परिवर्तन ट्रस्ट निर्मित लघुपट - 'जागृती' व 'मन की आँखे'
७ एप्रिल हा दिवस जगभरात 'जागतिक आरोग्य दिवस' म्हणून साजरा केला जातो. या वर्षी जागतिक आरोग्य संस्थेनं 'नैराश्य', म्हणजे 'डिप्रेशन' या आजारावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं आहे. आणि म्हणून या वर्षीची संकल्पना आहे - 'चला बोलूया - नैराश्य टाळूया' ('Depression– Let’s talk').
परिवर्तन ट्रस्ट ही संस्था सातारा आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये 'इन्सेंस' आणि 'जन– मन –स्वास्थ्य' या प्रकल्पांअंतर्गत वेगवेगळ्या मानसिक आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समाजाभिमुख पुनर्वसनासाठी गेली अनेक वर्षं काम करत आहे. समाजातल्या सर्व घटकांबरोबर प्रत्यक्ष काम करत असतानाच समाजाला मानसिक आजारांबाबत आणि त्यांच्या उपचारांबाबत माहिती देण्यासाठी नेहमीच ही काही ना काही कार्यक्रम राबवत असते.
नैराश्य आणि इतर सामान्य मानसिक आजारांविषयी लोकांमध्ये जनजागृती व्हावी, आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांनी न संकोचता मदत मागावी आणि समाजानंही मदतीसाठी वेळोवेळी हात पुढे करावा, या हेतूंनी परिवर्तन ट्रस्टनं टाटा ट्रस्ट्स यांच्या सहयोगानं दोन लघुपटांची निर्मिती केली आहे. श्रीमती सुमित्रा भावे यांनी या दोन्ही लघुपटांचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.
'मन की आँखे' आणि 'जागृती' अशी या लघुपटांची नावं असून हे दोन्ही लघुपट ७ एप्रिल, २०१७ रोजी जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित करण्यात येत आहेत.
पुण्यातल्या लॉ कॉलेज रस्त्यावर असलेल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात, म्हणजे एनएफएआय इथे, शुक्रवार, दि. ७ एप्रिल, २०१७ रोजी हे दोन्ही लघुपट सादर केले जातील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
हे दोन्ही लघुपट लवकरच मायबोली.कॉमवर सर्वांना बघण्यासाठी उपलब्ध होतील.
'मन की आँखे' या लघुपटाची एक झलक -
https://www.youtube.com/watch?v=234bTV2qCa0&feature=youtu.be
'जागृती' या लघुपटाची एक झलक -
https://www.youtube.com/watch?v=Lb-mn37quGU&feature=youtu.be
मायबोलीकरांना या विषयाची अधिक माहिती व्हावी, म्हणून परिवर्तन ट्रस्टनं एक लेख पाठवला आहे. तो इथे प्रकाशित करत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या निरीक्षणानुसार संपूर्ण जगात ३०० दशलक्ष लोक हे नैराश्यानं ग्रस्त आहेत. २००५च्या तुलनेत २०१५ सालापर्यंत ही संख्या सुमारे अठरा टक्क्यांनी वाढली आहे. मानसिक आजारांबद्दल समाजात असणारे पूर्वग्रह, भीती, मानसिक आजार असलेल्या व्यक्तीला योग्य प्रकारची मदत न मिळणं आणि मानसिक आजारांबद्दलची अपुरी माहिती यांमुळे नैराश्यग्रस्त व्यक्तीला योग्य उपचार मिळत नाहीत. म्हणूनच मानसिक आजारांबद्दलची भीती कमी व्हावी, मानसिक आजार झालेल्या व्यक्तीला समाजानं कमी लेखू नये, समाज आणि व्यक्ती मानसिक आजारांबद्दल जागरूक व्हावेत आणि जास्तीत जास्त लोकांना योग्य मदत आणि उपचार मिळावे, म्हणून जागतिक आरोग्य संघटनेनं यावर्षी नैराश्य या विषयावर लक्ष केंद्रित केलं आहे.
नैराश्य आणि 'लेट्स टॉक' यांचा थोडक्यात संबंध काय, ते समजून घेण्याचा थोडा प्रयत्न करूया.
वाढतं आधुनिकीकरण, तांत्रिकीकरण यांमुळे व्यक्तीला घरबसल्या सर्व सोयीसुविधा मिळत असल्या, तरी रोज नव्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला अनेक प्रकारच्या तणावांना सामोरं जावं लागत आहे. यामुळे व्यक्तींचा आपल्या नातेवाइकांशी, मित्रांशी, तसंच समाजाशी हळूहळू संपर्क तुटत चालला आहे, व्यक्ती एकाकी होत चालल्या आहेत. आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या संपर्कात राहण्यासाठी वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांचा वापरही वाढला आहे. मात्र संपर्काची साधनं वाढली असली, तरी ‘मनाचा- मनाशी’ संवाद मात्र कमी झाला आहे आणि ‘कम्युनिकेशनच्या’ युगात माणूस अधिकाधिक एकटा होत चालला आहे.
यामुळेच लोक अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक आजारांना बळी पडत आहेत. उदा. मधुमेह, लठ्ठपणा. त्यांपैकीच एक, बहुतांश वेळी दुर्लक्षित राहिलेला आजार म्हणजे नैराश्य किंवा उदासीनता. कोणत्याही गोष्टीतला आनंद घेण्याची क्षमता कमी होणं, अंगात शक्ती नसल्यासारखं वाटणं, अस्वस्थता, झोपेचं प्रमाण कमी- जास्त होणं, अपराधीपणाची भावना मनात येणं, आत्मविश्वास कमी होणं, स्वतःबद्दल सतत नकारात्मक विचार येणं, उदाहरणार्थ, मी काहीच करू शकत नाही, मी अपयशी आहे, मी जगून काय करू?, मरणाचे विचार मनात येणं, तसंच आत्महत्येचा प्रयत्न किंवा आत्महत्या करणं अशी लक्षणं नैराश्यानं ग्रस्त असलेल्यांमध्ये दिसून येतात.
NIMHANS (National Institute of Mental Health and Neurosciences) या बंगळुरू इथल्या संस्थेनं भारतातील मानसिक आजारांचं वाढतं प्रमाण यावर संशोधन केलं आहे. त्यानुसार भारतामध्ये एक हजार व्यक्तींमागे पासष्ट व्यक्ती या सामान्य मानसिक आजारानं ग्रस्त असल्याचं निदर्शनास आलं आहे. तसंच, भारतात प्रत्येक वर्षी आत्महत्येनं जेवढे मृत्यू होतात, त्यांपैकी ८०% मृत्यू हे नैराश्य या मानसिक आजारानं होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. याचाच अर्थ असा की, मानसिक आजार आणि त्यासंबंधीच्या समस्यांकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची आता वेळ आली आहे. म्हणूनच आत्ताच्या 'मेंटल हेंल्थकेअर बिल'मध्ये भारत सरकारनेही कोणताही मानसिक आजार झालेल्या व्यक्तीच्या अधिकारांवर गांभीर्यानं लक्ष देऊन ते व्यक्तिकेंद्रित केलं आहे.
पण फक्त सरकारनं कोणत्याही मानसिक आजारासाठी उपाययोजना करून तिथेच थांबता येणार नाही. खरी गरज आहे ती बोलण्याची - संवाद साधण्याची . कारण बऱ्याचदा व्यक्तीच्या समस्या वाढतात, त्या तिचं ऐकून घेणारं कोणीही नाही, या विचारानंच. आपल्या जवळच्या व्यक्तीचा त्रास कमी करण्यासाठी तिच्याशी विश्वासानं बोलणं आणि तिच्या भावना समजून घेण्यानंच तिचा आणि आपलासुद्धा बराचसा त्रास कमी होण्यास मदत होते.
जेव्हा आपण एखाद्या भावनिक समस्येचा सामना करत असतो, तेव्हा आपण त्याबद्दल इतरांशी बोलणं टाळून मोठया धैर्यानं चेहऱ्यावर हसू आणतो. परंतु यानं फायदा होण्याऐवजी नुकसानच होतं. कारण यामुळे आपल्या भावना आतल्या आत दाबल्या जातात आणि अनेक मनोकायिक आजार होण्याची शक्यता वाढते.
जेव्हा आपण आपल्या समस्या आणि अडचणी यांविषयी मोकळेपणानं आपल्या विश्वासातल्या व्यक्तीशी बोलतो, तेव्हा आपल्या मनावरचा ताण प्रचंड प्रमाणात कमी होण्यास मदत होते. अश्रू ही निसर्गानं मानवाला दिलेली सर्वांत सुंदर भेटवस्तू आहे. अश्रूंमुळे व्यक्तीला स्वतःच्या भावनांपासून त्वरित मोकळं होण्यास आणि भरपूर प्रमाणात आराम मिळण्यास मदत होते. अनेकदा व्यक्ती अनावश्यक अपराधीपणाच्या भावनेनं उदास असते.
पण याविषयी जर त्या व्यक्तीनं विश्वासातल्या इतरांशी चर्चा केली, तर मनातील अपराधीपणाची भावना कमी होऊन आपलं दुःख कमी होण्यासही मदत होईल. आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिल्यानं मन शांत होण्यास मदत होईल आणि ती व्यक्ती स्वतःच समस्या सोडविण्यासाठी काय करता येईल, याचा व्यवस्थित विचार करू शकेल.
आपल्या भावनिक गोंधळाविषयी आपल्या कुटुंबातील किंवा आसपासच्या लोकांना कळलं, तर ते अधिक चांगल्याप्रकारे आपली मदत करू शकतात. पण आपण बोललोच नाही, तर आपली काळजी करणारे अनेक लोकसुद्धा आपली मदत करू शकणार नाहीत. अनेकदा असं होऊ शकतं की, आपल्या जवळच्या व्यक्तींशी बोलूनसुद्धा आपल्याला आराम वाटत नाही, मोकळं वाटत नाही. अशा वेळेस मात्र समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ज्ञाची मदत घेणं किंवा त्यांच्याशी बोलणं अधिक हितकारक ठरतं.
आपल्याकडे अशा अनेक प्रकारच्या प्रभावी उपचारपद्धती उपलब्ध आहेत. आपल्यापैकी सर्वच मानसशास्त्राच्या अभ्यासात पारंगत असतील, असं नाही. त्यामुळे आपण आपल्या सर्वच मानसिक समस्या सोडवायला समर्थ आहोत, असं समजणं मात्र कधी कधी धोक्याचं ठरू शकतं. जर पाय मुरगळला असेल, तर घरच्या घरी उपचार करून बरा करता येतो. पण पायाचं फ्रॅक्चर झालं असेल, तर मात्र डॉक्टरांकडेच जावं लागतं. तसंच आपल्या मनाचंसुद्धा आहे. छोट्या छोट्या समस्या असतील, तर कुटुंबातील व्यक्तींशी किंवा इतरांशी बोलून प्रश्न सुटू शकतात, मात्र मनाला फ्रॅक्चर झालं असेल, तर मात्र तज्ज्ञांचीच मदत घेणं फायद्याचं ठरेल.
आम्ही निर्मिती केलेल्या दोन्ही लघुपटांतून शहरी आणि ग्रामीण भागांतील उदासीनता (नैराश्य) आणि चिंता यांनी त्रस्त अशा दोन व्यक्ती आणि त्यांचं कुटुंब यांच्या कथा दाखविल्या आहेत. सर्वसाधारणपणे कुटुंबात दिसून येणाऱ्या दोन समस्या घेऊन त्यांतून बाहेर पडताना केलेले प्रयत्न आणि समाजातील काही जागरूक व्यक्तींची योग्य वेळी मिळालेली मदत त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी किती मोलाची ठरते, हेच या दोन्ही लघुपटांतून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. एका कथेत ग्रामीण भागातील मानसिक आजार झालेल्या कुटुंबातील व्यक्तीला 'आशा-वर्कर' मानसिक आजार आणि उपचार यांबाबत योग्य मार्गदर्शन करून, कुटुंबियांच्या आणि समाजाच्या मदतीनं आजार बरा करून चांगलं आयुष्य जगता येऊ शकतं, हे सांगते. दुसऱ्या कथेत शहरी भागात राहत असणाऱ्या कुटुंबाला शेजारच्या मावशी आत्मीयतेनं मदत करतात. या दोन्ही लघुपटांचं लेखन आणि दिग्दर्शन श्रीमती सुमित्रा भावे यांनी केलं आहे.
दि. ७ एप्रिल, २०१७ रोजी होणार्या कार्यक्रमास आपण आवर्जून उपस्थित राहावं, ही विनंती.
८९ -९० च्या आसपासअंनिसत
८९ -९० च्या आसपासअंनिसत असताना दाभोलकरांनी हा विषय अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यातील अपरिहार्य घटक आहे असे सांगितले होते. त्यावेळी त्यांनी आम्हाला मनोविकारांचा मागोवा या डॉ श्रीकांत जोशी यांच्या संग्राह्य पुस्तकाची ओळख करुन दिली होती. नंतर अजून एक पुस्तक वाचनात आले ते म्हणजे औषधं, उतारे आणि आशीर्वाद. मनोविकारांचा मागोवा हे उत्तम पुस्तक लिहिणारे मानसोपचार तज्ञ डॉ श्रीकांत जोशी यांनी ते अनुवादित केल होत. मूळ पुस्तक Mystics, Shamans and Doctors डॊ सुधीर कक्कर यांच.
या पुस्तकाचा परिचय मायबोलीवर टाकला आहे. http://www.maayboli.com/node/48337
श्रद्धा अंधश्रद्धांकडे पहाण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन या पुस्तकात आपल्याला पहायला मिळतो. मानसोपचाराच्या फिया अजून मानसोपचाराची गरज असलेल्या अनेक लोकांच्या आवाक्यात नाहीत ही देखील वस्तुस्थिती आहे. म्हणुन त्यांना बाबा बुवा जवळचा वाटतो. त्यावेळी अंनिस त हा मुद्दा मी मांडलाही होता. ज्याकारणासाठी लोकांना बाबा बुवांकडे जावेसे वाटते त्याच कारणासाठी त्यांना आपल्याकडे यावेसे वाटेल अशी परिस्थिती आपण निर्माण करु असा भाबडा आशावाद त्यावेळी मी मांडला होता.
असो सध्या इतकेच
हा कार्यक्रम अतिशय उत्तम झाला
हा कार्यक्रम अतिशय उत्तम झाला. चॅनेल रिपोर्टर प्राची कुलकर्णी ने ही एक उत्तम स्वानुभव नंतर सांगितला. मानसोपचाराबद्दल एक जागृती समाजात होते आहे. मानसोपचार क्शेत्रातील सर्व कल्ट्स आपापल्या परीने प्रबोधन करताहेत. हे भविष्यातील एक प्रकारचे मार्केटिंगच आहे.