मोठ्या शहरांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकाधिक कठीण व बिकट होत चालला आहे. औद्योगिक क्षेत्रे एकसारखी वाढत चालली असून त्यामुळे शहरे अयोग्य प्रकारे वाढत आहेत. शहरी लोकसंख्या सर्व बाजूंनी वाढत असून ही वाढ रोखणे अथवा टाळणे अवघड आहे. तसेच लोकसंख्या वाढीचे अंदाजही पुष्कळदा चुकतात. यामुळे शहरांना होणारा पाण्याचा पुरवठा हा नेहमी कमीच पडत राहतो. पुढील तीस वर्षांचा हिशोब करून दिलेले पाणी पाच-दहा वर्षांत कमी पडु लागते.
निसर्गात मिळणार्या पाण्याचे मुख्यतः दोन वर्ग करण्यात येतात : (१) भूमिगत पाणी व (२) पृष्ठभागावरील पाणी.
भूमिगत पाणी :
भूपृष्ठाखाली विशिष्ट भूस्तरांच्या रचनेमुळे मोठ्या प्रमाणात साठलेले पाणी तसेच भूपृष्ठावर मुद्दाम साठवलेल्या पाण्यापैकी जमिनीत मुरणारे पाणी, डोंगरातील झ-याचे पाणी, उथळ व खोल विहिरींतील पाणी आणि आर्टेशियन (कारंजी) विहिरीतील पाणी ह्या सर्वांची गणना भूमिगत पाण्यात करता येईल .
पृष्ठभागावरील पाणी :
नद्या, नाले, ओढे ह्यांमधून वाहणारे पाणी किंवा तळी, सरोवर, समुद्र यांमधील साठलेले पाणी तसेच धरण, बंधारे बांधून कृत्रिमपणे साठवलेले पाणी हे सर्व पृष्ठभागावरील पाण्यात मोडते.
सध्या जगभर पाण्याचा तुडवडा असल्याने ब्रिटन, अमेरिका, रशिया यांसारखे पुढारलेले देश निर्लवणीकरणाविषयी संशोधन करीत आहेत. भारतात भावनगर येथील केंद्र सरकारच्या सेंट्रल सॉल्ट अँड मरीन रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये याप्रकारचे संशोधन चालू असून खा-या पाण्याचे शेतीकरिता वापरण्याइतके पाण्याचे शुद्धीकरण केल्याचे प्रसिद्ध झाले आहे. याशिवाय सौर भट्टीत खा-या पाण्याचे निर्लवणीकरण कमीत कमी खर्चात व वेळात करण्याचे प्रयत्न चालू आहेत. असे असले तरी हे सर्व उपाय खूप खर्चिक आहेत व त्यावर अजून संशोधन चालू आहे. म्हणूनच सध्या हाती असलेला पर्याय म्हणजे जुन्या व पडीक विहिरींचे पुनरुज्जीवन.
मुंबईत पूर्वी एखादी विहिरी बुजली गेली तर डासांचा एक अड्डा कमी झाला असे मानले जायचे. परंतु २००२ नंतर वर्षाजलसंचयन कक्षाची स्थापना झाल्यानंतर विहिरींचे जतन करण्यासाठी कटाक्षाने प्रयत्न केला गेला. नागपूर शहरात जवळपास सातशे सार्वजनिक विहिरी आहेत. मात्र यातील बहुतांश विहिरी मृतावस्थेत आहेत. कचरा टाकून लोकांनी त्या बुजवून टाकल्या आहेत. एका विशेष प्रयोगाअंतर्गत मट्टीपुरा व भुजाडे मोहल्ला येथील दोन विहिरी निवडल्या गेल्या ज्या ५० वर्षांपासून बंद अवस्थेतच होत्या. या दोन्ही विहिरी उपसून स्वच्छ करण्यात आल्या. त्यानंतर तेथे मोटर पंप बसवून विहिरीतील पाणी लोकांना पुरविले जात आहे. किमान दीडशे घरांना याचा लाभ मिळाला आहे .
विहिरींचे पाणी हे नळ किंवा कालव्याच्या पाण्यापेक्षा अधिक लवणयुक्त असू शकते. त्यामुळे त्यांच्यात पाचक गुणही असतो, असा समज आहे, परंतु लवणांचे प्रमाण वाढले की, पाणी पिण्यास व शेतीस निरूपयोगी होते. विहिरींच्या पाण्याचा जडपणा सुद्धा तपासावा लागतो. घरगुती वापरास जड पाणी योग्य नसते. खा-या पाण्याच्या विहिरी पुष्कळ ठिकाणी असतात. पाण्याच्या एक लक्ष भागात २५० भाग लवणे असलेले पाणी पिण्यास निरूपयोगी व हानिकारक असते. विकसित देशांत पिकांना खूप नत्र खते घालतात. ह्या खतातील नायट्रेट जमिनीत झिरपून विहिरीच्या पाण्यात मिसळते, असे पाणी आरोग्याला हितावह नसते.
हि गोष्ट टाळण्यासाठी विहिरीचे पुनर्भरण (रिचार्जिंग) ही पद्धत अत्यंत उपयुक्त ठरली आहे. त्यासाठी जमीन, शेती, रस्ते, नाले यांतून वाहून जाणारे पाणीही उपयोगात येऊ शकते. या तंत्रात विहिरीजवळ एक खड्डा घेऊन त्यामध्ये पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी बांध घालून साठविले जाते. व ते एका नळाद्वारे विहिरीत सोडले जाते. येथे विहिरीचा पाणी साठवण्याच्या टाकी सारखा उपयोग केला जातो. व साठवलेले पाणी हे पुढे अनेक दिवसापर्यंत वापरता येऊ शकते. या पद्धतीने खा-या पाण्याची विहीर देखील गोड्या पाण्याच्या स्वरूपात बदलता येते. कारण खारे पाणी जड असल्याने तळाशी राहते व गोडे पाणी हलके असल्याने वर राहते. ऑपरेट चॅरिटेबल ट्रस्टने सौराष्ट्रात ४७,००० विहिरींचे पुनर्भरण केले आहे. लातूर येथील कृषी विभागामार्फत जिल्ह्यात २०१२ या वर्षात ५६९ विहिरींचे पुनर्भरण करण्यात आले आहे. अशा विहीर पुनर्भरणामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे.
https://2.bp.blogspot.com/-hWCM9no19_w/VvCc_NDb2tI/AAAAAAAABg0/ZscNu_sh4...
- अंबज्ञ
सुंदर लेख. खुप गरज आहे या
सुंदर लेख. खुप गरज आहे या सगळ्याची आता.
मी मुंबईत १९७४ पर्यंत मालाडला होतो. तिथे जवळजवळ प्रत्येक बिल्डींगची एक विहिर होती. पिण्यासाठी महानगरपालिकेचे पाणी
वापरत असू तरी कपडे, भांडी यांच्यासाठी विहिरीचेच पाणी वापरत असू, आणि ते वर्षभर उपलब्ध असे. मालाडला ठिकठिकाणी
तळी पण होती, पण त्याच काळात ती बुजवायला सुरवात झाली होती.
चांगला विषय. आमच्या गावी
चांगला विषय. आमच्या गावी जवळजवळ प्रत्येकाच्या अंगणात एक दोन विहिरी आहेत. बर्यापैकी पाणीही असते. ते प्यायला/आंघोळीला वापरता आले नाही तरी कपडे, भांडी, वाडीसाठी आणि इतर साफसफाईला वापरतो. शहरातल्या अनेक विहिरी बुजवलेल्या पाहिल्या आहेत. पण त्या कोरडया पडल्यामुळेच बुजवत असावे. आमच्या परिसरातील एक विहीर भुताटकीच्या अफवांमुळे बुजवली. आताशा विहीर ही फक्त गावीच बघायची गोष्ट झाली आहे.
सुंदर विषय आणि चांगला लेख.
सुंदर विषय आणि चांगला लेख.
आवडला लेख !
आवडला लेख !
छान लिहिलय...
छान लिहिलय...
sewage च्या खुपच जवळ विहीर
sewage च्या खुपच जवळ विहीर असेल तर पाणी अशुद्धच असेल ना. मला प्रश्न पडतो की सांडपाणी विहिरीतल्या पाण्यात मिसळत असल्याने कपडे, भांडी वापरासाठी देखील ते योग्य नाहीच ना. जमिनीत पाणी झिरपताना नेमकी शुद्दीकरणाची काय प्रोसेस असते? जाणकारांनी प्रकाश पाडावा.
रिसायकलिंगच्या जमान्यात आता
रिसायकलिंगच्या जमान्यात आता वापरायोग्य नाही अशी काही गोष्टच उरलेली नाही @राया .
तुम्ही विचारलेल्या शंकेविषयी अनेक फिल्टरेशन सिस्टिम आणि त्यामागचे तंत्रज्ञान तुम्हाला उत्तर शोधायला मदत करतील निश्चितच
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद !
सुंदर विषय आणि चांगला लेख.___
सुंदर विषय आणि चांगला लेख.____+१
धन्यवाद देवकी
धन्यवाद देवकी