आज ८:३०-९ पर्यंत ऑफिस मध्ये थांबायला लागणार होतं. मध्ये एक ब्रेक घेऊन मग कामाला सुरुवात करायचा विचार केला. मग अश्या वेळेस ऑफिस मधील तमाम पब्लिक चहा-कॉफी मशिनसमोर वेळ घालवताना पाहिलं आहे. आज आपणही हा प्रयोग करून पहावा असा विचार करून मी चहा-कॉफी मशीनपाशी पोचले. पण या वेळेस, कुठलही गरम द्रावण पोटात घालायची सवय नसल्याने (उगाच भलते विचार करू नका), काय प्यावं हा विचार करत होते. तेवढ्यात जोरात आवाज आला. पण आजूबाजूला तर कोणीच नव्हतं. नीट लक्ष दिल्यावर कळलं कि आवाज मशिनमधून येतो आहे. गंमत वाटली म्हणून जरा पुढे गेले तर.... कमालच होती. चहा आणि कॉफी चक्क एकमेकांशी बोलत होते. बोलत कुठले मला तर वाटलं भांडत होते.
चहा: अगं,अजून काही मी तुझं कौतुक करू शकत नाही. इतकं खूप झालं.
कॉफी: अजून? तुला माझं कौतुकच नाहीये. तुला चांगलं बोलताच येत नाही.
चहा: अगं, म्हणलं ना एकदा की तशी तुझी गोडी अवीट आहे.
कॉफी: असं नाही म्हणालास. तू म्हणालास, "काळे, जरा दूध जास्त घाल, मग गोड़ लागशील."
चहा: अगं, आता काळ्याला काळे नाही म्हणणार तर काय म्हणणार?
कॉफी: हेच हेच. तुला माझी किमंत नाहीये. बाहेर लोकं किती वेडी असतात एका कॉफीसाठी.
चहा: असं काही नाही. चहाचं वेड काही वेगळच असतं. ते तुला कसं कळणार? तू कुठे असतेस माझ्यासारखी कोणाच्याही हातात. तुझं जरा उच्च स्थान !
कॉफी: आता एवढा टोमणा मारायची काही गरज नाहीये. आजकाल तुझे ते भाऊ पण असतात माझ्याबरोबर, ग्रीन टी, लेमन टी....
चहा: हो. सध्या जरा आमचा पण भाव वधारतो आहे. बघ म्हणजे आता आमचे इतके प्रकार आहेत कीं काही दिवसात कॉफीला कोणी विचारणारच नाही.
कॉफी: हे फारच झालं आता. माझ्या कितीतरी मैत्रिणी आहेत ना cappuccino, Latte, डाएट कॉफी... . ते राहू दे. तुला सांगायचंच राहिलं. परवा त्या कॅफे कॉफी डे मध्ये मजाच आली.
चहा: तुला काय माहित ग इथे बसून त्या कॅफे मध्ये काय झालं ते?
कॉफी: मग, आमचं नेटवर्किंग एकदम सॉलिड आहे. पण ते महत्वाचं नाही. तर झालं काय ते ऐक. एक मुलगा आणि एक मुलगी कॅफे मध्ये आले होते. म्हणजे तसे ते रोजच येतात. पण त्या दिवशी, मूड एकदम romantic होता. मग त्या मुलाने काय केलं माहिती आहे का?
चहा: ते माहिती असतं तर मीच नसतं का सांगितलं? आणि ती मुलगी कशी होती ग?
कॉफीने: तुला काय करायचं आहे रे? तर, त्या मुलाने cappuccino ची ऑर्डर दिली आणि चक्क त्यावर "I Love You" असं लिहून propose केलं त्या मुलीला. ती मुलगी इतकी खुश झाली, इतकी खुश झाली आणि तिने चक्क.... चक्क
चहा: अगं, सांग ना पुढे ..
कॉफी: चक्क त्याला मिठीच मारली.
चहा: हॅट... एवढचं ना..
कॉफी: एवढचं काय? म्हणजे ती “हो” म्हणाली रे त्याला. माझी मैत्रीण तर इतकी खुश झाली होती.
चहा: आता तिला खुश व्हायला काय झालं ? तिला पण propose केलं का त्या मुलाने.
कॉफी: असा बोलतोस ना म्हणूनच आपली भांडण होतात. तिला इतका आनंद झाला की तिच्यामुळे ती दोघ भेटली ना एकमेकांना.
चहा: असं काही नाही. तिला म्हणावं इतकं खुश होण्याआधी जरा थांब. तोच मुलगा दोन दिवसांनी दुसऱ्याच मुलीला घेऊन येत नाही ना ते बघ आधी. हे कॅफे कॉफी डे मधलं प्रेम काही खरं नाही ग.
कॉफी: मग काय रस्त्यावरच्या चहाच्या टपरीवरचं प्रेम खरं का?
चहा: अगं तिथे असं नाटकीपणाने प्रेम व्यक्तच करावं लागत नाही, तिथे सगळा मामला दिलखूलास. दो दोस्त एक कटींग चाय, ऐकलं नाहीस का कधी?
कॉफी: म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? चहा तेवढा खरा, लोकांचा लाडका वगैरे का?
चहा: आता त्यात अजून वेगळ काय म्हणायचं आहे. ते तर माहितीच आहे सगळ्यांना.
कॉफी: अरे कोण सगळे? चल, आता एकदा हे सिद्धच करूया. आपण त्या लोकांसारखी एक निवडणूकच लढवूया. मग बघू कोण जिंकत ते.
चहा: कशाला उगीच वेळ वाया घालवतेस? तुला खूप प्रचार करावा लागेल. त्या पेक्षा जाऊ दे.
कॉफी: हो का? का रिंगणात उतरायच्या आधीच घाबरलास?
चहा: मी गमंत करत होतो तुझी. आणि आपल्याकडे निवडणूक लढवायचा रिकामा वेळ पडला आहे का? लोकांना तजेला देण्याचं काम आपलं. हे उगीच कुणाकडे जाऊन मते मागणं काही जमणार नाही आपल्याला.
कॉफी: ते खरं आहे. पण म्हणून "तू जास्ती प्रसिद्ध" असं मी मान्य करणार नाही. तुला माझ कौतुक करावचं लागेल.
चहा: ते करतोच मी अधूनमधून. इतकी वर्ष आपण एकत्रचं नाही का? म्हणून तर तुझ्याविरुद्ध असं लढायला काही आवडणार नाही मला.
कॉफी: खरचं रे. किती वर्ष आपण एकमेकांबरोबर आहोत ना. हॉटेलच्या मेनूकार्डपासून ते स्वयंपाकघराच्या डब्यापर्यंत. जोडीनेच असतो.
चहा: आणि भांडायला तरी कोणीतरी हवंच की.
कॉफी: म्हणजे पुन्हा भांडणार का आता?
चहा: चालेल. पण जरा विषय बदलूया. "चहाचे मळे आधी कि कॉफीच्या बिया" हा विषय घेऊया का?
कॉफी: अर्थातच, कॉफीच्या बिया.
आणि दोघं जोरजोरात हसायला लागली.
इतका वेळ मी या मशिनकडे का बघते आहे हे न कळून, जवळच उभा असलेला ऑफिस boy म्हणाला, " मॅडम, मशीन बंद पडलं आहे. चहा-कॉफी नाही मिळणार." मी त्याला म्हटलं, " अरे बंदच असणार. इथे किती वाद चालला होता. पण आता वाद मिटला आहे. मशिन चालू झालं असेल आता." त्याने या बाईने नक्की काय प्यायलं आहे असा शंकास्पद कटाक्ष माझ्याकडे टाकला आणि निघून गेला. जाऊ दे बिचारा. त्या पामराला काय कळणार इथे काय रामायण घडलं ते.
ही चहा-कॉफीची घरघरची कहाणी सर्व जगभर सफळ संपुर्णम!
चहा - कॉफी
Submitted by _तृप्ती_ on 28 July, 2017 - 00:48
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
व्वा लय भारी
व्वा लय भारी
मस्त !
मस्त !
खूप धम्माल लिहिलय
खूप धम्माल लिहिलय
अफ़लातून कल्पना
चहा तर एकद्दम आवडीची गोष्ट
चहा तर एकद्दम आवडीची गोष्ट आहे..दिवसाची सुरुवात च होऊ शकत नाही चहाशिवाय...
छान! मस्त लिहिलय ...लिहित रहा..
मस्तच!!
मस्तच!!
आयला... मस्तय हे... खरंच
आयला... मस्तय हे... खरंच अफलातून कल्पना...
पुढील लेखनास शुभेच्छा..
छान लिहले आहे
छान लिहले आहे
धन्यवाद ! तुम्हाला सगळ्यांना
धन्यवाद ! तुम्हाला सगळ्यांना ही कल्पना आवडली त्यामुळे अजून लिहायला पेन (खरं म्हणजे कीबोर्ड) सरसावते आहे
काही सूचना असल्यास जरूर कळवा.
छान लिहिलंय. मस्त कल्पना
छान लिहिलंय. मस्त कल्पना सुचतात तुम्हाला!
हेहे! मस्त कल्पना! छान
हेहे! मस्त कल्पना! छान लिहिलंय.
कॉफीकडे छान मग्ज पण आहेत मिरवायला
व्वा! छान कल्पना आहे.
व्वा! छान कल्पना आहे.
कॉफी शिवाय दिवसाची सूरवात आणि रात्रीची झोप नीट होतच नाही. मग अगदी ती काळीकुट्ट दूध नसलेली असली तरी चालेल.
असली कल्पना मला का नाही सुचत.
असली कल्पना मला का नाही सुचत...
पुलेशु...
मस्तच!
मस्तच!
हा हा, मस्त लिहिलय.. मजा आली
हा हा, मस्त लिहिलय.. मजा आली वाचायला
मी सुद्धा चहाबाज. कॉफी फक्त विकेंडच्या रात्री... अरेच्चा, म्हणजे आजच की .. नव्हे आताच की
मस्तच....
मस्तच....
माझ्यासारख्यासाठी चहा म्हणजे अम्रुत.... आता पुन्हा चहा करायला गेले तर मातोश्री चिडतील....
प्रतिसादाबद्दल सर्वाना
प्रतिसादाबद्दल सर्वाना धन्यवाद!
मी खरं म्हणजे अजिबातच चहा किंवा कॉफी प्रेमी नाही. पण आजूबाजूला इतके चहा -कॉफी प्रिय लोकं पाहून, हे सुचलं
कल्पना सुचण्याचे सर्व श्रेय चहा - कॉफी प्रिय लोकांना