चित्रपटगृहांत राष्ट्रगीत अनिवार्य - सुप्रीम कोर्टाचा आदेश

Submitted by भास्कराचार्य on 1 December, 2016 - 04:21

काल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या अंतर्गत निर्देशांनुसार (Interim Order) आता देशातील सर्व चित्रपटगृहांत चित्रपटाच्या सुरवातीला राष्ट्रगीत वाजवणे, व अर्थातच नागरिकांनी त्यासाठी उभे राहणे, अनिवार्य आहे. येत्या १० दिवसांत ह्या निर्देशांचे पालन होईल, अशी व्यवस्था करण्याचे आदेश कोर्टाने सरकारला दिले आहेत.

http://timesofindia.indiatimes.com/india/National-anthem-to-play-before-...

ह्या निर्णयावर काहींनी असहमती दर्शवली आहे, तर काहींनी त्याचे जोरदार समर्थन केले आहे. मला स्वतःला 'राष्ट्रगीताचा सन्मान झालाच पाहिजे' हे वाटतेच. शाळा किंवा महाविद्यालयांतही अगदी ते रोज वाजवले गेले पाहिजे, असे वाटते. कारण ह्या संस्थांतून देशाचे नागरिक घडत असतात. परंतु चित्रपटगृहासारख्या ठिकाणी राष्ट्रगीत वाजवून त्याचा सन्मान झाला पाहिजे, हा नियम काही कळत नाही. देशाच्या प्रतीकांप्रती आदर दाखवणे हे प्रत्येक नागरिकाचे संवैधानिक कर्तव्य आहे, व त्याने ते पाळलेच पाहिजे. परंतु ही प्रतीके अशी जनसामान्यांना चित्रपटगृहात दाखवून काही फरक पडेल का, हे कळत नाही. अर्थात, चित्रपटगृहात राष्ट्रगीत लावल्यावर मी उभा राहतोच, व राहीनही. पण हा नियम खरेच काही करेल, ह्याबद्दल शंका वाटते. महाराष्ट्रात हा नियम आधीपासूनच होता, पण आता सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतलेला असल्याने तो देशभर झाला आहे, व तो सुप्रीम कोर्टाचा असल्याने त्यात बदल करणे अशक्यप्राय आहे. ह्याबद्दल मायबोलीकरांतही मतांतरे असतील, ती जाणून घेण्यासाठी हा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्कि इशु काय आहे? >>> हाच प्रश्न मलाही पडलाय. राष्ट्रगीताची सक्ती हा, उभं राहण्याची सक्ती हा, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला हा की अजून काही? काय इशु आहे नेमका?

राष्ट्रगीतावरून माझी देशभक्ती ठरते, याचा मला विलक्षण त्रास होतो. घटनेनं, कोर्टानं मला उभं न राहण्याचं स्वातंत्र्य दिलेलं असताना देशभक्त पब्लिक उभं न राहिल्यास कायदा हाती घेणार. हे कसलं स्वातंत्र्य?
..
>> अगदी अगदी. ह्या सोकवणाऱ्या तथाकथित देशभक्तांची सोय झाली ह्या निर्णयाने.
राष्ट्रगीत चालू असताना तसं उभं रहाणं ही नोर्म किंवा सवय असू शकते. सक्ती का असावी?
आणि तिथे उभं राहून देशविधायक कारवाया केल्या तर चालतील का?
मुळात झेंडा राष्ट्रगीत म्हणजे देशभक्ती का देशभक्ती व्यक्त करण्याची साधन - प्रतिकं?
वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे त्यांना फक्त गाणं म्हणून राष्ट्रगीत आवडत असलं तरी ते देशभक्त ठरतील अशा प्रकारे.
प्रेम आदर वगैरे भावना अशाने निर्माण होतात का खरच? सवय होइल फारतर.

- राष्ट्रगीत आवडणारी - देशावर प्रेम असलेली - पण ही सक्ती पसंत न पडलेली

हाच प्रश्न मलाही पडलाय. राष्ट्रगीताची सक्ती हा, उभं राहण्याची सक्ती हा, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला हा की अजून काही? काय इशु आहे नेमका?
>> सुप्रीम कोर्टाचा निर्णय.
संन्यास घेतल्यावर गृहस्थाश्रमात येऊ नये हा संकेत ठीकच. पण संकेत मोडल्याबद्दल वाळीत टाकणाऱ्या धर्ममार्तंडाच मात्र पटत नाही . तसच काहीसं

आक्षेप -

१. चित्रपटगृहांत राष्ट्रगीत वाजवलंच पाहिजे.
२. प्रत्येकानं उभं राहिलंच पाहिजे.

उप-आक्षेप
१. राष्ट्रगीतात 'dramatization' इत्यादी नको. म्हणजे फक्त राष्ट्रध्वज आणि शब्द हवेत.
२. चित्रपटगृहाचे दरवाजे बंद केले जावेत.
३. कोर्टाला या देशाचे नागरिक पुरेसे देशभक्त नाहीत, याची काळजी वाटते.
४. कोर्ट देशभक्त कोण, हे ठरवतं.
५. कोर्टाचे दोन सदस्य २० वर्षांपूर्वी तीन सदस्यांनी दिलेल्या निकालाच्या विरुद्ध निर्णय देतात.
६. कोर्ट constitutional patriotism असा शब्दप्रयोग वापरत बरोब्बर उलटा निकाल देतं.

constitutional patriotism ही काय भानगड आहे ? collective conscience सारखा बळंच बनवलेला शब्द वाटतो.

मुळात चित्रपट हा मनोरंजन प्रकार आहे, त्यावाचून काय कोणाचा जीव जात नाही, इतकाच त्रास होत असेल दोन मिनिटे उभे राहण्याने तर सविनय निषेध नोंदवा कि मी या सक्तीच्या विरोधात एकही चित्रपट गृहात जाउन पाहणार नाही, डीव्हीडी विकत आणून पाहीन, तिथे घरी तुम्हला कोण सक्ती करत नाही.
उद्या राष्ट्रगीत म्हणूनदाखवल्या शिवाय रेशन चे धान्य दिले जाणार नाही असा फतवा निघाला तर विरोध ठीक आहे.
इथल्या पोस्ट वाचून असे वाटू लागले आहे की किती तो त्रास, रोजच्या रोज राष्ट्रगीतला उभे राहण्याचा जसे की रोजच तिन्ही त्रिकाल हे तिथेच पडीक असतात.

अनुमोदन आशुचॅंप !!

हा असाच प्रश्न मला मागे त्या पॉर्न साईट बंदीच्या वेळीही पडला होता. तेव्हाही काही लोकांनी फेसबुकवर असा काही दंगा घातला होता की जणू पॉर्न बघणे हे भारताचे राष्ट्रीय मनोरंजन आहे आणि ते आता बंद केले आहे! निदान तो निर्णय मोदी सरकारने घेतलेला असल्याने त्या दंग्यामागची 'सरकारल धोपटणे' ही भुमिका तरी समजू शकते. आतातर (नऊ वर्षे )चालू असलेल्या केसवर सुप्रिम कोर्टाचा निर्णय असूनही लोकं तितक्यात पोटतिडकीने झोडपतायत. फेसबुकावर असेही वाचले की (ह्या) सरकारनेच बाजू मांडली नाही म्हणे!

भारतातली मोठ्या प्रमाणावरची थिएटर्स बघता ह्याची एकंदरीत ह्याची अंमलबजावणी कशी करणार कळत नाही. पण एकंदरीत इज इट रियली अ बिग डील ? अगो, नताशा आणि रमड ह्यांचे मुद्देही आहेतच.

मुळात चित्रपट हा मनोरंजन प्रकार आहे, त्यावाचून काय कोणाचा जीव जात नाही >> जीव गेल की किंवा जाणार असेल तर निषेध करायचा का फक्त? Lol परत 'च' Lol
>> किती तो त्रास, रोजच्या रोज राष्ट्रगीतला उभे राहण्याचा >> उभे राहायचा त्रास नाहीये तर होणाऱ्या विचित्र सक्तीचा आहे. जी संविधानानुसार आणि पूर्वीच्या निर्णयानुसार टिकायला नको पण तरीही कोर्टाने घातली आहे.

पॉर्नचा इथे संबध नाही पण विषय निघाला म्हणून, पॉर्न राष्ट्रीय मनोरंजन असतं तरच बघायचं का? मग सी आय डी राष्ट्रीय मनोरंजन ठरून अनवट नाटकं बंद करा. Happy
रच्याक्ने मध्यंतरी वाचलेल्या आकडेवारीवरून ते भारताचं मनोरंजन आहे असंच वाटलेलं.
थोडक्यात जे मेन स्ट्रीम जनता करते तेच सगळ्यांनी करायचं. झापडबंद. कोणी काही वेगळं कायदा न मोडत केलं, तर धाक दपटशा दाखवून बंद करायचं. इथे कोर्ट केस आहे सो धाक नाहीये हे समजतंय. ovharturn करणं हाच शक्य असेल तर उपाय आहे. मात्र हा प्रेसिडन्स पडला तर मात्र डेंजर होईल.

कुठलाही निर्णय आला की तो ठेविले अनंते मान्यच केला पाहिजे का?

जीव गेला तर किंवा जाणार असेल तरच निषेध यात इतके अवघड काय आहे आणि त्याचे उदाहरण मी वर दिलेच आहे. सक्ती तुम्हाला आणि आणखी काही टक्के लोकांना विचित्र वाटत असेल हा तुमचा परस्पेक्स्टिव्ह आहे, कित्येक असे आहेत की ज्यांना नाही वाटत आणि हि सक्ती बजरंग दल टाईप्स प्रकारातली नाही त्यामुळे कुठे आणि किती केलं तर या प्रश्नाला काही अर्थच नाही.
असेही आपल्याकडे लाख सक्ती होऊ द्या कायदेभंग आपल्या रक्तात आहे त्यामुळे चिल

{३. कोर्टाला या देशाचे नागरिक पुरेसे देशभक्त नाहीत, याची काळजी वाटते.
४. कोर्ट देशभक्त कोण, हे ठरवतं.}

हे दोन मुद्दे मला सगळ्यात भीतीदायक वाटतात

हा निर्णय हास्यास्पद आहे. पण आपल्याकडे दिखावेगिरी सगळ्यात महत्वाची आणि ती न दाखवणार्‍याला देशद्रोही म्हणून झोडपायला सगळे तयारच असतात! त्यामुळे असोच!
इतके दिवस माझा सर्वोच्च न्यायालयावर जो विश्वास होता तो थोडा डळमळीत झाला आहे एवढे नक्की.

<भारतातली मोठ्या प्रमाणावरची थिएटर्स बघता ह्याची एकंदरीत ह्याची अंमलबजावणी कशी करणार कळत नाही. पण एकंदरीत इज इट रियली अ बिग डील ? .>

गोवंशहत्याबंदीच्या कायद्यांची अंमलबजावणी कशी होते आहे तशीच.

आता थेटरात राष्ट्रगीत वाजू लागलं की काही अतिदक्ष अतिराष्ट्रभक्त अतिराष्ट्रवादी आजूबाजूचं कोण राष्ट्रगीताचा मान राखत नाही हे डोळ्यांत तेल घालून पाहू लागतील. (तसे करताना, ते स्वतः राष्ट्रगीताचा मान राखतात की नाही हे विचारायचं नाही. कदाचित नुसतंच उभं राहणं अपेक्षित असावं. स्तब्ध राहणं, राष्ट्रगीताच्या शब्दांवर लक्ष केंद्रित करणं आणि त्यामुळे आपल्या मनात त्यावेळी देशप्रीती उचंबळून येणं याची काही गरज नाही. तसंही देशभक्ती आपण देशासाठी काय करतो यापेक्षा दुसरा कोण काय करत नाही, हे दाखवून देण्यात आहे ) मग राष्ट्रगीत चालू असताना एखाद्याने स्वतःचीच दाढी खाजवली हे कारण त्याला राष्ट्रभक्तीचा धडा शिकवायल पुरेसं ठरू शकेल.
जिथे आजरपणामुळे उभं राहू न शकणार्‍या लोकांना बडवायचं लायसन्स राष्ट्रवाद देतो (माणुसकीपेक्षा राष्ट्रवाद कधीही मोठाच) तिथे आणखी काय काय होऊ शकेल, याची कल्पनाच केलेली बरी.

फक्त चित्रपटगृहच का हा प्रश्न मी माझ्या पहिल्या प्रतिसादात विचारला होता. अन्य अनेकांनीही विचारलाय.
सगळी कार्यालयं किंवा त्यांची शिफ्ट सुरू होताना राष्ट्रगीत का वाजवू नये? सरकारी कार्यालये आणि न्यायालयांपासून सुरुवात का करू नये? चित्रपट पाहयाला जाणार्‍यांतच राष्ट्रभक्तीचा अभाव असतो तेव्हा त्यांना राष्ट्रगीताचं व्हिटॅमिन टोचावं असं काही आहे का? मग माझ्यासारख्या गेली कित्येक वर्षं थेटरात न गेलेल्या माणसाला २६ जानेवारी व १५ ऑगस्ट असे वर्षातून मिळणारे दोन डोस पुरणार का?
इतकंच जर आहे तर ३० जानेवारीला जसा ११ वाजता भोंगा वाजवून दोन मिनिटं शांतता पाळायची प्रथा आहे, तसंच रोजची एक ठरावीक वे़ळ राष्ट्रगीत वेळ ठरवून द्या. सगळ्या प्रसारमाध्यमांतून त्या वेळी राष्ट्रगीत वाजवा. सगळ्यांनी त्यावेळी स्तब्ध उभं राहावं असा प्रघात पाडा.
------------

It has become a big deal now that it has become compulsory.
आताही चित्रपटगृहांत राष्ट्रगीत वाजतंच. ज्यांना गायला, उभं राहायला आवडतं, त्यांची सोय आताही आहे.
पण यापुढे उभं राहणं सक्तीचं होणार आहे. ज्यांना तशी गरज वाटत नव्हती, त्यांच्यावर तसं करण्याची सक्ती आहे आणि मुख्य म्हणजे न केल्यास इतरांकडून देशद्रोही असल्याचा शिक्का आणि बरंच काय काय लावून घेण्याची सोयही आहे.

राष्ट्रगीत वाजू लागलं की आपसूक उभं राहावसं वाटलंच पाहिजे असं लिहिलं गेलंय. तोच नियम रस्त्याने जाताना देऊळ लागलं तर पायताणं काढून हात जोडून मगच पुढे जावं असं वाटलंच पाहिजे, असं मी लिहू का?

<हा असाच प्रश्न मला मागे त्या पॉर्न साईट बंदीच्या वेळीही पडला होता. तेव्हाही काही लोकांनी फेसबुकवर असा काही दंगा घातला होता की जणू पॉर्न बघणे हे भारताचे राष्ट्रीय मनोरंजन आहे आणि ते आता बंद केले आहे! >

मुद्दा हा आहे, की ज्याला जे बघायचंय ते बघायचं स्वातंत्र्य का नसावं? की फक्त राष्ट्रीय मनोरंजन म्हणून जाहीर केलेल्या गोष्टीच पाहाव्यात असा या राष्ट्रवादाचा आणखी एक पैलू आहे?

मी काय पहावं, काय वाचावं, काय लिहावं , काय खावं, काय प्यावं , काय ल्यावं याचं पुरेसं स्वातंत्र्य घटनेनं मला दिलेलं आहे. त्याचा संकोच का व्हावा?

ती एक अपंगांची केस सोडली तर आजवर अश्या किती केसेस झाल्या आहेत? मूठभर उपद्रवी लोक सोडले तर बाकी सगळे शांततेने घेतात. बाकी चित्रपट गृहात मोबाईल वर मोठ्याने बोलू नये असाही संकेत आहे, आणि तो किती जण पाळतात? त्याच्यावरून जितक्या हाणामाऱ्या होतात तितक्या राष्ट्रगीतला उभे राहण्यावरून होतील असे सिरियसली वाटते? सिरियसली?????
आव असा आणला जातोय कि तमाम भारतीय येतात ते दंडुके घेऊन , दिसला कोणी कि हाण,
हे जे करतात त्यांना कुठलाही मुद्दा चालतो, त्यामुळे ते असे करतील याचा बागुलबुवा आता बस करावा

घटनेने जेवढे स्वातंत्र्य दिलेआहे तसेच काही कर्तव्य हि दिली आहेत, त्याबद्दल कोणाला काही पडलेली नाही, अनिर्बंध स्वातंत्र्य पाहिजे पण कर्तव्य मात्र करूच असे नाही

किमान तीन केसेस माझ्या वाचनात आल्यात.
एक मुंबईतल्या की बंगळूरमधल्या एका फॅमिलीची.(प्रसारमाध्यमांतच स्थानाबद्दल संदिग्धता होती.ही पहिली केस. ) आणखी एका कलाकाराची.

चित्रपट नाटक चालू असताना मोबाईल न वापरणं, मोठ्याने न बोलणं याबाबत खरंतर नियम असण्याची आवश्यकता आहे.

मुळात या कारणासाठी कोणालातरी सुप्रीम कोर्टात जावंसं वाटलं यावरूनच हे प्रकरणाचा सीरियसनेस कळतोय.

राष्ट्रगीतासाठी उभं राहिलं की सगळी कर्तव्य पार पाडल्याचं सर्टिफिकेट मिळणार आहे.
नियमापेक्षा त्या नियमामागची विचारसरणी अधिक धोकादायक आहे.

बहुसंख्यांना काहीही त्रास होत नाहीए. त्यामुळे ज्यांना होतोय त्यांच्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे हे नवं तत्त्व आलेलं दिसतंय.
बहुसंख्यांना त्यांच्या खांद्यावर असलेल्या वस्तूचा उपयोग फक्त ते डोलावण्यासाठीच करता येतो , इतरांना त्या वस्तूचा दुसराही उपयोग माहीत आहे, हा खरा प्रॉब्लेम आहे.

मला राष्ट्रगीत आवडतं आणि ते सुरू असताना मी नेहमी उभी राहते.
पण त्याची अशी सक्ती अयोग्य आहे.
म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतो म्हणून चिंता वाटते.

जांभई देणारा इमोटीकॉन का नाहीये माबोवर? Proud

>>>> > नक्कि इशु काय आहे? >>> हाच प्रश्न मलाही पडलाय. राष्ट्रगीताची सक्ती हा, उभं राहण्याची सक्ती हा, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला हा की अजून काही? काय इशु आहे नेमका? <<<<< Lol

यापेक्षा आमच्याकडे बरे अस्ते बोवा..... चला घ्या कापुर लावुन म्हणले, की बाकी उपस्थित मंडळी आपसुक उठुन उभी रहातात.... अन सुखकर्ता सुरु होईस्तोवर अल्मोस्ट सगळे उभे राहिलेले अस्तात....! Proud म्हातारीकोतारी देखिल काठीचा आधार घेत उभारतात......
मग आम्हीच सांगतो, ज्यांना शक्य आहे त्यांनीच उभे रहावे...
अन पूजा खाली बसुन चौरंगासमोर असेल, तर पूजा करणार्‍यांनाही बसुनच आरती करायला सांगतो... (त्यामागे कारणे आहेत ती अवांतर)
पण मुद्दा असा की, आरती देवांची, देवाला उद्देशुन म्हणत, देवाशी बोलत असता, देवाकरता आदर दाखविणे म्हणून उभे रहाणे आपसुक घडते, तसे "संस्कार" आहेत , तिथे "व्यक्तिस्वातंत्र्य" आड येत नाही, आड येत असेल, तर खपवुन घेतले जात नाही, अशा व्यक्ति खड्यासारख्या बाजुला फेकल्या जातात.
तोच मुद्दा पुढे चालविला तर "भगव्या ध्वजाखाली" एकत्र येणे काय किंवा "राष्ट्रध्वजा खाली" , तो ध्वज प्रतिक स्वरुपात "देवच " मानला जातो. त्याची आरती ती राष्ट्रगीत..... ! ती केव्हा म्हणावी? तर जसे देवाचे स्मरण तिन्ही त्रिकाळ २४ तास करावे, तसेच याचेही !
त्यामुले मला तरी राष्ट्रगीत जिथे कुठे सुरु असेल, तिथे उभे रहाण्यात "कमीपणा" वाटत नाही, वा माझ्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आलीये असे वाटत नाही.

हल्ली काये ना, लालेलोक अमेरिकन व्यक्तिस्वातंत्र्याचा आधार घेत "देशभक्ति " रुजविण्याच्या कुठल्याही प्रयत्नात खो घालु पहातातच. आमच्या वेळेस शाळेत सुरवातील "प्रतिज्ञा" म्हणवुन घ्यायचे...नंतर कुणा मेंदुतुन आक्षेप निघाले, अन ती प्रतिज्ञा म्हणणे बंद झाले.....!

मला असं कळलंय की बहुतेकांना व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे काय याची सुतराम कल्पना नसते. एक भारतीय म्हणून मी खरच स्वतंत्र आहे का? तर मुळीच नाही Sad बहुतेक लोकांना स्वातंत्र्याची भीती वाटते. मर्यादित स्वातंत्र्य किंवा जे मिळेल त्यालाच स्वातंत्र्य मानणे हे सगळ्यात सोप्पं! व्यक्तिस्वातंत्र्याचा विरोध करणारे भित्रे असतात कारण स्वातंत्र्याबरोबर जी जबाबदारी येते ती पेलण्याची हिंमतच नसते अंगात! मग नैतिक परंपरा आणि नसते कायदेकानून यांचं लोढणं गळ्यात अडकवून आपण कसे स्वतंत्र अशा गैरसमजूतीत आयुष्य जगत रहायचं! फक्त देश स्वतंत्र आहे म्हणून देशातली जनता आपोआप स्वतंत्र होत नसते. ज्या दिवशी लोकांना ही जाणीव होईल तो खरा स्वातंत्र्यदिन असेल!

राज |
>>अशी व्यवस्था करण्याचे आदेश कोर्टाने सरकारला दिले आहेत.<<

पडद्यामागे मोदि सरकारचाच हात यात आहे अशी मला शंका आहे. डिमोनटायझेशनच्या गोंधळातुन जनतेचं लक्श डायवर्ट करुन देशप्रेमाकडे ते वळवलं जावं हा अंत:स्थ हेतु त्यात आहे...

मजा आहे!

कालपर्यंत मोदीविरोधक म्हणत होते- राईट विंग वाल्यांना आमचं राष्ट्रगीत आवडतच नाही, त्यांना फक्त वंदे मातरम आणि नमस्ते सदा वत्सले मातृभूमे चंच कौतुक. त्यांनी जन गण मन म्हणून आपलं देशप्रेम सिध्द करावं वगैरे वगैरे!
आता मोदीविरोधक म्हणतात- मोदींचाच हात असला पाहिजे यामागे. का ते आम्हाला राष्ट्रगीत म्हणायला लावतात? त्याचा देशप्रेमाशी काय संबंध?
निर्णय कोर्टाचा आहे, सरकारचा नाही.

मला असं कळलंय की बहुतेकांना व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे काय याची सुतराम कल्पना नसते.>> काहीही जनरलायझेशन करू नका. धन्यवाद. कृपया.

Pages