सत्तर वर्ष झाली..
काय काय बोलायचं?
न बोललेलंच बरं..
देश आपलाच आहे...
किती लक्तरं आणखी
आपणच वेशीवर टांगायची.. ?
अजूनही या देशात
जात सांगावी लागते
जातीच्या नावाखाली
आरक्षण मागावे लागते
सांगावा लागतो धर्म
अल्पसंख्याक आहे..
हेही नमूद करावं लागतं
बाकी.. जातीधर्मावरचे दंगल दहशतवाद...
न बोललेलंच बरं..
देश ! आपलाच आहे.............. !
दिला जातोय नरबळी
अंधश्रद्धा अजूनही घेतेय
सुशिक्षितांचे बळी..
अजूनही लागतोय शाईचा अंगठा
आणि शिकणा-यासाठीही
आड येतोय कोटा..
बाकी.. अॅडमिशन्स.. डोनेशन्स..
न बोललेलंच बरं..
देश ! आपलाच आहे................!
'ती' ही अजून शोधतेच आहे
आपल्या अस्तित्वाची खूण
अशीही नव्हतीच तिला सत्ता कधी
आतातर गर्भातच मारलं जातंय -'तिचं' भ्रूण
अजूनही 'ती' नरकयातना भोगतेय
अजूनही जातोय तिचा हुंडाबळी
बाकी... अत्याचार.. बलात्कार...
न बोललेलंच बरं..
देश ! आपलाच आहे.............!
इथे दर दुस-या वर्षी पडतोय दुष्काळ
आणि एखाद्या खेपेला फाटतंय आभाळ
अजूनही लढता येत नाहीच निसर्गाशी
ह्या कृषीप्रधान देशात
उरलेत तरी किती असे ..
'शेतकरी' म्हणवून घेणारे
आणि जे उरलेत ते तर ...
बाकी... शेतकरी.. आत्महत्या..
न बोललेलंच बरं..
देश ! आपलाच आहे................!
आलिशान घरा-गाडीतून टाकला जातो
सरेआम कचरा भररस्तात
जाता येता थुंकतात लोक पचापच
"शौचालय बांधा" अशी करावी लागते जाहिरात इथे
बाकी.. प्रदुषण.. डेंग्यु मलेरिया..
न बोललेलंच बरं..
देश ! आपलाच आहे................!
बाकी काय ??? ....
भ्रष्टाचार आणि राजकारण.. ! ? ! ?
छे ! छे ! काहीच बोलायचं नाहीये...
देश ! आपलाच आहे...
तेरीभी चूप... मेरीभी.. !
- अनुराधा म्हापणकर