१२ सप्टेंबर.उंचपुऱ्या देखण्या जेरेमी ब्रेट ला जगातून गेल्याला आज २१ वर्षं होतील.अजूनही जुने बी.आर.चोप्रा महाभारत पाहिलेल्यांच्या डोळ्यासमोर कृष्णाचं नाव काढलं की फक्त नितीश भारद्वाज येतो तसं शेरलॉक होम्स म्हटलं की जगातल्या बहुतांश लोकांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त जेरेमी ब्रेट येतो.
आर्थर कॉनन डॉयल च्या या पात्राने अनेक निर्मात्या दिग्दर्शकांना आव्हान दिले.शेरलॉक होम्स स्टेज आणि मोठ्या छोट्या पडद्यावर अनेकांनी साकारला.यात सर्वात जास्त प्रसिद्धी मिळवलेले सादरीकरण ग्रॅनडा टेलिव्हिजन च्या शेरलॉक होम्स चे.प्रचंड खर्च, मेहनत आणि पूर्वतयारीनिशी ग्रॅनडा ने शेरलॉक होम्स आणि वॊटसन चा व्हीक्टॉरियन इंग्लंड चा काळ जिवंत केला.त्या घोडागाड्या, ब्रॉअम(छोटी घोडागाडी),वीज नसल्याने मेणबत्त्या आणि कंदील हातात घेऊन सर्वत्र फिरणारी माणसं,बारीक कमरेच्या पेल्पम(वेस्ट लाईन ला पूर्ण कपड्याच्या रंगाची उठावदार झालर असलेली ड्रेस किंवा स्कर्ट टॉप ची फॅशन) ड्रेस आणि डोक्यावर फुलांची हॅट किंवा बॉनेट वाल्या 'संकटातल्या सुंदऱ्या'(डॅम्सेल इन डिस्ट्रेस),शहरात रेशमी अस्तरवाली उंच टॉप हॅट आणि गावाकडे गेल्यावर डिअर स्टॅकर कॅप घालणारी आणि सर्वत्र वेस्टकोट, खिश्यात सोनेरी पॉकेट वॊच,वर लांब फ्रॉक कोट मध्ये फिरणारी माणसं हे सर्व बघायला खूप रोचक आहे.त्या काळातल्या वाफेची इंजिनं आणि प्रत्येक कुपेला स्टेशनवरून चढण्यासाठी स्वतंत्र दार असलेल्या आगगाड्या,काळ्या ड्रेस वर पांढरा ऍप्रन बांधून टोपीसदृश स्कार्फ चे दोन पट्टे केसावरून मागे सोडलेल्या पार्लरमेड,मोठी मोठी ऐसपैस लॉन्स असलेली घरं हे सर्व पाहून 'एकदा तरी त्या काळात जन्माला येऊन इंग्लंड ला जायला पाहिजे होतं राव' असं नक्की वाटून जातं.
ग्रॅनडा टेलिव्हिजन्स निर्मित शेरलॉक होम्स सर्वात आधी पाहिला तो कॉलेजात असताना हिस्टरी चॅनल वर हिंदी डबिंग सह.कोणीतरी हल्ला करणार या भीतीत होम्स कडे आलेल्या गृहस्थाने पूर्ण कथा सांगितल्यावर त्याच्याकडे रोखून बघून थंड शांतपणे 'मुझे सच बताईये'(टेल मी द ट्रुथ) म्हणून त्याने खरी गोष्ट सांगितल्याशिवाय त्याला कोणतीहि मदत न करणारा होम्स.आणि तेव्हा पासून आणि कोणताही माणूस होम्स म्हणून पाहणे डोळ्याला पटणारच नाही.मन ही मन मैने उसको अपना होम्स मान लिया.
आर्थर कॉनन डॉयल ने साकारलेला हा 'प्रायव्हेट कन्सल्टिंग डिटेक्टिव्ह' त्याच्या पुस्तकामध्ये दिसतो तो असा: कृष, काटक, थोड्या पांढरट निस्तेज त्वचेचा(अर्थातच कामाच्या नादात जेवणाखाणाच्या आणि झोपेच्या वेळा कधीच पाळत नसल्याने),भेदक नजरेचा,थोड्या मोठ्या कपाळाचा,सरळ टोकदार नाकाचा आणि कोरीव चेहऱ्यामोहऱ्याचा. सिडनी पॅगेट ने डॉयल च्या कथांसाठी काढलेली चित्रं असा दिसणारा होम्स दाखवतात.हा होम्स जिवंत होतो तो शेरलॉक होम्स च्या जेरेमी ब्रेट ने साकारलेल्या, विशेषतः पहिल्या सीझन मधल्या भागातल्या होम्स ला पाहिल्यावर.जेरेमी ब्रेट चे शेवटी वळलेले पोपटनाक,कायम टापटीप असलेले वेगवेगळ्या रंगाचे वेस्टकोट आणि फ्रॉक कोटस,क्षणात परत गंभीर चेहरा धारण करणारी त्याची प्रसिद्ध 'नॅनोसेकंड स्माईल्स',रेखीव आणि सगळीकडे समान मांस असलेला देखणा चेहरा,प्रचंड चपळ हालचाली(जेरेमी ब्रेट ची एका भागात सोफ्याच्या पाठीवरून वॅटसन ला परत बोलावून आणायला मारलेली उडी पाहिली तरी पटतं की तो या भूमिकेत अक्षरशः झोकून द्यायचा.),ते फ्रॉक कोट फलकारून बाजूला करून मग एखाद्या स्टुलावर बसणं,केस डोळे मिटून ऐकत असताना मध्येच डोळे उघडून एखाद्या सुंदरीला 'प्रे कंटीन्यू' सांगणं(म्हणजे तशी आधीपासून ती कंटीन्यूअसच बडबडत असते, श्वास घ्यायला थांबते त्या वेळात हा शहाणा हे वाक्य म्हणतो),चालत्या घोडागाडीत उडी मारून बसणं,बॉक्सिंग ची एक विशिष्ठ लकब,कोण्या गुंडाशी अचानक मारामारी करावी लागून नेहमी जेलने चप्प बसवलेले केस विस्कटलेले हे सर्व पाहणं हा नितांत आनंद आहे.याला पाहिलं की मग मला भारतातल्या नायकांना रक्ताने पत्र लिहिणाऱ्या किंवा एकदा पाहायला मिळावं घरात चोरासारखं घुसून मग अटक करवून घेणाऱ्या फॅन्स च्या कथा अती वाटत नाहीत.ज्या काळात जगला त्या काळात हा प्राणी पण फॅन्स ना याच उत्कटतेने आवडत असेल.
जेरेमी ने शेरलॉक च्या भूमिके साठी प्रचंड मेहनत घेतली.६ किलो वजन कमी केलं,भावाकडून पाईप ओढणं शिकून घेतलं आणि केसही वाढवले.शेरलॉक होम्स चे एपिसोड हे जवळ जवळ १००% डॉयलच्या मूळ कथेशी प्रामाणिक असावेत हा त्याचा आग्रह असायचा.शेरलॉक नक्की कसा होता,अमुक प्रसंगी तो कसा वागला असता,त्याच्या मनात एखाद्या प्रसंगाच्या वेळी काय विचार असतील,त्याचा डॉयल ने न लिहिलेला भूतकाळ कसा असू शकेल यावर जेरेमी सतत विचार करायचा.शेरलॉक चं वागणं बोलणं सवयी यावर त्याने ७७ पानी बेकर स्ट्रीट जर्नल बनवलं होतं.सेट वरील इतर लोक दुपारच्या जेवणासाठी गेल्यावर पण जेरेमी बेकर स्ट्रीट जर्नल चा अभ्यास करत असायचा.निव्वळ शेरलॉक चं पात्रच नाही, तर व्हीक्टॉरियन लंडन कसं असेल याबाबत जेरेमीने बरंच वाचन केलं.एपिसोड लिहिणाऱ्यानी पण बरेच कष्ट करून डॉयल च्या लिखाणात जरा कंटाळवाण्या वाटणाऱ्या जागा मूळ लिखाणाशी जास्त फारकत ना घेता रंगतदार बनवल्या.ग्रॅनडा च्या संपूर्ण टीम ची मेहनत म्हणजे हे शेरलॉक चे भाग, ज्यांना आजही चॅनेल्स कडून मागणी आहे.मनमोकळ्या दिलखुलास जेरेमी साठी असा एकलकोंडा,कमी बोलणारा,अलिप्त होम्स रंगवायचा म्हणजे एक मोठं कसोटीचं काम होतं.पण जेरेमीने असा होम्स नुसता उभाच नाही केला, तर त्यात स्वतःच्या काही विशिष्ठ लकबी टाकून तो डायनॅमिक आणि आकर्षक बनवला.स्पेकल्ड बँड, ग्रीक इंटरप्रीतर,कॉपर बीचेस,नॉरवूड बिल्डर,मुसग्रेव रिच्युअल हे काही अतिशय सुंदर एपिसोड.
एका उच्च कुटुंबातून आलेल्या पीटर जेरेमी हगीन्स ला अभिनयाची आवड कॉलेज पासून होतीच.लहानपणापासून डिसलेक्सीया आणि बोलण्यातला दोष(आर नीट उच्चारता न येणे) या आजारांबरोबर राहून पण जेरेमी कॉलेज मध्ये गायकांमध्ये होता.अभिनयात येताना 'या क्षेत्रात जाऊन कुटुंबाचं नाव लावून खराब करू नकोस' अशी वडिलांची भूमिका असल्याने स्टेज वर त्याने हगीन्स सोडून आपल्या सुटाचं लेबल आणि शिंप्याचं आडनाव असलेलं 'ब्रेट' नावामागे लावलं आणि तेच शेवटपर्यंत टिकवलं.२५ व्या वर्षी ऍना मेस्सी शी लग्न, आणि मुलगा डेव्हिड लहान असतानाच २९ व्या वर्षी डिव्होर्स घेऊन गॅरी बॉण्ड बरोबर समलिंगी संबंध, परत १९७६ मध्ये जोन विल्सन शी लग्न अश्या अनेक उलथापालथी त्याच्या व्यक्तिगत जीवनात चालू होत्या.शेरलॉक होम्स साठी नाव नक्की झालं तेव्हा जेरेमी आधीच एक यशस्वी अभिनेता होता.अनेक नाटकं आणि 'माय फेअर लेडी' सारख्या भूमिकेची प्रसिद्धी त्याच्या नावावर जमा होती.पण शेरलॉक होम्स हाती घेतल्यापासून 'शेरलॉक म्हणजे जेरेमी आणि जेरेमी म्हणजे शेरलॉक' असं समीकरण नक्की झालं.
१९८५ मध्ये शेरलॉक होम्स चे चित्रीकरण जोरात चालू असताना फक्त नऊ वर्षांच्या प्रेमळ संसारानंतर जोन कॅन्सर ने वारली.जोन वर जेरेमीचं प्रचंड प्रेम होतं.त्यांचे विचार पण जुळायचे.जोन च्या मृत्यू नंतर जेरेमी मानसिक दृष्ट्या कोसळला.आधीपासून असलेल्या बायपोलर डिसऑर्डर ने उग्र स्वरूप धारण केलं.प्रचंड प्रमाणात मूड चे चढ उतार,उदासी याबद्दल त्याला उपचार घ्यावे लागले.१९८७ मध्ये परत शेरलॉक होम्स च्या चित्रीकरणासाठी तयार झाला तेव्हा तो बायपोलर डिसऑर्डर च्या उपचारासाठी लिथियम वर होता.त्याने त्याच्या वजनात खूप वाढ झाली.पूर्वीचा सोफ्यावरून उडी मारून दाराकडे धावत जाणारा देखणा चपळ होम्स जाऊन आता बऱ्याच मंदावलेल्या हालचाली आणि वाढलेलं वजन घेऊन फिरणारा होम्स दिसायला लागला.लिथियम मुळे वजन वाढतच गेलं.एकदा खिन्नतेच्या भरात त्याने स्वतः स्वतःचे केस कात्रीने वेडेवाकडे कापून टाकले.जेरेमीच्या आखूड केसांना शेरलॉक च्या जेल्ड बॅक केसांच्या लूक मध्ये कसं बसवायचं यावर सेट वरचे स्टायलिस्ट स्वतः चे केस उपटायला लागले.बायपोलर डिसऑर्डर ची माहिती माध्यमांपर्यंत जाऊ दिली नव्हती, त्यामुळे माध्यमांनी या जाड आणि मंद झालेल्या नव्या सीझन्स मधल्या होम्स वर टीका चालू केली.सिगारेट पिणे दिवसाला ६० सिगारेट पर्यंत गेले.या सगळ्यात शेरलॉक होम्स चं चित्रीकरण चालू होतंच.जेरेमी ऑक्सीजन सिलिंडर घेऊन व्हील चेअर वरून सेट वर यायचा.योगायोगाने डाईंग डिटेक्टिव्ह या भागाच्या चित्रिकरणा दरम्यान जेरेमीचं हृदय काही काळ बंद पडलं होतं.त्याच्या आजाराची नीट माहिती असलेला कोणीही मनुष्य या वाढलेल्या वजनाच्या मंद जेरेमीच्या एपिसोडस चा तिरस्कार करू शकणार नाही.लिथियम चालू ठेवलं तर वजन वाढतं,फुफ्फुसात पाणी भरतं, आणि लिथियम बंद केलं तर मॅनिक डिप्रेशन परत नव्या दमाने डोकं वर काढतं अश्या पेचात डॉक्टर मंडळी सापडली होती.जेरेमी एकदा सॅनिटोरियम मध्ये असताना काही पापाराझी पत्रकार मंडळी त्याला हॉस्पीटल मध्ये चोरून घुसून 'तुम्ही एडस होऊन मरता आहात का' विचारुन गेली.या सगळ्यांशी लढत १२ सप्टेंबर १९९५ ला जेरेमी ने झोपेतच हृदय निकामी होऊन जगाचा निरोप घेतला.
शेरलॉक होम्स चाहत्यांसाठी मात्र जेरेमी कायम जिवंत आहे.अजूनही जेरेमी ब्रेट चा शेरलॉक सर्व वयोगटातल्या प्रेक्षकांकडून तितकाच समरसून पाहिला जातो.जेरेमी चं त्याच्या सुंदर क्लायंटस ना स्पर्श करून त्यांच्या व्यवसायाबद्दल अंदाज व्यक्त करणं असूदे,त्याची केस विस्कटून आणि चेहऱ्यावर धूळ चोपडून केलेली माळी,प्लंबर ची वेशांतरे, किंवा त्याची र थोडा खेचण्याची लकब, सुंदर योग्य खर्जातला स्पष्ट आवाज असूदे, ब्रिटिश ऍसेन्ट आणि थोडासा स्वतःचा 'ब्रेटीश' ऍसेंट वापरून 'ब्रोज' ला 'ब्राज्ज' म्हणणे असूदे, स्पेकल्ड बँड मध्ये विषारी मण्यार येण्याची वाट पाहत अंधारात थरथरत्या हाताने उभा होम्स असूदे,जेरेमीला ला परत परत बघताना त्याचे चाहते कधीच थकत नाहीत, आणि त्यातला एक तरी कळवळून 'जेरेमी आता या काळात हवा होता राव!मरायला नको होता हा माणूस!' अश्या भावना व्यक्त करतोच.
जेरेमी, जिथे कुठे असशील आणि हे कोणत्यातरी दिव्य जाणीवेने वाचू ऐकू शकत असशील तर:
धन्यवाद दोस्ता, तुझ्यामुळे आवडता शेरलॉक होम्स इतका चांगला बघायला मिळाला,देव तुझं भलं करो!!मिस यु अ लॉट..
-अनुराधा कुलकर्णी
आह!!! जेरेमी ब्रेट ! सिर्फ
आह!!! जेरेमी ब्रेट ! सिर्फ नामही काफी है..
यू ट्यूब वर सहज शेरलॉक होम्स टाकून पाहिलं तेव्हा ग्रेनेडा निर्मित शेरलॉक होम्सचे भाग मिळाले. आणि मग त्यानंतर अधाश्याप्रमाणे सगळे भाग पाहिले. परिणामी शेरलॉक होम्स म्हणजे ब्रेट हेच समीकरण डोक्यात फिट बसलं.
भेदक नजर, चपळ शरीरयष्टी त्याला शोभलेशी उंची, देखणं व्यक्तिमत्व लाभलेल्या ब्रेटने खऱ्या अर्थाने होम्स उभा केला.
अतिशय सुंदर वर्णन!
अतिशय सुंदर वर्णन! व्हिक्टोरीअन काळाचे किती बारकाव्याने वर्णन केलय! शेरलॉकचा चहाता म्हणवून घेणारा मी अजून ह्या सिरीज् पासून कसाकाय लांब राहिलो काय माहीत? आमच्या जनरेशननी पाहिलेले होम्स दोनच! रॉबर्ट डाऊनी ज्यु. आणि बेनेडिक्ट कंबरबॕच. पण दोघांनीही मूळ कथेची ॲडॉप्टेड किंवा इंस्पायर्ड व्हर्जन्स साकारली आहेत. मूळ कथेशी तंतोतंत जुळणारं काही बघायला नक्कीच आवडेल.
एक महान पात्र साकारणाऱ्या महान अभिनेत्याचा शेवट असा व्हावा ह्याचं दुःख वाटतं.
आता कुतूहल जागे झालेच आहे तर चलो युट्युब!
मी अजून लेख वाचला नाही. परंतु
मी अजून लेख वाचला नाही. परंतु जेरेमी ब्रेटसारखा अभिनेता दुसरा होणे नाही व त्याच्यासारखा शेरलॉकही! माझा फार फार आवडता अभिनेता आहे हा. त्याच्यामुळे शेरलॉक माझ्यासाठी जिवंत झाला. आता लेख वाचते.
मलाही शेरलॉक म्हटल्यावर
मलाही शेरलॉक म्हटल्यावर रॉबर्टच आठवतो. पण आता जेरेमीचा शेरलॉकही पाहीन.
या लेखासाठी धन्यवाद!
येस्स! शेरलाँक होम्स = जेरेमी
येस्स! शेरलाँक होम्स = जेरेमी ब्रेट्स! मस्त लिहीलयंस, अनु!!!
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=eBI_5Rzf1aI
फेसबुकवर जेरेमी ब्रेटच पेज आहे . तिथून ही लिंक साभार
मस्त लिहल आहे अनु.आवडल.
मस्त लिहल आहे अनु.आवडल.
डिसक्लेमरः यात टाकलेली चित्रे
डिसक्लेमरः यात टाकलेली चित्रे कॉपीला प्रतिबंधित नसली तरी फ्रीवेअरही नाहीत.जेरेमीची फ्रीवेअर चित्रं शोधायचा प्रयत्न केला पण मिळाली नाहीत.चित्रं नाही टाकायची म्हटलं तर जेरेमीचा लेख आणि फोटो नाहीत???बटाटेवड्यात बटाटा नाही???
जेरेमीला भेटून जेरेमीची स्वतः छायाचित्रं काढून इथे टाकण्याचे म्या पामराचे अहोभाग्य असते तर इथे लेख लिहीत बसले असते का?तर, मुद्दा हा की चित्रांवर कोणी हरकत घेतल्यास ती सखेद आणि माफीसह काढून टाकली जातील.
मस्त लिहलाय लेख. आवडला.
मस्त लिहलाय लेख. आवडला.
रामानंद सागर महाभारत>>>>बी आर
रामानंद सागर महाभारत>>>>बी आर चोप्रा महाभारत
बाकी लेख छान आहे. माझाही आवडता शेरलॉक होम्स फक्त जेरेमी ब्रेट..
अरे हो खरंच की, फुल्ल मिसळ
अरे हो खरंच की, फुल्ल मिसळ केली रामायण महाभारताची.संपादन करते.
मला शेरलॉक जेरेमी जसा आवडतो
मला शेरलॉक जेरेमी जसा आवडतो तसे त्या मालिकेचे ओपनिंग म्युझिक, बेकर स्ट्रीटचे चित्रीकरण, तो काळ, सेपिया छटा.... सगळे सगळेच आवडते. मी त्या मालिकेच्या अखंड प्रेमात आहे. ओपनिंग स्कोअर तर मनाला हुरहूर, बेचैनी, पुढे काहीतरी गूढ घडणार आहे याची नांदी देणारा, काहीसा दर्दभरा, भूतकाळात घेऊन जाणारा आहे. रात्रीच्या नीरव शांततेत ही मालिका पाहाताना खासच मजा येते. मैं और मेरा शेरलॉक होम्स!
शेरलॉक होम्स चे सर्व एपिसोड
शेरलॉक होम्स चे सर्व एपिसोड पडद्यावर साकारणं कठीण आहे.
कपड्यात पण सूक्ष्म बदल डिपेंडिंग अपॉन प्रत्येकाची ड्रेसिंग स्टाईल आहेत.उदा.होम्स गावाकडे जाताना डीअर स्टाकर कॅप घालतो आणि वॅटसन ब्रिटिश म्हातारे सध्या घालतात ती कॉर्डरॉय ची पी-कॅप.
सुंदर्या बहुधा पायघोळ पेल्पम मॅक्सी सारख्या फॉर्मल ड्रेस मध्ये असतात.त्यांची चपटी फुलं वाली टोपी अंबाड्यावर घातलेली असते(केस मोकळे नसतात.)
कॉपर बीचेस वरुन वाटतं की बायकांचे केस शॉर्ट हेअरकट मध्ये कापणं हे फारसं कॉमन नसावं.
माणसं रात्री झोपताना ३/४ लेन्ग्थ पांढरा बिना बटनाचा गाऊन घालतात(होम्स आणि वाटसन दोघे अचानक उठवल्यावर त्या झग्यात असतात.)
सिगरेट पिणे हे 'व्यसन' नसून एकदम कॉमन गोष्ट असावी.बरेच लोक ४५-५० ला फुफुसांच्या विकाराने मरत असतील.
होम्स वॅटसन च्या शर्टाची कॉलर पण नेहमीच्या शर्टासारखी टाय मध्ये अडकवलेली नाही.
काठी घेऊन चालणे हे म्हातारपणाचे लक्षण नसून एकदम फ्रेशर म्हणून नोकरीला लागलेली माणसं पण काठी घेऊन चालतात.
घरातल्या जनरल नोकर्/मेड बायांना टोपी घातली नाही तरी चालते, पार्लर मेड ला ती पांढरी टोपी घालावी लागते.
होम्स ला स्त्रियांशी शेक हँड करणे आवडत नसावे, तो शेक हँड करण्याऐवजी पाठीवर हात ठेवल्यासारखे करुन दार दाखवतो.
अश्या अनेक (मला वाटणार्या) मजेशीर गोष्टी आहेत.
म्हटलं ना, ती दुनिया काहीतरी
म्हटलं ना, ती दुनिया काहीतरी वेगळीच, एकाच वेळी खरी व आभासी, सर्वसामान्य व गूढ, देखणी व अंगावर येणारी, संकुचित व कल्पक अशी मजेशीर आहे.
जेरेमी ने शेरलॉक च्या रोल ला
जेरेमी ने शेरलॉक च्या रोल ला अक्षरशः जिवंत केले.
डॉयल च्या पुस्तकातले एकूण वर्णन वाचून शेरलॉक हे अत्यंत गंभीर, तुसडे,व्यसनी आणि स्त्रीद्वेष्टे माणूसघाणे पात्र म्हणून रंगवले जाते.पण जेरेमी ने त्यातली विनोदी बाजू पुस्तकाशी जास्त फारकत न घेता पुढे आणली.
१. साईन ऑफ फोर मध्ये आधी कसले कसले रेफरन्सेस शोधायला खोलीत प्रचंड पसारा करुन नंतर क्लायंट मेरी मॉर्टसन भेटायला आलेली असताना अचानक त्या पसार्याचा अडथळा होऊन वॅटसन नेच पसारा केल्यासारखे 'वॅटसन, धिस प्लेस इस अ मेस' म्हणणे.
२. मुसग्रेव्ह रिच्युअल मध्ये मेड रेचेल प्रचंड तापात आणि हिस्टेरिक फिट मध्ये बेशुद्ध होऊन वॅटसन च्या अंगावर कोसळत असताना अजिबात डिस्टर्ब न होता मख्खपणे बसून राहून 'द गर्ल इस फेंटिंग, वॅटसन' म्हणणे.
३. सकाळी सकाळी मिसेस हडसन उठवायला आलेली असताना तोंडावर हात ठेवून डोळे गच्च मिटून 'प्लीज गो अवे' म्हणणे.
>>'एकदा तरी त्या काळात
>>'एकदा तरी त्या काळात जन्माला येऊन इंग्लंड ला जायला पाहिजे होतं राव' असं नक्की वाटून जातं.
+१
मस्त लेख. मला ह्या अभिनेत्याबद्दल माहितीच काय पण त्याचं नावही माहित नव्हतं. पण शेरलॉक म्हटलं की हाच डोळ्यासमोर येतो. कुठलं चॅनेल ही सिरिज परत दाखवेल का?
यूट्यूबवर बहुतेक सर्व भाग
यूट्यूबवर बहुतेक सर्व भाग आहेत.
Chan lekh ahe...mi_anu and
Chan lekh ahe...mi_anu and arundhati tumchya pratek post shi totally sahmat. Jeremy Brett mazahi favourite ...ya sarkha hach ahe ...dusra Holmes hone nahi ...
Tyacha memories jagavlyat...thank you .
अनु, मस्त लेख!
अनु, मस्त लेख!
भारी लिहिलंय.....
भारी लिहिलंय.....
वा . सुंदर लिहिलंय
वा . सुंदर लिहिलंय
सुंदर लिहिले आहे. लहानपणी हे
सुंदर लिहिले आहे. लहानपणी हे एपिसोड बघितले होते, आता पुन्हा बघायला पाहिजेत.
माझे आवडते तीन लेखक आहेत आणि
माझे आवडते तीन लेखक आहेत आणि तिघांच्या वेगळ्या शैली आहेत ते म्हणजे,
सर आर्थर कॉनन डॉयल(गूढ, रहस्य कथा), पु. ल. देशपांडे (विनोदी) आणि नारायण धारप (भयकथा)!
सर डॉयल यांनी लिहिलेल्या अप्रतिम शेरलॉक होम्स कथांमुळेच माझ्यातील कल्पना आणि तर्क शक्तीचा विकास झाला आणि त्यामुळेच मी आज विज्ञान कथा लिहू शकतो.
जेरेमी ब्रेट बद्दल काय बोलणार? तो एक अभिनेता नव्हे तर महान जादूगार होता असेच म्हणावे लागेल! स्वतःला त्याने शेरलॉकमध्ये भूमिकेत इतके तंतोतंत बसवले कि आपण शेरलॉकलाच टीव्हीवर लाईव्ह केस सॉल्व करताना बघत आहोत कि काय असा प्रश्न पडल्या शिवाय राहत नसे!
खरंच एक महान अभिनेता आपण गमावला आहे! आजही मी जेव्हा परत या मालिकेचे भाग पाहतो तेव्हा डोळ्यात पाणी आल्यावाचून राहत नाही, जेरेमी आज या जगात नाही (तो होताच तसा निराळ्या जगातला!) याची खंत वाटते.
बाकी देवही काही महान कलावंतांना स्वतःपाशी ठेवल्याशिवाय नाही राहू शकत हेच खरं!
आठ नऊ वर्षांपूर्वी हिस्ट्री टीव्हीने या मालिकेचे भाग परत दाखवायला सुरुवात केली होती, आताही त्यांनी ते परत दाखवायला पाहिजे (इंट्रो थिम तर काय जबरदस्त होतं!). ज्यांनी पहिली नसेल त्यांना विनंती आहे कि या महान जादूगाराला फक्त एकदा पहा आणि पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी तयार राहा!
अजून एक गोष्ट म्हणजे, खूप लोकांना आजचा बेनेडिक्ट कंबरबॅचही आवडत असेल (ज्याचे स्वतः सर आर्थर कॉनन डॉयलशी दूरचे नाते आहे!), त्याने आजच्या काळातला शेरलॉक अप्रतिमपणे साकारला आहे. त्याच शेरलॉक मालिकेची एक टाय इन टीव्ही फिल्म आली होती, 'Abominable Bride'. तीही पहा कारण त्यात शेरलॉक मूळ कहाण्यांवरून घेतला आहे, त्याच जुन्या काळातला, जुन्या पेहरावातला आणि मुख्य म्हणजे त्यात बेनेडिक्टही थोडाफार जेरेमी सारखाच दिसतो अर्थात त्यांची तुलना नाही होऊ शकत पण तरीही खूप सुंदर पद्धतीने बनवलेला आहे.
मस्त प्रतिसाद आहे!!
मस्त प्रतिसाद आहे!!
ब्रेट ची सगळी सिरीज पाहिली आहे
आबानोमियाबाल(गुगल इंडिक वर लिहिता येत नाहीय) ब्राईड मधला जुना शेरलॉक जेरेमी सारखाच आहे.बोलण्यातला अकसेंट पण.
बेनेडीक्त लहान असल्यापासून जेरेमी ची शेरलॉक बघायचा.
जेरेमी त्यांच्या कधीकधी घरी पण यायाचा. जुजबी ओळख होती.त्यामुळे बेनेडीक्त च्या शेरलॉक मध्ये कधीमधी जेरेमी डोकावतो.
शेरलॉक च्या बर्याच कथा मी
शेरलॉक च्या बर्याच कथा मी वाचल्या आणि नंतर हिस्ट्री टिव्हीवर या कलाकाराचे दाखवतील तेवढे भाग आणि रिपिट भाग पण पाहिले.
मला ह्या अभिनेत्याबद्दल माहितीच काय पण त्याचं नावही माहित नव्हतं. पण शेरलॉक म्हटलं की हाच डोळ्यासमोर येतो. >>+१
म्हणूनच शेरलॉकचे recently आलेले चित्रपट पाहू शकले नाही.
एकदा तरी त्या काळात जन्माला येऊन इंग्लंड ला जायला पाहिजे होतं राव' असं नक्की वाटून जातं.>>+१
पण आता बरीच वर्षे झाली आता हि मालिका पुन्हा telecast करायला हवी.
mi_anu धन्यवाद. तुमच्या मुळे या आवडत्या कलाकाराच्या नावासकट बरीच माहिती मिळाली.
वाहवा ! मस्त !
वाहवा ! मस्त !
लेख पूर्ण वाचला नाहीये.. पण पहिला परिच्छेद वाचूनच प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहवले नाही.
खुप सुंदर लेख!
खुप सुंदर लेख!
जेरेमी आता या काळात हवा होता राव!मरायला नको होता हा माणूस!>>> अगदी
कुठे मिळेल बघायला ?
कुठे मिळेल बघायला ?
जेरेमी ब्रेट पर एक लेख तो
जेरेमी ब्रेट पर एक लेख तो बनताही है!!! काय अफाट आहे त्याने साकारलेला होम्स. लेख फार आवडला अनु.
माझा देखील आवडता अॅक्टर आहे तो.
>>कुठे मिळेल बघायला ?>>
>>कुठे मिळेल बघायला?>>
इथे मिळेल.
बघायला आणि डालो करायला.
Pages