बंडया - गुंडी १८

Submitted by Pritam19 on 22 August, 2016 - 13:16

रमलाचे भाकित
जमिनीची चिंचोळी पट्टी समुद्रात आत घुसत गेलेली. वाळूऐवजी खडपांचा, कपारींचा किनारा होता तो. पट्टीच्या मागच्या बाजूला गगनचुंबी इमारती उभ्या होत्या. तर पुढे भोवताली तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेली. त्यातही उत्तर, दक्षिणेला मोठ्ठया पुलांची बांधकामे चालू असलेली दिसत होती. कोळीवाडयातल्या घरांच्या गर्दिने पट्टी गच्च भरून गेली होती. कोळीवाडयात उत्सवाचे वातावरण दाखविणारे मोठया आवाजाचे कर्णे “धमाल कोळीगीते” बोंबलत होते. जागोजाग रंगीबेरंगी पताका आणि झेंडयांनी छोटया, मोठया होडया आणि आसमंत सजला होता. दुपारचे रणरणते ऊन लाटांवरून परिवर्तीत होऊन डोळयावर चमचमत होते. खारा वास व त्यात मिसळलेला माव्ह-याचा वास, डिझेल इंजिनाचा वास, ग्रीसचा वास गुदमरवून टाकत होता. सारे वातावरण जल्लोषाने कोळी, कोळणी आणि त्याच्या पोरापोरींच्या कलकलाटाने उत्साहाने सळसळत होते. बंडया, गुंडी आणि अमुदि शाळकरी मुलांच्या गँगला त्याची लागण झाली होती. काहीतरी करायला, उडया मारायला, आरडा-ओरडा, गडबड माजवायला सारेजण उतावीळ होते.
“रे पोरांनू वाईच हय सरा,” म्हणत एक निळया रंगाचा पडाव ते उभे होते तिथेच कट्टयाला येऊन थडकला. भर्रकन एक जाड जूड दोर त्यांच्या दिशेने फेकला गेला. तो त्यांच्या अंगावर आदळण्याआधी मधल्यामध्ये धरला गेला आणि एका मजबूत दगडी चि-याला बांधला गेला. सर्रकन एक फळकुट, पडाव आणि धक्क्याच्या मध्ये सरकले. त्यावरून एक बापय गडी उतरून त्यांच्या सलगीला आला आणि विचारता झाला, “ओ नागडे बाबांनू तुमची पोरांची फलटण जमलीन का? बेगीन चला, तांडलान् मियाँ धाडलान् आणायाक.”
जरी रापून काळी झालेली त्वचा होती, तरी तो तरणा कोळी आणि नुस्त्या कमरेच्या लंगोटलुंगीत उघडेबंब दिसणारे त्याचे पिळदार शरीर बंडयाला फारच प्रभावित करून गेले. बंडयाने मनोमन त्याच्या कॉमिक पुस्तकातल्या वेगवेगळया शक्तिमान नायकांच्या यादित त्याला अग्रक्रम देऊन टाकला. नागडे बाबा मात्र त्या सगळया उघडयावागडया दणकट अंगांच्या बाप्यांच्या जगात एक नाजूक शिडशिडा नखरेल पोषाखी माणूस वाटत होता. नंदू नागडे बरोबर बंडयाची ही पहिलीच खेप होती.
बिना उघडे किंवा वाघ्या वागडे आजोबांप्रमाणे नंदू त्यांचा एक समायोजक होता. पण तो त्याच्या कॉल सेंटरच्या कामात इतका व्यस्त असे की अभावानेच त्यांच्याबरोबर असायचा. आजच्या दिवसाची मुलांची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल नंदूच्या चेह-यावर तीव्र पश्चातापाची भावना स्पष्ट दिसून येत होती. कोळी समाजाच्या उत्सव साजरा करण्याच्या रूढीपरंपरांमध्ये स्वच्छतेला फारशी किंमत नसते हे जे स्पष्ट दिसून येत होते!
“अजून एक मुलगी आली नाहीए. थोडा वेळ पाहू आणि मग निघू.” नंदूने वैषम्याने उघडाबंब कोळयाला उत्तर दिले. त्याची नजर चंटी न आल्याच्या निराशेपेक्षा कोळयाच्या शरीराकडे पाहून जास्त वैषम्य व्यक्त करत होती.
“नंदू. ती नाही यायची. तिचे आईबाबा तिला असल्या...,” पंडीने पुढचे काही वातावरणाचे वर्णन करणारे शब्द उघडाबंब कोळयाकडे पाहून गिळले, “अं! असल्या गर्दीत म्हणायचे होते मला, नाही पाठवायचे. आपण जाऊ या.”
“ओ बाबांनू, चेडू लय हुशार दिसता. ता सांगता ता ऐका न् बेगीन चला. बाकि होडगी आमच्यापुढे जातली नायतर.” म्हणताना त्याने सहज कपाळावरचा घाम बोटाने टिपून टिचकीने उडवला. त्याचे शिंतोडे नंदूच्या परिटघडीच्या पांढ-या शर्टावर उडाले नि त्याचा चेहरा वेडावाकडा झाला. तो जास्त वेडावाकडा झाला, जेव्हा गुंडीनेही हिरोबाज कोळयाची सही सही नक्कल करत आपल्या कपाळाचा घाम टिचकिने उडवला.
“गुंडी तू मुलगी आहेस.” नंदूने तिला खडसावले.
“मग काय झालं? मला माहीताय.” गुंडी किंचाळली.
“तिला माहिताय रे,” म्हणत तंटाने कंटासमोर टाळीला हात दिला आणि ते दोघे तिला खिजवत हसले. गुंडीने मारक्या म्हशीचा पवित्रा घेतला मात्र ते वांडामागे दडले. गुंडीने वांडाकडे मोर्चा वळवला. तसे त्याने तिच्याकडे उद्धटपणे पाहिले आणि आपल्या कपाळावरचा घाम रुबाबात निपटून टिचकीने तीच्यावर उडवला.
“तुज्या?” करत गुंडी खवळून त्याच्या अंगावर जाणार तो पंडी व धुंडीने तिला धरले.
उघडाबंब कोळयाने मोठया उत्सुकतेने हा प्रकार न्याहाळला व तो म्हणाला “बाईमाणसान, बापय माणसाची बराबरी करता न्हय,” न् तो एक खकारा काढून पचकन शेजारच्या पाण्यात थुंकला. तेव्हा प्रत्युत्तरादाखल गुंडीनेही एक खकारा काढून तो पाण्यात थुंकला. तसा आपली पांढरी शुभ्र दातावळ दाखवत कोळी हसला.
एवढावेळ शांत अस्वस्थपणे सारे पाहणा-या नंदूने मग रूबाबात आपले डिझायनर घडयाळ नजरेसमोर धरले. “फार उशीर झाला चला सगळेजण. एकएक फळीवरून नीट पडावात जा,” म्हणत स्टाईलीत त्याने गॉगल नाकावर सारखा केला. आता घडयाळ आणि गॉगलकडे वैषम्याने पाहायची पाळी उघडाबंबची होती.
पहिला वांडा दणदणत फळीवर चढला नि पडावात निघाला, तशी फळी सरकली आणि कसाबसा तोल सावरत वांडा पडावात जाऊन कोसळला. उघडाबंब कोळी लगबगीने खाली वाकला आणि त्याने फळी गच्च धरली. वांडा मागोमाग तंटा कंटा होते. त्यांची लगेच पुढे जायची हिंमत होईना. गुंडीने त्यांना बाजूला सारले आणि बेपर्वाईचा आव आणत पण पायाबुडी नीट पाहत पडावात गेली.
“पंडी ये ग. मी हात देते,” म्हणत तिने पंडीला सुखरूप पडावावर उतरून घेतले.
तसे तंटा कंटा पुढे सरकले. गुंडीने मदतीचा हात काढून घेतला नि दोघी खाली बसल्या. वांडाने मग हात पुढे करून त्या दोघांना उतरून घेतले. त्याने धुंडीलाही मदत देऊ केली. पण बंडया पुढे होताच तो हात मागे घेऊन खाली बसला. बंडयाला नवल वाटले. त्याचा राग करायला वांडाला काय बरे कारण? तो जरा विचारात पडला. तेवढया वेळात नंदू पुढे होऊन आत शिरला.
“बंडया.., ए बंडया.” बंडयाला त्याच्या परिचित आवाजातल्या हाका ऐकू आल्या. त्याने मागे वळून पाहिले राव काकांचे राजन आणि बंटी त्याच्या दिशेने हात हलवत होते. बंडयाने पडावाकडे खूण करून आपल्याला जायचेय सुचवले. ते दोघे धावत त्याच्यापाशी आले.
“त्या कॅमेरावाल्या काकांनी आम्हाला त्यांच्या लांब फोकसमधून तू दाखवला, तू इथे काय करतोयस?” दोघांनी चढलेला श्वास घेत घेत विचारले. बंडयाने कॅमेरावाल्या काकांच्या दिशेने पाहिले. कोणी नव्हते.
“ते होते आता तिथे. ते पेपरासाठी बातमी गोळा करायला फोटो काढतायत.” राजनने खुलासा केला, “पण तू ईथे कसा?”
हा प्रश्न बंडयालाही त्यांना विचारायचा होता. पण उघडाबंब कोळी बोलला, “ओ बाबांनू. लान्च सुटतली. बेगीन चला. बाता मगे करा.” एकदम बंडयाला काही सुचले.
“नंदूकाका हे माझे शेजारी आहेत, यांना पण घेऊ?”
नंदू वैतागला, “मला काका नाही नुसतं नंदू म्हण. ते आपल्या शाळेतले नाहीयत. ते नकोत.” आठया घालत त्याने बंडयाला निघायची खूण केली. उघडाबंबला दिलदारपणा दाखवायची नामी संधी मिळाली.
“चला येऊ दे पोरास्नी. होडक्यात काय जागा कमी पडाची नाय,” नंदूच्या परवानगीची वाटही न बघता त्याने बंटीला फळीवर ढकलले. बंटी मधोमध जाऊन थरथरू लागला, तसा नंदूही मग ताबडतोब आपला दिलदारपणा दाखवायला मदतीसाठी उठला आणि त्याने हात पुढे केला. बंटी त्याचा हात धरून पुढे जाताच, उघडाबंबने फळीवरली पकड सोडली. फळी हलली. नंदूने एकदम आवेशाने बंटीला ओढ दिली न् त्याचा डिझायनर गॉगल खाली पडला. बघता बघता समुद्रात खोल दिसेनासा झाला. नंदूचा चेहरा कसानुसा झाला. क्षणभर त्याला बंटीच्या कानाखाली एक सणसणीत हाणून राग काढावासा वाटला. पण तो मुकाट्याने गिळून त्याने उघडाबंबचा धावा केला.
“हा बघा इथेच पडलाय. चटकन पाण्यात गेलं तर मिळेल. दहा फूटच खोल पाणी आहे.”
“नाय नाय नागडे बाबांनू. ता तसा जमण्यासारखा नसता. तो चिखलात खय गेलो गावायचो नाय. आज नारली पूनव नारलाबरोबर ता पण दर्याक घातला म्हणान समजा.” उघडाबंब कोळयाने शहाजोगपणाने नंदूला सल्ला दिला आणि राजनला फळीवर ढकलले.
नंदूने आपलेच दातओठ चावत राजनला पडावावर घेतले. बंडया फळीवर गेला, तेव्हा नंदूही वांडाप्रमाणे हात आखडून खाली बसला. बहुतेक झालेल्या नुकसानीला तो बंडयाला व त्याच्या विनंतीला जबाबदार धरत असावा. डळमळणा-या पायांनी भीती वाटत होती तरी बंडया एकटा पुढे पडावापर्यंत गेला. गुंडी आणि पंडीने आपल्या मध्ये त्याच्यासाठी जागा राखली होती. नाहीतर तीही न मिळती. बसता बसता त्याने टिपले की उघडाबंब कोळी आपल्या जेट्टीवरल्या सवंगडयाला डोळयाने काही खूण करत होता. काय करतोय तो?
(आम्ही पडावातून पुढे गेलो की ईथे पडलाय बघ्. नीट लक्षात ठेव. तो गॉगल काढून ठेव.)
बंडयाच्या मनात एकदम उघडाबंब कोळयाच्या मनातले विचार लखलखले आणि लगोलग त्याला बंडयाचे कळले असावेत. तसे एकदम कोळयाने दचकून मागे बंडयाकडे पाहिले. डोळयांना डोळे भिडले आणि तो क्षणभराचा मनोसंवाद तुटला. कोळयाच्या आक्रसलेल्या डोळयातून चाललेले रागाचे थैमान पाहून बंडया थिजून गेला. मगासचा नायक आता खलनायक वाटू लागला.
“बंडया तुझ्या शाळेची सहल आहे का?” बंटीने विचारले. बंद दाराच्या फ्लॅट संस्कृतीत देखिल भिंतींना कान हे असायचेच. बंडयाच्या कसल्या तरी वेगळयाच शाळेविषयी त्याच्या कानावर आधी काहीतरी गेले होते.
“नाही. आता आमच्या शाळेचा होडीवरला वर्ग आहे.” प्रश्नांची लगोलग उत्तरे देण्याचा रोग जडलेल्या पंडीने तत्परतेने उत्तर दिले.
“तुझी शाळा होडीवर आहे?” राजनने डोळयात व डोक्यात न मावणा-या कुतुहलाने विचारले.
“असं काही नाही. कधी होडीत असते, कधी बसमध्ये, कधी विमानात.” पंडीला त्यांच्या प्रश्नांचे नवल वाटून तिने गंमत केली.
“अरे पण तुम्ही इथे कसे?” बंडयाने त्या दोघांना प्रश्न विचारायची संधी मिळू नये म्हणून प्रतिप्रश्न केला.
“आम्ही मामाकडे आलो होतो. आमचा मामा इथेच राहतो.”
“मग त्याला माहित आहे का? तुम्ही माझ्याबरोबर आलात ते? तो शोधत असणार तुम्हाला.”
राजन बंटी काळजीत पडले. मग त्यांनी जेट्टीकडे पाहिले.
“ए तो बघ, तो कॅमेरावाला काका आमच्या मामाला आपल्याकडे बोट दाखवून काहीतरी सांगतोय.” राजन आनंदाने चित्कारला.
त्याने मामाला हात हलवून दाखविला. मामानेही हात हलवून दाखविला. जणू जा म्हणून परवानगी दिली. बंडयाचे तिथे बघून डोळे विस्फारले. त्याने अपेक्षेने गुंडी, पंडीकडे पाहिले. त्या दोघी देखिल चकित झालेल्या. लांबून देखिल त्या कॅमेरावाल्या काकाची देखणी छबी ओळखता येण्यासारखी होती. नलीचा पाठलाग करणारा दारूडा! तो आता त्याच्या लांब फोकसवाल्या कॅमे-याने त्यांच्याकडेच पाहायला लागला. तिघांनीही आपली नजर त्याच्यावरून फेरून घेतली.
तंटा कंटा आणि वांडाचा पडावाच्या बाजूने सरकत जाणा-या पाण्यात हात घालायचा प्रयत्न चालू होता आणि त्यांना रोखण्यात नंदू व्यस्त होता. पंडी गुंडी आपापसात तो दारूडा आज लाल चौकटीच्या शर्टात जरा जास्तच देखणा वाटतोय आदी विषयात गढून गेलेल्या. धुंडी राजन आणि बंटीला नेहमीच्या शाळेपेक्षा त्यांची अमुदि शाळा कशी वेगळी आहे समजावण्यात दंग होता. सगळयांवरून फिरून बंडयाची नजर सहज उघडाबंब कोळयाकडे गेली. तो बंडयाकडेच डूख धरून बसलेल्या सापासारखा बघत होता. होता होता पडाव त्याच्या लक्ष्याकडे मोठया लॉन्चीकडे पोहोचला. पुन्हा एकदा फळकुटाचा पूल सरकवला गेला. बंडयाला लगेच वर निसटून जायचे होते. त्याआधीच उघडाबंबने त्याला गाठला. त्याची कडक टोकदार बोटे बंडयाच्या पाठीत रूतली. एक एक करत बाकी सगळे लॉन्चवर गेले. नंदू मागे उरला. त्याने मुले मोजत एक कमी पडला म्हणून मागे वळून पाहिले. बंडयाचा भयग्रस्त आणि उघडाबंबचा खुनशी चेहरा त्याने अचूक टिपला. त्याचा बंडयावरचा राग निवळला असावा. पटकन हात पुढे करून त्याने बंडयाला “इकडे ये” म्हटले.
“बोललास तर याद राख.” फक्त बंडयाला ऐकू येईल अश्या शब्दात उघडाबंबने त्याला दरडावले. नंदूने बंडयाला आधी आपल्या पुढे फळकूटावर सरकवले व लॉन्चवर पोहोचू दिले.
मग सहज जवळ जावे तसा तो उघडाबंबकडे गेला आणि त्यालाच ऐकू येईल अशा आवाजात बोलला, “गॉगलचे काय होणार आहे मला माहीत आहे. त्यासाठी मुलावर ताकद काढायची जरूरी नव्हती.” उघडाबंबने नखे मुठीत घट्ट रूतेपर्यंत त्या आवळल्या. पण तांडेलनानांसमोर त्याला काहीच करता येण्यासारखे नव्हते. नंदूने ते ओळखून मंद स्मित केले आणि तो लॉन्चवर चढून आला.
पडाव लॉन्चला बांधण्यात आला. उघडाबंब तरणा कोळी वर चढून आला. लॉन्च भरसमुद्रात आत सुसाटत निघाली. भिरभिरं वारं सगळयांच्या कपडयातून खेळायला लागलं. आजुबाजुने इतर काही मोठया लॉन्चीदेखिल थोडयाश्या अंतरावरून जोडीने सुसाटत होत्या. मुलांचे स्वागत करायला तांडेलनाना जवळ आले. काळेकभिन्न लंगोट लुंगी कमरेला असलेले, बिनबाहयांची आखुड बंडी, गळयात दंडात गंडे बांधलेले, मोठया कल्लेदार पांढ-या मिशा असलेले. डोक्यावर कोळयांची पारंपारीक कानवाली टोपी घातलेले, कानात बाळी होती आणि त्यांचे जवळ जवळ सगळे दात सोन्याने भरलेले होते.
आपले लाखो रूपयांचे सोनेरी हास्य फाकवत त्यांनी सा-या मुलांशी परिचय करून घेतला. त्यांच्या पाठी थोपटल्या. काहींच्या केसांतून हात फिरवला. त्यांच्या लठ्ठ गालांवर व चेह-यावर म्हातारपणाच्या सुरकूत्या दूधावर साय दाटावी तशा दाटल्या होत्या. हसल्याने त्या चुण्यांमध्ये जास्तीची भर पडत होती. मग त्यांनी मुलांना इंजिनापाशी नेले. त्याची जुजबी माहिती दिली. वांडाचा सुकाणू ताब्यात घेण्याचा बेत हाणून पाडला. धुंडीने होडक्याच्या नांगराचे दोर फिरवायचा प्रयत्न करून हात ग्रीसने बरबटून घेतले. त्याला हात पुसायला सूती कापडाचा गुंडा दिला. पंडीला वेगवेगळया तबकडयांवरच्या खुणा-निशाण्या समजावून सांगितल्या. राजन आणि बंटी माशांची जाळी गुंडाळून ठेवली होती, त्यात अडखळले व गुंतले. त्यांना त्यातून बाहेर काढले. आणि अर्थातच गुंडीचा कारनामा नेहमीप्रमाणे जिवावर बेतलेला. ती जीवरक्षक टायरमध्ये घुसून कठडयाच्या बाजूला कवायती करून दाखवताना पडली. तिला पाण्यात चांगल्या चार पाच गटांगळया खायला लावून उघडाबंब मार्फत परत लॉन्चवर आणवली.
सा-यांचे लक्ष गुंडीच्या कारनाम्याकडे लागले असताना, विरूद्ध बाजूला कसला तरी आवाज झाला. बंडयाला खात्री नव्हती पण कोणीतरी चोरटी व्यक्ति तिथून सरसरत वर गेली होती. लॉन्चच्या टपावर खात्री करून घेण्यासाठी टपावर जाणा-या शिडीनुमा जिन्यावर दोन दांडया बंडया वर चढला.
“तांडेल,” अशी खर्जातली गर्जना एकदम वरून झाली.
तांडेलनाना लगबगीने शिडीपाशी आले. तोंडावर बोट धरून आवाज करू नको, अशी त्यांनी बंडयाला खूण केली. त्याला सावकाशीने खाली उतरवले. ते मग शिडीवर चढून वर गायब झाले. बंडया पंडी, गुंडीकडे परतला. पंडी गुंडीच्या कपडयांचा जो काही मोकळा भाग हातात येईल तो धरून पिळून काढायचा प्रयत्न करत होती. ओल्या कपडयात गुंडी थंडी वाजल्यासारखी हुडहुडत होती. इतक्या उकाडयात, इतक्या उन्हात तिला हुडहुडायचे काय काम? बंडया नवल करत होता. बाकी मुले गुंडीकडे दुर्लक्ष करून आपापसात रममाण झाली होती. तंटा कंटा आज चंटीच्या अनुपस्थितीत बरेचसे निवळलेले, सामंजस्याने वागत होते. राजन बंटीशी आपल्या शाळेची अपूर्वाई मिरवण्याची अमुदि मुलांमध्ये स्पर्धा लागलेली. आम्हाला शाळेची कायमची ईमारत नाही, कायमचे शिक्षक नाहीत, कायमच्या इयत्ता नाहीत, ना ठराविक विषय, ना गृहपाठ, ना परीक्षा, ना..., राजन बंटीला सारे खोटे वाटत होते. थापाडया बंडयाचे थापाडे मित्र. पण नंदू नागडेसारखा एवढा अक्कडबाज तरूण त्या सगळया गोष्टींना दुजोरा देत होता, तांडेलनानांसारखे बुजुर्ग ग्वाही देत होते तर..
तर ते खरे मानायला हवे होते. राजन आणि बंटीच्या तोंडून बालरोदन शाळेचे वर्णन ऐकून ती एखादी छळछावणी वा यातनातळ असावा असे अमुदि मुलांना वाटत होते. धुंडीच्या तर अंगावर काटाच उभा राहीला. जेव्हा अख्ख्या दिवसभरात सकाळ ते संध्याकाळ मध्ये फक्त एक तास जेवणाच्या सुट्टीचा मिळतो हे ऐकले तेव्हा.
“म्हणजे एरव्ही वर्गात तुम्हाला भूक लागली तर खाता येत नाही?” हा धुंडीचा प्रश्न ऐकून तर बालरोदनच्या मुख्याध्यापकांना जोशीसरांना घेरी आली असती. आता तांडेलनानांच्या वर्गातही खिशातून चणे फुटाणे काढून तोंडात घालत त्याचा यथेच्छ उदरभरणाचा कार्यक्रम चालू होता.
तांडेलनाना शिडी उतरून खाली आले. त्यांच्या चेह-यावर गोंधळल्याचे भाव होते. “इथे वाघ कोण आहे?” त्यांनी विचारले.
“मी.” वांडाने हात वर केला.
“आणि रानडुक्कर?” त्याच्याकडे आपादमस्तक निरीक्षण करीत त्यांनी पुढे विचारले.
“मी.” गुंडीने गर्जना केली.
“वाघ, रानडुक्कर आणि देवमाश्याला आचार्यानी वर बोलावले आहे.” तांडेलनानांनी सुस्कारत मोठयाश्या पेचातून सुटल्यासारखे आमंत्रण दिले.
“कासवाचे काय?” धुंडीने विचारले.
“आम्ही बैल आणि घोडा आहोत.” तंटा कंटाने आपल्या बाहयांवरली चित्रे दाखवत सांगितले.
तांडेलनानांच्या डोक्यात आता पुरा प्रकाश पडला होता. आचार्यांच्या अंतर्ज्ञानाला मनोमन त्यांनी सलाम ठोकला. “नाही फक्त हे चारच जण.”
“आम्ही का नाही?” तंटाने तंटा केला.
“जशी आचार्यांची ईच्छा असेल तशीच पुरी करावी लागते.” तंटा कंटाच्या पुढच्या निषेधाकडे दुर्लक्ष करीत त्यांनी ठरलेल्या चौघांना वर जायचा ईशारा केला.
वांडा मागोमाग गुंडी, पंडी, बंडया वर शिडी चढून गेले. टपावर लाकडी फळयांची जमिन होती. वर रणरणते ऊन होते. एका बाजूला सावलीची टपरी होती. त्यात एक वयस्कर थोराड गृहस्थ बसले होते. काळीभोर रेशमी कफनी, गळयात खडयांच्या रंगीबेरंगी माळा, हातात अंगठया, गोरेपान लालबुंद, चंदेरी पांढरीशुभ्र लांबलचक दाढी व केस असलेले. एखाद्या राजाच्या डोक्यावर असावी तशी त्यांनी रत्नजडीत गोल कडी धारण केली होती. ते राजेशाही व्यक्तिमत्व त्या गचाळ लॉन्चीवर फार विसंगत वाटत होते. जणू एखादा शापीत विजनवासातला राजा.
आचार्यांच्या हातात पत्त्यांप्रमाणे धरलेल्या अनेक गोल चकत्या होत्या. त्यांच्यावर अनेकविध चित्रे होती. काही ओळखीची वाटत होती. काहींवर रामाचे चित्र होते. काहींवर कृष्णाचे. त्या चंदनी लाकडाच्या असाव्यात.खा-या वासात वा-याची लहर फिरली की चंदनाचा घमघमाट नाकापर्यंत येत होता. मुलांना पाहून त्यांनी हलके स्वागतपर स्मित केले. बंडयाच्या कानात तीन अक्षरांचा साबरी परवलीचा वाजला. बंडयानेही आपला तोंडात पुटपुटला. समाधानाने त्यांनी मान हलवली. सभोवताली एक नजर फिरवली. आता या समुद्रावर त्यांचे बोलणे ऐकायला कोण असणार होते? दुसर्या लॉन्ची ऐकू जाण्याइतपत जवळ नव्हत्या. सर्व नौका वळून उत्तरेला मोतमावलीची टेकडी दिसत होती, तिला समांतर धावत होत्या. आचार्यांनी जवळ येण्याची खूण केली. भारली गेल्यासारखी मुले त्यांच्या दिशेने गेली.साबरी दिक्षितांच्या मायावी जगात आपले स्वागत असो. जादू आणि चमत्कार या जगातून संपलेले नाहीत. साहसवीरांच्या अदभुत कथा आजही घडताहेत. शोधा म्हणजे सापडेल. वाचा म्हणजे समजेल.
* अलख निरंजन. *

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंच हा भाग फार वेगळा वाटतोय
पण आपण परत लिहिते झालात तेच सुंदर
धन्यवाद