नियतीचे वर्तुळ

Submitted by सचिन काळे on 2 July, 2017 - 13:25

रेखा झपझप पावलं उचलत चालत होती. कामावर जायला फार उशीर झाला होता. आठ तेराची लोकल आज पुन्हा सुटणार होती. आजकाल कामावर जायला उशीर होणं रोजचंच झालं होतं. अलार्म वाजूनसुद्धा तिची बिछान्यातून बाहेर पडायची इच्छाच होत नसे. रात्र रात्र डोळ्याला डोळा लागत नसे. ती सतत प्रदीपचाच विचार करी. तासंतास त्याचेच विचारचक डोक्यात फिरत राही. प्रदीपबरोबर आपण जसं वागलो त्याचे ती मनातल्या मनात सारखं समर्थन करण्याचा प्रयत्न करीत राही. आपलं वागणं चूक की बरोबर होतं याचा ती निर्णय करू शकत नव्हती.

रेखाचे वडील तीन वर्षांपूर्वीच एका खाजगी शाळेतून शिपाई म्हणून रिटायर झाले होते. त्यांना रिटायरमेंटच्या मिळालेल्या पैशाचा बराचसा भाग त्यांच्या स्वतःच्याच आजारपणावर खर्च होत होता. दोन वर्षांपूर्वी रेखा बीए बीएड झाल्यावर त्यांनी तिला आपल्याच शाळेत शिक्षिका म्हणून कामाला लावले होते.

सुरवातीला एक वर्ष रेखाचे शाळेेत शिकवण्यात मन रमायचे नाही. तिचे शाळेत फक्त पाट्या टाकण्याचे काम चालू होते. रोज सकाळी उठायचे, आपलं आवरायचं, ट्रेन पकडून शाळेत जायचं, तिथे पाचसहा तास शिकवून परत ट्रेनने घरी यायचं. घरी येऊन घरची रोजची कामं उरकायची, की संपला दिवस. आयुष्य अगदी निरस झाल्याचं वाटत होतं. ती तरुण होती. अविवाहित होती. आपल्या तारुण्यातील उमेदीचे दिवस शाळेच्या चार भिंतीत वाया जात असल्याचे तिला सतत वाईट वाटे.

आणि अचानक एके दिवशी तिच्या आयुष्यात आनंद फुलला. एका वर्षांपूर्वी शिपायाने तिला प्रिन्सिपल मॅडमनी बोलावल्याचा निरोप दिला. आज क्लार्क कामावर आला नव्हता. मंत्रालयातून काही महत्वाच्या कागदपत्रांवर आजच्या आज सह्या करून आणणं आवश्यक होतं. मॅडमनी रेखाला विनंती केली. शाळेच्या कटकटीतून एक दिवस सुटका होईल म्हणून रेखा आनंदाने मंत्रालयात जायला तयार झाली.

रेखा एका हातात कागदपत्रांची पिशवी, दुसऱ्या हातात छत्री आणि खांद्यावर पर्स अडकवून बसस्टॉपवर जायला निघाली. बघते तर काय? बसस्टॉपवर मंत्रालयाला जाणारी एक डबलडेकर बस नुकतीच निघण्याच्या तयारीत होती. तिने बसकडे धाव घेतली. त्याबरोबर बस चालू लागली. रेखा धावत धावत बस पकडायला गेली. बसचा दांडा तिच्या हातात आला पण फुटबोर्डवर चढताना तिचा एक पाय घसरला. ती अर्धी फुटबोर्डवर आणि अर्धी खाली लटकू लागली. रेखाचा जीव खालीवर झाला. वाटलं आता सगळे संपले. पण तेवढ्यात एका राकट हाताने तिच्या कंबरेला विळखा घातला आणि तिला अलगद वर उचलून खेचले. रेखाची छाती धडधडत होती. तिचा श्वास जोरजोरात चालत होता. जीवनमरणाचा फक्त एका क्षणाचा तो खेळ होता. तिने थँक्स म्हणायला आपल्या उपकारकर्त्याकडे पाहिले, आणि ती पहातच बसली.

एक रांगड्या व्यक्तिमत्वाचा, उंचपुरा, गोरा, घाऱ्या डोळ्यांचा आणि कपाळावर मस्त केसांची झुलपं असलेला तो एक तरुण होता. त्याने तिची पडलेली पिशवी उचलून तिला सीटवर बसायला मदत केली. तिची परवानगी घेऊन तो तिच्या बाजूच्याच सीटवर बसला. सहज रेखाचे त्याच्या हातांकडे लक्ष गेले तर त्याच्या हातातसुद्धा रेखाकडे असलेल्या कागदपत्रांच्या पिशवीसारखीच एक पिशवी होती. तिने त्याची चौकशी केली. त्याचे नांव प्रदीप होते. जवळच्याच एका शाळेत तोही शिक्षक होता. रेखाप्रमाणेच प्रदीपही मंत्रालयात कागदपत्रांवर सह्या आणायला चालला होता.

तो संपूर्ण दिवस रेखा आणि प्रदीप एकत्र होते. मंत्रालयातून कागदपत्रांवर सह्या मिळायला फारच उशीर झाला. ते मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये जेवले. त्यांच्यात दिवसभर शाळेविषयी गप्पा झाल्या. तिने आडून आडून प्रदीपची चौकशी केली. तो अविवाहित होता. एके ठिकाणी पेईंगगेस्ट म्हणून रहात होता. घरी परत येताना ते एकत्रच आले. त्याने तिला तिच्या घराजवळ सोडले. दोघांनी एकमेकांचे फोन नंबर शेअर केले. रेखाला तिची संगत प्रदीपच्या डोळ्यात आवडलेली दिसली.

आणि तिचा होरा खरा ठरला. दोनच दिवसात प्रदीपचा सहजच तिच्या चौकशीचा फोन आला. आणि मग वरचेवर येत गेला. दोघं एकमेकांत मनाने गुंतत गेले. संध्याकाळचं एकत्र हिंडणेफिरणे होऊ लागले. प्रेमाच्या आणाभाका दिल्या आणि घेतल्या गेल्या. रेखाचे चांगलेचुंगले कपडे घालणे, प्रदीपसोबत हॉटेलिंग करणे होऊ लागले. आता तिचे मन शाळेत चांगलेच रमू लागले.

असेच दोनचार महिने गेले, आणि अचानक एके दिवशी प्रदीपची संस्थेच्या दूरच्या शहरातील एका शाळेत बदली झाली. आता महिनोन्महिने त्यांची गाठभेट होत नव्हती. फोनवरच कधीतरी त्यांचे थोडेफार बोलणे होई. एकमेकांना भेटायला त्यांचा जीव तरसे.

हळूहळू रेखाचे पूर्वीचे एकाकी आणि निरस जीवन पुन्हा सुरू झाले. दिवसामागून दिवस जात होते. एक दिवस ती प्रदीपच्याच विचारात रस्ता ओलांडत होती, आणि अचानक एका कारखाली ती येतायेता वाचली. कारने अगदी तिच्याजवळ येऊन ब्रेक मारला. पण तिला कारचा हलकासा धक्का लागलाच आणि ती रस्त्यावर तोल जाऊन पडली. लगेच कारमधून तीस बत्तीस वर्षाचा एक सुंदर आणि उमद्या व्यक्तिमत्वाचा तरुण उतरला. त्याने रेखाला हाताचा आधार देऊन उभे केले. रस्त्यावर पडल्यामुळे तिच्या उजव्या पायाच्या ढोपराला फक्त थोडंसं खरचटलं होतं. अपघात पाहून आजूबाजूला लोकांची गर्दी जमली. लोक तावातावाने त्या तरुणाला बोलू लागले. लगेच रेखाने आपलीच चूक असून आपण पूर्ण सुरक्षित असल्याचे लोकांना सांगितले. गर्दी पांगली. त्या कारवाल्या तरुणाने रेखाला डॉक्टरकडे उपचाराकरिता चलण्याची विनंती केली आणि तिला आपल्याच कारमध्ये बसवले. कारमध्ये त्या तरुणाची एक पाच वर्षांची गोड मुलगीही बसली होती. त्या तरुणाने रेखाला आपली ओळख संजय आणि आपल्या मुलीचं नांव निहारिका अशी करून दिली. संजयने रेखाला एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेऊन तिच्या जखमांवर मलमपट्टी करून तिला तिच्या घराजवळ आणून सोडले.

रेखाचा गुढगा दुखत असल्याने ती शाळेत जाऊ शकत नव्हती. तिच्या तब्येतीची विचारपूस करायला संजय निहारिकाबरोबर रोज तिच्या घरी येत होता. निहारिका फार गोड मुलगी होती. ती नुकतीच शाळेत जायला लागली होती. ती आपल्या शाळेच्या गमती जमती रेखाला सांगून फार हसवत असे. त्या दोघांची लवकरच छान गट्टी जमली. पण संजयने जेव्हा सांगितले की तीची आई दोन वर्षांपूर्वी कॅन्सरने वारली, तेव्हा रेखाला फार वाईट वाटले. संजयने रेखाला रोज संध्याकाळी एखादा तास निहारिकाच्या शाळेचा अभ्यास घ्यायला घरी येण्याची विनंती केली.

काही दिवसांनी रेखा रोज संध्याकाळी निहारिकाचा अभ्यास घ्यायला संजयच्या बंगल्यावर जाऊ लागली. बंगला श्रीमंत वस्तीत आणि राजेशाही होता. नोकर चाकर, दोन तीन गाड्या, सुखासीन वस्तूंनी परिपूर्ण होता. संजय पिढीजात श्रीमंत होता. वडिलांच्या मृत्यूनंतर तो दोन चार कंपन्यांचा एकुलता एक वारस होता. पण कंपन्यांची जबाबदारी व्यवस्थापकांवर टाकून मित्रमैत्रिणींबरोबर छानछौकी करण्यात, आयत्या मिळालेल्या श्रीमंतीचा उपभोग घेण्यातच त्याचा जास्त कल होता.

रेखा निहारिकाचा अभ्यास घेतेवेळी संजय बर्याच वेळा घरी दिसे. कधी कधी निहारिकाच्या अभ्यासाच्या निमित्ताने रेखाशी बोलण्याचा प्रयत्न करे. कधी उशीर झाल्यास रेखाला कारने घरी सोडवे. काहीना काही निमित्ताने रेखाला महागड्या वस्तू भेटीदाखल देई. रविवारी रेखा आणि निहारिकाला तो बागेत फिरवून आणे. त्यांना कधी जेवायला हॉटेलात तर कधी सिनेमाला नेई.

संजय आपल्याकडे आकृष्ट झालेला रेखाला स्पष्ट जाणवत होते. तिलाही हे सर्व हवेहवेसे वाटत होते. रेखाच्या घरची पिढीजात गरिबी असल्याने हे तिला सर्व नवे होते. आपल्या आयुष्यात असे आनंदाचे क्षण येतील याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. तिला आताशा प्रदीपची आठवणही येईनाशी झाली होती. मनातल्या मनात ती प्रदीप आणि संजयची तुलना करू लागली होती.

आणि एक दिवस तिच्या अपेक्षेप्रमाणे संजयने तिला लग्नाची मागणी घातली. आईविना पोरकी झालेल्या निहारिकाला आईचा आधार देण्याची विनंती केली. रेखा जणू ह्याच क्षणाची वाट पहात होती. तिने त्याला आनंदाने होकार दिला. काही कारणाने संजयने सहा महिन्यानंतर लग्न करायचे ठरवले.

आताशा प्रदीप रेखाच्या फोनवर तुटक बोलण्याने तर कधी फोन न उचलण्याने चिंतीत झाला होता. त्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. एक दिवस त्याने रजा काढून रेखाची भेट घेतली. रेखाने आपले लग्न ठरल्याचे सांगितले. प्रदीपने रेखाला आपल्या प्रेमाची आठवण करून दिली. पण रेखाने त्याच्याशी लग्न करून आयुष्यभर गरिबीचे चटके खात जगायला नकार दिला. भावनेच्या भरात वहावत गेल्याची आणि प्रदीपला शब्द देऊन बसल्याची तिने कबुली दिली. प्रदीप निराश होऊन आपल्या नोकरीच्या शहरी निघून गेला.

रेखाचे आता संजयच्या घरी येणे जाणे वाढले. निहारिकाची काळजी घेण्याच्या निमित्ताने तिचे कधीकधी दोन दोन दिवस संजयच्या बंगल्यावर रहाणे होई. बऱ्याचदा संजय रात्री उशिरा घरी परते तेव्हा तिला त्याच्या तोंडाला दारू सिगरेटचा उग्र दर्प जाणवे. कधी त्याच्या मित्रमंडळींबरोबर बंगल्यावर पार्ट्या होत तेव्हा रेखाला काही हवं नको ते बघायला रात्री बंगल्यावर थांबायला लागे. रेखाला हे सर्व नाईलाजाने सहन करायला लागे.

एक दिवस रेखा निहारिकाच्या शाळेच्या पिकनिकची तयारी करायला भल्या पहाटे संजयच्या बंगल्यावर पोहचली तेव्हा संजयच्या बेडरूममधून बाहेर पडणाऱ्या एका भडक हावभाव करणाऱ्या स्त्रीशी तिची गाठ पडली. रेखाला संजयच्या बाहेरख्यालीपणाची जाणीव झाली. तिने संजयला जाब विचारताच त्याने रेखापुढे सपशेल नांगी टाकली. पुन्हा असे न करण्याचे वचन दिले. रेखानेही झाल्यागोष्टीबद्दल संजयला माफ केले.

पण एके दिवशी रेखाने पुन्हा एकदा संजयला एका बाजारू स्त्रीबरोबर मॉलमध्ये मजाहजा करताना पकडले. आता मात्र रेखाचे डोके भडकले. संजय घरी येताच तिने त्याला फैलावर घेतले. त्यावर संजयने तिलाच चार शब्द सुनावले. त्याचे राहणीमान असेच आहे आणि यापुढेही असेच राहील. निहारिका आणि बंगल्याचा सांभाळ करायला, घरी आल्यागेल्याचं बघायला कोणीतरी स्त्री हवी आहे म्हणून तो रेखाशी लग्न करतोय असे निर्लज्जपणे सांगून त्याच्या कारभारात अजिबात लक्ष घालू नकोस अशी रेखाला त्याने स्पष्ट तंबीच दिली.

झाल्या प्रसंगाने रेखा कोसळून पडली. सुखी आणि श्रीमंत संसाराची तीने जी स्वप्ने पाहिली होती ती सर्व तिला भंगताना दिसू लागली. आपण संजयशी लग्न केले तर आपली त्या घरात फक्त मोलकरणीएवढीच लायकी असेल याची तिला जाणीव झाली. त्या घरात आपली काडीचीही किंमत असणार नाही हे तिला कळून चुकले. नवऱ्याचे प्रेम आणि सुख मिळणे ही तर दुरचीच गोष्ट राहिली.

रेखाच्या मनात द्वंद्व सुरू झाले. विचार करकरून डोके फुटायला आले. आणि शेवटी तिला तिच्या मनानेच उत्तर दिले. संजयशी लग्न केल्याने मिळणाऱ्या श्रीमंतीपेक्षा तिला तिच्या गमवावे लागणाऱ्या स्वाभिमानाचे मोल जास्त असल्याचे समजून आले. तिने संजयशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. आणि त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले.

आता रेखा परत एकटीच जीवन जगतेय. गेल्या वर्षभरात तिच्या आयुष्यात झालेल्या वादळाने ती कोलमडून पडलीय. रात्र रात्र ती बिछान्यात तळमळत असते. क्षणभरही डोळ्याला डोळा लागत नाही. स्वतःच्या गरीब परिस्थितीमुळे संजयच्या श्रीमंतीला भुलून रेखाने केलेल्या प्रदीपच्या प्रेमाच्या विश्वासघाताने ती स्वतःच्या मनातून पार उतरून गेलीय. आता ती सतत प्रदीपचाच विचार करीत असते. प्रदीपबरोबरचं आपलं वागणं चूक होतं की बरोबर याचा ती निर्णय करू शकत नाहीये. रेखाने ज्या संजयकरिता प्रदीपच्या प्रेमाचा अव्हेर केला, त्याच संजयला सोडण्याचे रेखाच्या नशिबी आले. नियतीने आपले एक वर्तुळ पूर्ण केले होते.

माझा ब्लॉग :  http://sachinkale763.blogspot.in

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ प्रज्ञा तिवसकर, कथा वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार!!!

अरे वा:!! कथा परत वर आली!

@ सागरजि, कथा वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार!!!

Pages