मंत्रावळी सुपारी
झिमझिम पाऊस सुरू झाला होता. आकाश बरेच गडद झाले होते. सगळीकडे दिवे उजळलेले होते. बंडयाने कल्पना केलेला तो रम्य जल्लोष आता हळूहळू तिथे साकार होत होता. ते खटखट वाजणारे तव्या, कढयांवरचे कालथ्यांचे आवाज आणि नाकापाशी आव्हान देणारे खमंग तळणाचे वास.
“बंडया रगडा पुरी खाऊ या?” गुंडीने विचारले. एवढा वेळ विद्याधरांच्या आईस्क्रिम केंद्रात घालवून प्रत्यक्षात त्यांच्या पोटात काही गेले नव्हते. बंडयाला भुकेची जाणीव झाली. दोघेजण वाट काढत पलिकडच्या पदपथावरील रामभरोसे भेलवालाच्या गाडीकडे निघाले.
“दोन रगडापुरी.” गुंडीने थाटात मागणी नोंदवली.
त्या गरमागरम पु-या अख्ख्या तोंडात कोंबायची कसरत करता करता बंडयाने विचारले, “मंत्रावळी कधी खायच्या? त्या फार चविष्ट असतात का?”
“फुस्स..” करून गुंडीच्या तोंडातली पुरी आणि रगडा बाहेर उडाला. तीला ठसका बसला. तो आणि हसू कसेबसे आवरून ती म्हणाली. “आधी हे तर खाऊन घे. मग मी तुला दाखवते ती कशी खायची.”
आता बंडया रगडा पुरीची चव विसरला. भरभर तोंडात कोंबून त्याने त्या संपविल्या. गुंडीचा खायचा वेग गाठणं तरीही त्याला अशक्य होतं. मग ती त्याला गर्दितून एका बाजूला घेऊन गेली.
“मला आई एकदा तिथे घेऊन आलेली तेव्हा मी जी मंत्रावळी चावली ना ती वायुतत्वांची होती. तुला तत्वे माहीत आहेत ना? जमिन, हवा, पाणी, आग आणि आकाश.” बंडयाने मान डोलावली. आज पहिल्यांदा तो गुंडीच्या तोंडून तीच्या घरच्यांचा उल्लेख ऐकत होता. त्याची आई देखिल त्याला तिथे घेऊन येत असे. आया सगळीकडून सारख्याच असतात तर. ते ऐकून त्याला बरे वाटले.
गुंडीने एक मंत्रावळी जपून काढली आणि त्याच्या हातात देत म्हणाली. “गिळू नकोस आणि मी सांगेपर्यंत अजिबात बोलू वा तोंड उघडू नकोस.”
बंडयाने तो छोटा तुकडा तोंडात टाकला आणि चघळू लागला. हळूहळू त्याचे तोंड एका अवर्णनीय सुवासाने भरून गेले. त्या सुवासाने त्याच्या डोक्यात कसलेतरी तरंग उठू लागले. अगदि हलके, हलके वाटू लागले, जणू तो तरंगतोय. एखाद्या मंत्राचा जप तोंडात चालू आहे असे त्याला वाटू लागले. गुंडीने त्याचा हात घट्ट धरला होता. बंड्या जमिनीवरून सुटला आणि तीने त्याला परत जमिनीवर टेकवला. ती उत्तेजित सुरात चित्कारली, “हे सुद्धा मरूत मंत्र आहेत. मी ना तेव्हा कितक्या लांबून वेतोबाच्या घुमटीवरली दिवटी विझवली होती माहिताय.”
बंडयाने हाताने काय, काय पृच्छा केली. मी काय करू आता या अर्थाने.
“तू पण काहीतरी विझव ना.” तीने आजूबाजूला पाहिले. समोरच गांधीजींच्या पुतळयावर मोठ्ठे, मोठ्ठे प्रकाशझोत सोडलेले. “ते गांधीजींवरचे दिवे विझव.”
“कसे?” बंडयाने पुन्हा हात फिरवले.
“मनात तसा विचार कर आणि फुंक मार त्यांच्यावर.”
बंडयाने तसे केले. एकदम आपल्या नाका, कानातून जोरदार वारे गेलेत असे त्याला वाटले. समोर काही घडले नाही. त्याने पुन्हा खुणेने समोरचे काय? विचारले.
“थोडा वेळ जाऊ दे रे. ती सुपारी लक्ष जप आपोआप पुरे करते. जसाजसा जप पुरा होत जाईल, आपले काम होत जाते.” गुंडीने त्याला धीर दिला.
तो आतुरतेने समोर पाहू लागला. थोडया वेळाने एक झोत बंद पडला. बंडयाला ही जादू आपण केली आहे यावर विश्वास ठेवता येत नव्हता. तो निव्वळ योगायोग असू शकणार होता. म्हणता अजून एक झोत विझला. जसजसा मंत्र पुढे जाऊ लागला, पुतळयापाशीचे रोषणाईचे दिवे हळूहळू मंद होऊ लागले. एक एक करत ते विझत गेले. फक्त तेच नव्हे हळूहळू आजूबाजूच्या दुकानांचे दिवे आणि रोषणाई देखिल मंदावू लागली. एकामागून एक दिवे विझत काळोखाचे साम्राज्य आजूबाजूला फैलावू लागले आणि त्याच्यामागोमाग गोंधळ. बंडयाला तोंडातला जप थांबवता येईना. थोडयाच वेळात परिसरात युद्धाच्या वेळी ब्लॅक आऊट असतो तसा मिट्ट अंधार पसरला.
“बंडया सुपारी गिळ पहिला.” गुंडी त्याच्या कानाशी फिस्कारली. बंडया सुपारी गिळतच होता आणि त्याच्यापासून थोडया अंतरावर कोणीतरी लायटरने विडी पेटवायचा प्रयत्न केला. काळोखात त्या लायटरच्या प्रकाशाने त्याच्या उजळलेल्या चेह-याने, नेमके दोघांचे लक्ष वेधून घेतले. पुढच्या क्षणी सारा आसमंत प्रकाशाने पुनः उजळला आणि सा-यांचे डोळे क्षण, दोन क्षण दिपलेले राहीले.
“जाडया.” बंडयाचा आवाज थरथरला. लाल शर्टातला अक्राळ विक्राळ राक्षस. त्याच्यापासून जेमतेम वीस हातावर उभा होता, विडी शिलगावत.
“जाडया.” गुंडीचा आवाज थरथरला. भीतीने नव्हे. रागाने. कधीचे तीचे हात त्याच्याशी दोन हात करायला
शिवशिवत होते. तीची कुपी तीला परत मिळवायची होती, “आता तू माझ्या तावडीतून सुटणार नाहीस. बंडया चल.” ती बंडयाचा हात धरून त्याला जाडयाच्या दिशेने खेचू लागली.
“तो आपल्या दोघांना मारून टाकेल.” बंडया तीला विरोध करत बोलला. त्याचा श्वास फुलला होता. गुंडीचा श्वास सुद्धा फुलला होता.
“तू बघच आता मी त्याला कसा सरळ करते.” तीची नजर त्याच्या गळयात चमचमणा-या कुपीकडे लागली होती. तीने एक मंत्रावळी तोंडात टाकली. तीच्या चेह-यावर क्रुद्ध भाव ताणले गेले होते. ती जास्तच थरथरू लागली. ती आता जमिनीवरून सुटेल याची जाणीव होताच बंडयाने तीचा हात गच्च धरून ठेवला. जाडया ओली झालेली विडी शिलगवायचा व्यर्थ प्रयत्न पुन्हा, पुन्हा लायटरने करत होता.
ही गुंडी त्याचा लायटर विझवून काय मोठ्ठासा तीर मारणार आहे? गुंडीने फुंकर घालायला आणि लायटर जाडयाने पेटवायला एकच गाठ पडली. भक्कन तिथे मोठा जाळ झाला. अख्खीच्या अख्खी विडी क्षणार्धात पेटून गेली होती. जाडयाला चांगला चटका बसला असेल. त्याहीपेक्षा अख्ख्या सिगरेटचा धूर एकदम आतमध्ये भरून त्याचा कोंडमारा झालेला दिसला. छातीतल्या धूराने घुसमटून त्याला तो ओकून ऑक ऑक करूनही बाहेर टाकता येईना. तो घुसमटू लागला. थरथर जागच्या जागी उलटसुलट नाचू लागला.
“बंडयाऽऽ कुपीऽऽ आणऽऽ.” गुंडी तारस्वरात किंचाळली.
बंडया बेभान झाला. जाडयाची वाटणारी सारी भीती त्याची ही गलितगात्र अवस्था पाहून नाहीशी झाली. तो मात्र एक माणूस होता तर. राक्षस वगैरे कोणी नाही. बंडया आवेशाने जाडयाकडे झेपावला. जाडयाच्या शर्टावर पकड घालत त्याने जाडयाच्या गळयाकडे झेप घातली आणि कुपीला हात घातला. इकडे गुंडी किंचाळली आणि मंत्रावळीचा जप बंद पडला. आत कोंडला गेलेला सारा धूर, भपकारा भर्रकन जाडयाच्या घशा, नाका, तोंडातून बाहेर पडू लागला. तो मोठ्ठे मोठ्ठे ठसके काढू लागला. त्या ठसक्याच्या जोराने बंडया दूर उडाला. बंडयाच्या हातात हिसकावलेली कुपी होती. तितक्या वाईट अवस्थेत देखिल जिवाच्या आकांताने जाडयाने बंडयावर झडप घातली आणि तो कुपी खेचून घेऊ पाहू लागला. आपला त्याच्यापुढे फार काळ निभाव लागणार नाही लक्षात येताच बंडयाने ती गुंडीकडे फेकली. ती गुंडीपर्यंत पोहोचली नाही. एक कोंबडया भरलेला छोटा रिक्क्षा टेम्पो त्यांच्यामधून पसार झाला. त्यात कुठेतरी ती...
जाडयाची नजर कुपीमागोमाग धावली. त्याचे लक्ष विचलीत झालेले पाहून बंडया हिसडा मारून पकडीतून सुटला. जाडयाने पळता पळता पुनः त्याचे बखोट धरले. तोच गुंडी त्याच्यासमोर पोहोचली. तीने घाईघाईने तिसरी मंत्रावळी तोंडात टाकली आणि जाडयावर फुंक घातली. मग जवळ येऊन ती बंडयाला जाडयापासुन दूर खेचू लागली. काही वेळ जाडया अजिबात दाद देत नव्हता. कशाने तरी त्याचा ताबा विचलीत झाला. तेवढा क्षण साधून गुंडीने बंडयाला जाडयापासून वेगळे केले आणि त्याचा हात धरून गर्दितून वाट फुटेल तिथे ती पळत सुटली.
झिमझिमणारा पाऊस आता सरसरू लागला होता. दोघांची अंगे पाण्याने पूर्ण भिजून गेली होती. जाडयाने त्यांचा पाठलाग करायचा प्रयत्न केला. दोघांनी ढिम्म मागे वळून पाहिले नव्हते. परत कोणाची तरी पाऊले त्यांच्यामागे पळत येताना वाजू लागली. दोघे धापा टाकत होते तरी पुन्हा पळू लागले. त्यांचे त्राण संपत आले होते. आजूबाजूचे भान सुटलेले. रस्त्याच्या मधोमध दोघे पळत होते.
अचानक शाळेची पिवळी बस त्यांच्या समोर आली. गुंडी तीचा परवलीचा ओरडली. बस पुढे जाऊन थांबली. गुंडी धडाडत तिकडे गेली. एक पाय दारात ठेवून बंडयाला चल चल खुणावू लागली. बस वाहकाने डोके बाहेर काढून पाहिले आणि दारावर थाप ठोकली. बस चालू झाली. बंडयाला मागच्या बाजूने कोणाचे हात लागले. त्याचा प्रयत्न चालला होता. बंडयाचे सारे अवसान सुटले. बेभानपणे त्याला आठवली ती सारी सारी मंत्राक्षरे बोंबलत तो बसच्या दारापाशी पोहोचला. कोणीतरी त्याला दोन हातांनी उचलून घेतले. पुढे त्याला काही सुचेना. तो कितीतरी वेळ वेडयासारखा रडत राहिला. कोणीतरी त्याचे गदगदणारे अंग आणि डोके मांडीवर घेऊन त्याला शांत करायचा प्रयत्न करत होते.
“ते काय?” बसमधल्या माणसाने कुठेतरी बोट दाखवले.
“बघू, तिकडे?”
“हां.” बसमधले लोक बस पुतळयापाशी येऊन वळली तेव्हा समोरचे विचित्र दृश्य खिडक्यांपाशी जमून पाहू लागले. एका माणसाच्या कपडयांमध्ये जणू हवा भरली होती आणि तो वरवर उचलला जात होता. हवेत तरंगत होता.
“आयला.” गुंडीने एकदम जिभ चावली. त्याबरोबर तो जाडा माणूस खाली पडला. बसमधले सगळे गुंडीकडे चमकून पाहू लागले. तीने क्षणात स्वतःला सावरले आणि आपण जणू त्या गावचेच नाही असे दाखवत ती बंडया ज्या आसनावर होता तिथे गेली.
“बंडया रडू नको. तो दारूडा आता इथे येणार नाही. आपण सुखरूप घरी पोहोचू.” मग तीने सांग्रसंगीत अमुदि वाचनालयातून बाहेर पडल्यावर एक दारूडा कसा आपल्या मागे लागला होता आणि त्याने आपला मुका घ्यायचाही कसा प्रयत्न चालवलेला वगैरे वगैरे कहाणी त्या थोर लोकांना सुनावली. या बसमध्ये लहान मुले नव्हती. सर्व मोठी माणसे होती. बंडया मुसमुसताना तीचे बोलणे कानात साठवत होता आणि आपल्याला काय भूमिका घ्यायचीय ठरवत होता.
“पण तुमचा पाठलाग करत होता तो दारूडा लाल कपडयात नाही निळया कपडयात होता आणि जाडा नाही खूप बारीक, उंचसा होता.” बसवाहक शांतपणे म्हणाले.
बंडया सर्द झाला. तो “तो” नव्हता तर तो “तो” होता. त्याचे रडे थांबले आणि तो मांडीवरून डोके उचलून सरळ होऊन त्या भगवी कफनीवाल्या दाढीदिक्षितांच्या शेजारी बसता झाला. त्यांचा स्पर्श किती प्रेमळ होता आणि ते त्याला थोपटत होते तेव्हा किती शांत शांत वाटत होते. रडे आवरले तरी, त्या शांत अनुभवासाठी बंडया त्यांच्या कुशीत पडून राहिला होता. बंडयाच्या ओल्या कपडयांनी त्यांचे कपडे देखिल ओले झाले होते आणि खालची गादी भिजत होती. दाढीदिक्षितांनी ते मनावर घेतले नाही. त्या पांढ-याशुभ्र दाढी, मिशा, केसांच्या सुतारफेणीतून त्यांचे हिरवे डोळे हसत होते. त्यांनी थोडा वेळ ते मिटून घेतले. उघडल्यावर ते पुन्हा प्रसन्नपणे हसले.
“हि मुले जिवावरच्या संकटातून वाचली आहेत. नाही का हो औदुंबरायण?” त्यांचा धीरगंभीर आवाज घुमला.
“होय कुलगुरू.” डोक्याला लाल पागोटे गुंडाळलेल्या गृहस्थांनी दुजोरा दिला.
गुंडी थिजली. साक्षात कुलगुरू संसारनाथ (विसाव्वे) यांच्यासमोर ती होती. अजून एक लोणकढी लाल, निळयाचे स्पष्टीकरण करण्यासाठी ती बोलू जात होती. तीची बोलती बंद झाली. बंडयाला मात्र हे सर्व लोक कोण आहेत याचा अंदाज नव्हता. ते कोणीतरी साबरी लोक होते. तो आता जाडयाच्या व दारूडयाच्या तावडीतून सुखरूप होता. बास्! याक्षणी एवढे त्याला पुरे होते. आनंदाची गोष्ट तो साबरी शाळेच्या बसमध्ये चढू शकला होता.
त्याने बसचे अंतरंग कुतूहलाने निरखले. आपोआप बसमधले सहप्रवासी त्याच्या नजरेस पडले. ती सर्व दहा बारा मोठी माणसे होती. त्यांनी पायघोळ कफन्या घातल्या होत्या. त्या भगव्या कफन्यांत तो कुणा साधूंचा जथ्था वाटत होता. त्यांच्या गळयात, हातात रूद्राक्षांच्या माळा होत्या. बहुतेकांच्या दाढी, मिश्या, जटा वाढलेल्या होत्या. तरूण होते त्यांच्या काळया होत्या. काहींच्या पांढ-या होत्या. ते सारे बंडयाकडे कुतूहलाने पाहत होते. गुंडीकडे नव्हे. तीच्याकडे कोणी लक्ष देत नव्हते, याबद्दल ती खूष होती. रस्त्यात नको ते पराक्रम करताना शाळेच्या शिक्षकांसमोर पकडले जायला कोणा विद्यार्थ्याला आवडेल?
भीती संपल्यावर बंडयाचे डोके विचार करू लागले. त्याचा परवलीचा? तो त्याला हवा होता. ज्याच्यामुळे बस त्याच्यासाठी थांबली तो अक्षरांचा क्रम. ती दांडगोबा गुंडी तो व्यवस्थित लक्षात ठेविल याची काही हमी देता येत नव्हती. स्वतःचा क्रम सुद्धा ती कितीतरी वेळा उलट सुलट करून ठेवत असे. भले तर बसमध्ये सगळे लोक त्याला हसले तरी चालतील. कोणत्याही किंमतीवर तो आता परत हरवता कामा नये. बसवाहकाने तो ऐकला असणार म्हणून तर त्याने बस थांबवली. बंडया त्याच्याकडे वळला, “मी तुम्हाला काय हाक मारू?”
“माझे नाव शांतभैरव.” तो धिप्पाड शरीराचा बसवाहक उत्तरला.
“शांतभैरव काका तुम्ही माझा परवलीचा ऐकला.”
“होय.”
“तुम्ही मला त्याचा... अं! म्हणजे माझा.. अं! म्हणजे तो काय होता सांगाल का जरा?” बंडयाने तो ज्या घाईगडबडीत उच्चारला होता, तो स्वतः विसरून गेला होता.
शांतभैरवाने ओठांचा चंबू केला. त्याला हा प्रश्न फार विचित्र वाटला होता. बंडयाला त्याची कल्पना होती. “म्हणजे मी ना... मी ना त्याचा क्रम विसरून गेलोय.” आपली चूक सगळयांसमोर कबूल करायला बंडयाला मेल्याहून मेल्यासारखी शरम वाटत होती.
“मुला तुला हा क्रम कशाला हवाय?” त्याच्या शेजारी बसलेल्या कुलगुरूंनी मध्येच त्याला प्रश्न केला.
“मी तो विसरलोय ना, म्हणून शाळेची बस मला आत घेत नाही. माझा परवलीचा कोणाला ऐकू येत नाही. “
“आम्हाला कळला. आम्ही सगळयांनी ऐकला. हो ना हो किमयादेवी?”
“होय कुलगूरू.” साखरेत घोळल्यासारखा मधाळ आवाज होता तो. “सगळीच्या सगळी बारा मंत्राक्षरे मी ऐकली. का हो बुटीमुनी?”
“होय तर. आमचे बुवा कानाचे पडदे फाटायचे बाकी राहीले.” बंडया थोडा खजिल झाला. तो बेंबीच्या देठापासून ओरडला होता.
“तुला शाळेच्या बसमध्ये घेत नाही. कोण घेत नाही?” कुलगुरूंनी त्याला विचारले.
“तो बसवाहक. पण माझ्या मित्रांना आणि आर्या पशुमित्रा, त्यांना सुद्धा माझा परवलीचा ऐकू येत नाही.” बंडया आपला हेका सोडायला तयार नव्हता.
“अच्छा पशुमित्र आहेस का तू?” त्यांची शोधक नजर बंडयाच्या कपडयावरून फिरली. त्यांच्या नजरेने त्याच्या डाव्या बाहीवरचा कारंजा उडवणारा देवमासा अचूक टिपला. हे एक आक्रितच होतं. बंडयाने गुरूपौर्णिमेच्या दिवशी तो निळा गणवेष इतर कपडयांमध्ये टाकला आणि आपोआप त्याच्या सगळया कपडयांवर देवमाश्याचा छाप उमटला होता. आईला वाटले होते, स्टीकर छापायचे हे बंडयाचे काही नवे खूळ आहे म्हणून.
“देवमासा.” दाढीवरून हात फिरवत हसत कुलगुरू म्हणाले.
“ती रानडुक्करीण आहे.” बंडयाने गुंडीकडे बोट दाखवत सांगितले. आपला नामोल्लेख झालेला पाहताच गुंडीने तोंड लपवले. या शिक्षक लोकांच्या कचाटयात तीला कसेच सापडायचे नव्हते.
“बरे तर मुला आता तुझी सगळी हकिकत मला सविस्तर सांग पाहू. तू कोणाचा, तुला दिक्षा कोणी दिली. साबरी जगात तू कसा आलास वगैरे सगळे. अगदि पहिल्यापासून.” कुलगुरूंनी त्याच्या पाठीवर थोपटत विचारले.
बंडया आपली सगळी हकीकत सांगू लागला. साबरी शाळेच्या बसविषयी त्याला वाटणारे कुतूहल. गुंडीची भेट. मग ती दुस्वप्ने. सरलकाका, रूद्राक्षमाळ, चांगदुष्टाची रिक्क्षा आणि मंजुघोष. आकाशमोती आणि बदल्यात मिळालेली अभिजीत जन्मनक्षत्राची माहिती, मग बारा कुंडे, बारा पिंपळाचा पार आणि बारा फे-या. त्या खुणांचे विस्मरण सरलकाकाने वाजवलेली एकतारी. कळलेले उच्चार पण विसरलेला अक्षरक्रम, मग अमुदित गुरूपौर्णिमेला पशुमित्रांची झालेली भेट, शाळेच्या बसवाहकाने नेहमी त्याला ढकलून दिल्याची कागाळी, पंडी आणि त्याने क्रमवारी शोधण्यासाठी केलेले प्रयत्न. वगैरे. पुत्रंजीव देवता, कुपी, जाडया, सर्वतोभद्र यक्ष, आज केलेली विद्याधरांकडची खरेदी आदी तपशील बंडयाने स्वतःच्या नकळत एका अंतःप्रेरणेने गाळले. कुपीचा उल्लेख गुंडी, सरलकाका, मंजुघोष सा-यांना फार अडचणीत आणेल याची खात्री होती. निवेदन संपले.
बंडया खूप उलट-सुलट, मागचे-पुढचे प्रसंग एकात एक मिसळून सांगत होता. तरी त्याला कोणी व्यत्यय आणला नाही. सा-यांचे चेहरे ऐकता, ऐकता गंभीर झाले होते. खरेतर सरलकाका व मंजुघोषाचा उल्लेख होताच त्यांच्या चेह-याच्या रेषा कठोर होऊन गेलेल्या बंडयाने बघितल्या होत्या. ते दोघे शाळेतून हद्दपार आहेत. बंडयाला आठवण झाली. पण उशीराने.
बसमध्ये आता अतिशय शांतता पसरली. सारे मोठे विचारात हरवून गेले होते. एकाएकी कुलगुरू हलले. शांतभैरवकडे वळून म्हणाले, “अरे शांत, सुशांतला म्हणावे कोकण नगरच्या नाक्यावर गाडी ने. मुलांना घराकडे पोचते केले पाहीजे. त्यांना फार उशिर झाला.”
“होय कुलगुरू,” म्हणत लगबगीने शांतभैरव गाडीचालकाच्या कक्षाकडे गेला.
आता लगेच आपले ठिकाण येईल बंडयाला अंदाज आला. “पण माझा परवलीचाचा अक्षरक्रम.” तो हेका सोडीना.
कुलगुरूंनी त्याला आश्वस्त करण्यासाठी पुन्हा कवेत घेतले, “मुला. त्यासाठी क्रम महत्त्वाचा नसतो. मनातला भाव महत्त्वाचा असतो. सुरवातीपासून आपला परवलीचा योग्य नाही अशी शंका तुझ्या मनात होती. त्यामुळे तो कामी येत नव्हता. आजमात्र पाठलाग चुकवण्यासाठी जिवाच्या आकांताने तू ओरडलास तेव्हा तुझ्या मनात शंका उदभवायला वेळ उरला नाही आणि मंत्राने काम केले. कोणताही मंत्र म्हणताना, कायम लक्षात ठेव त्याविषयी जर तुझ्या मनात किंचितही शंका असेल तर तो काम करणार नाही. मंत्राचे सामर्थ्य त्याच्या शब्दात आणि उच्चारांत नाही, ते उच्चारणा-या मनाच्या श्रद्धेत असते.”
बंडयाने समजले अशी मान डोलावली. तोपर्यंत गचका खाऊन बस थांबली. बंडया, गुंडीचे ठिकाण आले होते. गुंडी गुमान उठली आणि उतरण्यापूर्वी कुलगुरूंपासून सुरूवात करून झाडून सर्वांच्या पाया पडली. त्या सर्वांनी तीला वेगवेगळे आशिर्वाद दिले. तीचे बघून बंडयाही सर्वांच्या पाया पडला. त्याला मात्र दिर्घायू होण्याचा एकच आशिर्वाद प्रत्येक मुखातून मिळाला. बंडया, गुंडी बसमधून खाली उतरले. शांतभैरवाने दारावर थाप मारली. बस निघून गेली. पाऊस थांबला होता. दोघे एकटे उरले.
“बंडया. कुपी तर गेली रे.” गुंडी चुटपुटली
“जाडयाकडे तर आता नाही ना.” बंडयाने काळया ढगाला असलेली रूपेरी किनार तीला दाखविली, “अलख.”
“अलख.”
दोघे दोन दिशांना आपापल्या घराकडे निघाले. बंडया विचारात दंग होता. आजचा दिवस फार चांगला गेला होता. जाडयावर मात केली होती. मंत्रावळीच्या रूपात त्याने आयुष्यातली पहिली जादू केली होती. त्याला त्याचा परवलीचा मिळाला होता. उद्यापासून त्याला गुंडीबरोबर साबरी वर्गांना जाता येणार होते. जाडया आणि दारूडयाची त्याला काही भीती वाटत नव्हती. त्याच्या खिशात अजून अंकदाण्याची अख्खी पुडी होती.
बंडया - गुंडी १५
Submitted by Pritam19 on 15 August, 2016 - 18:04
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा