तरही - तुझ्यासाठीच जगलो आजवर, कळले मला

Submitted by बेफ़िकीर on 20 August, 2016 - 06:44

(तरही मिसरा प्रमोद खराडे ह्यांचा)

स्वतःची का न मी केली कदर, कळले मला
तुझ्यासाठीच जगलो आजवर, कळले मला

न दर्शन वा न बोलाचाल, नुसते हुंदके
शपथ! हे प्रेम आयुष्यात जर कळले मला

तुझ्या स्मरणांसवे उकरून भांडण पाहिले
करावे काय नक्की रात्रभर, कळले मला

बरसल्या पंचक्रोशीवर सुगंधाच्या सरी
तुला आलेत नाही ते बहर, कळले मला

अनवधानात गुणगुणलीस माझी गझल तू
नवे कित्येक अर्थांचे पदर कळले मला

सुचत नाहीत हल्ली शेर पूर्वीसारखे
तुला माझा पडत आहे विसर, कळले मला

पुढे आयुष्यभर निस्तेज डोळे राहिले
किती मी सोसली नजरानजर, कळले मला

पुरे झाली शिकवणी जीवना आता तुझी
मला नाही कळालो मी.... इतर कळले मला

जगाला वाटले, स्पर्धेत मागे राहिला
'कुणीही सर करत नसते शिखर', कळले मला

'घरी या एकदा' ऐकायचो जेथेतिथे
नसावे आपले कुठलेच घर, कळले मला

तुझे तू बघ म्हणाले जे जगत माझ्यामुळे
कसे हे 'बेफिकिर' झाले शहर कळले मला

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा .............
अनवधानात गुणगुणलीस माझी गझल तू
नवे कित्येक अर्थांचे पदर कळले मला

सुचत नाहीत हल्ली शेर पूर्वीसारखे
तुला माझा पडत आहे विसर, कळले मला...........आवडले

>>>अनवधानात गुणगुणलीस माझी गझल तू
नवे कित्येक अर्थांचे पदर कळले मला

सुचत नाहीत हल्ली शेर पूर्वीसारखे
तुला माझा पडत आहे विसर, कळले मला

पुढे आयुष्यभर निस्तेज डोळे राहिले
किती मी सोसली नजरानजर, कळले मला

पुरे झाली शिकवणी जीवना आता तुझी
मला नाही कळालो मी.... इतर कळले मला>>>एकसे बढकर एक शेर!

अनवधानात गुणगुणलीस माझी गझल तू
नवे कित्येक अर्थांचे पदर कळले मला

>> इथे पहिली ओळ लयीत म्हणताना कम्फर्टेबल वाटले नाही. 'गझल' शब्दाचं वजन विचित्र प्रकारे बदलावं लागतंय असं वाटलं.

सुचत नाहीत हल्ली शेर पूर्वीसारखे
तुला माझा पडत आहे विसर, कळले मला

पुरे झाली शिकवणी जीवना आता तुझी
मला नाही कळालो मी.... इतर कळले मला

>>
जबरदस्त ! खास करून 'शिकवणी' !!