खांदे पालट झाला....... आणि ..... यात्रा नदीकडे वळली. वेळ दुपारची असली आणि ऊन तापलेलं असलं तरी वारा घूं ....घूं आवाज करीत वाहात होता. अधून मधून धूळ उडत होती. दीडचा सुमार झाला.खरं तर सगळ्यांनाच भुका लागल्या. तात्या मात्र व्रतस्थ असल्यासारखा तटस्थपणे सगळं करीत होता. थोड्याच वेळात भटाच्या पोराने जागा निवडली. ती साफसूफ केली. त्यावर त्याने आणलेली तयारी ठेवली. कणिक, डालडा तूप, मीठ, फुलं आणि इतर आवश्यक साहित्य होतं. तिरडी बाजूच्याच एका चौथर्यावर ठेवली. बाबासाहेबांच्या देहावरचे हार फुलं काढ्ली गेली. नवीन घातलेले कपडे होते ते काढून ते तिथेच राहून सर्व व्यवस्था पाहणार्या जनूला दिले गेले. जनूचा हा पिढिजाद धंदा होता. गावातले लोकही त्याला हवे नको ते पुरवित असत. त्याच्या बरोबर कोणी भांडल्याचे आठवत नाही. शेवटी सगळ्यांनाच त्याचा हात लागणार ही जाणीव बहुदा त्यामागे असावी. जनूही मन लावून सांगितलेले काम करी. त्याने बालदीत आधीच गरम पाणी आणलेलं होतं. एका बालदीत थोडं केरोसिन होतं. अगदीच लाकडं खराब निघाली तर, म्हणून . तात्याने बालदीतल्या पाण्याने अंघोळ केली. पंचा पिळला.तोच ओलेता पंचा नेसुन , भटाने ठेवलेल्या तयारीजवळ बसला. भटाने आणलेला अग्नी मडक्यातून काढून केरोसिन टाकू प्रज्वलित केला. तयारी मांडून एकीकडे कणकीचे पिंड तयार करीत म्ंत्रांना सुरुवात केली. अगीच्या ठिणग्या वार्याने इकडे तिकडे उडू लागल्या. अजूनही जीवनचा पत्ता नव्हता. तात्याला वाईट वाटलं.
जवळच शशांक बसला होता.त्याने एकूणच सर्व वातावरणावरून नजर फिरवली. अचानक त्याला इथल्या सगळ्याच गोष्टी परक्या वाटू लागल्या. जणूकाही हे जग त्याच्यापासून वेगळं पडलय. आपला या सगळ्या गोष्टींशी काहीही संबंध नाही असं त्याला वाटू लागलं. तो केवळ साक्षीरुपाने तेथे आहे असं त्याला जाणवलं. मात्र ही त्याची अवस्था काही सेकंदच टिकली. अचानक तो परत मनाच्या अर्धवट अवस्थेत आला. ना धड वर्तमानात ना धड भूत किंवा भविष्यात. तो उठून बाजूच्याच एका खडकावर बसला.तिकड्जे तात्याचं सव्य अपसव्य चालू होतं. शेवटी भटाचं आवरलं. .....थोड्याच वेळात चिता रचण्याचं काम चालू झालं. गावातली बडी मंडळी हातभार लावित होती. आता देह उचलून चितेवर ठेवण्याची वेळ झाली. शशांक, पियुष ,पाटील आणि इतर लोक मिळून देह उचलू लागले . सात आठ तास झाल्याने तो चांगलाच जड झाला होता. शशांकने सहज म्हणून बाबासाहेबांच्या निर्जिव हाताला हात लावून पाहिलं. त्यांची कातडी प्लस्टिकच्या पेपरासारखी चकाकत होती. बाबासाहेब अस्तित्वात नाहीत याची त्याला एकदम जाणीव झाली. आपल्यासाठी त्यांनी आणलेल्या बर्याच वस्तू त्याला आठवल्या. तो पण त्यांना बाबासाहेब म्हणूनच हाक मारीत असे. त्याला एकद्म भरून आलं. त्याला हुंदका फुटला. इतका वेळ याला काहीच कसं वाटलं नाही आणि आताच याला रडायला काय झालं असं उचलणार्यांच्या मनात आलं, त्यांनी थांबून त्याच्याकडे पाहिलं. पाटिल त्याच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाले, " बाळा, आपल्या हातात काय आहे. सगळि त्याची माया आहे. आपण फकस्त त्याची आज्ञा पाळायची. रडणं आवर.". अस म्हणून ते बाजूला झाले. मग देह उचलून चितेवर ठेवला गेला.
सर्व उपचार पुरे झाल्यावर तात्याने अग्नी दिला. वार्याच्या झोतात चिता धडाडून पेटली. जणू काही मृतदेह आणि लाकडं अग्नीची वाट पाहात होते. तात्याने चितेभोवती मंत्रोच्चारात उलट्या फेर्या मारल्या. दहन विधी समाप्त झाला ( दहन विधी संपन्न हो गया , आजकालच्या शब्दात). लाल पिवळ्या ज्वाळा एवढ्या उंच गेल्या की शशांक पाहातच राहिला. थोड्याच वेळात देहाच्या डोक्याजवळ ठिणग्यांचं मोहोळ जमा झालं. आणि "फ....ट " असा आवाज झाला. भटाचा पोरगा ओरडला," चला काम झालय. " त्याने मग जनूला बोलावून त्याच्या हातात दहा रुपयाची नोट सरकवीत चितेची राखण करण्याचे बजावले. मग अश्मा घेऊन सगळ्यांनी तिलांजली दिली. बहुतेकांना सुटका झाल्या सारखं वाटलं. अजून बाबासाहेवांच्या घरी जाऊन "दिवयाचे दर्शन घेतल्याशिवाय घरी जाता येणार नव्हते. पण ती अगदी साधी बाब होती. तात्या आणि पियुष शशांकला आधार देत समजावित निघाले. हळूहळू सगळेच घरी आले. दिवाणखान्याच्या एका कोपर्यात दिवा लावला होता. तीन वाजायला आले. सगळे घरात शिरले आणि त्यांच्या पाठोपाठ जीवन शिरला. त्याला पाहून माईंना राग आला. " हा लवकर येणार होता ना ?" त्या स्वतःशीच पुटपुटल्या. .............
पाटीलहि गेले. गावकरीही गेले. आता सगळेच घरातले राहिले. बैठकीवर बसून जडशीळ झालेली तारा सगळ्यांसाठी चहा करायला स्वैपाकघरात गेली.शर्मिला बैठकीवर तशीच बसून होती. तिला जीवनचा राग आला होता. हा कामाच्या वेळी कधीच हजर नसतो. तिने मनाच्ल्या मनात त्याला शिव्याशाप दिले. जीवन हातपाय धुऊन माईंजवळ येऊन बसला. तिला म्हणाला," माई काळजी करू नकोस. आम्ही सगळेच तुझ्याबरोबर आहोत. तू एकटी नाहीस. ". उत्तरादाखल माईंनी त्याच्याकडे फक्त पाह्यलं. त्यांच्या नजरेत एक प्रकारचा तिरस्कार होता. कधीही पैसे न पाठवणारा जीवन . म्हणतोय माझ्याबरोबर आहे. याला इतके वेळा फोन करून यांची तब्बेत ठीक नाही असं कळवलं तरी एक फोनसुद्धा केला नाही, आणि म्हणतोय 'तू एकटी नाहीस' . निर्लज्ज, बेशरम..... अर्थातच त्या उघडपणे काहीही बोलल्या नाही. सगळेच जन जीवनकडे त्रासिकपणे पाहात होते. ते पाहू जीवन चिडून म्हणाला," मी काही मुद्दाम उशिरा आलो नाही. ऐन वेळेवर इन्स्पेक्शनला जावं लागलं म्हणून उशीर झाला. नसेल माझ्याशी बोलयचं तर बोलू नका. माई तुझी पण कमाल आहे. " हे ऐकल्यावर माई जरा वरमल्या. दिवस यांत्रिकपणे गेला. बाबासाहेबांच्या आठवणि काढण्यात, शिवाय प्रेतयात्रेला येऊ न शकलेल्या गावकर्यांच्या भेटण्यात वेळ गेला. दुसर्या दिवशी अस्थि गोळा करायला मात्र जीवन होता. अस्थि घरी आणून त्या बाहेर टांगेपर्यंतचा वेळ विक्षिप्त शांततेत गेला. शशांकच्या मनात आलं , अगदी दोन तीन दिवसांपूर्वि , कसेही असले तरी बाबासाहेब घरात होते. आणि आज ते नाहीत. केवढी तफावत आहे ......माणसाचं असणं आणि नसणं ..... आपल्यालाही आता काही तरी जॉब करायला हवा. किती दिवस आपण तात्या आणि पियुष वर अवलंबून राहणार आहोत ? माईची जबाबदारी आपल्यालाच घ्यायला हवी. बाकी सगळे कडेनी पोहणरे आहेत आपण मधे पोहणारे आहोत. सरला काय, लग्न होईल आणि जाईल. त्याला अचानक , तात्पुरता का होईना, पोक्तपणा आला. .....
मग कोणीतरी दहावा, बारावा , तेरावा, याच विषय काढला. बाबासाहेबांना बहीण नव्हती. एकच भाऊ तोही गेलेला होता. त्यांच्या बाजूनी फारसं कोणी नव्हतं. माईंच्या बाजूनी मात्र अजून दोन भाऊ आणि एक बहीण होती.दोन भावांपैकी , गजामामा तेवढा संबंध ठेऊन होता. बाकी दुसरा तर कधीही ढुंकतही नसे. गजामामा येण्याची अजून वाट होती. बाबासाहेबांचं त्याच्याशी जरा तरी पटायचं. तेही तो भाऊबिजेला येण्याची वाट पहायचे. असेच कसेतरी दोन् तीन दिवस गेले. खरतर आता सगळ्यांना राहायचा कंटाळा आला होता. पण माईला काय वाटेल असा विचार करून सग्ळे गप्प होते. मग माईंनी या गोष्टीला एका रात्री तोंड फोडलं. जेवणं झाली होती. अंथरूणं घालण्याचं काम चालू होतं. तेवढ्यात माई म्हणाल्या," ज्यांना कुणाला राहायला जमत नसेल त्यांनी आपले वेळेवर निचा. आम्ही काय ते दिवस वगैरे जमतील तसे करू. " पण अजूनही कोणी जाण्याचे नाव घेईना. माईना कळेना काय कारण असावं ? मग त्यांच्या डोक्यात विचार चमकला. " मृ त्यु प त्र " बापरे ! विचारासरशी त्या केवढ्या दचकल्या. मृत्युपत्रासाठी तर सगळे थांबले नाहित ना ? आता तात्याच्या मुलांच्या परिक्षा नाहित वाटतं ? "
तात्याची गाडी असल्याने नाशिकला जाऊन ते अस्थिविसर्जन करून आले. अधून मधून पाटील येतच होते. आज बाबासाहेवांना जाऊन सहा दिवस झाले. सहज म्हणून पाटील तात्याला म्हणाले, " तात्या, मी विचारणं बरं न्हाई, पन बाबासाहेवांनी काही विल वगैरे केलं होतं का? " (एरव्ही इंग्रजी न येणाऱ्या पाटलांना "विल" हा शब्द माहीत होता)माई आतल्या खोलीत होत्या. त्यांनी कान टवकारले. तात्या म्हणाला, " मी वाडेकर वकिलाशी बोललोय, त्याच्याजवळ मृत्युपत्राची मूळ प्रत आहे. दिवस होऊन गेले की तो येऊन वाचून दाखवेल. त्यालापण माईला भेटायचंच आहे. बारावा तेरावा झाला की लगेचच त्याला यायला सांगतो, म्हणजे फार दिवस इथे राहावं लागणार नाही. ........" "म्हणजे तू लगेच जानार की काय, तू महिनाभर तरी राहायला हवंसं, माईला पण काही दिवस सोबत होईल. " पाटील मध्येच म्हणाले.
तात्या म्हणाला, " छे, हो, मुलांच्या परीक्षा आहेत. मी तर तेरावा झाला की एक दोन दिवसात निघणार आहे. " बोलणं तेवढ्यावरच थांबलं,
पाटील गेले. पियुष आणि जीवन पण तिथेच होते, पण ते काहीच बोलले नाहीत. माईच्या मनात नाही नाही ते विचार येऊ लागले. ती अस्वस्थ झाली. माईला ते दोघेही जास्त लबाड वाटत होते. तात्याला थोडी तरी माया होती. शर्मिलाचा विचार करण्यात अर्थच नव्हता. तारा जरा बरी होती.परस्पर काम कसं होईल असं पाहणारी होती. पुन्हा कोणी काही बोलले नाही.
आज दहावा दिवस. घरातले सगळेच नदीवर आले होते. पाटलांबरोबर काही गावातली मंडळी पण होती. तात्या आणि शशांक या दोघांनीच फक्त केस कापले होते. भटाच्या पोराची लगबग चालू होती. विधीनुसार पि ड तयार झाले. ते टळटळीत उन्हात त्याने कावळ्यांना दिसतील असे ठेवले. काही पिंडांवर पिवळे झेंडे लावले होते. मधल्या पिंडावर मात्र झेंडा नव्हता. मग भटाचा पोरगा बाजूला झाला आणि पारावर बसलेल्यांमध्ये येऊन तो उकिडवा बसला. नंतर तो आपल्या हुकमी स्वरात म्हणाला, " अजाबात कालवा कराचा नाही. पोरांना जवळ पाठवू नका. म्हणजे कावळे लवकर येतील. "माई थोड्या अंतरावर तोंडात पदर धरून होत्या. त्या म्हणत होत्या. असली वेळ सगळ्यांवर येते. पण आपल्याला एवढी भीती का वाटत्ये?. कावळा शिवला नाही तर? सबंध गावभर बोभाटा होईल. परत भटाच्या पोराचा आवाज आला, "मधल्या पिंडाला कावळा शिवल्याशिवाय सुटका नाही. बघा, मृतात्म्याची काही इच्छा अपुरी असल्यास विचार करून ठेवा. ती पुरी करण्याचं आश्वासन द्या. बघा, बाबासाहेबांचा जी कोणामध्ये अडकला असेल, आठवा. "..........
उन्हाची तीव्रता हळू हळू जाणवू लागली. नदीकाठ असल्याने वारा वाहत होता. आता अगदी शांतता झाली. नदीकाठावर दुसरं कोणीही नव्हते. काही वेळापुरता वाहणारा वाराही थांबला. अचानक दोन तीन कावळे नुसतेच पिंडांवर झेपावले आणि दुसऱ्या एका वडावर जाऊन बसले. तात्या उपरणं पांघरून बसला होता. निशी आणि रचना माईंजवळ होते. शर्मिला पारावर बसली होती. पियुष, जीवन, तारा, शशांक घोळका करून पारावर उभे होते. गावातली मंडळी पण आपापले गट करून आजूबाजूला घुटमळत होते. सरला मात्र एकटीच एका बाजूला उभी राहून डोळे पुशीत होती. शर्मिलाने तिच्याकडे पाहिलं आणि स्वतःशी पुटपुटली, " फुकट खाऊ सरला, निष्कारण पैशात होणारी भागिदारीण. हिला कुठे तरी धडा मिळालाच पाह्यजे. " कारण नसताना तिला ती शिव्याशाप देत होती...... कावळे आजूबाजूचे पिंड चोचीने मोडू लागले. पण मधल्या पिंडावर बिलकूल झेपावत नव्हते. तेवढ्यात पाटील तात्याजवळ आले आणि म्हणाले, " अरे, बाबासाहेबांना सरलाची काळजी असनार. तिची काळजी घेयाचं तेवढं बोला म्हंजी शिवल कावळा. मधल्या पिंडाभोवती त्यांचा देह फिरतोय ना रे बाबा, मं ग कस शिवल कावळा? ".... शर्मिला सावध झाली. ती तात्याच्या कानात कुजबुजली, " अजिबात काही बोलू नका. बाकीचे आहेत तिचं सगळं करायला. जरा ऐका. नाहीतर, व्हाल पुढे. तात्याच्या मनात खरं तर असच होतं. पण त्याने शर्मिलाला जास्त नाराज न करण्याचं ठरवलं. थोडावेळ पुन्हा शांतता.... कोणीच पुढे जाऊन बोलायला धजेना. सरला आपल्या गळ्यात पडली तर? तिचं लग्न आणि त्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या (? ) त्या कोण निभवणार? शर्मिलाच्या मनात आलं. मुंबईचे लोक तसेही बदनाम. कशाला आपण काही बोला. कोणीच काही बोलेना शांतता बोचू लागली... ̮.. ̮लांबून येणारा लोहाराचा घण तेवढा आवाज करीत होता. बाकी सगळं चिडीचूप....
नंतर काय झालं कोण जाणे. कधेच एकदम वारा सुटला. वडावर्चे दोन चार असलेले कावळेही उडून गेले. भटाचा पोरगा अस्वस्थ झाला. बारा वाजायला पंधरा मिनिटं होती. त्याच्या पोटात कावळे कोकलू लागले. चहाच्या पाण्याशिवाय सकाळ पासून पोटात काहीच गेले नव्हते. त्याने आशेने तात्याकडे, मग पियुष आणि जीवनकडे पाह्यले. कोणीच हालचाल करीना....... मग मात्र माई तोंडांत पदराचा बोळा कोंबून पुढे झाल्या. आणि दूर गेलेले कावळे कलकलाट करीत परत वडावर आले. ते पाहून, परमेश्वरी लीला अगाध असल्याचे प्रत्यंतर आल्याने, पाटलांनी आकाशाकडे पाहून हात जोडले. माई पिंडांपुढे गुडघे टेकून बसली. तिने एकदा आपल्या मुलांकडे पाहिले. आणि मग ती जरा मोठ्या आवाजातच निश्चयाने म्हणाली, " सरलाची, शशांकची अजिबात काळजी करू नका, मी सगळं करीन त्यांच्यासाठी, तेही स्वतःच्या बळावर. मग इतका वेळ दाबलेला हुंदका त्यांना फुटला. तिच्या आवाजानंतर कावळ्यांना कळलं, की मृतात्म्याला, कोणास ठाऊक, पण दोन कावळे झेपावत आले आणि मधला पिंड मोडून परत वडावर जाऊन बसले. भटाचा पोरगा पुढे होऊन माईंना आधार देत म्हणाला, " माई, शेवटी तुम्हीच जबाबदारी घेतलीत, त्यामुळे हे शक्य झालं., बाकीच्यांनी म्हटलं असतं तर कावळा शिवला असता की नाही, माहीत नाही. त्यांना पारावर बसवून तो पुढे म्हणाला, " चला आपलं काम झालंय, सगळ्यांनी तिलांजली द्यायची आहे आणि मग घरी जायचंय. " असं म्हणून तो तिथेच पारावर ताम्हण घेऊन बसला. तिलांजली साठी रांग लागली.....
घरी आल्यावर तो दिवस तसाच गेला. रात्री माईंची बहीण म्हणाली, " दिव्या भोवतालच्या रांगोळीत म नुष्य कोणत्या योनीत जन्म घेणार त्याप्रमाणे त्या त्या प्राण्याच्या पायाचे ठसे दिसतात. म्हणून प्रत्येक जण मग ठसे पाहू लागला. आणि अर्थ लावू लागला. पियूष म्हणाला, " आता मृतात्म्याला अस्थीही पोचल्या आहेत. त्याचं कुठेतरी फॉर्मेशन झालं असेलच. " माईंना ते आवडलं नाही.
गेलेल्याची चेष्टा करणं बरं नाही. पण त्या काहीच बोलल्या नाही. एक प्रकारचं गूढ वातावरण निर्माण झालं. आत्याबाईंच्या म्हणण्याप्रमाणे कोणाला कुत्र्याच्या पायाचे, तर कोणाला गायींच्या पायाचे, तर कोणाला घोड्याच्या पायाचे ठसे दिसले. माईंनी मात्र तिकडे जाऊन पाहण्याचं टाळलं, न जाणो, या गोष्टी खऱ्या निघाल्या तर.......?
बाराव्या तेराव्याला जवळ जवळ सगळा गावच जेवायला होता. पाच एकशे पान झालं. पाटलांचा मुलगा मात्र त्या दिवशी झिंगूनच जेवायला बसला होता. त्याने वाढायला आलेल्या सरलाचा हातच धरून ठेवला आणि " आय लव यू "म्हणाला. जेवायला आलेले सगळे प्रतिष्ठित लोक पाहत राहिले. मग पाटील ओरडले तेव्हा कुठे त्याने सरलाचा हात सोडला. सरला आत जाऊन बसली ती बाहेर आलीच नाही. हे एक सोडलं तर, बाकी सर्व कार्यक्रम (? ) ठीक झाला. तो दिवस गेला तरी कोणी जाण्याचे नाव घेईना. तात्याने वकिलाला फोन केला तो संध्याकाळी येणार होता. सगळे नेहमीप्रमाणे वागत होते. पण माईंना त्यात लबाडी वाटली. संध्याकाळी सहाच्या सुमारास वाडेकर आला. बरोबर पाटील होतेच. आता मात्र पाटलांचं येणं कोणालाच आवडलं नाही. पण बोलणार कोण?. मग वाडेकरनीच खुलासा केला. "एक जबाबदार साक्षीदार म्हणून मी यांना आणलंय. यांच्या हजेरीतच मी हे 'विल ' वाचणार आहे. थोडावेळ थांबून त्याने तात्याला विचारलं.
" आले का सगळे? म्हणजे घरातले. " आली नाही ती फक्त सरला. " सरलालाही घेऊन या. " वकील म्हणाला.
झोपाळा लावला असल्याने, पाटील आणि वाडेकर झोपाळ्यावर बसले. दिवाणखान्यात कमालीची शांतता पसरली.शर्मिला कान टवकारून बसली. तात्या आणि पियूष यांना फारसा रस नव्हता. काही मिळालं अन नाही मिळालं तरी त्यांना चालणार होतं. पण जीवन, तारा आणि शर्मिला यांना अपेक्षा होत्या. निशी आणि रचना तिथेच घुटमळत होती. विल वाचायला प्रारंभ झाला............
" मी बाबासाहेब शिंत्रे पूर्ण विचारांती असे सुचवितो की, माझ्या नावे असणारी खालील मिळकतीची वाटणी पुढीलप्रमाणे करावी :
१) माझ्या तीन बँकांमध्ये ठेवलेल्या मुदत ठेवींची वाटणी सरला, शशांक आणि तात्या यांच्यात सारख्या प्रमाणात वाटवी. एकूण मुदत ठेवीची रक्कम रू. ७, ००, ०००/-
२)देवस्थानची शिंतरी येथील जमीन फक्त शशांकच्या नावे ठेवावी. व देवस्थान साठी विश्वस्त मंडळ बनवावे. ज्यात घरातील सर्व पुरुष व चंद्रकांत पाटील असतील. देवस्थानच्या उत्पन्नातील तिसरा हिस्सा जिंदगीभर माईला मिळावा व नंतर पियुषच्या मुलांना मिळावा.
३) घरातले परंपरागत दागिने मात्र माई सोडून सर्व सुनांनी सारखे वाटून घ्यावेत. किंमत रु. ४, ००, ०००/-
४) वाड्याची मालकी त्यालाच मिळावी जो माईला शेवटपर्यंत सांभाळील.
५)निशी आणि रचना यांना घरामागील बागेचा भाग विकून येणारी रक्कम सारखी वाटून त्यांच्या लग्नामध्ये देण्यात यावी.
६)सरलाची जबाबदारी पूर्ण पणे तात्याने घ्यावी.
(क्र म शः )
बाबासाहेबांना बहीण नव्हती.
बाबासाहेबांना बहीण नव्हती. एकच भाऊ तोही गेलेला होता. त्यांच्या बाजूनी फारसं कोणी नव्हतं. >>>>
रात्री बाबासाहेबांची बहीण म्हणाली, >>>>>>>>>
थोडी गफलत झालीयं का ??? काही टायपो पण आहेत.
सुरूवातीचे दोन्ही भाग वाचले, आवडले !
होय. गफलत झालि आहे. दुरुस्त
होय. गफलत झालि आहे. दुरुस्त करित आहे. चूक दाखवल्याबद्दल आभारी आहे . प्रतिसादाबद्दलहि आभारी आहे. संगणकाच्या शिफ्ट कीज सैल झाल्याने र्हस्व दीर्घांच्या चुका होतात , त्याबद्दल क्षमस्व. तसेच चुक
तिथेच दुरुस्त करायला गेलं तर बाजूचे शब्दही बिघडतात. यावर उपाय माहीत "असल्यासाम " (अशी चुक ) असल्यास सांगावे. येथे सांगावे हा शब्द दुरुस्त करायला गेलो होतो, त्याने बाजुचा असल्यास हा शब्द बिघडवला.
nxt part kdhi ynr??? brobr
nxt part kdhi ynr??? brobr will cha suspense aanun bhag sampvla aahe