विमी - बॉलीवूडमधील सर्वात दर्दनाक मौत झालेली देखणी अभिनेत्री ......

Submitted by अजातशत्रू on 8 September, 2016 - 07:33

जगणं सुंदर आहेच पण या सुंदर जगण्याचा भयाण नरक कसा होतो व आयुष्याची, स्वप्नांची धूळधाण कशी होते याची आर्त शोकांतिका म्हणजे देखण्या विमीची चित्तरकथा ..... विम्मी जेंव्हा अनंताच्या यात्रेस गेली तेंव्हा तिचा मृतदेह शेंगा-फुटाणे विकायच्या ठेल्यावरून सांताक्रूझच्या स्मशानभूमीत नेला होता ! तिच्या सर्वांगाला दारूचा वास येत होता आणि तिचा मित्र जॉली याच्यासह फक्त चारेक माणसे तिचं पार्थिव ठेवलेला तो हातगाडा ढकलत नेत होते. हिंदी सिनेमाच्या इतिहासात सर्वात उपेक्षित असा भयाण मृत्यू विमीचाच झाला होता. अनेक अभिनेत्री अन अभिनेते अशा उपेक्षित अवस्थेतून गेले पण कोणाच्याही वाट्याला तिच्यासारखे भोग आले नाहीत अन येऊही नयेत... काळ्याशार मासोळी डोळ्यांची, आरसपानी कमनीय बांध्याची, गोरयापान रंगाची, चाफेकळी नाकाची, मोत्यासारख्या दंतपंक्तीची अन नाजूक ओठांची, बाहुलीसारखी दिसणारी देखणी विमी वयाच्या अवघ्या चौतिसाव्या वर्षी देवाघरी गेली तेंव्हा तिने 'सौदर्याचा शाप का दिला ?' म्हणून त्या विधात्याला विचारले असेल का असा प्रश्न मनात येतो......

आयुष्याच्या शेवटच्या पाच सहा वर्षात कुठलीही मिळेल ती दारू ती पित होती. त्यातलीच काही वर्षे तर तिने वेश्याव्यवसायदेखील केला, तिचा लिव्ह इन मधला जोडीदार जॉली तिला वेगवेगळ्या हॉटेल्सवर घेऊन जायचा...काहींनी तर तिला रेड लाईट एरियात देखील पॉइंट आऊट केले होते. तिच्या देखण्या शरीराचे अनेक पुरुषी श्वापदांनी मन मानेल तसे लचके तोडले आणि त्या बदल्यात ते तिला दारू देत गेले. ती आणखी पित गेली. ती पितच राहिली, ती स्वतःवर सूड उगवत राहिली. तिच्या अब्रूची लक्तरे वेशीवर मांडण्यात तिचा 'हमराज' म्हणवून घेणारा जॉली हाच मुख्य व्यक्ती होता ही खरेतर दुदैवीा गोष्ट होती. पण तिला त्याचाही रागलोभ नव्हता. ती कधीच या सगळ्याच्या पल्याड गेली होती. विमीच्या शेवटच्या वर्षात तर त्यानेही तिच्याकडे लक्ष देणे सोडून दिले. त्यानंतर तिच्या देहाची झालेली विटंबना अत्यंत पाशवी आणि अगतिकतेच्या कातळकड्यावरून झालेल्या कडेलोटाची होती. तिचा मृतदेह शेंगा-फुटाणे विकायच्या ठेल्यावरून सांताक्रूझच्या स्मशानभूमीत नेला होता ! तिच्या सर्वांगाला दारूचा वास येत होता आणि चारेक माणसे तिचं पार्थिव ठेवलेला तो हातगाडा ढकलत नेत होते. हिंदी सिनेमाच्या इतिहासात सर्वात उपेक्षित असा भयाण मृत्यू विमीचा झालेला आहे.

विमी ही पंजाबच्या जालंधरमधील सुबत्ता असणाऱ्या घरात १९४३ मध्ये जन्माला आलेली देखणी मुलगी. तिच्या कुमार वयात तिने गायनाचे धडे गिरवले होते. गायनाची आवड, घरचा पैसा आणि अंगचे देखणेपण यामुळे ती किशोर वयातच मुंबईत आली आणि पुढचे शिक्षण चालू ठेवले. ऑल इंडिया रेडीओच्या मुंबई केंद्रावरून मुलांच्या आकाशवाणीच्या कार्यक्रमात तिने बरयापैकी सहभाग नोंदवला होता. मुंबईच्या सोफिया कॉलेजमधून तिने मानसशास्त्रातून कला शाखेची पदवी घेतली. कोलकात्यातील हार्ड वेअर व्यवसायाचे किंग समजल्या जाणाऱ्या अगरवाल कुटुंबियाचा वारस शिव अगरवाल हा कामानिमित मुंबईला आल्यावर त्याची विमीशी भेट झाली आणि त्या भेटीचे रुपांतर प्रेमात अन प्रेमाचे रुपांतर पुढे विवाहबंधनात झाले. जातीने पंजाबी असणारे तिचे कुटुंबिय या लग्नाच्या विरोधात होते आणि त्यांनी इथून तिच्याशी जे संबंध तोडले ते परत कधीच जोडले नाहीत. त्यांचं हे अंतरजातीय लग्न मुलाकडच्या कुटुंबियांना देखील पसंत नव्हते पण त्यांनी तेंव्हा तरी टोकाची भूमिका घेतली नाही अन तिला सून म्हणून स्वीकारले. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.....

कोलकत्त्यात एका अलिशान पार्टीत बॉलीवूडचे प्रसिद्ध संगीतकार रवी आणि विमी यांची गाठ पडली. आरसपानी, नितळ देखण्या विमीला बघून रवी चकित झाले. त्यांनी तिला मुंबईस आल्यास काम मिळवून देण्याचा शब्द दिला. त्या दिवसानंतर विमीने आपल्या पतीकडे मुंबईला जाण्याचा हट्ट धरला. विमीने मुंबईच्या मायानगरीचा हट्ट धरला तेंव्हा त्या कुटुंबाने देखील त्यांची साथ सोडली. शिव अगरवाल मात्र आपल्या आईवडिलांना सोडून विमीसह मुंबईला आला. ते वर्ष असावं १९६४ च्या आसपासचं.

अमेरिकन फिल्म व दुरचित्रवाहिन्यावरील अभिनेत्री जॉन क्रॉफर्ड अन हॉलीवूडमधील मूकपटाच्या काळातील सेक्सी खलनायिका थेड बेरा यांची ती स्वतःला पौर्वात्य वारसदार समजत असे. पाली हिल मधल्या आपल्या अलिशान अपार्टमेंटमध्ये ती नवरयासोबत राहू लागली. मुळचीच श्रीमंत असणारी विमी गोल्फ आणि बिलीयर्डस अशा राजेशाही खेळांची शौकीन होती. तिच्याकडे तेंव्हा स्पोर्ट्स कार असल्याची नोंद आहे. भल्या मोठ्या ओव्हरकोटसनी अन डिझायनर ड्रेसेसनी तिचा वॉर्डरोब खचाखच भरलेला असे. अत्यंत लेव्हीश आणि स्टायलिश लाईफ स्टाईल जगणारया विमीला संगीतकार रवी बी.आर.चोप्राकडे घेऊन गेले, त्यांनी आपला शब्द पूर्ण केला. त्यांनी विमीला काम मिळवून दिले. रवीच्या या देखण्या 'फाईंड'वर बी.आर.चोप्रा एकदम खुश झाले, त्यांनी तिला त्या काळच्या शिखरावरील असणारया राजकुमार आणि सुनीलदत्तच्या सोबत फ्लोअरवर लॉंच केले, त्यांनी तिला 'हमराज'च्या लीड रोल मध्ये घेतले. विमी रातोरात स्टार झाली. मार्च १९६८ च्या फिल्मफेअरच्या कव्हरवर ती झळकली. त्या काळच्या सर्व सिनेपत्रिकात तिच्या तसबिरी छापून येऊ लागल्या.

१९६७ मध्ये 'हमराज' रिलीज झाला आणि तो ब्लॉकबस्टर हिट झाला, १९६८ मध्ये लगेच विमीचा पुढचा सिनेमा आला, 'आबरू' त्याच नाव होतं. आपण पैशासाठी इंडस्ट्रीत आलो नाही असं तेंव्हा प्रत्येक मुलाखतीत सांगणारी विमी नंतरअक्षरशः एक रुपयाला देखील महाग झाली होती. 'आबरू'मध्ये तिच्या सोबत त्या वर्षीचा बेस्ट न्यू फाईंड असा ज्याचा लौकिक झाला होता तो दिपककुमार होता. अशोक कुमार,ललिता पवार आणि निरुपा रॉय असे इतर तगडे आणि नामांकित अभिनेते त्यात होते. पण टुकार कथानक अन सुमार निर्मितीमुल्ये यामुळे हा सिनेमा विमीसाठी बॉक्स ऑफिस डिझास्टर ठरला ! १९६७-६८ मध्ये साईन केलेले तिचे 'रंगीला', 'अपोइंटमेंट' व 'संदेश' या नावाचे चित्रपट कधी आले न गेले काही कळाले देखील नाही. मात्र चर्चेत कस राहायचं याच तंत्र तिला चांगलेच अवगत झालं होतं. ती लेट नाईट पार्ट्यांना जात राहिली, फोटो शूट करत राहिली अन त्यातूनच ती कधी एक्सपोज होत गेली तिलाच ते कळले नाही. १९७० च्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ती चक्क बिकिनी घालून गेली होती ! नाही म्हणायला 'पतंगा' या आणखी एका सिनेमाने तिला थोडंस टाईम एक्सटेंशन मिळवून दिले, नाहीतर तिची आणखी लवकर दुर्गती झाली असती.

१९७४ मध्ये रिलीज झालेला शशीकपूरबरोबरचा 'वचन' हा तिचा शेवटचा सिनेमा, तो देखील आधी साईन केल्यामुळे हाती टिकून होता. तसेच १९७१ नंतर तिच्या कोणत्याही मुलाखती छापून आल्या नाहीत नाही तिचे कुठे फोटोशूट झाले. तिचा पती तिला घरी परतण्याविषयी विनवू लागला. देखणेपणाचा टोकाचा गर्व, हेकेखोर स्वभाव असणाऱ्या आणि पैशाचा काहीसा अहं असलेल्या विमीने आयुष्यात आणखी एक चुकीचा निर्णय घेतला, ती पतीपासून विभक्त झाली. अगदीच डी ग्रेड चित्रपट निर्माण करणारया जॉली नामक चित्रपट निर्मात्यासोबत ती राहू लागली. कमाई शून्य अन राहणी खर्चिक तशात दारूचे जडलेले व्यसन यामुळे ती पुरती कर्जबाजारी झाली. शिव अगरवालने विमीच्या नावावर केलेल्या 'विमी टेक्सटाईल्स' या कोलकात्यातील उद्योगाला जॉलीने विकून टाकले अन तिची देणी फेडून टाकण्याचे नाटक केले. जॉली तिला छोट्या सिनेमांच्या निर्मितीच्या थापा मारत राहिला अन ती त्याला भुलत राहिली. मुलाखतीत ती ज्या सिनेमांबद्दल बोलायची ते सिनेमे कधी सेटवरच गेले नाहीत. तिला अगदीच विपन्नावस्था आली. प्रचंड मानसिक तणाव सहन करीत अपयशाच्या खोल गर्तेत बुडून गेलेल्या विमीने सामाजिक बंधने झुगारून दिली, नाती तोडली, स्वतःला अतिमुल्यांकित केले अन ती पक्की नशेबाज झाली. हाती येईल ती दारू त्यामुळे ती पिऊ लागली. तिच्या आयुष्यात ही प्रचंड उलथापालथ केवळ बारा वर्षाच्या एका तपात झाली, तिशीतली एक देखणी अभिनेत्री फिल्मफेअरच्या कव्हरवरून उतरली आणि काही वर्षात बाजारात जाऊन बसली, ती देखील दारूच्या काही घोटासाठी !!

खरे तर चोप्रा कॅम्पेनचा इतिहास बघितला तर असं लक्षात येतं की त्यांनी पडद्यावर आणलेले नवीन चेहरे फेल गेले तरी ते त्यांना वारंवार संधी देत गेले पण फुटक्या नाशिबाची विमी याला देखील अपवाद ठरली. चोप्रांच्या 'हमराज'च्या पोस्टिंगमध्ये त्यांनी विमीचे तोंड भरून कौतुक केले पण नंतर सिनेमे दिले नाहीत. बी.आर.चोप्रा तिच्याशी असं का वागले याचं कोणतंच उत्तर कोणापाशीही मिळाले नाही. विमीला इंडस्ट्रीमधील कुठल्या कोस्टारने देखील का मदत केली नसावी याच उत्तर मात्र मिळते. विमी जेंव्हा विजनवासाच्या बेड्यात गेली तेंव्हा जॉलीने तिचा बाजार मांडला, तिचे अविरत शोषण केले गेले. प्रसिद्धी सोडाच तिचा ठावठिकाणा देखील कुणी पुसला नाही इतकी तिची बदनामी अन बदहाली झाली. भरीस भर तिच्या बद्दल इतक्या भयंकर कहाण्या अन अश्लाघ्य चर्चा झाल्या की तिचा कुणी शोधच घेतला नाही. एके काळी स्वतःच्या स्पोर्ट्सकार मधून लॉंगड्राईव्ह वर जाणाऱ्या विमीला तिच्या उभ्या आयुष्यात कधी असे वाटले असेल का, की तिच्या मृत्यूनंतर तिला हातगाडीवरून ढकलत स्मशानात नेले जाईल ?

विमीच्या आयुष्याची अन अब्रूची अशी चिंधड्या उडालेली लक्तरे अखेर काळालाच असह्य झाली असावीत. विमीचे लिव्हर बस्ट व्हायला आले होते, काहीही पिऊन आणि कुठेही झोपून अनेकांनी शोषलेल तिचं शरीर एक ओसाड मधुशाळाच झालं होतं. तिला रस्त्यावरून उचलून नानावटीच्या जनरल वॉर्डमध्ये शेवटचे काही दिवस ठेवण्यात आलं होतं. कित्येक वर्षानंतर तिच्या शरीराला मिळालेला हा एक आरामच होता. हा आराम देखील अखेरचाच ठरला, २२ ऑगस्ट १९७७ च्या मध्यरात्रीचा भयाण अंधार तिला इथल्या अंधारकोठडीच्या अक्राळ विक्राळ जबड्यातून काढून आपल्या सोबत घेऊन गेला. आनंदबाजार पत्रिकेत तिच्या कोलकात्त्यातील कृष्णा नावच्या मित्राने तिच्या श्रद्धांजलीत लिहिले होते की. ' हा मृत्यू म्हणजे तिची सुटका होती, एका वेदनेतून मोठी सुटका घेऊन आलेली रात्र ...' या लेखात विमीने घेतलेल्या भूमिका आणि निर्णय तिच्या मित्राने तिच्या ध्येयाला धरून असल्याचे म्हटले होते. सिने एडव्हान्स या सिनेपत्रिकेने देखील तिच्यावर लेख लिहिताना अखरेच्या काळात झालेल्या तिच्या शोषणाबद्दल हळहळ व्यक्त केली होती. विमीची अशी त्रोटक आणि तुरळक दखल तिच्या मृत्युनंतर इंडस्ट्रीने घेतली आणि नंतर तर ती लोकांच्याही स्मृतीतून बेदखल झाली.

मला कधी कधी प्रश्न पडतो, डोळे दिपवणारया या मायानगरीचा हा काळाकुट्ट चेहरा आपल्या आत्म्यावर पांघरून अशा कित्येकांनी हे भोग भोगले असतील ? ज्यांची नावे आपल्याला माहिती आहेत त्यांच्या विषयी आपण जिज्ञासा दाखवून थोडीफार माहिती तरी घेतो पण ज्यांची कसलीही ओळख निर्माण होऊ शकली नाही, ज्या कळ्या कधी फुलूच शकल्या नाहीत अशा किती जणांच्या वाट्याला हे मरणभोगाहून वाईट भोग आले असतील ? काही कल्पना करवत नाही....परवीन बाबी अल्लाह कडे गेल्यानन्तर तीन दिवसांनी तिच्या देहाचा कुजल्यासारखा वास येऊ लागल्याने कळाले की ती राहिली नाही. तिच्या पश्चात काही दौलत होती म्हणून काही वारसदार मृत्यूपश्चात त्या हेतूने तरी तिच्या अवतीभोवती गोळा झाले. पण विमीच्या नशिबी तर हे सुख देखील नव्हते..

ज्या दिवशी हातगाडीवरती या देखण्या अभिनेत्रीचे शव नेले जात होते तेंव्हा आभाळात तेच निळे मेघ होते का ज्यांच्याकडे बघत राजकुमारने तिच्याकडे पाहत 'ओ नीले गगन के तले, धरती का प्यार मिले ..." असं उत्कट गीत पडद्यावर गायले होते हा प्रश्न माझ्या डोळ्याच्या कडा ओल्या करून जातो....विमी जरी चुकली असली तरी विधात्याने तिला इतकी कठोर शिक्षा द्यायला नको होती असं सतत वाटत राहते. पूर्वी हमराज खूप वेळा पाहिलाय तो राजकुमार आणी सुनीलदत्त साठी, पण आता कधी जर हमराज पाहतो तर फक्त आणी फक्त या शापित अभिनेत्रीच्या सुखद दर्शनासाठी .......स्वप्नाच्या आणि आयुष्याच्या चिंधड्या उडालेल्या, अकाली मृत्यूमुखी पडलेल्या एका दुदैवी अभिनेत्रीच्या रेखीव छबीच्या आठवणी डोळ्यात साठवण्यासाठीच मी हमराज पाहतो...

- समीर गायकवाड.

माझा ब्लॉगपत्ता -
http://sameerbapu.blogspot.com/2016/09/blog-post_43.html
humraj.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचून फार वाईट वाटले. विम्मीच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

विमीच्या अंताची कहाणी भयंकर आहे, पण ती अभिनेत्री म्हणून `धन्यवाद'च होती... तिला 'हमराज' मिळाला हेच आश्चर्य! अ‍ॅक्टिंगची टोटल बोंब!!

वाईट वाटले वाचुन.
हा संदर्भ तपासून बघणार का ? धर्मेंद्र सोबत एका चित्रपटात, ( बहुतेक क्रोधी नावाच्या ) ती दिसली होती, असे वाचल्याचे आठवतेय. त्यात हेमा आणि झीनत पण होत्या

विमीच्या अंताची कहाणी भयंकर आहे, पण ती अभिनेत्री म्हणून `धन्यवाद'च होती... तिला 'हमराज' मिळाला हेच आश्चर्य! अ‍ॅक्टिंगची टोटल बोंब!!>>>>>> +१

शोकांतिका आहेच. पण बर्याच अंशी, स्व-कर्तृत्वाने ओढवून घेतलेली आहे. त्यामुळे वाईट वाटलं तरी सहानुभूती नाही वाटत.

विमी हे नाव ऐकलं आहे पण शोकांतिका वाचून फार वाईट वाटलं.
चित्रपट सृष्टीला मायानगरी का म्हणतात ते अशा (सत्य) कथा वाचून पटतं. इथे यशाला हुरळून न जाता आपले पाय सतत जमिनीवर ठेवणं ज्याला जमलं तोच यशस्वी झाला.
दारूण अंत झालेली विमी ही पहिली अभिनेत्री नसावी, परविन बाबी, ललिता पवार. प्रत्यक्ष दर्शनी काहींना मृत्यू यथासांग आलाही असेल, पण अपयशाने खचून मनातून मेलेले कित्येक अभिनेते आणि अभिनेत्री या मायानगरी ने पाहिले असतील.

विमीबद्दल खरंच फार वाईट वाटले. असं व्हायला नको होतं असं मनोमन वाटून गेलं पण त्या त्या वेळी त्या व्यक्तीचे प्रेफरन्सेस आणि चॉईसेस आयुष्य बदलून टाकतात.

विमी सारखी देखणी व्यक्ती जन्माला यावी नक्की, पण तिचा असा दारूण अंत होऊ नये.

विमीची शोकांतिका फार वाईट आहे.
अभिनेत्री म्हणून मात्रं ती दगड होती असं मात्रं जोक्स ऐकले आहेत, किसी "पत्थरकी मूरत "से मोहब्बत का इरादा है, गाण्या वरून अजुनच जास्तं, खरोखरच दगडी पुतळा, एक्स्प्रेशन्स वगैरे काही संबंधच नाही.

हो, क्रोधी मधेच दिनेश भाऊ. थोडीशीच झळकली होती. मृत्यू पूर्वी शूटिंग जेवढं झालं तेवढं राहिलं असेल.

वरती दक्षिणाने लिहिलेच आहे की, मायानगरीत अनेकांच्या नशिबी असे भोग आले आहेत. मी तर ऐकलेले आहे की मीना कुमारीच्या नशिबी सुध्दा याप्रकारची दुर्दशा आली होती. विमीची शोकांतिका वाईट आहेच. पण फेरफटका म्हणतात त्याप्रमाणे वाईट वाटलं तरी सहानुभूती नाही वाटत. कारण हे तिने स्वतःहून ओढवून घेतलं होते.

विमीच नाव आधी माहित नव्हत >>> मला पण

पण फेरफटका म्हणतात त्याप्रमाणे वाईट वाटलं तरी सहानुभूती नाही वाटत. कारण हे तिने स्वतःहून ओढवून घेतलं होते.>>> + १११

"निले गगन के तले " हे गाण जवळजवळ दोन दिवसाआड मी सोनी मिक्स वर येता जाता पाहत असते.पुर्ण लेख वाचुन झाल्यावर हिच ती विमी ..बापरे.. अस झाल. Sad
वाईट वाटल.पण तिने स्वतःने च असे का निर्णय घेतले अस ही वाटल.कितीतरी पर्याय हाताशी असताना बिचारी दारुपायी गेली.

लेख वाचून विमीला बिचारी वगैरे म्हणणे हास्यास्पद वाटले. तिच्याबद्दल जराही वाईट वाटले नाही. तिने तिचे पर्याय स्वतः निवडले होते.

लचके तोडणे, शोषण करणे वगैरे शब्दप्रयोग तिच्याबाबतीत बिलकूलच लागू होत नाहीत. प्रत्येक वेळेला पुरुषाला खलनायक ठरवायची धडपड खूपच हास्यास्पद वाटली.

हा लेख अजिबातच पटला नाही.

माधव,
लेखकाने पुरुषांना खलनायक ठरविले आहे असे वाटत नाही.

{{{ .विमी जरी चुकली असली तरी विधात्याने तिला इतकी कठोर शिक्षा द्यायला नको होती असं सतत वाटत राहते. }}}

तिची चूक मान्य करुनही लेखकाने तिच्या नशीबाला दिलाय असं जाणवतं.

माधव - तुमच्या संपुर्ण पोस्ट ला सहमती.

एकुणच ह्या नटीचे वर्तन बघता, ती सिनेसृस्टीत आली नसती तरी तिची अशीच काहीतरी अवस्था झाली असती.

तिला पाहिजे ते तिने केले, उगाच तिला शोषित वगैरे पोट्रे करणे हास्यास्पद आहे.

खरा शोषीत कोण असेल तर तिचा नवरा शिव अगरवाल. बिचार्‍याचे आयुष्य मात्र ह्या बाईने उद्ध्व्स्त केले.

विमी चा मुलगा रजनीश जो की ओझेन रजनीश म्हणुन आता ओळखला जातो त्याची तर अजुनच विचित्र कहाणी वाचनात आली. त्याचे पुस्तक - tears of mystic rose, वाचले, वेडसरच वाटतो हा मनुष्य. फ्री पी डी एफ - https://ozenrajneesh.com/o/wp-content/uploads/Tears_of_The_Mystic_Rose_e...
हा फ्रॉड बाबा बुवा आहे असे वाटते. सं - https://www.vice.com/en/article/kz4ze9/how-a-fake-guru-set-up-a-wild-wil...
ओशो मेल्यानंतर त्यांचा आत्मा आपल्यात प्रवेशला असे सांगतो तो.
_______
२८८ पैकी १२६ पाने वाचंण्यात उगीच वेळ घालवला असे माझे मत शेवटी बनले.

ओशो मेल्यानंतर त्यांचा आत्मा आपल्यात प्रवेशला असे सांगतो तो > Lol
मलाबी रोज स्वप्नात एक लांब दाढीवाला,उंची झब्बा-डोक्याला मुंडासे असा पेहराव, स्पोर्टबाईकवर राईड करणारा म्हातारा स्वप्नात दिसायचा. नंतर बऱ्याच काळाने एक दिवस हापिसात युट्युबवर भोजपुरी गाणे बघत असताना सजेशनमध्ये तो म्हातारा दिसला एका थम्बनेलमध्ये. व्हिडिओ प्ले केला तर तो स्वप्नात येणारा म्हाताराच होता. मग काय तडक माझ्या स्कुटीला किक मारून तामिळनाडूला गेलो आणि दीक्षा घेतली. आता त्यांचा आत्मा माझ्यात यायला निर्वाणाची वाट पाहावी लागेल.

पण त्यासाठी गुरुजींच्या उरावर बसून छातीवर हात ठेऊन मंत्र म्हणावा लागेल. परत आत्मा एक्सचेंज झाल्यावर माझ्या शरीरात गुरुजींना राहावे लागेल. काही न करता बॊलबच्चन टाकायची सवय आहे त्यांना. नोकरीपाणी जमेल का त्यांना ? शिवाय त्यांचे शरीर जर्जर झालेले असल्याने माझे छंद-उद्योग झेपणार नाही त्या थकेल गात्राला Wink

Lol
जर्जर म्हटल्याबद्दल णिषेध Wink , सगळ्यात चार्मिंग व सतत 'फंडामेंटल' हा शब्द वापरणारे नवतरुण आहेत ते , ऐकत राहिलो तर एकेदिवशी आपणच मेंटल होऊ..

Pages