पैलतीर ... 

Submitted by तेजूकिरण on 22 November, 2016 - 10:25

"एक मिनिट वेळ आहे का?", फोन वर मोना विचारत होती. खरतर मी जरा घाईतच होतो. लवकर काम संपवून मित्रांना भेटायचं होतं.

"Urgent?" मी वैताग लपवायचा प्रयत्न करत विचारलं. 

" Yes, it's personal. Please?" मोना जरा गंभीरच वाटत होती. काहीतरी तसच कारण असणार. 

"OK. Come "
आता मात्र मला थोडी काळजी वाटायला लागली. मोना घाईतच आत शिरली आणि लगेच दरवाजा बंद करून माझ्या समोर बसली. तिचा चेहरा बघून मला जरा टेंशनच आलं. काय असेल बरं? हीचा काही प्रॉब्लेम? पण मग ही शमा कडे, माझ्या बायकोकडे का नाही बोलली? मी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत असतानाच माझी नजर चुकवत मोना बोलायला लागली. 

" अजय, खरंतर मी शमा लाच सांगणार होते, पण, then I thought, you should know this before anyone else. I don't even know how to start" मोना अडखळतच बोलत होती. 

"Come on Mona, सांग मला, काय झालय?" आता मात्र माझे पण शब्द अडखळायला लागले.  मी उभा राहून लक्ष देऊन ऐकायला लागलो. 

आणि यानंतर मोना ने जे काही मला सांगितलं ते ऐकल्यावर माझा मेंदू सुन्न झाला, माझे हातपाय गळून गेल्यासारखे झाले. मला आपण काय ऐकतोय त्याचा अर्थ काय, काहीच कळेनासे झाले. मी मटकन खुर्चीतच बसलो. 

"Please will you leave me alone?"  मी माझ्या नकळतच मोना म्हणालो. 
" I am sorry Ajay, but…?” 
" I am fine, but I need some time " मोना जायला वळली,
"मोना, please, कुणाकडे बोलू नकोस " मी अचानक बोलून गेलो. 
" अजय, ही बातमी मला तासापूर्वी कळली, आणि मी तुला सांगायला आले. मला जर का gossip च करायचं असतं तर मी इथे नसते आले. मावशी माझ्या आईसारख्या आहेत. "

माझं डोकं गरगरायला लागलं. मी डोकं घट्ट धरून डोळे मिटून घेतले. 
आई? का पण? माझं करिअर, माझी बायको, माझी मुलगी, माझी आई , सगळं perfect. आणि मग हे का? why?

माझ्या बंद डोळ्यांसमोर निरनिराळे प्रसंग उभे राहायला लागले. 

घरात खूप माणसं जमली आहेत. सगळीकडे रडारड चालू आहे. माझ्या बाबांना समोर ठेवलय. सकाळी कामावर जाताना त्यांचा अपघातात मृत्यू झालाय. दोन्हीकडचे आजी आजोबा रडतायत. मामा, काकाला कुणीतरी समाजवताय. फक्त मी आणि माझी आई बाबांसमोर एकटक बघत बसून आहोत. तिने मला घट्ट धरून ठेवलय आणि माझ्या केसांवर तिचे अश्रू हळूच पडतायत. पण ती अगदी शांत आहे. रडत, ओरडत नाही आहे. जणूकाही जे झालाय ते अजूनही समजून घेतेय.
मी अकरा वर्षांचा, नुकताच माझा वाढदिवस झालाय आणि बाबांनी आणलेली क्रिकेट बॅट समोरच दिसतेय. ते मला क्रिकेट शिकवणार होते, आम्ही रोज खेळणार होतो. मला माझ्या बदललेल्या आयुष्याचा काहीच अंदाज लागत नाहीय. मी सैरभैर होऊन नुसताच बघतोय. 

नंतर काही महिन्यांनीं मी शाळेतून घरात शिरतोय आतल्या खोलीत दोन्ही आजी आजोबा, मामा, काका असे सगळे आईशी काहीतरी गंभीर बोलत आहेत. मी बाहेरच बसून त्यांचं बोलणं ऐकायचा प्रयत्न करतोय. 

आजी म्हणतेय "बाळा, आमचा मुलगा तर गेला, पण तुझं आयुष्य अस वाया का जाऊ द्यायचं? त्याने स्वतःहूनच चौकशी केली आहे, शिवाय तो अजय ला सुद्धा चांगला सांभाळेल. विनय काही परका नाही आहे आपल्याला." दुसरी आजी नुसतीच रडतेय. मामा, काका सगळे आलटून पालटून तेच तेच बोलतायत. 

माझ्या पायाखालची जमीनच सरकल्या सारखी झाली. म्हणजे हे लोक आईला बाबांच्या मित्राशी, विनय काकांशी लग्न करायला सांगतायत? मी आधीच माझे बाबा गमावलेत आणि आता आई सुध्दा? मी धाव्वत आत जाऊन आईला घट्ट मिठी मारून रडायला लागतो. आणि आईचा खंबीर आवाज माझ्या कानावर पडतो.

" माझा आयुष्य वाया का जाईल? अजय आहे ना माझा? त्याच्यासाठीच तर जगणार आहे ना मी? आम्ही दोघांनीही अजय साठी खूप स्वप्नं बघितली आहेत. त्याला खूप शिकवायचा आहे, परदेशी शिक्षणाला पाठवायचा आहे, जमलंच तर चांगला खेळाडू बनवायचा आहे. खूप कामं आहेत मला. आणि बरं झालं तुम्ही सगळेच इथे आहात ते, तुम्हाला सांगायचं होतं कि मी मुंबईत नोकरी शोधली आहे, माझ्या एका मैत्रिणीच्या दवाखान्यात. तिथेच राहून नर्सिंग शिकेन आणि अजय लाही चांगलं शिक्षण देऊ शकेन. " त्यानंतर बराच चर्चा-विवाद, रडणे वगैरे झाले. पण माझी आई खंबीर राहिली, तिने तिची वाट आधीच निवडली होती. ती सर्वांना समजावत होती "शेवटी तुम्हीच तर आहात ना सगळे माझ्यासाठी? मला गरज लागली तर तुम्हीच येणार सगळे धावून. पण आता मात्र माझी ताकत बना, कमजोरी नका बनू. माझी मदत करा ते मला परत उभं करायला, मला स्वावलंबी बनायला. "

बाबा गेल्यापासून मी खूपच वेड्यासारखा वागायला लागलो होतो. अभ्यास करत नव्हतो. सारखा आदळआपट आणि चिडचिड करायचो. बाबा मला जे जे करायला सांगायचे, तेच सगळं आता मी अजिबात करायचं नाही असच जणू ठरवलं होतं. त्यांच्या अचानक निघून जाण्याच्या असा बदलाच घेत होतो. पण त्या दिवशीच्या प्रसंगानंतर मात्र मी पूर्ण बदललो. आई माझ्यासाठी जी स्वप्नं बघत होती ती पुरी करायचा प्रयत्न करणार होतो. 

मग आम्हा दोघांचं एक छान आयुष्य सुरु झालं. मुंबई शहराने आम्हाला एका क्षणातच आपलासं केलं. तिथल्या गर्दीत आई आणि मी अगदी मस्त सामावून गेलो. हळूहळू मग मी शाळा-कॉलेज, मित्र यात रमून गेलो. पण आई माझी जवळची मैत्रीणच झाली, माझीच नाही तर माझ्या सगळ्या गॅंग ची ती दोस्त बनली. त्याच वेळेला, शमा मला भेटली आणि ती सुद्धा आईची फॅन बनली. त्या दोघींची तेव्हा जुळलेली मैत्री नंतर सासू सुना झाल्या तरी तशीच कायम राहिली. 

शमा च्या आठवणीने मला एकदम धडधडायला लागलं. तिला हे कळलं तर? ती काय म्हणेल? ती आईचा किती मान ठेवते. ती तर शॉक च घेईल.  काय करून ठेवलंय आईने आता हे? या वयात? तेव्हा तयार झाली असती लग्नाला तर? तर, काय? आपण होतो तयार? मी वाटून घेऊ शकलो असतो माझी आई कुणाबरोबर?
छे, काहीतरीच. सगळे काय म्हणतील? इथे अमेरिकेत आता आपलं एक जग तयार झालय. आपले मित्र, त्यांची मुलं, सगळे कसे एका कुटुंबासारखे राहतो आपण. आणि त्या सगळ्यांना आईविषयी किती आदर आहे? त्यांना काय वाटेल हे कळल्यावर? 
आणि आताच का? या वयात? आता माझी मुलगीच झाली सोळा वर्षाची. Oh my God अनु, तिला कळलं तर? तिला काय वाटेल? तिची आजी, जिचा आपण आदर्श ठेवत असतो सतत मुलांसमोर, ती? अशी? 

मन बधीर झालं होतं. मित्र फोन करत होते. मी फोन उचलून नुसताच text केला कि मी येत नाही. कुणाशीही बोलायची सुद्धा इच्छा नव्हती. 

तसाच घरी पोचलो. आत शिरताच शमाचं खळखळून हसणं कानावर आलं. हे तिच नेहमीचंच. काहीतरी फालतू कारणांवरुन हिला हसू येतं. तिच्या हसण्याने आलेला राग तिच्या बाजूला बसलेल्या आईला बघून आणखीनच वाढला. मी तरातरा वर जायला लागलो, तेव्हड्यात शमाचं माझाकडे लक्ष गेलेच. 
"अरे, तू कसा काय एव्हड्या लवकर? no Friday drinks?"

मी आवाजात जास्तीत जास्त वैतागून म्हटलं "नाही, मीच आलो घरी ". 
तसाच वर जाऊन बेड वर पडून राहिलो. 

काही वेळाने शमा आली " अजू, काय झालं? माझ्या जवळ येऊन माझ्या डोक्याला हात लावून म्हणाली "बरं वाटत नाही आहे का तुला?" 

मला तिला सांगावंसं वाटलं की हे प्रश्न आधी बंद कर, मला काही धाड भरली नाही आहे. 
पण मी नुसताच पडून राहिलो. तिची काय चूक होती? तिला कशाला ओरडू मी? माझी स्वतःची आई च अशी वागतेय असं मी कोणत्या तोंडाने सांगू हिला?

माझा चेहरा न्याहाळत ती माझ्या अजून जवळ येऊन बोलू लागली "असा का दिसतोयस? काही झालय का? मला काही सांगशील का?"
मी नकळत बोलून गेलो "काय सांगायचं राहिलं आहे आत्ता? आईने नको ते"
माझं वाक्य संपायच्या आतच, शमा जवळ जवळ ओरडलीच “वाट्टेल ते बोलू नकोस" 

"शमा, अगं शमा, तुला माहिती नाही आहे, माझ्या आईने" मी आता अगदी रडकुंडीलाच आलो होतो. 
"अजय, तुझ्याकडून हि अपेक्षा नव्हती माझी", शमा अजूनही माझं काहीही ऐकून घ्यायला तयारच नव्हती. ही एव्हडी माझ्या आईवर विश्वास ठेवते आणि माझी आई, शी. मलाच लाज वाटायला लागली. आता हिला कसं सांगू?

मी शब्दांची जुळवाजुळव करतच होतो, की शमाच बोलायला लागली,
"अजय, मला नाही माहिती कि तुला कुणी आणि काय सांगितलं आहे ते. तुझे मित्र काही बोलले असतील, पण तू इतका टोकाला जाऊन विचार करशील अस नव्हत वाटलं मला"
आता मात्र मी शमा कडे नुसताच वेड्यासारखा बघायला लागलो. म्हणजे हिला माहिती आहे?
"Do you know about आई and Dr. Parikh? "

शमा शांतपणाने माझ्याकडे पाहत म्हणाली "हो, मला माहिती आहे. आणि त्यात काहीही गैर नाही"

आता मात्र माझं डोकं फुटतंय कि काय असं वाटायला लागलं. मी अक्षरशः किंचाळलोच " Have you gone mad? तुला काही गैर वाटत नाही? अगं, जी बाई आयुष्यभर केवळ एक त्यागाची देवी म्हणून जगली, जिचा सगळेजण आदर्श मानतात. ती, आता या वयात, हे ?" माझ्या तोंडून शब्दच फुटेनात. 

शमा मला मधेच तोडत बोलायला लागली " अजय, प्लीज हळू बोल. आई त्यांच्या रूम मध्ये असतील, हे ऐकायला गेले तर खूप त्रास होईल त्यांना. मला आश्चर्य वाटत ते तुझं. अरे ज्या आईने अख्ख आयुष्यं केवळ तुझ्या सुखासाठी काढलं, स्वतःचा काडी इतकाही विचार केला नाही, त्या आई विषयी तू असे विचार मनात आणूच कसे शकतोस? "

"मग जे मी ऐकलं ते खरं नाही?" मी आवाजावर ताबा ठेवत विचारलं. 

“ते मला माहित नाही, पण मला कळलं ते तुला सांगते "

"म्हणजे तुलाही बाहेरूनच कळलंय, कुणाकुणाला काय माहिती आहे कोण जाणे? काय काय बोलत असतील लोक?" माझा आता पारा चढायला लागला. 

माझ्याकडे निरखत बघत शमा बोलली "मला बाहेरून नाही कळलंय, मला अनु कडून कळलंय "

"काय?" आता तर मी थरथरायला लागलो.  माझी आई माझ्या मुलीला वापरतेय हे असले प्रकार करायला?
"अजय, आधी बस इथे आणि ऐकून हे सगळं " शमाने मला जबरदस्तीने बसवलं. 

"तीन वर्षांपूर्वी जेव्हा आई "DoctorsWithoutBorders" जॉईन करायचं म्हणाल्या तेव्हा तू त्यांना किती support केलेस? तूच कौतुकाने सगळ्यांना आईचे सगळीकडे फिरल्याचे, काम करतानाचे फोटो दाखवत असायचास. आई पण किती आनंदात असतात त्या कामात? तीच त्यांची खरी आवड आहे. She is a giver. केवळ तुझ्यावरच नाही पण त्या माझ्यावर सुद्धा पोटच्या मुलीसारखं प्रेम करतात. त्यांना तेवढच माहिती आहे. त्या कधीही दुसऱ्याला दुखावून स्वतःचं सुख बघूच नाही शकत" शमा एखाद्या लहान मुलाला समजावं तसं मला समजावत होती. 

"डॉ. पारीख यांच्या बरोबर त्या टूर वर गेल्या होत्या आणि त्या दोघांनाही एकमेकांचा खूप आधार झाला. आई मला सगळं नेहमीच सांगत असत.  त्या दोघांमध्येही एक खूप छान मैत्रीचं नातं निर्माण झालं. आईंना या वयात असा एक मित्र मिळाला कि जो त्यांना केवळ एक स्त्री म्हणून न बघता एक सांगाती म्हणून त्यांच्याकडे पाहत होता. असा एक पुरुष जो कि त्यांना स्वतःच्या बरोबरीने वागवून, त्यांचा मान ठेवून एक खूप सुंदर हळुवार नातं जपू पाहत होता.  असं नातं जे कि सामान्य माणसांच्या समजुतीच्या पलीकडचे असतं. आपण प्रत्येक भावनेला काहीतरी नाव देऊन तिला कुठच्यातरी बंधनात बांधून तिला अगदी गुदमरून टाकतो रे"
मी अजूनही संभ्रमातच शमा कडे नुसताच बघत होतो. अजूनही माझ्यातला पुरुष या स्त्री हृदयीच्या भावना समजून घ्यायला तयारच नव्हता. 

"तुझं बरोबर आहे शमा, ती तुझी आई नाही, म्हणून तू हे अलंकारिक वगैरे बोलू शकतेस. ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं." मी अजूनही मानायला तयारच नव्हतो.
“ती माझी आई आहे. तीला दुसरे कोण हवंय कशाला? मी काय कमी पडू दिलंय तिला?”

" You are right, अरे ती माझी आई नाही म्हणूनच तर मी तिला समजून घेऊ शकले. माझी आई असती तर मी सुद्धा तुझ्यासारखीच तिला गृहीत धरली असती. तिचं स्वतःचं आयुष्य आहे हे समजूनच घेतला नसतं. आणि तुला माहिती आहे? माझ्याहीपेक्षा तिला कुणी समजून घेतले ते? तुझ्या अनुने."
आता मी नुसताच बघत राहिलो शमा कडे.

"गेले काही दिवस मी बघत होते कि आई सेंटर वर जात नाहीत. सेंटर वरचे फोन सुद्धा घेण्याचे टाळतात. मला कळेना कि काय झालंय, मी आईंना विचारणारच होते.
आजच दुपारी अनु मला ऑफिस मध्य भेटायला आली. थोडी घाबरलेली होती, तिच्या बरोबर होता डॉ. परिखांचा नातू. दोघेही मला सांगायला लागले, कि गेल्या आठवड्यात डॉक्टरांचा वाढदिवस होता आणि सेंटर वर छोटीशी पार्टी ठेवली होती. तेव्हा या मुलांनी हट्ट धरला कि डॉक्टरांनी आईंना propose करायचं. लहान मुलांचा हट्ट, त्यांना दोघांनाही वाटलं कि हे दोघे एकमेकां बरोबर खूप मजेत राहतील तर मग त्यांनी का नाही काढू उरलेले आयुष्य जसा त्यांना आवडेल तसं?  
पण या सगळ्या प्रकरणात आई मात्र खूप रागावल्या मुलांवर आणि घरी निघून आल्या.
अनुला अजूनही कळत नाही आहे कि, तिचं काय चुकलं?"

माझ्या नकळतच माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. खरंच किती स्वार्थी बनलो आहे मी? इतकी वर्ष, मला का नाही कधीच वाटलं कि आईचं पण मन आहे, तिला सुद्धा भावना, स्वप्नं आहेत. तिलाही कधी वाटलं असेल कि एखादा जोडीदार पैलतीरापर्यंत बरोबर असावा. 
का नाही आपली आई एक माणूस म्हणून पहिली आपण?  तिने आयुष्यात प्रत्येक वेळी मलाच प्राध्यान्य दिलं, पण मी जेव्हा आपल्या आयुष्यात गुंगून गेलो तेव्हा तीच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कशी दिसलीच नाही आपल्याला?

एक जी माझी पत्नी आहे, जिने माझ्या आईला मनापासून समजून घेतलं, दुसरी जी माझी लेक, जिला मी फक्त लाडावून ठेवली आहे असंच
समजत होतो, तिने या वयात आपल्या आजीच्या मनाचा किती खोलवर वेध घेतला?
आणि मी? मी केवळ खोट्या प्रतिष्ठेसाठी माझ्या आईला तिची काहीही चूक नसताना किती दोष देत बसलो होतो. माझ्या कोत्या मनाची मलाच लाज वाटली. 
स्त्री च्या मनाची उंची आणि खोली पुरुष कधीच समजू शकत नाही. आमची मन उथळच.
या तीन स्त्रियांनी आज मला हे दाखवून दिलं.

हळूहळू ढगांतून सूर्यकिरणं डोकावायला लागली होती आणि मला जणू नवा दिवसच नाही तर एक नवं जीवनच घेऊन आल्यासारखी वाटली. 

आईच्या रूम मधला दिवा लागला. ती तयार होऊन फिरायला जायला बाहेर पडतच होती. 
मी हळूच तिच्या पाठीवरची शाल सारखी करायच्या निमित्ताने तिला जवळ घेतली आणि तिच्या कपाळाचे हळुवार चुंबन घेतले. ती नुसतीच माझ्या छातीवर डोकं ठेवून पाणावलेले डोळे पुसत राहिली.
काही सांगायची, विचारायची गरजच नव्हती आता. 

दिवस उजाडताच राहिला…

-- तेजू किरण [ऑक्टोबर १०, २०१६ - न्यू जर्सी, USA
This story is published in Marathi Vishwa [New Jersey] 's Diwali Ank "Rangdeep-2016"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Teju sir tumchi story rudyala touch karun geli..mastach,aani tumchya vicharranmadhe badal jhalyacha aadar vattoy.....Best of luck for next story!!!!!!
@Padma. nahi patnyasarkh yat kahich nahi,tya strichya jagi swatala thevun vichar kara nakki patel.pratyek vyaktila konachya tari aadharachi garaj astech.yat age matter nahi karat.....

@Kaveri that lady was already having much support of son, daughter in law, grand daughter and other friends in the society. So which kind of special support she needed? That is just a blast of compressed lust which is trying to convince sentimental ppl in emotional way..............
nothing else........

Nice

@Padma sir,tya strila ticha mulga ,sun,society che pepole ya sarvankadun support ha miltch hota,pan ek mitra mhanun dr.pratik yancyakadun jo emotionaly support milat hota to ya sarvankadun nahi milu shakat aapan pratyek gost aaplya mulala,sunela,kinva natila aajubajuchya lakanna nahi sangu shakat...tya stricha husband gelyanantar pahilyanda tila koni aapalas vatl yat gair kay aahe? becouse she is female,he tar unfair aahe sir.....................

a thief doesn't surrender by his own will......
I just don't want to overload my thinking on others...

sir,I think tumhi he sagal ego madhe ghetay,mhanun kadachit,and u r not a thief.anyways I don't want to fight with u

chan lihilay...avadali story... samajachi vicharsarani badalat chalaliye asech disun yete ya lekhanatun...

सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनापासून आभार , कथा वाचल्याबद्दल आणि वेळ काढून तुमच्या प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल.
मी स्वतः एक स्त्री आहे , आणि माझ्या आयुष्यात अश्या खूप स्त्रिया पाहिल्या आहेत कि ज्या संपूर्ण आयुष्य केवळ मुलांसाठी किंवा कुटुंबासाठी वाहून घेतात.
आज जेव्हा मी स्वतः पंचेचाळीस च्या वर गेले तेव्हा कधी कधी कल्पनेनेच भीती वाटते कि आपण कधी एकटेच राहिलो तर? आणि अश्या वेळी मनात विचार येतो कि आपल्याला निदान आपल्या जोडीदाराबरोबर खूप छान आयुष्य घालवता आलंय , खूप छान आठवणी आहेत , पण ज्यांना हे नाही अनुभवता आलं आणि जर का आयुष्य अशी संधी उतारवयात घेऊन आलं , तर कुटुंबातले , समाजातले लोक काय म्हणतील या विचाराने त्यांनी ती संधी केवळ वाया घालवावी कि समाजाने त्यांना समजून घ्याव? शेवटी आयुष्य प्रत्येकाला एकदाच मिळतं ना?

एक जी माझी पत्नी आहे, जिने माझ्या आईला मनापासून समजून घेतलं, दुसरी जी माझी लेक, जिला मी फक्त लाडावून ठेवली आहे असंच
समजत होतो, तिने या वयात आपल्या आजीच्या मनाचा किती खोलवर वेध घेतला?
आणि मी? मी केवळ खोट्या प्रतिष्ठेसाठी माझ्या आईला तिची काहीही चूक नसताना किती दोष देत बसलो होतो. माझ्या कोत्या मनाची मलाच लाज वाटली.
स्त्री च्या मनाची उंची आणि खोली पुरुष कधीच समजू शकत नाही. आमची मन उथळच.
या तीन स्त्रियांनी आज मला हे दाखवून दिलं.

खुप छन अहे हा para....

Thanks

Thanks

कथा फार छान आहे. मस्त!!! माझ्या नात्यातल्या जवळच्या स्त्रीने खंबीरपणे मध्यम वयात विवाह करुन, बंड मोडून काढलेले आहे. आणि तरीही तिला जवळचे सख्खे नातेवाईक समजून घेउ शकलेले नाहीत याचे फार वाईट वाटते.
अधिकाधिक विधवा/ विधुर पुनर्विवाह व्हावेत. जर त्यांना वाटत असेल विवाह करावा तर त्यात उगाच सख्ख्या पोटच्या पोरांनी किंवा कोणीही आडकाठी आणू नये.