मायबोली मास्टरशेफ - आशिका - मका बेसन शाही रोल्स

Submitted by आशिका on 8 September, 2016 - 05:02

नमस्कार मंडळी !!

मायबोलीच्या गणेशोत्सवासाठी 'मायबोली' च्या आद्याक्षरांपासून सुरु होणार्‍या तीन घटक पदार्थांपासून मी ही गोड पाककॄती स्पर्धेसाठी सादर करीत आहे.

या पदार्थाचे नाव आहे,

मका बेसन शाही रोल्स

लागणारा वेळ - १ तास

साहित्य

स्पर्धेच्या नियमानुसार मुख्य घटक पदार्थ

१. - मका पीठ -पाव मेजरींग कप
मक्याचे पोहे - ३-४ लहान चमचे
२. - बेसन - अर्धा मेजरींग कप
बदाम - अर्धा मेजरींग कप पावडर करुन
३. - लोणी - अर्धा मेजरींग कप

इतर साहित्य

१. पिठीसाखर - पाव मेजरींग कप
२. दूध - पाच मोठे चमचे
३. केशर , वेलची पावडर, जायफळ पावडर, बदाम, पिस्ते काप - स्वादानुसार

sahitya-R.jpgविशेष सुचना -
या पा. कॄ. त. नियमानुसार लोणी वापरायचे होते. मी यासाठी पारंपारीक पद्धतीने घरी सायीला विरजण लावून ताक करुन जे लोणी काढतात ते घरचे लोणी वापरले आहे.

कॄती

१.सर्वप्रथम बेसन लोण्यात भाजायच्या आधी त्याचा हरवसपणा निघून जावा यासाठी बेसन मंद आचेवर कोरडेच खमंग भाजून घेतले.

२. आता बेसनात थोडे थोडे लोणी टाकत पुन्हा बेसन त्यात भाजून घेतले. मोजून घेतलेल्या लोण्यापैकी पाव भाग लोणी बाजूला ठेवले. बाकी सर्व बेसन भाजण्यासाठी वापरले. बेसनाचा खमंग वास येऊ लागताच ५ ते ६ चमचे दूध घालून गॅस बंद केला.

३. आता दुसर्‍या कढईत मक्याचे पीठ मंद गॅसवर कोरडेच भाजून घेतले. खरपूस झाल्यावर बाजूला काढले.

४. वगळलेले पाव भाग लोणी एका ताटलीत घेऊन ते मथले.
( खाजाचे कानवले करत असताना जी तूप मथण्याची प्रक्रिया आहे, ती लोण्यावर केली. ज्यांना तूप मथणे माहित नाही अशांसाठी - एका ताटलीत तूप घेऊन ते बोटांच्या पेरांनी घुसळतात जेणे करुन तुपातील रवाळपणा निघून गुळगुळीत पेस्ट बनते, जी कानवल्याच्या सारणासाठी आवश्यक असते.)

इथे तुपाऐवजी लोणीच असल्यामुळे मथण्याची क्रिया झटकन झाली.

steps 1-4-R.jpg

५. या मथलेल्या लोण्यात भाजून ठेवलेले मका पीठ थंड झाल्यावर घातले.

६. यातच ग्राईंडरवर वाटून घेतलेली कोरड्या बदामाची पावडर 'शाही' या शब्दाला जागण्यासाठी, तसा शाहीनेस यावा म्हणून मिसळली. दोन ते तीन चहाचे चमचे पिठीसाखरही घातली. किंचित वेलची व जायफळ पावडर मिसळली व फोटोत दाखवल्याप्रमाणे बॉल्स बनवून ठेवले.

७. या स्टेपला अचानक कानात शब्द घुमु लागले की अपार्ट फ्रॉम बेसन अँड लोणी, ' मका' इज ऑल्सो द हिरो ऑफ द डीश' आणि म्हणून साहित्याचा जो फोटो आहे त्यात नसलेला घटक अ‍ॅड करायची खुमखुमी आली आणि तो म्हणजे मक्याचे पोहे म्हणजे आपल्या बोलीभाषेत कॉर्नफ्लेक्स. तर थोडे कॉर्नफ्लेक्स हाताने चुरुन या मका, बदामाच्या बॉल्सवर घोळले.

८. इथे पोहोचेपर्यंत बेसन गार झाले होते. मोजून घेतलेली पिठीसाखर गुठळ्या मोडण्यासाठी एकदा ग्राईंडरमधून फिरवून बेसनात मिसळली. बेसन लाडू वळण्यासाठी तयार आहेत.

step5,6-R.jpg

९. पण गोलमटोल बेसन लाडू तर बनवायचेच नव्हते. तसंच मोदकाचा आकारही मला अपेक्षित नव्हता. म्हणून मी मुदाळ्याकडे कूच केले.

१०. मुदाळ्यात बेसन-पीठीसाखरेचे मिश्रण भरुन मध्यभागी आरपार खळगा केला आणि त्यात वर बनवलेला मका बदामचा बॉल हळूच सरकवून बेसनाच्या आवरणाने वरील भाग बंद केला.

mudale-r.jpg

११. मुदाळ्यातून बाहेर काढल्यावर सजावटीसाठी केशर काड्या वापरल्या. तसंच बदाम इज ऑल्सो द हीरो ऑफ धिस डीश, म्हणून बदाम, पिस्ते सजावटीसाठी कापाच्या रुपात विराजमान झाले.

Fp1R.jpgfp2-r.jpg

धन्यवाद मायबोली प्रशासन, संयोजक आणि समस्त मायबोलीकर.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ममो, नरेश माने, मानव, सोनू, चिन्नु - धन्यवाद.

फोटोंचं महाकाय रुप आवरतं घेण्याचा प्रयत्न करते.

धन्यवाद सर्वांचे.

संयोजक - फोटोंची साईझ कमी करण्यासाठी हा धागा संपादीत करीत आहे. कदाचित काही वेळ फोटोज दिसणार नाहीत.

तसदीबद्दल क्षमस्व .

वाह! आशिका... काय कष्ट घेतलेयंस गं... कळून येतंय... नीटच
स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा तुला.

Pages