बारव

Submitted by संतोष वाटपाडे on 21 February, 2017 - 03:13

काल बारवाच्या काठी
धुणं धुवायाला आली
भर दुपारी उन्हात
जुन्या चिंचेची सावली...

तिच्या पोपटी बांगड्या
हेल खावून वाजल्या
खोप्यातल्या सुगरणी
खोपा सोडुन धावल्या...

बारवाच्या पोटावर
वड पिंपळाची पोरं
आली बघाया सावली
काही पकडून दोरं..

पाण्यामधे चमकला
निळ्या आभाळाचा दिवा
सावलीला डिवचून
गेला पाखरांचा थवा...

दगडाच्या थारोळ्यात
सारी कापडं धुतली
बारवाच्या गारव्याने
वेडी सावली भिजली..

सार्‍या काचोळ्या लुगडी
गोळा हाताने करुन
पुन्हा बांधून अंबाडा
गेली सावली निघून ...

-- संतोष वाटपाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

छान.

अहाहा...नितांत सुंदर सहज कविता!
हेल खावून वाजणाऱ्या पोपटी बांगड्या,बारवाच्या पोटावर
दोर पकडून आलेली वड पिंपळाची पोरं,पाण्यामधे चमकता निळ्या आभाळाचा दिवा,दगडाच्या थारोळ्यात धुतलेली कापडं
आणि सारंकाही सहज लपेटुन नेणारा तिचा अंबाडा!
>>>सावलीला डिवचुन
गेला पाखरांचा थवा>>>हे तर केवळ अप्रतिम!
पुन्हा पुन्हा वाचतो आहे! खूपंच आवडली कविता!
अनेक अभिनंदन आणि धन्यवाद!

भावनाताई, बारव म्हणजे दगडी विहिर. जी जुन्या काळी प्रत्येक गावात एक असायची. आणि उतरायला चढायला पायर्^या असायच्या सोबत रहाटसुद्धा....

सुंदर ..सुंदर
पोपटी बांगड्या .........
.......... धावल्या
विशेष आवडले