पुरीभाजी आणि प्रेम

Submitted by अजय चव्हाण on 30 June, 2017 - 01:31

पुरीभाजी आणि प्रेम...

पार्ट 1..

"अण्णाऽऽऽ एक पुरी भाजी और कांदा चटणी अलगसे....."
आपण गाडीच्या चावीचं किचेन बोटात फिरवत रूबाबात ऑर्डर दिली...
तसा अण्णा ओळखीचा हसला आणि तीच ऑर्डर त्याने त्याच्या पोर्याला दिली....

"दि इंडीयन कॅटीन" इंडस्ट्रीयल एरियातलं एकमेव व फेमस कॅटीन...सगळं काही मिळायचं तिकडे तेही रिझनेबल किंमतीत आणि म्हणूनच "ही" गर्दी असायची तिथे..आपणही त्या गर्दीतलाच एक भाग होतो....अरे हो सांगायचं राहूनच गेलं..त्याच काय आहे ना एकदा ऑर्डर दिली की मोकळ... तसंही ऑर्डर यायला थोडा वेळ लागतो इथे..असो..आपलं नाव खंडोबा बुचडे आणि मी, माझं,मला... असं काय नसतं आपल्या आयुष्यात आपल्या आयुष्यात सगळं आपण, आपलं,आपल्याला अस असतं..आता हे असलं आपलं नाव आणि डायलाॅग ऐकून बर्याच लोकांनी नाक मुरडली असतील..मुरडा लेकहो..पण आपणच हिरो आहे हया कथेचा...

तर ही आपुण की स्टोरी....हा कुठे होतो आपण.....
आपण आपल्या नेहमीच्याच कोपर्यातल्या टेबलावर मोबाईलवर बोट आपटतं बसलो होतो..
खरंतरं ही आपली नेहमीची जागा...इंडस्ट्रियल एरीआत हे कॅटीन असल्याने आपल्या सारखेच डबा न आणणारे कर्मचारी इथे खादडायला यायचे ..असो...ईथल्या टेबलाच्याच बाजुच्या खिडकीत मोगर्याची रोपे लावलेली होती आणि त्या फुलांचा सुवास मस्त दरवाळयचा म्हणूनच हे टेबल आपलं आवडत टेबल होतं...आपण इथेच बसायचो नेहमी ..आजही असाच बसलो होतो..
लक्ष मोबाईलच्या हिरव्या स्क्रीनकडे आणि इतक्यात कुणीतरी चाचरत येऊन आपल्यासमोर येऊन बसलं.. म्हणून आपणं वर पाहील तर काहीशी सावळी, खुल्या सोडलेल्या केसांना चाफ्याचं तेल लावून दोन बट मागे घेऊन चाप लावलेला,फिटींग कळकट पंजाबी ड्रेस,कपाळावर आडवा टिळा आणि डोळ्यांवर नाजूक चष्मा...तिला बघताक्षणीच कोणीही सांगेल साऊथ इंडीयन आहे म्हणून...असो अगदीच काकुबाई... मनातल्या मनात खंडेरायाला बोलही लावले ..पाठवल तर कुणाला हे असलं ध्यान? आपण परत मोबाईलवर पाहणार तेवढ्यात..."यअण्णा. येक पुरीभाजी"
अशी ऑर्डर तिने दिली...आपण विस्फाराने बघतच राहिलो..
आपल्याला वाटलं होत ही इडली भातासारखी सांबारामध्ये कालवून खाणार्यातली असेल पण हीने चक्क पुरीभाजीची ऑर्डर द्यावी हे काय रूचल नाय बा आपल्याला ..काकुबाईने नऊवारी नेसायच सोडून मिनिस्कर्ट घालावा इतपत हे आपल्यासाठी आश्चर्यकारक होतं..
इतक्यात हाॅटेलचा पोर्या पुरीभाजीची प्लेट नेहमीप्रमाणे टेबलावर आपटून गेला...आपण आपल्याकडे प्लेट सरकवणार तोच तिने तिच्याकडे सरकवली...असा राग आला ना...काय सांगू...
पण कंट्रोल करून सावरलं स्वतःला...आणी ही "अय्योबय्या"
काही झालचं नाही अशा अर्विभावात भराभर खाऊ लागली..
थोड्या वेळाने आणखी एक प्लेट आली तेव्हा तिला कळलं...
आणि "सांबराबरोबर चटणी पाहीजे का असं विचारावं" तसं ती "साॅरी" म्हणाली तेव्हा का कोण जाणे आपल्या तोंडून "चालतयं की" इतकंच बाहेर पडलं...तुझ्यात जीव रंगलाच परिणाम दुसरं काय..
खरंतरं आपलं कसं आहे ना..."बडे बडे बातें और पुरी भाजी खाते" समोर कुणीही असो आपण एकदम कडक.. चुकीला माफी नायटाईप पण इथे ती साॅरी बोलली आणि आपला "राणा दा" झाला.. भाजीत पुरी चिवळताना बोटही चिवळत होती आणि आपलं मन कुठल्या गावात पाणी पितयं हेच कळ ना..."अय्योबय्या" खाऊन निघून गेली होती...पण आपण तिथेच..अख्ख्या लाईफमध्ये कुणी आपल्याला साॅरी बोललं नाय..ही पहीलीच... ती ही मुलगी...हे म्हणजे पिझ्झा हट्ट मध्ये छानशी गोड बासुंदी मिळाण्यासारखंच..

दुसर्या दिवशी मोठ्या आशेने परत पुरी भाजीची ऑर्डर देऊन आपण बसलो...भाजीत मीठ कमी असावं असचं वाटतं होतं तेव्हा...पण ती काही आली नाही...दोन तीन दिवस असेच अळणी गेले..आणि आपल्या प्रेमाची बटाट्याची भाजी विरहाच्या पुरीबरोबरच आपण गिळकृंत केली...

मध्यंतरी किती दिवसं गेले हे आठवत नाही..पण एकेदिवशी "अय्योबय्या" आपल्याअगोदरचं त्याच टेबलावर आपल्याला दिसली..
आपण हलकेच चाचरत जाऊन तिच्या समोर जाऊन बसलो..पहिंल्यांदा ज्या नजरेने आपण तिला पाहीलं त्याच नजरेने ती आता आपल्याला पाहत होती...पण आपण दीडशहाणा..जणू काही जबरजस्ती आपल्याला तिकडे बसावं लागतयं ह्या अर्विभावात आपण बसलो आणि आपली नेहमीचंच ऑर्डर दिली..ठराविक वेळेनंतर पोर्या टेबलावर प्लेट आदळून निघून गेला...पण ह्यावेळी आपण शांत बसून राहीलो...तसं तिने प्लेट आपल्याजवळ सरकवली आणि मनात शिर्याचे गोड भाव उमटणार तोच "तुझीच ऑर्डर आहे मी मसाला डोसा मागवलाय" अशी ती बोलली...
" आयला हीला मराठी येत" आश्चर्याने पाहत आपण फक्त थॅन्क्स म्हणालो..आज पुरीभाजीला वेगळीच चवं आलेली हे वेगळं सांगायलाच नको..

खुप दिवस झाले...कधी ती भेटायची तर कधी नाही..पण का कोण जाणे आपल्याला तिच येणं हवहवंसं वाटायचं...बोलणं तर काही व्हायचचं नाही पण एकत्र खाणं तर व्हायचं...तिच्या ताटात नेहमी काहीतरी नविन असायचं कधी इडली, कधी मिसळ, कधी मसालेभात..पण आपल्या ताटात एकचं पुरी भाजी..आपल्याला एखादी गोष्ट आवडली की आवडते आपण काय सोडत नाय तिला कधी...
एकदा झालं असं की, तिच्याकडे सुट्टे पैसे नव्हते आणि अण्णाकडेही संपले होते आपल्याला तिचा प्रोब्लेम समजला होता पण आपण उगाचचं तिची मदत नाय करणार...स्वतःहून जाऊन मदत करणं ...ते ही मुलीला?? हे म्हणजे अतिशहाणपणाच लक्षण वाटत आपल्याला....तिने मागितली तर ठीक आहे आणि तिने आधी विचारावं असं आपल्याला वाटतं होतं पण तिने विचारलंचं नाय..शेवटी अण्णाने ह्याला त्याला विचारून झाल्यावर आपल्याला विचारलं आणि आपणही खुल्या मनाने खुले दिले...
सुट्टे देताना "अय्योबय्यानी" जरा रागातच पाहील आपल्याकडे....कदाचित "द्यायचे होते तर आधी द्यायला तुझ्या बापाचं काय गेलं असतं" हे तिला सांगायचं होतं...पण आपण एकदम शांत..
एक स्माईल दिलं तिला आपणं..

"अयोबय्या" हल्ली रोज यायची..पण त्या सुट्ट्याच्या प्रकारापासून ती आपल्यापासून लांबच बसायची.....आपण आपला टेबल कधी सोडला नाही...आपल्याला एखादी गोष्ट आवडली की आवडते आपण सोडत नाय तिला कधी...एकदा अशीच आपल्या समोरच्या टेबलावर बसली होती . आपला उपवास ना तर आपण च्या मागवला...आपण मस्तपैकी बशीत च्या ओतून फुरके मारत होतो...माझ्या प्रत्येक फुर्र..फर्रऽऽऽ फुरक्यासरशी ती आपल्याकडे रागाने पाही...पण आपण असाच पिणार च्या...
ती उत्तपा खात होती आणि तिच्या समोर अगदीच मवाली वाटणारा मुलगा येऊन बसला...अन तिच्याशी छेडछाड करू लागला..ती न खाताच ताड ताड करत पैसे देऊन निघून गेली..
आपल्याला जाम वाईट वाटला तेव्हा..च्या बाजुला ठेऊन आपण पोर्याला उत्तपा पार्सल करून तिच्या ऑफिसला पाठवला..
म्हणलं विचारालं तरी कुणी दिलं ते सांगायचं नाही...

आणि ईकडे आपण आपल्या जिगरी पक्क्याला फोन लावला...पक्क्याने सांगितल्याप्रमाणे पोतं आणलं होतं..त्याच खाऊन झाल्यावर पोतं घालून धु धु धुतला त्याला आपण..
आणि पक्क्याला पैसे दिलं आणि दवाखान्यात घेऊन जायला सांगितलं आपणं..आपण ना थोडासा कांईड हर्टेड आहे...कुणाचं दुःख पाहवत नाही आपल्याला.. आपण भलेही मारला असेल त्याला पण समजावलबी.....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आणि ईकडे आपण आपल्या जिगरी पक्क्याला फोन लावला...पक्क्याने सांगितल्याप्रमाणे पोतं आणलं होतं..त्याच खाऊन झाल्यावर पोतं घालून धु धु धुतला त्याला आपण..>>>> मला तर मुन्नाभाई ची च आठवण आली.
पुलेशु. Happy

आवडतंय की!
पुढचे भाग येऊ द्या लवकर

आवडली भौ आपल्याला.
'अय्योबय्या' बी, आणि ष्टोरी बी!!!
फूडचं टाका की वो लवकरश्यानी.

जमलंय की!
अय्योबाई माझ्या डोळ्यासमोर सनम तेरी कसम मधल्या हिरवनीसारखी आली. सरस्वथी.

अय्योबय्या

आवडतंय की!
पुढचे भाग येऊ द्या लवकर+++++