"आई, मोहना आणि शालिनी बरेच दिवस म्हणतायत भेटूया म्हणून. या शनिवारी जाऊन येऊ? तू रियाला बघशील?" अंजलीने आईला विचारलं. आई होच म्हणणार आहे हे माहीत असलं तरीही रियाची जबाबदारी आजीवर टाकण्याआधी अंजली नेहेमी आजीची परवानगी घेत असे. आजीची आणि रियाचीसुद्धा!
शनिवारी लंचला त्या तिघींच्या ठरलेल्या सीफेस रेस्टाॅरंटमधे भेटायचा प्लॅन ठरला. हे रेस्टाॅरंट तसं थोडं लांबच पडायचं पण शांत, निवांत माहौल आणि खिडकीतून दिसणारा समुद्र ..... त्यामुळे तिघीनांही तिथे भेटायला आवडायचं. ड्राईव्ह करताना अंजली आठवू लागली. मेडिकल कॉलेज मधे सुरु झालेल्या या मैत्रीला आता तब्बल पंधरा वर्ष झाली होती. दर वर्ष, सहा महिन्यांत तिघी भेटायच्या. शिवाय अधून मधून फोनकॉल्स , मेसेजेस असायचे. आशिषच्या दुःखातून सावरायला या दोघींनी तिला खूप मदत केली होती.
मोहना अगदी गरीब घरची आणि गरीब स्वभावाची आणि तशी अबोल. आईवडील दोघेही शिक्षक, त्यामुळे घरात शिस्तीचं वातावरण. कोकणस्थांचा शिक्का मारल्यासारखा गोरा रंग, घारे डोळे आणि रेखीव चेहरा. कॉलेजमध्ये कितीतरी मुलं तिच्यावर फिदा होती पण बाजी मारली ती त्यांचाच बॅचमेट श्रीकांत कर्णिकने.
मोहनाच्या उलट शालिनी, हुशार, तरतरीत, बडबडी, रंगाने सावळी अशी ही डार्क ब्युटी खानदेशातून एकटीच शिकायला मुंबईत आली होती. रंग सावळा आणि त्यात तिचा तो खानदेशी अॅकसेन्ट! त्यामुळे तिच्याकडे कोणाचं लक्ष जातच नसे. गेल्या पंधरा वर्षांत मात्र तिचा तो अॅकसेन्ट पूर्ण गेला होता. शिवाय आत्मविश्वासाचं , हुशारीचं वेगळं तेज शालिनीच्या चेहर्यावर आलं होतं. एमबीबीएस नंतर शालिनीच्या लग्नाचे प्रयत्न तिच्या आईवडिलांनी केले होते पण चार पाच नकारांनंतर शालिनीने तो नाद सोडून कऱीअरवरच लक्ष केंद्रित केलं. आणि मग लग्नाचं राहिलं ते राहिलंच.
तिघीही ऑलमोस्ट एकाच वेळी पोहोचल्या. डोअरमॅनने अदबीने दार उघडलं. रेस्टाॅरंटच्या काचेच्या दरवाज्याला एक मोठा तडा गेला होता. शालिनीने नेहेमीच्या बोलक्या स्वभावानुसार डोअरमॅनला विचारलं "ये कैसे हुआ? "
"क्या मालूम मॅडम ! कल रात ठीक था. आज सुबह देखा तो बडासा क्रॅक आया था. पता नहीं किसीने तोडा या धूप की बजेसे ...."
"रात में धूप!!" शालिनीने आश्चर्याने म्हटलं. "अगं बाई चल ना. तू समुद्र बघ. तो क्रॅक नको बघू." म्हणत अंजलीने शालिनीला आत ढकललं आणि तिघी हसत हसत जाऊन टेबलपाशी बसल्या.
गप्पा सुरु झाल्या. प्रॅक्टिस , कॉन्फरन्स, सेमिनार, बाकीचे कॉमन फ्रेंड्स .... होता होता विषय घरच्यांकडे वळला. एव्हाना मेन कोर्स सर्व्ह झाला होता. वेटर्सचं टेबलकडे येणंही कमी झालं होतं. एकदा आजूबाजूला बघून दबक्या आवाजात मोहना म्हणाली, "मला तुम्हाला दोघींना एक सांगायचंय...." ती चाचरत पुढे म्हणाली "श्रीकांतचं काहीतरी चाललंय". अंजली आणि शालिनी दोघींच्या हातातले घास तसेच राहिले. "काय चाललंय?" शालिनीने न राहवून विचारलं, "अफेअर, तो कोणाच्या तरी प्रेमात पडलाय बहुतेक" खाली मान घालून मोहनाने म्हटलं. "तुला.... तुला सोडून तो इतर कोणाकडे बघतोय?" अंजलीने अजूनही अविश्वासाने म्हटलं. मोहना फक्त सुंदर होती एवढंच नव्हतं , मोहना आणि श्रीकांत कॉलेजमधले स्टार कपल होते. "हो नक्कीच तो कोणाच्यातरी प्रेमात पडलाय. प्रेमात तो कसा असतो ते मी चांगलं बघितलंय. आताही तेच चालू आहे. लग्नाआधी चार वर्ष आम्ही एकमेकांच्या प्रेमात होतो. लग्नालासुद्धा आता दहा वर्ष झाली. त्याने नुसतं हं म्हटलं तरी मला समजतं त्याला काय म्हणायचंय. मग त्याचं मन उडालेलं मला नाही का कळणार!" मोहनाला हुंदका आला तरी ती बोलतच राहिली. "आठवतं ना, तो कॉलेजमधे कसा होता, लेटर्स काय, रोझेस काय, रोमँटिक डेट्स काय.... सगळं काही अमर्याद करण्याचा स्वभाव आहे त्याचा. माझ्यावर प्रेमसुद्धा असाच अमर्याद करायचा. इतकं की मूल वगैरे काही हवं असं त्याला काही वाटायचच नाही. मला मात्र मूल हवं होतं आणि आम्हाला होत नव्हतं. मग IVF वगैरे तर तुम्हाला माहीतच आहे. आणि मग दोन वर्षांपूर्वी ट्विन्स! शार्विल आणि शनाया , तोपर्यंतसुद्धा आम्ही घट्ट एकमेकांबरोबर होतो. पण हळू हळू काय झालं कळलं नाही. तो बॉयफ्रेंडच राहिला मी मात्र पूर्ण 'आई' होऊन गेले गं. ते सळसळतं प्रेम, धुंदी हरवून गेली माझ्याकडून. श्रीचं सगळं आयुष्यच अशा हाय वर चालतं. त्याला किक हवी असते. ती त्याने बाहेर शोधलीये कुठेतरी. त्याचं बाहेर जास्त राहणं , मधेच गिल्टी वाटून घेऊन आम्हा तिघांशी एक्सट्रा प्रेमाने वागणं, टीनएजर सारखं सतत मोबाईल घेऊन बसणं.... त्याला वाटतंय मला कळत नाहीये पण मी आतून तुटतेय गं..... मोडून पडतेय मी." तिघींच्याही डोळ्यातून आता पाणी येत होतं.
"नको रडू मोहना. तुला खात्री आहे का? की तुझी स्पेक्युलेशन्स आहेत ही सगळी? तू बघितलंयस का त्याला कोणाबरोबर? कोणाकडून ऐकलंयस का काही?" अंजलीला विश्वास ठेवणं कठीण जात होतं. "नाही ग. पण पक्की खात्री आहे मला. आमचा जुना फ्लॅट आहे ना अंधेरीला. गेल्या शुक्रवारी श्री त्या फ्लॅटची चावी घरातून हळूच घेऊन गेला, पुण्याला केस आहे सांगून ! त्याला वाटलं मला कळणार नाही आणि मलासुद्धा वाटतं की त्याच्यावर लक्ष ठेऊच नये. कशाला उगाच डोक्याला त्रास. पण मला जमतच नाहीये! आमच्या..... आमच्या फ्लॅटवर तो कोणाला तरी घेऊन गेला!" मोहना हुंदके देत रडत होती. गोरंमोरं होऊन त्यांनी आजूबाजूला पाहिलं पण कोणाचंच या तिघींकडे लक्ष नव्हतं. "शालिनी तू श्री बरोबर थिएटर (ऑपरेशन थिएटर) करतेस ना कधीकधी .... कोणा नर्स बरोबर वगैरे चाललंय का त्याचं काही?" अंजलीने शालिनीला विचारलं . "मला नाही लक्षात आलं ग कधी" कसनुश्या चेहर्याने शालिनीने उत्तर दिलं. आशिष गेला, मोहनाचं हे असं आणि शालिनी तर कायमच एकटी. विचार करून अंजलीचं डोकं सुन्न झालं. तिने आणि शालिनीने मोहनाला परोपरीने समजावायचा प्रयत्न केला की यात तिची काही चूक नाही, तिने गिल्टी वाटून घेता कामा नये, उलट श्रीला थोडा दम दिला पाहिजे. त्यांनी श्रीशी बोलावं का असंही अंजलीने विचारलं पण मोहना नको म्हणाली. ती खिडकी बाहेर शून्यात बघत होती. अंजलीची नजर बाहेर गेली. ओहोटीने समुद्राला खूप मागे खेचलं होतं. किनारा लाटांच्या खुणा उरावर घेऊन भरतीची वाट पहात स्तब्ध होता. शेवटी त्यांनी आवरतं घेतलं . सवयीप्रमाणे तिघींनी बिल डिव्हाइड केलं .
शालिनीने क्रेडिट कार्डने पैसे भरले आणि दोघीनी तिला कॅश दिली. आशिष नेहेमी त्यांच्या या सवयीला हसायचा. "जिवाभावाच्या मैत्रिणी पण एकमेकींचं बिल नाही भरत !!" "अरे त्यामुळे कितीही वेळा मोकळेपणाने भेटता येतं, कोणावरही प्रेशर राहात नाही" अंजली म्हणायची.
शालिनीला एक तासात क्लिनिक होतं म्हणून तिने दोघींचा निरोप घेतला आणि ती निघाली. त्या भेटीने तिचंसुद्धा डोकं भणभणत होतं. बाहेर पार्किंगमधे तिचा ड्राइवर गाडीच्या काचा खाली करून गाडीतच बसला होता. एवढ्यात तिचा मोबाईल वाजला . फोनची स्क्रीन बघून तिने हातानेच ड्रायव्हरला 'तू जा' अशी खूण केली. तो गेल्यावर तिने मोबाईल उचलला. धारदार आवाजात ती बोलू लागली, "मोहनाशी बोलून आलेय मी. ढसाढसा रडत होती ती . तू तुझी बायको सोडशीलही कदाचित पण मी माझी मैत्री तोडणार नाही. डोकं फिरलं होतं माझं म्हणून तुझ्या मोहात अडकले. पण आता माझी अक्कल जागेवर आली आहे. तुझ्या अंधेरीच्या फ्लॅटची चावी उद्या ड्रायव्हरकडे पाठवून देते." पलीकडचा शब्दही न ऐकता तिने फोन कट केला आणि मान वळवली. तिचं विसरलेलं क्रेडिट कार्ड हातात घेऊन अंजली जस्ट तिथे आली होती आणि शालिनीचं फक्त शेवटचं वाक्य - फ्लॅटच्या चावीबद्दलचं तिच्या कानावर पडलं होतं. संताप, फसवणूक, घृणा सगळे भाव अंजलीच्या चेहर्यावर एकाच वेळी दाटले होते. " यू आर डिसगास्टिंग शालिनी , लाज नाही वाटली तुला!" अंजली कडाडली. शालिनीचं कार्ड तिच्यासमोर भिरकावून देऊन अंजली मागे वळली आणि रेस्टाॅरंटच्या आत मोहनाकडे गेली. शरमेने , दुःखाने शालिनीचा चेहरा झाकोळून गेला. अंजली गेली होती त्या दिशेला तिने बघितलं . खरंच त्या समोरच्या काचेला खूप मोठा तडा गेला होता.
https://drmadhurithakur.blogspot.co.uk/2017/02/blog-post_7.html?m=1
डाॅ. माधुरी ठाकुर
मस्त जमलिये कथा...
मस्त जमलिये कथा...
हे अस होत्???नशिब त्या शलिनिला अक्कल आली..
मस्त जमलीये कथा. पण का कोण
मस्त जमलीये कथा. पण का कोण जाणे.. मी शेवट predict करू शकले होते.
मी शेवट predict करू शकले होते
मी शेवट predict करू शकले होते.>> सेम हिअर...
पण छान होती एकंदर..
गोश्त अवदलि... मस्त आहे
गोश्त अवदलि... मस्त आहे
आवडली. पण त्या काचेच्या
आवडली. पण त्या काचेच्या तड्याचा रेफरन्स आधी असल्यामुळे अंदाज येतो.
मी शेवट predict करू शकले होते
मी शेवट predict करू शकले होते.>> हो, शेवट ची भेट म्हटल्यावर काहीतरी होणार हे कळलेल
पण छान वाटली वाचायला.
खूप मस्त जमलिये कथा. मस्तच
खूप मस्त जमलिये कथा. मस्तच
मस्त जमलीये कथा. आवडली.
मस्त जमलीये कथा. आवडली. अप्रतिम...
अरेरे, मैत्रीमधे असे होउ नये
अरेरे, मैत्रीमधे असे होउ नये खरे तर.....
पण आयुष्य कदाचित असे पण असते
great . i really like it.
great . i really like it.
आवडली कथा, पण मालाही थोडी
आवडली कथा, पण मालाही थोडी प्रेडिक्टेबल वाटली.
मोहना मेडीको नाही का ? मग ते दोघे एकाच कॉलेजमधे ?
सर्वच प्रतिक्रियांबद्दल आभार.
सर्वच प्रतिक्रियांबद्दल आभार. अदिती तुमचं पटलं. "भेटीच्या शेवटी....." वालं वाक्य was giving it away too soon म्हणून ते काढून टाकलं. आधी ते नव्हतंच पण whatsapp ग्रुपवर समरी टाकताना ते ऍड केलं होतं. लोकांना वाचायला टेम्प्टकरायला
दिनेश मोहना सुद्धा मेडिकोच आहे. मेडिकल कॉलेजपासूनच्या तिघी मैत्रिणी
मस्त आवडली !
मस्त आवडली !
मस्तच जमली आहे कथा.
मस्तच जमली आहे कथा.
शी बाबा स्वताच लग्न झालेल
शी बाबा स्वताच लग्न झालेल असूनही बेस्ट फ्रेंड च्या नव र्याशी अफेर
Shalini unmarried aahe ho.
Shalini unmarried aahe ho.
छान जमली आहे कथा!!
छान जमली आहे कथा!!
हे पटत नाही,mhanje frnd chya
हे पटत नाही,mhanje frnd chya hubby barobar relations thevta tevha naii samjat ka ,Tila Kay vatel..ani ek eki bhetla var realise hote tht whatever they r dng it's wrong...
kathin ahe rao..
भयन्कर काय त्यात... हि
भयन्कर काय त्यात... हि रेयलित्य आहे... अश गोश्ति होत असतात... पाय घसरतो...
छान आहे कथा...
छान आहे कथा...
एक शंका : शीर्षक 'अंजलीची गोष्ट' असं का आहे? कथा तर मोहना आणि शालिनीबद्दल घडतेय ना?
एक शंका : शीर्षक 'अंजलीची
एक शंका : शीर्षक 'अंजलीची गोष्ट' असं का आहे? कथा तर मोहना आणि शालिनीबद्दल घडतेय ना?>> ती तिच्या आयुष्यातला अनुभव सांगतेय म्हणुन दिलं असावं..
छान मांडणी आहे कथेची ...
छान मांडणी आहे कथेची ... श्रीचं सगळं आयुष्यच अशा हाय वर चालतं. त्याला किक हवी असते-अस जर आहे तर कोणी शालिनी असो वा मालिनी कोणीही आयुष्यातून गेल्याने त्याला फरक पडणार नाही उलट नवीन किक शोधायला श्री मोकळा होईल.... या सर्वात फक्त मोहना ची एक ओंजळ रितीच राहील कायमस्वरूपी .... मैत्री आणि नवर्याच प्रेम या अँगल ने.
मात्र एक ओंजळ मोहना ने रीती न ठेवता शार्विल आणि शनाया सोबत आनंदाने व्यतीत करावी.... बऱ्याच पॉसिटीव्ह गोष्टी आहेत करण्यासारख्या .... आणि आयुष्य खूप सुंदर आहे!!!!!!!!!
प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक
प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार.
हर्षल - अंजली च्या गोष्टींची ही सीरिज आहे. सगळ्या गोष्टी तिच्या नजरेतून लिहिल्या आहेत. अंजलीच्या आणखीही एक दोन गोष्टी मी मायबोलीवर पोस्ट केल्या आहेत.
समृद्धी तुमच्या सल्ल्याशी मी पूर्ण सहमत आहे.
आलं लक्षात, इतर कथा वाचायला
आलं लक्षात, इतर कथा वाचायला घेतल्या
छान, येऊद्यात...
हीच कॉक स्टाइल ची ही गोष्ट
हीच कॉक स्टाइल ची ही गोष्ट
सुंदर ,
हीच कॉक स्टाइल ची ही गोष्ट
हीच कॉक स्टाइल ची ही गोष्ट
सुंदर ,
छान
छान
चांगली आहे गोश्ट.
चांगली आहे गोश्ट.