अधिवेशनाचे वृत्त - मे २०१७

Submitted by BMM2017 on 3 May, 2017 - 13:08

MI मराठी - आपलं अधिवेशन

अधिवेशनाची रूपरेषा आखणं ही खूप महत्वाची गोष्ट असते. ही रूपरेषा म्हणजे अधिवेशनाचा पाया असतो आणि त्यावरच नंतर अधिवेशनाचा संपूर्ण डोलारा उभा राहणार असतो. "अधिवेशन का करायचं?" या प्रश्नापासून ही रूपरेषा आखायला सुरुवात होते आणि एकदा "का?" या प्रश्नाचं उत्तर मिळालं, की मग "कसं?" ह्या प्रश्नाचं उत्तर मिळत जातं..

अधिवेशन हे पक्वान्नांनी भरलेल्या ताटासारखं असतं. त्यात मनोरंजनाचे कार्यक्रम 'पुरणपोळीची' जागा घेतात, महाराष्ट्रीय भोजन 'बटाट्याच्या भाजीची' जागा घेतं, तर उत्तम सुविधा, सभागृह, ऑडिओ-व्हिजुअल हे 'वरण-भात-तूप-लिंबू' यांसारखंच अत्यंत आवश्यक असतं. आता हे ताट कसं सजवायचं, त्यात काय काय असावं हे ठरवणं, म्हणजे अधिवेशनाचं नियोजन करणं. प्रत्येकाला वाटतं सचिन यावा अधिवेशनाला. त्याला आपल्याला कदाचित बोलवता आलंही असतं. पण सचिनचं येणं, म्हणजे आपलं ताट थेट १० पुराणपोळ्यांनी भरलं असतं आणि अजून पदार्थ ठेवायला आपल्याला काही जमलं नसतं. ताटात पुरणपोळीला सगळ्यात जास्त महत्व आहे, यात शंकाच नाही. पण जर तिच्या जोडीला कटाची आमटी असली तर? काकडीची किंवा कांदा-टॉमेटोची कोशिंबीर असली तर? पापड, कुरडई, भजी, एखादी उसळ, पुरी, ताक, हिरवी चटणी, लोणचं, चिमूटभर मीठ आणि जेवण झालं की आईस्क्रीम असलं तर..! इतकंच नाही तर चांदीचं ताट, ताटाच्या भोवती रांगोळी, संगीताचे कोमल स्वर आणि प्रेमाने केलेला जेवणाचा आग्रह.. हे सगळं सोबतीला असेल तर? तर ह्याला खरं "साग्रसंगीत भोजन" म्हणता येईल, नाही का!

मग ह्यावेळी आपल्या "पक्वान्नांच्या ताटात" काय काय आहे? अहो बरंच काही आहे! नाना पाटेकर, विजया मेहता, प्रशांत दामले, राहुल देशपांडे, बेला शेंडे, स्वप्नील बांदोडकर, शंकर अभ्यंकर, अशोक नायगांवकर, रामदास फुटाणे अशा दिग्गजांचे कार्यक्रम आहेत. जेवणात महाराष्ट्राच्या विविध प्रांतातली खासीयत आहे. कधी कोकणी, मालवणी, कधी वऱ्हाडी, कधी कोल्हापुरी जेवण आहे, तर कधी अस्सल पुणेरी आणि मुंबई कट्टा स्टाईल जेवण आहे. लहान मुलांना आवडतील असे पदार्थ प्रत्येक जेवणात आहेत. जेष्ठ लोकांसाठी, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असणाऱ्यांसाठी कमी तिखट, कमी गोड असे अधिक पदार्थ आहेत. अगदी रोज वरण भात मिळणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या असणार आहेत.

जेष्ठ लोकांसाठी किंवा ज्यांना मदतीची आवश्यकता आहे अशांसाठी जेवणाच्या वेगळ्या रांगा असणार आहेत, जेणेकरून त्यांना कमीत कमी वेळ वाट पाहावी लागेल. जेष्ठ लोकांसाठी आणि तान्ह्या बाळांसाठी आपण फेब्रुवारीपर्यंत अधिवेशनाच्या सभागृहाला लागून असलेली हॉटेल्स उपलब्ध करून दिली होती. बऱ्याच लोकांना त्याचा उपयोग व्हावा आणि अधिवेशनाला येणं सुकर व्हावं ही त्यामागची भूमिका. डेट्रॉईट आणि शिकागो एअरपोर्टला विमानाने येणं तुलनेने स्वस्त असल्याकारणाने त्या एअरपोर्टसपासून अगदी सवलतीच्या दरात बसेस उपलब्ध केल्या आहेत. ग्रँड रॅपिड्सच्या विविध हॉटेल्स पासून अधिवेशनाच्या सभागृहापर्यंत मोफत शटल्स उपलब्ध केली आहेत. कार रेंट करण्यासाठी तसेच Uber किंवा कॅब करण्यासाठी दरात सवलत उपलब्ध करून दिली आहे. रजिस्ट्रेशन करताना गर्दी होऊ नये म्हणून जे बुधवारी किंवा गुरुवारी पोहोचतायत त्यांचं त्यांच्या हॉटेलमध्येच रजिस्ट्रेशन होणार आहे.

नॉर्थ अमेरिकेचे एकापेक्षा एक कार्यक्रम असणार आहेत. नाट्य-नृत्य-गायन-वादन सगळ्याचा सुंदर मिलाफ पाहायला मिळणार आहे. कार्यक्रमांची निवड करताना न्यू जर्सी, कॅलिफोर्नियातले नेहेमीचे यशस्वी कलाकार तर असणारच आहेत, पण नॉर्थ कॅरोलायना, आयोवा अशा ठिकाणाहून पहिल्यांदाच काही कलाकार येऊन त्यांची कला सादर करणार आहेत. अधिवेशनाचा हा मंच अधिकाधिक कलाकरांना उपलब्ध करून देणं आणि कलेचा हा उत्सव आनंददायी करायचा प्रयत्न करणं ही या मागची भूमिका. तसेच तरुणांसाठी स्पीड डेटिंग आणि आजच्या काळाची गरज ओळखून ३५+ वयोगातल्या लोकांसाठी "मनोमिलन" ह्या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. या शिवाय BizCon, CME, उत्तररंग ह्या तीन परिषदा आणि banquet म्हणजे पूर्वसंधेची मेजवानी असणार आहे. लहान मुलांसाठी आणि तरुण मुलांसाठी भरपूर कार्यक्रम आयोजित केले आहेत आणि त्यातला प्रत्येक कार्यक्रम त्या त्या वयोगटातल्या मुलांनी निवडला आहे. त्यामुळे मुलं अगदी धमाल करणार आहेत. वाचनीय अशी स्मरणिका तयार होत आहे. अनेक ढोल-ताशा पथकं "ग्रंथदिंडी" साठी जमा होणार आहेत. "ओपनिंग सेरेमनी" ची तयारी डेट्रॉईटकर तन-मन-धन अर्पून करत आहेत. अधिवेशनाचं स्वागत गीत तयार होत आहे..

कसं वाटलं हे सजवलेलं ताट? तुमचं प्रेमाने आदरातिथ्य करायला डेट्रॉईटच्या स्वयंसेवकांची फौज तयार आहे. आता अवकाश आहे फक्त आपण अधिवेशनाला येण्याचा. ६-९ जुलै, ग्रँड रॅपिड्स, मिशिगन येथे!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधिही प्रत्येकवेळेस लिहलय परत एकदा लिहते, अधिवेशनाचे व्हिडीयो उपलब्ध केल्यास ज्याना अधिवेशन इच्छा असुनही अ‍ॅन्टेड करता येत नाही त्यानाही त्याचा आस्वाद घेता येइल