
"And, when you want something, all the universe conspires in helping you to achieve it.”
― Paulo Coelho, पॉलो कोहेलो च्या 'द अलकेमिस्ट' या पुस्तकात वारंवार येणारे हे वाक्य आणि जवळपास
याच अर्थाचा हा ओम शांती ओम चा डायलॉग "कहते ही किसी चीज को अगर तुम दिल से चाहो तो, पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशीश मी लग जाती है… " ही वाक्ये प्रत्यक्षात उतरायला तसे प्रसंग घडावे लागतात.
***
महेश्वर या नावाचं भूत मानगुटीवर बसलं ते जगन्नाथ कुंटे यांच 'नर्मदे हर' वाचल्यावर.. मग सुरु झाल, इंटरनेट वरून महेश्वर च्या नर्मदामाईचे फोटो बघत तासन तास त्यात हरवून जाणं ! ध्यासच घेतला महेश्वर ला जायचा. एक जबरदस्त गारुड होत या नावाच!
... आणि मागच्या वर्षी २०१५ डिसेंबर मध्ये हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. नविन वर्षाची सुरुवात नर्मदा किनारी करायची हे ठरवलच. महेश्वर, मांडू , उज्जैन, इंदौर , आणि नविन वर्षाला ओंकारेश्वर असा त्रिकोण करायचा प्लॅन केला. सुट्ट्या जुळुन आल्या. नेटवरुन अंतर मोजुन, हॉटेल्स बुकिंग करुन घेतल. मधेच ३-४ दिवस पुण्यात अभुतपुर्व थंडी अचानक पडली. मनात म्हटलं, मैय्या परीक्षा घेतेय, घेऊ दे!
त्यात बडवानी हुन निरोप आला की तिथे २ डिग्री तापमान आहे. आणि नर्मदेच्या किनारी रहाणार म्हटल्यावर अजुनच थंडी असेल. हे पाहुन आमच्या ग्रुपमधे २-४ जण गळाले.तरी आमचा निर्धार पक्काच. काही झाल तरी जायचे...नर्मदा मैय्यावर सोपवुन. ती पाहुन घेइल. गाडीनेच जायचय ना, बरोबर गरम कपड्यांचा स्टॉक घेउन. बहिण, तिचे मिस्टर, मी आणि माझा मुलगा..आम्ही चौघेच निघालो.
सकाळी साधारण ८ च्या सुमारात नाशिकहुन प्रस्थान केले. दुपारी बिजासन घाटात माता बिजासनीचे दर्शन घेउन संध्याकाळी ६ च्या सुमारास महेश्वरला पोहोचलो.
महेश्वर नर्मदेच्या उत्तर तटावर आहे. अहिल्यादेवी होळकर यांचं हे टुमदार गाव. होळकर पॅलेसच्या आवारातच होटेल होते. हॉटेल मैय्या किनारी, मैय्याचे सतत दर्शन होईल अशा तर्हेने बुक केले होते.
गम्मत म्हणजे तिथे अजिबात थंडी नव्हती. मैय्याने आमची 'हाक' ऐकुन 'ओ' दिली होती. संध्याकाळी जवळच्या राजराजेश्वर मंदिरात जाउन आलो. गाभार्यात अहिल्यादेवींच्या काळापासून तेवत असलेले भलेमोठे 11 दगडी दिवे... साजूक तुपाचे! पाहूनच मन भरून गेले. घाटावर ही चक्कर मारली. इथला घाट अतिशय सुंदर..घडीव पायऱयांचा... प्रचंड आकाराचा!
घाटावरची गर्दी कमी झाली होती. एखादा दुसरा परिक्रमावासी, 2-3 साधू, 2- 3 पुजारी इतकेच तुरळक लोक. अंधार पडायला सुरुवात झाली होती मात्र पलीकडचा काठ उजळून निघाला होता. होळकर राजवाड्यात त्या 2-3 दिवसात कुणी कन्येचे लग्न होते.पलीकडच्या काठावर लग्नाचं शाही वर्हाड उतरले होते. त्यांचे पन्नासेक तंबू दिसत होते. आणि त्या तंबुवर लागलेले लाईट्स ची असंख्य प्रतिबिंब पाण्यात हेलकावत होती. आमच्याजवळच कुणी एक स्त्री घाटावर येऊन मैय्याच्या पात्रात दिवे सोडत होती.आकाशातही एकेक नक्षत्र उगवत होते आणि माईचा चमचमता पदर अधिक खुलून दिसत होता. त्या दिवे सोडणार्या स्त्रीला आम्ही ," इथे पहाटे स्त्रिया येतात का स्नानाला? काही भीती नाही ना? वै वै पांढरपेशी प्रश्न विचारले. त्यावर तिचा प्रतिसाद आश्वासक होता.
भल्या पहाटे उठुन मैय्यावर स्नानाला निदान दर्शनाला जायच ठरवल खर... पण पहाटेच्या थंडीत उठावेसे वाटेना. 'हो' 'नाही' चालु होते.शेवटी बहिणीने जोर लावुन धरला. ६ वाजता मैय्याच्या प्रशस्त निर्मनुष्य घाटावर आम्ही चौघे पोहोचलो.
आता मैय्या सोबतीला होती.भीतीचा प्रश्न नव्हता. इथली मैय्या अगदी संथ, शांत! जलतत्वांच असं हे अजिबात आवाज न करणार रूप माझ्यासाठी नवीन होतं. संपूर्ण पात्रभर पांढराशुभ्र धुक्याचा पडदा!उजाडल्याशिवाय हा पडदा उठणार नव्हता. आधी थोडेसे लांब बसून अंदाज घेतला. मग मैय्यापासून अगदी एक फुटावर कुडकुडत बसलो. अजूनही थंड पाण्यात पाय टाकायचे धारिष्ट होत नव्हते. मैय्या म्हणजे तीर्थजननी.. तिला भेटायला जायचे म्हणजे आधी पाय कसा लावायचा? हा विचार करून आधी त्या जलतत्वाला नमस्कार केला. हळूच आधी हात बुडवून ते पाणी प्रोक्षण केले.. ' नर्मदे हर' म्हणत माथ्यावर शिंपडले. आणि मग हळूच तळवे जलात सरकवले.. आश्चर्य! मैयाचे जल अगदीच काही थंडगार नव्हते. एक सुखद लहर शरीरातून... मऊशार पाणी तळव्यांना गुदगुल्या करतंय! एवढ्या अंधारातही मैय्याचा तळ आता स्पष्ट दिसतोय.छोटे छोटे मासे आणि त्यातही काही झपकन ट्युबलाईट पेटावी असे प्रकाशमय मासे.. पायाला लुचू लागलेत.या सुखानुभवात आपोआप डोळे मिटले गेले. हाच का तो शाश्वत आनंद? आतापर्यंत आनंदाचे क्षण का कमी आलेत? मुलगा झाला तो आनंद, नोकरी लागली तो आनंद, पगार वाढला, आत्मनिर्भर झालो हा आनंद ...किती काळ टिकला? मग शाश्वत आनंद कशात?
डोळे मिटले की दृष्टी 'आत' वळते म्हणतात. अचानक आठवलं आपलया गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात पण महेश्वर चा उल्लेख आहे ना? इथूनच गेले असतील का श्रीमहाराज? कदाचित इथेच बसून या मैय्याच्या साक्षीनेच त्यांनी आत्मसमाधी लावली असेल का? अंगावर रोमांच उठले.नकळत डोळे भरून आले.माझ्याही नकळत हे जलतत्व आता अंतर्यामी उतरू लागलेय. माझे सद्गुरु ज्या ज्या ठिकाणी फिरले अश्या तुझ्या किनारी तूच भेटायला बोलवतेस, मैय्या! हे तूच घडवून आणतेस!
तरीही हे मन वेडं असत ग! हे असे परमानंदाचे क्षण सोडून, सुख-दु:खाच्या हेलकाव्यात क्षणात आनंदित तर क्षणात चिंतीत तर कधी साशंक होत. आपल्या जीवनाचा हेतूच अजून लक्षात येत नाहीये. "
तिच्या उसळत्या पाण्याचा खळखळाट आता स्पष्ट ऐकू येतोय. जणू गिरक्या घेत मला ती म्हणतेय, किती ' साठवून' ठेवतेस आत? मी बघ मागचं सगळं विसरून कशी पुढेच धाव घेते. तुम्ही कधी काळी धुवून टाकलेले सगळे राग, लोभ, द्वेष ,मत्सर पोटात घालूनही कशी नितळ राहाते! ते पाण्यावर वहात चाललेलं पान दिसतय तुला?? किती मजेत चाललय! आहे का त्याला उद्याची चिंता कि भूतकाळातली संवेदना? प्रवाहाचा झोत आला की जोरजोरात उसळी घ्यायचं आणि संथ असेल तेव्हा मजेत पाण्यावर पहुडायचं. मधेच एखादी खडक आला की एक गिरकी घेऊन आपल्याच मस्तीत झोकुन द्यायचं! बघ, अस जगता येईल तुला?"
डोळ्यातुन धारा सुरु झाल्या होत्या.
"माई, धन्य झाले मी !! सगळा संभ्रम दूर केलास! तू घडवून आणले म्हणून ही तीर्थयात्रा.. आम्ही फक्त तुझी इच्छा करायची. तुझ्या सान्निध्यात आलं की कुठलीही इच्छा करा.. मग ती ऐहिक असो कि पारमार्थिक , तू त्या पूर्ण करतेस. कशी होऊ त्याची उतराई??
आता हे जलतत्व चक्क बोलतंय माझ्याशी!
ती: बरं मग, मी जे मागेन ते देशील?
मी: खरंच! तुला जे हवे ते! हा देह देऊ? आता या क्षणी मृत्यू जरी समोर आला तरी आनंदाने पत्करेन मी.
ती: हाहा, तो पंचमहाभूतांकडून उसना घेतलेला देह मलाच परत करून काय साधणार? मला जे हवंय ते दुसरंच!
मी: सांग मैय्या, काय आहे माझ्याकडे देण्यासारखं! जर हा देह, हा श्वास देखील त्या परमात्म्याने दिलाय तर मी माझं स्वतःचं असं काय?
ती: हे सगळं खरं असलं तरी एक गोष्ट आहे तुझी स्वतःची.
... तुझा 'अहं', तुझा 'मी' पणा देऊ शकतेस तू??
मी: ( थोडं थांबून) धत! एवढंच ना, हा बघ दिला. एवढा माझा जप राहिलाय तो झाला की लगेच....
ती: ( खळखळुन हसत) हाहाहा ... म्हणजे अजूनही 'तू स्वतःच' जप' करतेस असं तुला वाटतय???
मी अवाक!निर्बुद्धपणे पहातच राहिले...
मनातले उसळते जल शांत झाले होते. हलकेच डोळे उघडले. काल संध्याकाळी आलेली तीच स्त्री पुन्हा मैय्याच्या पात्रात दिवे सोडत होती.हे दिवे आणि पलीकडच्या तिरावरचे अश्या असंख्य दिव्यांनी मैय्याचे पात्र उजळून गेले होते. नकळत हात जोडले गेले!
दूरवरून राजराजेश्वर मंदिरात होत असलेल्या आरतीचा आणि घंटेचा आवाज हे मंगलमय वातावरण अधिकच अधोरेखित करत होता!
पूर्वक्षितिजावर लाल गुलाबी रंग दिसू लागला होता.
....आणि मैय्या?
मैय्या खळखळत आपल्याच मस्तीत वाहत होती. मैय्याच्या पात्रावरचा धुक्याचा पडदा हळूहळु विरत होता!
आणि ...
मनातलाही!
मैय्याचे मनोहारी दृष्य. पलिकडे पान्ढर्या ठिपक्याची लाईन दिसते ते राजेशाही तम्बु!
आर्याताई, मस्त लिहिल आहे.
आर्याताई, मस्त लिहिल आहे. खूप छान परीसर आहे.
धन्यवाद कृष्णाजी, शैलजा,
धन्यवाद कृष्णाजी, शैलजा, मंजुडी, मुक्ता, विनिता, नताशा, स्मितु, स्मिता, निरा, नरेशजी, आरती! .. __/\__
नितांत सुंदर अनुभुती आणि लेख
नितांत सुंदर अनुभुती आणि लेख
अप्रतिम...
अप्रतिम...
वाचूनच काटा आला अंगावर.
वाचूनच काटा आला अंगावर. अनुभवताना साळींदर होऊन जाईल काया!
अप्रतिम.
शतश: धन्यवाद हर्पेन,
शतश: धन्यवाद हर्पेन, शशांकजी, माधवजी! __/\__
मैय्या ओढ लावते हेच खरं
आहाहा, काटा आला अंगावर. शब्द
आहाहा, काटा आला अंगावर. शब्द नाहीत ___/\___.
सुंदर लिहिलय..
सुंदर लिहिलय..
सुरेख!
सुरेख!
सुरेख लिहिलंय!
सुरेख लिहिलंय!
व्वा! आर्ये, खूपच सुंदर
व्वा! आर्ये, खूपच सुंदर लिहिलस. जाऊया एकदा महेश्वरला.
नर्मदे हर! _________/\__________.
वाह फारच आत्ममग्न करायला
वाह फारच आत्ममग्न करायला लावणारे लिहिले आहे.
आधी शिर्षक वाचून फोटूसह प्रवासवर्णन असेल असे वाटले होते.
नर्मदा वाचायला मिळाली दोन पुस्तकांत,
एक जगन्नाथ कुंटे यांचे "नर्मदे हर"
आणि गोनिदांचे "कुण्या एकाची भ्रमणगाथा"
तेव्हापासुन नर्मदा काठची अनेक ठिकाणे खुणावत आहेत.
या वर्षाच्या सुरूवातीलाच एक योग आला,
काही कारणाने बडोद्याला जाणे झाले,
एक दिवस वेळ होता, एकटाच निघालो बसने आणि गेलो गरूडेश्वरला,
मी टेंबे स्वामींच्या समाधी मंदिरात एकटाच उभा होतो,
कसल्याशा कामा निमित्त पलिकडल्या काठावर दुपारच्या वेळात सुरूंगाचे स्फोट चालू होते,
कामगार म्हणाले अर्धा एक तास तिकडे आतच थांबा,
नंतर बाहेर पडलो आणि पायर्या उतरून नर्मदेच्या पात्राजवळ गेलो रणरणत्या उन्हात,
दुर्दैवाने पाणी बरेच खराब होते, अगदीच जरासे पाणी हातावर घेऊन पाहिले,
संध्याकाळपर्यंत बडोद्याला परत गेलो, दुपारचे जेवण होऊ शकले नाही पण स्थलदर्शनानेच पोट भरले होते.
खरेतर सरदार सरोवर धरण खुप जवळ असुन देखील तिकडे जाता आले नाही.
मध्य प्रदेशातल्या इंदौर, ओंकारेश्वर, महेश्वर, मांडूगढ, इ. ठिकाणे करायचा प्लॅन खुप काळापासुन मनात रेंगाळतो आहे, तुमच्या या लेखाने मन पुन्हा त्या आवर्तांमधे गेले आहे.
महेश्वरला न जाता देखील मला त्या ठिकाणाने फारच भुरळ घातली आहे.
तुम्ही आणि अन्य माबोकरांना जमणार असेल तर एक गटग तिकडेच करावे का ?
महेश, मला चालेल तिकडे गटग
महेश, मला चालेल तिकडे गटग
आलेली अनुभूती फारच छान
आलेली अनुभूती फारच छान शब्दबध्द केली आहे.
महेश, बडोद्यावरुन गरूडेश्वरला
महेश,
बडोद्यावरुन गरूडेश्वरला बसने कसे जायचे? बसची फ्रिक्वेन्सी कशी अाहे?
नर्मदातीरी जायची खुप इच्छा आहे.
निदान गरुडेश्वरला जरी जाणे झाले तरीही मनाला समाधान वाटेल.
गमभन, बडोद्याच्या मध्यवर्ती
गमभन,
बडोद्याच्या मध्यवर्ती बस स्थानकावर गेलो आणि तेथे विचारले, लोकांनी सांगितलेल्या एका बसमधे बसलो आणि निघालो. वाटेत डभोई नामक गाव लागले जे लक्षात राहिले आहे. पुढे कंडक्टरने सांगितलेल्या एका ठिकाणी रस्त्यावरच उतरलो, तिथे दोन तीन रिक्षा होत्या, एक रिक्षा पकडून साधारण एक दिड कि.मी. अंतरावर असलेल्या मंदिर परिसरात गेलो. काहीच गर्दी नव्हती. येताना चालत निघालो मुख्य रस्त्याकडे, तर एका दुचाकीस्वाराने आपणहून लिफ्ट दिली. त्या मुख्य रस्त्यावर टेम्पो ट्रॅव्हलर सारख्या गाड्या प्रवासी वाहतूक करतात, त्याने बडोद्यात परत आलो. पण त्या गाडीने अगदी गावाच्या बाहेरील भागात कुठेतरी सोडले होते.
तसे गरूडेश्वर हे ठिकाण अजिबात गर्दीचे, वाहतुकीचे नाहीये. फारच छोटुकले गाव आहे.
तात्पर्य : स्वतःचे किंवा भाडोत्री वाहन घेऊन जाणे योग्य.
येताना चालत निघालो मुख्य
येताना चालत निघालो मुख्य रस्त्याकडे, तर एका दुचाकीस्वाराने आपणहून लिफ्ट दिली. >>>>>>>>>>.हा अनुभव मलाही आलाय. नर्मदे हर!
सर्वांचे पुन्हा एकदा आभार्स!
सर्वांचे पुन्हा एकदा आभार्स!
<<तुम्ही आणि अन्य माबोकरांना जमणार असेल तर एक गटग तिकडेच करावे का ? <<
व्वा मस्त कल्पना आहे. सर्वांच्या सुट्ट्या जुळून यायला हव्यात मात्र.
<<<<एकटाच निघालो बसने आणि गेलो गरूडेश्वरला,
मी टेंबे स्वामींच्या समाधी मंदिरात एकटाच उभा होतो,<<<<
गरुडेश्वरच वातावरण भर दुपारी फार धीरगंभीर असतं. दुपारी १२ ची आरती सुरु झाली की मंदिराजवळपासचे कुत्रे फार करूण आवाजात विव्हळतात. असं ऐकलं होतं आणि स्वतः पाहिलेही.
<<नंतर बाहेर पडलो आणि पायर्या उतरून नर्मदेच्या पात्राजवळ गेलो रणरणत्या उन्हात,
दुर्दैवाने पाणी बरेच खराब होते, अगदीच जरासे पाणी हातावर घेऊन पाहिले,<<
तिथली मैय्या थोडी खोल आहे.. थोडे पुढे गेल्यावर खडकाळ पण.
सरदार सरोवर जवळच आहे. तिथुन कधीकधी अचानक पाणी सोडले कि इकडे मैय्याचे पाणी वाढू लागते ...ते लक्षात यायला हवं. नाहीतर धावपळ होते.
<<हा अनुभव मलाही आलाय. नर्मदे हर! << मायबोलीकर शोभा आणि मंजूताईना गरुडेश्वरचे फार छान अनुभव आले आहेत.
शोभा शक्य झाल्यास तुमचे अनुभव टाका.
महेश, माहितीसाठी धन्यवाद
महेश,
माहितीसाठी धन्यवाद __/\__
नयने, अग काय सुंदर लिहीलस..
नयने, अग काय सुंदर लिहीलस.. आवडलच.. नर्मदा परिक्रमाची मलाही आस आहे. पाहू, मैया कधी बोलावतेय..
>>मध्य प्रदेशातल्या इंदौर,
>>मध्य प्रदेशातल्या इंदौर, ओंकारेश्वर, महेश्वर, मांडूगढ, इ. ठिकाणे करायचा प्लॅन खुप काळापासुन मनात रेंगाळतो आहे, तुमच्या या लेखाने मन पुन्हा त्या आवर्तांमधे गेले आहे.
नवीन वर्षात जायचा योग येणार असे दिसत आहे. २६ जानेवारीच्या सुमारास ओंकारेश्वर, इंदौर, मांडवगढ, महेश्वर असा प्लॅन करत आहोत. महेश्वरला एक रात्र नक्की राहणार आहोत.
||नर्मदे हर || अरे व्वा,
||नर्मदे हर ||
अरे व्वा, महेशजी! फायनली मैय्याने बोलवले तर!
महेश्वरला जरुर मुक्काम करा. बसस्टैन्डजवळ सुप्रसिद्ध 'गुरुकृपा' हॉटेलमधे नाष्टा/ जेवण घ्या. उत्तरेतल्या शीख बन्धुन्चे आहे ते.
सर्व्हिस आणि जेवणाची क्वालिटीही उत्तम! आम्ही इकडून जातांना महेश्वर मुक्कामी असताना तर गेलोच. पण पूर्ण ट्रीप करून ओंकारेश्वर कडून परततांना आवर्जून तिथे लंच घेतलं.
सकाळी 'गुरुकृपा' समोरच गरमागरम जिलबी, पोह्यान्ची गाडी लावलेली असते. १० रु त भरपेट नाश्टा!
महेश्वरहुन मान्डुला जाताना महेश्वरच्या ५ किमी पुढे सहस्त्रधारा हे रम्य ठिकाण आहे. तिथे मैय्या असंख्य धारामधे विभागली गेली आहे. त्याची कथा फार सुन्दर आहे.
आर्यातै, धन्यवाद ! महेश्वरला
आर्यातै, धन्यवाद !
महेश्वरला रहाण्याचे पर्याय सुचवू शकाल का ? अहिल्या फोर्ट महाग आहे तसेच ते म्हणत आहेत की २ रात्र मुक्काम असेल तरच बुकिन्ग मिळेल.
महेशदा, आम्ही राहिलो ते हॉटेल
महेशदा, आम्ही राहिलो ते हॉटेल 'राज पॅलेस'! फोर्ट्च्या आवारातच आहे. राजराजेश्वर मन्दिराला लागुनच! गुगल वर साईट आहे. नेट वरील फोटो पाहुन बुक केले होते.:फिदी:
रेट ८००/९०० आहे. गरम पाण्याची बाद्ली भरुन ते आणुन देतात. बाकि व्यवस्था ठिक ठाक. चहा, नाश्ता, जेवण सगळ बाहेर घ्यावे लागेल. तसे एक्स्ट्रा पैसे देवुन रुमवर आणुन देतात. एका रात्रीसाठी अगदी योग्य. आम्हाला बाल्कनीतुन सतत मैय्या दर्शन होईल असेच हवे होते.
फोटो टाकायचा ट्राय करतेय.
या मन्दिराच्या मागे दिसतेय ते.
हे रुमसमोरच्या रोड पलिकडे राजराजेश्वर मन्दिर आणि पलिकडे नर्मदा माई!
आर्यातै, पुनश्च धन्यवाद
आर्यातै, पुनश्च धन्यवाद उपयुक्त माहितीबद्दल _/\_
आणखी काही प्रश्न आहेत ते विपुमधे विचारतो.
वाहवा, प्रचि टाकल्याने या
वाहवा, प्रचि टाकल्याने या धाग्याला चार चाँद लग गये
महेश्वरची मंतरलेली पहाट!.....
महेश्वरची मंतरलेली पहाट!..... धागा सारखा वर येत होता आणि नाव वाचल जात होतं.. का कोण जाणे हा लेख वाचायचा राहून गेला.
काल NDTV Good Times वर आदित्य बाल ची भटकंती चालू होती..एक तर आदित्य आवडीचा आणि त्यात महेश्वर... episod नीट बघून झाल्यावर या धाग्याची आठवण झाल्याशिवाय राहवलं नाही. मनाशी खूणगाठ बांधली कि सर्वात पहिल ऑफिस मध्ये जाऊन हा लेख वाचायचाच...
आर्या काय अप्रतिम लिहिल आहे हो ..मी अगदी नि:शब्द झाले..डोळे अश्रुंनी भरून आले. असे वाटले तुमच्या सोबत मी हि त्या भारलॆल्या अवस्थेत मैय्या सोबत एकरूप होते आहे......
मैय्या म्हणजे तीर्थजननी.. तिला भेटायला जायचे म्हणजे आधी पाय कसा लावायचा? हा विचार करून आधी त्या जलतत्वाला नमस्कार केला. हळूच आधी हात बुडवून ते पाणी प्रोक्षण केले..>>>>>>> काय लिहू ? किती आदर व्यक्त झालाय तुमच्या मनातला. असा विचार जे लोक पवित्र तेर्थक्षेत्रे खराब करतात त्या सर्व लोकांनी केला तर?
हे असच भारून जाण अनुभवलंय २ वेळा अष्टविनायक दर्शन च्या वेळेस गिरिजात्मक मंदिराच्या गाभार्यात ....ते क्षण आठवून अंगावर रोमांच उभे राहिले...आणि तुमचा अनुभव रिलेट झाला.
आर्या तुमचे मनापासून आभार... अश्याच छान छान लिहीत राहा.
पॉलो कोहेलो च्या 'द
पॉलो कोहेलो च्या 'द अलकेमिस्ट' या पुस्तकाचे मराठी भाषांतर उपलब्ध आहे का ??
पॉलो कोहेलो च्या 'द
पॉलो कोहेलो च्या 'द अलकेमिस्ट' या पुस्तकाचे मराठी भाषांतर उपलब्ध आहे का ??
नमस्कार,
नमस्कार,
नुकतीच ओंकारेश्वर, इंदौर, मांडवगढ, महेश्वर ही यात्रा करून आलो.
राज पॅलेस मधेच राहिलो होतो एक रात्र, सुर्यास्त आणि सुर्योदय दोन्ही पाहिले महेश्वरला.
सुर्यास्तानंतर होडीतुन एक चक्कर मारून आलो.
अगदी मंत्रमुग्ध करणारे गुढरम्य ठिकाण आहे.
आर्यातै, आपल्या बहुमोल मार्गदर्शनाबद्दल धन्यवादच _/\_
Pages