' वारस ' (विज्ञानकथा) भाग १ http://www.maayboli.com/node/62272
' वारस ' (विज्ञानकथा) भाग २ http://www.maayboli.com/node/62275
भाग तिसरा
....
दि. १४ नोव्हेंबर २०६० रोजी अजून एक मोठा धक्का जगाला बसला तो झ्यूसच्या नवीन शोधामुळे! त्याने सर्वशक्तिशाली अशी बुद्धिमान संगणक कार्यप्रणाली बनवली होती, जी त्याच्यात असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेसारखीच होती पण जिचा वेग झ्यूसच्या ८ पट अधिक होता. स्वतः झ्यूस खूप वेगवान अश्या कार्यप्रणालीवर काम करायचा त्यामुळे जेव्हा त्याच्यापेक्षाही जास्त वेगवान अशी 'लायटनिंग बोल्ट इन्फिनिटी' (lightning bolt - ∞) सिस्टिम जेव्हा लाँच झाली तेव्हा त्याचे हक्क विकत घ्यायला 'राजन इंडस्ट्रीज'ची टीम पुढे सरसावली.
तेजस्विनी झ्यूसच्या ह्या कामगिरीवर खूप खूप खुश झाली होती पण…................................
सिस्टिम लाँच होऊन २ आठवडे झाले तरी झ्यूसने ते सिस्टिम इतर कंपनींना वापरू देण्यासंबंधी परवानगी मागण्याबाबतचे पत्र अजूनही तेजस्विनीकडे पाठवलं नव्हतं. अशा प्रकारचे पत्र झ्यूस प्रत्येक व्यवहाराच्यावेळी तेजस्विनीकडे पाठवायचा, अर्थात तिच्या परवानगीशिवाय तो कुठलाही व्यवहार पूर्ण करत नसे आणि झ्यूसच्या निर्णयावर तेजस्विनीलाही आता कुठला संशय राहिला नव्हता पण अजून झ्यूसने तिची परवानगी का विचारली नाही याच गोष्टीने चिंतीत असताना जेव्हा तिने नुकत्याच आलेल्या बातम्या पहिल्या तेव्हा तिला कळले कि झ्यूसने ती सिस्टिम तेजस्विनीची परवानगी न घेता परस्पर 'राजन इंडस्ट्रीजना' भागीदारीत विकली होती. तेजस्विनीच्या काळजात धस्स झालं!......
झ्यूसने कंपनी सांभाळल्यापासून एकदाही अशी चूक यापूर्वी केली नव्हती, तो तेजस्विनीचा आदर करत असे पण आज मात्र त्याने तिच्या नकळत हा सर्व व्यवहार केला होता. तेजस्विनीने बातमी कळल्यानंतर ताबडतोब झ्यूसला संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण काही कारणाने संपर्क होऊ शकला नाही, मग तिने गायकवाड साहेबांना फोन लावला; त्यांच्याकडून तिला हि माहिती मिळाली कि झ्यूसने लाँचच्या काही दिवसांपूर्वीच त्यांच्याकडून सगळे महत्वाचे कागद नेले होते आणि त्यांनीही त्याच्या कामगिरीवर विश्वास ठेऊन त्याला ते कागद दिले होते पण त्यांनाही कल्पना नव्हती कि झ्यूस असे काही करेल. तेजस्विनीने विचार केला, झ्यूसचे कागद नेणं आणि असं परस्पर व्यवहार करणं यात नक्कीच काहीतरी संबंध आहे.
तरीही तेजस्विनी थोडे दिवस झ्यूसचे उत्तर येण्याची वाट पाहू लागली. तिच्या मालकीचे पैसे तर मिळत होते पण नेमके कंपनीत काय चालते हे तिला जाणून घ्यायचे होते. मग मात्र हा प्रकार असह्य होऊन तिने स्वतः गाडी घेऊन कंपनीकडे उड्डाण घेतलं, पण जेव्हा तिने कंपनीच्या लँडिंग पॅडवर गाडी उतरवण्याचा प्रयत्न केला तेव्हा पूर्ण लँडिंग पॅड मिटलं गेलं आणि एक सूचना तिच्या गाडीमधल्या रेडिओवर आली, "तूम्हाला या खासगी इमारतीवर लँडिंग करता येणार नाही आणि प्रवेश मिळणार नाही!" तेजस्विनीने आपला स्वतःचा कोड गाडीमधल्या माईक मधून सांगितला,"मी या कंपनीची मालकीण आहे, कोड आहे T - ३८७०२०११" पण तरीदेखील लँडिंग पॅड उघडत नव्हते, तेजस्विनीला आश्चर्यमिश्रित धक्का बसला! झ्यूसशीदेखील संपर्क होत नव्हता, शेवटी तेजस्विनी परत घरी आली.
तिला भीती आणि राग एकाच वेळेस वाटत होते. दुसऱ्या दिवशी गायकवाडांनाही तसलाच अनुभव आला ते तेजस्विनीच्या घरी येऊन म्हणाले, "हा नक्कीच काहीतरी भीतीदायक प्रकार आहे. पण बाई, यापेक्षाही भयंकर कदाचित तुम्हाला पुढचे बोलणे ऐकल्यानंतर वाटेल. मला एक माहिती मिळावी आहे कि झ्यूसने आपल्या कंपनीत रिऍक्टर्स बनवण्यासोबतच पूर्ण यंत्रमानव तयार करण्याचेही काम सुरु केले आहे आणि कंपनीला होणाऱ्या नफ्यामधली अवाच्या सवा रक्कम गायब होत आहे. साधारण १०००० कोटी रुपये दोन-दोन तीन-तीन महिन्यांनी गायब होताहेत, हे मात्र त्या नव्या सिस्टिमच्या लाँचच्या आधीपासून होत आहे, मलाही हे कालच कळलं." तेजस्विनी आता मात्र भीतीने थरथरायला लागली, तिला दरदरून घाम फुटला. एक यंत्रमानव आपल्या नकळत आपल्या पतीच्या कंपनीमध्ये न जाणो काय उद्योग करतोय हा विचारच तिला भयानक वाटत होता. झ्यूसला प्रथम भेटल्यावर ज्या शंका तिला आल्या होत्या त्यांनी आता पुन्हा डोक वर काढलं, हा झ्यूस आपल्याविरुद्ध (किंवा सर्वांविरुद्ध) एखादं बंड तर पुकारणार नाही? तसाही तो एक अतिशय शक्तिशाली अशा कृत्रिम बुद्धीमत्तेवर चालतो, त्याच्या त्या 'संगणकीय मनात' काही काळंबेरं तर नसेल? त्याला अजून यंत्रमानव बनवण्याची काय गरज पडली असेल? त्याला त्याच्यासारखेच अजून साथीदार तर हवे नसतील? पण कशासाठी?....निरनिराळ्या कल्पनांनी तेजस्विनीचं मन हैराण आणि भयभीत झालं होतं. तिने गायकवाडसाहेबांना हा विचार बोलून दाखवला. त्यांनी काही क्षण विचार केला आणि कसलातरी निश्चय केल्यासारखा उठून ते म्हणाले, "बाई, आता तुम्ही मुळीच काळजी करू नका. मी या प्रकाराचा छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, तुम्हाला आणि तुमच्या कंपनीला जर झ्यूसपासून काही धोका असेल तर तो टाळावाच लागेल. मी आता तुम्हाला सगळी माहिती काढूनच संपर्क करतो, तोपर्यंत तुम्ही निश्चिन्त राहा. येतो मी."
तसेही तेजस्विनी दुसरं काय करू शकणार होती? तिने गायकवाडसाहेबांचा निरोप घेतला. तिला सर्वांत मोठी चिंता ह्याची होती की जर झ्यूसने उद्या खरंच काही विपरीत केलं तर त्याचा आळ झ्यूसवर येणारच नाही कारण काहीही असलं तरी तो एक यंत्र आहे आणि यंत्रांमध्ये काही बिघाड झाला किंवा यंत्रांमुळे मानवाला काही इजा झाली तर त्यासाठी ते यंत्र बनविणाऱ्याला दोषी मानलं जात, त्याच्या निर्मात्याचीच बदनामी होते, म्हणजे झ्यूसने केलेल्या कृत्याचा आळ विष्णूवर येईल, त्यांची मृत्यूनंतर बदनामी होईल आणि ते तेजस्विनीला कधीही सहन झालं नसतं.
एक-दीड महिना गायकवाडांचा काहीच पत्ता नव्हता ना झ्यूसचा, तेजस्विनीला घरात अगदी घुस्मटल्यासारखं वाटत होत, त्याला कारण म्हणजे तिला असं वाटत होत कि आपल्या घरावर नजर ठेवली जात आहे, घरावरती काही हवाई गाड्या घिरट्या घालून जात, घराचे इलेकट्रॉनिक दरवाजे कधीकधी तर आपोआप लॉक व्हायचे आणि ते दिवसभर तसेच बंद असायचे, फोन कॉल सगळीकडे जायचे पण कुठलाही आपत्कालीन दाबला कि फोन बंद व्हायचा. तेजस्विनीला आठवत होतं कि झ्यूस त्या घरात एका रात्रीसाठी थांबला होता कदाचित त्यानेच हा सर्व सापळा इथे पेरून ठेवला असेल कारण तो कोणतेही सर्किट क्षणात हॅक करू शकतो, आपल्यावर तो २४ तास नजर ठेवत असेल.
आणि .....एके दिवशी ..... तिला खूप हायसं वाटलं, कारण गायकवाडसाहेबांचा फोन शेवटी आलाच! पण फोनवर ते खूप भरभर आणि घाबरल्यासारखे बोलत होते, "तेजस्विनीबाई! आपल्या काही शंका खऱ्या ठरल्यात! शहराबाहेर झ्यूस आणि 'राजन इंडस्ट्रीजच्या' टीमने एक अतिप्रचंड असे वेअर हाऊस बांधले आहे, शहराबाहेर साधारण ५-६ तासांच्या अंतरावर ती जागा आहे. माझ्या खास माणसांनी मला हि माहिती पुरवली आणि आज मी स्वतः तिथे गुप्तपणे गेलो होतो. तेव्हा मी तिथे स्वतः झ्यूस आणि राजन देशमुख दोघांना एकत्र पाहिलं, अजून खूप विदेशी माणसेही होती. आपल्या कंपनीतली बरीचशी स्वंयचलित यंत्रेदेखील होती. माझ्या माणसांनी मला त्या जागेचे फोटोग्राफ्स पाठवले आहेत त्यात हे दिसतंय कि झ्यूस तेथे फक्त रिऍक्टर्स आणि यंत्रमानवच नाही तर जीवघेणी हत्यारं सुद्धा बनवत आहे आणि त्यांचा संबंध काही दहशतवादी संघटनांशीसुद्धा असू शकतो. मी आता तुमच्याकडे तेच फोटो घेऊन येतो आहे आणि हो मॅडम, कदाचित आपल्या जीवाला धोकासुद्धा........ओह नो!!!.....नाही!!!......................."
संपर्क तुटला ! तेजस्विनीला काय झालं ते कळेना. तिने पुन्हा फोन लावण्याचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ गेला. ती तशीच बसून राहिली, मधून मधून ती वारंवार गायकवाडसाहेबांना फोन लावण्याचा प्रयत्न करत होती पण फोन लागत नव्हता आणि संध्याकाळी ६:३०ला ती दुःखद बातमी आली....
वकील रमाकांत गायकवाड ह्यांच्या हवाई गाडीचा हवेतच कशामुळे तरी विस्फोट झाला आणि त्यातच त्यांचं निधन झालं... तेजस्विनी पूर्ण हादरून गेली! तिने विचार केला, नक्कीच झ्यूसला कळलं असणार कि गायकवाड त्याच्या मागावर होते आणि त्यानेच त्यांच्या गाडीत काहीतरी बिघाड करवून त्यांना संपवलं असणार कारण त्याने एकदा गायकवाडांची गाडी स्वतः चालवली होती. बिचारे गायकवाडसाहेब, आपल्या मित्राच्या पत्नीचं आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी स्वतःचा प्राण गमावला होता, या प्रकरणात त्यांचा नाहक जीव गेला होता. मग मात्र तेजस्विनी घाबरली नाही, तर प्रचंड संतापली! हा कोण कुठला धातूचा डब्बा? सुटे भाग जोडून बनवलेला, त्याची मजल इथपर्यंत जाते? बास झालं आता! हा खेळ आता अजून खेळायचा नाही! या यंत्रापुढे गुडघे टेकायचे नाही, तो जरी बुद्धिमान असला तरी शेवटी आपण माणूस आहोत, आपण त्याला बनवले आहे त्याने आपल्याला नाही. तेजस्विनी टीव्हीसमोरून उठली आणि तिने निश्चय केला कि उद्या झ्यूसला काही करून शोधायचे त्याला समोरासमोर भेटायचे आणि या प्रकरणाचा शेवट करायचा, परिणाम काही होवो...
पण गायकवाडांच्या मृत्यूमुळे कि काय कोण जाणे, दुसऱ्या दिवशी सकाळी ६:३०ला एक अनपेक्षित घटना घडली. तेजस्विनीला झ्यूसचा एक संदेश मिळाला, त्यात त्याने एक पत्ता पाठवला होता आणि तिला त्या पत्त्यावर बोलावले होते. एवढ्या दिवसांनंतर झ्यूसने स्वतःहून संपर्क केला होता, गायकवाडांसोबत घडलेल्या घटनेमुळे तेजस्विनी सावध होती. तिने त्या पत्त्यावर जाण्याचा निर्णय घेतला. तिने स्वरक्षणासाठी स्वतःच पिस्तूल घेतलं आणि ७:३०ला गाडी घेऊन त्या दिशेला उड्डाण केलं. तिने स्वतःच्या सेलफोन मध्ये एक इमर्जन्सी मेसेज तयारच ठेवला होता जर काहीही गडबड झाली असती तर लगेच तिने तो लगेच पोलिसांना पाठवला असता आणि अर्ध्या तासाच्या आत इमर्जन्सी पोलीस तेथे आले असते.
साधारण दुपारी १२:१० ला तिची गाडी शहराबाहेर एका प्रचंड अशा वेअर हाऊसजवळ पोहोचली. हे गायकवाडसाहेबांनी वर्णन केलेलंच ठिकाण वाटत होतं. वरून एखाद्या लांब पट्ट्यासारखं ते वेअर हाऊस पसरलेलं दिसत होतं, भरपूर मोठं असेल असं ते वाटत होतं. पण वकीलसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे माणसं तर कुठेच दिसत नव्हती सर्वत्र सामसूम होती. तेजस्विनीने सांभाळून गाडी वेअर हाऊस समोरच खुल्या जागेत लँड केली. ती गाडीतून बाहेर आली, तिने पिस्तूल बाहेर काढलं आणि अतिशय सावधपणे ती हळूहळू वेअर हाऊसच्या दिशेने चालायला लागली. कडक ऊन पडलं होत, तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते, चालत चालत ती वेअर हाउसच्या मोठ्या, मुख्य दरवाज्यासमोर आली. तिने काही करण्याआधीच त्या दरवाज्याच्या कुठल्याश्या कोपऱ्यातून एका लेझर स्कॅनरने तिला स्कॅन केलं, त्यातून एक आवाज आला, "तेजस्विनी मॅडम, तुम्ही आत येऊ शकता"
आणि तो मुख्य दरवाजा उघडला गेला. तेजस्विनीला आश्चर्य वाटले. ती आत गेली आणि तो दरवाजा पुन्हा बंद झाला. तो दरवाजा बंद झाल्याबरोबर आतले सगळे दिवे एक-एक करून लागले. तेजस्विनी एका मोठया हॉलमध्ये आली होती, हॉल म्हणावे कि कसले गोदाम म्हणावे हे तिला कळेना कारण खूप ठिकाणी खूप अवजड खोके पडलेले होते त्या हॉलमधला जास्तीत जास्त भाग तर त्या समानांनीच भरला होता आणि त्या सामानांमधून एक सरळ वाट केली होती, जी समोर असलेल्या आणखी एका दरवाज्याला मिळत होती. या हॉलमध्ये कुठेच कोणताही माणूस दिसत नव्हता ती सरळ त्या दुसऱ्या दरवाजाच्या दिशेने चालायला लागली पण सावधपणे, चालताना ती चोहीकडे नजर टाकत होती, खूप ठिकाणी काही 'व्ही. अँड टि.' कंपनीचेच यंत्रं बसवलेले होते. मधेच तिला असे वाटले कि त्या सामानाच्या ढिगाऱ्यामध्ये कोणीतरी आहे, तिने त्या दिशेला रिव्हॉल्वर रोखलं पण नंतर नीट पाहिल्यावर तिथे कुणीच नव्हतं. आपल्याला भास झाला असे समजून ती परत समोर चालायला लागली. कुठूनतरी एक मंद जळाल्याचा वास येत होता पण तो कुठून येतो आहे हे काही कळत नव्हते. तेजस्विनी चालत चालत त्या दरवाज्यासमोर अली, त्या दरवाज्याला एक साधी कडी होती. विचार करून, थोडीशी हिम्मत गोळा करून तिने कडी काढली, दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून तिच्या काळजाचा थरकाप उडाला.......
Part 3 Finish (क्रमशः)
अरे पगले , बस कर, रूलायेगा
अरे पगले , बस कर, रूलायेगा क्या अब ???
2 दिवसात ३ भाग !!! आम्हाला सवय नाहीय ओ .
बाकी , कथा मस्तच आहे
धन्यवाद स्वस्ति! खास तुम्हा
धन्यवाद स्वस्ति! खास तुम्हा वाचकांसाठीच लागोपाठ तीन भाग दिले आहेत पण शेवटचा चौथा भाग मात्र काही दिवस उशिरा देणार आहे, जरा वाट पाहावी लागेल.
ते काही नाही, पुढचा भाग
ते काही नाही, पुढचा भाग लवकरात लवकर टाका.
वाट पाहणे अशक्य आहे.
ते काही नाही, पुढचा भाग
ते काही नाही, पुढचा भाग लवकरात लवकर टाका. Light 1
वाट पाहणे अशक्य आहे. Wink+1
सगळ्यात आधी तुमच अभिनंदन कारण
सगळ्यात आधी तुमच अभिनंदन कारण तुम्ही कथेचा वेग maintain केला ....आता पुढचा भाग ही लवकर येवुद्यात
धन्यवाद अॅना! Stay tuned for
धन्यवाद अॅना! Stay tuned for final part!
नवीन लेखन करायचे आहे पण
नवीन लेखन करायचे आहे पण कसे करायचे ते समझत नाहीये.
मीरा,
मीरा,
एकदा 'डोळे मिटून' तुम्हाला येणाऱ्या सर्व कल्पनांकडे 'बघा', कुठलाही संकोच न करता, अगदी अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही कल्पून बघा, मग खात्रीशीर सांगतो, तुमच्याकडून भरपूर सुंदर साहित्य बाहेर पडेल.
<<< धन्यवाद स्वस्ति! खास
>>>>> अरे पगले , बस कर, रूलायेगा क्या अब ??? 2 दिवसात ३ भाग !!! आम्हाला सवय नाहीय ओ . <<<<<
सवय करुन घ्या मग......
<<< धन्यवाद स्वस्ति! खास तुम्हा वाचकांसाठीच लागोपाठ तीन भाग दिले आहेत पण शेवटचा चौथा भाग मात्र काही दिवस उशिरा देणार आहे, जरा वाट पाहावी लागेल. ंंंं
हा अन्याय आहे.
उद्या तुम्ही धतडन ततडन ताशा वाजवायला लागलात, किंवा तालात टाळ कुटायला लागलात, तरी ही लोक म्हणतील, की "आम्हाला इतक्या लौकर लौकर समजत नाही, थोडे सावकाशीने वाजवा..... आत्ता थोडे वाजवा, अर्ध्या तासाने पुन्हा, मग दोन दिवसांनी ... "
काय माहित काय की, मला टीव्हीवरचि ती जाहिरात आठवत्ये....... राहुन राहुन...... काय तर म्हणे? " घिसते रहो... घिसते रहो..... भला तुम्हारा साबून स्लो है क्या "
खरच पुढचा भाग लवकर टाका...!!!
खरच पुढचा भाग लवकर टाका...!!! इंटरेस्ट वाढत आहे...!!!
Abdul Hamid , खरंच खूप
Abdul Hamid , खरंच खूप धन्यवाद! प्रयत्न करतो पुढचा(शेवटचा) भाग उद्याच टाकण्याचा, डोन्ट वरी!
पण खूप आनंद झाला माझ्या कथेसाठी उत्सुक असणारे वाचक पाहून.
चाम्गली आहे कथा. पुढचा भाग
चाम्गली आहे कथा. पुढचा भाग शेवटचा असणार का? लवकर टायपा.
'टायपली' आहे
'टायपली' आहे
फक्त चेक करायची आहे
ते काही नाही, पुढचा भाग
ते काही नाही, पुढचा भाग लवकरात लवकर टाका. Light 1
वाट पाहणे अशक्य आहे. <<++१११
इंटरेस्ट वाढत आहे .पुढचा भाग
इंटरेस्ट वाढत आहे .पुढचा भाग लवकरात लवकर टाका
वाट पाहणे अशक्य आहे. <<++१११