बंडया - गुंडी १४

Submitted by Pritam19 on 15 August, 2016 - 17:48

म्हाता-या मालकाने नम्रता धारण करत नाराज गि-हाईक परत का आले, हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. अचानक गुंडीचा परवलीचा कानात वाजला आणि बंडया आश्चर्यात पडला. तोच आश्चर्यात पडलेल्या म्हाता-या मालकाने देखिल उच्चारलेला तीन अक्षरी परवलीचा बंडयाच्या कानात खणखणला. आता तो म्हातारा अपेक्षेने बंडयाकडे पाहू लागला.
गुंडीने बंडयाला कोपराने ढोसले, “त्याच्या कानात त्याचा सांग.”
बंडयाच्या डोक्यात आधी प्रकाश पडला नाही. तसा पडल्यावर तो म्हाता-याच्या कानाजवळ गेला आणि त्याने म्हाता-याच्या कानात म्हाता-याने ऐकवलेला परवलीचा त्याला ऐकवला. म्हाता-याच्या कपाळावर शंकांचे जाळे उठले. गुंडीने त्याला समजावले कि बंडयाला सध्या तात्पुरती परवलीचाचा वापर करण्यास शाळेत मनाई केलीय. म्हाता-याच्या चेह-यावर समजले, समजले असे भाव उमटले.
“तू फारच खोडया करतोस तर शाळेमध्ये, आं!” त्याने खेळकरपणे बंडयाला म्हटले. बंडयाने त्याचा भाव समजून उगीचच लाजल्यासारखे करून दाखवले. म्हाता-याने तीनदा हाताच्या टाळया वाजविल्या आणि पुकारले. “चित्ररूप या दोघांना वरच्या कक्षांमध्ये घेऊन जा कसे.”
तोच मगासचा चढेल सरबराईदार, खोटा नम्रभाव धारण करून दोघांना सामोरा आला. मुले त्याच्या मागोमाग जिना चढून पोटमाळयावर, छोटे छोटे कक्ष गि-हाईकांना खाजगीपणा पुरवण्यासाठी केलेले, त्यातल्या एकात जाऊन बसली. लाकडांची अर्धवट झुलती दारे त्या छोटयाशा खोल्यांना होती. तर टेबल टेकून होते ती भिंत पूर्ण आरशाची होती. खुर्च्यांना मऊशार काळी मखमल होती. टेबलावर ताज्या गुलाबांचा गुच्छ सजवलेला होता. कक्ष वातानुकूलीत होता. गुलाबाच्या गुच्छदाणीतून प्रकाश कक्ष उजळवून टाकत असल्यामुळे वातावरण अद्भभुत भासत होते.
बंडया आरशातून गुंडीच्या चेह-यावर पसरलेल्या किरण सावल्यांचा खेळ पाहत असतानाच दारे गर्रकन फिरली आणि चित्ररूप परत आत आला. त्याने एवढया लवकर कपडे बदलले कसे? बंडयाला आश्चर्य वाटले. त्याने सर्वांगावर कमळाच्या माळा धारण केल्या होत्या. त्यांचा सुमधूर सुवास दरवळला. डोक्याला, गळयात, दंडात, हातात, कंबरेला, पायांत कमळे आणि कंबरेला तलम रेशमी धोतर. तो त्यात फार सुरेख दिसत होता. कमळांच्या त्या धुंद सुवासापुढे बंडया का गुंडीचा राग टिकण्यासारखा नव्हता. चित्ररूपाकडे प्रत्यक्ष पाहता यावे म्हणून बंडयाने आरशावरून विरूद्ध बाजूला लाकडी झुलत्या दाराकडे नजर वळविली आणि तो अवाक झाला. तिथे कोणी नव्हते. पुन्हा आरश्यात पाहिले. चित्ररूप तर तिथे होता. पण प्रत्यक्षात नव्हता. चित्ररूप फक्त आरशातच दिसत होता. गुंडीला यात नवलाईचे काहीच वाटले नाही.
“मोहोरा दाखवा कृपया. किती आहेत?” चित्ररूप नम्रतेने म्हणाला. त्याच्या चेह-यावर, गालांच्या खळयांत एक छद्मी हसू होते. बंडयाने गुंडीकडे पाहिले, तीने मानेने काढ काढ खुणावले. बंडयाने एकेक करून सगळया पाच मोहोरा टेबलाच्या मखमलीवरती मांडल्या. त्यांच्याकडे पाहून एक एक करत उचलून त्या चित्ररूपाने तपासल्या. हे सारे फक्त आरशातच घडत होते. प्रत्यक्षात टेबलावर असलेल्या मोहोरा त्यांच्या जागेवर होत्या. पुन्हा एकदा त्याचे छद्मी हास्य करीत चित्ररूपाने लाकडी झुलती दारे घडीसारखी बाजूला केली. तिथे आता मोठ्ठे मोठ्ठे खण दिसत होते. त्यांच्यात नानाविध काचेच्या रंगीबेरंगी नानाविध आकारातल्या बरण्या होत्या. त्यात अजब अजब पदार्थ होते.
“या सर्वात वरच्या बरण्यात हजार मुद्रांच्या गोष्टी आहेत, त्या खालच्या या सर्व बरण्यांत शंभर मुद्रांपर्यंत किंमती उतरतात. आपल्या या काही कामाच्या नाहीत. नाही का मुलांनो. माझ्या देवाघरच्या लाडक्या फुलांनो, पाहूया हं. दहा मुद्रांखाली काही आहेत का. हे सुर्यकान्त मण्यांच्या ज्योतीवर शिजवलेले अनंगरंग मधाचे पाळे, अं,.. पन्नास मुद्रा. नको. या चंद्रकान्त मण्यापासून पाझरलेल्या रसात बनवलेल्या चिरोटया? पंचवीस मुद्रा. नको. पाकात मुरवलेल्या या चाफ्याच्या शेंगा, मात्र पंधरा मुद्रा. नाही जमणार ना. सापडेल तरी पाच मुद्रांत काही तरी. अंकदाण्यांचे हे भांडार, दहा साठी दहा मुद्रा.”
“आम्हाला पाच मोहोरांत पाच द्या ना.” गुंडीने लगेच संधी साधली.
“पाच मुद्रात अर्ध्या. अशी तडजोड नाही चालत. मंत्रविधींमध्ये दोष येतो आम्हाला. डोकं नाही वापरत लोक कामाला. मी किती खजिल आहे म्हणून सांगू. आमच्याकडे तुमच्या मुद्रांयोग्य एकही वस्तू लायक नाही हे कबुल करताना माझा जीव तीळ तीळ तुटतो आहे. आमचे हे सारे भांडार किती कुचकामाचे आहे, हे आज माझ्या लक्षात आले. पाच मुद्रात देण्याजोगी एकही वस्तू नसावी. हाय हा दैवदुर्विलास.” असे मोठया नाटकीपणे म्हणून त्याने ती कवाडे परत बंद करून त्यांच्याजागी लाकडी दारे उघडली.
बंडया, गुंडी निराशेने उठणार तोच ती पुन्हा एकदा फिरली आणि म्हातारे मालक आत आले. त्यांचा जामानिमाही काही और होता. काही वेगळया प्रकारची सुंदर सप्तरंगी पाकळयांची फुले चित्ररूप विद्याधराप्रमाणे त्यांच्या अंगभर होती. त्यांनी नाराज सुरात चित्ररूपाला दटावले, की अतिथीगणांशी वागायची ही रीत सौभ्याग्याची नाही. जर का त्याने अतिथींचा उचित सन्मान केला नाही, तर लवकरच त्यांच्यासोबत भाग्यलक्ष्मी देखिल त्याच्याकडे दुर्मुख करून निधून जाईल. आपण मुलांशी फार सौजन्याने वागलोय अशी कैफियत चित्ररूपाने मांडायचा प्रयत्न केला. मुलांचीच साक्ष त्यासाठी काढायचा त्याने प्रयत्न केला. पण म्हाता-या विद्याधरांनी त्याला फटकारले. असले तोंडी दाखविले जाणारे दुतोंडी सौजन्य काय कामाचे? चित्ररूपाला त्यांनी मग तशाच खोटया नम्रभावाने तिथून हाकलून लावले. तेव्हा त्याला त्यांचे म्हणणे पटले असावे. चरफडत तो निघून गेला.
मुलांकडे वळून म्हाता-या सुरूप विद्याधरांनी त्यांची झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. एवढया थोर गृहस्थांनी स्वतःची चूक नसताना माफी मागितल्याबद्दल बंडयाला ओशाळवाणे वाटले. सुरूपांनी पुन्हा ते लाकडी खण उघडले आणि खालच्या बरण्यांतून मंत्रावळी सुपारीचे एक पाकीट काढून फोडले. त्यातल्या सुपा-या त्यांनी हातावर धरल्या. दिसायला तरी त्या आवळा सुपारीप्रमाणे होत्या.
“या बघा एका मुद्रेत एक, एक येतील किवा पाहिजे तर एकेका मुद्रेत अंकदाण्याची एक, एक पुडी बांधून देतो. बोला सगळया पाचात काय काय हवे आहे?”
चित्ररूप तर पाच मुद्रात काहीच नाही म्हणत होता. उलट आता पाच मुद्रांत निवड करायला वाव मिळत होता. “दोन अंकदाण्याच्या पुडया द्या. एक मला. एक बंडयाला आणि उरलेल्या तीनांच्या मंत्रावळी.” गुंडीने लगेच निर्णय दिला.
“देतो हां,” म्हणत सुरूपांनी तीन मंत्रावळी मोजून टेबलावर ठेवल्या आणि काय आश्चर्य, त्या प्रत्यक्षातल्या टेबलावर प्रगट झाल्या. त्या कशा आहेत पाहण्यासाठी बंडयाने घाईने त्यांच्याकडे हात नेला, तोच एकदम गुलाबाचा काटा त्याला टोचला. रक्ताचे थेंब सांडले. एक मोहोरेवर पडला.
तशी गुंडी एकदम ओरडली, “बंडया हात मागे घे.”
बंडयाने बिचकून हात मागे घेतला. गुंडी ओरडली म्हणून सुरूपांनी वळून पाहिले. त्यांनी शेंगदाण्याप्रमाणे दिसणा-या दोन अंकदाण्यांच्या पुडया कागदात बांधलेल्या होत्या. त्यांचे लक्ष टेबलावरील मोहरेवर पडलेल्या रक्ताकडे गेले.
“ती मुद्रा चालणार नाही. आता यातले काय कमी करू?” त्यांनी गुंडीला विचारले.
“एक अंकदाणा पुडी नका देऊ.” गुंडी खट्टू होत म्हणाली. त्याप्रमाणे पुडी टेबलावर ठेवून, चार अकलंकित मोहोरा उचलून, आभार मानून ते निघून गेले. बंडयाने पुढे पाहिले. तीन छोटया सुपा-या व एक पुडी काळया मखमलीवर होती. चार मोहोरा गायब होत्या, एक तिथेच होती.
“विद्याधर मानवी रक्ताला स्पर्श करत नाहीत.” गुंडीने त्याला स्पष्टीकरण दिले. त्या खास वस्तू व मोहर खिशात घालून दोघे निघाले. त्या कक्षाबाहेर खुल्या जगात परतल्यावर बंडयाला हायसे वाटले. खरे जग आणि आरशापलीकडले जग यातला फरक तो हळूहळू विसरू लागला होता. कदाचित तोही त्या आरशातला हिस्सा बनून गेला असता. प्रत्यक्षातून गायब झाला असता अशी भीती सारखी त्याला तिथे वाटत होती. जिना उतरून खाली आले. तो गल्ल्यावर मालक आणि गि-हाईकांत चित्ररूप व्यस्त दिसले. जणू ते कायम तिथेच होते. वर होते ते कोण होते? बंडया गुंडी त्या भुलभुलैय्यातून आईस्क्रिम केंद्रातून बाहेर रस्त्यावर आले. त्यांची फिरती वाचनालय गाडी आता त्या जागेवर दिसत नव्हती. त्यांचे सारे सहपाठी आपापल्या घरी गेले असणार.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users