बाबासाहेबांना जाऊन आता तीन तास झाले होते. सकाळचे आठ वाजत होते. अजून तात्या, त्याची बायको शर्मिला, पियूष, त्याची बायको तारा आणि जीवन (अविवाहित) कोणीच घरी पोचले नव्हते. घरी आणल्यापासून जमेल तसे गावकरी दर्शन घेऊन, माईंशी सांत्वनाचे शब्द बोलून जात होते. दिवाणखान्याच्या एका कोपऱ्यात माई सतरंजीवर बसून रडत होत्या. सरला, बाबासाहेबांची अनाथ पुतणी, तिथेच थिजल्यासारखी बसली होती. शशांक, बाबासाहेबांचा धाकटा मुलगा. गेले काही दिवसांपासून दिवाणखान्यातला झोपाळा काढून ठेवला होता. दिवाणखान्याच्या रंगहीन काळसर पडलेल्या भिंती, दरवाज्यातून थेट येणाऱ्या सूर्य किरणांमुळे शरमल्या सारख्या दिसत होत्या. फाटके कपडे घातलेला माणूस एकदम प्रकाशात आला की अंगावरचं वस्त्रं सांभाळून उभा राहतो आणि शक्यतोवर दिसणारं अंग झाकण्याचा प्रयत्न करतो, तसा उन्हाच्या कमी जास्तपणामुळे भिंतींचा जणू उन्हाबरोबर लपंडाव चालू होता. आत सारच वातावरण शांत पण गढूळ होतं. आवाज फक्त माईंच्या विव्हळण्याचा येत होता. थोड्यावेळाने बाहेर लख्ख ऊन पडलं. पण वातावरणातला गढूळ पणा जात नव्हता.
अचानक बाहेर गाडीचा हॉर्न वाजला. लवकरच, तात्या (मोठा मुलगा), शर्मिला आणि त्यांची दोन मुलं, निशी आणि रचना दिवाणखान्याच्या दाराशी आल्याने आतला काळोख वाढला. आत येत, हातातलं सामान बाजूला ठेवत, तात्या माईंजवळ गेला. तिला जवळ घेऊन म्हणाला, " हे सगळं कसं झालं, माई? मागच्याच महिन्यात फोन केला तव्हा तर तब्बेत ठीक आहे म्हणालीस " माई डोळे पुषीत म्हणाल्या, " खरं आहे, आता विचार करून काय उपयोग आहे? कसं झालं, नि काय झालं? ". तसं नाही माई, पण कळायला नको का? " तात्या अजिजीने म्हणाला. त्याची बायको तिथेच सतरंजीवर बसली. ती थोडी भेदरल्यासारखी झाली होती. बाबासाहेबांचा पांढरी चादर घातलेला देह सतरंजीवर ठेवलेला होता. त्यांच्या नाकातोंडात कापसाचे बोळे घातले होते. त्यांची नजर अहेतुक, कुठेतरी आढ्यावर लागली होती. गेल्यावर डोळे बंद करण्याचं कुणाच्याच लक्षात आलेलं नव्हतं. शर्मिलाला थोडं बरं वाटलं. ति मनात म्हणाली, " बरं झालं, आता निदान प्रत्येक गोष्टीतली लुडबुड तरी बंद झाली. " बाबासाहेब तसे साफ मनाचे. राग लोभ मनात न ठेवणारे. आणि फटकन दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार न करता बोलणारे होते. ते बोलत ते नक्कीच बरोबर असायचं. पण सगळ्याच गोष्टी बोलल्याच पाहिजेत अस नसतं. माणसांना ओळखण्याची त्यांची जुनी सवय होती. म्हणून त्यांच्याशी चापलुसी करणाऱ्याला ते उघडे पाडीत. पण असं थोडच चालतं? सोयिस्कर खरेपणा वर तर जग चालतं.
जुन्या पेन्शन वर दिवस किती चांगले जाणार? स्वतःचा वाडा हीच त्यांची एकमेव दिसणारी मिळकत. जवळ फारसं सेव्हिंग नव्हतं. म्हणायला ते सरकारी अधिकारी होते. काही वर्षापूर्वी रिटायर झालेल्या त्यांना, फारसा फंड व पेन्शन मिळाले नाही. बाकी तात्या, पियुष महिन्याला पाच सात हजार रुपये पाठवीत त्यावर त्यांचं चाले. अजून सरला, जीवन आणि शशांक यांची लग्न व्हायची होती. सरला त्यांच्या भावाची मुलगी. भाऊ आणि त्याची बायको दहा पंधरावर्षांपुर्विच गेली होती. अनाथ सरलाची जबाबदारी अर्थातच बाबासाहेबांनी घेतली. माईंना ते फारसं आवडलं नव्हतं. पण त्यांनी विरोधही केला नव्हता. सरला आता नाही म्हंटलं तरी लग्नाच्या वयाची होती. तिचं पदवी पर्यंतच शिक्षण बाबासाहेबांनी केलं होतं. ते नेहेमी म्हणत, "आपल्याला देवानी मुलगी दिली नाही. हिच्यामुळे तरी कन्यादानाच पुंण्य आपल्याला मिळेल. ". पण ते त्यांच्या नशिबात नव्हतं हेच खरं. शशांकचं शिक्षण संपत आलेलं होतं. छोटेखानी शहर असल्यामुळे वस्तुंच्या किंमती फार वाढलेल्या नव्हत्या. काही वस्तू तर मिळतच नसत. त्यांच्याशिवाय जगण्याची गावकऱ्यांना सवय झाली होती. शर्मिलाला तर सासरी फार दिवस राहण्याची वेळ आलीच नव्हती. लग्न झाल्यावर ती जी काही दोनतीन महिने राहिली तेवढीच. तेवढ्यात तिला बाबासाहेबांचा स्वभाव चांगलाच समजला. बाबासाहेबांचं लक्ष प्रत्येक ठिकाणी खूप असायचं. त्या मानानं माई बऱ्या म्हणायच्या. तिनं हळूच माईंकडे पाहिलं. माई तशा अबोल होत्या. त्या कूठल्याच बाबतीत प्रतिक्रिया देत नसत. मुंबईला राहण्याची सवय असल्यामुळे म्हणा किंवा एखाद्याला फॅशनेबल राहण्याची सवय असते म्हणा, ती फॅशनेबले राहायची. पण बाबासाहेब तिच्या कपड्यांवरही टीका करायचे. म्हणायचे, "गावात फिरलीस म्हणजे कळेल, लोक एकदा बोलायला लागले की परत इथे यायची नाहीस. " शर्मिला फक्त तोंड वाकडं करायची. तिला माईंचाही राग यायचा. त्या तिची बाजू कधीच घेत नसत. पण तिनी माईंना कधी दुखावलं नाही.
दिवाळीसणाच्या वेळचा प्रस्ग तिला ओझरता आठवला. बाबासाहेबांनी तिच्या आईवडलांवर केलेली शेरेबाजी तिला आठ्वली. तिनं त्यावेळी मात्र ठणकावून सांगितलं होतं, " मुंबईला राहतात, पण नोकऱ्याच करतात. सोन्याची खाण सापडली नाही त्यांना. दोघा भावांची शिक्षणं व्हायच्येत अजून. " त्यावर जवळ जवळ दोन तास वाद घातला होता, बाबासाहेबांनी. ते म्हणाले ते खरं होतं. पण नेहेमीच माणसानं खरं बोलायला पाहिजे का? माणसं तुटत असतील तर खरं हवच कशाला? असा तिचा सरळ हिशेब होता. मग मात्र ती येईनाशी झाली. निशीचा जन्म जसा मुंबईचा तसाच रचनाचा पण. त्यावेळी गावी बाळंतपण करण्याचा हट्ट तात्यानी धरला होता पण तिनी ते बाबासाहेबांच्या स्वभावामुळे मोडून काढलं. थोडक्यात तिच्या घराबद्दल आणि बाबासाहेबांबद्दल कटू आठवणीच जास्त होत्या. बाबासाहेब सर्व आर्थिक मदत शशांक आणि सरलाला करीत. त्यामुळे ती तात्यावर चिडायची. तिच्या वाट्याला बाबासाहेबांचा पैसा कधी आला नाही. मग देवांचं सगळं ताब्यात घ्या असं ते म्हणाल्यावर तिने ते मोडून काढलं, म्हणून बरं. नाहीतर भोळसट तात्यानी होकार दिलाच होता. मुंबईला आम्हाला वेळ मिळणार आहे का, या सगळ्या गोष्टी सांभाळायला. अशा एक ना अनेक, बऱ्याच आठवणी तिच्या मनात चित्रपटासारख्या तरळून गेल्या. असल्या चित्रपटांचा वेग एवढा असतो की सगळं आयुष्यसुद्धा काही मिनिटात उलगडतं. तिला आपल्याच मनाची कमाल वाटली. ती खरं तर आता कंटाळली होती. पांढरी साडी नेसून खाली मान घालून असं किती वेळ बसून राहायचं, या डेड बॉडीपुढे?. आत जाऊन फ्रेश होऊन चहा घ्यावा असं तिला वाटू लागलं. दिवाणखान्यात कोणतच आवाज येत नव्हते. समोरच्या लोहाराच्या दुकानातून घण मारल्याचे आवाज येत होते. आपलं आयुष्य असच घण मारून कोणितरी वळवल्यासारखं गेलं, एखाद्या लोखंडाच्या तुकड्यापासून कुठलातरी आकार बनवतात तसं. निशी आणि रचना आल्याबरोबर मागिलदारी खेळायला गेले. मुलांचं बरं असत, त्यांची सगळ्यातून लवकर सुटका होते. येतांना सगळं बजावलं होतं. त्यांचं खाणं पिणं करुनच ते निघाले होते. खरं तर ते रात्रीसुद्धा येऊ शकले असते. पण जेवण खाणाची पंचाईत होऊ नये म्हणून ते सकाळी निघाले.
जीवन दुपारी एक वाजेपर्यंत येणार होता. त्याचा तात्याला फोन आला होता. तो भोपाळला असायचा. जीवन एबढा पगारदार माणूस, पण पैसा सुद्धा घरी पाठवीत नव्हता. तेवढ्यात माईंनी समोरच बसलेल्या तात्याला विचारलं, " जीवन कधी येतोय? उत्तरादाखल तात्याने "काय माहीत? " अशा अर्थी हातवारे केले. शर्मिलाला माहित होतं, पण ती बोलली नाही. माणसांची होणारी तगमग तिला बघायला मजा वाटायची. दाराशी पुन्हा कोणीतरी घोटाळलं. दारात पियुष आणि तारा उभे होते. ते आत आले. आणि ताराला तिथे बसायला सांगून शर्मिला स्वैपाकघरात गेली. आतला सगळा पसारा पाहून तिचं डोकं उठलं. रात्रीची भांडी तशीच अस्ताव्यस्त पडली होती. सरलाला काय झालं होतं ती साफ करायला? तिला वाटलं. बाबासाहेबांसाठी तापवलेलं गरम पाण्याचं मोठं पातेलं भरलेलंच होतं. एका प्लास्टिकच्या पिशवीत बाबासाहेबांची जखम पुसलेले कापसाचे बोळे तसेच होते. नशीब अजून माशा घोघावत नव्हत्या. छातिचा कॅन्सर झाला होता. जखम वाहत असल्याने ती सारखी पुसावी लागे. शेवटचा आठवडा डॉक्टरांनीही हात वर केले होते. आणि घरी घेउन जाण्यास सांगितले होते. अधून मधून ते यायचे. पण "औषध न लगे मजला " असली अवस्था बाबासाहेबांची असल्याने, क्वचितच एखादं पेन किलरचं इंजक्शन देऊन जायचे. मग जरा बर बाटायचं. एवढी अवस्था होती पण जास्त कमी काही कळवलं नव्हतं. शशांक आणि सरलाचं ठिक आहे, पण माईंनी नको सांगायला?..... मुखदुर्बळ कुठल्या.!. हे सगळं तिला शेजारचा भैया मुंबईला आला होता त्याच्याकडून तिला कळलं. पण घरातल्या माणसांच्या मनः स्थिती बद्दल जराही सहानुभूती नसल्याने तिला त्यांनाच दोष देण्यात मौज वाटत होती. ती चहा साखर शोधीत होती. थोडस दूध शिल्लक होतं. तिनं गॅस पेटवला आणि चहा करण्याच्या तयारीला लागली.
बाहेरून एकदम बोलण्याचे आवाज आले. म्हणून ती दिवाण्खान्यात डोकावली. चंद्रकांत पाटील, दोन तीन गावकऱ्यांसोबत आले होते. तिचं त्याच्याबद्दल चांगलं मत होतं. ती परत आत आली. पाटलांनी पुढे होऊन तात्याची, पियुषची विचारपूस केली. साधारण पुढील कार्यक्रम केव्हा, ही विचारणा केली. पियुषच म्हणाला, " एक वाजेपर्यंत निघू. जीवन येईल तोपर्यंत. नाहीच आला तरीही निघू. " पाटील म्हणाले, " बारा साडेबारापर्यंत सामान येईलच. मानसाला पाठवलाय मसणाचा पास काढायला. आणि शामूभटाचा मुलगा येईल म्हणालाय. काही लागलं तर संकोच करू नका, ताबडतोब कळवा. आनी हो, च्यापाणी पाठवायची येवस्था करतोय, तो तेवढा घ्या. न्हाई म्हणू नका. काय आहे, जाणारा जातोय, पन आपल्याला जगायचं अस्तं न्हवं का? अस्म म्हणून ते गेले. माईंना त्यांचं बोलणं फारसं आवडल्ं नाही. बारा वाजत आले, गेटबाहेर पुढच्या तयारीचं सामान येऊन पडलं. मध्येच निशी आणि रचना डोकावीत, पण ते आत येत नव्हते. त्यांनाही काय झालय याची कल्पना होतीच. असं किती वेळ बसून राहायचं ताराच्या मनात आलं. तिला माईंबद्दल थोडा सॉफ्ट कॉर्नर होता. माईंचं तिला कौतुक वाटत होतं. एवढा मोठा परिवार सांभाळायचा आणि मुख्य म्हणजे बाबासाहेबांसारख्या फटकळ माणसाला सांभाळायचं, कठीण काम त्या करीत होत्या. तिला त्यांच्याबद्दल आदर होता. तसे बाबासाहेब मोठया सुनेच्या वागण्यापासून सावध झाले होते. त्यांनी दुसऱ्या सुनेच्या वेळेला अलिप्त राहण्याचं ठरवलं, म्हणून ठीक झालं. ताराशी त्यांची भांडणं झाली नाहीत की बोलाचालीही. तारालाही त्यांच्यावद्दल अढी अशी नव्हती किंवा फार प्रेम होतं असही नव्हतं. एकूण ताराचं वागणं बरं होतं. पण शर्मिलाला मात्र तिचं वागणं अलिप्त वाटायचं. तिला ती संधीसाधू, न बोलून शहाणी वाटायची. शर्मिलाची सगळ्यांच्याच बाबतीत काही ना काही तरी तक्रार असायची. कदाचित शर्मिलाला, मोठी सून म्हणून घराचा ताबा स्वतः कडे असावा असं वाटत असावं. सगळ्यात मोठी आणि प्रथम आलेली, म्हणून तिला सगळ्यांच्याच नकारात्मक वागणुकीचा त्रास झाला असावा. तसं नंतरच्या सुनांचं होत नसावं. त्या येईपर्यंत नकारात्मक वागणूकीची धार थोडी कमी झालेली असते.
असो, सव्वा बारा झाले परत पाटील डोकावले. आता त्यांनी येताना बाहेरून जेवणाचे डबे आणले होते. ते तात्याच्या ताब्यात दिले. नंतर दबक्या आवाजात म्हणाले, " तात्या, जीवनची वाट पाहायची का? काय आहे की आपण (म्हणजे ते पण) घरची माणसं. आपलं ठीक आहे रे. पण गावकरी येतील त्यांच्या पोटापाण्याचं काय?...... आं,... काय म्हणतो मी? ऊनही तापलय..... तूच विचार कर. " तात्यलाही ते पटलं. तात्या म्हणजे आपल्या अटलबिहारी वाजपेयींसारखा होता. त्याला सगळ्यांचच पटायचं. त्यानी मग जीवनला फोन लावायचा प्रयत्न केला, पण उत्तर आलं नाही. आत जाऊन शर्मिलाशी बोलून मग त्याने साडेबारापर्यंत निघण्याच ठरवलं. पण शर्मिला मध्येच येऊन म्हणाली, " अहो पण जीवन भावजींचं काय? नाहीतर ते आपल्यालाच दोष देतील. जरा थांवता आलं नाही का, असं म्हणाले म्हणजे? तिचंही म्हणणं तात्याला पटलं. तात्याची चांगलीच पंचाईत झाली. त्याने मग आपण तयारीला लागू, तो पर्यंत जीवन आला तर बरं, नाहीतर निघू, असं पाटलांना सांगितलं.
........... तयारीला सुरुवात झाली. गावातले खास लोक जमू लागले. पंढरीनाथ सोनार, दरेकर डॉक्टर, प्रभुदेसाई सावकार, सगळेच ओटीवर जमा झाले. मग मध्येच कोणीतरी म्हणालं, " अग्नी कोण देणार? " नुकतीच आलेली माईंची सासवडची विधवा बहीण ओरडली, " मोठा, नाहीतर धाकटा, या दोघांनाच अधिकार असतो. मधल्यांना नाही. " असं म्हंटल्यावर तात्या पुढे झाला. ते पाहून शर्मिलानी त्याला बोलावलं, आणि दबक्या आवाजात म्हणाली, " तुम्हाला काय अगदी प्रेम उफाळून आलय? शशांक करील की सगळं. नाहीतरी तोच धाकटा आहे. आणि तुम्हाला इथे राहता येणार आहे का, पुढचे पंधरावीस दिवस?, मुलांच्या परीक्षा आल्येत. विचार करा की जरा. " तात्याने तिचं ऐकलं नाही. तो स्व्तः सगळं करणार असल्याचं सांगायला बाहेर गेला. तेवढ्यात शशांक म्हणाला, " मी करीन की सगळं. नाहीतरी मी सध्या मोकळाच आहे. ". त्याला उत्सुकता होतीच, हे सगळं कसं करतात, ते पाहण्याची. पण तात्याच म्हणाला, "राहू दे शशांक. मी करणार आहे, सगळं होईस्तोवर मी राहीन इथे. " बाहेर आलेल्या शर्मिलानी हे ऐकलं आणि नापसंती दाखवीत ती स्वैपाक्घरात गेली. तिथे तारा होती. तिला म्हणाली, "यांची कमाल आहे. शशांक तयार असूनही यांना भलताच उत्साह लोटलाय.. तुमचं बरं आहे. पियुष भावजी आणि जीवन भावजी यांना करण्याचा अधिकारच नाही, म्हणून पथ्यावर पडलं. " मग तारा म्हणाली, " आता तशी पोझीशन आम्ही तर आणली नाही ना? एवढं वाईट कशाला वाटून घेताय? मोठेपणानी तुम्हीच सांगा ना शशांकला करायला. " मग त्या दोघी नुसत्याच इकडे तिकडे करीत राहिल्या. त्यांना काय करावं सुचेना. शर्मिलानी एक दोन वेळा शशांकला खूण केली. पण त्गे तात्यानी पाहिलं आणि डोळे वटारले. ती गप्प बसली.
अर्धा तास झाला. तयारी झाली. आत येऊन तात्यानी माईला समजावलं. आणि तिच्याकडून मंगळसूत्र काढून घेतलं. तेवढ्यात पाटील आणि इतर चार पाच जण पुढे झाले आणि बाबासाहेबांचा मृतदेह त्यांनी उचलला..... "श्रीराम जयराम.. जय जय राम... श्रीराम जयराम... जयजय राम... (रामाचा काय संबंध असतो, कोण जाणे) ̮. गढूळ वातावरणाला वास्तवतेचा छेद गेला. देह मुख्य दरवाजापाशी आणला. तेवढ्यात कोणितरी भरलेली घागर आणली. पण शामूभटाचा पोरगा ओरडला, " फकस्त पायावर पाणी घाला, डोक्या पर्यंत नेऊ नका. " असं म्हंटल्यावर काहीना ते खटकलं. रस्त्यावर वीस पंचवीस गावकरी खांद्यावरचं मोठं फडकं डोक्याला गुंडाळून उभे होते.. त्यांच्यात कुजबुज झाली. " बामनानी सगळं सोडलय. डोक्यापर्यंत अंगुळ घालाया पायजे. नवीन कापडं घालत्यात आनी मग जाळत्यात की राव. " बोलणारा आणि बोलणं लक्षात ठेवण्यासारखं नव्हतं. उगी वाद नको, म्ह्नून पाटील ओरडले, " अरे ए, भडविच्यानो, कालवा नकोय, चला म्होरं. समद्यास्नी च्या आनलाय तो घेवा आनी चला.
मग बाबासाहेबांचा देह तिरडीवर ठेवला. अंगावर काथ्याच्या दोऱ्या घट्ट बांधल्या. गुलाल बुक्का उधळला गेला. जवळ दहा पंधरा हार त्यांच्या गळ्यात पडले. पोटाचा भाग त्यामुळे फुगीर दिसू लागला. लांबून पाहणाऱ्याला जाणारा जलोदराने गेला की काय असे वाटले असते. समोरचा अण्णा लोहार पण प्रेतयात्रेत सामिल झाला. तात्याने मडकं धरलं. खांद्यावर टॉवेल टाकला. मडक्यातून येणारा धूर त्याचे डोळे जाळीत होता. मग पियुष, शशांक आणि गावातली बुजुर्ग मंडळी खांदा देण्यास पुढे सरसावली. मग पुन्हा एकदा राम नामाचा गजर झाला. माईंनी ओटिवर येऊन बाबासाहेबांचं शेवटचं दर्शन घेतलं. तोंडात पदराचा बोळा कोंबून त्या परत आत जाऊन बसल्या. प्रेताचे पाय दक्षिणेकडे ठेऊन बाबासाहेबांना नेऊ लागले. टाळ ढोलकीवाल्यांनी भजनाला सुरुवात केली....... " येथे कोणाचे दैव आड आले..... " शशांकला हे सगळं नवीन होतं. त्याला मनातल्या मनात हसू येऊ लागले. तो ते दाबीत स्वतः शीच पुटपुटला, " कोणाचं दैव आड येणार?.... मरणाऱ्याचं. हळू हळू यात्रा नदीच्या दिशेने पुढे निघाली. अजूनही जीवनचा पत्ता नव्हता. घरात तारा शर्मिला, सरला आणि माई बैठकीवर बसल्या होत्या. कोणाला काय बोलायचे तेच सुचेना.
(क्र म शः)
ही पण वाचल्यासारखी वाटतेय
ही पण वाचल्यासारखी वाटतेय कथा.
छान लिहीली आहे. मानवी मनाच्या कंगो-यांचे बारीक चित्रण.
छान आहे. ही पण वाचल्यासारखी
छान आहे.
ही पण वाचल्यासारखी वाटतेय कथा >> मनोगतावर आहेत त्यांच्या या कथा.
'सोयिस्कर खरेपणा वर तर जग
'सोयिस्कर खरेपणा वर तर जग चालतं.'
सुरेख वाक्य...छान् च लिहिता...
मस्त आहे...!!! एक सान्गावेसे
मस्त आहे...!!! एक सान्गावेसे वाटते की, तुमच्या कुठल्याही कथेची सुरुवात एक तर 'चौकार' अथवा 'षट्कार' ने होते....!!!
अनघा, चैत्रगंधा ,सुजाता आणि
अनघा, चैत्रगंधा ,सुजाता आणि अब्दुल हमीद यांचा प्रतिसादाबद्दल आभारी आहे. ही कथा काही
जणांनी मनोगतावर वाचली असण्याची शक्यता आहे. पण बाकीच्यांनी वाचलि नसल्यास त्यांना वाचता येइल.
कथेचा दुसरा भागही टाकला आहे तोही वाचून प्रतिसाद द्यावा ही विनंती.