शरीराचे तालबद्ध काल -चक्र

Submitted by दीपा जोशी on 24 March, 2017 - 13:07

circadian-rythms.jpg

परवा एका प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञाचा कार्यक्रम टी. व्ही. वर लागला होता. त्यातले त्यांचे एक वाक्य मला फार महत्वाचे वाटले. त्यांनी सांगितले, ‘दिनचर्या सुधारली की, अहोराञ आरोग्याच्या समस्या काढता पाय घेऊ लागतात.’ म्हणजे, दिनचर्या वेळेवर पाळू लागलो की शरीर पण शहाण्यासारखं वागू लागतं!

दिनचर्या म्हणजे काय ? तर रोज सकाळी उठण्यापासून झोपेपर्यंत कोणत्या वेळी काय करायचं याचे नियम. हे नियम आपले पूर्वज बऱ्याच काटेकोरपणे पाळत असत. त्यामागे अनुभवाअंती आलेले शहाणपण आणि आयुर्वेदाचे ज्ञान होते.
अमुक वेळेला अमुक का करावं- याचं कारण आहे- आपल्या शरीराची असणारी ‘जैविक तालबद्धता’; अथवा शरीरामध्ये असणारे नैसर्गिक घड्याळ. फक्त आपल्याच शरीरात नाही, तर प्राणी, पक्षी, वनस्पती यांच्यामध्येही हा जैविक ताल असतोच. दिवसाच्या २४ तासात मुख्यत्वे सूर्यप्रकाश आणि अंधार यांना प्रतिसादात्मक म्हणून शारीरिक आणि मानसिक बदल घडतात. दर २४ तासांनी पुनरावृत्ती होणाऱ्या या घटना शरीरातल्या नलिकाविरहित ग्रंथींमार्फत स्त्र्वणाऱ्या हॉर्मोन्स मुळे नियंत्रित होतात, आणि त्यामुळे आपले शरीरयंत्र कसं रोजच्यारोज आपसूकच सुरळीत चालतं ! म्हणजे- सकाळी आपोआप जाग येते, भुकेच्या वेळेला भूक लागते, रात्री दमलेल्या शरीराला विश्रांती मिळावी म्हणून आपोआप झोप लागते.

शरीरात दिवसाच्या २४ तासात ठराविक वेळेला नियमितपणे घडणाऱ्या अशा घटनांच्या कालचक्राला ‘सरकॅडीअन सायकल’ असे म्हणतात. या जैविक तालाचा अभ्यास करणारे एक शास्त्र आहे. ‘क्रोनोबायोलॉजि ’ असे त्याचे नाव.
रोज, साप्ताहिक, मासिक, वार्षिक, आणि ऋतूप्रमाणे शरीरात घडणाऱ्या नैसर्गिक घटनांचे एक चक्र असते. दिवसातल्या, आठवड्यातल्या, महिन्यातल्या, वर्षातल्या किंवा एखाद्या ऋतूमधल्या ठराविक काळात शरीरात ठराविकच घडामोडी होतात; त्याप्रमाणे शरीरात ठराविक बदल घडतात- असे हे शास्त्र सांगते.

सूर्याप्रकाशा वर आधारलेले एक अदृश्य घड्याळ खरोखरीच आपल्या शरीरात असते. मेंदूच्या तळाशी असणाऱ्या ‘हायपोथॅलॅमस’ भागात ‘सुप्रा- कायसमॅटिक- केंद्र’ नामक, जवळपास 20,000 चेता पेशींचा एक समूह असतो. हेच आपल्या शरीरातले अदृश्य घड्याळ! सूर्य उगवल्यावर निर्माण होणार प्रकाश, आणि मावळल्यावर होणारा अंधार यांची नोंद डोळ्यांमधल्या प्रकाश- संवेदक असणाऱ्या खास ’गॅन्गलिओन’ पेशी घेतात. ही माहिती थेट प्रक्षेपित होते ती या ‘सुपरा - कायसमॅटिक‘ केंद्राकडे. मग या केंद्रातल्या पेशी आलेल्या सगळ्या माहितीचं विश्लेषण करतात, चेतातंतूंमार्फत योग्य तो संदेश ‘पिनिअल’ ग्रंथींकडे पोहोचवतात. या ग्रंथींच काम असतं मेलॅटोनीन हॉर्मोन निर्माण करणे. हे मेलॅटोनीन म्हणजे झोपेचं हॉर्मोन.

मेंदूच्या मध्यभागी, असणारी वाटाण्याच्या आकाराची ही ग्रंथी दिवसभर सुप्तावस्थेत असते.
दिवस मावळून अंधार पडू लागतो,रात्र होत जाते, तसतशी ‘सुपरा - कायसमॅटिक‘ केंद्राकडून आलेल्या संदेशामुळे ही ग्रंथी सक्रिय होऊ लागते. तिच्याकडून मेलॅटोनीनची निर्मिती सुरु होते. साधारणतः रात्री नऊच्या सुमारास मेलॅटोनीन ची निर्मिती होऊ लागते. मध्यरात्री ती सर्वोच्च बिंदूपर्यंत जाते, आणि दिवस उजाडेपर्यंत हळूहळू कमी होत जाते. मेंदू मधील मेलॅटोनीन ची पातळी तिव्रतेने वाढू लागते तस - तसं आपली कार्यक्षमता कमी होते. त्याची पातळी वाढत जाईल, तस तसा मेंदू कडून संदेश येतो, ‘आता काम थांबव आणि झोपी जा’. मग आपल्याला सुस्तावल्यासारखं, झोपाळल्यासारखं होऊ लागतं, शरीराचं तापमान कमी होऊ लागतं.आपल्याला झोप येऊ लागते. अशा वेळीच अंथरुणावर पडलं, तर रात्री कशी गाढ झोप लागते. दिवसभर झालेली शरीराची झीज भरून येऊ लागते. उजाडू लागतं, तसे मेलॅटोनिनची पातळी कमी होते. त्याच वेळी परत ’कॉर्टिसॉल’ या दुसऱ्या हॉर्मोनची रक्तातली पातळी वाढू लागते. डोळ्यावरची झोप उतरवून दिवसभरातल्या हालचालीसाठी जागृत अवस्था आणण्याचे काम या ‘कॉर्टिसॉल’चे. आता मेंदूचा संदेश येतो,‘ चला, उठा आणि कामाला लागा!’ आणि मग हळू हळू जाग येते, भरपूर विश्रांती घेऊन ताजातवाना झालेला मेंदू आणि सगळी गात्रं उत्साहाने नवीन दिवसाचं स्वागत करतात!

संध्याकाळनंतर अंधार पडू लागला की परत कॉर्टिसॉलची पातळी कमी होऊ लागते आणि मेलॅटोनीनची पातळी वाढू लागते. रात्री कॉर्टिसॉलची पातळी एकदम कमी झालेली आणि मेलॅटोनीन ची वाढलेली असते. दिवसामागून राञ आणि रात्रीमागून दिवस येताना झोप आणि जागृतीसाठी असे हे घड्याळ प्राणी-मात्रांना बहाल करून निसर्गाने मोठीच कृपा केली आहे! या घड्याळाचं खरं महत्व कुणी जाणलं असेल तर, ज्यांना झोपेच्या गोळ्यांशिवाय सुखाची झोप लागत नाही त्यांनी!

बाहेरचे तापमान, प्रकाश यांच्या प्रमाणे हे घड्याळ शरीरातल्या घडामोडींचे योग्य नियंत्रणदेखील साधते. ‘जेट -लॅग’ मुळे तात्पुरतं झोपेचं खोबरं वगैरे होतं, मरगळल्यासारखं होतं, दिवस अनावर झोप येते, पचन बिघडतं…. कारण शरीराचं घड्याळ बिघडतं, जैवीक ताल थोडा ’बेताल’ होतो. पण नंतर, त्या ठिकाणच्या दिवस-रात्रीच्या चकराप्रमाणे शरीराचा जैविक ताल परत पूर्ववत होतो.
राञ होते तसं आणखी एका हॉर्मोनचं काम सुरु होतं. ‘ग्रोथ हॉर्मोन’ अथवा वाढीसाठी लागणारं हे हॉर्मोन . आपण गाढ झोपेत असताना- प्रथिनांची निर्मिती, स्निग्ध पदार्थांचं ज्वलन, मुलांमध्ये हाडांचा आणि स्नायूंचा विकास -अशी महत्वाची कामे हे हॉर्मोन गुपचूप करून टाकतं. रात्री अवेळी झोपणार्यांमध्ये लठ्ठपणाचे एक कारण, बिघडलेलं ( कि बिघडवलेलं?) जैविक घड्याळ हेही असू शकतं. कारण उशिरा झोपल्याने शरीरातलं मेटॅबॉलिझम -म्हणजे चयापचय बिघडून जातं, शरीरातल्या स्निग्ध पदार्थांचं ज्वलन पूर्ण होत नाही.

पूर्वी माणसं संध्याकाळीच जेवून घेत असत, आणि गडद अंधार पडताना झोपी जात असत. तसच सकाळी उजाडायच्या वेळी उठून दिनक्रम सुरु करत असत. ही जीवनशैली शरीराच्या जैविक तालाशी आणि हॉर्मोन निर्मितीच्या कालचक्राशी अगदी सुसंगत होती!
शरीराच्या नैसर्गिक घटनाचक्राची जाणीव ठेऊन त्याप्रमाणे वागणे हे आपल्याला वाटतं त्यापेक्षा खूप जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे फक्त झोप चांगली झाल्यानं एकंदरीत आरोग्य चांगलं राहतं एवढंच त्याचं महत्व नाही, तर शरीराच्या खूप साऱ्या महत्वाच्या कामकाजाशी जैविक तालाचा संबंध असतो. नैसर्गिक कालचक्र बिघडलं, की हृदयाचे आरोग्य, मनाचे आरोग्य, कमकुवत प्रतिकारशक्ती, पचनाच्या समस्या अश्या अनेक समस्या डोकं वर काढू लागतात.
पचन संस्थेच्या आरोग्यावर जैविक घड्याळाचा मोठा प्रभाव असतो. रात्री निर्माण होणारे मेलॅटोनीन हे भूक लागणे, पोट भरल्याची भावना, आतड्यांची हालचाल वगैरेंशी संबधीत असते. तसेच, गॅस्ट्रीन, घ्रेलिन, सेरोटोनिन या हॉर्मोन्सची आणि पाचक रस तयार करणारे एंझाईम्स यांची निर्मिती जैविक घड्याळाने नियंत्रित होते. म्हणूनच रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांमध्ये जैविक ताल बिघडल्याने, ऍसिडिटी, अल्सर, ‘इरीटिबल -बॉवेल -सिंड्रोम‘ असे पचनसंस्थेचे विकार आढळतात.

झोपेचं नैसर्गिक जैविक चक्र बिघडल्यास, स्त्रियांमध्ये प्रजनन संस्थेचं काम देखील बिघडतं . रात्रीच्या गडद अंधारात झोप घेताना तयार होणारं मेलॅटोनीन हे हॉर्मोन, मुली वयात येण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवतं, ओव्हरीजचे कार्य नियंत्रणात ठेवतं, आणि प्रजननासंबंधीचे हॉर्मोन्स वेळेवर निर्माण करतं असं आता सिद्ध झालं आहे.
संध्याकाळच्या आणि रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या मुली आणि बायकांना रात्रीच्या वेळी दिव्याच्या प्रखर प्रकाशामध्ये काम करावं लागतं. त्यामुळे, नैसर्गिक अंधारा अभावी मेलॅटोनीन निर्मिती दबली जाते. अशा स्त्रियांना बऱ्याचदा पाळी अनियमितपणे येते. कधी लवकर येते तर कधी बऱ्याच उशिरा. शिवाय पाळीच्या वेदना, खूप जास्त रक्तस्त्राव, किंवा अत्यल्प रक्तस्त्राव, अशा तक्रारी निर्माण होतात. जनन संस्थेच्या हॉर्मोन्स च्या निर्मिती मध्ये बदल होतो. अशा शिफ्टमध्ये काम करणाऱ्या बायकांना गर्भ-धारणा झाल्यास, पूर्ण दिवस भरण्या-आधी प्रसूती होण्याचा, आणि कमी वजनाची मुलं होण्याचाही धोका असतो. अजून एक महत्वाची बाब गेल्या दशकात समोर आली आहे. ती म्हणजे शिफ्टमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचं वाढतं प्रमाण. मेलॅटोनीनची कमतरता हेच कारण पुन्हा इथंही पुढे येतंय.

दिवसाच्या २४ तासांचं या नैसर्गिक कालचक्राशी इतरही अवयवांचं, संस्थांचं कार्य संबंधित असतं. त्यामुळे त्या संस्थांशी संबंधित व्याधीदेखील दिवसाच्या ठराविक वेळेल उफ़ाळतात असं दिसतं. ‘ऍलर्जिक ऱ्हायनायटिस’ मध्ये शिंका येणे, नाक गळणे अथवा चोंदलेले असणे अशी लक्षणे नेमकी सकाळीच जास्त करून दिसतात. तर कित्येक पेशंटना दम्याचा अटॅक पहाटे येण्याचे प्रसंग दिवसातल्या उत्तर वेळांपेक्षा १०० पट जास्त असतात. सकाळी जाग आल्यानंतर पहिल्या काही तासातला रक्तदाब हा दिवसातल्या इतर कोणत्याही वेळी असणाऱ्या दाबापेक्षा सगळ्यात जास्त असतो. छातीत दुखणे, अंजायना, इ सी जी मध्ये आढळणाऱ्या विकृती, हृदयविकाराचे झटके या घटना सामान्यतः सकाळी जाग आल्यानंतरच्या पहिल्या काही तासातच होतात असं आढळलं आहे.

आयुर्वेदात सुद्धा नैसर्गिक कालचक्राची कल्पना महत्वाची मानली आहे. पहाटे २ ते ६ आणि दुपारी २ ते ६ ही वेळ ‘वात- दोष‘ अधिक्याची मानली आहे. ‘वात’ हालचाल, उत्सर्जन, उत्साह , मनाचे आणि मेंदूचे कार्य यांच्याशी निगडित असतो. म्हणून या कालावधीत उठल्यास मल -मुञ विसर्जन चांगले होते. पहाटे चार च्या दरम्यानची वेळ (ब्रम्ह-मुहूर्त) ध्यान, जप, अध्यात्मिक साधना यांच्यासाठी उत्तम मानली आहे. यावेळी निसर्ग तरलं, शांत असतो, मनाची एकाग्रताही चांगली होते, शरीर हलके असते. यावेळी शरीर- मनाला मिळणाऱ्या ऊर्जेचा फायदा पुढे दिवसभर मिळतो. म्हणून सकाळी सहाच्या आधी उठले पाहिजे. नंतरची सकाळी ६ ते १० ची वेळ ‘कफ’ अधिक्याची असल्याने जितके उशीरा उठू तितके जड सुस्त आणि आळसावलेले वाटत राहते. या सकाळच्या कफाच्या वेळेत घ्यायचा सकाळचा नाश्ता हलका असावा. संध्याकाळी ६ ते रात्री १० ची वेळ परत ‘कफा’ची मानली आहे. संध्याकाळी किंवा रात्री लवकर आणि हलके जेवण घेणे हितकारक मानले आहे. कारण शरीर यंत्रणा, चयापचय मंद होऊ लागलेले असते. सकाळी १० ते दुपारी २ ची वेळ ‘पित्त’ अधिक्याची असते. पित्ताचे कार्य पचन, चयापचय. म्हणून ही वेळ ‘जठराग्नी’ची. दुपारी भर १२ वाजता कशी कडकडून भूक लागलेली असते. सगळे पाचक रस उत्पन्न झालेले असतात. यावेळी पचनशक्ती उत्तम असल्याने जड जेवणही चांगले पचते. रात्री १० ते २ ही वेळ देखील पित्ताची असते. पण या वेळेत पचनाचं कार्य होत नाही, शरीराअंतर्गत ‘सफाई’चं काम चालू असतं. आधुनिक संशोधनाप्रमाणे, यकृतात सगळ्यात जास्त पित्त निर्मिती सकाळी ९ वाजता आणि सगळ्यात कमी पित्त निर्मिती रात्री ९ वाजता होते, कारण, अन्नावर पित्ताची प्रक्रिया करण्याची गरज दिवसाचं असते. रात्री ९ नंतर पित्त निर्मिती बंद होऊन चयापचयाला आवश्यक अशा इत्तर रसायनांची निर्मिती, तसेच विषारी घटकांची सफाई, सुरु होते. पहाटे ३ वाजता यकृत हे काम बंद करते, आणि परत पित्त निर्मितीचं कार्य सुरु करते. दुपारी ३ पर्यंत व्यवस्थित पित्त निर्मिती झाल्यावर, हे काम बंद होऊन, परत रसायन निर्मितीची दुसरी शिफ्ट चालू होते. अगदी, एखाद्या रसायनांच्या कारखान्याचं ‘शिफ्ट- वर्क‘ असतं तसं, अहोरात्र यकृताच्या कारखान्याचे काम चालू असतं. किती आश्चर्य कारक आहे ना हे!

तर असं हे शरीराचं तालबद्ध कालचक्र! आता वैज्ञनिकच म्हणत आहेत की, आरोग्य चांगलं राहावं असं वाटत असेल तर, हे जैविक घड्याळ बिघडू द्यायचं नाही. त्यासाठी एकच करायचं. ते म्हणजे, संध्याकाळीच - किंवा रात्री लवकर-जेवायचं, रात्री अंधार झालेला असेल तेव्हा सरळ अंथरुणात शिरायचं, आणि गुडूप झोपी जायचं. बाहेर उजाडतं, तेव्हा मस्तपैकी उठायचं (आळोखे-पिळोखे देत म्हणा हवं तर!) आणि दिवसभरातल्या जेवणा -खाण्याच्या वेळा चुकवायच्या नाहीत. झोपायच्या कमीतकमी एक तास आधी प्रखर प्रकाश म्हणजे टी. व्हि, संगणक, मोबाईल इत्यादी गोष्टी पूर्णपणे टाळायच्या. हल्लीच्या ‘आधुनिक युगात’ हे जरी अवघड वाटलं, तरी अशक्य नाही. सुरवातीला अगदी काटेकोरपणे जमलं नाही, तरी आपली दिनचर्या प्रयत्नपूर्वक तशी बनवायची. आणि शक्य तेवढी पाळायची. कारण आरोग्य बिघडल्यानंतर जे भोगावं लागतं, ते शरीराच्या नैसर्गिक तालाशी सुसंगत अशी आपली दिनचर्या ठेवण्याच्या कष्टांपेक्षा कितीतरी पटींनी अधिक असतं !

सन्दर्भ
http://natural-fertility-info.com/melatonin-circadian-rhythm.html
https://www.nigms.nih.gov/education/pages/Factsheet_CircadianRhythms.aspx
http://journal.frontiersin.org/article/10.3389/fendo.2013.00195/full
https://www.hindawi.com/journals/ije/2010/813764/
http://www.hepatitiscentral.com/news/working_with_yo/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुंदर लेखन आणि माहिती.
अमेरिकेत सध्या "टाइम रिस्ट्रिक्टेड इटिंग" अशा नावाखाली याच गोष्टीवर संशोधन चालू आहे. त्याचे लीड रिसर्चर भारतीय वंशाचे आहेत. मला आत्ता ते सापडत नाहीये पण सापडले की लगेच इथे लिंक देईन.

शरीराच्या जीवरासायनिक प्रक्रियेचा अभ्यास केला की लक्षात येते की सगळी संप्रेरकं, एखाद्या क्रियेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नंतर लगाम लावण्यासाठी अशी जोडी-जोडीने काम करत असतात. तुमच्या लेखनातूनदेखील मेलॅटोनीन आणि कॉर्टिसॉल या जोडीबद्दल वाचायला मिळाले.

खासकरून मला हा लेख जास्त आवडला कारण त्यात आयुर्वेद आणि पाश्चात्य मेडिसिन या दोन्ही शाखांनी केलेला अभ्यास संक्षिप्तपणे वाचायला मिळतोय. अजून असे लेख वाचायला नक्कीच आवडेल.

प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद गुलबकावली, सई केसकर

सई केसकर,
तुम्ही उल्लेख केलेल्या विषयावरची माहीती, लेखन वाचायला मलाही खूप आवडेल. लिंक मिळाल्या की नक्की पाठवा.
खरे पाहता संशोधन हे निसर्गाचे गूढ उकलायला बऱ्याच मेहनतीने आणि भरपूर खर्च करून केले जाते. ते जर सर्वांपर्यंत पोहोचून रोजच्या जीवनात आणले गेले, तरच त्याचा उपयोग- या भावनेने हे लिखाण केले आहे . तुमच्यासारख्या वाचकांनी अशी दाद दिली की लिहायचा हुरूप आणखी वाढतो!

मंजूताई, limbutimbu ,
लेख आवडल्याचे कळवलेत, खूप धन्यवाद.

खुप छान आणि शास्त्रीय दृष्ट्या समर्पक उत्तरे मिळतील असा महत्वपूर्ण लेख दिलाय त्याबद्दल धन्यवाद Happy आता लेट नाईट online ह्या संस्कृतीचे लांगुलचालन करणाऱ्या मंडळीना ह्यातून नक्कीच आवश्यक बोध मिळेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

छान लेख, इथे दिल्याबद्दल धन्यवाद
शेवटचा संपूर्ण पॅराग्राफ +११११

निसर्गाला अनुकूल राहणीमान अंगिकारण्याचा प्रयत्न करणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यकच आहे आणि त्याचे महत्व पटवून देण्याची गरज नसावी. पण आजच्या काळात सांगाव लागतं Happy

छान लेख. अगदी पटला.

मला गेली कित्येक वर्षे फक्त ५ तास झोपायची सवय आहे. रात्री ११ ते ४. रजेच्या दिवशी फार तर एखादा तास जास्त पण त्यापेक्षा जास्त कधीच नाही.
अनेकवेळा विमान प्रवासात रात्रभर जागा असतो मी, पण मुक्कामी पोहोचल्यावर भरपाई वगैरे करावीशी वाटत नाही.

सस्मित, आंबज्ञ ,झेलम, असुफ, दिनेश, राया .......
सर्वांचे मन:पूर्वक आभार.

आंबज्ञ,
<<<<आता लेट नाईट online ह्या संस्कृतीचे लांगुलचालन करणाऱ्या मंडळीना ह्यातून नक्कीच आवश्यक बोध मिळेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.>>>> तसं झालं तर लेख यशस्वी झाला म्हणायचं!
नात्यातल्या, शेजार-पाजारच्या तरुण पिढीची रोजच मोबाईल, लॅपटॉप , टी.व्ही यामुळे रात्री १२/१ वाजता झोपायची सवय, आणि रात्री ११.३० वाजताही ‘फास्ट फूड’ / वडे -भजी’ सारखे पदार्थ खाण्यात धन्यता मानणं पाहिलं की खरंच मला असं वाटतं , की आरोग्याकडे किती बेफिकीरपणे पाहातात ही मंडळी.

असुफ,
<<<<निसर्गाला अनुकूल राहणीमान अंगिकारण्याचा प्रयत्न करणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यकच आहे आणि त्याचे महत्व पटवून देण्याची गरज नसावी. पण आजच्या काळात सांगाव लागतं >>>>
खरे आहे. याला कारण, जुन्या गोष्टींवर विश्वास नसणे, आणि वेगवान आधुनिक आयुष्य !

दिनेश,
<<<< मला गेली कित्येक वर्षे फक्त ५ तास झोपायची सवय आहे. रात्री ११ ते ४. रजेच्या दिवशी फार तर एखादा तास जास्त पण त्यापेक्षा जास्त कधीच नाही.>>>>
खूप नियमित आहे झोप- जागृतीची सवय. पहाटे लवकर उठण्यामुळे काही फायदे निरीक्षणास आले असतील नोंदवावेत.

अतिशय सुंदर व माहिती पूर्ण लेख.असे लेख अजून वाचायला आवडतील. जे सतत माझ्या विचारात असते ते असे अभ्यासपूर्ण वाचावसाय मिळाले.

Now I don't have Marathi font so writing in English ☺
Many many thanks Prakash Ghatpande, Smita 2016 for your compliments!

Prakash Ghatpande,
Your question is very good!
Although, on an average our internal clock is set to approximately 24 hours, the exact timing of circadian rhythms varies little from one person to the next.
1. It is affected by some outside factor - like temperature, light, stress, some physical disorders or illness etc.
2. It is also linked to genetic component.

दिनचर्या म्हणजे काय ? तर रोज सकाळी उठण्यापासून झोपेपर्यंत कोणत्या वेळी काय करायचं याचे नियम.
कळतं पण वळत नाही.
लहानपणापासूनच सवयी लागायला पाहिजेत नि तरुणपणी त्या ठेवल्या पाहिजेत!
नाहीतर रात्री बाराच काय पहाटे २ वाजेस्तवर धम्माल पार्टी झाली, खूप खाणे, "पिणे" झाले की पुढचे दोन दिवस तरी सगळी दिनचर्या बिघडते. असे एखादे वेळी झाळे तर ठीक, पण गंमत येते म्हणून वारंवार होते, म्हणून सगळे बिघडते.
न करायला कारणे पुष्कळ सांगता येतील, पण महत्वाचे म्हणजे सांगता येतील, खरी कारणे नसतात.

ज्या लोकांना (नाईलाजाने) रात्रीच्या ड्यूट्या कराव्या लागतात, उदा. नर्सेस, डॉक्टर्स, पोलिस, सैनिक, रात्रीच्या विमान्/रेल्वे/गाड्यांचे ड्रायव्हर्स, अमेरिकेतल्या लोकांना सर्विस देऊन डॉलर कमवणारे भारतातले आयटीतले लोक, इ. च्या लाईफस्पॅनच्या काळजीने कासावीस झालो..

या सगळ्यांना रात्रीची झोप मिळो ही सदिच्च्छा Happy

*

(ता.क. : काही प्रच्छन्न विचार)

हा सर्कॅडियन र्‍हिदम माणसात सुरू का झाला असावा? आय मीन ब्राह्ममूहूर्तावर उठणे अन रात्री लवकर झोपणे.?

प्राणीजगतात निशाचर असतात, जे रात्री शिकार करतात, किंवा अन्न शोधतात. तसेच दिवसा शिकार करणारे, अन्न शोधणारे, चरणारेही असतात. यांचे सर्कॅडियन र्‍हिदम वेगळे असतात.

माणूस रात्र/दिवसा शिकार्‍ करणार्‍या सगळ्यांचाच भक्ष्य होता. पहाटे ४ ते ६ या वेळेत रात्रीचे शिकारी अन दिवसाचे शिकारी दोघेही अ‍ॅक्टीव्ह असतात. भक्ष्याने जागे राहणे हा सगळ्यात उत्तम संरक्षणाचा मार्ग.

प्रत्येक प्राण्यात, अन्न शोधणे व त्यामार्गे स्वपोषण, सेल्फ प्रिझर्वेशन, सर्वायवल. हा मूळ हेतू, त्यात स्पर्धा उत्पन्न होते, तशी त्या प्राण्यांतले काही प्राणी काही थोडे वेगळे करून/ वेगळे मार्ग अवलंबून पाहतात, नंतर हळू हळू "उत्क्रांती" नामक गोष्ट, एक नवी जमात/स्पेसीज बनवते. या नव्या स्पेसीजला, नव्या प्रकाराने अन्न मिळवता येते. A new niche is found. त्यासाठी आवश्यक असे वेगवेगळे बदल शरीरात होत जातात. यातच एक म्हणजे सर्कॅडियन र्‍हिदम. जो रात्री शिकार करून अन्न मिळवणार्‍या प्राण्यांसाठी, रात्री जागणे हे नॉर्मल आहे.

आता,

या प्रकारे,

माणूस नामक प्राण्यात रात्रीची नोकरी करून अन्न मिळवणे, या कारणास्तव रात्री जागण्याचा सर्कॅडियन र्‍हिदम नव्याने उत्पन्न व्हायला किती वर्षे लागतील?

किंवा, सो कॉल्ड फास्ट फूड.

स्टार्च/प्रोटीन्स फ्राईड इन फॅट.

ह्या प्रकारचे अन्न फाऽर पूर्वी दुर्मिळ होते, व दुष्काळ, प्रतिकूल हिवाळा/उन्हाळ्यात जगण्यासाठी "फॅट" स्टोरेजसाठी गरजेचे होते. तस्मात, आपणा सर्वांना या प्रकारच्या अन्नाची क्रेव्हींग, किंवा तृष्णा, किंवा तलफ असते.

पण आजच्या जगात या प्रकारचे अन्न सर्वात स्वस्त, व यातून मिळालेली एक्स्ट्रा उर्जा वापरात आणणारी लाइफस्टाईल गायब.

मग या अन्नाचे काय करावे? त्यासाठीही, शरीरात काहीतरी उत्क्रांती घडतच असेल ना?

असो.

स्मिता २०१६, सुनीता, नंद्या४३, आ.रा. रा-----प्रतिक्रियाबददल आभार!

नंद्या४३,--<<,-दिनचर्या म्हणजे काय ? तर रोज सकाळी उठण्यापासून झोपेपर्यंत कोणत्या वेळी काय करायचं याचे नियम. कळतं पण वळत नाही>> > -आणि कधीकाळी डॉक्टर हेच पुन्हा सांगतात, तेव्हा वेळ निघून गेलेली असते!

आ.रा.रा.-- <<< ज्या लोकांना (नाईलाजाने) रात्रीच्या ड्यूट्या कराव्या लागतात, उदा. नर्सेस, डॉक्टर्स, पोलिस, सैनिक, रात्रीच्या विमान्/रेल्वे/गाड्यांचे ड्रायव्हर्स, अमेरिकेतल्या लोकांना सर्विस देऊन डॉलर कमवणारे भारतातले आयटीतले लोक, इ. च्या लाईफस्पॅनच्या काळजीने कासावीस झालो..>>> खरंय. कमीत कमी, नैसर्गिक झोप आणि त्यामुळे राखलं जाणार स्वास्थ्यं हे प्रत्येकाला मिळायला पाहिजे. जरी करिअर, पैसे यासाठी नाईट शिफ्ट्स करत असतील तरी, आपण या लोकांची सेवा घेतो , तेव्हा कुठंतरी आपण त्यांचे उपकृत होतो.

आरारा, पृथ्वी वर २४ तासाचा दिवस असतो म्हणून चोवीस तासाचे एक चक्र आहे.
उत्क्रांती साठी किमान काही शे/हजार/लाख वर्षे जावी लागतात. अनियमित दिनचर्या असणाऱ्या लोकांना ह्या जन्मात तरी तिच्या दुष्परिणामांपासून सुटका नाही.

दीपा जोशी, चांगला लेख!

@आ रा रा ---<<<माणूस नामक प्राण्यात रात्रीची नोकरी करून अन्न मिळवणे, या कारणास्तव रात्री जागण्याचा सर्कॅडियन र्‍हिदम नव्याने उत्पन्न व्हायला किती वर्षे लागतील?>>. लाखो वर्षे, पिढ्या न पिढ्या, सर्व मानव जात जर रात्री जागे, आणि दिवस झोपलेले असं झालं तर कदाचित सिरकॅडिअन चक्र बदलेल…
पण, मानवी जैविक चक्र सूर्य- प्रकाशाला संवेदक पेशींमुळे निर्माण होत असल्याने , वर म्हटल्याप्रमाणे होणे असंभव आहे.
<<<पण आजच्या जगात या प्रकारचे अन्न सर्वात स्वस्त, व यातून मिळालेली एक्स्ट्रा उर्जा वापरात आणणारी लाइफस्टाईल गायब.
मग या अन्नाचे काय करावे? त्यासाठीही, शरीरात काहीतरी उत्क्रांती घडतच असेल ना?>>> शरीरातली चरबी, (लठ्ठपणाची समस्या ) फार लवकर वाढते ती यामुळेच.

@आ रा रा ---<<<माणूस नामक प्राण्यात रात्रीची नोकरी करून अन्न मिळवणे, या कारणास्तव रात्री जागण्याचा सर्कॅडियन र्‍हिदम नव्याने उत्पन्न व्हायला किती वर्षे लागतील?>>. लाखो वर्षे, पिढ्या न पिढ्या, सर्व मानव जात जर रात्री जागे, आणि दिवस झोपलेले असं झालं तर कदाचित सिरकॅडिअन चक्र बदलेल…
पण, मानवी जैविक चक्र सूर्य- प्रकाशाला संवेदक पेशींमुळे निर्माण होत असल्याने , वर म्हटल्याप्रमाणे होणे असंभव आहे.
<<<पण आजच्या जगात या प्रकारचे अन्न सर्वात स्वस्त, व यातून मिळालेली एक्स्ट्रा उर्जा वापरात आणणारी लाइफस्टाईल गायब.
मग या अन्नाचे काय करावे? त्यासाठीही, शरीरात काहीतरी उत्क्रांती घडतच असेल ना?>>> शरीरातली चरबी, (लठ्ठपणाची समस्या ) फार लवकर वाढते ती यामुळेच.

@आ रा रा ---<<<माणूस नामक प्राण्यात रात्रीची नोकरी करून अन्न मिळवणे, या कारणास्तव रात्री जागण्याचा सर्कॅडियन र्‍हिदम नव्याने उत्पन्न व्हायला किती वर्षे लागतील?>>. लाखो वर्षे, पिढ्या न पिढ्या, सर्व मानव जात जर रात्री जागे, आणि दिवस झोपलेले असं झालं तर कदाचित सिरकॅडिअन चक्र बदलेल…
पण, मानवी जैविक चक्र सूर्य- प्रकाशाला संवेदक पेशींमुळे निर्माण होत असल्याने , वर म्हटल्याप्रमाणे होणे असंभव आहे.
<<<पण आजच्या जगात या प्रकारचे अन्न सर्वात स्वस्त, व यातून मिळालेली एक्स्ट्रा उर्जा वापरात आणणारी लाइफस्टाईल गायब.
मग या अन्नाचे काय करावे? त्यासाठीही, शरीरात काहीतरी उत्क्रांती घडतच असेल ना?>>> शरीरातली चरबी, (लठ्ठपणाची समस्या ) फार लवकर वाढते ती यामुळेच.

@आ रा रा ---<<<माणूस नामक प्राण्यात रात्रीची नोकरी करून अन्न मिळवणे, या कारणास्तव रात्री जागण्याचा सर्कॅडियन र्‍हिदम नव्याने उत्पन्न व्हायला किती वर्षे लागतील?>>. लाखो वर्षे, पिढ्या न पिढ्या, सर्व मानव जात जर रात्री जागे, आणि दिवस झोपलेले असं झालं तर कदाचित सिरकॅडिअन चक्र बदलेल…
पण, मानवी जैविक चक्र सूर्य- प्रकाशाला संवेदक पेशींमुळे निर्माण होत असल्याने , वर म्हटल्याप्रमाणे होणे असंभव आहे.
<<<पण आजच्या जगात या प्रकारचे अन्न सर्वात स्वस्त, व यातून मिळालेली एक्स्ट्रा उर्जा वापरात आणणारी लाइफस्टाईल गायब.
मग या अन्नाचे काय करावे? त्यासाठीही, शरीरात काहीतरी उत्क्रांती घडतच असेल ना?>>> शरीरातली चरबी, (लठ्ठपणाची समस्या ) फार लवकर वाढते ती यामुळेच.

Pages