कथुकल्या ३ + शशक पुर्ण करा चॉलेंज

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 15 April, 2017 - 11:52

नमस्कार मंडळी.

यावेळी तुमच्यासाठी एक चॅलेंज टाकलं आहे.
तिसरी कथा शतशब्दकथा आहे…पण ती आहे अपूर्ण. तुम्हाला येईल का ती पुर्ण करता…

-----------------------------------------------

१. स्मशानचोर

दिग्या अन जग्या मुडदे चोरायचे… स्मशानात पुरलेले. संशयाला जागाच सुटणार नाही असं परफेक्ट त्यांचं काम. म्हणून गुप्तपणे संशोधन करणाऱ्या संस्था/शास्त्रज्ञ, आणि काही मेडिकल कॉलेजेस त्यांनाच काम द्यायच्या. या डेड बॉडीजचं पुढे काय होतं याच्याशी त्यांना काही देणंघेणं नव्हतं. त्यांच्या मतलब होता पैशांशी.

आजची सुपारी मोठी होती. दोघांनी अख्खी रात्र घाम गाळून सहा मुडदे उकरून काढले. त्यांना मटकावून गाडी जंगलाच्या दिशेने सुसाटत निघाली.

जग्याने खिशात हात घातला, रिव्हॉल्व्हरच्या थंडगार नळीचा स्पर्श सुखावणारा होता. आज रग्गड पैसा मिळणार होता; पण या पैशात त्याला भागीदारी पाहिजे नव्हती. दिग्या त्याचा चांगला मित्र होता पण पैशापुढे कोणी बाप नसतो का दादा. एवढ्या पैशात त्याला दुबईला जाऊन सेटल होता आलं असतं. दिग्याला टपकवायचं त्याने पक्कं केलं.

त्या विशिष्ट ठिकाणी ते पोहोचले तेव्हा टकलू आधीच पोहोचला होता. त्याने आपल्या लांबलचक कारच्या नंबरप्लेट झाकलेल्या होत्या.

“वेल डन बॉइज. तुम्ही आहात म्हणून आमचे प्रयोग बिनबोभाट सुरू आहेत.” टकलू खुशीत बोलला.

“अपनेको सिर्फ पैसों से मतलब.”

“मिळतील मिळतील. आधी त्या सात डेडबॉड्या तर माझ्या गाडीत टाका.”

“सात ?!! दिग्या, तू तर बोलला होता की सहाच बॉड्या पाह्यजे.”

“सातच आहेत भावा”

त्याने रिव्हॉल्व्हर बाहेर काढली, ट्रिगर दबला.

---------------------------------------------

२. परग्रहावरची मजा

आपण जिवंत आहोत यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. नुसता जिवंतच नाही तर चांगला ठणठणीत होता तो. डोळे उघडून त्याने आजूबाजूला पाहिलं... पोपटी झाडांचं जंगल, निळसर माती अन आकाशात मंद तेजाने चमकणारे दोन तांबूस सूर्य. त्याच्या लक्षात आलं की आपण पृथ्वीवर नाही.

पुष्पक कंपनीने लकी ड्रॉ काढला अन अवकाशयात्रेसाठी त्याची निवड झाली, तो प्रचंड खुश झाला होता तेव्हा. सोबतचे पाच प्रवासी पैसे भरून आले होते. सगळं सुरळीत सुरू असतांना अचानक अपघात झाला अन तो या अनोळखी ठिकाणी येऊन पडला. त्याने सहप्रवाशांना बराचवेळ आवाज दिला पण कुणीच सापडलं नाही.

पाठीमागून कसलातरी आवाज आला. त्याने वळून पाहिलं…अन तो पाहतंच राहिला. दहाबारा सुंदर एलीयन तरूणी फरच्या बिकिनी घालून उभ्या होत्या. जवळपास माणसांसारख्याच दिसणाऱ्या ह्या अप्सराच जणू. सगळ्यांनी महत्वाचे भाग झाकतील इतपतच कपडे घातले होते ! त्याला वाळवंटात मृगजळ दिसावं त्याहून जास्त आनंद झाला.

“हाय, मी सखाराम” तो पाच बोटं नाचवत म्हणाला.

पण त्या तरूणी शांत होत्या. सगळ्यांची नजर त्याच्यावरच खिळलेली होती.

‘यांना आपली भाषा काय घंटा समजणार’ त्याने मनाशी विचार केला अन चुप बसला. सगळ्यात पुढे असलेली तरूणी त्याच्या जवळ आली. तिच्या शरीराचा अनामिक, धुंद करणारा सुगंध त्याला जाणवला. तिने त्याला खालपासून वरपर्यंत न्याहाळलं.

“पृथ्वीवरचा दिसतोस.” तिने चक्क पुणेरी मराठीत विचारलं.

आयला ही काय भानगड आहे !

“तुम्हाला…मराठी…”

“आमच्याकडे भाषा रुपांतरण यंत्र आहेत. विश्वातली कोणतीही भाषा आम्ही ऐकू शकतो आणि समजू शकतो.”

“वॉव ग्रेट.”

“तू पुरुष आहेस ??” तिचा पुढचा प्रश्न.

“तुला दिसत नाही ??” तो रागाने बोलला. पौरूषत्व हनन करणारी कुठलीही गोष्ट तो सहन करू शकत नव्हता.

“दिसतंय, पण तू एलीयन आहेस म्हणून कन्फर्म केलं. काही वर्षांपूर्वी अवाढव्य कासवांसोबत झालेल्या युद्धात आमचे सगळे माणसं ठार झाले. म्हणून आम्हाला पुरूषाची गरज होती. ती आज पूर्ण झाली.”

स्वतःला अजिबात चिमटा घ्यायचा नाही हे त्याने ठरवून टाकलं, यदाकदाचीत हे स्वप्न असेल तर मोडू नये म्हणून.

“तू तयार आहेस का आमचा वंश वाढवायला ?”

“हो हो तयार आहे, मदत करायला मराठी माणूस एका पायावर तयार असतो.” तो खास ठेवणीतलं हास्य चेहऱ्यावर पसरून म्हणाला. एवढा आनंद त्याला आयुष्यात कधी झाला नव्हता. या ग्रहावरचा तो राजा होता अन बाकीच्या सगळ्या राण्या !!

“केव्हा करायची मग सुरुवात ?” त्याने दोन्ही हातांचे तळवे चोळत विचारलं

“तुझी इच्छा असेल तर लगेच.” त्याच्या डाव्या हाताला उभी असलेली सडपातळ तरूणी म्हणाली.

तो फक्त नाचायचंच बाकी उरला.

“पण अनुभव आहे का तुला ? तुला एकट्याला इतकेजण हँडल करता येतील ?

“त्याची तुम्ही चिंताच करू नका. या विषयात मी बाप आहे म्हटलं. सखाराम हे नाव जरी उच्चारलं तरी अख्खी बुधवारपेठ हादरून जाते. फक्त दोन दिवसांच्या अवकाशप्रवासात सोबतच्या दोन आन्ट्या पटवल्या भाऊनं.”

“गुड. मला सांगा तुम्ही इथे कशी सुरुवात करणार आहे ?”

“अम्म… सध्या एक तरूणी द्या माझ्यासोबत. प्रॅक्टीस झाली की एकावेळी दोन तीन, जेवढं पचेल, रूचेल तेवढं हँडल करू.”

“जशी तुझी मर्जी.”
तिने मागे वळून एका तरूणीकडे पाहिलं. इशारा ओळखून एक ती पुढे आली. ग्रुपमधली सगळ्यात सुंदर तरूणी होती ती.

“याला घेऊन गुहेत जा.“

आनंदाचा आवंढा गपकन त्याच्या घशात अडकला.

“चालेल ना ?”

“चालेल नाही धावेल, उडेल.” तो आनंदाने चित्कारला.

थोड्याच वेळात ते दोघे एका गुहेत आले. अंधुक उजेड होता पण आवश्यक ते दिसायला तेवढा पुरेसा होता.

“पोहोचलो आपण.” तिने माहिती दिली.

त्याने एका झटक्यात टी शर्ट अन बनियेन काढून फेकला. तिच्या अंगावर झेप घेणार तेवढ्यात तिने त्याला थांबवलं.

“एक सांगायचं राहीलंच, आमची स्त्रीप्रधान संस्कृती आहे. तुमच्या पृथ्वीवर आहे त्याच्या उलट.”

“नो प्रॉब्लम. तू पुढाकार घे.”

तिने समोरच्या भिंतीवरचं बटन दाबलं, भिंत दरवाजासारखी बाजूला सरकली. समोरच्या दालनात होती लहानमोठी शेकडो एलीयन मुलं.

“आम्ही शिकारीला गेलो की यांना तू सांभाळायचं आहेस. आमचा वंश वाढवणं तुझ्या हातात…..
.
.
.
अरे तू चिमटे का घेतोयस स्वतःला ??”

------------------------------------------------------

३.

अख्खा वाडा बाया, माणसं अन पोरांनी फुलला होता. विस्फारलेल्या डोळ्यांच्या शेकडो जोड्या टकामका बघत होत्या. कुणी म्हणालं ही जादू आहे तर कुणाला स्वप्न वाटत होतं. काही विद्वानांनी चारिबाजूंनी फिरुन पाहिलं, आबांनी काठी आपटंत कोणी लपलंय का ते शोधलं, लहानसहानांनी आनंदाने टाळ्या पिटल्या. त्यांच्या आया मात्र घाबरलेल्या होत्या. जवळ जाऊ नये म्हणून पोरांना त्यांनी मागे खेचलं.

ही बातमी पंचक्रोशीत वणव्यासारखी पसरली. बघ्यांची रांग लागली, तांत्रिकमांत्रिक डोकावून गेले. काहीजण लांबच राहिले. गर्दी पाहून विक्रेत्यांनी धाव घेतली. अखेर बराच नावलौकीक असलेल्या पुजाऱ्यांना बोलावण्यात आलं, विधिवत पुजा होऊन ब्राह्मणजेवणाच्या पंगती उठल्या .............

--------------------------
हे आहेत ८७ शब्द, अजून फक्त १३ शब्द हवेत. कुणाला काय शेवट सूचतो वाचायला उत्सुक. (अर्थात हे ऑप्शनल आहे. शेवट नाही सांगितला तरी पहिल्या दोन कथा कशा वाटल्या याबद्दल मात्र जरूर सांगा)

(माझ्या डोक्यातले १३ शब्द मी चैतन्य रासकर यांना विपू द्वारे पाठवले आहेत. उद्या संध्याकाळी ७ वाजता ते इथे टाकेन.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त कथा...सगळ्या.

कथा ३ = "सोन्याच्या पेटी वरचा तो सात फणे असलेला, दणकट नाग अजूनही ऐटीत डुलत होता...."

१३ शब्द.... कसे वाटले...?
Happy Wink

"सोन्याच्या पेटी वरचा तो सात फणे असलेला, दणकट नाग अजूनही ऐटीत डुलत होता...."
>> i )नाग असता तर मुलं घाबरले असते
ii) आबांनी काठी आपटत कुणी लपलंय का शोधलं...
या वाक्याचा अर्थ बसत नाही

दुसरे १३ शब्द...?

हवेत तरंगणाऱ्या त्या जादुई पिवळसर रंगाच्या करंडकाच तेज आता हळू-हळू वाढू लागले होते....

हवेत तरंगणाऱ्या त्या जादुई पिवळसर रंगाच्या करंडकाच तेज आता हळू-हळू वाढू लागले होते....
>> चालू शकतं पण आबांना कुणीतरी लपलय अशी शंका का आली ; )

पहिल्या दोन्ही कथा नेहमीप्रमाणे मस्त आहेत . तिसरी पण भारी आहे आणि अपूर्ण असल्यामुळे आणखी इंटरेस्टिंग वाटत आहे. बग्स बनीजींचा प्रयत्न पण चांगला आहे कथा पूर्ण करण्याचा .

Katha 3
13 shabd
- Aani shevti ekdach khrrrrrr asa aawaj houn gavat aalela pahila tv suru zala

जबराट. बहुत खूब सोचा है जनाब आपने. परंतु वरील १३ शब्द ग्राह्य धरल्यास एकदोन प्रश्न मनास पडतात -

गावात आलेला पहिला टीव्ही इतका वेळ सुरूच झालेला नव्हता. म्हणजे तो बंद टीव्ही काच लावलेल्या लाकडी पेटीसारखा दिसत असेल which is not a strange thing. मग एखादी जादूची गोष्ट बघितल्यासारख्या reactions का आल्या ?

दूसरी गोष्ट तो गावातला पहिला टीव्ही होता हे मानल्यास आजुबाजुच्या गावातपण एखादा टीव्ही असू शकेल. मग पंचक्रोशितले लोक का आले तिथे ? Unique असेल तरच एवढं अप्रुप

"खडकातील भगदाडाला पाझर फुटला होता. दुष्काळी भागात एका झऱ्याने अकस्मात जन्म घेतला होता."

किंवा
बाया मुलांना मागे खेचत का होत्या हे कळत नसेल तर

"खडकातील भगदाडात एका झऱ्याने जन्म घेतला होता पण पाणी चाखण्याची कोणातही हिम्मत नव्हती."

१३ शब्द
स्वर्गात गेलेले आबा मिश्किल हसत तेरव्याच्या दिवशी अचानक सागल्यान समोर प्रकट झाले होते.......

सर्वसामान्य मुलाप्रमाने दिसणारा बालयन्त्रमानव सगळा गाव स्वच्छ-सुंदर करून कोषात परत गेला होता.

शामजी,
दूसरे तेरा शब्द जुळत आहेत. छान

अश्विनीजी,
Concept interesting आहे. पण वरीलपैकी काही वर्णनांशी जुळत नाही.
कदाचित modify करता येईल

श्री गणरायाची मूर्ती खरोखर सर्वांसमक्ष दूध पीत होती, प्रसादाचे ताट डोळ्यादेखत रिकामे झाले.
खूपच साहजिक वाक्य आहे आणि तेरा शब्द ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, अजून काही सुचले तर लिहितो.
पहिल्या दोन कथा खूप चांगल्या आहे विनय आणि चॅलेंज ठेवल्याबद्दल धन्यवाद, विचारशक्तीला खरंच चालना मिळते.

धन्यवाद वैभव.
फिट बसत आहेत १३ शब्द. मस्त

आणि तेव्हाच भारताचे परतुन आलेले पहिले स्पेसशटल रित्राईव्ह करायला इस्रोची टीम वाड्यावर पोहोचली

ही बातमी पंचक्रोशीत वणव्यासारखी पसरली. बघ्यांची रांग लागली, तांत्रिकमांत्रिक डोकावून गेले. काहीजण लांबच राहिले. गर्दी पाहून विक्रेत्यांनी धाव घेतली. अखेर बराच नावलौकीक असलेल्या पुजाऱ्यांना बोलावण्यात आलं, विधिवत पुजा होऊन ब्राह्मणजेवणाच्या पंगती उठल्या .............

आणि तेव्हाच भारताचे परतुन आलेले पहिले स्पेसशटल रित्राईव्ह करायला इस्रोची टीम वाड्यावर पोहोचली
>>
काहीही हं श्री Lol Lol

आणि पाटीलांनी दिलेली गुप्त खजिन्यातील एकेक सुवर्णमुद्रा घेवून प्रत्येकजण समाधानाने आपापल्या घरी निघाला.

अहो स्पेस कॅप्सूल माळरानावर पडली, पहिलाच प्रयन्त होता तेव्हा खेडोपाडी tv नव्हते, आकाशातून असे काही मोठे आले म्हणजे देवच जाणिनीवर आले,
म्हणून पूजा, गावजेवन,
Happy
असो... 100 शब्दांची कथा, शेवटच्या 13 शब्दांचे स्पष्टीकरण च 100 शब्दातून जास्त व्हायचं Lol

माझ्या डोक्यात काय होतं ते सांगतो :

तर अशी होती तालुक्यातल्या पहिल्या टीव्हीची मजा. मी लहान होते तेव्हा... आजी म्हणाली.

जुन्या काळी कुठलंही धार्मिक कार्य /मोठी पुजा असली तर त्याच्या समाप्तीच्या वेळी ब्राह्मणजेवण घालण्याची पद्धत होती.

छान आहेत या ही कथा Happy
तिसरी कोडेवाली कथाही छान..
फार भन्नाट सुचत आहे एकेक तुम्हाला..

ते टीव्हीचे उत्तर वर बसु यांनीही दिले होते. अर्थात नेमके संदर्भ जुळावेत हे कठीणच कारण कथा तुम्हाला सुचलेली आणि तपशील तुम्ही त्यानुसारच भरलेले. पण तो टीव्ही असणार हे सुचणे कौतुकास्पद, बासू यांचेही कौतुक आणि अभिनंदन Happy

धन्यवाद ऋन्मेSश. प्रोत्साहनाने हुरुप वाढतो.

खरंच बसूजी यांचे विशेष कौतुक कारण त्यांना तो tv असावा हे सुचलं.

शामजी आणि वैभव यांचेही तर्क जवळपास चपखल बसणारे आणि संपुर्ण घटनेकडे वेगळ्या दृष्टीकोनातून प्रकाश टाकणारे आहेत.

Pages