मिस्टर डब्लो ( विनोदी विज्ञानकथा :)

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 30 March, 2017 - 05:27

संशोधन गुप्त होतं म्हणून तो गप्प बसला नाहीतर ‘युरेका युरेका’ असं ओरडत नागडं पळाला असता. पण ज्याच्यामुळे या शोधाची प्रेरणा मिळाली त्या जैवशास्त्रज्ञ मित्राला बातमी देणं आवश्यक होतं. डॉक्टर नाकतोडेने शंकुपात्रात पडून असलेला मोबाईल उचलला अन लंबेला कॉल केला
“बुट्ट्या, लगेच प्रयोगशाळेत ये.”

“नंतर येतो, सध्या मी माकडांना डान्स शिकवतोय.”

“त्यांचं सोड, इथे आल्यावर तूच डान्स करायला लागशील. बेट्या तू शापमुक्त होणार आज.”

“काय सांगतोस नाकतोड्या. आलोच बघ शून्य मिनिटात.”

सातव्या मिनिटाला तो डॉक्टर नाकतोडेच्या प्रयोगशाळेत होता.

“सांग पटकन काय शोध लावलास.” तो धापा टाकत म्हणाला.

“एवढा मोठा शोध लावलाय बुट्ट्या ज्याची तू कल्पनाही करू शकणार नाहीस. लॉटरी लागलीये तुला लॉटरी.”

“गेअरपण टाकशील की गाडी रेसच करशील नुसती. मुद्द्याचं बोल.”

“ओक्के.”

नाकतोडेनं आपले दोन्ही हात एखाद्या जादूगारासारखे हवेत फिरवले अन शेजारच्या कपाटातून एक काचेची बाटली बाहेर काढली. त्यात गडद तपकिरी रंगाचा द्रव चमकत होता.
“ढँटढँ S .पेश है जनाब आपके खिदमतमे, डॉक्टर नाकतोडेज न्यू रिसर्च… मिस्टर डब्लो.”

“हे काय आता !?”

“या बाटलीतल्या रसायनाचं नाव आहे ते. हे पिलं की कोणतीही सजीव वस्तू आकाराने डबल होते.”

“सकाळी सकाळी कोणी भेटलं नाही का तुला?”

“भिकारचोटा तुझा विश्वास बसणार नाही मला माहीतच होतं. आता बघंच तू गंमत.”

नाकतोडेने कपाटातून एक पेटी बाहेर काढली. सूटकेसएवढी ती लाकडी पेटी त्याने टेबलावर ठेवली.
“अमीबा पाहिलाय का कधी?”

“पट्टीच्या पोहणाऱ्याला तू मासा पहिलाय का असं विचारतोयस. सूक्ष्मजीव मी असे खिशात घेऊन फिरत असतो. सुप्रसिद्ध बायॉलॉजिस्ट आहे म्हटलं मी.” त्याची छोटी छाती अभिमानानं फुलली.

“मग अमीबा जर तुला भेटला तर ओळखशील त्याला ?”

लंबे खांदे उडवत हसला अन आपल्या डाव्या डोळ्याकडे बोट करून म्हणाला,
“मित्रा, हा डोळा बारीक का झाला असेल असं तुला वाटतं?”

“नो आयडीया?”

“कारण तो सतत सुक्ष्मदर्शकाला चिकटलेला असतो म्हणून…आणि काय रे, अमीबा का एखादा माणूस आहे का रस्त्यात भेटायला?”

“इथून पुढे अमीबा, फंगाय तुला रस्त्यातपण भेटू शकतील. अल्गी पाण्यात पोहतांना दिसतील.”

“ते कसंकाय बुवा?!”

“इकडे ये आणि ही पेटी उघड.”

लंबे टेबलाजवळ आला. त्या तीन फूट टेबलाएवढीच त्याची उंची होती. नाकतोडेनं आधीच एक स्टूल त्याच्यासाठी मांडून ठेवला होता. तो एखाद्या बोक्याच्या शिताफीने त्यावर चढला. त्याने अलगद पेटीचं झाकण उघडलं. अन...आतली गोष्ट पाहून तो फुटभर उडालाच

“आय कान्ट बिलिव्ह धिस. इतका मोठा अमिबा !!”

“मिस्टर डब्लोच्या सहाय्याने मी त्याला बराचपट मोठा केलाय. आता तुला सूक्ष्मजीव मोठाले करून पाहण्याची गरज नाही. तुझं सूक्ष्मदर्शक विकून टाक OLX वर.”

लंबे मात्र एकटक अमिबाकडे पाहत होता. पेटीत त्या एकपेशीय सजीवाची हालचाल होत होती.

“हे तर भन्नाटच आहे यार.” त्याने वळून पाहत म्हटलं. अन समोरचं दृश्य पाहून त्याची भीतीने बोबडी वळली, पाय लटलट कापू लागले. टेबलावर, त्याच्या अगदी समोर वाघ बसला होता !! तो रागाने लंबेकडेच पाहत होता. लंबेनं घाबरुन स्टुलावरून खाली उडी मारली. त्याची ही स्थिती पाहून नाकतोडे खळखळून हसायला लागला.

“घाबरू नको बुट्ट्या, मांजर आहे ती. तीन वेळा मिस्टर डब्लो पाजला तिला. नाऊ शी इज एट टाइम्स लार्जर दॅन ओरिजिनल.”

त्याला दुजोरा देण्यासाठीच की काय, त्या वाघाने ‘म्याऊ’ असा आवाज काढला.

“आतल्या खोलीत मांजराएवढे उंदीर अन उंदराएवढे झुरळं आहेत. काही दिवसांनी बघ, मी माझ्या कुत्र्याच्या पाठीवर बसून कामावर येत जाईल. हा, तो घोड्यासारखं खिंकाळणार नाही म्हणा.”
नाकतोडे घोड्यासारखं खिंकाळत हसला.

लंबे संमोहित झाल्यासारखा टकामका मिस्टर डब्लोकडे पाहत होता. बाटलीला स्पर्श करण्यासाठी त्याने हात पुढे केला
“हात नको लावू. मौल्यवान वस्तू आहे ती. मलाच हाताळावी लागेल.”

नाकतोडेने बाटली पुसूनपासून जागेवर ठेवली.

“नाक्या, मला उंच करशील? पलीSSज.”

“त्यासाठीच तर तुला बोलावलंय; फिकर नॉट.”

“थँक्स यार.”

“मला सांग, उंच झाल्यावर तू सगळ्यात आधी काय करशील?”

“जानूला भेटीन”

“कोण ही जानू?”

“तिचं नाव जान्हवी आहे पण प्रेमाने मी तिला जानू म्हणतो. आमची फेसबुकवर ओळख झाली. आधी चॅटींग झालं नंतर मोबाईल नंबर घेतला. तुला तर माहितीये न मी बोलण्यात किती हुशार…”

“चभरा.”

“ओके चभरा आहे ते. याच कौशल्याच्या आधारावर पटवलं तिला.”

“अरेरे. प्रॉब्लम काय आहे.”

“आता ती भेटायचं म्हणते.”

“मग भेट ना.”

“तीच तर गोची आहे न यार. मी टॉल, डार्क अँड हॅण्डसम आहे असं सांगितलं होतं तिला.”

“लाज वाटते का रे बुट्ट्या तुला. अंथरुण पाहून तरी पाय पसरायचे.”

“जे झालं ते झालं. मला पटकन तुझा डब्लो पाज. उंच होतो अन जातो तिला भेटायला.”

“अरे थांब थोडं. एवढा उतावळा होऊ नको.”

“नाही मित्रा. हा भार असह्य झालाय आता..तीन फूट उंची असूनही लोक दीडफूट्या म्हणतात मला. आजपर्यंत माझ्या कतृत्वाचीच उंची मोठी होती. आता शरीराचीपण होऊ दे. माझं लंबे हे नाव सार्थक होऊ दे.”

“शंभर टक्के होईल. पण लगेच नाही. माणसांवरील वापराआधी अजून काही टेस्ट कराव्या लागतील.”

तेवढ्यात लंबेचा फोन वाजला

“डॉक्टरसाहेब, कुठे आहे तुम्ही?” पलिकडचा आवाज.

“बाहेर आहे. काय झालं?”

“तुम्ही गडबडीत पिंजऱ्याचा दरवाजा उघडा टाकला. रिसर्चला ठेवलेले माकडं पळून गेले.”

“धर त्यांना. मी शून्य मिनिटात आलो.”

“नाक्या, मी पळतो आता. भेटू नंतर.” असं म्हणून तो माकडासारख्या उड्या मारत निघून गेला; पण जाताजाता त्याने हातचालाखीने मिस्टर डब्लोची बाटली खिशात टाकली होती.
* * *
डब्लोची बाटली चोरीला गेल्याचं नाकतोडेला लवकरच कळालं. एकतर त्याचा शोध गुप्त होता अन दुसरं म्हणजे अजून काही चाचण्या बाकी होत्या. नसता आगाऊपणा केल्यामुळे तो लंबेवर खूप चिडला होता. त्याने लंबेला बरेच कॉल केले पण त्याचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. लंबे ज्याठिकाणी सापडू शकतो त्या प्रत्येक ठिकाणी तो गेला; पण काहीच फायदा झाला नाही. शेवटी तिसऱ्यांदा त्याच्या घरी चक्कर मारली तेव्हा दरवाजा उघडा दिसला. दरवाजा ढकलून तो घरात गेला. पण आत कुणीच नव्हतं. घरभर फिरुन त्याने आवाज दिले.

“नाक्याS.” क्षीण आवाजात प्रत्युत्तर मिळालं.

“कुठेय तू?”

“इथेच आहे.”

आवाज तर जवळूनच येत होता पण दिसत कुणीच नव्हतं.

“इथे म्हणजे कुठे?”

“किचनच्या ओट्याखाली.”

नाकतोडेने ओट्याखाली वाकून पाहिलं. तिथे जेमतेम दिडफूट उंचीचा लंबे उभा होता!

“आयला तू छोटा कसाकाय झालास ?!! निम्माच उरलास तू तर.”

“शीट…तुझं औषध पिलं अन बुट्टा झालो यार अजून.”
“तुला म्हटलं होतं घाई करू नको. माणसांवरच्या टेस्ट बाकी आहेत अजून. पण तू कसला ऐकतोस. उथळ बुद्धीचा बटू मानव.”

“जे झालं ते झालं. मला पुन्हा पहिल्यासारखं बनव.”

“माझ्या हातात का जादूची कांडी आहे का? अजून रिसर्च करावा लागेल, काही रासायनिक संरचना बदलाव्या लागतील.”

“बदल ना मग पटकन.”

“आधी मला सांग, तू माझा रिसर्च का पळवलास?”

“सिंपल आहे. मला गरज होती त्याची.”

“अरे लेकरा पण मीच तुला ते पाजणार होतो न.”

“ते सोड. मी तुझा रिसर्च पळवला न. तूपण माझा एखादा रिसर्च पळव. खुश? पण आधी मला उंच कर.”

“चारपाच दिवस थांब. मी इलाज शोधून काढतो.”

“तोपर्यंत मी काय करणार ?”

टिंग टॉंग.

उत्तराऐवजी दारावरची बेल वाजली. दोघेजण त्रासिक चेहऱ्याने हॉलमध्ये गेले. लंबेने दरवाजाच्या फटीतून बाहेर पाहिलं.
“ओ माय गॉड, जानू आली.”

“ती कशीकाय आली ?!”

“मीच तिला बोलावलं होतं. म्हटलं उंच होऊ अन भेटू तिला.”

टिंग टॉंग टिंग टॉंग
परत एकदा बेल वाजली.

“नाक्या काहीतरी कारण सांगून तिला कटव. मी लपतो इथे कपाटात.”

“अरे पण…”

“बेस्ट ऑफ लक.”

नाकतोडेने नाईलाजाने दरवाजा उघडला. त्याने पाहिलं अन तो पाहतंच राहिला. समोर सर्वांगसुंदर मदमस्त तरूणी उभी होती.

“हाय.”

“हा..य. लंबे सध्या घरी…”

पण त्याचं वाक्य पुर्ण व्हायच्या आत तिने त्याचा गालगुच्चा घेतला

“वर्णन केलं होतं अगदी तसाच आहेस. टॉल, डार्क अँड हॅण्डसम.”

“तो लंबे तिकडे छोटा…”

“छोट्यामोठ्या गोष्टी विसरून जा रे. मीपण विसरून जाते. बिकॉझ आय लव्ह यू बेबी.”

ती लाडिकपणे त्याच्या गळ्यात पडली. आनंदाने त्याचा श्वास गुदमरला.

‘मी तुझा रिसर्च पळवला..तूपण माझा एखादा रिसर्च पळव.’
लंबेचं वाक्य त्याला आठवलं.
“आय लव्ह यू टू.”.त्याच्या तोंडून नकळतपणे शब्द बाहेर पडले.

‘दण दण दण’
कपाटाच्या आतून आवाज आला.

“सॉरी मी तुला वेळ देऊ शकलो नाही. पण आता काही दिवस फक्त तुझ्याबरोबर घालवणार.”

“आणि तुझा रिसर्च ?”

“तो काही दिवस बंद.”

कपाटाच्या आतून येणारा आवाज अजून वाढला.

“कसला आवाज आहे हा?”

“काही नाही गं, उंदीर खूप झालेत. चल आपण बाहेर फिरायला जाऊ.”

अन तो बुट्ट्याच्या रिसर्चला घेऊन हसतखिदळत बाहेर पडला.

------------------------------------------------------
चित्रश्रेय : प्रतिम काटे
----------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली गोष्ट.
प्रतीमची चित्रे पण अप्रतीम!

मस्तय.
चित्र मस्त आहेत. कुणी काढली?
लंबेच्या रीसर्चचं चित्र भारी आहे.

=))

चित्रश्रेय : प्रतिम काटे >> दोन्हि चित्र लय भारी!

आवडली गोष्ट पण मला तूमच्याकडून जास्त अपेक्षा आहेत त्यामूळे मूळ कल्पना सामान्य वाटली मला.

छान गोष्ट Lol
चित्राना पण पकडायचा का countingमध्ये Proud

Thanks to all

मस्त!

Pages