http://www.maayboli.com/node/57854 - पूर्वार्ध १
http://www.maayboli.com/node/57861 - पूर्वार्ध २
http://www.maayboli.com/node/57936 - जम्मूत आगमन
http://www.maayboli.com/node/58021 - जम्मू (भाग ४)
http://www.maayboli.com/node/58148 - (भाग ५): पठाणकोट - निवांत सुरुवात
http://www.maayboli.com/node/58175 - (भाग ६): अमृतसर - लखलखते सुवर्णमंदीर
http://www.maayboli.com/node/58217 - (भाग ७): मुक्तसरसाहीब - कसोटीचा दिवस
http://www.maayboli.com/node/58684 - (भाग ८): हनुमानगढ - राजस्थानात प्रवेश
http://www.maayboli.com/node/60334 - (भाग 9): सरदारशहर - वालुकामय वेदना
http://www.maayboli.com/node/60392 - (भाग १०): डीडवाना- एक दुर्दैवी दिवस
http://www.maayboli.com/node/60472 - (भाग ११): अजमेर - चमत्कार झाला की हो
http://www.maayboli.com/node/60609 - (भाग १२): भिलवाडा - हजार किमी पार
http://www.maayboli.com/node/60780 - (भाग १३): नाथद्वारा - सुंदर अनुभव
http://www.maayboli.com/node/60844 - (भाग १४): खेरवारा - अरवलीचे आव्हान
http://www.maayboli.com/node/61826 - (भाग १५): मोडासा - एक दिवस विश्रांतीचा
http://www.maayboli.com/node/61845 - (भाग १६): बस्का (वडोदरा)- गुजरातमां स्वागत
http://www.maayboli.com/node/61860 - (भाग १७): अंकलेश्वर - नवे साथीदार, नवा उत्साह
http://www.maayboli.com/node/61878 - (भाग १८): वलसाड- गुजरातमधली खादाडी
http://www.maayboli.com/node/61889 - (भाग १९): वसई - उन्हाच्या तलखीत महाराष्ट्रात प्रवेश
http://www.maayboli.com/node/61917 - (भाग २०): मुंबईतले जंगी स्वागत
=======================================================================================
सकाळी उठलो तेव्हा छान फटफटले होते, पण आज काय टेन्शन नव्हतं, ९०च किमी होतं आणि एकदाचा का बोर घाट चढला की पुढे सगळा सरळ रस्ता होता. बोर घाटाचीच थोडी चिंता होती, कारण याआधी दोन्ही वेळा चांगलेच घामटे काढले होते, त्यामुळे दहा-बारा किलोचे पॅनिअर लादून तो घाट चढणे म्हणजे कसोटी होती.
त्यामुळे मामांनी कार काढताना विचारले की कुणाची पॅनिअर्स न्यायची आहेत का, पण कौतुकाची गोष्ट म्हणजे एकानेही त्यांच्याकडे पॅनिअर्स सोपवली नाहीत, इतके हजारो किमी आलोय ते घेऊन, आता थोडक्यासाठी कुठे असाच सगळ्यांचा सूर होता. त्यामुळे आम्ही बाणेदारपणे मामांना सांगितले आता सायकली पॅनिअरसकट घरी जाणार. त्यांनाही ते आवडलेच.
दरम्यान, एक गंमत म्हणजे, रोज आम्ही हेम सरांच्या मार्गदर्शनाखाली असे गोल करून स्ट्रेचिंग आणि वॉर्म अप करायचो, त्याचे शूटींग करावे अशी इच्छा ओबीला झाली आणि त्याने सायकलवरचा गो प्रो सुरु करून वर्तुळात सामिल झाला. माझा एक डोळा त्यावर होता आणि कॅमेराकडे आपली पाठ नको यायला म्हणून मी चक्क त्याच्या सायकलकडे तोंड करून व्यायाम करायला लागलो. सगळे आपल्याकडे बघून व्यायाम करतायत आणि मीच एकटा भलतीकडे तोंड करून व्यायाम करताना पाहून हेम पण कन्फुज झाला, शेवटी हसत हसत ओबीनेच त्यामागचे गुपीत फोडले.
अशा गंमती गमतीतच निघालो आणि बघता बघता बोर घाटापाशी येऊन ठेपलोही. आता इथून सगळा रस्ता माहीतीचा होता, आधीच्या रस्त्यासारखे कसलेही सरप्राईजेस नव्हती.
दोन वेळेला घाट केल्यामुळे काय करायचे हे गणित मनात पक्के होते त्याप्रमाणे लोएस्ट गियरवर १-१ सायकल टाकली, हेडफोन कानात कोंबले आणि सकाळी सकाळी समाजसेविका सन्नीताई यांचे जगाबद्दल गहन विचार असलेले गाणे ऐकत पॅडल मारायला सुरुवात केली. हळूहळू एक एक करत सगळे पुढे निघून गेले, हेम थोडा वेळ मागे होता पण तोही एका वळणावर ओव्हरटेक करून गेला. मला कसलीही चिंता नव्हती कारण एकदाही न थांबता, न पाय टेकता घाट पार करण्याचे उद्दीष्ट होते, त्यानुसार मस्त आजूबाजूची हिरवाई, मधून मधून येणारी गार हवेची झुळुक एन्जॉय करत एक एक पॅडल मारत चढ चक्रांकात करत राहीलो. उन्हे तापायची होती त्यामुळे जरी श्वास फुलला तरी घामटे काढले नव्हते, आणि वाटेत बाहुबली पॉइंट (हे आम्हीच ठेवलेले नाव आहे...अधिक माहीतीसाठी भेटा अथवा लिहा) पाशीही न थांबता पुढे सरकलो आणि थेट माथ्यावर जाऊनच थांबलो.
...
श्वास गरम झाले होते, अंग तापले होते, छातीचा भाता धपापत होता पण गड जिंकून आल्याचा आनंद खूप जास्त होता, आणि पुढे राजमाची पॉइटला जाणारा तीव्र चढ अजून बाकी असल्याने बॉडी कूल व्हायच्या आधीच पुढे निघालो. अर्ध्या एक तासातच खंडाळा पार करून लोणावळा गाठलेही. वाटेत जीवाचा खंडाळा-लोणावळा करायला आलेले पर्यटक, इतक्या पहाटेही कठड्यावर बसून गुलुगुलु करणारी कपल्स, शाळेला जाणारी मुले-मुली, दुकानदार, टोपल्यात कैरी, काकड्या, पेरू तत्सम विकत कडेला बसलेल्या बायका आणि चार पायावर हुंदडत असलेले पूर्वज आमच्याकडे टकाटका बघत होते, त्यामुळे अजूनच भारी वाटत होते.
मनशक्ती गाठले तेव्हा ओबी दिसला, त्याने एक टर्न वेगळा घेतल्यामुळे जुन्या हायवेऐवजी तो एकदम एक्प्रेस हायवेला गेला आणि तिथून वळता न आल्यामुळे तसाच लोणावळ्यापर्यंत आला. त्यामुळे आम्हाला त्याला चिडवायला संधी मिळालीच. तु घाट काय पूर्ण केला नाही, एक्सप्रेसवे वरून यायला काय मज्जा, तुझी राईड आता अर्धवटच काऊंट होणार इ.इ. अर्थात त्याने काय दाद दिली नाही ही गोष्ट वेगळी.
दहा वाजताच मनशक्ती गाठल्यामुळे आणि घाट चढून आल्याने कडकडून भूक लागलेलीच. त्यामुळे भरपेट हादडले आणि पुन्हा सायकलवर स्वार झालो. आता काय कामशेत प्राईम सोडले तर सगळा सरळ रस्ता आणि अनेकदा तुडवलेला. सुसाट गँगसाठी एकदम मख्खन, त्यामुळे ते सुटलेच, पण बाकीचेही त्यांना धरुन धरून जात रोहीलो. वेदांगचा भक्कम ड्राफ्टचा फायदा घेत मी, पाठोपाठ हेम, काका असे सगळे लांब शेपूट करून जात राहीलो. त्यामुळे हाहा म्हणता कामशेत पार करून बाराच्या सुमारास वडगावला येऊन ठेपलोही.
तिथे एक भारी सरप्राईज होते, लान्सचे काका महिंद्र हसबनीस तिथे राहतात, त्यांची मोठी डेअरी आहे. त्यांनी सगळ्यांना आग्रह करून घरी नेले. आणि एका भन्नाट व्यक्तिमत्वाची ओळख झाली. मुळात ते लान्सचे काका यावरच विश्वास बसत नव्हता. लान्स कसा एकदम सात्विक, सोज्वळ, मितभाषी. आमच्या दहा वाक्याला त्याचे एक असा हिशेब. या उलट त्याचे काका, एकदम गडगडाटी आवाजात सगळ्यांचे स्वागत केले आणि प्रत्येकाच्या व्यवसायाबद्दल विचारून प्रत्येकाला बोलते केले. त्यांना सगळ्याच विषयात गती होती आणि मिश्किल प्रश्न विचारून एकेकाची फिरकी घेत होते. एरवी बोलण्यात कुणाला न ऐकणाऱ्या ओबीलाही त्यांनी मात दिली. गप्पांसोबत खायला आले आणि पाठोपाठ तुडुंब भरून दाट, निरसे, चविष्ट दुधाचे प्याले. ते संपवता संपवता दमछाक झाली.
दरम्यान, मनशक्तीनंतर हेमचे फोन सुरु झाल्याने तो मागे पडला. नंतर जोर लावून त्याने काकांना गाठलं. तळेगांवला त्याचा भाऊ हायवेजवळच आहे रहायला, पण तो होता मुंबईत. त्याने फोन करुन सांगितलं की आई तळेगांवलाच आलेली आहे, घरी जाऊन ये. मग तो आणि काका घरी गेले, तिकडे दोघांनाही औक्षण वगैरे केलं. पण यात त्यांनी लान्सच्या काकांची भेट मिस केली.
तोवर एक वाजून गेला आणि उन्हे तापायला सुरुवात झालेली. आणि वैताग यायला लागलेला. हे पुरेसे वाटले नाही म्हणून का काय ओबीची सायकल पंक्चर झाली. त्या अडनिड्या वेळी झालेल्या पंक्चरमुळे तोही वैतागला, पण करतो काय. कसेतरी पंक्चर काढले, पाच मिनिट झाले आणि परत पंक्चर. तो तर इतका हैराण झाला म्हणे, आता अजून एक पंक्चर झाले तर हातात सायकल घेऊन घरी चालत जाईन पण टेंपो करणार नाही.
ते बहुदा ऐकले असावे त्याच्या सायकलने कारण त्यानंतर मग तिने काही त्रास दिला नाही.
पण या सगळ्या व्यत्ययात खूप वेळ गेला, तोवर घरच्यांचे फोनावर फोन, कधी पोचताय. त्यांची तिकडे स्वागताची तयारी सुरु झाल्याचे कळत होते. पण काय इलाजही नव्हता. दोन अडीचच्या सुमारास पिंपरीतील डांगे चौक पार केला, तेव्हा मायबोलीकर मल्लीचा फोन. मी येतोय भेटायला. मल्लीने आम्ही कन्याकुमारीला गेलेलो असतानाही आणि आत्ताही माबोवर आमच्या प्रवासाचे अपडेट टाकण्याचे अतिशय मोठे काम केले होते. तो आमचा आणि माबोचा दुवाच होता म्हणा ना. त्यामुळे त्याला भेटणे चुकवणे शक्यच नव्हते. आणि त्या तळपत्या उन्हात आमची भरतभेट पार पडली.
सगळे आता पोचायला उत्सुक असल्याने फारसा वेळ न घालवता त्याचा निरोप घेतला आणि पुढे सरकलो. पण आता सगळेच मागे पुढे असे विखुरले गेलो होतो. तीनच्या सुमारास पुणे विद्यापाठापाशी पोचलो तेव्हा प्रचंड ट्रॅफिक. तापलेल्या उन्हात त्या ट्रॅफिकमधून चालवायचा वैताग वेगळाच होता. ठाण्याच्या लोकांपुढे पुणेकरांची बेपर्वा वृत्ती फारच जाणवत होती. कुणाला काय घेणेदेणेच नव्हते, सगळ्यांना नुसती पुढे जायची घाई, पार अगदी पॅनिअरला घासून पण जात होते, उलट आम्हीच काय ब्याद आहोत असे तुच्छ कटाक्ष टाकण्यासही कुणी कमी केले नाही. (एक पुणेकर म्हणून मला हे लिहीताना काय यातना होत असतील याची कल्पना नाही येणार कुणाला).
अधून मधून कुठेतरी जर्सी दिसली की तीला फॉलो करत कसे तरी निलायमच्या ब्रीजपाशी पोचलो तेव्हा चार वाजून गेले होते. एक मात्र चांगले झाले, तिथे एक रॅलींग पॉईंट ठरवल्यामुळे सगळ्यांनी एकत्रच सारसबागेत पोचायचा उद्देश सफल झाला.
नेमके त्या दिवशी होती माघी गणेश जयंती आणि सगळ्यांचे नातेवाईक तिथे केव्हाचे ताटकळत उभे असल्याने त्या चौकात प्रचंड गर्दी झालेली. काही उत्साही पुणेकरांनी तबक, औक्षणाचे सामान पाहून कुठली पालखी येणार आहे का असेही विचारले म्हणे.
झाले आता शेवटची पाच मिनिटे आणि आम्ही एक वळण घेऊन त्या घोळक्यात सामिल झालो आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. अखेर आम्ही जम्मुचे रघुनाथ मंदिर ते पुण्याचे सारसबाग असा २२०० किमी चा प्रवास कसलेही विघ्न न येता पार पाडला होता. कित्येक अडचणी आल्या, दुखापती झाल्या, दमछाक झाली, भांडणे झाली, कुरबुरी झाल्या, हसलो, रडलो, रक्त वाहले, घामाच्या तर धारा, पाय आणि पोटऱ्या रोजच्या टॉर्चरनंतरही शाबूत होत्या आणि त्यावरच्या तटतटलेल्या शीरा सगळ्या प्रवासाची कहाणी सांगत होत्या.
माझे डोळे त्या गर्दीत आईला शोधत होते आणि ती दिसताच मी सायकल सोडून लहान मुलासारखी तिच्याकडे धाव घेतली आणि तिच्या मायेच्या मिठीत विरघळलो. तिचे कढत अश्रू माझा खांदा भिजवत होते आणि मी सगळा त्रास, दुख, वेदना, राग, चिडचिड सगळे काही विसरलो. तिचे आशिर्वादासारखे अभिषेक करणारे डोळ्यातले पाणी सगळे वाहून नेत होते आणि खऱ्या अर्थाने मोहीमेची सांगता झाली होती.
त्यानंतर होता तो नुसता आनंद सोहळा. सगळ्यांनी गळाभेट घेऊन अभिनंदन केले, औक्षण झाले, लोक नुसते फोटोवर फोटो काढत होते की सेलिब्रिटी असल्याचा भास होत होता. इतक्या उन्हात पण सगळे जण कौतुक करायला आवर्जून आले होते, कुणा-कुणाची नावे घ्यावी. सगळेच आपले. ज्यातर्फे आम्हाला मेरीडाची जर्सी आणि शॉर्ट्स स्पॉन्सर झाले होते तो प्रो बाईकचा प्रसाद शाळीग्राम तर आम्हाला लोणावळ्याला भेटायला आलेला सायकलवरून आणि तिथून तो पुण्याला आला आमच्या सोबत
...
...
मायबोलीकर पवन आम्हाला कन्याकुमारीला जाताना सारसबागेपाशी भेटायला आला होता, आणि आज जम्महून आल्यावरही.
हेम म्हणला, बायकोच्या चेहऱ्यावर आम्हांला सुखरुप पाहून, २२०० किमी लांब सोडलेला नि:श्वास स्पष्ट जाणवला.
त्याची एक गंमतच होती. त्याच्या मुलीचा होता वाढदिवस, त्यामुळे तिला तो त्यादिवशी नाशिकला हवा होता, पण मामांनी आग्रह केल्यामुळे त्याने पुण्यालाच मोहीम पूर्ण केली.
कारण त्याच दिवशी संध्याकाळी सगळ्यांसाठी श्रमपरिहाराची पार्टी ठरली होती आणि मग तिथेच शर्वरीचा, हेमच्या मुलीचा वाढदिवस साजरा करायचे ठरले होते. आता तोही आमच्या मोठ्या कुटुंबाचा भाग होता. त्यामुळे त्याला सोडलेच नाही.
तिथून जातानाही मी कारमधून पॅनिअर्स पाठवले नाहीत, म्हणलं, घरी याच अवतारात येणार. हेम आणि घाटपांडे काकांना तर तिथून कात्रजला त्यांचे घर गाठायचे होते. त्यामुळे हेम म्हणाला, सायकल गाडीत टाकून आरामात जाऊ घरी.. तर काकांनी स्पष्ट नकार दिला व म्हणाले चल चालवत. एवढं चालवलंय तर साताठ किमी ने कांय होणारे? तिथून धनकवडीपर्यंत काकांनी त्या चढावर चालवायला लावून त्याला घरापर्यंत पोहोचवून मग कात्रजला त्यांच्या घरी गेले.. मोहिमेत सगळ्यांची पाठराखण करणाऱ्या काकांनी घरीही सर्वात शेवटी जाण्याचा शिरस्ता राखला.
रात्रीची पार्टीही भन्नाट झाली. आधी सगळ्यांच्या घरच्यांनी पंजाबी हॉटेलमध्ये गेट टु गेदरचा बेत आखला होता, पण आम्ही प्रवासभर पंजाबीच खात असल्याने तो आम्ही तातडीने मोडीत काढला आणि चक्क महाराष्ट्रीयन भाकरी-भाजी मिळेल अशा ठिकाणी गेलो.
आमच्या घरच्यांनी सगळ्यांना एक छानशी भेट दिली, सगळ्यांना संग्रही ठेवण्यासाठी मग्ज. आणि मला त्यांच्याकडून मिळालेली भेट तर अगदीच भन्नाट.
पुढे काय
मोहीम संपली पण त्याची झिंग अद्याप उतरलेली नाहीये. आणि खरे सांगायचे तर आम्ही फार काही अदिव्तीय केल्यासारखे काही वाटत नव्हते पण लोकांना प्रचंड उत्साह होता. त्या मोहीमेबद्दल ऐकायला, फोटो बघायला आणि आमचे कौतुक करायला त्यांना विशेष आनंद होत होता.
विशेष म्हणजे पुणे महानगरपालिकेनेही आमचा खास सत्कार केला. महापौरांनी विशेष मानचिन्ह आणि गौरवपत्रक दिले.
...
तिकडे हेमचाही नाशिकच्या महापौरांच्या हस्ते सत्कार झाला.
ज्या चक्रम हायकर्सच्या सदस्यांनी आमचे ठाण्यात भरघोस स्वागत केले होते त्यांनी त्यांच्या सभासदांसाठी आमचे एक खास प्रेझंटेशन ठरवले. आणि आमच्यात मामा, घाटपांडे काका, शिरिष, युडी, ओबी यांनी पुणे ते ठाणे सायकल ने जाऊन त्यांना आश्चर्याचा धक्का दिला.
पुढे पुण्यातही फोलीएज संस्थेने ट्रॅव्हल कट्टा कार्यक्रमात आम्हाला खास आमंत्रण दिले आणि उत्साही पुणेकरांनी चांगला प्रतिसाद देऊन हुरुप वाढवला.
...
मोहीमा
मी आल्यानंतर डॉक्टरांना पाय दाखवला तर त्यांनी लिगामेंट रॅप्चर असल्याचा निर्वाळा दिला आणि तीन महिने कसलीही अॅक्टिव्हीटी करण्यावर निर्बंध घातले. तरी नंतर सगळ्यांसोबत पावसाळ्यात पुणे अलीबाग पुणे अशी राईड केलीच.
आणि हक्काचे ठिकाण असलेल्या रुपाली च्या वाऱ्या सुरुच होत्या
दरम्यान मामांनी सगळे आपापल्या व्यापात व्यस्त असल्याने एकट्यानेच सायकलवरून नर्मदा परिक्रमा करण्याचा घाट घातला आणि या जानेवारीत त्यांनी तो यशस्वीरित्या पूर्ण केलाही. विशेष म्हणजे, त्यांच्या मुलाने वेदांगनेही नर्मदा परिक्रमेचा ध्यास घेतला आणि तो सध्या चालत ती पूर्ण करत आहे.
अद्भुत बाप लेक. दोघेही परिक्रमेदरम्यान भेटले तेव्हा. एक सायकलवरून आणि एक चालत असे एकटे एकटे. त्या दोघांना परवानगी देणाऱ्या मामींना साष्टांग नमस्कार
घाटपांडे काकांनी मोठी मोहीम अशी केली नाही पण दररोजची प्रॅक्टिस राईड आजही न कंटाळता सुरु आहे. बाकी कुणी येवो ना येवो, घाटपांडे काका, आपटे काका, अतुल हे सकाळी साडेसहा वाजता सारसबागेपाशी दिसणार म्हणजे दिसणारच.
सुह्द अमेरिकेला रवाना झाला आणि तिथे सायकल विकत घेऊन आपली हौस भागवत आहे.
तर ओबीने गोव्यात झालेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत भाग घेऊन दिग्गज लोकांचे आव्हान मोडून काढता पहिल्या दहात क्रमांक मिळवला. तो आणि हेमने अवघड समजल्या जाणाऱ्या सातारा हिल मॅरेथॉनमध्येही भाग घेतला. मायबोलीकर हर्पेनही त्यांच्यासोबत होता.
हेमने तर सायकलींग सोडून पूर्णपणे रनिंगला वाहून घेतले होते, ते म्हणजे त्याचा पूर्ण (४२ किमी) मॅरेथॉन धावण्याचा ध्यास. कठोर ट्रेनिंग आणि टप्प्याटप्प्याने प्रगती करत त्याने अखेर मुंबई मॅरोथॉनला आपले स्वप्न पूर्ण केलेच.
फिटनेसचा ध्यास घेतलेल्या आपटे काकांनी पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त ५० किमी पळून आपण आपल्या तारुण्याची झलक दाखवून दिली.
लान्सदादांनी मोहीमेच्या आधी केलेल्या बीआरएम्सची पदके आल्यानंतर त्यांच्या गळ्यात पडली
युडी काकांचा स्पीड कन्याकुमारीच्या तुलनेत खूपच वाढला असल्याचे सगळ्यांनाच जाणवले, आणि आता तेच सगळ्यांच्या मागे पुढची मोहीम ठरवा म्हणून लागले आहेत.
त्यामुळे आम्ही व्हॉट्सअप वर वेगवेगळ्या मोहीमा ठरवतोय आणि आगामी काळात एखादी अशीच मोहीम पार पाडून पुन्हा मायबोलीकरांच्या भेटीला येऊच..
तोपर्यंत सगळ्यांना सविनय नमस्कार
तुम्हा सगळ्यांच्या कौतुकामुळे, भरघोस प्रतिसादांमुळे जे मुठभर मांस अंगावर चढले आहे ते सत्कारणी लागेल अशी आशा.
ए भाऊसाहेब व्हॉट अ सिरीज,
ए भाऊसाहेब व्हॉट अ सिरीज, एकदम हंड्रेड पर्सेंट डिव्हाइन साला.
ए भाऊसाहेब तू एक काम कर ने ह्या लेखमालेचा पुस्तक बनव ने ?
आशु किती सुंदर वर्णन केलंयस
आशु किती सुंदर वर्णन केलंयस, तु सारसबागेत पोहोचताच आईला शोधत तिच्या मिठीत शिरल्याच्या वर्णानाने तर डोळे भरून आले एकदम.
आज दोन वर्षे झाली
आज दोन वर्षे झाली
आज चार वर्ष..............
आज चार वर्ष.............. फोतो दिसत नहिये
ठाण्याच्या लोकांपुढे
ठाण्याच्या लोकांपुढे पुणेकरांची बेपर्वा वृत्ती फारच जाणवत होती. कुणाला काय घेणेदेणेच नव्हते, सगळ्यांना नुसती पुढे जायची घाई, पार अगदी पॅनिअरला घासून पण जात होते, उलट आम्हीच काय ब्याद आहोत असे तुच्छ कटाक्ष टाकण्यासही कुणी कमी केले नाही. (एक पुणेकर म्हणून मला हे लिहीताना काय यातना होत असतील याची कल्पना नाही येणार कुणाला).>>>>>>>>
अगदी अगदी अगदी ह्याच भावना आल्या होत्या लहानपणापासून 25 वर्ष कल्याण मध्ये काढून पुण्यात आल्यावर
थोडे उद्धट वाटेल पण लिहितो
मनात साठून बसलेय
2 wheelers ना पुण्यात बिलकुल शिस्त नाहीये
लेन नावाचा प्रकार कोणीच पाळत नाही रस्त्यावर
एकदम सुरुवातीला पुण्यात आल्या वर फार त्रास झाला होता
बाईक चालवायची आता सवय झाली पण आज ही संध्याकाळी 5 ते 8.30 पर्यंत सिंहगड रोड ला कार काढायची म्हणजे चिडचिड होते
मुंबई मध्ये लेन ची शिस्त इथल्या तुलनेत फार फार better आहे
बाकी प्रवासवर्णन खूप मनात
बाकी प्रवासवर्णन खूप मनात बसलेय
अतिशय सुंदर लिहिलेय
पहिली कन्याकुमारी मोहीम
ही जम्मू मोहीम
कांचनजंगा ट्रेक
ओडिन चा धागा
सगळंच मस्तय
Pages