इष्क मुबारक, दर्द मुबारक: भाग ४

Submitted by विद्या भुतकर on 8 January, 2017 - 23:46

भाग ३: http://www.maayboli.com/node/61318

रितू आणि आनंदला आता लोकांची कुजबुज अजिबात ऐकू यायची नाही. एकतर त्यांनी त्याच्यावर विचार करायचं सोडून दिलं होतं आणि ऑफिसमधल्या लोकांनीही 'यांना बोलून असेही काही फायदा नाही' म्हणत वस्तुस्थिती स्वीकारली होती. फक्त एकच गोष्ट त्यांना खटकायची ती म्हणजे 'आई बाबांना' याबद्दल काहीच सांगू शकत नव्हते ते. तितकी हिंमत काही त्यांना होत नव्हती. त्यातल्या त्यात एक समाधान त्यांना होतं की अजूनही त्यांच्या मध्ये कुठलेही शारीरिक संबंध नव्हते. कितीही आकर्षण असलं तरी एक मित्र किंवा मैत्रीण म्हणून जे प्रेम किंवा आपुलकी असते त्याच्या पलीकडे जाऊन जवळीक करणे याची थोडी त्यांना दोघांनाही भीती वाटत होती, जे आहे ते गमवायची भीती. शिवाय इतक्या वर्षाच्या ओळखीनंतर असं एखाद्या समोर आपले इतके उत्कट भाव व्यक्त करणं यातही थोडा संकोच वाटत होताच.

पण अशा गोष्टी कितीही ठरवलं तरी व्हायच्या राहतात का? वीकेंडला कधी तिचे केस धुतलेले असताना सोबत स्वयंपाक करणं त्याला अवघड जायचं. आणि कितीही 'टिपिकल वाटलं तरी तिच्या धुतलेल्या केसांचा सुवास, तिच्या चेहऱ्यावरची तरतरी, अशा वेळी तिच्या आसपास असणं त्याला त्रास द्यायचं. तिच्या एखाद्या टोमण्यावर करकचून तिचा मुका घ्यायची इच्छा व्हायची. तर कधी सोफ्यावर बसून टीव्ही बघताना तिच्या मांडीवर डोके ठेवून बघायची. तीही या त्रासातून सुटली नव्हतीच. याचं एखाद्या दिवशी शायनिंग मारत फोटो काढणं, कुठेही जाताना पटकन हात पकडून पुढे घेऊन जायची सवय, कधी जेवण बनवताना खांद्याला धरून 'तू बैस गं' म्हणून खोटं रागावून केलेली जबरदस्ती त्या सगळ्यांतून स्वतःला सावरणं जणू अशक्यच होतं तिला. अनेकदा रात्री कॉल संपल्यावर त्याच्या रूममध्ये जाऊन झोपायची इच्छा व्हायची. पण किती सावरलं होतं तिने स्वतःला.

अशाच एका रविवारी दोघे जेवण बनवत असताना ती त्याला म्हणाली,"कधी जायचं रे आपण भारतात? मला आता कंटाळा आलाय इथे राहायचा."

त्याने मस्करीने विचारलं,"का माझा कंटाळा आला वाटतं इतक्या लवकर?".

रितू,"तसं नाही रे घरी जाऊन आता जवळजवळ दोन वर्षं झाली. सगळ्यांना कधी एकदा भेटेन असं झालंय." बोलतानाच घरची आठवण येऊन तिच्या डोळ्यांत पाणी दाटलं. त्यालाही थोडं वाईट वाटलं. आपण तिकडे असूनही हिच्या आठवणीत घर विसरलो आणि ती तर केव्हाची इकडेच आहे.

"हो आता लवकरच संपव काम तुझं आणि जाऊ आणि लग्न करू पटकन." त्याने तिला असं म्हणत जवळ ओढलं.

त्याच्या या अचानक जवळीकीने ती थोडी बावरली पण त्याच्या छातीवर डोकं ठेवून तशीच उभी राहिली. तिलाही आता पुढच्या स्वप्नांचे वेध लागले होते. ती अजूनही रडत आहे हे पाहून त्याने तिचा इतकासा चेहरा हातात घेतला. पुन्हा एकदा त्याला मनात आलं,'किती टपोरे डोळे आहेत हिचे'. त्याने तिच्या चेहऱ्याजवळ जात अलगद तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. तीही जणू या क्षणाची कित्येक वर्षं वाट पहात होती. त्याच्या ओठांच्या स्पर्शाने, त्याच्या उष्ण श्वासांच्या वेगाने आणि तिच्या कानामागे असलेल्या त्याच्या हातांच्या ओढीने ती अजून वेडी झाली आणि कितीतरी वेळ दोघेही सर्व विसरून तसेच त्या एका क्षणात हरवून गेले. कुकरच्या शिटीने त्यांना भानावर आणलं.

"लग्नापर्यंत थांबायला हवं रे" असं त्याला म्हणत आणि स्वतःलाही समजावत ती त्याच्यापासून दूर झाली.

दोन व्यक्तींमध्ये बाकी कितीही पल्ला पार केला तरी त्या दोन ओठामधलं अंतर पार करायला जणू अनेक युगं लोटतात. पण तो क्षण एकदा येऊन गेला की त्याच्या आधीच्या सर्व क्षणांची मुक्ती होते आणि फक्त एक 'किस' मनात राहतो. तसाच तो राहिला दोघांच्याही मनात, श्वासांत आणि त्यांच्या ओठांत. दोघांनीही पुढच्या दोन-तीन दिवसांत त्याची कितीतरी वेळा मनात पुनरावृत्ती केली होती. त्याच्यापुढचा अख्खा आठवडा म्हणजे जणू त्यांची परीक्षाच होती, त्यांच्या संयमाची. पण ते टिकणार नव्हतेच. इतक्या जवळ राहून आणि दोघांना काय हवंय हे माहित असतानाही आवरणं अवघड होतं. शेवटी तो दिवस आलाच जो लग्नाआधी येऊ नाय अशी त्यांची अनावर इच्छा होती. पण आता त्या 'किस' नंतर त्यांना थांबणं शक्य होतं नव्हतं. Finally They Had Sex !

होय ! त्याच्यानंतर जे झालं ते सांभाळणं मात्र आनंदला अवघड गेलं. रितू रडू लागली. का? त्याला अर्थातच अनेक कारणं होती. इतक्या उत्कट क्षणी तिचं त्याच्याबद्दलचं प्रेम भरून आलं होतं. त्यांतच 'आता पुढे काय करायचं?', 'आपण थांबायला हवं होतं' असे अनेक विचार तिच्या डोक्यात येत होते. तिला नक्की काय समजवायचं हे त्याला कळत नव्हतं. त्याने तसेच तिला आपल्या छातीवर डोके ठेवून पकडून ठेवले. कधीतरी तिची झोप लागून गेली त्याच्याच मिठीत. आपण जिच्यावर इतके प्रेम करतो ती खरंच आपल्या मिठीत आहे आणि इतक्या प्रेमाने झोपलीय हे पाहून त्याला एक प्रकारचं समाधान वाटत होतं आणि सोबत 'सकाळी तिची काय प्रतिक्रिया असेल' याची त्याला काळजीही.

पण मुळात हा सगळा विचार करायला त्यांना वेळ झालाच नाही. सकाळी उशिराच जाग आली,"अरे माझी मिटिंग होती ९ वाजता" असं ओरडतच आपले कपडे त्याच्या रूममधून गोळा करत रितू बाथरुमकडे पळाली. दोघांची आवरण्यात एकदम धावपळ झाली. नास्ता करून डबे भरून दोघेही ऑफिसला निघाले. रात्रीबद्दल विचार करायला फुरसतच नव्हती. ऑफिस आल्यावर तो तिला म्हणाला,"तू जा पुढे मी कार पार्क करून येतो नंतर." ती "हो" म्हणून गप्प बसली. गाडी स्लो करत असतानाच त्याने पुढे होऊन तिच्या गालांवर एक किस घेतला आणि 'गुड डे' म्हणत गाडी थांबवली. तीही लाजून हसत 'यू टू' म्हणत लॅपटॉप घेऊन घाईत बिल्डिंगमध्ये घुसली. पुढच्या काही दिवसांत कोण कुणाला जास्त प्रेम व्यक्त करून दाखवतो याची जणू रेसच लागली होती. वेगवेगळ्या प्रकारे दोघे एकमेकांना खूष ठेवत होते. कधी आवडीचे जेवण बनवून, कधी घर साफ करून कधी फुले-कॅण्डलने घर सजवून आणि वेगवेगळ्या प्रेमाच्या नोट्स देऊन. कितीही बालिश वाटलं तरी त्यांचं पहिलं प्रेम होतं ते !

एक दिवस रात्री जेवण झाल्यावर आनंदने तिला जवळ घेत विचारले, "कधी आहे कॉल तुझा?".

ती वैतागून बोलली,"रात्री अकरा वाजता !"

इतक्या उशिरा तिचे कॉल असले की तो कंटाळून झोपून जायचा. त्याने लाडीकपणे विचारले,"चला म्हणजे अजून एक तास आहे."

त्याचा हेतू समजून ती म्हणाली," मला हे कॉल च्या आधी वगैरे काही जमणार नाही हां."

त्याने तिच्या केसांतून हात फिरवीत विचारले,"असं काय? नुसता रिपोर्टींग कॉल आहे ना?"

ती,"हो, पण तू मला उगाच आग्रह करू नकोस. मला उशीर होईल तू जा झोपायला." आणि ती त्याच्या मिठीतून बाहेर पडत उठून गेली. तो हिरमुसला आणि तिथेच बसून राहिला. ती परत बाहेर येत नाही हे पाहून तो त्याच्या रूममध्ये जाऊन झोपून गेला.

लवकरच तिचा कॉल सुरु झाला आणि बऱ्याच वेळाने संपला. अर्थात आता त्यात तिचे लक्ष लागतही नव्हते. कॉल नंतर पाणी पिऊन ती त्याच्या झोपलेल्या चेहऱ्याकडे पाहून पुन्हा आपल्या रूम मध्ये गेली. "सारखं काय विचारायचं? काम वगैरे असतं की नाही?" , तिने विचार केला.

'तो रुसून झोपलाय' या विचाराने तिला झोप येईना. उगाच चुळबुळ करत ती पडून राहिली. या अशा नात्यामध्ये कधी भांडण झालं की मात्र त्रास जास्त होतो. एकतर त्याच्यावर चिडलोय हे बाकी कुणाला सांगता येत नाही. बरं आजपर्यंत कुठल्याही गोष्टीत ज्या प्रिय मित्राला सांगायचो तोच आता 'प्रियकर' झाल्यावर त्या 'मित्राची' अजून आठवण येते. अजून किती वेळ असं बसणार म्हणून ती वैतागली. तिला त्याच्यावर चिडल्याचे वाईट वाटले. आपली चादर उचलून ती त्याच्या रूममध्ये गेली. त्याला झोपतेच सरकायला सांगून त्याच्या पांघरुणात घुसली. त्यानेही तिला एका हाताने मिठीत घेतलं आणि झोपून राहिला. त्याचा हात अंगावर घेऊन तिला बरं वाटलं, तिची चुळबुळ आता थांबली होती. कधीतरी तिची झोप लागून गेली.

त्यांना अजून दोनेक महिने काम बाकी होते. घरी जायचे वेध दोघांनाही लागले होते. तिच्या घरचे ती येणार म्हणून आधीपासूनच मुलांचे फोटो, माहिती तिला पाठवू लागले होते. त्यांना हे सर्व कसे सांगायचे हा मोठा प्रश्न तिला होताच. पण आनंद सोबत होता तिच्या आणि इथून माघार नाही हे दोघांनीही पक्के केले होते. राहत्या घरातले सामान विकायचे, काय काय परत न्यायचे, खरेदी कधी करायचे याच्या चर्चा अनेक वेळा करून झाल्या होत्या. त्यानेही तिच्या प्रोजेक्ट्च्या वेळेतच आपले कामही पूर्ण करायचे ठरवले होते त्यामुळे त्याची धावपळ होत असायचीच. एक दिवस तो उशिरापर्यंत ऑफिसमध्येच होता. तिचे त्याला ७-८ कॉल येऊन गेले होते. त्याने 'In meeting' असा मेसेज करूनही तिचा फोन येतंच होता. त्याने तो सायलेंट करून काम पटकन पूर्ण करून घरी जायचे ठरवले. मिटिंग मधून बाहेर आल्यावर त्याने तिला फोन केला. रितू फोनवर बरीच घाबरलेली वाटत होती.

"हे बघ तू उगाच घाबरू नकोस मी घरी येतोय मग बोलू आपण. तू शांत हो मी आलोच २० मिनिटांत असे सांगून आनंदने तिला शांत केले आणि काळजीत तोही लगेच घरी निघाला. घरी आल्यावर तिने त्याला सांगितलं," अरे अशी उशिरा येत नाही कधी. मी गेले ५-७ दिवस झाले वाट बघतीय. मला खूप टेन्शन येतंय."

"हे बघ मला तरी असे काही होईल असे वाटत नाहीये. पण तुझ्या खात्रीसाठी आपण चेक करून घेऊ. " त्याने समजावले. तिने मन हलवली. थोडे इंटरनेट वर चेक करून ते दोघेही फार्मसीत गेले. टेस्ट दुसऱ्या दिवशी सकाळी करायची होती. दोघांनीही अख्खी रात्र 'काय होईल' बेचैनीत घालवली.

पहाटे पहाटे तिने बाथरूममध्ये जाऊन टेस्ट केली. पुढचे २-४ मिनिटंही तिला उसंत नव्हती. आनंदही तिच्यासोबत ती टेस्ट पहात होता. टेस्ट पॉसिटीव्ह होती. मोठ्या अक्षरात त्या स्टीकवर दिसत होते,"Pregnant!".

क्रमश:
विद्या भुतकर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users