बंडया - गुंडी १०

Submitted by Pritam19 on 13 August, 2016 - 18:26

“जय हो गुरूमाऊली.”
“बरे बरे कल्याण असो.” पशुमित्रा तीच्या नमस्काराने छानश्या लाजल्या आणि संकोचल्या. बंडयाची आजी अशी कधी पाया पडल्यावर लाजत नसे. उलट चांगली आग्रहाने त्याला पाया पडायला लावे. “मेल्या फुकटचा आशिर्वाद पाहिजेय होय.”
“आता ही मिठाई सगळयांना दे बघू.”
“हे हो काय आर्या. मी ती खास तुमच्यासाठी आणलीय. तुम्हाला आवडते ना, म्हणून मुद्दाम आज सगळया दुकानांतून शोधून आणलीय. कुठे मिळतच नव्हती.”
“हो ना. मला मुलांना दयायची होती. तर एक बाई घेऊन गेल्या.”
“एक बाई? अय्या... वीणाच तर नव्हे?” आणि चटकन् बिनाने जीभ चावली. आता बाण सुटला होता.
“वीणा? तुझी बहीण. तरी मला वाटलेच होते मी हिला कुठे ओळखते म्हणून.”
आता बिना ताई उभ्या उभ्याच एक पाय हलवत अस्वस्थपणे डोळे आकाशाला लावून बसली. मग तीने मनाचा काही निर्धार केला आणि टि शर्टमध्ये छातीच्या जागी आत हात घालून बटवा बाहेर काढला. तीने गुंडी घालते तसाच टि शर्ट, जीन्सची पॅन्ट असा पुरूषी अवतार धारण केला होता. बॉयकट राखला होता. मोठ्ठी झाली की गुंडी अशीच दिसेल आणि वागेल सुद्धा. बंडयाने विचार केला.
“आर्या कोणाला सांगू नका हाँ.” बटव्यातली शंभरची नोट त्यांच्या हातात ठेवत, ती एकदम रडत त्यांच्या गळयात कोसळली.
पशुमित्रांनी खुणेनेच पंडीला खोका घ्यायला आणि सगळयांना वाटायला सांगितला. त्या बिनाला घेऊन जरा बाजूला गेल्या आणि तीचे सांत्वन करू लागल्या. प्रत्येकाने कतलीचा एक एक तुकडा उचलला. गुंडीने निगरगट्टपणे दोन तुकडे उचलले. तेव्हा धुंडीची चुळबुळ चालू झाली. पंडीने अजून एक तुकडा त्याच्या हातावर ठेवला.
“त्यांना दोन काय?” म्हणून तंटाने तंटा केला.
“माझ्या वाटणीचा त्याला दिला.” पंडी म्हणाली.
“मी अरमानच्या वाटयाचा घेतलाय.” गुंडीने ठणकावले. “अहसानचा पण दे गं.”
झक मारली आणि तंटा केला असे त्याला झाले. पण गुंडीने तिसरा तुकडा घेतल्यावर धुंडीची परत चुळबुळ वाढली. पंडीने त्याला डिंक लाडूही दिला.
“त्यालाच का दिला? आम्ही सगळे आहोत, सगळयांना वाट.” कंटाने कटकट केली.
“माझा लाडू मला वाटेल त्याला देईन.”
“अरे तो तीचा यार आहे.” चंटी कुजकटपणे खिदळली.
“ए काय म्हणालीस?” गुंडीने चढाई केली.
“हा तीचा दुसरा यार आहे.” तंटा खिदळला.
“हा, हा यारीण नव्हे यार.” कंटाही खिदळला.
गुंडीने चंटीचे नरडे धरताच ती केकाटली, “वांडा वाचव.”
तसा स्त्रीदाक्षिण्याला तो पुढे सरसावला. मामला हातघाईवर चढताच बंडयाचेही बाहू फुरफुरू लागले. धुंडी आधीच त्यात सामीलही झाला होता. पण मामला फार काळ रंगात येऊ शकला नाही. बिना उघडे सारख्या उघडया समशेरीने एकमेकांपासून तोडायचे ठरवले तर कासव, रानडुक्कर, वाघ, बैल, घोडे आणि मोर फार काळ एकमेकांच्या तंगडयात तंगडे घालून झटापट करु शकत नाहीत. गुंडीच्या कमरेच्या पट्टयाचे बक्कल डुक्कराकृती होते हे बंडयाने ओळखले होते. ती एक रानडुक्कर होती. पशुमित्रांनी प्रत्येक मुलाला एक एक पशुचे प्रतिक जुळवले होते. याच्यामागे काहीतरी अर्थ असणार नक्की!
“लाजा वाटायला हव्यात तुम्हाला. आज गुरूपौर्णिमेला तुमच्यापैकी एकाने तरी आपल्या गुरूची पुजा राहोच, साधा नमस्कार तरी केलात का? आणि वर उलटे हे धांगडधिंगाणे करून तमाशे माजविता. आयला तुझी...” इथे बिना उघडेने धुंडीच्या पोटाला गुपचुप चिमटे काढायला सरकणा-या तंटाच्या हातावर एक जोरदार फटका हाणला. बंडयाला त्यात नवल वाटले नाही. बिना उघडेच्या उघडया हातावर सिंहाचे गोंदण उठून दिसत होते. सिंहापुढे एका बैलाचा काय पाड! सगळे गुपचुप गार झाले.
बिना उघडेची कानउघाडणी वाया गेली नाही. पंडीने खोका तीच्या हातात परत दिला आणि ती आर्या पशुमित्रांकडे धावली. पोलक्याच्या खिशातून तीने एक सोनचाफ्याचे फूल काढले आणि त्यांना दिले. ते खुषीने त्यांनी केसात अनंताच्या जोडीला माळले. तोपर्यंत पंडी त्यांच्या पायावर वाकली होती.
“सुखी हो बाळ.” पंडीला तोंड भरून आशिर्वाद मिळताच बाकी मुले पुढे सरसावली.
चंटीने एक कस्तुरीची कुपी त्यांच्या हातावर ठेवली आणि पाया पडली. “किर्तीवंत हो.”
तंटाने चंदनाची अगरबत्ती भेट दिली. “गुणवंत हो. “
कंटाने धूप, कापूर अर्पण केला. “धनवंत हो.”
वांडाने केशराची डबी दिली. “कुलवंत हो.”
गुंडीने ओतुमदाची बाटली दिली. “यशवंती हो.”
धुंडीला काय दयावे तेच कळेना. बापडयाने आपल्या खिशातली शेंगदाण्याची पुडी काढून तीच हातावर ठेवली. त्याबरोबर सगळे हसायला लागले. “चिक्कू”“कंजुस” म्हणून तंटा कंटा गुपचुप तोंडात पुटपुटले.
पशुमित्रांनी खुषीने ते दाणे तोंडात टाकले. “बुद्धिमंत हो.”
आता बंडयाची पाळी होती. पुजेसाठी त्याने करंडा आणला होता. तोच त्याने आर्यांच्या हातावर नेऊन ठेवला. “हा माझ्या आजीचा आहे. ती आता नाही. माझी आई तर कुंकू, टिकली काही वापरत नाही. तुम्ही हा वापराल?”
पशुमित्रांनी त्यातल्याच कुंकवाचा टिळा बंडयाच्या कपाळी उभा लावला. “औक्षवंत हो.”

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला प्रयोग आहे...पण मुलांची नाव काय पटली नाय बाबा. उदा. गुंडी, पंडी, धुंडी...वैगरे वैगरे...उगाच काहीही.......
हॅरी पाॅटर हून प्रेरित आहे म्हणता पण तशी गंभीरता नाही ह्यात...असो...
मागचे ७-८-९ भाग अतिरोचक झाले असते जर ते जास्त विस्तृतपणे लिहले असते. लेखन प्रभावशाली आहे. पण घटनांचा वेग खुपच जास्त आहे. वेळ घ्या आणि जास्त विस्तृत लिहा...म्हणजे...उत्कंठा कायम राहिल...