गौराक्का!!!

Submitted by विद्या चिकणे-मांढरे on 20 March, 2017 - 08:04

''गौराक्का, गौराक्का", राजूच्या हाकेकडे दुर्लक्ष करत, तिने हातातल्या दगडावरची पकड घट्ट केली आणि सर्वात उंच असलेल्या चिंचेवर नेम धरला. एक, दोन, तीन....म्हणत दगड भिरकावणार, इतक्यात आतापर्यंत अंगणात उभा राहून हाका मारणारा राजू जवळ आला होता. तिच्या हाताला धरून ओढंतच घराकडे नेऊ लागला. 'गौराक्का चल, काकूने बोलावलंय तुला लगेच.' 'थांब रे! ती चिंच पाडू दे, काय कटकट लावलीस, येते सांग आईला.' 'नाही काकूने लगेच बोलवलंय, चल.' राजूने धोशाच लावला. 'काकूचा चमचा कुठला, चल.' असे म्हणत नाईलाजाने तिने हातातला दगड खाली टाकला आणि राजूच्या खांद्यावर हात टाकून चालू लागली. घराजवळ येताच, काहीतरी आठवल्यासारखं करून राजू ओरडला, 'इकडून नाही, इकडून नाही, मागच्या दाराने यायला सांगितलय काकूने.' 'आता हे काय नविन?, मी एवढा वेढा घालून मागच्या दाराने जाणार नाय, तुला जायचं तर जा.' 'अगं पाहुणे आलेत तुला बघायला, म्हणून...' राजू ओरडला. पण त्याचं ऐकायला ती तिथे थांबलीच कुठे? झपझप चालत ती पोहोचली ओसरीवर. अन बघते तर काय! समोर पंचविशीतला एक मुलगा, त्याच्याबरोबर दोन पुरुष, चाळीस बेचाळीसची एक बाई, बाबा आणि सरूमावशी असे सगळे बसले होते. आई सगळ्यांना चहापाणी विचारत होती. गौरीला दारात बघताच बाबा बोलले, 'अरे बाळा, आलीस तू, ये ये. पाव्हणं! हि आमची गौरी बर का'. सगळ्यांना उद्देशून बाबा बोलले आणि सगळ्या नजरा गौरीकडे वळल्या. सगळ्यांच्या चेहर्यावर एक मिश्किल हास्य उमटले. सरुमावशीने मात्र डोक्यापासून पायापर्यंत तिला न्याहळलं आणि डोळ्यांनीच आईला 'तिला आत घेवून जा,' अशी खुण केली. आई हातातला पाण्याचा तांब्या लगबगीनं खाली ठेवंत आणि खोटं हसू कसंबसं जपत, गौरीला जवळजवळ ओढंतच आत घेवून गेली. 'मागच्या दारानं ये, सांगितलेलं ना गं! हा असला अवतार घेऊन पाहुण्यांच्या समोर आलीस?' आईकडे नं बघता तिने हळूच कपाटाच्या आरशात डोकावलं. खरंच ध्यान दिसत होती. धुळीने माखलेले कपडे, विस्कटलेले केस. "मी कशी का दिसेना त्याचं एवढं काय", असा विचार करत होती तोवर आई परत बडबडली, 'आवरून घे, हि साडी नेस. मी पोहे करते. हि कमल पण कुठं कडमडली कुणास ठाऊक, जाई गेली बोलवायला आणि तीपण तिकडलीच झाली. मी एकटी काय काय करू? थांब जरा मी सरीलाच आत बोलवते, ती तुला साडी नेसवून देईल.' असे म्हणत, उंबर्या वरूनच सरू मावशीला हात करून तिने बोलावले. साडी, पोहे वगैरे शब्द ऐकल्यावर गौरीला सगळा प्रकार लक्षात आला. "हम्म, म्हणजे जो दिवस यायलाच नको असं वाटत होतं , तो आलाय तर. आता संपलं सगळं." असे मनाशीच म्हणत तिने उसासा घेतला आणि आईने ठेवलेल्या साडीकडे बघत राहिली.

सरूमावशी आली आणि साडी नेसवता नेसवता तिनेही तोंडसुख घ्यायला सुरुवात केली, 'एवढं चांगलं स्थळ आणलंय आणि तुम्हाला काय परवाच नायं, एवढा राजबिंडा पोरगा, चांगलं घरदार आणि असला अवतार घेऊन आलीस त्यांच्यासमोर कार्टे!' असे म्हणत मावशीने एक टपली मारली. आणि पुढे बोलू लागली, 'आणि हो बाहेर पाहुण्यांच्या समोर फिदीफिदी नका करू. आवडी निवडी विचारल्या तर स्वयंपाक, घरकाम सांगा. नाहीतर सांगाल हुंदडायला आवडतं म्हणून. पाहुण्यांच्या समोर पोरीच्या जातीनं खाली बघावं नजर वर करू नये.' मावशीच्या सूचना चालू होत्या तेवढ्यात कमलकाकूपण आली, 'हुं...., सरुताई स्थळ बाकी साजरं आणलंय बऱ का! गौरा, काय मग खुश ना? ताई, अहो काय सांगू , हि जुई मला बोलवायला आली आणि निरोप द्यायचा सोडून, बसली तिथे सापशिडी खेळत. तिचा डाव झाल्यावर सांगते मला, पाहुणे आलेत तुला बोलावलंय म्हणून. हातातलं काम टाकून आले बघा, धावत.' कौतुक ऐकल्यावर मात्र मावशीचा राग मावळला.

गौरी कपाळावर आठ्या पाडून नुसती ऐकत होती सगळं. एकदाची साडी-बिडी कार्यक्रम उरकला आणि मावशी म्हणाली, 'चला बाहेर जाऊ, खोळंबा झालायं सगळ्यांचा.' आई, गौरी, काकू आणि मावशी अशी सगळी वरात आली ओसरीवर. बसायला जागा मिळेल तशा बसल्या सगळ्या. सगळ्यांच्या नजरा गौरीकडेच लागल्या होत्या. ती मात्र मावशीने दिलेल्या सूचनांच अगदी नाईलाजाने पालन करत होती. "पंधरावी झाल्याशिवाय मी लग्नच नाही करणार!" असे म्हणून आजवर तिने सगळ्यांना थोपवून धरले होते. पण आता तेही कारण सांगता नव्हते येणार, मागच्याच आठवड्यात पदवीची परीक्षा संपली होती. "आता तेच, आई आणि काकुसारखं आयुष्य जगायला लागणार. मुलंबाळ, घरदार, धुनीभांडी. संपलं, सगळं संपलं . आता फुलपाखरा सारखं बागडणं नाही, कि कोकिळे सारखं गाणं नाही. शेताच्या या पांदिपासून त्या पान्दिपर्यंत धावण्याची शर्यत नाही, कि पाटलाच्या आमराइतले आंबे चोरणं नाही." विचारांचं नुसतं काहूर उठलं होतं डोक्यात. जेवढा जास्त विचार करत होती, तेवढी जास्त खट्टू होत होती. आजूबाजूला चाललेल्या चर्चेत तिला अजिबात रस नव्हता. तिला विचारलेल्या प्रश्नांची फक्त 'हो', 'नाही', 'हुं' एवढीच उत्तरं देत होती.

सगळ्यांचे औपचारिक प्रश्न झाले आणि मधेच एक रुबाबदार आवाज कानांवर पडला, 'तुमची हरकत नसेल, तर मला गौरीशी जरा बोलायचं आहे.' एवढावेळ जमिनीला खिळलेली नजर हळूच वर गेली आणि नजरानजर झाली. गौरीसारखा अगदी गोरागोमटा नसला, तरी त्याचं टोकदार नाक त्याच्या गव्हाळ रंगास साजेसं होतं. उंच आणि बांधेसूद शरीरयष्टी, हसरा चेहरा! "खरंच साजरं स्थळ आणलंय मावशीने. पण काय उपयोग, मन मारूनच जगायचं असतं नंतर, आम्हां मुलींना आमच्या आवडीनिवडींची गुंडाळी करून फेकुनच द्यायला लागते. ती पाटलाची मीरा कित्ती छान गाते, पण लग्नानंतर नवरा म्हणाला, 'आमच्याकडे हे नाही चालणार'. लग्न झाल्यापासून गायलीच नाही बिचारी." पुन्हा विचार....
मुलाच्या अशा विचित्र प्रश्नामुळे सगळे शांत झालेले पाहून मुलाचे वडील बोलले, 'जिच्याबरोबर आयुष्य घालवायचं आहे, तिच्याशी व्यवस्थित बोलणं व्हायला पाहिजे. असे आमच्या श्रीचे म्हणणे आहे. तुमची काही हरकत नसेल तर......' वातावरणातलं अवघडलेपण घालवण्यासाठी गौरीचे बाबांचं बोलले, 'अहो हरकत कसली? जाऊद्या पोरांना, जरा मोकळ्यापनांन बोलता ईल. नवीन जमाना ए, आपला काळ वेगळा होता. जा गं गौरा पाहुण्यानला आपली झाडं दाखव.'

बाबांची परवानगी मिळाली आणि दोघे परड्यात आले . 'आता इथे काय आहे, याला दाखवायला आणि याला असे काय बोलायचे आहे?' ती असा विचार करत होती, तेव्हढ्यात तोच म्हणाला, 'चिंचेखाली बसुया का?' ती फक्त 'हुं' एवढंच बोलली. दोघे चिंचेखाली पोहोचले. एका दगडावर बसत आणि बाजूलाच पडलेल्या दुसऱ्या दगडाकडे हात करत तो म्हणाला, 'बस ना तुहि.' तीही बसली आणि म्हणाली, 'तुमचे कपडे खराब होतील धुळीने.' 'अग सवय आहे मला. दर विकेंडला आम्ही सगळे मित्रमैत्रिणी जात असतो फिरायला, ट्रेकला, पिकनिकला तेव्हा होतातच कपडे खराब. मला फिरायला खूप आवडतं आणि हो लग्नानंतर माझ्या बायकोने मला या सगळ्यात सोबत करावी असेही वाटते.' तो बोलत होता आणि ती नुसती ऐकत होती भारावल्यासारखी, आत्ता पर्यंत निस्तेज असलेले डोळे वेगळ्याच आनंदात चमकू लागले होते. तो पुढे बोलला, 'मला टीवी समोर बसण्यापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात जायला आवडतं, गड किल्ले चढायला आवडतात, फुल स्पीडमध्ये गाडी चालवायला आवडतं, चिंब पावसात भिजायला आवडतं......'

मधेच जोरात टाळी वाजवून ती म्हणाली, 'आयला ! तुझ्या आणि माझ्या आवडी एकदम सेम टू सेम एत.' आपण जरा जास्तच बोलतोय, असे वाटल्याने तिने हळूच जीभ चावली आणि गप्पं झाली. तोही त्यावर जोरात हसला, 'ते मघाचा तुझा अवतार बघून, आलंय माझ्या लक्षात.' असे म्हणत मघाशी गौरीच्या हातून पडलेला दगड त्याने उचलला आणि पूर्ण ताकदीनिशी भिरकावला. वर गेलेला दगड खाली आला, तो चिंच घेवूनच. गौरीने धावत जावून ती उचलली आणि तशीच धावत घराकडे गेली. उंबर्याजवळ तिची पावलं थबकली, तिने हळूच मागे वळून बघितलं आणि हातातली चिंच चाखली. बावीस वर्षात आज ती पहिल्यांदाच एवढी गोड लागत होती. गालांवर चढलेली लालीही नवीनच होती.

विद्या
https://www.facebook.com/vidya.chikne/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख लिहिलेय Happy
पण लग्नाआधीचा स्वप्नाळूपणा खरंच टिकतो का???? मुलीच्या बाबतीत तर नाहीच नाही.

@ विनिता तुम्ही नोंदवलेल्या प्रतिसादाबद्दलही आभार! स्वप्नं पाहणं अन ती पूर्ण करणं आपल्याच हातात असते असे मला वाटते. लग्नानंतर तडजोडी कराव्याच लागतात हे मान्य, पण त्या फक्त मुलींनाच कराव्या लागतात असे नाही वाटत मला. मुलगा अन मुलगी दोघांनाही तडजोडी कराव्याच लागतात, त्यानेही काही स्वप्नं पाहिलेली असतात जी लग्नानंतरच्या जबाबदाऱ्यांमुळे त्याला पूर्ण करता येत नाहीत. खरी कसरत तर एकमेकांची स्वप्नं समजून घेऊन ती पूर्णत्वास नेण्यासाठी एकमेकांस मदत करण्याचा समंजसपणा अंगी येण्यासाठीची असते, जी सहजासहजी नाही येत. असो, हे आपले माझे वैयक्तिक मत.....

स्वप्नं पाहणं अन ती पूर्ण करणं आपल्याच हातात असते असे मला वाटते. >>> आजही मुलींसाठी हे अवघड आहे. आणि मुलांचे जग लग्नानंतर तेवढे बदलत नाही जेवढे मुलींचे! मुले त्यांचे मित्र, हॉबीज, रुटीन सगळे आहे तसे चालू ठेवू शकतात, मुलीचा बेसच हलतो. बघून, ऐकून सांगत नाहीये, बर्‍याच मुली बघितल्या आहेत अशा स्वप्नाळू!! नंतर 'हं ते काय गं! वाटायचे पण नाही जमत.." असे उत्तर देणार्‍या.
अर्थात हा माझा अनुभव व त्यामुळे बनलेले हेमावैम.
ऐकमेकांना समजून घेण हा वेगळा भाग आहे, मी मुलीच्या स्वप्नांबद्द्ल बोलतेय.