जम्मू ते पुणे सायकल मोहीम (भाग २१): मुक्काम पुणे

Submitted by आशुचँप on 10 March, 2017 - 05:52

http://www.maayboli.com/node/57854 - पूर्वार्ध १
http://www.maayboli.com/node/57861 - पूर्वार्ध २
http://www.maayboli.com/node/57936 - जम्मूत आगमन
http://www.maayboli.com/node/58021 - जम्मू (भाग ४)
http://www.maayboli.com/node/58148 - (भाग ५): पठाणकोट - निवांत सुरुवात
http://www.maayboli.com/node/58175 - (भाग ६): अमृतसर - लखलखते सुवर्णमंदीर
http://www.maayboli.com/node/58217 - (भाग ७): मुक्तसरसाहीब - कसोटीचा दिवस
http://www.maayboli.com/node/58684 - (भाग ८): हनुमानगढ - राजस्थानात प्रवेश
http://www.maayboli.com/node/60334 - (भाग 9): सरदारशहर - वालुकामय वेदना
http://www.maayboli.com/node/60392 - (भाग १०): डीडवाना- एक दुर्दैवी दिवस
http://www.maayboli.com/node/60472 - (भाग ११): अजमेर - चमत्कार झाला की हो
http://www.maayboli.com/node/60609 - (भाग १२): भिलवाडा - हजार किमी पार
http://www.maayboli.com/node/60780 - (भाग १३): नाथद्वारा - सुंदर अनुभव
http://www.maayboli.com/node/60844 - (भाग १४): खेरवारा - अरवलीचे आव्हान
http://www.maayboli.com/node/61826 - (भाग १५): मोडासा - एक दिवस विश्रांतीचा
http://www.maayboli.com/node/61845 - (भाग १६): बस्का (वडोदरा)- गुजरातमां स्वागत
http://www.maayboli.com/node/61860 - (भाग १७): अंकलेश्वर - नवे साथीदार, नवा उत्साह
http://www.maayboli.com/node/61878 - (भाग १८): वलसाड- गुजरातमधली खादाडी
http://www.maayboli.com/node/61889 - (भाग १९): वसई - उन्हाच्या तलखीत महाराष्ट्रात प्रवेश
http://www.maayboli.com/node/61917 - (भाग २०): मुंबईतले जंगी स्वागत
=======================================================================================

सकाळी उठलो तेव्हा छान फटफटले होते, पण आज काय टेन्शन नव्हतं, ९०च किमी होतं आणि एकदाचा का बोर घाट चढला की पुढे सगळा सरळ रस्ता होता. बोर घाटाचीच थोडी चिंता होती, कारण याआधी दोन्ही वेळा चांगलेच घामटे काढले होते, त्यामुळे दहा-बारा किलोचे पॅनिअर लादून तो घाट चढणे म्हणजे कसोटी होती.

त्यामुळे मामांनी कार काढताना विचारले की कुणाची पॅनिअर्स न्यायची आहेत का, पण कौतुकाची गोष्ट म्हणजे एकानेही त्यांच्याकडे पॅनिअर्स सोपवली नाहीत, इतके हजारो किमी आलोय ते घेऊन, आता थोडक्यासाठी कुठे असाच सगळ्यांचा सूर होता. त्यामुळे आम्ही बाणेदारपणे मामांना सांगितले आता सायकली पॅनिअरसकट घरी जाणार. त्यांनाही ते आवडलेच.

दरम्यान, एक गंमत म्हणजे, रोज आम्ही हेम सरांच्या मार्गदर्शनाखाली असे गोल करून स्ट्रेचिंग आणि वॉर्म अप करायचो, त्याचे शूटींग करावे अशी इच्छा ओबीला झाली आणि त्याने सायकलवरचा गो प्रो सुरु करून वर्तुळात सामिल झाला. माझा एक डोळा त्यावर होता आणि कॅमेराकडे आपली पाठ नको यायला म्हणून मी चक्क त्याच्या सायकलकडे तोंड करून व्यायाम करायला लागलो. सगळे आपल्याकडे बघून व्यायाम करतायत आणि मीच एकटा भलतीकडे तोंड करून व्यायाम करताना पाहून हेम पण कन्फुज झाला, शेवटी हसत हसत ओबीनेच त्यामागचे गुपीत फोडले.

अशा गंमती गमतीतच निघालो आणि बघता बघता बोर घाटापाशी येऊन ठेपलोही. आता इथून सगळा रस्ता माहीतीचा होता, आधीच्या रस्त्यासारखे कसलेही सरप्राईजेस नव्हती.

दोन वेळेला घाट केल्यामुळे काय करायचे हे गणित मनात पक्के होते त्याप्रमाणे लोएस्ट गियरवर १-१ सायकल टाकली, हेडफोन कानात कोंबले आणि सकाळी सकाळी समाजसेविका सन्नीताई यांचे जगाबद्दल गहन विचार असलेले गाणे ऐकत पॅडल मारायला सुरुवात केली. हळूहळू एक एक करत सगळे पुढे निघून गेले, हेम थोडा वेळ मागे होता पण तोही एका वळणावर ओव्हरटेक करून गेला. मला कसलीही चिंता नव्हती कारण एकदाही न थांबता, न पाय टेकता घाट पार करण्याचे उद्दीष्ट होते, त्यानुसार मस्त आजूबाजूची हिरवाई, मधून मधून येणारी गार हवेची झुळुक एन्जॉय करत एक एक पॅडल मारत चढ चक्रांकात करत राहीलो. उन्हे तापायची होती त्यामुळे जरी श्वास फुलला तरी घामटे काढले नव्हते, आणि वाटेत बाहुबली पॉइंट (हे आम्हीच ठेवलेले नाव आहे...अधिक माहीतीसाठी भेटा अथवा लिहा) पाशीही न थांबता पुढे सरकलो आणि थेट माथ्यावर जाऊनच थांबलो.

...

श्वास गरम झाले होते, अंग तापले होते, छातीचा भाता धपापत होता पण गड जिंकून आल्याचा आनंद खूप जास्त होता, आणि पुढे राजमाची पॉइटला जाणारा तीव्र चढ अजून बाकी असल्याने बॉडी कूल व्हायच्या आधीच पुढे निघालो. अर्ध्या एक तासातच खंडाळा पार करून लोणावळा गाठलेही. वाटेत जीवाचा खंडाळा-लोणावळा करायला आलेले पर्यटक, इतक्या पहाटेही कठड्यावर बसून गुलुगुलु करणारी कपल्स, शाळेला जाणारी मुले-मुली, दुकानदार, टोपल्यात कैरी, काकड्या, पेरू तत्सम विकत कडेला बसलेल्या बायका आणि चार पायावर हुंदडत असलेले पूर्वज आमच्याकडे टकाटका बघत होते, त्यामुळे अजूनच भारी वाटत होते.

मनशक्ती गाठले तेव्हा ओबी दिसला, त्याने एक टर्न वेगळा घेतल्यामुळे जुन्या हायवेऐवजी तो एकदम एक्प्रेस हायवेला गेला आणि तिथून वळता न आल्यामुळे तसाच लोणावळ्यापर्यंत आला. त्यामुळे आम्हाला त्याला चिडवायला संधी मिळालीच. तु घाट काय पूर्ण केला नाही, एक्सप्रेसवे वरून यायला काय मज्जा, तुझी राईड आता अर्धवटच काऊंट होणार इ.इ. अर्थात त्याने काय दाद दिली नाही ही गोष्ट वेगळी.

दहा वाजताच मनशक्ती गाठल्यामुळे आणि घाट चढून आल्याने कडकडून भूक लागलेलीच. त्यामुळे भरपेट हादडले आणि पुन्हा सायकलवर स्वार झालो. आता काय कामशेत प्राईम सोडले तर सगळा सरळ रस्ता आणि अनेकदा तुडवलेला. सुसाट गँगसाठी एकदम मख्खन, त्यामुळे ते सुटलेच, पण बाकीचेही त्यांना धरुन धरून जात रोहीलो. वेदांगचा भक्कम ड्राफ्टचा फायदा घेत मी, पाठोपाठ हेम, काका असे सगळे लांब शेपूट करून जात राहीलो. त्यामुळे हाहा म्हणता कामशेत पार करून बाराच्या सुमारास वडगावला येऊन ठेपलोही.

तिथे एक भारी सरप्राईज होते, लान्सचे काका महिंद्र हसबनीस तिथे राहतात, त्यांची मोठी डेअरी आहे. त्यांनी सगळ्यांना आग्रह करून घरी नेले. आणि एका भन्नाट व्यक्तिमत्वाची ओळख झाली. मुळात ते लान्सचे काका यावरच विश्वास बसत नव्हता. लान्स कसा एकदम सात्विक, सोज्वळ, मितभाषी. आमच्या दहा वाक्याला त्याचे एक असा हिशेब. या उलट त्याचे काका, एकदम गडगडाटी आवाजात सगळ्यांचे स्वागत केले आणि प्रत्येकाच्या व्यवसायाबद्दल विचारून प्रत्येकाला बोलते केले. त्यांना सगळ्याच विषयात गती होती आणि मिश्किल प्रश्न विचारून एकेकाची फिरकी घेत होते. एरवी बोलण्यात कुणाला न ऐकणाऱ्या ओबीलाही त्यांनी मात दिली. गप्पांसोबत खायला आले आणि पाठोपाठ तुडुंब भरून दाट, निरसे, चविष्ट दुधाचे प्याले. ते संपवता संपवता दमछाक झाली.

दरम्यान, मनशक्तीनंतर हेमचे फोन सुरु झाल्याने तो मागे पडला. नंतर जोर लावून त्याने काकांना गाठलं. तळेगांवला त्याचा भाऊ हायवेजवळच आहे रहायला, पण तो होता मुंबईत. त्याने फोन करुन सांगितलं की आई तळेगांवलाच आलेली आहे, घरी जाऊन ये. मग तो आणि काका घरी गेले, तिकडे दोघांनाही औक्षण वगैरे केलं. पण यात त्यांनी लान्सच्या काकांची भेट मिस केली.

तोवर एक वाजून गेला आणि उन्हे तापायला सुरुवात झालेली. आणि वैताग यायला लागलेला. हे पुरेसे वाटले नाही म्हणून का काय ओबीची सायकल पंक्चर झाली. त्या अडनिड्या वेळी झालेल्या पंक्चरमुळे तोही वैतागला, पण करतो काय. कसेतरी पंक्चर काढले, पाच मिनिट झाले आणि परत पंक्चर. तो तर इतका हैराण झाला म्हणे, आता अजून एक पंक्चर झाले तर हातात सायकल घेऊन घरी चालत जाईन पण टेंपो करणार नाही.

ते बहुदा ऐकले असावे त्याच्या सायकलने कारण त्यानंतर मग तिने काही त्रास दिला नाही.

पण या सगळ्या व्यत्ययात खूप वेळ गेला, तोवर घरच्यांचे फोनावर फोन, कधी पोचताय. त्यांची तिकडे स्वागताची तयारी सुरु झाल्याचे कळत होते. पण काय इलाजही नव्हता. दोन अडीचच्या सुमारास पिंपरीतील डांगे चौक पार केला, तेव्हा मायबोलीकर मल्लीचा फोन. मी येतोय भेटायला. मल्लीने आम्ही कन्याकुमारीला गेलेलो असतानाही आणि आत्ताही माबोवर आमच्या प्रवासाचे अपडेट टाकण्याचे अतिशय मोठे काम केले होते. तो आमचा आणि माबोचा दुवाच होता म्हणा ना. त्यामुळे त्याला भेटणे चुकवणे शक्यच नव्हते. आणि त्या तळपत्या उन्हात आमची भरतभेट पार पडली.

सगळे आता पोचायला उत्सुक असल्याने फारसा वेळ न घालवता त्याचा निरोप घेतला आणि पुढे सरकलो. पण आता सगळेच मागे पुढे असे विखुरले गेलो होतो. तीनच्या सुमारास पुणे विद्यापाठापाशी पोचलो तेव्हा प्रचंड ट्रॅफिक. तापलेल्या उन्हात त्या ट्रॅफिकमधून चालवायचा वैताग वेगळाच होता. ठाण्याच्या लोकांपुढे पुणेकरांची बेपर्वा वृत्ती फारच जाणवत होती. कुणाला काय घेणेदेणेच नव्हते, सगळ्यांना नुसती पुढे जायची घाई, पार अगदी पॅनिअरला घासून पण जात होते, उलट आम्हीच काय ब्याद आहोत असे तुच्छ कटाक्ष टाकण्यासही कुणी कमी केले नाही. (एक पुणेकर म्हणून मला हे लिहीताना काय यातना होत असतील याची कल्पना नाही येणार कुणाला).

अधून मधून कुठेतरी जर्सी दिसली की तीला फॉलो करत कसे तरी निलायमच्या ब्रीजपाशी पोचलो तेव्हा चार वाजून गेले होते. एक मात्र चांगले झाले, तिथे एक रॅलींग पॉईंट ठरवल्यामुळे सगळ्यांनी एकत्रच सारसबागेत पोचायचा उद्देश सफल झाला.

नेमके त्या दिवशी होती माघी गणेश जयंती आणि सगळ्यांचे नातेवाईक तिथे केव्हाचे ताटकळत उभे असल्याने त्या चौकात प्रचंड गर्दी झालेली. काही उत्साही पुणेकरांनी तबक, औक्षणाचे सामान पाहून कुठली पालखी येणार आहे का असेही विचारले म्हणे.

झाले आता शेवटची पाच मिनिटे आणि आम्ही एक वळण घेऊन त्या घोळक्यात सामिल झालो आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. अखेर आम्ही जम्मुचे रघुनाथ मंदिर ते पुण्याचे सारसबाग असा २२०० किमी चा प्रवास कसलेही विघ्न न येता पार पाडला होता. कित्येक अडचणी आल्या, दुखापती झाल्या, दमछाक झाली, भांडणे झाली, कुरबुरी झाल्या, हसलो, रडलो, रक्त वाहले, घामाच्या तर धारा, पाय आणि पोटऱ्या रोजच्या टॉर्चरनंतरही शाबूत होत्या आणि त्यावरच्या तटतटलेल्या शीरा सगळ्या प्रवासाची कहाणी सांगत होत्या.

माझे डोळे त्या गर्दीत आईला शोधत होते आणि ती दिसताच मी सायकल सोडून लहान मुलासारखी तिच्याकडे धाव घेतली आणि तिच्या मायेच्या मिठीत विरघळलो. तिचे कढत अश्रू माझा खांदा भिजवत होते आणि मी सगळा त्रास, दुख, वेदना, राग, चिडचिड सगळे काही विसरलो. तिचे आशिर्वादासारखे अभिषेक करणारे डोळ्यातले पाणी सगळे वाहून नेत होते आणि खऱ्या अर्थाने मोहीमेची सांगता झाली होती.

त्यानंतर होता तो नुसता आनंद सोहळा. सगळ्यांनी गळाभेट घेऊन अभिनंदन केले, औक्षण झाले, लोक नुसते फोटोवर फोटो काढत होते की सेलिब्रिटी असल्याचा भास होत होता. इतक्या उन्हात पण सगळे जण कौतुक करायला आवर्जून आले होते, कुणा-कुणाची नावे घ्यावी. सगळेच आपले. ज्यातर्फे आम्हाला मेरीडाची जर्सी आणि शॉर्ट्स स्पॉन्सर झाले होते तो प्रो बाईकचा प्रसाद शाळीग्राम तर आम्हाला लोणावळ्याला भेटायला आलेला सायकलवरून आणि तिथून तो पुण्याला आला आमच्या सोबत

...

...

मायबोलीकर पवन आम्हाला कन्याकुमारीला जाताना सारसबागेपाशी भेटायला आला होता, आणि आज जम्महून आल्यावरही.

हेम म्हणला, बायकोच्या चेहऱ्यावर आम्हांला सुखरुप पाहून, २२०० किमी लांब सोडलेला नि:श्वास स्पष्ट जाणवला.
त्याची एक गंमतच होती. त्याच्या मुलीचा होता वाढदिवस, त्यामुळे तिला तो त्यादिवशी नाशिकला हवा होता, पण मामांनी आग्रह केल्यामुळे त्याने पुण्यालाच मोहीम पूर्ण केली.

कारण त्याच दिवशी संध्याकाळी सगळ्यांसाठी श्रमपरिहाराची पार्टी ठरली होती आणि मग तिथेच शर्वरीचा, हेमच्या मुलीचा वाढदिवस साजरा करायचे ठरले होते. आता तोही आमच्या मोठ्या कुटुंबाचा भाग होता. त्यामुळे त्याला सोडलेच नाही.

तिथून जातानाही मी कारमधून पॅनिअर्स पाठवले नाहीत, म्हणलं, घरी याच अवतारात येणार. हेम आणि घाटपांडे काकांना तर तिथून कात्रजला त्यांचे घर गाठायचे होते. त्यामुळे हेम म्हणाला, सायकल गाडीत टाकून आरामात जाऊ घरी.. तर काकांनी स्पष्ट नकार दिला व म्हणाले चल चालवत. एवढं चालवलंय तर साताठ किमी ने कांय होणारे? तिथून धनकवडीपर्यंत काकांनी त्या चढावर चालवायला लावून त्याला घरापर्यंत पोहोचवून मग कात्रजला त्यांच्या घरी गेले.. मोहिमेत सगळ्यांची पाठराखण करणाऱ्या काकांनी घरीही सर्वात शेवटी जाण्याचा शिरस्ता राखला.

रात्रीची पार्टीही भन्नाट झाली. आधी सगळ्यांच्या घरच्यांनी पंजाबी हॉटेलमध्ये गेट टु गेदरचा बेत आखला होता, पण आम्ही प्रवासभर पंजाबीच खात असल्याने तो आम्ही तातडीने मोडीत काढला आणि चक्क महाराष्ट्रीयन भाकरी-भाजी मिळेल अशा ठिकाणी गेलो.

आमच्या घरच्यांनी सगळ्यांना एक छानशी भेट दिली, सगळ्यांना संग्रही ठेवण्यासाठी मग्ज. आणि मला त्यांच्याकडून मिळालेली भेट तर अगदीच भन्नाट.

पुढे काय

मोहीम संपली पण त्याची झिंग अद्याप उतरलेली नाहीये. आणि खरे सांगायचे तर आम्ही फार काही अदिव्तीय केल्यासारखे काही वाटत नव्हते पण लोकांना प्रचंड उत्साह होता. त्या मोहीमेबद्दल ऐकायला, फोटो बघायला आणि आमचे कौतुक करायला त्यांना विशेष आनंद होत होता.

विशेष म्हणजे पुणे महानगरपालिकेनेही आमचा खास सत्कार केला. महापौरांनी विशेष मानचिन्ह आणि गौरवपत्रक दिले.


...

तिकडे हेमचाही नाशिकच्या महापौरांच्या हस्ते सत्कार झाला.

ज्या चक्रम हायकर्सच्या सदस्यांनी आमचे ठाण्यात भरघोस स्वागत केले होते त्यांनी त्यांच्या सभासदांसाठी आमचे एक खास प्रेझंटेशन ठरवले. आणि आमच्यात मामा, घाटपांडे काका, शिरिष, युडी, ओबी यांनी पुणे ते ठाणे सायकल ने जाऊन त्यांना आश्चर्याचा धक्का दिला.

पुढे पुण्यातही फोलीएज संस्थेने ट्रॅव्हल कट्टा कार्यक्रमात आम्हाला खास आमंत्रण दिले आणि उत्साही पुणेकरांनी चांगला प्रतिसाद देऊन हुरुप वाढवला.

...

मोहीमा

मी आल्यानंतर डॉक्टरांना पाय दाखवला तर त्यांनी लिगामेंट रॅप्चर असल्याचा निर्वाळा दिला आणि तीन महिने कसलीही अॅक्टिव्हीटी करण्यावर निर्बंध घातले. तरी नंतर सगळ्यांसोबत पावसाळ्यात पुणे अलीबाग पुणे अशी राईड केलीच.

आणि हक्काचे ठिकाण असलेल्या रुपाली च्या वाऱ्या सुरुच होत्या

दरम्यान मामांनी सगळे आपापल्या व्यापात व्यस्त असल्याने एकट्यानेच सायकलवरून नर्मदा परिक्रमा करण्याचा घाट घातला आणि या जानेवारीत त्यांनी तो यशस्वीरित्या पूर्ण केलाही. विशेष म्हणजे, त्यांच्या मुलाने वेदांगनेही नर्मदा परिक्रमेचा ध्यास घेतला आणि तो सध्या चालत ती पूर्ण करत आहे.

अद्भुत बाप लेक. दोघेही परिक्रमेदरम्यान भेटले तेव्हा. एक सायकलवरून आणि एक चालत असे एकटे एकटे. त्या दोघांना परवानगी देणाऱ्या मामींना साष्टांग नमस्कार

घाटपांडे काकांनी मोठी मोहीम अशी केली नाही पण दररोजची प्रॅक्टिस राईड आजही न कंटाळता सुरु आहे. बाकी कुणी येवो ना येवो, घाटपांडे काका, आपटे काका, अतुल हे सकाळी साडेसहा वाजता सारसबागेपाशी दिसणार म्हणजे दिसणारच.

सुह्द अमेरिकेला रवाना झाला आणि तिथे सायकल विकत घेऊन आपली हौस भागवत आहे.

तर ओबीने गोव्यात झालेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत भाग घेऊन दिग्गज लोकांचे आव्हान मोडून काढता पहिल्या दहात क्रमांक मिळवला. तो आणि हेमने अवघड समजल्या जाणाऱ्या सातारा हिल मॅरेथॉनमध्येही भाग घेतला. मायबोलीकर हर्पेनही त्यांच्यासोबत होता.

हेमने तर सायकलींग सोडून पूर्णपणे रनिंगला वाहून घेतले होते, ते म्हणजे त्याचा पूर्ण (४२ किमी) मॅरेथॉन धावण्याचा ध्यास. कठोर ट्रेनिंग आणि टप्प्याटप्प्याने प्रगती करत त्याने अखेर मुंबई मॅरोथॉनला आपले स्वप्न पूर्ण केलेच.

फिटनेसचा ध्यास घेतलेल्या आपटे काकांनी पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त ५० किमी पळून आपण आपल्या तारुण्याची झलक दाखवून दिली.

लान्सदादांनी मोहीमेच्या आधी केलेल्या बीआरएम्सची पदके आल्यानंतर त्यांच्या गळ्यात पडली

युडी काकांचा स्पीड कन्याकुमारीच्या तुलनेत खूपच वाढला असल्याचे सगळ्यांनाच जाणवले, आणि आता तेच सगळ्यांच्या मागे पुढची मोहीम ठरवा म्हणून लागले आहेत.
त्यामुळे आम्ही व्हॉट्सअप वर वेगवेगळ्या मोहीमा ठरवतोय आणि आगामी काळात एखादी अशीच मोहीम पार पाडून पुन्हा मायबोलीकरांच्या भेटीला येऊच..

तोपर्यंत सगळ्यांना सविनय नमस्कार

तुम्हा सगळ्यांच्या कौतुकामुळे, भरघोस प्रतिसादांमुळे जे मुठभर मांस अंगावर चढले आहे ते सत्कारणी लागेल अशी आशा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघून असं नाही वाटत तुम्ही लोक जम्मू पासून सायकल चालवत आलात, जराही थकवा किंवा त्रास दिसत नाही उलट आपली मोहीम पूर्ण झाल्याचा आनंद ओसंडून वाहतोय, मायबोलीवर आला कि पुढचा भाग आली कि नाही हे शोधात होतो ते आत्ता चुकल्यासारखं होईल.

छान आहेत सगळे फोटो आणि लिखाण सुद्धा शेवट फार आवडला, मोहीम फत्ते करून सगळे आपापल्या कामाला लागले. पुढच्या मोहिमेसाठी खूप खूप शुभेच्छा लवकर, अशीच मेजवानी मिळो आम्हाला, आणि तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीला पुन्हा एकदा सलाम. Happy

बापू आता कसं समाधान वाटलं,
बुलेटवर परिक्रमा करणार असाल तर आमची आठवण काढा, मला यायाला आवडेल

धन्यवाद सर्वांना

सपना हरिनामे - तुमचे खास कौतुक, दोन दिवसात आख्खी मालिका वाचून काढलीत आणि प्रत्येक भागाबद्दल लिहीलेतही...खूप छान वाटले

मित - बघुया कसं काय योग येतो ते

बापू आता कसं समाधान वाटलं,
बुलेटवर परिक्रमा करणार असाल तर आमची आठवण काढा, मला यायाला आवडेल

कच्चा आराखडा काढायला वेळ मिळेल का आशुभाऊ थोडा? मिळाल्यास लैच जबऱ्या होईल, दिवसाला १५० किमी फक्त (मैय्याचे अस्तित्व सुद्धा तर अनुभवायचे आहे ना!!) , टोटल किती किमी बसतील अन किती दिवस होतील , रूट काय असेल, ह्याचे अगदी कच्चे स्वरूप जर निघाले तर कळवा. बघू काय साधते ते.

(डोक्यात किडा सोडणे क्रिया समाप्त)

बाप्या

ह्रदयस्पर्शी शेवट. मस्त लिहिता तुम्ही आशुचँप.
कन्याकुमारी आणि जम्मु - पुणे या दोन्ही राइड्सची ही वर्णनं म्हणजे मायबोलीवरचा सुंदर ठेवा बनला आहे.

बाबुभाईचा ट्रायथलॉन फोटो एकदम cool...

मस्त झालीय मालिका आशुचॅम्प . प्रत्येक भागावर प्रतिसाद लिहिला नाहीये तरी मस्त झालीय मालिका . परत दुसरी मोहीम केलीत तर नक्की लिहा मोबो वर .

आशुचॅंप
माझं कसलं कौतुक ! मी फक्त वाचक आहे. खरं कौतुक तुम्हा सर्व जिद्दी लोकांचं आहे. खरं सांगायचं तर शब्दात नाही मांडता आलं. जिथे हे लिहायला देखील वेळ लागला असेल तिथे संपूर्ण मोहीम पार पाडण्यासाठी किती कष्ट पडले असतील, तयारीसाठी किती मेहनत घेतली गेली असेल ...

बरेच प्रश्न आहेत. सायकलविषयी, फिटनेसविषयी, सुरूवात करण्याविषयी इत्यादी इत्यादी. नवीन धागा लिहीणार असाल तर आभारी राहीन.

आशुचँप, काय भारी लोक आहात तुम्ही! एवढा मोठ्ठा प्रवास पुर्ण केल्याबद्दल अभिनंदन.
पुर्ण सिरीज वाचायला खुप मजा आली. प्रत्येक भागावर प्रतिक्रिया लिहिली नाही तरी प्रत्येकच भाग आवडला. आता नवीन मोहिम कधी आणि कुठे?

वा! काय रोमांचक मोहीम केलीत रे! आणि तू ते सगळं तितक्याच रंजक पद्धतीनं लिहून पोचवतोस.
वर्णनात सगळे रंग असतात. सोबतीला फोटो असल्यामुळे आणखी भारी वाटतं वाचताना.

तुम्हा सगळ्यांना पुढच्या मोहिमेला मनापासून शुभेच्छा Happy

धन्यवाद, सई, नताशा, मनीमोहोर, फोतोग्राफेर२४३

http://www.maayboli.com/node/42915

सपना - असा धागा आधीच काढला आहे, प्रत्येक भागाच्या शेवटी पुढच्या भागाची लिंक आहे. शक्यतो सर्वसामान्य प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे, काही प्रतिसादांमध्येही आहेत. त्याही व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर खुशाल विचारा. नक्कीच मदत करायला आवडेल.

सायकल कम्युनिटी वाढण्यासारखा दुसरा आनंद नाही

अतिशय सुंदर वर्णन!!!
माझे डोळे त्या गर्दीत आईला शोधत होते आणि ती दिसताच मी सायकल सोडून लहान मुलासारखी तिच्याकडे धाव घेतली आणि तिच्या मायेच्या मिठीत विरघळलो. तिचे कढत अश्रू माझा खांदा भिजवत होते आणि मी सगळा त्रास, दुख, वेदना, राग, चिडचिड सगळे काही विसरलो. तिचे आशिर्वादासारखे अभिषेक करणारे डोळ्यातले पाणी सगळे वाहून नेत होते आणि खऱ्या अर्थाने मोहीमेची सांगता झाली होती. >>>+११११
सगळे भाग वाचले. मस्त आहेत.

कसला जबरी अनुभव आहे रे.... Happy
पण तो घ्यायला आधी तितकेच कष्ट/जिगर्/चिकाटी/निश्चय आहे.... त्या निश्चयाला सलाम. Happy
सगळ्या टीम मेम्बर्सच्या पुढच्या कहाण्या देखिल झकास...

चँप, मायबोलीवर वाचलेल्या लेखमालिकांपैकी ही आणि पुणे-कन्याकुमारी या दोन सीरीज, one of the best आहेत.

प्रत्यक्ष मोहिमेबद्दल सांगायचं तर तुझ्या शारिरिक आणि मानसिक क्षमतेला सॅल्युट! हे काही साधं काम नाही!

आणि शेवटी लिखाणाबद्दल सांगायचं तर, तू आमच्यासाठी एक मोलाचा ठेवा निर्माण करून ठेवला आहेस. पुढे केव्हाही मी जेव्हा down, sad feel करेन, किंवा कधी मला inspiration ची गरज वाटेल, अशावेळी ते मिळवण्याचे दोन उपाय माझ्यापाशी आता आहेत - ही आणि कन्याकुमारी ची लेखमाला. एवढंच नव्हे, तर पुन्हापुन्हा वाचावं अशा कॅटॅगरीमध्ये ह्या दोन्ही लेखमाला गेल्या आहेत. अतिशय प्रामाणिकपणे लिहिले आहेस. त्या प्रामाणिकपणाला सलाम. "रोजच्या त्याच त्या जगण्यातून काहीतरी वेगळं करण्याची ही जिद्द आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे." (I know हे फार घिसंपीटं छापील वाक्य झालंय). पण 'कन्याकुमारी-पुणे' आणि 'पुणे-जम्मू' वाचताना किती वेळा भरून आलं आणि किती वेळा 'आत्ताच्या आत्ता उठावं आणि असं लांब कुठेतरी भटकून यावं' असं वाटलं असेल ते देवच जाणे! हे असं वाटणं हे तुझ्या लिखाणाचं माझ्यासाठी तरी मोठं श्रेय आहे. गेल्या एप्रिलपासून 'दर महिन्याला एक भटकंती' ह्या निश्चय प्रत्यक्षात आणणं मला जमलंय त्यात तुझ्या ह्या दोन्ही लेखमालांचा वाटा आहे. त्याबद्दल अजून एकदा thanks... भरपूर फिर, भरपूर लिहित रहा.

शुभेच्छा! Happy

________________________________/ \________________________________

तुम्हा सर्वाना

बस अजून काहि नाही लिहीत

आहे चांगली, हे आम्हाला महापालिकेचा पुरस्कार मिळालेला तेव्हाही त्यांच्याशी चर्चा झालेली या विषयावर. यात प्रॅक्टिकल अडचणी प्रचंड आहेत.

१. सायकल ट्रॅक होणे आणि ते वापरले जाणे हे दिवास्वप्न आहे. आपल्याकडे लोकांना चालायला जागा नाही, गाड्यांना जायला जागा नाही. आहे तेच रस्ते गाड्यांच्या गर्दीने ओसंडून वाहतायत. रिकामा फुटपाथ दिसला तर त्यावर फेरीवाले कबजा करतात. त्यामुळे वेगळा सायकल ट्रॅक केवळ अशक्य आहे.

२. सायकलींची देखभाल, पंक्चर किवा अन्य बिघाड झाल्यास त्यावरची उपाययोजना काय असणार यावर एकमत होणे अशक्य. त्याचे पार्टस बदलणे, किंवा चोरीला जाऊ नये म्हणून काय यासरख्या अनेक बारक्या गोष्टी

३. योग्य देखभालीविना त्या सायकली खटारा होणार आणि सायकलची आवड असलेली लोक सुद्धा त्या चालवायला तयार होणार नाहीत. प्रत्येक माणसाची उंची, वजन यानुसार सायकलची फ्रेम, सीटची उंची वेगळी असली पाहिजे. आपल्याला पाहिजे ती सायकल मिळणे अवघड, मिळाली तर ती नीट चालवता नाही आली तर बोबला.

त्यामुळे या योजनेवर कुणी काम करत असेल तर त्यांना सायकल ट्रॅकप्रमाणेच त्याचा बोऱ्या वाजवून पैसे खायचे आहेत, असे माझे ठाम मत आहे. ही योजना पुण्यात अव्यवहार्य आहे.

या पेक्षा जॉगींग ट्रॅक सारखे सायकल ट्रॅक विकसीत करावेत. तिथे लहान मुलांनाही वापरता येतील अशा सायकली तासाच्या हिशेबात भाड्यावर द्याव्यात. एक-दोन किमीच्या ट्रॅकमध्येच फिरत असल्याने लक्ष ठेवायलाही सोपे. माझा मुलगाही सायकल शिकतोय, पण मला त्याला रस्त्यावरच्या भरधाव जाणाऱ्या गाड्यांच्या बाजूला सोडू शकत नाही. त्यामुळे माझ्यासारखे अनेक पालक तिथे येऊन मुलांसोबत सायकलींगचा आनंद घेतील, नव्याने सायकल शिकणारे, अगदी पन्नाशीच्या महिला ज्यांना रस्त्यावर चालवायची भीती आहे असे सगळे तिथे येऊन सायकलींग करू शकतील.

याच माध्यमातून सायकलींग जास्त प्रमोट होणार आहे.

खरंच की! विश्रांतवाडीत तर न चुकता मोटरसायकल वाले पदपथावर गाडी चालवायचे. ५ वर्षांपूर्वी.
सायकल ट्रॅक विषयी ते काय म्हणाले होते? (उगीच उत्सुकता)

सायकल ट्रॅकचे त्यांनी सांगितले की ते वरून ऑर्डर आली म्हणून लोकांनी कसेतरी करून ते ट्रॅक बोकांडी मारले. त्यामागे कसलेही प्लॅनींग नव्हते, सर्वे केला नव्हता की कुठल्या भागात जास्त आवश्यकता आहे. फंड मंजूर झालेला म्हणून केले आणि जाहीरात मोठी की सायकल ट्रॅक देणारे शहर वगैरे.

प्रत्यक्षात त्या ट्रॅकचा दहा टक्केही वापर कधी झाला नाही.

हे सर्व ऑफ द रेकॉर्ड होते, त्यामुळे त्याने मनमोकळेपणे सांगितले.

मलाही अनुभव आहेच की, मी सिंहगड रोडवरच्या सायकल ट्रॅकवरून जाताना एक बाई मध्ये आल्या म्हणून त्यांना बाजू व्हा म्हणलं तर त्या इतक्या भडकल्या. रस्त्यावरून पण जाऊ देत नाही फुटपाथवरून पण नाही. असल्या जळजळीत नजरेने त्यांनी पाहिले की हा सायकल ट्रॅक आहे, फुटपाथ नाही हे बोलण घशातच राहील

मस्तच झाली ही पूर्ण मालिका. मला तर मोहिमेनंतरचे अपडेट्सही फार आवडले. कीप इट अप >> +१

आशु.. मेळाव्यात तुमच्या सायकल वारीच्या अनुभव कथनाची record केलेली MP3 जमल्यास इथे टाक.

Pages