पुढचे अनेक दिवस असेच सरले. कुणीच कुणाचा रुसवा काढायला आलं नाही की गेलं नाही. मुक्ताने एक दोनदा मेसेज केले होते केदार आणि नितिनलाही पण त्याच्यावर कुणाचंच उत्तर आलं नव्हतं. ज्याला त्याला विचार करायला वेळ दिला पाहिजे आणि आपणही घेतला पाहिजे हे मुक्ताला कळत होतंच. ऑफिस तर चालूच होतं.
असेच एक दिवस जेवताना पूनमने तिला विचारलं,"काय गं किती दिवस अशी गप्प राहणार आहेस? काही सांगत पण नाहीस. "
ती बोलत असतानाच मुक्ताने आपल्या डब्यातली भाजी पूनमला वाढली. ते पाहून पूनम पुढे म्हणाली,"हे बघ मला नुसतं असं खायला घालून मी शांत होणार नाहीये. तुझं काय चाललंय ते सांगशील का?"
शेवटी मुक्ता बोलायला लागली,"अगं खरं सांगायचं तर भांडण असं कुणाचंच कुणाशीच झालं नाहीये पण प्रत्येकाला माहितेय काय घडलं आहे ते. मला कळलंच नाही कधी त्याच्यात जीव अडकला. नसते उद्योग. कुठे एकदाचं माझं काम मार्गी लागत होतं तर मधेच दुसरंच काहीतरी उद्भवलं. "
पूनम,"मग तुला केदारशी लग्न करायचं नाहीये का? तसं त्याला क्लिअर सांगून टाक ना? आता त्याच्याशी संबंध ठेवायचेच नाहीत तर मग हॉटेलच्या कर्जाचंही बघ बाई. आणि असंही तुम्ही एकत्र काम कसं करू शकणार आहे हे सर्व झाल्यावर?"
मुक्ता वैतागली,"पूनम अगं केवळ, लग्न आणि हॉटेल हाच मुद्दा नाहीये. आमची इतक्या वर्षाची मैत्री आहे ती अशीच तोडायची का? सगळा गोंधळ आहे नुसता. " तिने डबा बंद केला आणि पूनमच्या जेवणाची वाट बघत बसली.
"नितीनशी तरी बोललीस का? तो काय म्हणतोय?"पूनमने विचारलं.
"तो काय बोलणार? आमचं त्या दिवसानंतर काहीच बोलणं नाहीये. मुळात असेही आम्ही बोलत कुठे होतो जास्त?" तिने उपहासाने वाक्य टाकलं.
"जाऊ दे उगाच त्रास करून घेऊ नकोस, मी आहे ठीक आता." म्हणत मुक्ता उठलीच. पूणमलाही मग तिच्या सोबत निघावं लागलं.
मुक्ताचं मन आजकाल स्वयंपाकात रमत नव्हतं. त्यामुळे काहीतरी बनवून टाकायची ती आणि बाकी बराचसा वेळ विचार करण्यात. पण जित्याची खोड कशी जाणार? मन रमवण्यासाठी तिने मसाले बनवायला सुरुवात केली. धणे-जिऱ्याची पूड, गोडा मसाला, भरल्या वांग्यासाठी मिक्स ओला मसाला हे तिचं चालू झालं. मधेच तिने भाजणीसाठी डाळी, तांदूळ, ज्वारी सगळं धुवून भाजून घेतलं. धान्य भाजता भाजता ती केदारच्या प्रपोजलचा विचार करत होती आणि तिला एकदम काही आठवलं.
तिने केदारला फोन केला त्याने उचलला नाहीच.
मग मेसेज केला,"एकदा तरी बोलायला संधी देणार आहेस की नाही?"
यावर मात्र उत्तर आलं होतं,"बोल".
तिने मग त्याला परत कॉल लावला. यावेळी त्याने उचलला.
"मला तुला भेटायचं आहे. " तिने अधिकाराने सांगितलं.
"पण..." तो.
"पण-बीण काही नको. आपण काही लहान मुलं नाहीयेत हे असं कट्टी करून बसायला. तू येणार आहेस की नाही सांग? तुझ्यासाठी वेगळं काहीतरी बनवते."
त्याने नाराजीनेच 'हो' म्हणून सांगितलं.
तिने अधीरतेने त्याच्यासाठी पनीर मसाला आणि पुलाव बनवायला घेतला. तिच्या वागण्यात जरा चंचलता आली होती. तो आल्या आल्या तिने हसून दार उघडलं. त्याचा चेहरा अजून रुसलेलाच.
ती," काय रे काही लागलंय का?" त्याने नकाराने मान हलवली.
"मग इतका चेहरा पाडून का बसला आहेस? हास की?" तिने त्याला चिअर अप केलं.
"हे बघ केदार, तू ना मला कन्फ्युज केलंस. आणि हो, एक चूकही केली आहेस त्या दिवशी प्रपोज करताना.", ती बोलली.
त्याने वर पाहिलं.
"हे बघ तू मला आधी लग्नाचं विचारलंस आणि मग बिझनेस बद्दल. बरं, हे दोन्ही एकत्र तर केलंच शिवाय हेही म्हणालास की तुम्ही मुली फार सेंटी असता, उगाच इमोशनल होऊन बिझनेस करता. आणि आता तू काय करत आहेस? तुला सांगते, आपण हे बिझनेस आणि लग्नाचं एकत्र काढायलाच नको होतं."
"आणि नितीनसोबत चालेल?" त्याने कुत्सितपणे विचारलं.
"अरे थांब ना! मला बोलू दे. हे हॉटेल माझ्यासाठीच नाही तर तुझ्यासाठीही तितकंच महत्वाचं आहे, होय ना?" तिने विचारलं.
"हम्म..", तो.
"आणि माझ्या लक्षात आलं की आपण ते 'झालं तर दोन्ही नाहीतर काहीच नाही' असा विचार करून काहीच बोलत नाहीये. बरोबर ना?"
"ह्म्म्म" तो हुंकारला.
"म्हणजे बघ, जर फक्त लग्नाचा विषय असता तर आपण तेव्हाच बोलून मोकळे झालो असतो ना? पण तू तरी माझ्याशी भांडून, संबंध तोडलेस का? नाही ना? आणि बिझनेस असता केवळ तर जरा समजून-समजावून पुन्हा बोलून आपलं स्वप्नं पूर्ण केलं असतं. बरोबर की नाही? मला वाटतं, आपण सध्या लग्न हा विषय थोडा बाजूला ठेऊ, तुला काय वाटतं?"
"असा कसा बाजूला ठेवू मुक्ता?" त्याने चिडून विचारले.
"कसा म्हणजे? लग्न झालंय का आपलं? बोलू ना त्या विषयावर परत. पण आता ही भेळमिसळ नको असं मला वाटतं. मी जर अशी इमोशनल झाले असते तर तू म्हणाला असतंस की नाही मला? उगाच इमोशनल होऊ नको म्हणून? हे बघ थोडा विचार कर. माझ्याइतकंच तुझंही ते स्वप्न आहे. आपण आपली स्वप्नं अशी पूर्ण करायच्या वयात हे काय भांडण घेऊन बसलोय? दोन मुलं बिझनेस करतात तेंव्हा काही वाद झाले तर ते सोडवून पुन्हा एकत्र येतातच ना? आपणही असेच मित्र आहोत आधी आणि मग बाकी सर्व. हे बघ मी तुला उगाच काहीतरी सांगत नाहीये. लग्नाचा विषय नसता तर आपण बाकी कुठलंही भांडण सोडवलंच असतं ना? मग हेही तसंच समज. तू विचार कर, हवा तेव्हढा वेळ घे. आपण पुन्हा बोलू, पण हे असं उगाच न बोलता सोडून देणं मला काही पटत नाही. "
ती ताटं घेत असताना त्याने तिला थांबवलं, म्हणाला,"मी निघतो. नंतर जेऊ कधी एकत्र."
तिने 'बरं' म्हणून पटापट डबे काढले आणि त्याला सर्व नीट पॅक करून दिलं. तो तिचं इतकं नीटनेटकं पॅकिंग बघून हसला. तीही त्याला उमजून हसली आणि 'बाय' म्हणाली.
तो गेल्यावर तिच्यावर मोठ्ठ काम होतं. तिने गाडी बुक केली आणि नितीनच्या शेतावर जायला निघाली. दोन तासाचा प्रवास होता, कधी एकदा तिथे पोचतो असं तिला झालं होतं. तो तिथे असेल-नसेल माहित नाही, पण त्याला भेटणं गरजेचं होतं. शेतावर पोचल्यावर तिने तो कुठे आहे म्हणून एका पोराला विचारलं, त्याने सांगितलं तशी ती चालत राहिली. त्याने बोलवूनही आपण कधीच इथे आलो नव्हतो यावर तिला स्वतःचाच राग येत होता. कुठेतरी दूर तिला त्याची आकृती दिसली. इतक्या दिवसांनी त्याला पाहून उगाच भरून येईल म्हणून तिने दोन क्षण दूरच थांबून घेतलं.
त्याच्याजवळ आल्यावर तिने त्याला मोठ्ठ स्माईल दिलं, त्यानेही नाईलाजाने. आपले विचार, भावना आतमध्ये दाबून कशा ठेवायच्या हे त्याला चांगलंच माहित होतं. तिने त्याला 'कुठेतरी बसूया का?' विचारलं. तो तिला घेऊन बांधावरच्या उंबराच्या झाडाखाली आला. दोघेही थोडी मोकळी जागा पाहून बसले.
तिने त्याच्याकडे डोळेभरून पाहिलं आणि म्हणाली,"अख्खं आयुष्य संपलं ना तरी एक शब्द बोलला नसतास तू, ना माझ्याशी ना माझ्याबद्दल. बरोबर ना?"
तो मान खाली घालूनच बसलेला.
"त्यादिवशी तू पहिल्यांदा माझ्या हातचं जेवलास आणि मन तृप्त झालं. कुणीतरी असं माणूस आपलं असावं असं वाटलं. पुढे तुझं तुझ्या शेतांवरलं प्रेम, त्यासाठी घेतलेले कष्ट हे सर्व आवडत होतंच. त्यादिवशी तू भाज्या घेऊन आलास आणि जणू तुझ्यासोबतचं आख्खं आयुष्य डोळ्यासमोरून गेलं. पण तू निघून गेलास, केदारही चिडून गेला आणि वाटलं, किती ते नुकसान?"
"एक स्त्री म्हणून आपल्या माणसानं आपल्या हातचं जेवण पोटभरून खावं यासारखं सुख नाही. ते मला तुझ्यात दिसलं. पण मग केदारही माझा मित्र आहेच. त्यानेही मला खूप काही दिलंय, शिकवलंय. या एका सुखासाठी ते सर्व तोडायचं नव्हतं मला. आणि सर्वात महत्वाचं सांगू का? तू, मी, केदार आपण सगळे स्वप्नाळू लोक आहोत. तू तुझ्या शेतावर जितकं प्रेम करतोस तितकंच माझं माझ्या प्रत्येक पदार्थावर आहे आणि तितकंच केदारचं त्याच्या बिझनेसवर. मी विचार केला, आपल्या भावनांमध्ये आपल्या स्वप्नांना का आपण चिरडायचं? इतकी लहान थोडीच आहेत ती? वर्षानुवर्षे मनात जपलीत, त्याच्यासाठी इतके कष्ट घेतलेत. मग ते इतक्या सहज का सोडून द्यायचं? तुला तुझा हा शेतीचा व्यवसाय वाढवायचा आहे तसेच आम्हालाही हॉटेलचा. उगाच तीन पार्टनरमध्ये एक मुलगी आहे म्हणून सगळे घोळ का? आपल्याला इतके परफेक्ट पार्टनर कुठेच मिळणार नाहीत. मग ते सोडून, आपलं इतकं मोठं नुकसान का करून घ्यायचं? आणि जेवायचंच म्हणशील तर एकदा हॉटेल सुरु झाले की तू एकदा काय रोज येऊन जेवलास तरी चालेल. होय ना?"
त्याने वर पाहिलं, तिच्या डोळ्यातलं पाणी आणि ओठांवरच हसू दोन वेगळ्या गोष्टी करत होतं. ती बोलतच राहिली,"नितीन, मला सध्या या कुठल्याच भावनांमध्ये अडकायचं नाहीये. मी माझं स्वप्न इतक्या सहज हातचं नाही जाऊ देणार. तुला खरंच योग्य वाटलं तर अजूनही आपण तसेच पार्टनर राहू जसं आधी ठरलं होतं. पुढच्या आठवड्यात हॉटेलच्या राहिलेल्या कामांसाठी वेगाने सुरुवात करणार आहे मी. तू आलास तर खूप आनंद वाटेल मला. तुझ्या या शेताने, मैत्रीने खूप आनंद दिलाय मला, तो असाच मिळू दे... येते मी. "
ती उठली आणि पुन्हा म्हणाली,"येऊ मी?". तसा नितीनही उठला. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि 'हो' म्हणाला. बांधावरून काठाला येईपर्यंत दोघेही न बोलता चालत राहिले. तिची कॅब तिथेच होती अजून. ती निघाली आणि तोही वळला. दूरवर पसरलेल्या आपल्या हिरव्यागार शेताकडे पाहात राहिला आणि ती वळून त्याच्याकडे.... पण तिच्या लक्षात आलं होतं तिच्यासाठी तिचं स्वप्न बाकी सर्वांपेक्षा मोठं होतं. ती केवळ एक वेळ होती, स्वप्नांपासून भरकटल्याची. आयुष्य अजून खूप मोठं आहे, आपली स्वप्नं अशीच सोडून देण्यासाठी.
ती डोळे पुसून पुन्हा पुढे पाहू लागली. तिला आता घाई झाली होती आपलं स्वप्न पूर्ण करण्याची.
समाप्त.
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
मस्तच
मस्तच
एकदम छान आणि वेगळी कथा विद्या
एकदम छान आणि वेगळी कथा विद्या!
खूप आवडली.
शेवट खूप च गुन्डाळल्यासारखा
शेवट खूप च गुन्डाळल्यासारखा वाटला, थोडा अजून फुलवला असता तर ?
मला नाही आवडली फारशी! सुरुवात
मला नाही आवडली फारशी! सुरुवात खूपच आवडली होती, पण प्रेमाचा त्रिकोण नसता आणला तरी चाललं असतं असं मला वाटलं.
वाचताना गुंडाळल्यासारखी
वाचताना गुंडाळल्यासारखी वाटतेय खरी पण कथेचा जर्म छान आहे. सिनेमा किंवा शॉर्ट फिल्म म्हणून बघायला जास्त चांगली वाटेल असे वाटले!!
शेवट खूप च गुन्डाळल्यासारखा
शेवट खूप च गुन्डाळल्यासारखा वाटला, थोडा अजून फुलवला असता तर ?>>>१+
मला आवडली बुवा कथा.
मला आवडली बुवा कथा.
'बिझनेसमध्ये केवळ एक मुलगी आहे म्हणू प्रेमाचा त्रिकोण त्रिकोण खेळत न बसता भावना बाजूला ठेऊन बिझनेस करावा' असं मस्तं सांगितलंय.
उलट शेवट भर्र्कन केला म्हणून जास्त आवडली कथा आणि मुद्दा थेट पोचला.
तासाभरात इतके कमेंट पाहून
तासाभरात इतके कमेंट पाहून उत्तर द्यायची इच्छा झाली. ही एक कथा म्हणूनच डोक्यात होती, कादंबरी नाही. ती अशा ठिकाणी संपवणं योग्य वाटलं जिथे एक नवी सुरुवात होतेय.
अशा छोट्या प्रसंगातूनच एखादा वाद मोठा होऊन एखादं छान स्वप्न धुळीला मिळवतो. प्रेमाच्या नादात अनेक मुले-मुली हातचं करियर सोडून वेगळंच काहीतरी करताना दिसतात. आपल्याला खरंच काय हवंय याचा विचार त्या त्या वेळीच केलेला योग्य असं मला वाटतं. आणि एखाद्या मुलीने इतका समंजस विचार करणं आपल्याकडे अपेक्षित असतं का? आणि नसेल तर का नाही? असो.
या गोष्टीत अजून एक प्रयत्न केला होता, खाद्यपदार्थांचं वर्णन. कमेंट वाचून त्यातील बरेचसे वाचकांपर्यंत पोचले आहे हे पाहून आनंद वाटला. मला एखादे ताट चित्रासारखे डोळ्यासमोर दिसते आणि ते समोर येईपर्यंत चैन पडत नाही. तीच तळमळ मुक्तामध्ये असावी असं वाटत होतं. प्रेमाने जेवू घालणाऱ्या लोकांचा एक स्वभाव असतो, तो चित्रित करण्याचा प्रयत्न होता.
लगेच आलेल्या कमेंट वाचून भाग प्रतीक्षेत होता हे जाणवलं, आवडलं.
विद्या.
मला तुम्ही केलेलं कुकींगचं
मला तुम्ही केलेलं कुकींगचं वर्णन फ़ारचं आवडलं. मस्त जमुन आलंय. लिहित रहा अशाचं
मलाही शेवट झेपला नाही पण तिने
मलाही शेवट झेपला नाही पण तिने ह्याच्या नाहीतर त्याच्याबरोबर सरधोपट संसाराला लागणं हे ही अगदीच नेहमीचं झालं असतं. त्यामुळे हा शेवटच बराय त्यातल्यात्यात.
मला आवडली कथा.
मला आवडली कथा.
कधी कधी आयुष्यात आपल्याला आपले मित्र (आपली माणसं) आणि आपले स्वप्न यातून कोणा एकाची निवड करावी लागते. पण मुक्ता, केदार आणि नितीन या तिघांचीही आपल्या स्वप्नांप्रती निष्ठा आणि प्रेम असणे) ही गोष्ट मनाला भावली.
खर तर, प्रेमाने जेवू
खर तर, प्रेमाने जेवू घालणाऱ्या लोकांपैकी मुक्ता एक दाखवली आहे, आणि प्रेमाने जेवणारा नितीन...पण म्हनून मुक्ताने लगेच त्याच्या प्रेमात पडणे काही पटले नाही..असे असेल तर तिच्या भावी होटेल मध्ये येणार्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रेमात पडावे का तिने ?
कथेचा मूळ चान्गले होते पण ह्या शेवटच्या भागामूळे गडबड झाली असे वाटते..
आणि हो, ते वढी "ओल्या
आणि हो, ते वढी "ओल्या हरबर्याच्या आमटी" ची पा. क्रू. देता आली तर बघा...वर्णन तर मस्त लिहीले आहे
मुक्ताला विचार करायला वेळ हवा
मुक्ताला विचार करायला वेळ हवा आहे हे ठिक, पण ती नितीनच्या प्रेमात पडण नाही झेपल.
म्हणजे विद्या, असं बघ की एखाद्या माणसांचा एखादा गुण आवडतो. काही काळ त्याने भारावून वगैरे पण जायला होते, पण त्या व्यक्ति सोबत आयुष्य काढणे फार वेगळी गोष्ट आहे.
>>प्रेमाने जेवू घालणाऱ्या
>>प्रेमाने जेवू घालणाऱ्या लोकांपैकी मुक्ता एक दाखवली आहे, आणि प्रेमाने जेवणारा नितीन...पण म्हनून मुक्ताने लगेच त्याच्या प्रेमात पडणे काही पटले नाही..असे असेल तर तिच्या भावी होटेल मध्ये येणार्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रेमात पडावे का तिने ?>> ह्याच्याशी सहमत. दोन तीनदाच झालेली भेट, त्यात काही फार बोलणं संवाद नाही. नुसत्या गुडमॉर्निंग, गुडनाईट मेसेजेसमधून लगेच प्रेमात पडणं जरा अशक्य वाटतं.
भाग ३ ची लिंक द्याल का? तो
भाग ३ ची लिंक द्याल का? तो भाग दिसत नाहीये
हे घ्या अॅना
हे घ्या अॅना
http://www.maayboli.com/node/61787
हे काही आपल्याला पटले नाही...
हे काही आपल्याला पटले नाही...!!! येवढ्या लवकर तुम्ही या कथेतुन पळवाट काढाल, असे वाटले नव्हते...!!! अजुन एक २-३ तरी भाग व्हायला पाहीजे होते...!!! मा मला वाटतय की अजुन ही वेळ गेली नाही....!! प्रयत्न करा आणि आणखी २-३ भागा पर्यंत कथा फुलवा...!!!
मला काही कळली नाही. मागच्या
मला काही कळली नाही. मागच्या भागात तिने जेवण बनवले आणि नितीन मन लाउन जेवला. मग मधे कधी तरी प्रेम वैगरे झाल का?
खर तर, प्रेमाने जेवू
खर तर, प्रेमाने जेवू घालणाऱ्या लोकांपैकी मुक्ता एक दाखवली आहे, आणि प्रेमाने जेवणारा नितीन...पण म्हनून मुक्ताने लगेच त्याच्या प्रेमात पडणे काही पटले नाही..असे असेल तर तिच्या भावी होटेल मध्ये येणार्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रेमात पडावे का तिने ? १+
Without triangle जर कथेचा शेवट झाला असता, तर जास्त आवडला असता.
बाकी लिखाण छान आहे.
धन्स विनिता.झक्कास
धन्स विनिता.झक्कास
अॅना वेलकम
अॅना वेलकम
इकडे, मुक्ता आणि नितीनचा
इकडे, मुक्ता आणि नितीनचा हळूहळू रोजचा नियमच झाला. रोज सकाळी मेसेजचा आणि संध्याकाळीही. सकाळ सकाळी शेतातून येणाऱ्या ताज्या फोटोंमध्ये कधी त्याचा हात फक्त दिसायचा. त्याचे ते हात तिच्या साठी 'कष्टाची' एक ओळख बनले होते. तो मात्र क्वचितच दिसायचा. दिसला तरी ते फोटोसाठीचं हसू त्यात नसायचं. तिच्या फोटोंमध्येही केवळ एकाहून एक सरस पदार्थ दिसायचे. जणू त्यांच्या भाज्यातून, जेवणातून ते एकमेकांचं हसू पाहत होते. बाकी मग शब्दांची गरज कुणाला होती? केवळ 'गुड मॉर्निंग' आणि 'गुड नाईट' पुरेसे होते. >> भाग ३ मधे हे लिहिताना त्यांच्यातील जवळीक जाणवणे अपेक्षित होते. पण कमेंट वाचताना ते झालेले वाटत नाहीये. असो.
अब्दुल, मागच्या वेळी कथेचे ६ भाग झाले असेच लिहून. पण तेंव्हा त्याला योग्य वाटेल असा पुढचा भाग होता. या वेळी मात्र मला खरंच कथा इथेच संपवायची होती. मी नियमित लिहिते त्यामुळे वेळ हा मुद्दा नव्हताच. कथेच्या शीर्षकानुसार तिच्यातील 'स्वप्नाळू' स्वभाव दिसणे अपेक्षित होते.
प्रेमाचा त्रिकोण नसून infatuation ही असू शकते पण ते तिच्या स्वप्नांच्या आड येऊ नये हे महत्वाचे होते.
कमेंट वाचून तुमची सर्वांची निराशा झाली पाहून वाईट वाटले कारण एखाद्या कथेने आनंद द्यावा अशी माझी इच्छा असते. असो. पण खरं सांगते इथे लोकांचे प्रतिसाद येतात त्यातून खूप शिकायला मिळते मला. आणि इथे कुणीही माझ्या मैत्रिणी किंवा घरच्यांसारखे माझ्या भावना जपायचा प्रयत्न ना करता स्पष्ट बोलतात हेही मला आवडते. पुढेही असाच सहभाग असावा अशी विनंती आणि अपेक्षा आहे.
सर्वांचे अनेक आभार.
विद्या.
कमेंट वाचून तुमची सर्वांची
कमेंट वाचून तुमची सर्वांची निराशा झाली पाहून वाईट वाटले >>>> अजिबात मनाला लावून घेऊ नका खरच खुप सुंदर झालीय कथा ...
ती अशा ठिकाणी संपवणं योग्य वाटलं जिथे एक नवी सुरुवात होतेय. >>>+++१११ मला हे खुप आवडलं.
नेहमी का एकतर्फी निर्णय घ्यायचा प्रेमापेक्षा स्वप्न जास्त महत्वाचं नसतं का ...
आणि हो कडाडून भूक लागायची ...
विद्या, मला एकंदरीत कथा ओके
विद्या, मला एकंदरीत कथा ओके वाटली, शेवट ईतकासा नाही आवडला.
पण तुम्ही सर्व प्रतीसाद सकारात्मक घेतले हे अगदी मनापासुन आवडले.
मलाही शेवट झेपला नाही पण तिने
मलाही शेवट झेपला नाही पण तिने ह्याच्या नाहीतर त्याच्याबरोबर सरधोपट संसाराला लागणं हे ही अगदीच नेहमीचं झालं असतं. त्यामुळे हा शेवटच बराय त्यातल्यात्यात. >> +१
पहिले ३ भाग आवडलेत .. ते वाचुन भुक लागलीच
विद्या,
विद्या,
केवळ 'गुड मॉर्निंग' आणि 'गुड नाईट' पुरेसे होते. >> याला प्रेम म्हणतात का?? आपुलकी म्हणणे ठिक आहे. असे तर मग आपण रोज किती गुड्मॉर्निंग व गुडनाईट म्हणतो, ते प्रेम असते का?? त्यात औपचारीकता हा एक भाग असतो. कधी समोरच्याला रिप्लाय दिला जातो, त्यामागे वेगळी भावना / रादर काही भावना असतेच असे नाही.
तुला काय दाखवायचे होते ते कळले, पण ते या शब्दातून पोहोचत नाही.
इथे कुणीही माझ्या मैत्रिणी किंवा घरच्यांसारखे माझ्या भावना जपायचा प्रयत्न ना करता स्पष्ट बोलतात हेही मला आवडते.>>> भावना जपणे म्हणजे काय? तुझी कथा सकस व्हावी अशा हेतूनेच आम्ही हे प्रतिसाद देतो आहोत. आणि मैत्रिण या नात्यानेच सांगतो आहोत. खरी मैत्रिण मला वाटते अशीच असते.
कथा आवडली. स्वयंपाकाचे वर्णन
कथा आवडली. स्वयंपाकाचे वर्णन तर फारच आवडले. मनापासुन स्वयंपाक करणारी माणसे , मनापासुन जेवणार्याच्या प्रेमात पडु शकतात. स्वयंपाक करणे ही एक थेरपी आहे खरंतर. आणि भाज्या पिकवणे, मातीत राबणे हे ही मनाला समाधान देतेच. प्रेमापेक्षा मुक्ता आणि नितीनमध्ये हा समान दुवा होता असे मला वाटते. काहीतरी क्लिक झालं त्यांच्यात. होतं असं.
आवडली कथा !
आवडली कथा !
>> "ओल्या हरबर्याच्या आमटी" ची पा. क्रू. देता आली तर बघा...वर्णन तर मस्त लिहीले आहे << +१११११
आवडली कथा !
आवडली कथा !
मनापासुन स्वयंपाक करणारी माणसे , मनापासुन जेवणार्याच्या प्रेमात पडु शकतात. स्वयंपाक करणे ही एक थेरपी आहे खरंतर. आणि भाज्या पिकवणे, मातीत राबणे हे ही मनाला समाधान देतेच. प्रेमापेक्षा मुक्ता आणि नितीनमध्ये हा समान दुवा होता असे मला वाटते. काहीतरी क्लिक झालं त्यांच्यात. होतं असं. >> +1..
Pages