तळघराचे प्रवेशद्वार उघडायला त्याचा हस्तस्पर्श पुरेसा होता. त्याची रचनाच अशी केली होती की पंडीताखेरीज कुणाचाही कोणताही स्पर्श ते द्वार स्वीकारीत नसे. उघडलेल्या प्रवेशद्वारातील पायऱ्यां वरून पंडित जवळ जवळ तरंगतच गर्भगृहात शिरला. त्याला गर्भगृहाबाहेरील, त्याने वश केलेल्या अमानवी जीवांची पर्वा नव्हती. आतल्या खडकातल्या भिंतीत वेगवेगळ्या पिंजरेवजा कोठड्या होत्या त्यात बळी देण्यासाठी लागणारे प्राणी, माणसे, स्त्रीया आणि बालकेही होती. पण त्यांना योग्य तो आहार देऊन त्यांचे शरीर टिकवून ठेवले होते. ते वेगवेगळया वशीकरण मंत्रांनी भारलेले असल्याने पंडिताचे गुलाम म्हणून ते वावरत होते. त्यांनी एकदम गलका केला. तसेच काही प्रेतेही त्याने मंत्रसिद्धीच्या साहाय्याने जगवली होती . जी, तो म्हणेल ते काम जिवंत माणसासारखे करून येत. पंडिताच्या प्रवेशाला मानवंदना म्ह्णून ते वेगवेगळे आवाज काढीत होते. पण पंडिताला आत्ता कालापव्यय करून चालणार नसल्याने त्याने तिकडे लक्ष दिले नाही. मोठमोठाल्या मशालींच्या आणि धगधत ठेवलेल्या अग्निकुंडांच्या पिवळट लालसर उजेडात कोणत्याच वास्तवतेला थारा नसून सगळेच कसे स्वप्नवत होते. साधारण जनांना तर असे दृश्य पाहून वर्षानुवर्षांची भीती बसली असती. घाईघाईने गर्भगृहात शिरलेल्या पंडिताने त्याच्या उपास्यदेवतेला मंत्रोच्चाराने जागृत केले. देवता म्हणजे एक शतका दीड शतका पूर्वीचे स्त्री शरीर होते. आश्चर्य म्हणजे ते शरीर पूर्ण नग्नावस्थेत असून त्याच्या अंगावर ठिकठिकाणी पिंगट रंगाची रंध्रे होती. त्या रंध्रांद्वारे ती रक्तशोषण करित असे. दर पौर्णिमा आणि अमावास्येला जेव्हा तो खास विधी करीत असे तेव्हा ते शरीर तो बाजूच्या कुंडात रक्त शोषणासाठी बुडवीत असे. आणि त्याला मनसोक्त रक्त शोषणाची संधी देत असे. शिवाय मंत्रविद्येने तो त्यात प्राण प्रोक्षण करीत असे. पंडिताला नक्की किती आणि कोणत्या विद्या येत असत हे त्याला आणि त्याच्या त्या देवतेलाच माहीत. पंडीताचे मंत्रोच्चारण ऐकून देवता प्रसन्न झाली . तिच्या मुखावर जिवंत स्त्री सारखे तेज चमकू लागले. तिचा चेहरा अंडाकृती असून अक्ष मोठाले आणि गोलाकार होते. जागृत झाल्याने तिच्या पापण्या आणि एकूणच चेहऱ्यावर लाली पसरली होती. अक्षांतील बाहुल्या मोठ्या आणि रक्तवर्णी होत्या. किंचितसे गूढ हास्य तिच्या चेहऱ्यावर पसरले होते. लालबुंद ओष्ठांच्या कोपऱ्यांतून रक्तपिपासू सुळे अल्प प्रमाणात दृक्गोचर होऊन चमकत होते. पूर्ण नग्न असली तरी देवता एका वेगळ्याच चैतन्याने चमकू लागली. गळ्यात फक्त एकच अलंकार होता. तो म्हणजे अतिशय बाल्यावस्थेत असलेल्या बालकांच्या शिरांचा हार. चैतन्यामुळे त्यातील बालकेही आता जिवंत वाटत होती. तिची शस्त्रे म्हणजे चारहीहातातील मंतरलेली मानवी शिरे आणि अति विकसित झालेली नखे. आपल्या धीर गंभीर आणि गूढ आवाजात ती विचारती झाली " वत्सा, कोणती मनीषा धरून मला तू जागृत केले आहेस ? " मग चित्र विचित्र आवाजात ती हसली. देवतेच्या चेहऱ्यावर तेव्हा रक्ताळल्या सारखा लालिमा पसरला होता. हास्याबरोबरच तिचे सुयोग्य दर्शन पंडितला झाले. तो समजला देवता प्रसन्न चित्त आहे. आपली मनीषा लागलीच पूर्ण होईल. आत्ताच तिला नैवेद्य दाखवण्याची आवश्यकता नाही.
पंडित काकुळतीने म्हणाला, " माते, माझ्या विवाहाबाबत तुला विदित केलेच होते. आजच्या शुभ दिनि माझा विवाह संपन्न होत असताना वधूने वेदीवरुन पलायन केले. माते, तिचे निवासस्थान मज ज्ञात नाही. ते मला समजावे आणि तिची व माझी भेट व्हावी माते. तुझ्या दर्शनाला येता यावे हीच माझी मनीषा आहे. माते वर दे, आशिर्वाद दे. माते . बळ दे. माते.......... " आवाज तळघरात घुमला. परत एकदा सगळ्याच भारलेल्या प्राण्यांनि, माणसांनी आणि प्रेतांनी विचित्र आवाज काढून त्याला अनुमोदन दिले. असं काही झालं की त्यांना खास खुराकही मिळत असे आणि कोणाचा बळी जाईल याची माहिती नसल्याने ते रडतही असत. देवतेच्या मुखावरचे हास्य पाहून पंडित म्हणाला, " या हास्याचा अर्थ काय समजावा? " उत्तरादाखल देवतेने आपल्या उजव्या हाताने गर्भगृहाबाहेर असलेल्या एका जलकुंडाकडे अंगुलिनिर्देश केला. आणि तिच्यातले प्राण अंतर्धान पावले. ती परत एखाद्या शवाप्रमाणे दिसू लागली तिची
मुद्रा सुकली. तिचे सगळेच अवयव एखाद्या दगडी मूर्तीप्रमाणे जड झाले. आणि तिचे अक्ष दृष्टिहीन झाले. अक्षातील रक्तवर्णी बाहुल्या मागे वळल्या आणि ते पांढऱ्या कवड्यांसारखे दिसू लागले. आता पंडित माघारी फिरला. गर्भगृहाबाहेर आल्यावर देवतेच्या वाम दिशेला असलेल्या जलकुंडात त्याने वाकून पाहिले. त्यात जल स्थिर झाल्यावर त्याला असे दिसले, की एका गवाक्षाला लागून असलेल्या मंचकावर 'कुणी रुग्ण स्त्री वेदनेने व्याकुळ झालेली आहे आणि तेथिल गवाक्षाच्या तावदानावर एक भयानक पक्षीही बसल्याचे त्याला दिसले. त्याला त्या पक्षाचा अर्थ लागेना. गवाक्षाच्या रचनेवरून त्याला ते महाराजांच्या महालाच्या गवाक्षासारखे असल्याचे वाटले. पण तो सांशक होता. . अश्या बऱ्याच इमारती असण्याची शक्यता होती. त्याला विचार करण्यात काळ घालवणे अयोग्य वाटले. त्याचा अंदाज डळमळीत होता, परंतू कार्यात विघ्न येऊ नये म्हणून त्याने पुन्हा एकदा देवतेच्या कृपेची करूणा भाकली होती. त्यात एका पक्षालाही सूचित केल्याचे पाहून त्याला काहीतरी विचार सुचला. मग स्वतःचे रुपांतर दाखवलेल्या पक्षात करण्यासाठी त्याने बाजूच्याच मानवी कातडी पासून निर्मिलेल्या पुस्तकाची पाने चाळण्यास सुरुवात केली. अशा रितीने त्याने काकुळतीने जवळच्याच कोनाड्यातील बरीच पुस्तके चाळून पाहिली. तेव्हा कुठे एका जीर्ण शीर्ण पुस्तकात त्याला त्या पक्षाचे वर्णन सापडले आणि निर्मिती मंत्रही. काळ त्याच्या हातून गळून जात होता. त्याचा आता धीर सुटत चालला होता. त्याने तो मंत्र जपायला सुरुवात केली. पण काहिच घडले नाही. आता मात्र तो क्रोधित होऊन परत देवतेकडे धावला. पुन्हा एकदा जागृतावस्थेत यावे लागल्याने देवता थोडी अप्रसन्नता दाखवीत म्हणाली, " वत्सा, क्रोध आवर. तो चांडाळ आहे. ( जणू पंडित अगदी सत्त्वशील ब्रह्मज्ञ होता ) तुझी विवेक बुद्धी नष्ट करील. " असे म्हणून देवतेने आपल्या शक्तीने भारीत होऊन त्यास पूर्णतया अगम्य असा मंत्र दिला. आणि ती सुप्तावस्थेत गेली. मंत्र अगदीच अगम्य असल्याने काल नष्ट होऊ लागला. मंत्र समजून घेण्यात काही काल व्यतित झाला. आणि नंतर जवळ जवळ दोन घटिका व्यर्थ गेल्यावर मात्र मंत्रोच्चाराने पंडिताचे रुपांतर पुस्तकात दाखवलेल्या पक्षामध्ये होऊ लागले. पण वेगळयाच चिंतेने त्याला सतावले. विवाहासाठी आलेले सर्वच फार वेळ प्रतीक्षा करणं शक्य नव्हतं. ते तेथून गमन करते झाले असण्याची शक्यता जास्त होती. म्हणजे पर्यायाने त्याची मानहानीच होती. परंतु ही पलायन योजना पंडिताची असली तरी पंडित स्वेच्छेच्या विवाहावेळच्या सौंदर्याने चांगलाच भारला गेल्याने आणि आपली . अमर्याद कामेच्छा पूर्ण करून घेण्यासाठी उतावीळ असल्याने त्याने योजना बाजूस सारली होती. खरंतर आलेल्या सरदार दरकदार आणि राजकारणी व्यक्तिंकडून नजराणे स्वीकारण्याने त्याच्या संपत्तीत फार मोठी भर पडणार नसल्याने तो तसा त्यांच्या प्रतीक्षेची चिंता करीत नव्हता. प्रश्न फक्त त्याच्या अपकीर्तीचा होता आणि धूम्रकाळात राज्यातील अर्थव्यवस्था बिघडवण्याची योजनाही सिद्धीस नेणे आवश्यक होते. म्हणजे आचार्यांची सत्ता थोडी तरी डळमळीत झाली असती. असो. ........ देवतेने पूर्ववत होण्याचा मंत्रही त्यास दिला होता......... प्रथम पंडिताचे मोठे नाक चोचीमध्ये रुपांतरीत झाले आणि उरलेल्या शरीराला पक्षाचा आकार प्राप्त होऊन पिसे निर्माण झाली. हळूहळू तो एक पूर्ण शक्तिमान असा शिकारी पक्षी झाला. त्याच्या चोचीत दंतनिर्मितीही झाली. पंखांना मोठ मोठ्या नख्या निर्माण झाल्या आणि एक प्रकारचा भयानक चित्कार तो पक्षी करू लागला. त्याच्या आवाजाने आजूबाजूची सगळी चेतन अचेतन प्राणी आणि प्रेते घाबरून रुदन करू लागली. आता तो उडत उडत प्रवेशद्वारानिकट आला आणि उंच झेप घेऊन तो अवकाशात उडाला. अर्थातच प्रवेशद्वार परत पूर्वीप्रमाणेच मिटले. जेमतेम अर्ध्या घटकेत पंडित महाराज्यांच्या इमारतींच्या कोंडाळ्यातील एका गवाक्षा बाहेर येऊन ठेपला. गवाक्ष आतून लावलेले असल्याने आतले दृश्य त्यास दिसले नाही. त्यावेळी नेमके राजवैद्य आत होते. पक्षीरुपी पंडिताने बाहेरच एका झाडावर ठाण मांडले. पण पंडिताला ते ओळखता आले नाही. तो परत इकडे तिकडे उडून स्वेच्छेची इमारत शोधू लागला. आता संध्या समय झाल्याने त्याने महालाच्या अंतर्भागात जाण्याचे ठरवले. महालातील सगळ्याच इमारती एकमेकींना जोडलेल्या होत्या. आपली विशालता टाकून आता त्या पक्षाने अतिशय छोटे रुप धारण केले. आतल्या घुमटाकार भागांमध्ये फिरून त्याने प्रथम स्वेच्छेचा कक्ष शोधण्याचे ठरवले. अचानक त्याला कामिनीदेवी त्यांच्या कक्षातून बाहेर येताना दिसल्या. त्याबरोबर त्याने महाराजांचा कक्ष जवळच असल्याचे अनुमान बांधले. तो परत आत उडू लागला. महालातील काही व्यक्तींना तो ओळखत होता. घाईघाईने जाणाऱ्या पिंगलाक्षाला पाहून, (त्याला तो ओळखत होता) तो त्याच्या मागे उडू लागला. पण तो ज्या कक्षात गेला तो कक्ष त्याने लावून घेतल्याने त्याला आत शिरता आले नाही की तो कुणाचा कक्ष आहे, हे ओळखता आले नाही. पण त्याने त्याच्यावर पाळत ठेवण्याचे ठरवले. काही काल गेल्यावर त्याला एक वैद्यराजांसारखी दिसणारी व्यक्ती कक्षाबाहेर येताना दिसली. याचाच अर्थ या कक्षात कोणी तरी व्यक्ती रुग्णाइत आहे. म्हणजे हा पिंगलाक्षाचा कक्ष नक्कीच नाही. तसेच कामिनीदेवींचाही नाही, कारण त्या त्याला प्रवेश करतानाच दिसल्या होत्या. मग इथे कोण होते. स्वेच्छा तर नाही? पलायन प्रसंगी तिला कुणी जख्मी तर केले नाही. अजून पिंगलाक्ष बाहेर ये नव्हता. त्यामुळे कक्षात प्रवेश मिळवणं अशक्यप्राय होतं. नक्की आत पिंगलाक्षच आहे की आणिखीही कोणी? स्वेच्छा
खरोखरीच आत आहे किंवा नाही हे कळण्याला काहीच मार्ग नव्हता. त्याने आता पिंगलाक्षाची प्रतीक्षा केली. काही समयानंतर पिंगलाक्ष बाहेर आला. पुन्हा लागणाऱ्या दरवाज्याच्या आंतरभागात प्रवेशून त्याने नजर फिरवली. कक्ष प्रवेशद्वार आता लावले होते. आंतर भागात एका मंचकावर कुणी तरी निद्राधीन होते आणि निकटच एक दासी किंवा बटकी नम्रतेने उभी होती. कक्षात अर्धवट प्रकाश होता. दीप प्रज्वलित केला असला तरी अगदी जेमतेमच होता. कदाचीत मंचकारूढ झालेल्या व्यक्तीला अतिप्रकाशाने अस्वस्थता आली असती. आतल्या एका झुंबराच्या मध्यभागी स्थिर होऊन पंडित पाहू लागला...........
पंडिताला अजून कळले नव्हते की मंचकावरील निद्राधीन स्त्री स्वेच्छा आहे. तो घिरट्या घालून निरिक्षण करू लागला. त्याबरोबर मंचकानिकट बसलेल्या सुस्मितेला त्याच्या उडण्याचा आवाज ऐकू आला. तिने ऊर्ध्व दिशेला पाहिले. तिला एक अतिशय छोटेखानी पक्षी दृष्टीस पडला. ज्याचे रूप लोभस वाणे होते. डोळे गुंजेसारखे लाल आणि पंख मात्र राखी रंगाचे. पोटाकडला भाग पिवळट रंगाचा होता. पंडिताने आता जाणून बुजून रंग बदलला होता. सुस्मितेला तो फारच आकर्षक वाटला. परंतु नसती भूतदया निर्माण झाल्याने तिने त्याच्या गमनासाठी समोरचे गवाक्ष उघडले. आता मात्र पंडिताने आपले पंख फडफडवीत स्वेच्छेच्या निकट उडण्यास सुरुवात केली. एक दोन वेळा भिरभिरताना पाहून सुस्मितेला भीती वाटली आणि तिने मोठ मोठ्याने सुरक्षा रक्षकांना पाचारण करण्यासाठी आकांत सुरू केला. त्याबरोबर स्वेच्छेची निद्रा भंग होऊन तिने मुखावरचे आवरण दूर सारले. ते पाहून पंडिताने तिला ओळखले व तो उडून गवाक्षाच्या तावदानावर जाऊन बसला. आता मात्र सुस्मितेने त्यास यष्टिका दाखवून त्यास उडवले. गवाक्ष लावून घेण्याचा तिने प्रयत्न केला. पण त्यावेळेस पंडित त्याच्या मूळ पक्षिरूपात परतला. त्याचे रौद्ररूप पाहून सुस्मितेचे वदन भयाने ग्रासले. स्वेच्छेलाही प्रथम विस्मय वाटला. मग हळू हळू त्याची जागा भयाने आणि अचंब्याने घेतली. आता गवाक्ष मिटवणे दोघींनाही शक्य नव्हते. भयाचा पहिला बहर ओसरल्यावर सुस्मिता भानावर आली आणि तिने कक्षाचे प्रवेशद्वार उघडले. पण ते न मिटवता ती पिंगलाक्षांच्या कानावर ही वार्ता घालण्यासाठी त्यांच्या कक्षाच्या दिशेला पळत पळत ती गेली सुद्धा. पण पिंगलाक्ष कक्षात नव्हते. मग मात्र तिथल्या सुरक्षा रक्षकांनी तिला एवढ्या तातडीने त्यांना भेटण्याचे कारण विचारले..........
इकडे कक्षात पंडिताने गवाक्षबाहेरून पाहिले की स्वेच्छेशिवाय आत कोणीही नाही. मग तो आपले अंग चोरून प्रवेश करता झाला. अंधुक प्रकाशात स्वेच्छा त्या पक्षाकडे पाहू लागली. आणि स्वसंरक्षणासाठी बाजूलाच पडलेली यष्टिका घेतली. ते पाहून पंडित आपल्या मानवी रुपात येऊन म्हणाला, " तू जिंकशील असं वाटलं की काय तुला. तुझे अतिलहान पक्षात रुपांतर करून माझ्या महालाकडे घेऊन जाणार आहे. त्यावर स्वेच्छा म्हणाली, " कामातुर होऊन आपण असला निर्णय घेऊ नये. कारण ठरल्याप्रमाणे माझा प्रवेश महाराजांच्या महालात झालेला आहे. आपल्या दोघांहे उद्दिष्ट वेगवेगळे असले तरी मार्ग एकच आहे. पण आपण तर आपल्या योजनाच नष्ट करायला निघाला आहात. हेतू साध्य झाल्यावर मी आपणाकडे येणारच आहे. " अर्थातच स्वेच्छेच्या मनात तसे नव्हतेच. त्याच्याबरोबर विवाह ही एक राजकीय खेळी होती. पण कामातुर पंडित काहीही विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हता. इतका ज्ञानी आणि मुत्सद्दी असूनही तो असा का वाहवत चालला होता कुणास ठावूक. त्याचा हा मूर्खपणा दोघांनाही कोंडीत आणणारा होता. तेवढ्यात कक्षाच्या द्वारावर मोठमोठ्याने हस्तनाद होऊ लागल्याने पंडित पुन्हा एकदा छोट्या पक्षाच्या रुपात गेला. गवाक्षाबाहेर जाऊन त्याने जवळच्याच एका वृक्षावर ठाण मांडले. त्याला आता स्वेच्छेचा कक्ष ज्ञात झाला होता.................
कक्षाबाहेर असलेल्या सुस्मितेने रक्षकांना कसेतरी समजावून आणले होते. खरेतर ते येण्यास इच्छुक नव्हते. त्यांना मुळी एका पक्षापासून भय वाटते हे सुरक्षिततेच्या आवश्यकतेचे कारण होत नाही असे वाटत होते. असे ते म्हणालेही. सध्या पिंगलाक्ष नसल्याने रक्षक अनिच्छेनेच स्वेच्छेच्या कक्षाजवळ आले होते. कक्षाचे द्वार योग्य रितीने न लावल्याने लवकरच उघडले गेले. आणि आत प्रवेशलेल्या रक्षकांना आणि सुस्मितेला कोणताही पक्षी दृष्टीस न पडल्याने रक्षकांना तवक आला आणि कालापव्यय झाल्याने ते सुस्मितेशी अद्वतद्वा भाषण करू लागले. मग मात्र स्वेच्छेने मध्ये हस्तक्षेप करीत जे घडले ते काहीही न लपवता निवेदन केले. तेव्हा कुठे रक्षकांचे समाधान झाले. पण त्या दोघींना गवाक्षाला लागून असलेल्या वृक्षावर बसलेला पक्षी रक्षकांच्या दृष्टीस आणून देण्याचे विस्मरण झाले. रक्षक गेल्यावर त्यांना त्याचे भान आले. असो. ते इतके महत्त्वाचे वाटले नाही. वास्तविक पाहता पक्षी दृष्टीस आणला असता तर रक्षकांनी त्याचे पारिपत्य केले असते. कदाचित नसतेही केले. कारण त्यांचा विश्वास बसणे जरा अशक्यच होते. इकडे पंडित वाट पाहून जेरीस आला होता. मग त्याने थोडा
साकल्याने विचार केला. खरेच, स्वेच्छेचे विचार योग्य आहेत. आपली योजना सिद्धिस जावी यासाठी असे वाटत असेल तर तिचे पलायन हे पलायनच वाटावे यातच आपला आणि तिचा लाभ आहे. परंतु पंडिताने तिच्या लाभाचा विचार लागलीच झटकून टाकला. स्त्री सारखी उपभोग्य वस्तूस होणारा लाभ याचा आपण विचार करण्याची आवश्यकता नाही. मग त्याने परत विवाहस्थानि गमन करण्याचा निश्चय केला आणि परराज्यातून आणलेल्या मुद्रा पौरजनांच्या ओंजळीत दान रुपाने घालण्याची संधी न सोडण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने श्रीपालालाही मुक्त करण्याचे ठरवले. म्हणजे फक्त श्रीपालालाच. त्याच्या सोबत आलेल्या ब्रह्मवृंदाला मात्र त्याच्या मुचलक्याच्या दृष्टीने कारागृहात ठेवण्याचे ठरवले. आणि श्रीपालाचे एकूण सोडल्यानंतरचे वर्तन पाहून मगच शेष ब्राह्मणांना सोडण्याची खेळी योग्य वाटली. उडता उडता त्याने देवतेला कष्ट दिल्याने तिचे क्षमामापन करण्याचे ठरवून तिला उत्तम बळी अर्पण करण्याचे ठरवले. अर्ध्या पाऊण घटिकेतच तो परत तळघराजवळ परतला. आपल्या मूळ रुपात आल्यावर त्याने गर्भगृहातील देवतेचे क्षमामापन स्तोत्र व मंत्रजप केला. परंतु देवतेचे मुखकमल कोपाने रक्तवर्णी होत असलेले पाहून पंडित घाबरला. त्याने त्वरा करून प्रथम स्वत; च्या वामहस्तास छेद देऊन उष्ण रक्ताचा अभिषेक तिच्या चरणकमली केला. परंतु देवतेचे वदन कोपयुक्तच राहिल्याने त्याने बाहेरच्या पिंजऱ्यातील एका बालकाचे शीर धडावेगळे करून तिच्या मस्तकावर एका सुवर्ण पात्रात जमवलेल्या त्याच्या रक्ताने तिला स्नान घातले. तेव्हा कुठे तिला काही प्रमाणात संतोष झाला. त्यावर ती म्हणाली, " अशा रितीने आज्ञा उल्लंघून केलेल्या कर्माची शिक्षा खरंतर तुला द्यायला हवी, पण केवळ तू माझा दासानुदास असल्याने सांप्रत तुजला क्षमा करीत आहे. " त्यावेळी तिचे नेत्र अर्धकोपयुक्त आणि अर्धक्षमायुक्त भावनेने भरून गेले. पण पुन्हा पुन्हा क्षमामापन आणि दंडप्रमाण केल्याने पंडित त्या पापापासून मुक्त झाला. त्याच्या आजपर्यंतच्या आयुष्यात असा अनुभव त्यास कधी आला नव्हता. आता त्याने कच्च्या कारागृहात असलेल्या श्रीपालाकडे आपला मोहरा वळवण्याचे ठरवून तो विवाह स्थानी अवतीर्ण झाला............ परंतु अचानक आलेल्या पर्जन्याने सर्वच विवाहस्थानी आलेल्या वऱ्हाडी मंडळींची त्रेधा उडवून दिली. हा अवेळी आलेला पर्जन्य म्हणजे एक प्रकारचे राज्यावरचे अरिष्ट होते. परंतु पंडिताच्या देवतेची अवकृपा होती हे, तो स्वतः सोडून कोणालाच कल्पना नव्हती. ते जाणणं हे फक्त आचार्यांच्या ज्ञान कक्षेत होते आणी संतरामांच्याही. देवी मात्र अशा पर्जन्याने उत्तेजित झाल्या आणि तात्पुरत्या स्वरूपाचे समाधान करवून घेण्यासाठी त्यांनी प्रज्ञेला पाचारण केले. परंतु त्यांना ही पंडिताची माया असल्याचे जाणवले नाही. महाराजांनाही असल्या पर्जन्य सरींचा अर्थ ज्ञात होता. त्यांनी त्यांचा एक खास दूत आचार्यांकडे पाठवला म्हणजे काही उपाय असल्यास तो वेळीच करता यावा अशी त्यांची मनीषा होती.
.....................................................................
लवकरच राज्यस्थापनेचा वर्धापन दिन समीप येऊ लागला. अशा वेळी राज्यात उत्साहाचे वातावरण असायचे. महाराजांच्या खापर पणजोबांपासून असा उत्सव साजरा केला जाई. खास दरबारी लोकांच एक मंडळ महाराजांना भेटण्यासाठी येत असे. त्या भेटीत उत्सवाची पूर्ण योजना आखली जायची. तीन दिवसांचा हा उत्सव तरूणांना त्यांचे कसब दाखवण्यासाठी उपलब्ध करून दिला जाई. अनेक कलाकारांना पारितोषिकेही वितरित केली जात असत. तसेच या उत्सवाच्या कालावधीत अनेक तरूणांचे विवाहही ठरवले जायचे. माघ महिन्याच्या पंचमीला असा उत्सव साजरा होत असे. परंतु अवेळी आलेला पर्जन्य सगळ्यांनाच भय निर्माण करू लागला. देवी आपल्या कक्षात प्रज्ञेची प्रतीक्षा करीत होत्या. लवकरच प्रज्ञा प्रवेश करती झाली. तिला प्रथम देवींनी सुलक्षेच्या पुत्राची वार्ता काढण्याचा आदेश दिला आणि तो महाराजांच्या हाती लागण्या आधी आपल्या हाती लागला पाहिजे असे बजावले. कोणतीही किंमत देऊन त्याला त्यांनी दुसऱ्या दिवशीच्या संध्यासमयी घेऊन येण्यास बजावले. निदान पुत्र एक पौगंडावस्थेत असला तरी सध्याच्या उपभोगासाठी त्याचा उपयोग करून घेऊन सुलक्षा ज्या मार्गाने गेली त्याच मार्गाने त्याला पाठ्वले तर कोणताच माग राहणार नाही असे देवींना वाटत होते...... प्रज्ञा एक उत्तम आज्ञाधारक दासी होती. आणि देवींच्या असल्या कर्मांमध्ये अत्यंत विश्वासाने सामिल होत असे. त्याचा लाभही तिला चांगलाच मिळत असे. असल्या लाभाच्या साहाय्याने तिने स्वतःचा छोटेखानी महाल गावाकडे बांधण्याचे निश्चित केले होते. प्रत्यक्ष संतरामांचा उल्लेख न करता देवींनी महाराजांना आडवळणाने त्यांनाही निमंत्रण देण्याचे ठरवले होते. महाराज अतिशय चतुर असल्याने त्यांनी पण देवींशी एकूणच महत्त्वाच्या कोणत्या व्यक्तींना निमंत्रणे गेली असल्याचे कळवण्याचे ठरवले. आणि देवींवर जवळून लक्ष ठेवण्यासाठी सोमूचा खास सहाय्यक अंधक यास सांगितले होते. तो असल्या गुप्त कर्मांमध्ये निपुण होता. आणि त्याला स्त्रियांवर लक्ष ठेवण्याचा अनुभव चांगलाच होता. शत्रूच्या स्त्री हेरांना फोडण्याचे कर्म तो फार कौशल्याने करीत असे. त्याचे कर्म नेहमीच अंधारातले असल्याने त्याची दृष्टी सूर्यास्तानंतरच प्रभावी होत असे. वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधण्यात त्याचा हात धरणारा राज्यभर तरी कोणीही नव्हता.
अचानक एके दिवशीच्या दरबारात महाराजांना एका दरबारी व्यक्तीने नजराणा म्हणून आणलेल्या वेगवेगळ्या खास जिनसांमध्ये काही सुवर्ण मुद्राही होत्या. मात्र त्या जास्त तेजस्वी वाटल्याने महाराजांनी सोमूच्या मदतीने परराज्यातल्या आहेत असे ठरवले. त्या दरबारी व्यक्तीला मग लवकरच सोमूने कुणालाही नकळत कारागृहात दाखल केले. पुढील शोध घेण्यासाठी महाराज त्याला आपल्या खास कक्षात बोलवीत, सोबत सोमू आणि इतर अंगरक्षकही असत. जवळ जवळ तीनचार दिवस छलयंत्रांचा वापर केल्यावर त्याने सुदेश पंडिताचे नाव घेतले. आता मात्र सोमू उतावीळ होऊन महाराजांना म्हणाला, " आदेश दिल्यास या घटकेला त्या अघोरी पंडिताला घेऊन येतो. म्हणजे सगळेच कूट उलगडेल. " परंतु महाराजांनी त्याला तशी उत्तेजित कृती करण्यास पासून परावृत्त केले. कारागृहात डांबलेला दरबारी एका राजकारणी सरदाराचा पुत्र असल्याने सखोल विचार करण्याचे महाराजांनी ठरवले. सदर सरदार अत्यंत पराक्रमी आणि महाराजांच्या सैन्यात अतिउच्च पदावर विराजमान होता. अशा परिस्थितीत गुप्त खेळी खेळूनच या समस्येवर समाधान निघाले असते याची महारजांना जाणीव होती. वर्धापन दिनाचे निमित्त साधून महाराज बऱ्याच समस्यांची उकल करणार होते. त्यात देवी, पंडित, सदरचा उच्च पदस्थ अधिकारी आणि इतर सर्वजण, जे जे म्हणून परराज्यातल्या मुद्रांच्या प्रसाराला जबाबदार होते ते सर्वच विचारात घेतले होते........
प्रज्ञेला आदेश मिळाल्यावर तिने प्रथम सुलक्षेचे निवासस्थान शोधले. सुलक्षा एक प्रामाणिक दासी होती. नगरातल्या उत्तम आणि विकसित झालेल्या विभागात राहात होती.
(क्र म शः )
हा हि भाग छान झाला . पुढिल
हा हि भाग छान झाला . पुढिल भागाच्या प्रतिक्शेत.
tumchya katha manala guntvun
tumchya katha manala guntvun thevnarya astat..ek bhag vachla ki kdhi pudhcha bhag yeto as vatat
तळघराचे प्रवेशद्वार उघडायला
तळघराचे प्रवेशद्वार उघडायला त्याचा हस्तस्पर्श पुरेसा होता.>> एकदमच आधुनिक की..
आणि बरोबरीने मुद्रांचा घोटाळा पण.. अगदीच सध्य परिस्थितीवर भाष्य..
मस्त आहे कथा. पुढचा भाग पटापट
मस्त आहे कथा. पुढचा भाग पटापट टाका
छान !!!
छान !!!