रावणाचे लग्न

Submitted by सखा on 1 June, 2017 - 08:42

समजा एखाद्या निबर रंगाच्या, मुच्छड आणि दांडगट माणसाला बघितल्यावर तुम्हाला दचकायला होत असेल आणि त्यातच जर त्याचे नाव रावण असेल तर, तुम्हाला काय वाटेल? अशा माणसा बद्दल तुमच्या मनात काय भाव निर्माण होईल? हे २०१७ साल असले तरी अशा वर्णनाचा रावण नावाचा माणूस हा सदवर्तनी, पापभीरु किंवा कवी हृदयाचा असेल असे तुम्हाला स्वप्नात तरी वाटेल काय? नाही ना?
मित्रहो हेच तर मला म्हणायचे आहे की सामान्य लोकच काय पण मोठे मोठे विद्वान आणि आताशा मला स्थळ म्हणून सांगून आलेल्या पुण्यातील सुंदर ग्रॅजुएट मुली देखील केवळ माझ्या नावा मुळे आणि बाह्यरूपा मुळे माझ्या बद्दल पूर्वग्रह दूषित मत बनवितात.
आता तुम्ही म्हणाल मुळात माझे नाव रावण का ठेवले? तर त्याची कथा अशी: अनेक वर्ष माझ्या आई-बापाला मूल न झाल्याने माझी पणजी म्हणे कुठल्या तरी देवाला नवस बोलली की जर मुलगा झाला तर त्याचे नाव रावणदेव ठेवीन आणि मुलगी झाली तर हिडिंबा ठेवेन.
मला कळू लागल्यावर अर्थातच माझे नाव हिडिंबा नाही ठेवले गेले हेच मला त्यातल्या त्यात सुख!
आजही माझ्या त्या दुष्ट कैलासवासी पणजीचा गळा घोटावा हा एकच सुप्त रावण विचार माझ्या मनात आहे हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो.
तुम्हाला सांगतो लहानपणा पासूनच मला कविता करायला खूप आवडतात. कदाचित कमी मित्र असण्याचे ते देखील कारण असेल. कवी पासून लोके दूरच राहतात असे माझ्या आत्याचे मिस्टर म्हणतात. आई बाबा दोघेही मराठीचे प्राध्यापक असल्याने घरी खूप पुस्तके. फुलपाखरे, पशु, पक्षी, कुत्र्या-मांजरावर कविता करता करता एखाद्या कळीचे उमलून फुल व्हावे तदवत मी कधी रोज प्रेम कविता धपाधप पाडू लागलो हे माझे मलाच कळले नाही.
किती बरे अल्लड असतात प्रेम भावना, प्रेयसीचे ते लटके रुसणे, तिच्या हातात हात घालून पावसात भिजणे, तिच्या विशाल नेत्रांचे पिटी पिटी, तिचे ते नाजूक .... असो. अर्थातच मला काही प्रेमाचा प्रत्यक्ष काहीच अनुभव नाही पण घरातील कवीची पुस्तके वाचून आणि हिंदी सिनेमे बघून मला जे उमजले त्या वरून मी वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी हा एक प्रेमाबद्दल ढोबळ अंदाज काढला आहे. आता प्रत्यक्ष एखाद्या देखण्या मुली सोबत प्रेमप्रकरण करून प्रेमाचा अनुभव घेण्याचा देखील माझा मानस आहे आणि नंतर "रावणाच्या कविता" नावाचे तरल प्रेम कवितांचे पुस्तक छापायचे देखील माझ्या मनात आहे परंतु प्रेमात पडणे तर दूर, मुली माझे नाव ऐकताच माघार घेतात असे मला खेदाने नमूद करावे लागेल. परंतु म्हणतात ना वेळ आली की सर्व काही घडून येते. एक दिवस माझ्याही तहानल्या आयुष्यात अवचित पावसाची सर यावी तसा तो दिवस आलाच.
तसे मला घरातील सारेच लोक रिकामंटेकडा समजत असल्याने आणि मी नौकरीच्या शोधात पुण्यात असल्याने, छबू मावशीच्या गोट्याच्या मुंजीच्या पत्रिका वाटायचे काम अर्थात माझ्याकडेच आले. मी मे महिन्याच्या रखरखीत दुपारी पत्रिका वाटत या बँकेतून त्या बँकेत मग पोस्टात आणि तिथून हायकोर्टात गेलो. तिथल्या ओळखीच्या वकिलांना पत्रिका वाटून बाहेर येतो तो काय आश्चर्य लाल तोकडा स्कर्ट घातलेली एक अक्षरश: मदनिका हुंदके देत बाजूने गेली आणि कोपऱ्यातील मळकट बाकावर बसून मूक अश्रू ढाळू लागली.
"डिव्होर्स केस थी साब" माझ्या जवळच उभा असलेला एक म्हातारा शिपाई म्हणाला. "आज फैसला हुवा. इसे कुछ नही मिला"
"अरेरे बहोत वाईट हुवा" - मी दुःखाने कळवळून म्हणालो.
ते करुण दृश्य पाहून माझ्या मनात तिच्या बद्दल दया आणि प्रेम एकाच वेळी उत्पन्न झाले. सुंदर स्त्री रडताना किती सुंदर दिसते, तिच्या गोबऱ्या गालावरचे अश्रू जणू काही मोतीच, ते लाकडाचे बाकडे किती नशीबवान आहे वगैरे उच्च विचार माझ्या मनात एखाद्या विद्युल्लते प्रमाणे लकाकून गेले.
मी हळूच आजूबाजूला पहिले तर माझ्याच वयाचे दोन तरुण तिच्याकडे चोरून चोरून पाहत होते. अरे बोक्यानो एक अबला पाहून तिच्याशी दोस्ती करायचा प्रयत्न करताय काय? मला काय कळत नाही तुमचा डाव? यांना पण माझ्या सारखेच तिला सहानुभूतीचा खांदा देऊन जवळीक साधायची आहे तर.
दुख्ख असह्य होऊन की काय पण रडता रडता त्या सुंदर मुलीने अचानक आपले मंगळसूत्र खस्सकन काढले आणि रागात माझ्या दिशेने भिरकावले. ते दोन बोके विजेच्या चपळाईने ते मंगळसूत्र घेण्यासाठी हलले पण त्यांचे दुर्दैव असे की ते मंगळसूत्र अगदी माझ्या पायाशीच पडल्याने मी ते अल्लाद उचलले आणि विजयी मल्ला सारखे घेऊन त्या सुंदर स्त्रीच्या दिशेने निघालो तेव्हा त्या दोन्ही पराजित बोक्यांचा चेहरा काळाठिक्कर पडला. नशीब नशीब म्हणतात ते हेच!
मी मंगळसूत्र तिच्या समोर धरत म्हणालो.
"तुमचे हे पडले चुकून"
"मुझे मराठी नाही आता"
"आपका ये सोने का नीचे पडा"
जरी तिने ते मंगळसूत्र परत आपल्या पर्स मध्ये टाकले तरी ती घुश्श्यात म्हणाली
"मुझे नही चाहिये. अब मेरा इस दुनियामे कोई नही."
"अरे अरे ऐसा मत बोलो भोत लोग अच्छे भी है"
"पता नही सब मर्द एक जैसे .... मै तो मर जाना चाहती हू."
"ऐसा मत करो आपुन ऐसा करेंगे चलो कुछ खाते है फिर विचार करेंगे." मी आजूबाजूला जमणाऱ्या बघ्या पासून दूर जाण्याच्या हेतूने म्हणालो
"मेरे पास पैसे नही है"
"मेरे पास हैना चलो चलो अच्छी बाई है तुम ..." म्हणजे मला शहाणी मुलगी या अर्थाने बोलायचे होते.
मोटर सायकलवर ती बिचारी अबला मला अगदीच घट्ट बिलगून बसली. तिने लावलेल्या अत्तराचा सुवास मला फारच सुखद वाटत होता. पुण्यातल्या खड्ड्याचे मी मनोमन आभार मानले आणि याचे कारण चतुर वाचकांना सांगण्याचे कारण नसावे.
"मै आपको बहोत तकलीफ दे रही हू" असे ती जेव्हा कानात कुजबुजत म्हणाली तेव्हा मला मनाला गुदगुल्या होत मी अरे नही नही ये तो मेरा फर्ज है असे म्हणत अजूनच जोरात गाडी पिटाळली आणि सरळ फाईव्ह स्टार रेस्टारंन्टला गेलो.
तिला खरोखरीच फार भूक लागली असावी रट्टाऊन जेवण झाल्यावर मी आकडे बघून घाम पुसत बिल देताना तिला विचारले
"आपका शुभ नाम"
"सीतादेवी"
"और आपका"
"रावणदेव" मी लाजत म्हणालो
तीला एकदम हसू आले. मग पोटभर हसून झाल्या वर ती म्हणाली
"रियली"
"हौ ना रियली"
"बहोत अच्छा नाम है आपका रावणजी"
"आं?"
मग मी पण धीर करून म्हंटले
"सीतादेवी आपका स्माईल बहोत बेस्ट है "
"थँक्स, रावणजी क्या आप मुझे आपकी लंका मे , मेरा मतलब आजके दिन आपके घर, ले जाओगे? मेरा इस दुनिया मे कोई नही."
"अरे ऐसा मतबोलो मै हू ना, हमेशा के लिये, मेरा घर आपका घर"
"हा पर आप थोडी मुझसे शादी करोगे मै तो डिव्होर्सी हू. "
"... आप परवानगी देंगे तो मै आपके बच्चो का पिता बनाना चाहता हू" मी राजकपूर स्टाईल ने म्हंटले
"कहने को तो सब कहते है."
"मै आपसे शादी करकेच बताऊंगा"
"नही छोडीये, जाने दिजिये मै बहोत हाय मेंटेनन्स हू आप मुझे जानते नही."
मग मात्र मी हट्टालाच पेटलो साधारणपणे एका तासातच तिला पटवून दिले की मी शिक्षणाने थर्ड क्लास इंजिनियर असलो तरी माझी स्वप्न मोठी आहेत आज ना उद्या नौकरी मिळाली की चांगला पगार मिळेलच. इथे पुण्यात बाबांनी तीन बेडरूमचा फ्लॅट घेतला आहे. तिचे भावी सासू सासरे गावाकडे असल्याने आपण दोघेच राजा राणी. त्यातच गावाकडे माझ्या नावावर चार पाच एकर बागायती एकर शेती आहे. मी एकुलता एक आहे. आई बापाचे सेव्हिंग आहे. अजून ते नौकरी करतात वगैरे.
मग मात्र ती विचारात पडली. सुंदर मुली विचार करताना किती सुंदर दिसतात माझ्या मनात विचार आला. शेवटी बरेच उलट सुलट प्रश्न विचारून ती बिचारी लाजत हो म्हणाली मात्र तिने एक अट घातली लग्न लगेच करायचे कारण पुरुष जातीचा काही भरोसा नाही.
छबू मावशी दहावीला हिंदी शिकवत असल्याने तिला सीता बद्दल विशेषच आत्मीयता होती. आई बाबानी टिपिकल नाराजी व्यक्त करून झाल्यावर मावशीच्या मिस्टरांचे ऐकून लग्नाला होकार दिला वगैरे. मग ज्या लोकांना गोट्याच्या मुंजीच्या पत्रिका वाटल्या त्यांनाच मी आनंदाने स्वतःच्याच पत्रिका वाटून आलो. कोर्टात पत्रिका वाटून येताना त्या बाकड्याचे चुंबन घ्यावे असे विचार मनात दाटून आले पण मग आता बाकड्याचे चुम्बन घ्यायची गरजच काय असे लबाड विचार येऊन मनात गुदगुल्याच झाल्या.
गावाकडून जास्त लोक कशाला मरायला उन्हात येतील असा सुप्त व्यवहारिक विचार करून लग्न पुण्यातच झाले. लग्नात अर्थातच तिचे बिचारीचे कुणीच नव्हते.
सकाळी लग्न झाले की लगेच मग लग्नाचे रजिस्ट्रेशन करून निघालो की एवढ्यात तिचा फोन वाजला आणि मग ती रडतच मला म्हणाली की तिचे बाबा खूप आजारी आहेत.
मी आश्चर्याने उडालोच:
"क्या मेरे सासरे जिंदा है?"
"हा "
"मगर तुम तो कह रही थी की मेरा कोई नही "
"वो तो मैने गुस्से में कहा .... उन्हे मेरी पहली शादी मजूर थोडेही ना थी."
मग ताबडतोब माझ्या कडून एक लाख रुपये घेऊन ती बिचारी विमानाने वडिलांची सेवा करायला दिल्लीला गेली. मी मात्र सुहाग रातला एकटाच डोक्यावर गरगरणारा पंखा पाहत बसलो.
नाही म्हणायला आठवड्यातून एकदोनदा तिचा फोन येऊन हिंदीत तिच्या बाबूजींची खुशाली कळवत असे. उद्याच परत येतीये वगैरे म्हणत दोन महिने उलटून गेले. मी आदर्श पती प्रमाणे दोनचार वेळा तिने सांगितले तिथे पैसे पाठवले. मी विरहा मध्ये "रावणदेव के दुःखी नगमे" ही गझलांची पुस्तिका सीतादेवीस अर्पणपत्रासह लिहून पूर्ण केली.
लोकपण कसे खोटारडे असतात बघा मध्यंतरी कुणी तरी म्हणाले वैनी डेक्कनला कुणा माणसा सोबत सिगारेट पिताना दिसल्या. एक जवळचा मित्र म्हणाला वैनी अमक्या बार चार तरुणा सोबत दारू पीत होत्या. सुंदर बायको असली की लोक असे जळतात! एकच व्यक्ती दिल्ली आणि पुण्यात कशी असेल?
शेवटी एकदाचा तो सुवर्ण दिन आला सीता परत आली आणि येताना सोबत तिचे वडील आणि दोघे भाऊ पण आले . वडिलांना कुठे तरी पहिले आहे असे वाटले मग आठवले कोर्टात आपल्याला माहिती देणारा म्हातारा शिपाई तो हाच.
मी चांगल्या जावया प्रमाणे घरी आलेल्या पाहुण्यांना छान पैकी चहा करून बोलताना सहज विचारले की:
"पिताजी आपकी कोर्टमें शिपाई है क्या?"
झाले हे ऐकताच सीता जे भडकली मला जोरजोरात अद्वातद्वा बोलू लागली. तिचे म्हणणे होते की तिच्या महान बापाचा मी शिपाई म्हणून अपमान केला आहे. मात्र सीता करीत असलेला माझा अपमान काही तिच्या भावाना सहन झाला नाही त्यांनी मग मात्र सरळ सीतेला मारायलाच सुरुवात केली. आपल्या बायकोला वाचवायला म्हणून मी मध्ये गेलो तर भावाना सोडून सीतेने मलाच ओरबाडले. त्या तिघा भावंडांचे मजबूत बुक्के मी पण खाल्ले. या साऱ्या तुंबळ युध्दात सीतेच्या भावानेच दिलेल्या एका टोल्याने सीतेचे नाक फुटले. अगदी सिनेमात असते तसे शेवटच्या सिन सारखे कुणास ठाऊक कुठून पण पोलीस आले आणि आम्हाला सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्या समक्ष ओढत पोलीस ठाण्यावर नेले. जाताना सीता माझ्या नावाने जोरजोरात ठणाणा करत होती आणि गम्मत म्हणजे तिचे भाऊ आणि वडील "अरे जाने दे जाने दे" असे म्हणत होते.
ठाण्यात इंस्पेक्टरीण बाईंनी माझे नाव रावण ऐकल्या पासून माझ्याकडे मी कुणी क्रूर गुन्हेगार असल्या सारखेच वागायला सुरुवात केली. सीता देवीने केलेल्या कम्प्लेंट नुसार भा.द. वी. ४९८-a नुसार मला अटक झाली. तिकडे गावा कडे खबर जाताच घाई घाईने मला सोडवायला आलेल्या आईबाबा आणि छबू मावशी आणि तिच्या मिस्टराना पण अटक झाली. माझी म्हातारी आजी गावाकडे सरकारी दवाखान्यात ऍडमिट होती तिला बिचारीला तिथेच पलंगावर अटक झाली आणि दारावर पोलीस बसवले गेले. ती दोन वर्षा पासून कोमात असल्याने तिला काहीच फरक पडला नाही ही गोष्ट अलहिदा. मी शाळेत असताना आईची फार इच्छा होती की माझा फोटो पेपरला यावा तसेच झाले दुसऱ्या दिवशीच्या पेपरला माझा फोटो झळकला. वार्ताहरांनी मथळे मोठे विचारपूर्वक दिले होते हे मात्र मानायलाच हवे.
-कलियुगातील रावण.
-सीतेने शिकविला रावणाला धडा.
-एका मुडक्याचा आधुनिक रावण पोलिसांच्या तावडीत.
आमचे वकील म्हणाले की तुमच्यावर ४९८a प्रमाणे खटला दाखल झाला आहे. तुम्ही आणि तुमच्या नातेवाईकांनी पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. तिच्या जीवास तुमच्या कडून धोका आहे. प्राथमिक शारीरिक तपासणीत तिच्या शरीरावर मारामारीच्या खुणा सापडल्या आहेत. तिचे भाऊ आणि वडील यांनी आपण आपल्या डोळ्यांनी मुलीला पतीने मारताना पाहिल्याचे सांगितले आहे.
कायद्या प्रमाणे फक्त ही केस केलेली स्त्री अथवा तिचे जवळचे नातेवाईक ही केस मागे घेऊ शकतात. खरेखोटे कोर्टात सिध्ध होईलच मात्र तुम्ही सुटे पर्यंत साधारणपणे पाच ते सात वर्ष सहज जातील. अशा गुन्ह्यात फक्त दोन टक्के दोषी असतात बाकी सगळ्या फेक केसेस. मग वकील साहेबानी मला खासगीत हळूच सांगितले, काय आहे तुमचे नाव रावण असल्याने तुमच्या विरोधी मत होण्यास फारसा वेळ लागत नाही!
बर इकडे गावाकडे सुनेचा छळ केला म्हणून आई-बाबाला गावात लोक वाट्टेल ते बोलू लागले. गावातल्या पेपरला
"शिक्षक दाम्पत्याला सुनेच्या छळा बद्दल अटक" अशी बहारदार बातमी फोटोसह येऊन गेल्याने त्यांची पण नौकरी गेली. गावाकडून पुण्यात कोर्टात हेलपाटे घालून घालून ते बिचारे जेरीस आले.
आता दोनवर्षे झाली सीता देवीच्या हातापाया पडून केस मिटवली. केस मागे घेण्याच्या बदल्यात आमचा पुण्याचा फ्लॅट आणि गावाकडची सगळी प्रॉपर्टी सीतादेवीने लाटली आहे. आई बाबाना पेन्शन नाहीये. त्यांनी हाय खाल्लीये. मी कविता करणे बंद करून अजूनही नौकरीच्या शोधात आहे. झालेल्या प्रसिध्धीने बहुदा लग्न होणे शक्यच नाहीये.
सीतादेवीचे अजून दोन डिव्होर्स झालेत म्हणे! आणि हो नाही म्हणायला मी एक चांगली गोष्ट केली माझं नाव ऑफिशिअली बदलुन "सुनील" केले आहे. नो मोअर रावण!

(काल्पनिक)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तं कथा. कथेचा आशय गंभीर आहे पण तो तुम्ही छान हलका फुलका फुलवलाय. कथा आवडली. कथानायकाविषयी वाईट वाटले Sad

@पद्मावति >> आपले म्हणणे अगदी खरे आहे हा अतिशय गंभीर विषय आहे. या कायद्याचा फार वाईट रित्या गैर फायदा घेण्यात आला ज्यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली. अनेक पुरुषांनी खोटे आरोप सहन न होऊन आत्महत्या केली. "म्हाताऱ्या कोमातील आजीला अटक होणे" हेच या शोकांतिकेची सार आहे . या कायद्या बद्दल आणि केसेस बद्दल अधिक माहिती आपल्याला http://www.498a.org/ या दुव्यावर मिळू शकेल. मग कदाचित प्रश्न पडेल की मी ही विनोदी कथा का म्हणून लिहिली? याचे कारण असे की माझी स्वतःची धारणा अशी आहे की मनोरंजन हे प्रबोधनाचे उत्तम साधन आहे आणि कडू गोळी ही साखरेच्या वेष्टणातच बरी लागते.

+ १

एवढा गंभीर विषय तुम्ही एवढ्या सहजपणे एक हलका फुलका विनोदी टच देउन एवढ्या सुरेखपणे मांडलय, या बद्दल सर्व प्रथम तुमचे अभिनंदन....!! तुमची कल्पना शक्ती खुप आवडली...!!!

Katha chan.
Pan katheylya Rawnala (suddha) nyay milala pahije ase watle.

मस्त

कडू गोळी ही साखरेच्या वेष्टणातच बरी लागते. >>>=+१ Happy