काही क्षण असे असतात की ते मनात खोलवर रुतून बसतात आणि त्यातून तयार होतात अनेक उत्कट प्रतिमा. अशाच काही लाघवी प्रतिमांचा हा शब्दखेळ...
"पहाटवेळी स्नानासाठी तू पाणी काढून ठेवतेस तेंव्हा त्यातला प्रत्येक थेंब स्पर्शाधीर होऊन जातो,
तुझ्या तलम देहावरून ओघळताना त्यांचे प्राण कंठाशी येतात आणि तुझी काया शहारून उठते.
भल्या सकाळी ओलेत्या अंगानेच चिंब झालेले केस सुकवण्यास तु सज्जात येऊन उभी राहतेस तेंव्हा,
तुझ्या बाहेर येण्याआधीच अंगणातल्या नभांत दृष्टीव्याकुळ मेघांची दाटी झालेली असते.
तुला पाहून गालातल्या गालात हसत एकेक मेघ आभाळाच्या अंतरंगात विरघळत जातो,
मेघजाळ्यामागे अडकलेली दर्शनोत्सुक कोवळी किरणे तोवर कासावीस होऊन जातात.
मेघांआडून त्यांचा श्वास मोकळा होण्याआधी तु तुलसी वृंदावनापाशीअल्वार अवतरतेस.
तुझ्या मखमली देहासाठी स्पर्शातुर झालेली ती दिप्त किरणे तुझ्यावर जीव ओवाळून टाकतात.
देव्हारयासमोर बसून तू पूजा करत असताना तुझ्या मिटलेल्या डोळ्यात देवतृप्ती ओथंबते.
दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी घेताना तुझी पाठ आपल्या अंगावर टेकावी म्हणून माती आतुरते.
सांज होताच तू उंबरठयापाशी येऊन उभी राहतेस तेंव्हा श्याममेघ प्राजक्ताआडून तुला न्याहाळतो.
धुंदरात्र होताना अनावृत्त होऊन तू दिवा मालवतेस तेंव्हा समईतली वात अंधाराला मिठी मारते.
तुझ्या घराबाहेरचा गंधमुग्ध निशिगंध खिडकीतून आत डोकावतो आणि लाजेने चूर होऊन जातो.... ...."
- समीर गायकवाड.
शब्दांशी खेळणं जमलय तुम्हाला
शब्दांशी खेळणं जमलय तुम्हाला अप्रतिम कविता लय भारी...!
खिओप मस्त ...
खिओप मस्त ...