आहे त्यावरून समजतो. हे लेख व मोर्चा विज्ञानाशी संबंधित आहे, त्याला पाठिंबा किंवा विरोध त्याच दृष्टीकोनातून व्हावा.

व्हॉट्सॅप वर जेव्हा एखादी गोष्ट शास्त्राने सिद्ध झालेली आहे असे ठोकून देणारे मेसेजेस येतात आणि आपण अनेक ग्रूप्स मधे अनेक लोक ते "अगदी खरं" म्हणून उत्तरे देताना व फॉरवर्ड करताना पाहतो, तेव्हा शास्त्र म्हणजे काय आणि सिद्ध म्हणजे काय या दोन्हीचा अर्थ लोकांपर्यंत पोहोचावा हा ही उद्देश मला इथे दिसतो. >>> मान्य आहे फारएण्ड. म्हणूनच मी वरच्या प्रतिक्रियेत म्हटले तसे परत म्हणते. "मोर्चा काढून सरकारकडे मागण्या करता येतात पण समाज बदलता येत नाही. जनजागृतीचे काम एका दिवसात होत नसते. "

मी स्वतः एक संशोधक आहे. संशोधन करताना येणार्‍या प्रश्नांची मला जाण आहे. त्या प्रश्नांच्या निमित्ताने सरकारकडे काही मागण्या असतील तर मोर्चा काढून सरकारचे लक्ष आपल्याकडे वळवून घेणे हेसुद्धा मला पटते. म्हणूनच मी ह्या मोर्चाला पाठींबा दर्शविला होत.

आता एक समाज म्हणून आपला दृष्टीकोन अ-शास्त्रीय असेल तर तो बदललाच पाहिजे हे ही मला कळते. पण एक मोर्चा काढून समाज बदलू शकत नाही हे बहुतेक इथल्या सर्वांनाच पटेल. म्हणून मी पुन्हा एकदा विचारते की भविष्यात काय पावले उचलायची ह्याबद्दलसुद्धा काही रुपरेषा तयार केली असेल तर ती काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल.

त्यामुळे भविष्यात काय पावले उचलायची ह्याबद्दलसुद्धा काही रुपरेषा तयार केली असेल तर ती काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल.
>>
या अनुषंगाने काही ठोस - भारतीय समाजासाठी चांगले - कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध नसलेले व छुपा अजेंडा नसलेले काम खरेच होणार असेल तर मी माझ्यापरीने सहभाग घ्यायला तयार आहे. इथे अनेक अनुभवी व त्या त्या शाखेचे शिक्षण घेतलेले शात्स्रज्ञ व इतर व्यक्ती आहेत. त्यांनी सुरुवात करावी.

मोदी सरकारच्या विज्ञान विरोधी धोरणा विरूद्ध वैज्ञानिकांचा विज्ञान मोर्चा होता
जर भारतातील शैक्षणिक अभ्यासक्रमातुन विज्ञान नष्ट केलं तर पुढच्या पिढ्या ह्या निव्वळ विवेकहीन बनुन जन्माला येतील. मग सापाच्या डोक्यावर पृथ्वी, सुर्याला गिळने, अमावस्या पौर्णिमेचे भुतं विद्यापीठ परिक्षेचा कधी भाग बनतील हे कळनार पण नाही. इंग्रज भारतात दाखल होईपर्यत भारतात विज्ञान विरोधी धोरणामुळेच ह्या एक हजार वर्षाच्या काळात भारत प्रगतीहीन राहिला आहे... आणि आज ही विज्ञान मोर्चाला दुर्लक्ष करून आम्ही प्रगती बाबत किती उदासिन आहोत हेच सिद्ध करतोय..

कालच्या ह्या मोर्च्याचे फुटेज मी इंडियन एक्सप्रेसच्या फेबुच्या व्हिडीओ वर बघितलं.मला त्यातलं प्रोफेसर दाणी यांचं बोलणं आवडलं.मोजकेच बोलले पण व्यवस्थित मुद्देसूद बोलले.बाकी एका बाईनी ट्रम्प वगैरे गोल गोल बोलणं घुमवल .तेव्हा मला अरे काय !काहीही असच वाटलं . नको ते मुद्दे कशाला घुसडवताय असंही वाटून गेलं

७ लाख शेतकरी विज्ञानाधारीत बेभरोशाच्या रासायनीक शेतीमुळे आत्महत्त्या करत होते त्यावेळेला कोणालाही कसलीही शुद्ध नव्हती !!
श्री पाळेकर यांच्या शेतीच्या मॉडेलने ऐका गायीच्या आधारावर ३० ऐकर शेती करता येते हे सिद्ध केल्यानेच आता सरकार संशोधनाकडे वळले आहे !!!

रासायनीक पद्धतीने केलेल्या व किटकनाशके मारलेल्या शेतीतही रोग व कीडींचा प्रादुर्भाव होतो.
पाळेकर गुरुजींच्या पद्धतीने केलेल्या शेतीत कोणतेही विषारी किटकनाशके न वापरताही कोणताही रोग त्रास देत नाही !
डाळींबावर हमखास लागणार्या तेल्या रोगाने शेतकरी त्रस्त झाले होते.पाळेकरांच्या पद्धतीने केलेल्या शेतीत तेल्या नावालाही सापडला नाही !!

जाधव पुराव्याशिवाय फेकाफेक करू नका, पालेकरांनी डाळींबाच्या तेल्याबद्दल काय शोध लावलाय जरा सांगाल का?

पाळेकर यांना शेतीतले रामदेवबाबा करताय कि काय?

संशोधनासाठी पुरेसा निधी मिळणं खरोखर खुप गरजेचं आहे आणि त्यादृष्टीने पावलं उचलल्याबद्दल सबंधितांच अभिनंदन.
जसं जसं लेखातील काही वाक्य आणि प्रतिसाद वाचत गेलो तसतसं काही वेगळचं असाव वाटायला लागलं , होप छुपा अजेंडा राबवत नसावेत . अन्यथा एका चांगल्या इनिशिएटीवचं अवार्ड वापसी फेल्युअर मध्ये रूपांतर व्हायचं .
सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली हिंदू लोकांना उगाच डिवचणे किंवा अतिरेकीपणा मधे उगाच equivalence शोधणे याच्या मी विरोधात आहे. >>> फा +१

मायबोली म्हणजे धमाल.
टीपिकल भारतीय, विशेषतः महाराष्ट्रीय वृत्ति - स्वतः काही करायचे नाही, पण कुणि काही करायला निघाले की फक्त त्यांच्यावर टीका. स्वतःला शहाणे समजून उग्गीच काहीतरी टीका करायची. या टीकाकारांपैकी अर्ध्याहून अधिक लोकांनी आयुष्यात एकहि विधायक कार्यक्रम ना स्वतः सुरु केला , ना त्याला सहकार्य केले.
<<<<<< एवढी मोठी जमीन दोन नवे देश द्यायचे म्हणून उधळली, ...........की हे सर्व असहिष्णूता नव्हतेच "सायंटीस्टांच्या" मते?>>>
हे असले प्रश्न विचारायचे प्रयोजन काय? हे प्रकार घडले तेंव्हा त्यात राजकारण, समा़जकारण करणार्‍या सगळ्यांचा संबंध होता, फक्त शास्त्रज्ञांना का दोष? इतरांना विचारले का? इतरांनी तरी काय केले? कदाचित कुणि काही प्रयत्न केलेहि असतील, पण या असल्या लोकांनी नुसतेच आधी का केले नाही, हा मार्ग का, इतकी मिनिटे झाली, अजून का प्रश्न सुटला नाही असले प्रश्न विचारले असतील!! मदत करणे दूरच!!
इतकी वर्षे काही सुधारणा नाही, मग आता करायचीच नाही का? सुरुवात तरी, ज्याने त्याने आपापल्या परीने.
देरसे आये दुरुस्त आये ही म्हण ऐकली नाही?
अहो शास्त्रज्ञ हेहि माणसेच आहेत, त्यांच्यात एकमत होऊन काही करायचे तर विचारविनिमय करावाच लागतो, करता येणे काय शक्य आहे काय नाही याचाहि विचार करावाच लागतो.
एव्हढाच महत्वाचा मुद्दा आहे की मूलभूत संशोधनास सरकारी मदत मिळावी. मूलभूत संशोधन सर्वच क्षेत्रात करायला हवे, त्याने सर्व प्रश्न एका क्षणात सुटणार नाहीत, पण सुरुवात तरी होईल. नाहीतरी असले नुसते प्रश्न विचारणार्‍या निरुद्योगी लोकांकडून कधीच काही होणार नाही.
खाजगी कंपन्या जे संशोधन करतात ते मूलभूत नसून त्याचा भर जास्तीत जास्त फायदा कसा करता येईल हे बघणे असते. पण तरी मूलभूत संशोधनाचे मह्त्व कमी होत नाही.

परंतु दीर्घावधीमध्ये समाजमनात जर वैज्ञानिक मूल्ये रुजवायची असतील, तर विचारांची असहिष्णुता दूर झाली पाहिजे, असं आम्हाला वाटतं. >> वैज्ञानिक मुल्य समाज असहिष्णु असला तर रुजणार नाहीत असा जो अर्थ ह्या वाक्यातून निघतोय तो विज्ञानाचा इतिहास बघता संपुर्ण चुकीचा आहे. त्यातुनही वैज्ञानिक मुल्य रुजलेला समाज सहिष्णु असेल असेही नाही. कारण विज्ञान हे ए-मॉरल आहे, विज्ञानाला सौंदर्यद्रूष्टी नाही आणि विज्ञानाने मिळालेले ज्ञान कसे वापरावे हे सुधा विज्ञान सांगत नाही.

मग असे असताना केवळ विज्ञानाच्या आधारावर सगळे मनुष्यजीवन कसे उभारता येइल? सरकारच्या सगळ्या पॉलिसीज केवळ त्यावरच कशा उभारता येतील ? त्यातुनही विज्ञानाने आलेले द्यान हे सगळ्या प्रष्णांचे उत्तर आहे हा गैर समज आहे. विज्ञान-ज्ञान हे एक प्रकारचे अर्धवट ज्ञानच आहे आणि ह्या अर्धवट ज्ञानाच्या जोरावर प्रत्येक वेळेस योग्य निर्णय घेतले जातीलच ह्याची कोणतीही शाश्वती नाही. असे असुनही कोणताही "विज्ञानवादी" विज्ञान ह्या प्रोसेसशी मोर्टली बांधला गेलेला असतो. जर भौतीक सत्य समजुन घ्यायचे असेल तर सध्या ही एकमेव प्रोसेस आहे.

त्यामुळे ज्याला कुणाला पुराणातल्या वांग्याच भरीत कितीही आवडीने खायच असेल तर खुशाल खा पण जर ते वांग आज उगवण्यात स्वारस्य असेल तर विज्ञानवादी होण्यावाचुन तुम्हाला कुठलाही पर्याय नाही.

>> वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समाजमानसात प्रसार व्हावा, असंही आम्हाला वाटतं. >> हे कुठल्याही सेन माणसाला वाटेलच. पण ते मोर्चा नेऊन कसं काय सध्या करणार?? जास्त निधी मिळाला की चांगले शिक्षक, चांगल्या प्रयोगशाळा तयार होतील, शास्त्रज्ञ निर्माण होतील त्यातून मुलांपुढे आदर्श निर्माण होतील आणि त्यातून हळूहळू दृष्टीकोन बदलेल. भाषण ऐकून/ मोर्चा नेऊन समाजाचा दृष्टीकोन कसा बदलेल? हे मुद्दाम या साठी विचारतोय कारण तुम्ही म्हणताय की तुम्हाला भौतिक अपेक्षांवर थांबायचे नाही.

>> हे इतकंच नव्हे तर असे संवैधानिक तत्व असलेला भारत हा जगातील मोजक्या देशांपैकी एक, कदाचित एकमेवदेखील, असावा. >> बरं मग? हे असं तत्व असल्याने किंवा नसल्याने भारताला आणि ते तत्व नसलेल्या इतर देशांना नक्की काय फायदा/ नुकसान झालं? एक तत्व अगदी संविधानात लिहिलं तरी त्याचा अर्थ न्यायव्यवस्थेने तसाच काढला का? याचे परिणाम ७० वर्षात दिसले का? मला नाही वाटत. हे परत आपण कसे ग्रेट, आपली पुराण कशी सुंदर आणि आपली घटना कशी महान या चालीवर जाणारे का?

पुढची तुमची तात्विक मागणी मला वैयक्तिकरित्या संपूर्ण मान्य आहे. पण भारतातील सगळे प्रॉब्लेम याने सोडवण्याच्या आदर्श ध्येयापेक्षा धर्म, सहिष्णुता हे मुद्दे सोडून स्टेप टू मध्ये घ्यावे. त्यावर अवाक्षर काढू नये असं मला वाटतं. हे सर्वसमावेशक केलं (भले डायल्युट झालं तरी) आणि मग फाईन ट्यून केलं तर यशाची शक्यता अधिक आहे, अन्यथा अधिकाधिक लोक सोडून जातील.
माझ्या धर्मगुरूने सांगितलं म्हणून बिग बँग वर कोणी विश्वास नाही ठेवला तर मूव्ह ऑन होऊन त्याला ज्या क्षेत्रात गती आहे तिकडे काम करू द्यावे.
>>विज्ञान संशोधनास योग्य निधी देऊन, व शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देऊन अल्पावधीसाठी फायदा होईल; परंतु दीर्घावधीमध्ये समाजमनात जर वैज्ञानिक मूल्ये रुजवायची असतील, तर विचारांची असहिष्णुता दूर झाली पाहिजे, असं आम्हाला वाटतं. ह्यासाठी हा प्रपंच आहे. >> हे टोटल फिल्मी टाळ्याखाऊ वाक्य झालं. कसं करणार हे?
ही पण पोस्ट लाख दुखोकी एक दवा टाईप ब्रॉड आणि म्हणूनच परिणामकारक वाटली नाही.
विज्ञानवादी दृष्टीकोन सरकारला सगळीकडे राबवायची इच्छा असेल तर उत्तमच पण जर सरकार याच्या विरोधी असेल तर जास्तीतजास्त लोकांना सामील करून दबाव निर्माण केला तर काही बदलेल. नाही तर इकडे आड तिकडे विहीर.

>>>>(१) भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या, म्हणजे जीडीपीच्या, कमीत कमी ३% इतका निधी वैज्ञानिक व तांत्रिक संशोधनास, तर कमीत कमी १०% इतका निधी शिक्षणक्षेत्रास देण्यात यावा.

(२) अवैज्ञानिक आणि प्रतिगामी विचारांच्या, तसंच धार्मिक असहिष्णुतेच्या समाजातल्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यात यावा. वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवी मूल्यं आणि शोधक वृत्ती ही संवैधानिक मूल्यं आचरणात आणण्यावर भर देण्यात यावा.

(३) शिक्षणपद्धतीत फक्त वैज्ञानिक पुराव्यांचा आधार असलेल्या विचारांचा अंतर्भाव असावा.

(४) सरकारची धोरणं ही पुराव्यांनी शाबित विज्ञानावर आधारित असावीत.<<<<

==========

म्हणजे संपूर्ण समाजच विज्ञानवादी बनावा अशी इच्छा आहे व त्यासाठी शासनाकडूनही विविध इनिशिएटिव्ह्ज घेतली जावीत अशी अपेक्षा आहे. 'मोर्चा काढून काय होणार' ह्या प्रश्नाला उत्तर असे की 'मोर्चा न काढून जे होईल त्यापेक्षा नक्कीच काहीतरी जास्त होईल'. 'हे सगळे आत्ताच का सुचत आहे' ह्या प्रश्नाला 'आत्ता तरी सुचते आहे हे काय वाईट आहे का' हे उत्तर आहे. 'ह्यात मोदी सरकारला छुपा विरोध आहे' ह्या मुद्यावर 'असला तरी काय बिघडले, विज्ञानवादाची कास धरण्याचे काम कोणत्या नेत्याच्या कारकीर्दीत होते आहे ह्यावर आक्षेप कशाला' असा मुद्दा मांडता येईल.

परंतु पेशवा ह्यांची पोस्ट (जी काही मला समजली ती) पटत आहे. नुसते विज्ञान व नुसते विज्ञानवादी असणे व अस्तित्व टिकून राहणे शक्य नाही. माणसाला जगायला एक मार्गदर्शक विचारसरणी आवश्यक असावी जी धर्म ह्या संकल्पनेतून मिळते. त्या संकल्पनेचे फायदे तोटे बघितले तर आजमितीला तोटे नक्कीच जास्त आहेत. पण तांत्रिक विकासाबरोबर हे तोट्यांचे प्रमाण कमी होत असून लोकांची मानसिकता अधिक विज्ञानवादी होऊ लागली आहे हेही तितकेच खरे!

नुसतेच विज्ञानवादी होण्याच्या प्रक्रियेचा अतिरेकी परिणाम म्हणून प्रेम, मानवी मूल्ये हे सर्व निरर्थक ठरेल. 'माणूस काय, एक शरीर आहे जे मरणार' अश्या दृष्टिकोनाने माणसे पाहू लागली तर काय उरले?

मोर्च्याच्या नुसत्या मागण्या मांडणेच बहुधा योग्य ठरेल. मागण्यांमागची भूमिका काहीशी स्वतः गंडलेली आणि दुसर्‍यांना गंडवणारीही वाटली.

मागण्यांना पाठिंबा!

'माणूस काय, एक शरीर आहे जे मरणार' अश्या दृष्टिकोनाने माणसे पाहू लागली तर काय उरले?

>>> सो कॉल्ड धर्म तरी वेगळं काय सांगतात?

धर्म सजीव अस्तित्वावर प्रेम करा असे सांगतात. संपूर्ण विज्ञानवादी झालेला समाज भावनिकदृष्ट्या कोरडा राहील.

नुसत्या मागण्या मांडणेच पुरेसे आहे, त्यामागची भूमिका मांडणे हे वादोत्पादक ठरू शकते.

धर्म सजीव अस्तित्वावर प्रेम करा असे सांगतात. संपूर्ण विज्ञानवादी झालेला समाज भावनिकदृष्ट्या कोरडा राहील.

>>> काहीही? मानवांतर्गत हिंसाचारात धार्मिकांचा किती सहभाग होता-आहे ह्याला इतिहास साक्षी आहे. बाकी या ठिकाणी तो वादाचा विषय होईल म्हणुन इथेच थांबतो.

Pages