हुरडा - फोटोफिचर

Submitted by अंजली on 21 March, 2017 - 00:18

जानेवारी संपत आला की हुरडा पार्टीचे वेध लागायला लागतात. ज्वारीची कणसं किती भरली आहेत, कोवळी आहेत बघून अंदाज घेतला जातो. साधारण फेब्रुवारीच्या दुसर्‍या तिसर्‍या आठवड्यात हुरडा तयार होतो आणि अगदी आठवडाभरच राहतो. नंतर कणसं निबर होतात, थोडक्यात ज्वारी तयार व्हायला लागते.

या फेब्रुवारीत बर्‍याच वर्षानंतर घरचा हुरडा खायला मिळाला. दुपारी साधारण १२ - १२:३० सुमारात जेवणाचे डबे घेऊन मळ्यात जायचं. मळ्यातल्या देवीला / देवाला नमस्कार करून यायचं. मस्त गप्पा टप्पा करत जेवण करायचं. वांग्याची भाजी, भाकरी, ठेचा, घरच्या दुधाचं दही, उखळात कांडलेली दाण्याची किंवा जवसाची चटणी, कधी कोवळ्या कैरीची कांदा घालून केलेली चटणी... जेवण अंमळ जास्तच झाल्यानं डोळ्यांवर झापड यायला लागते. तिथंच ओसरीवर जरा लवंडायचं. चारच्या पुढं उन्हं उतरल्यावर शेतावर एक फेरी मारून यायची. चहा झाला की हुरड्याची तयारी सुरू होते.

१. ज्वारीचं कोवळं कणीस


३. खड्डा खणून शेणाच्या गोवर्‍या नीट रचून ठेवायच्या.

४. नीट रचल्या गेल्या की शेकोटी नीट पेटली जाते.

५. तो पर्यंत शेतावर काम करणारे गडी कोवळी कणसं बघून पोत्यात भरून आणतात.

६. शेकोटी नीट पेटली पाहिजे.

७.

८.

९. तो पर्यंत हरबरा (डहाळा) भाजून घ्यायचा का?

१०.

११. निखारे छान पेटले की ज्वारीची कणसं आत टाकायची.

१२.

१३.

१४. साधारण मिनीटभरानं बाहेर काढायची. जास्तवेळ ठेवली तर करपतात.
खरपूस भाजलेलं कणीस.

१५.

१६. लगेच हातावर चोळून भाजलेले दाणे वेगळे करायचे. यासाठी चटके खाल्लेले, मळ्यात राबलेले अनुभवी हातच पाहिजेत. आपल्यासारख्यांचं काम नाही हे.

१७. हुरड्याचे कोवळे दाणे.

१८. कुसं, कोंडा वेगळा करायचा.

१९. हुरडा पाखडून स्वच्छ करेपर्यंत पानात दाण्याची चटणी, भाजलेले शेंगदाणे, गूळ-खोबरं घ्यायचं. हुरड्याबरोबर कोथींबीरीची लसूण घातलेली चटणीही मस्त लागते.

२०. पाखडून स्वच्छ केलेला हुरडा कधी एकदा तोंडात टाकतोसं होऊन जातं.

२१. अजून पाखडायचा आहे.

२२

हुरडा खाल्ला की पाणी प्यायचं नाही म्हणे. मठ्ठा प्यायचा, त्यामुळे पोटात दुखत नाही. पोटं भरली तरी मन भरत नाही. सूर्य मावळायला येतो, मळ्यात अंधार व्हायला लागतो. दूरदेशाहून पुन्हा कधी हुरड्याला यायला मिळेल विचार करत घरची वाट धरली जाते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच सफर घडवलीत की हुरडा पार्टीची!
(पण इतक्या स्वच्छ सतरंजीला काळे डाग पाडण्याऐवजी जरा पेपर पसरले असतेत तर बरं झालं असतं!) आणि ताटात फारच कमी घेतलात की हुरडा इतक्या मेहनतीच्या मानाने आणि वाट पहायला लावल्यावर Happy

धन्यवाद सगळ्यांना :).
फोटोंचा काय घोळ आहे कळत नाही. गुग्ल ड्राईव्हवरून अपलोड केले आहेत. काही फोटो आडवे दिसत आहेत (उदा. फोटो क्रमांक ५). काय करावं?

आंबट गोड, पेपर पसरून प्रयोग करून झाला आहे. गरम कणसांचे हाताला चटके बसायला लागले की ते लोक कणसं सरळ खाली टाकून रगडतात. पेपर फाटून त्याचे तुकडे झाले आणि ते हुरड्यात मिसळायला लागले. खेरीज सतरंजी खास हुरड्याची आहे, स्वच्छ झटकून आवश्यक वाटल्यास धुवून पुढच्या हुरडा पार्टीसाठी तयार ठेवतात. त्यामुळे डागांची चिंता नाही :).

वॉव मस्त. कधीही हुरड्याला जायचा योग आलेला नाही आजवर. जरा भाकरीवाल्यस ताटाचाही फोटो टाकला असतास तर?

दुपारचा मेनू वाचूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. अजून हुरड्याचे फोटो बघितलेच नाहीत. लोड व्हायला खूप वेळ लागतोय.

सायो, भाकरीवालं ताट फोटो काढायच्या आधीच फस्त झालं. फोटो काढण्याएवढा दम कुठला निघायला?
गुगल ड्राईव्ह वरून फोटो अपलोड करणं त्रासदायक आहे. पिकासा वेब चांगलं होतं. फोटोंची क्वालीटी कमी करावी का? म्हणजे लवकर अपलोड होतील?

छान आहेत फोटो, वर्णन..
बरेच ऐकून आहे या हुरडापार्टीबद्दल..
काय मजा असते ते कदाचित प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावरच समजेल..

भारी! Happy

लहानपणी सोलापूरच्या आसपास मनसोक्त खाल्लेला हा हुरडा "पोंक" हे गुजराती नाव धारण करून ऐटीत फ्रोझन सेक्शन मधे बसलेला पाहून आश्चर्य वाटले. अर्थात हुरडा पार्टीची नव्वद टक्के मजा वातावरण निर्मितीत असते.

मस्त