वयस्कर व्यक्तींचे आपल्या जीवनातील स्थान

Submitted by सचिन काळे on 8 November, 2016 - 07:01

गेले तेवीसएक वर्षे आमचं त्रिकोणी कुटुंब आहे. मी, सौ.आणि एकुलती एक मुलगी. घरात आमच्यापेक्षा वयस्कर असं कोणी नाही. आजपर्यंत रोजच्या जगण्यामध्ये विविध प्रकारच्या अडीअडचणींना सामोरे जावे लागूनही ईश्वरकृपेने तावून सुलाखून मी त्यातून सहीसलामत बाहेर आलोय.

पण त्या अडीअडचणींचा सामना करताना प्रत्येकवेळी माझ्या मनात सतत हा विचार येई कि आपल्या घरात आपल्यापेक्षा कोणीतरी वयस्कर अशी व्यक्ती असायला हवी होती. जीच्याकडे मीे आपली अडचण सांगावी.त्यावर तिचा सल्ला घ्यावा. तिने आयुष्यभर खपून आपल्या गाठी बांधलेल्या अनुभवाचा आपण फायदा घ्यावा. तिला आपले दुःख सांगावे. तीच्याजवळ आपले मन मोकळे करावे. तीच्याकडून आपल्या मनाचं सांत्वन करून घ्यावं. इतर कशाविषयी असलेला राग तीच्याजवळ व्यक्त करून आपलं डोकं शांत करावं. आपल्याला झालेला आनंद तीच्याबरोबर वाटून तो द्विगुणित करावा. आपण निराश झालो असताना तीच्याकडून चार मोलाच्या गोष्टी ऐकून आपल्या मनाला उभारी द्यावी. सणासुदीला तीच्याकडून रितिरिवाज जाणून घेऊन सण साजरे करावेत.

पण काही अपरिहार्य कारणांमुळे माझ्या संसारात मला माझ्यापेक्षा वयस्कर व्यक्तीची सोबत मिळाली नाही. आणि ह्यापुढेही मिळण्याची शक्यता नाही. आज मी आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे, जिथे माझे आतापर्यंत जीवनातील बरेच बरेवाईट अनुभव घेऊन झालेत. मी माझ्या मुलीकरिता वयस्कर आहे, जी माझ्यात आपला आधार शोधते. तीच्या अडीअडचणीच्या काळात मी तीच्यामागे खंबीरपणे उभा रहातो. असं असूनसुद्धा अजूनही माझ्या आयुष्यात असलेली माझ्यापेक्षा वयस्कर व्यक्तीची उणीव मला सतत भासत असते, जी शारीरिक, आर्थिक नव्हे तर माझ्या मानसिक आधाराची गरज भागवू शकेल.

आपण कितीही म्हातारे झालो तरी आपल्या मानसिक गरजा पूर्ण करण्याकरिता आपणांस आपल्यापेक्षा वयस्कर व्यक्तींचीच नेहमी गरज भासते. मग भले ते आपले आईवडील असोत किंवा आपल्या कुटुंबातील इतर कोणीही वयस्कर व्यक्ती. आपल्या जीवनातील त्यांचे स्थान अढळ आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान विचार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना दत्तक घेऊ शकता. असे अनेक आज्जी आजोबा असू शकतात जे आपल्या अनुभवाचा फायदा इतरांना द्यायलासदैब्व तत्पर असतात.

कित्येक कुटुंबांमधे नवरा बायको दोघंही बाहेर असल्याने ज्येष्ठांची काळजी घेणं शक्य होत नाही. वृद्धाश्रमात ठेवणे मनाला पटत नाही. अशा लोकांनी आपले सासू सासरे दत्तक म्हणून गरजूंना द्यायला काय हरकत आहे. सचिनजी, तुम्ही इथे आवाहन केलंत तर कुणी न कुणी मोठ्या मनाने आपल्या घरातले ज्येष्ठ तुमच्याकडे पाठवायला तयार होतील. तुमचेही काम होईल.

असं असूनसुद्धा अजूनही माझ्या आयुष्यात असलेली माझ्यापेक्षा वयस्कर व्यक्तीची उणीव मला सतत भासत असते, जी शारीरिक, आर्थिक नव्हे तर माझ्या मानसिक आधाराची गरज भागवू शकेल.
<<

याच्यासाठीच लोक उतारवयात देव-देव करू लागतात.

दुरून डोंगर साजरे . तुम्हाला वयस्कर लोकांची नाही तर आई-वडिलांची उणीव भासते आहे. कोणी जीवलग असेल तर ठीक, नाहीतर थेरपिस्ट आहेतच.

योग्य विषय मांडलात ............
तुमच्या नातेवाईकांमध्ये ती व्यक्ती मिळू शकते ..........

निसर्ग नियमानुसार मागची पिढी पुढच्या पिढीच्या किमान तीसेक वर्षे आधी निघून जाते.

हा निसर्गाचा नियम आहे... तुमचे वय साठ असेल आणिअजुन माझ्याही वरचा कुणीतरी नव्वद वर्षाचा बरोबर असावा असे वाटत असेल, आता त्या नव्वदीच्या व्यक्तीलाही कुणीतरी १२० चा बरोबर असावा असे वाटू लागेल...

इच्छा असणे चुकीचे नाही, पण निसर्गनियमानुसार शक्य आहे का?

प्रत्येक वयस्क माणूस तुम्हाला अपेक्षित आधार देईलच असे नाही. मला तरी उलटे अनुभव आलेत. विचारांमध्ये खूप गॅप पडत असल्याने संवाद साधणे कठिण होते, बरे सतत बोलत बसलो नाही तर आपण दुर्लक्ष करतोय असे त्यांना वाटत राहते. प्रत्येक गोष्टीबद्दल अवास्तव काळजी, प्रश्न इत्यादी गोष्टींमूळे नकोसे वाटत राहते. एकूणच विचित्र परिस्थिती होऊन बसते. आपल्याला घरात ते हवे तर असतात, त्याबद्दल प्रश्नच नाही. पण आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीत त्यांची ढवळाढवळ नको असते आणि वयस्कांना दुसरे काहीच काम नसल्याने ते हि ढवळाढवळ खूप करतात. Happy

अगदी बरोबर साधना, वयस्कर लोक सकारात्मक विचारांचे असतील तरच आधार वाटतो...नाहीतर कायम सहानुभूती चे बोलणे....मनाचे नाते जुळले, अपेक्षा नसतील तर बिगर-नातेवाइक/शेजारी सुध्दा आधार देउ शकतील

माझा एक फन्डा आहे, जे तूम्हाला इतरांकडून हवे असते ना, ते तूम्ही इतरांना द्यायला सुरुवात करा. त्यात जास्त आनंद असतो !

>>ज्येष्ठ नागरिकांना दत्तक घेऊ शकता. असे अनेक आज्जी आजोबा असू शकतात जे आपल्या अनुभवाचा फायदा इतरांना द्यायला सदैब्व तत्पर असतात.>>
सपना, ही कल्पना कितीही रम्य वाटली, तरीही लहान मूल दत्तक घेणे आणि वयस्कांना दत्तक घेणे यात फार फरक आहे. वयस्क व्यक्तीना आपापला भूतकाळ असतो. बर्यावाईट अनुभवांचं ओझं असतं. त्यासह त्यांना स्वीकारणं सोपं असत नाही. त्यांनाही आणि दत्तक घेणारालाही.

सर्व प्रतिसादकर्त्यांचे जाहीर आभार!!! आपण कितीही म्हातारे झालो तरी आपल्या मानसिक गरजा पूर्ण करण्याकरिता आपणांस आपल्यापेक्षा वयस्कर व्यक्तींचीच नेहमी गरज भासते. हा जो माझा विचार मी व्यक्त केला आहे, त्यांस बऱ्याच प्रतिसादकर्त्यांनी दुजोरा दिला. मला वाटलं होतं कि फक्त मलाच असं वाटतंय कि काय? पण नाही. माझ्याबरोबर बोटीत अजून बरेचजण आहेत, हे समजून मला किती बरं वाटतंय म्हणून सांगू!!!

आपल्या सहकार्याकरीता पुनः एकवार धन्यवाद.

हे असे त्रिकोणी, चौकोनी कुटुंबियांना कधी कधी वाटत असेल. तर काही जणांना वयस्कर आपल्यामधे नको तितकी लुडबूड करताहेत, स्वतःचे मत लादताहेत (जरी चालू परिस्थिती वेगळी झाली असेल, जशी भारतात गेल्या तीस वर्षात झाली आहे), असेहि वाटू शकते.

मानसिक आधार देणारे, अधून मधून उपयोगी सल्ला देणारे असे लोक आपल्या आयुष्यात हवेच, पण ते वयस्कच असावे असे नाही.

साधना यांच्याशी सहमत. वयस्क म्हणजे अनुभवी, जास्त समज असलेले, नेहेमी प्रेमच करणारे, समजून घेणारे असतातच असे नाही. वयस्क नसले तरी एकेका विषयात जास्त अनुभवी, समज असणारे लोक वयस्कच असतात असे नव्हे. प्रेम करणारे, समजून घेणारेहि वयस्कच पाहिजे असे नाही.

<<आपण कितीही म्हातारे झालो तरी आपल्या मानसिक गरजा पूर्ण करण्याकरिता आपणांस आपल्यापेक्षा वयस्कर व्यक्तींचीच नेहमी गरज भासते. >>
----- सल्ला देणारे वयस्करच असायला हवेत असे मला अजिबातच वाटत नाही. माझ्यापेक्षा वयाने २५ वर्षान्नी लहान असणार्‍यान्चे सल्ले/ विचार पण मला मोलाचे वाटतात. येथे वय हा फॅक्टर खुप महत्वाचा नाही आहे.

<< वयस्क म्हणजे अनुभवी, जास्त समज असलेले, नेहेमी प्रेमच करणारे, समजून घेणारे असतातच असे नाही. वयस्क नसले तरी एकेका विषयात जास्त अनुभवी, समज असणारे लोक वयस्कच असतात असे नव्हे. प्रेम करणारे, समजून घेणारेहि वयस्कच पाहिजे असे नाही.>>
----- साधना, नन्द्या४३ यान्च्या मताशी सहमत.