बंडया - गुंडी ९

Submitted by Pritam19 on 13 August, 2016 - 18:09

आर्या पशुमित्रा
गुरुपौर्णिमा दोन दिवसांवर आली होती. आपणच निर्माण केलेल्या रम्य कल्पनांप्रमाणे अमुदि शाळा असेल काय? बंडयाने स्वतःच स्वतःला कोडयात टाकले. गुरूपौर्णिमेच्या गुरूवारी सकाळी तो स्नानादी कर्मे करून शुचिर्भुत होऊन निघाला. या दिवशी गुरूंची पुजा करतात हे त्याने वाचले होते. त्याच्या दप्तरात खाऊचा डबा, पाण्याची बाटली, वहि, पेना शिवाय त्याने आजीच्या भांडयांमधला एक कुंकवाचा करंडा सोबत घेतला होता. बाकी उदबत्त्या, फुले, धूपारती त्याच्या घरात उपलब्ध नव्हते. गुंडीला नुस्तीच पिशवी, दप्तराशिवाय पाहून त्याला नवल वाटले.
“डब्बा, बाटली ती कश्शाला? आणलीच आहेस तर राहू दे. आपण येताना खाऊ पिऊ.” गुंडीने परस्पर बंडयाच्या डब्यात वाटाही अडवून टाकला.
तीने सायकल आणली होती. बंडयानेही इमारतीच्या पार्किंग मधली आपली सायकल मोकळी केली. दाजी किराणावाल्याने दुकानात लक्ष्मीच्या तसबिरीला हार चढवताना या दुक्कलीकडे एक हलका कटाक्ष फेकला. सदू न्हाव्याने गणपतीपुढे दिवा लावताना काडी ओढून मग ती विझवताना दुक्कलीकडे पाहून एक चटका खाल्ला. पानपट्टीवाला राघव साईबाबांसमोर उदबत्त्या ओवाळत होता. तो उदबत्ती फिरवायचे सोडून नाकासमोर धरून राहून गुदमरला. सगुणा भाजीवालीने भोनी सुरू करण्याआधी खंडोबाची आण घेऊन स्वतःच्या गालात हलक्या चापटया मारून घेताना चुकून चार जास्त खाल्ल्या.
बंडयाने आजपर्यंत मोठया हमरस्त्यावर सायकल घातली नव्हती. आज गुंडीच्या जोडीने ती हिंमतही केली. जेव्हा गुंडीने बाबांच्या कार्यालयाच्या दिशेने सायकल घातली तेव्हा तो जरा घाबरला. पण तो रस्ता मध्येच उजव्या गल्लित वळून त्यांनी सोडला तेव्हा त्याला हायसे वाटले. ते तर शिवाजी मैदानात दाखल झालेले. सकाळच्या वेळेचा सैरसपाटा मारण्यात लोक मश्गुल होते. काही जाडे लोक जाडे बूट घालून धावत होते. त्यांची पोटे थुलथुल वरखाली उडत होती. एका ठिकाणी काही लोक उगाचच खदाखदा, हिहि हि करून हसत होते. ते कोणाला हसत होते ते बंडयाला कळू शकले नाही. एवढयात एक प्रचंड मोठा कुत्रा त्याच्या मागून जोराजोराने हाफत, आवाज काढणार्या बरोबरच्या माणसाला रेटून पुढे ओढून घेऊन गेला. त्या माणसाने कुत्र्याला फिरवण्यापेक्षा तो कुत्रा त्या माणसाला फिरवीत होता म्हणणे योग्य होईल. तो माणूस मध्येच कोणा एका बाईकडे बघत उभा राहि. मग कुत्रा गुरगुरे व दोराला हिसडा मारून त्या माणसाला पुढे नेई. जर कधी तो माणूस आपल्या ओळखीच्या माणसाशी हसून अभिवादन करायला उभा राहीला वा जर कधी तो माणूस एखादया गाडीवरचे नाव, झाडावरचे स्टीकर बघायला गेलाच तर कुत्रा त्याला फरफटवत नेई. तो राजसी कुत्रा स्वतः मात्र कोणत्याच इतर कुत्र्यांकडे, झाडे हुंगण्याकडे लक्ष देत नव्हता.
तिथे मैदानाच्या कडेच्या कट्टयावर, टप्प्या टप्प्यावर माणसे, मुले कोंडाळे करून बसली होती. बंडयाच्या नाकाला सकाळच्या दवात भिजलेला गवताचा ओला वास गुदगुल्या करत होता. ताजी हवेची झुळूक अंगावरून खेळून जात होती. एखादया वर्गात, खोलीच्या तुरूंगात जाऊन बसण्याऐवजी आता इथे त्या गवतात, मातीत लोळायला, खेळायला मिळाले तर काय मज्जा येईल? त्याचे विचार चालू होते, तोच त्याच्या पाठीवर एक हलकी थाप पडली. त्याने दचकून वळून पाहीले.
“ए बंडया, बंडया ना?” ती लालबुंद पिट्ट गोरी मुलगी हस-या चेह-याने त्याच्याकडे पाहत म्हणाली. तीच्या अंगावर आगीच्या ज्वाळांचा भास करून देणारा नारींगी, पिवळा पोलका होता. तीच्या केसांच्या दोन वेण्यांची दोन बाजूला चक्रे करून तीने गुंडाळली होती. तीचे डोळेही घारे, पिवळसर सुंदर होते. आडदांड गुंडीच्या पुरूषी अवतारापुढे ती छान नाजूक एखादया बाहुलीसारखी बंडयाला वाटली.
“बंडया ही पंडी. पंडी हा बंडया.” इति गुंडी.
पंडीने त्या दोघांचे हात आपल्या हातात घेतले आणि ती त्याना ओढत एका बाजूला नेऊ लागली, आम्ही सगळे तिथे जमलोत, त्या फुललेल्या गुलमोहराच्या झाडाखाली. बंडयाला तिथे पडलेल्या गुलमोहराच्या सड्यातले आणि पंडीतले साम्य मनोमन चांगलेच जाणवले. तिथे एक प्रौढ बाई बसल्या होत्या व त्यांच्या अवतीभोवती पाच, सहा मुलांचा थवा जमलेला होता. ती सगळी त्याच्या दिशेने पाहून स्वागतासाठी हात हलवत होती. तिथे जमलेल्या सर्वांनी आवर्जुन बंडयाशी हात मिळवले. आपली ओळख करून दिली.
जाडगेलासा ढगाळ कपडयातला धुंडी होता. त्याने टि शर्ट घातले होते. त्याच्यावर डाव्या बाजूला कासवाचा पुढा होता आणि मागच्या बाजूला कासव शेपूट वर करून शेण टाकत होता. बंडयाला त्याची फार गंमत वाटली. धुंडीचे डोळे हसला की इतके बारीक होत की दिसतच नसत. मग भेटला वांडा. हा गुंडीच्या तोलामोलाचा दणकट होता. त्याने लष्करी हिरव्या रंगाचा चौकटीचा हाफशर्ट आणि हाफपॅन्ट घातली होती. त्याच्या डोक्यावरल्या कॅपवर एक वाघाचे चित्र होते. त्याच्याशी हात मिळवताना आपला हात चांगलाच चुरडला गेल्यासारखे बंडयाला वाटले. त्याचे नाक पोपटासारखे होते आणि भुवया खूप जाड आणि दाट. तंटा आणि कंटा ही वांडाच्या मानाने फार किरकोळ अंगाची मुले होती. भाऊ भाऊ असावेत तसे त्यांनी कॉलरचे पिवळे टि शर्ट घातले होते आणि त्यावर बैलाची व घोडयाची चित्रे होती. तंटाचे केस सरळ होते नि त्याच्या कपाळावर, डोळयांवर लोंबत होते. त्याला
झिप-या म्हणणे ठिक होते. कंटाचे केस आफ्रिकन माणसासारखे दाट कुरळे,राठ होते. दोघेही काळेकुट्ट होते. त्यांच्या जोडीने उभी होती चंटी. तीच्या अंगावर रंगीबेरंगी चमचमणा-या टिकल्यांचा मोर होता. त्या सर्वांमध्ये तीच्या अंगावरचा तो रेशमी मोरपिशी डगला अगदि उठून दिसत होता. सगळयात भारी होता. तीने केसांमध्ये त्याच रंगाचा हेअरबॅन्ड लावून ते मागे घातले होते. जरी ती सावळी होती तरी सुंदर होती.
सगळयांमध्ये पाहता क्षणी बंडयाच्या लाडक्या बनल्या त्या आर्या पशुमित्रा, त्यांच्या अमुदि शाळागटाच्या व्यवस्थापक, प्रौढ बाई. मोत्याच्या कुडया, गळयात बोरमाळ, छोटासा अंबाडा, त्यात खोचलेले दुप्पट मोठं अनंताचं फूल. नऊवारी साडी, नाकात मुंद्रि, त्याचे गाल कुस्करणा-या.
बंडयाचा एकदम त्यांचे गाल ओढायचा धीर झाला नाही, पण त्या म्हणाल्या असत्या ना, “मेल्या म्हातारीचे गाल ओढतोस?” आणि त्याच्या तळहातावर खडीसाखरही ठेवली असती. बंडया भारावल्यासारखा त्यांच्याकडे पाहतच राहिला. त्या खळी पाडत हसल्या आणि तोंडातच काहीतरी पुटपुटल्या.
बंडयाच्या कानात तो मंत्र खणखणला. बंडया अगदि खट्टू झाला. त्याचा मंत्र अजून जुळला नव्हता. कोणीतरी त्याचा शर्ट मागून खसकवला. वांडाच्या मुलग्याच्या आवाजातला मंत्र बंडयाच्या कानात खणखणला आणि मग पंडीच्या नाजुक मंजुळ आवाजातला एक मंत्र किणकिणला. बंडयाने पाहिले ते सर्व त्याच्याकडे एका अपेक्षेने पाहत होते. बंडयाने खिन्नपणे सगळयांची नजर चुकवत मान खाली घातली. वांडाने खचकून तोंड वाकडे करत फिरवले.
बंडयाला वाटले कोणातरी पक्ष्याचा पंख त्याच्या खांदयावर आला आहे. तो पंडीच्या पोलक्याचा मागा होता. तिथे पंख पसरलेला गरूड आहे हे त्याच्या लक्षात आले. तीने त्याचा खांदा हलकेच थोपटला. तीला काय म्हणायचे आहे त्याला कळले.
“मी जुळवत होतो.” बंडया हलकेच उत्तरला.
गुंडीने एकदम त्याच्या पायावर पाय मारला आणि त्याच्या कानाशी येत अगदि हळू फिस्कारली, “चुप, बाकी सगळे अदिक्षित आहेत.” बंडया आपल्या घोडचूकीने एकदम वरमला.
“मग तुला पंडीचे कोडे जुळले का?” गुंडीने मोठयाने सर्वांना ऐकू जाईल असे विचारले.
“हं सांग बघू, प्रत्येकी हजार केळी खाणार्या दहा हत्तींएवढी त्याची भूक आणि तो एक केळेही गिळू शकत नाही तर तो प्राणी कोण?” पंडीने लगेच बंडयाची बाजू सावरली आणि गुंडीला साथ देत सर्वांसाठी कोडे उच्चारले.
बंडया बावचळला. बाकीची मुलेही गोंधळली.
“कोणी नाही, कोणी नाही?” पंडीने सगळीकडे वळून खात्री केली.
“एखादा राक्षस, ज्याला केळी आवडत नाहीत.” गुंडी बोलली. पंडीने गुंडीकडे एक तिखट कटाक्ष टाकला.
“डायनोसार.” बंडया म्हणाला, “डायनासोरच्या काळात केळी नव्हती.”
“तू कधी गेला होतास बघायला?” चंटीने तडकावले.
“मागच्या जन्मात.” तंटा कुजकट हसला.
“चल तो मागच्या जन्मात गाढव होता.” कंटाने रि ओढली.
गुंडी लगेच मुठ आवळत पुढे सरसावली. तशी कंटाने चंटिच्या पाठी दडी मारली.
पशुमित्रांनी गोष्टी हाताबाहेर जाण्याआधी हस्तक्षेप केला, “मला सगळेच प्राणी प्रिय आहेत, आणि गाढव हा फार सन्माननीय प्राणी आहे. प्रत्यक्षात बैल किवा घोडयापेक्षा हुशारही आहे.”
हा रोख आपल्या कपडयांवरील प्राण्यावर आहे हे तंटा- कंटाने ओळखले.
“बंडया अरे हा प्राणी तर तुझाच आहे, हा काय इथे?” पशुमित्रांनी बोट दाखविले तिथे बंडयाने पाहीले.
त्याच्या शर्टावर छानसा कारंजे उडवणारा देवमासा होता. तो थक्क झाला. संत कार सायकलवाला, राखाडी हाफ पॅन्ट व निळा शर्ट (उणे राखाडी टाय) हा गणवेश घालून तो निघाला होता. त्यावर हा देवमासा आला कुठून? बंडयाची शोधक नजर पशुमित्रांच्या वरून फिरली. त्या बुट्टेदार नऊवारी नेसलेल्या. ते बुट्टे साधे नव्हते. ते वेगळे वेगळे प्राणी चित्रवलेले होते. त्यातला एक त्यांनी बहुतेक मगाशीच जवळ घेताना सरकवून त्याच्या खिशावर टाकला होता. क्षणभर त्याला भास झाला. ते पातळ हवेत फडकलेय आणि त्यातले सारे प्राणी सजीव साकार होऊन मैदानात पळू लागलेत. तो पशुमित्रांच्या चेह-याकडे पाहू लागला. त्यांनी असे भाव धारण केले होते जसे आपण त्या गावचेच नाही.
“पण देवमासा एक केळं काय? ती सगळी दहा हजार केळी एकदम गिळू शकतो.” वांडाने वैतागात म्हटले.
पशुमित्रांनी पंडीकडे सूचक नजरेने बघितले, तशी ती पंडिता पुढे सरसावली, “नाहीच मुळ्ळी. देवमाशाचा घसा एवढा छोटा असतो कि तो साधे केळे सुद्धा गिळू शकत नाही.”
“मग तो जगणार कसा?” धुंडीच्या चेह-यावर भले मोठे प्रश्नचिन्ह.
“अरे तो पाणी ओढून घेतो आणि त्याचे दात म्हणजे मोठ्ठी चाळणी असते. त्यात पाणी गाळतो. अडकलेले सुक्ष्मजीव व वनस्पती तेवढया गिळतो. त्यावरच तो पोट भरतो.” पंडिताने सुनावले.
“त्या धुंडीलाही असेच नुसते सुक्ष्म वनस्पतींवर ठेवले पाहीजे. म्हणजे त्याचा आकार कमी होऊन तो देवमाशासारखा चपळ होईल.” चंटी टेचात म्हणाली.
“देवमाशासारखा नाहीतर सशासारखा, भित्रीभागुबाई.” तंटा .
“भित्रु आणि चिक्कू.” कंटा.
धुंडीचा चेहरा शरमून दुःखी झाला हे बंडयाने पाहिले. चंटी सुंदर असली तरी खत्रुड होती आणि तंटा कंटा जणू तीचे चमचे होते. धुंडीबद्दल बंडयाला वाईट वाटले. तंटा कंटाला काही खरमरीत उत्तर त्याला द्यावेसे वाटत होते. पण पशुमित्रांनी त्यांना गप्प केले, “हे बघा एकामेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढायच्या नाहीत. आपण इथे शिकायला जमलो आहोत. तुमच्या गटाची जबाबदारी कुलगुरू सरलनाथ (विसाव्वे) यांनी माझ्यावर सोपवली आहे. पुढच्या आठवडयात तुम्ही कुठे कुठे जाणार आहात आणि महिनाभर काय काय करणार आहात त्याचा कार्यक्रम मी आखला आहे. तो आता सविस्तर सांगते. नीट लक्षात ठेवा. ज्यांना नोंदून घ्यायचाय त्यांनी नोंदून घ्या.”
यावर पंडी आणि वांडाने आपापल्या खिशामधून एक मोठ्ठीशी दैनंदिनी काढली आणि ते त्यावर लिहून घेऊ लागले. चंटी, गुंडी नुसत्याच उभ्या राहील्या. तर धुंडी, तंटा, कंटा साध्या वहयांवर उतरवून घेऊ लागले. बंडयाला आपण वही बरोबर घेतली याबद्दल हायसे वाटले. धुंडी ईतका हळू होता कि आर्या पशुमित्रांना प्रत्येक शब्द निदान दहा वेळा तरी थांबून थांबून सांगावा लागे.
दर गुरूवारी पशुमित्रांना इथेच येऊन भेटायचे होते. शुक्रवारी वाचनालयाची फेरी होती गांधी पुतळयापाशी. सोमवारी कार्यशाळा होती, मंगळवारी स्थळदर्शन, बुधवारी वार्तालाप, शनिवार रविवार पालकांबरोबर घालवायला पूर्ण मोकळे होते. हे वार्तालाप, स्थळदर्शन, कार्यशाळा वगैरेसाठी नर्सरीवाला, लॉन्ड्रीवाला, गिरणवाला, हि-यांची सराफपेठ, चामडयाच्या वस्तुंचा कारखाना फर्निचरवाला वगैरे वगैरे लोक आणि ठिकाणे यादीत होती. न्हावी, वाणी, आचारी वगैरे माणसांबरोबर बंडयाच्या शाळेचे गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल असे विषय कुठेच नव्हते. ते नव्हते याबद्दल बंडयाला वाईट वाटत नव्हते. फक्त थोडेसे आश्चर्य.
अजून पुढच्या आठवडयांतील सविस्तर कार्यक्रमाला पशुमित्रा सुरूवात करतात तोच मोठा गिल्ला त्यांना ऐकू आला आणि दोन सायकलस्वार मुले त्यांच्यावर येऊन थडकली. तो भला मोठ्ठा कुत्रा त्यांच्यामागे लागला होता. ती मुले भेदरून पशुमित्रांच्या अंगाला बिलगली. त्यांनी मुलांना सावरले व त्या कुत्र्याकडे वळल्या. जोरात भुंकणारा कुत्रा पशुमित्रांशी नजर मिळताच जादू झाल्यासारखा शांत झाला. मान हलकेच खाली घालून कुई कुई करायला लागला व पुढचे दोन्ही पाय जोराजोराने जमिनीवर घसटू लागला. जणू काही तो आपली सावजे परत करण्यासाठी पशुमित्रांकडे तक्रार करत होता.
“तुम्ही त्याचे काय केलेत?” पशुमित्रा दोघा मुलांकडे वळून विचारत्या झाल्या. बंडयाने ती मुले ओळखली. ते त्याच्याच ईमारतीतले अहसान व अरमान होते.
“काही नाही, काही नाही.” अरमान म्हणाला.
“हा फक्त शाळेला उशीर झाला म्हणून घाईने त्याच्यासमोर पळाला.” अहसान म्हणाला.
पशुमित्रांनी कुत्र्याकडे पाहीले. जणू म्हणल्या, “पाहिलस. पळापळीचे साधे कारण होते. संशयासारखे काही नाही.”
कुत्रा जरासा खर्जात गुरगुरला आणि चालू पडला. तोच त्याचा मालक हाफत दमत पळत आला व त्याने कुत्र्याचा पट्टा धरून त्याला ओढत नेले. जाण्यापूर्वी काही काळ कुत्रा आपल्याकडेच रोखून पाहत आहे असे बंडयाला जाणवले. कुत्रा त्याला तसे मुद्दामहून जाणवून देत होता. बंडयाला त्यात काही खास असावेसे वाटले नाही. थोडया दूरवर कुत्र्याच्या मालकाला एका व्यक्तिने कामगिरीबद्दल पैसे दिले. हे त्याने बघितले असते तर कदाचित विचार केला असता. त्याने कुत्र्याने त्याच्या जोडयांवर ओढलेल्या एका चुकार ओरखडयाबद्दल तरी विचार करायला हवा होता. पंडीसारख्या तल्लख मुलीच्या नजरेतून ते सुटले नव्हते.
“तो तुझ्या जोडयांना बोचकारत होता.” पंडी म्हणाली
“जोडयांना नाही, त्याला बंडयाला चावायचे असणार, व्दाड कुत्रा.” अहसान म्हणाला. कुत्रा नजरेच्या आड गेला तरी त्याची छाती वर खाली धपापत होती.
“अय्या. तुला बंडया माहित आहे.”
“आमच्याच ईमारतीत तर राहतो तो,” अरमान म्हणाला.
“बंडया तुझे शेजारी दोस्तच आहेत होय रे, मग खेळू दे त्यांना आपल्याबरोबर,” पशुमित्रांनी दोघांना आपल्या टोळक्यात शामील करून घेतले. तसे दोघे खूष झाले. खेळायला कोणी नाही म्हणतो का?
“पंडीने कोडे घालून झाले आता मी एक कोडे घालते हो, तर ऐका. मी आजच्या सणासाठी तुम्हा सर्वांना वाटायला छानशी काजू कतली घेतली नव्वद रुपयांना. तोच दुस-या एक बाई आल्या, त्यांना तीच हवी होती. दुकानात संपलेली. म्हणून मला म्हणाल्या कृपया मला दया ना हा खोका. मी बाई भोळी, दिला की हो खोका तीला, त्यांनी दिले शंभर मला. सुट्टे नव्हते माझ्याजवळ. तीची नोट देऊन दुकानदाराच्या दहाच्या दहा नोटा घेतल्या त्याच्याकडनं, त्यातले दहा दिले हो तीच्यापाशी, ती भुर्रकन उडाली. गेली माशीसारखी. आता दुकानदार बोलला, बाई तुम्ही फसलात. खोटी नोट घेऊन बसलात. काय करते कर्म म्हणते, दिले पदरचे अजून शंभर मी त्याला, आता सांगा तुम्ही कोणी मला बाई पशुमित्रा किती रूपयांना ठकलात?”
बाकी सगळे नुसते गणित करू लागले. पण धुंडी सात्विक संतापाने ओरडला, “आर्या तुम्ही त्या ठकबाईला तसे सोडायचे नव्हते, तीच्या मागून जाऊन सगळे पैसे आणि खोका वसूल करायला पाहिजे होता.” आपल्याला वाटायला घेतलेली काजू कतली परस्पर दुस-या कोणी लांबवली ही त्याच्या दृष्टीने फारच गंभीर आणि दुःखद घटना होती.
“हो. तुम्ही तीला एक जोरदार झटका दयायला हवा होतात.” वांडाने मूठ आवळून दुस-या हाताच्या तळव्यात जोरात आपटत विचारले.
“मी असते ना तीच्या झिंजाच उपटल्या असत्या.” कधी नव्हे ते गुंडीचे आणि वांडाचे एकमत झाले.
“आर्या मी सांगते तो दुकानदारच खोटारडा होता. ती नोट खोटी कशावरून?” चंटीचे डोके नेहमी उलटया दिशेने चाले.
“मिठाईवाले लुच्चे असतात. ते साखरेऐवजी डांबराचे सॅकरीन घालतात.” तंटाने रि ओढली.
“हो आणि काजूऐवजी भाट्याचे बी मिसळतात.” कंटाने अंग शहारवत पाजी दूकानदारांची पोल खोलून ठेवली.
“आमच्या ईथला दाजी किराणवालाय ना, तो चहाची वापरलेली पत्ती सुकवून ती परत विकतो,” छोटया अरमानने आपणही व्यवहार ज्ञानात कमी नाही हे दाखवून दिले.
तेव्हा अहसानने आपणही कच्चे नाही हे दाखवताना म्हटले “आणि आईस्क्रिम मध्ये..,” त्याने आपल्या नाकातून द्रवपदार्थ काढत असल्याची हालचाल केली.
“ई..” “श्शी...” करत वातावरणात शहारे फुलले.
“पुरे.” या व्यवहार गंगेच्या ओघाला आळा घालत पशुमित्रा गरजल्या, “या कोडयाचे जो अचूक उत्तर देईल त्याच्यासाठी मी हा डिंकाचा लाडू बदाम, पिस्ते, आक्रोडवाला बक्षिस द्यायला बांधून घेतलाय.”
लगोलग धुंडीसकट सगळी मंडळी हिशेबाला लागली. मिठाईवाले किती का बदमाष असेनात ते लाडू फर्मास बनवितात.
“दोनशे?”
“नाही.”
“एकशे नव्वद?”
“नाही.”
“एकशे दहा?”
“नाही.”
“शंभर?”
“ना... अरे हा. बरोबर.”
“आर्या. तीच नेहमी कोडी जिंकते. तुम्ही कोडयांना बक्षिसे लावलीत तर तीलाच एकटीला सगळी मिळणार,” चंटीने पंडीच्या नावाने बोटे मोडली.
“आर्या कोडी नकोत, कोडी नकोत.” तंटा, कंटा, वांडाकडून एकच गदारोळ झाला.
धुंडी, गुंडी हे देखिल विरोध न करता तोंड गिळून गप्प राहिले. पंडी जरी लाडकी असली, तरी एक बदाम, पिस्तेवाला लाडू ही रोजरोज मिळणारी सामान्य गोष्ट नव्हे. मग ते “कच्ची पपई, पक्की पपई” खेळ खेळले. मग...
खेळांच्या नादात सगळेच वेळेचे भान विसरून गेलेले. उन्हे डोक्यावर आली तसे पशुमित्रांनी त्यांना वेळेचे भान आणले. साडे अकरा वाजले म्हटल्यावर अरमान आणि अहसान एकदम तंतरले. बापरे! शाळेची वेळ दहाची तर कधीच टळून गेलेली. बंडयाने त्यांना किती “थांबा जरा, थांबा जरा” म्हटले तरी ते घाईघाईने आपल्या सायकली पिटाळत पळाले. धुंडीनेही जायची परवानगी मागितली, त्याला सणकून भूक लागलेली. पशुमित्रांनी त्याला परवानगी दिली आणि तो जाण्यासाठी वळला. तर त्याच्यासमोर बिना उघडे एक काजू कतलीचा भरलेला मिठाईचा खोका उघडा घेऊन उभी होती.
“बिना उघडे” ला बघून बंडयाचे तोंड आंबट झाले. ती त्यांची दूधवाली होती. चांगलीच वाचाळ होती. अमुदि शाळा काचेच्या मनो-यात न भरता, शिवाजी मैदानाच्या फुटक्या बाकडयावर भरते, हे जोशी काका काकूंना कळायला आता उदया सकाळला जितके तास होते, तितकेच उरले होते. खोका आर्यांच्या हातात ठेवून, शड्डू ठोकतात तसा तीने एक साष्टांग दंडवत त्यांच्या पायावर घालून दिला.
“जय हो गुरूमाऊली.”

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users