विदध्याधरांचे दुकान
आपल्या घराच्या खिडकीपाशी बंद तावदानावर पडणारे पावसाचे थेंब व त्यांच्या ओघळत्या रेषांनी बनणारी नक्षी पाहत बंडया निवांत बसला होता. त्याच्या मनातही वेगवेगळे विचार असेच एकमेकांत गुंतून त्यांची छानशी जाळी तयार होत होती. ते विचार छान होते. बंडया खुषीने स्वतःशीच हसला. त्याला ती मजा आठवली. गेल्या मंगळवारी स्थळदर्शनाच्या कार्यक्रमात ते एका नाटकाची तालीम बघायला गेले होते. नाटक इतके विनोदी होते की पाहता पाहता धुंडीला इतके हसू आवरेनासे झाले आणि तो असा गदागदा हलू लागला! खुर्ची मोडली. गंमत म्हणजे खुर्ची मोडल्याबद्दल नाटकवाले रागावले नाहीतच, त्यांनी खुष होऊन धुंडीला जास्तीचे दोनदा बटाटेवडे खायला घातले. नाटक हमखास यशस्वी होणार याची त्यांना खात्री पटली म्हणे.
त्याआधीच्या स्थळदर्शनाची आठवण मात्र तितकीशी हवीशी नव्हती. ते सगळे बसडेपो बघायला गेले होते. बंडयाला एका रिकाम्या बसमध्ये कोणीतरी विदूषकासारखी व्यक्ती असल्याचा भास झाला की खरेच तो तिथे होता? बंडया खात्री करायला आत चढला. बाकी कोणाला कळले नाही. सगळे पुढे गेले. आत कोणी सापडले नाही. अचानक बंडयाला जाणीव झाली. तो तिथे एकटाच होता. भीतीने घाईघाईने बंडया बसमधून खाली बाहेर पडला. ओळखीचे कोणीच जवळपास दिसत नव्हते. तो पुढे गेला. तिथे नव्हते. मग डावीकडे गेला, मग उजवीकडे. प्रत्येक ठिकाणी त्याची निराशा होत होती. सभोवताली इतकी माणसे होती आणि तरिही बंडया एकटा होता. गर्दीत हरवलेला. लोकांचे धक्के खात. जाणा-या येणा-यांच्या शिव्या ऐकत. सुन्न!
आताही तो एकटाच होता. स्वतःच्या घरात. एकटा राहू नकोस बजावताना सरलकाकाने तो घरात एकटा सुरक्षित असेल असे गृहीत धरले होते का? तो तसा नव्हता. इथे घरात एकटाच असताना त्याला कायम भीती सतावत असे. बाथरूमच्या दारामागे बसून पारवे घुमत राहत हुं, हुं. त्या आवाजाने सतत कोणीतरी दबा धरून आपल्याकडे सरकते आहे, अशी त्याला जाणीव होत राहि. तो जाडया कधीही घराचे दार फोडून आत घुसू शकतो आणि त्याचा गळा चिरडू शकतो. विचार बंडयाला भेडसावत राहत. डेपोत तो सुन्न होऊन मरणाची वाट पाहत बसला. गळा आवळणा-या हातांची. दोन हात त्याच्यापाशी आले आणि त्यांनी त्याचे डोळे मिटले. हे छोटे नाजूक हात मरणाचे नव्हते. ते जाडयाचे असू शकणार नव्हते. ते, ते...
“पंडी.” तो एकदम ओरडला.
“छट्! चंटी.” ती खळखळून हसून म्हणाली होती. बंडयाला चांगलाच राग आला. ते सर्व त्याची मजा बघत त्याला खेळवत होते का?
“नाही. आम्हाला तू खरेच सापडत नव्हतास.” सगळे जमल्यावर वाघ्या वागडेंनी त्याला समजावले. उलटा दम भरला. सगळयांना सोडून काही कळवता न सवरता असे परस्पर बसमध्ये वगैरे चढल्याबद्दल. त्यादिवशी मुलांना फिरवून आणायची जबाबदारी त्यांची होती ना.
आजोबा वाघडे. नाही. त्याना आजोबा म्हटले तर राग यायचा. “वाघ्या काका म्हणा,” म्हणायचे. अंगावर इतकी सुरकुत्यांची जाळी पडलेली, सगळे केस पिकून डोक्याला सोडचिठ्ठी देऊन गेलेले. टक्कल लपवण्यासाठी गांधी टोपी घालणारे. मिशा, भिवया पांढ-या शुभ्र झालेल्या. चष्म्याच्या काडयासुद्धा म्हाता-या होऊन खाली वाकलेल्या. दातांचे ते बोळके, त्यात कवळी ठासली म्हणून काय झाले, डेपोतल्या कॅन्टीनमध्ये समोश्याची कड कडक लागली तेव्हा कशी काढून परत बसवावी लागली, आणि तरी म्हणे म्हातारा न ईतुका, मला काका म्हणा. पणजोबा म्हणायला हवे खरे तर. बंडया आतासुद्धा मनोमन तितकाच वैतागला, जितका त्यावेळी तिथे तो उपदेश खाताना वैतागलेला.
मग पंडीला का नाही असा उपदेश केला? गेल्या बुधवारी ते लोक वार्तालापाच्या कार्यक्रमात पर्यावरणतज्ञ डॉ. आयझॅकच्या व्याख्यानाला गेलेले. प्लास्टिक वापरू नका म्हणून त्यांनी काय झकास मुद्दे मांडलेले. तर ही आमची शहाणी पंडीता त्यांचीच उलटी झाडाझडती घ्यायला लागली. मग तुम्ही रोज तुमचा दातांचा ब्रश लाकडी वापरता का? तुमची साबणाची डबी दगडी आहे का? तुम्ही पाण्याची बाटली फिरायला नेताना ती काचेची नेता का? आणि काय काय? बिच्चारे. इतक्या लोकांसमोर लाजच काढली अगदि. त्यांच्या खिशाला लावलेले पेन काढून आपटले सरळ सगळयांसमोर. याची बनावट आणि रिफिल दोन्ही प्लास्टिकची आहे म्हणून. कोरडे उपदेश कसले जगाला करता? आधी स्वतः सांभाळून दाखवा तुमचे तंत्र आणि मग लोकांना त्यांच्या प्लास्टिकच्या वस्तूंची होळी करायला सांगा. कसले कावले डॉ. आयझॅक. तुझ्यासारख्या लहान मुलींना कळणार नाहीत या गोष्टी. हळूहळू जग बदलते, त्याची सुरूवात कुठूनतरी करायला हवी असे मी म्हणत होता, वगैरे वगैरे. तेव्हा हे आज्या वागडे सरळ सगळया मुलांना घेऊन बाहेर पडले आणि मारे पंडीला शाबासकी देतायत.
मुर्ख कुठची ! डॉ. आयझॅकच्या व्याख्यानानंतर लगेच एक मध्यांतर होते आणि त्यात सगळयांना वाटायच्या शीतपेयांचे खोके ती कार्यकर्ती मंडळी आत आणत होती, ती दिसली नाहीत का? चार शब्द नुसते ऐकून घेतले म्हणजे काय लगेच तीच्या घरातल्या सगळया प्लास्टिकच्या वस्तू पेट घेणार होत्या? बंडया गुंडी आणि धुंडीच्या जोडीला तंटा, कंटा देखिल जाम चरफडले होते. वांडा मात्र तीचे कौतुक करत होता. आगीची मुलगी म्हणून, जेव्हा केव्हा ती अशी सर्रकन पेटून उठे.
वांडा कार्यशाळेच्या वर्गात, ड्रिल मशीनने भोक कसे पाडतात बघायला गेला आणि त्या लाकडी फळकूटासोबत त्याच्या खालच्या तयार टेबलाला सुद्धा भोक पाडले. तेव्हा त्या फर्निचरच्या दुकानाचे मालक सन्तासिंग आणि बन्तासिंग कपाळाला हात लावून बसलेले दृश्य बंडयाच्या डोळयासमोर तरळले. नंदा उघडेकडे मुलांची जबाबदारी होती. तीने वांडाला आता पगडी बांधूया आणि त्याला तुमच्या जातीतला समजा वगैरे काही मखलाशी करायचा प्रयत्न केला होता. दोघे सिंग बंधू एवढे यावर संतापले की त्यांनी रागाने मुठी आवळल्या. त्याचबरोबर त्यांचे डोळे आवळलेले साधून सा-या फौजेने तिथून पळ काढला होता.
कंटाने कार्यशाळेच्याच अजून एका वर्गात गिरणीवाल्याच्या चक्कित इतके सारे गहू एकदम घातले की ती प्रमाणाबाहेर ताण येऊन बंद पडली. जोडीला विजेचा मुख्य फ्युज पण उडाला. कमी वेळेत जास्त काम उरकले की विजेची बचत होईल हे आपण चक्किवाल्या यादवला पटवून देत होतो, असे स्पष्टीकरण नंतर कंटाने दिले. अर्थात सगळे यादवच्या दोन हातांपासून खूप लांब सुरक्षित अंतरावर पोहोचल्यावर. नंदा उघडे या अमुदि गटावर निहायत खूष होती. अशी धावाधाव जर दर दोन दिवसावर घडायला लागली तर आपले जास्तीचे वजन दोन महिन्यात पार उतरेल अशी तीची खात्री होती.
तंटाने मात्र केशभूषाकार (न्हावी हा सोप्पा शब्द) रशिदच्या वार्तालाप व प्रात्यक्षिकांवेळी स्वतःवर प्रयोग करून आपल्या केसांचे वाटोळे करून घेतले. म्हणजे त्याने त्यावर बॉल आणि बॅटची चित्रे कोरून घेतली. चंटीने एका नर्सरीवाल्याचा फवारे उडवण्याचा हातपंप नादुरूस्त करून ठेवण्यापलीकडे मोठा पराक्रम केला नाही. असे मोठ्ठे भीमपराक्रम करायची मक्तेदारी गुंडीकडे होती.
मिठेलाल प्यारेमोहन हलवायाच्या दुकानात कार्यशाळेच्या वर्गात जिलेबीच्या कढत्या उकळत्या तेलात, साखरेच्या पाकाच्याच थेट जिलेब्या बनवाव्यात असे काहीतरी आपल्याला सुचले होते, असे निवेदन तीने नंतर कधीतरी दिले. आता उरल्या आहेत त्या फक्त त्या क्षणाच्या कढत आठवणी. अगदि कढत कढत. आता सुद्धा बंडयाचा हात त्या फोड आलेल्या जागांवरून हळूवार फिरला. ते मिटले होते आणि त्याचे व्रणही आता बुजले होते. त्यांच्या पायी अख्ख्या गटाचे अमुदि वर्ग चार दिवस बंद पडले होते. त्यामुळे वाचनालयाचा दिवस एकदा बुडाला तर दुस-यांदा वाचनालयाची फिरती गाडी वाटेत पंक्चर झाल्यामुळे येऊ शकली नव्हती. आज तो दिवस उगवला होता. निघायची तयारी केली पाहिजे. बंडया स्वतःशीच म्हणाला. घोर एकटेपणाने अशी बडबडायची सवय त्याला लागली होती. सरलकाकाने बंडयाला अमुदि वर्गात एकटे न सोडण्याची जबाबादारी गुंडीवर टाकलेली. डेपोवाला हरवण्याचा प्रसंग घडल्यावर पंडीवर सुद्धा. त्यानंतर मात्र बंडयाला हरवणे दुरापास्त झाले. पंडीची त्याच्यावर सतत बारीक नजर असे.
इथे घरात कंटाळा करत बसण्यापेक्षा इमारतीखालच्या सोप्यात गुंडीची वाट बघत बसणे बरे. खाली आल्यावर बंडयाला फार वेळ गुंडीची वाट पाहावी लागली नाही. ती उत्साहाने सळसळत आली अख्ख्या दिवसात आता जाऊन ऊन आले होते. पावसाचे कोंदट वातावरण आता लख्ख श्रावणी उन्हाने उजळून निघाले होते. दोघे हातात हात घालून मजेत गांधीजींच्या पुतळयाच्या चौकाच्या दिशेने निघालेले. सारा परिसर स्वच्छ धुतल्यासारखा प्रसन्न दिसत होता. निसर्गशोभा दाखवण्याची त्या शहरी भूभागाची ऐपत नव्हती. हिरवळीचा छोटासा तुकडा गांधीजींच्या पुतळयापाशी पाहायला मिळेल बंडयाची खात्री होती.
पुतळयापाशीचे ते फुलझाडांचे बेट सुरेख फुलारलेले होते. त्या बेटाच्या चारही बाजूंनी रस्ते व वाहतुकीचा गजबजाट होता. त्यापलीकडे फेरीवाल्यांनी अडवूनही शिल्लक उरणारे रूंद पदपाथ, त्यांना संलग्न अनेक ऊंची दुकाने. संध्याकाळच्या वेळी ती दिव्यांनी उजळून निघाली की तिथली शोभा विशेष बघण्यासारखी असे. फुलझाडांचे बेट व त्यामधल्या पुतळयावरही सुरेख प्रकाशझोत व दिवे उजळून निघत. ओल्या गच्च काळयाभोर रस्त्यांवर मोटार गाडया व इतर वाहनांचे रंगीबेरंगी दिवे प्रतिबिंबित होत. ते दृश्य बंडयाला फार आवडे.
लोकही रंगीबेरंगी कपडयांनी सजून फेरफटका मारण्यासाठी तिथे गजबजत. त्यांच्या अंगाला लावलेल्या प्रसाधनांचे, अत्तरांचे सुवास हवेत मिसळून एक प्रकारचा तरलपणा वातावरणात येत असे. त्यातच खाऊ पिऊच्या गाडयांवरून सुग्रास, खमंग वास भर घालत. हसण्या, खिदळण्याच्या आवाजांच्या जोडीला जोरजोराने तव्या, कढायांवर आपटण्यात येणा-या कालथ्यांचे आवाज, चुरचुर तव्यावर मारल्या जाणा-या पाण्याचे आवाज, बशा चमच्यांचे चुटचुटीत, किणकिणते आवाज, बांगडयांची सळसळ, उंच टाचांच्या चपलांची टपटप, ऊसासे, स्स्ऽऽ करत ठसके, रस्त्यावरच्या डबक्यातून उडणारे शिंतोडे, चिखलाने पावलांशी केलेल्या ओल्या गुदगुल्या. सारे वातावरण जल्लोषाने जिवंत होऊन उठत असे. फेरिवाल्यांच्या आरोळया, गि-हाईकांच्या चौकश्या मग घासाघीस, बोली पटल्यावरचे हाकारे आवाजांचा ईतका गलका होऊन जाई कि शेजारी उभ्या माणसाशी देखिल तार स्वरात ओरडून बोलावे लागे. प्रत्येकाच्या ओरडण्याने आवाजाची पातळी अजून, अजून उंचावर चढत जात असे. पूर्वी या अशा गर्दीला तो बुजून जात असे. आज मात्र त्याला ती खूप हवीशी वाटत होती. डेपोतल्या गर्दिसारखी ती आपल्या कामात मग्न, घाईघाईने दूर दूर पळणारी नव्हती. दिवसभर घडयाळाच्या काटयानुसार वावरणारी हलणारी यंत्रे, संध्याकाळी परत चालती बोलती माणसे बनणार होती. एका लहान मुलाला एका क्रूर राक्षसाने चिरडण्याचा प्रयत्न केला तर ती त्याच्यासाठी भांडणार, लढणार होती. राक्षसाला दूर पिटाळून लावणार होती.
तो रम्य उल्हास प्रत्यक्षात साकारायला अजून वेळ होता. त्याची तयारी चालू असलेली, फेरीवाले गाडीवाल्यांच्या लगबग हालचाली चाललेल्या बंडयाला दिसत होत्या. त्याला गाणे गुणगुणावेसे वाटले. त्यांच्यासमोरून जाणारा माणूस देखिल काहीतरी गुणगुणत होता. “कोणी वंदा, कोणी निदा..” असेच काही. त्याची चाल विचित्र वाटत होती.
गुंडी हलकेच बंडयाच्या कानात कुजबुजली, “त्याने घेतलीय.” बंडयाला तो माणूस अंगावरून गेला तेंव्हा कसला एवढा उग्र दर्प नाकाशी झोंबला होता त्याचा उलगडा झाला.
“दारू.” बंडयाने गुंडीला काय म्हणायचेय आपल्याला कळलेय दाखवण्यासाठी अजून खालच्या आवाजात उच्चारले. त्याबरोबर त्या दारूडयाने एकदम मागे वळून त्या दोघांकडे पाहिले.
“श्शू....” त्याने तोंडावर बोट दाबत त्यांना केले. बंडया आणि गुंडी जागच्या जागी थारावले. तसे तारवटलेली नजर दोघांवरून फेरून दारूडा पुन्हा आपल्या मार्गाला लागला..
“बंडयाऽऽ,” “गुंडीऽऽ,” त्यांच्या कानावर पंडीची हाक आली. एका मोठया मिनीबसपाशी ती पलीकडच्या पदपथावर उभी होती. नेहमीच्या घाईघाईने सिग्नलची पर्वा न करता गुंडी सरळ रस्त्यावरच्या वाहनांच्या वर्दळीत शिरली आणि रस्ता पार करून गेली. बंडयाला तसे करता आले नाही. मग मोठया गाडया, बसेसची त्याच्या समोरून रांग सुरू झाली. त्या बसेस कधी संपतायत याची बंडया वाट पाहत थांबला.
सुर्य त्याच्या मागच्या बाजूला क्षितीजाकडे कलत चालला होता. एक मोठ्ठी सावली त्याला झाकोळून उभी राहीली. समोरून एखादी चकचकित गडद रंगाची गाडी सरकली तर, तीच्यावर ती विक्राळ सावली जिथे पडे, त्यात मागच्या गोष्टी प्रतिबिंबित होत होत्या. अचानक त्या ओझरत्या दिसणा-या प्रतिबिंबावर बंडयाचे लक्ष गेले. त्याचे हृदय जिथल्या तिथे थांबले. लालभडक शर्ट आणि त्यावरल्या त्या क्रूर दाट भिवया अन् मिश्या, तो जाडजूड आकार एकाच व्यक्तीचा असू शकणार होता.
ती गाडी पुढे सरकून गेली. होता होता समोरच्या गाडयांची रांग संपली. सिग्नल पडला. समोर गुंडी आणि पंडी हातवारे करून त्याला लवकर ये खुणावू लागल्या. बंडयाला थोडा धीर आला. त्याने मागे वळून पाहिले. ती मोठ्ठाली सावली दोन खचाखच भरलेल्या पिशव्या घेतलेल्या शांताबाईंची होती. “ए चेंगट आता चल की पुढे, न्हाय तर हो बाजूला, मस्नी जाव दे.” बंडया खजील झाला. आपल्याला ध्यानी मनी जाडयाच दिसतोय नुसता.
तो पळत, पळत त्या दोघींपाशी गेला. त्याने हसून पंडीला अभिवादन केले. तीचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. तो आला तिथे पलिकडे काहीतरी नजरेने टिपायचा प्रयत्न ती करत होती, “बंडया तो माणूस त्या दिवशी तू डेपोत हरवला होतास ना, तेव्हा तू उतरलास त्या बसमधून नंतर उतरून गेलेला.”
बंडया चमकला. बसमध्ये कोणी नाही याची त्याने पुरेपूर खात्री केलेली, पण कोणीतरी होतं म्हणून तो बघायला आत शिरलेला ना. अर्थात ही गोष्ट त्याने सगळयांना सांगितली नव्हती. कोणी नव्हते तर तसे सांगून मुद्दाम स्वतःचा फज्जा करून घ्यायला तो काय आपला हे होता? हे म्हणजे नितिन. त्याला बुवा आपल्या फजित्या खाश्या मिटक्या मारत सांगायची खोड होती. तरी पंडीने मुद्दाम तो माणूस लक्षात ठेवायची काही गरज नव्हती.
“तो गुरूपौर्णिमेच्या दिवशी शिवाजी मैदानात पण होता.” पंडीने पुढचे सांगितले, “आपल्या बहुतेक अमुदि वर्गांच्या तिथे मी त्याला पाहिलेय. अजुन पुढे बघ, तोच का तुझ्या मागावरचा जाडया, पण तो तर किती बारीक आहे.” तीच्या आवाजात तीच्या डोक्यातला गोंधळ लपत नव्हता.
बंडयाचाही मोठ्ठा गोंधळ उडाला होता. त्याला भास वाटतात ते भास नसतात तर. म्हणजे त्याने आता जाडया मागे पाहिला होता. तोही खरा तर. पण मग पंडी त्याला बारीक का म्हणतेय?
“कुठचा ग, मला दाखव?” गुंडीने फर्माविले.
“तो... तिथे होता गं आता, तो नाही का त्याने मागे वळून बघितले आणि तुम्ही थांबला होतात. कसा झिंगत, झिंगत जात होता.”
“तो दारूडा. निळा शर्ट आणि निळी जीन घातलेला? त्याच्या हातात पांढरे, लाल वेलक्रो पट्टेवालं घडयाळ होतं आणि त्याचा एक मोजा पांढरा नि एक काळा होता. त्याच्या गळयातल्या चेनमध्ये बदामी आकाराचं सोन्याचं पदक होतं न त्यात त्याच्या प्रेमिकेचं नाव मारीया लिहीलं होतं. तो?” गुंडीची सरबत्ती ऐकून बंडया गार झाला. जे दहा सेकंद त्याने वळून या दोघांकडे पाहिलं तेवढयात गुंडीने एवढं सारं टिपलं आणि लक्षात ठेवलं? बंडयाला तर नेमका त्याने कुठल्या रंगाचा शर्ट घातला होता ते सुद्धा आठवत नव्हतं.
“त्याच्या प्रेमिकेचं नाव मारीया आहे होय?” पंडीने जरा नाराज सुरात विचारले.
“तो का त्याच्या आईचं नाव गळयात घालणार आहे? काय जाम चिकणा होता ना गं तो!”
आपण चुकिच्या साथीदारांबरोबर चुकिच्या वेळी उभे आहोत, हे बंडयाच्या पटकन लक्षात आलं. मिनीबसच्या दारातून एक मोठ्ठं गोल गरगरीत डोकं बाहेर आलेले बंडयाला दिसलं, तसा तो तिकडे धुंडीकडे पळाला. आता इथे अजून कोणीतरी मोठया व्यक्तिने येऊन झापेपर्यंत, तो माणूस कोणत्या टि.व्ही मालिकेमधल्या वा सिनेमामधल्या नायकासारखा दिसतो आणि ती मारीया त्याची कितवी प्रेमिका असेल, यावर देमार किस पडत राहणार. हे गेल्या पंधरावडयातल्या अनुभवावरून त्याला माहित झालं होतं. जरी तो माणूस सारखा बंडयाचा पाठलाग का करतोय यावर विचार करणे जरूरी होतं, तरी याक्षणी त्या दोघी तो गुंडीच्या कि पंडीच्या मागे लागलाय यावर विचार करणं पसंत करतील याची बंडयाला खात्री होती. बसमध्ये चढता, चढता त्याने दोघींकडे एक ओझरता कटाक्ष टाकला तेव्हा चंटी त्यांना सामील झालीय आणि तीने ज्या त-हेने छातीवर हात दडपलाय त्यावरून ती “बाई!” चित्कारत असणार त्याच्या लक्षात आले. त्या तिघींची नजर समोरच्या गर्दित त्या चिकण्याला शोधत होती. तो खरोखर चिकणा होता का? बंडयाला तरी याबाबत शंकाच होती.
त्या पांढ-या शुभ्र रंगात रंगवलेल्या बसवर “अमुदि शिक्षण उपक्रम - फिरते वाचनालय” असे सोनेरी मोठया अक्षरात दोन्ही बाजूला लिहीले होते. बसला खिडक्या नव्हत्या. तिथे त्यांच्याजागी खच्चून भरलेले पुस्तकांचे खण होते. छताला काचेच्या खिडक्या होत्या. त्यातून सुर्यप्रकाश आत उतरत होता. मध्यम उंचीच्या, स्थूल बांध्याच्या आणि उभट चेह-याच्या, मोठे नाक असणा-या एक बाई पुस्तकांच्या भल्या मोठया ढिगाबरोबर पसा-यात बसलेल्या होत्या. दोरी बांधून गळयात लटकवलेला चष्मा बंडयाला पाहण्यासाठी त्यांनी उचलून नाकावर ठेवला व त्या त्याच्याकडे कुतुहलाने पाहू लागल्या.
“मी बंडया बंडे.” नेमके काय बोलावे न कळून बंडया म्हणाला. इतर बहुतेक अमुदि शिक्षकांप्रमाणे त्यांनी त्याच्याकडे बघून परवलीचा उच्चारला नाही. याबद्दल बंडयाला हायसे वाटले. तसे कोणी केले कि जखमेवर मीठ चोळल्यासारखे त्याला वाटे.
“मी शैलजा परांजपे.” त्या म्हणाल्या. पुन्हा त्याच्याकडे कुतुहलाने पाहू लागल्या. बंडयाला परत जास्त अवघडल्यासारखे झाले. त्याने मदतीसाठी आपल्या साथीदारांकडे पाहीले. धुंडी, वांडा, तंटा, कंटा चौघेही पुस्तकांत हरवून गेल्यासारखे बसले होते.
बंडयाने त्या चौघांवरून बोट फिरवत म्हटले, “मी यांच्याबरोबर शिकतो.”
ते चौघे होकार देतील या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे पाहीले. चौघांनी त्याच्याकडे ढिम्म लक्ष दिले नाही. त्या बंडयाकडे तशाच पाहत होत्या. बंडया चुळबुळत तसाच जागच्या जागी उभा राहिला. यापूर्वी कधी तो कोणत्या वाचनालयात गेला नव्हता. तिथे काय करायचे असते त्याला नेमकी कल्पना नव्हती. अर्थात बाकीचे चौघे पुस्तक वाचत होते तसे एखादे वाचायचे उघड होते.
“मी पुस्तक वाचू.” त्याने चाचरत विचारले.
“तू रंगवलय का बांधले नाहीयस्?” बाईंनी विचारले.
बंडया - गुंडी १२
Submitted by Pritam19 on 14 August, 2016 - 08:00
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूपच सुंदर लिहिलंय। आणि हो
खूपच सुंदर लिहिलंय।
आणि हो पुढील भाग लवकर टाका, राहवत नाहीये आता।
धन्यवाद अशी कथा इथे दिल्याबद्दल।