रसप यांनी लिहिलेले कोर्ट चित्रपटाचे परीक्षण आणि त्यातला त्यांचा त्रागा माझ्या अजूनही लक्षात आहे,
ते पण हा चित्रपट विसरलेले नाहीत कारण अलिकडेच त्यांनी एका प्रतिसादात या चित्रपटाचा
उल्लेख केला होता.
या सगळ्यामूळे माझ्याकडे या चित्रपटाची सिडी असूनही बघावासा वाटत नव्हता.
पण गेल्या आठवड्याभरात तूकड्या तूकड्याने तो मी बघितला. माझ्या सिडी बघण्याच्या स्टाईल बद्दल
लिहायलाच हवे. समोर टीव्ही चालू ( त्यावर माझ्या आवडते ऑलिंपिकचे सामने ) जेवण चालू आणि
कानाला हेडफोन लावून मी हा चित्रपट बघितला.
रसप यांनी माझी मानसिक तयारी करून घेतली होती, हे मला मान्य करावेच लागेल, कारण
सतत स्क्रीनवर डोळे रोखन हा चित्रपट बघायची गरजच नाही. कोर्टात जश्या तारखा पडतात,
तसाच टप्प्या टप्प्याने बघितला.
त्यांनी लिहिल्याप्रमाणे अक्षरशः कॅमेरा कुठेतरी खुंटीला टांगून ठेवल्यासारखे चित्रण आहे.
त्यांनी काही सीन्सचा उल्लेख केलाय त्याहूनही बरेच सीन्स आहेत. एका सीन मधे वकिलाचा
तोंडावर काळे फासल्यानंतर तो पार्लर मधे जाऊन स्टीम घेतो. त्या सीन मधे दुसरे काही होतच
नाही. पण निदान त्या मशीन मधून वाफ तरी येताना दिसते, तेवढीच हालचाल.
दुसर्या एका सीनमधे तो बेडवर पाठमोरा बसलेला असतो, त्यात तर काहिही हालचाल नाही.
( मला वाटले माझी सिडीच अडकली कि काय )
आणखी एका प्रसंगात वकीलावर "गोयमार" लोक हल्ला करतात, त्याच्या तोंडाला काळे फासतात
हा सर्व प्रसंग घडताना, कॅमेरा मात्र एकाच ठिकाणी बघत असतो आणि हे सगळे कॅमेराच्या अपरोक्ष
घडते.. या मागचे लॉजिक मला कळले नाही.
पण या अश्या कॅज्यूअली बघण्यातून मला यातले काही नर्म विनोद कळले, तेच इथे लिहितोय.
( ते दिग्दर्शकाला अपेक्षित आहेत का ते माहित नाही ) तसेच काही प्रसंगाना दाद पण द्यावीशी
वाटली, ते पण इथे लिहितो.
त्यातला शेवटी शेवटी येणारा कोर्ट बंद होतानाचा सीन ( ज्या बद्दल रसपनी पण लिहिलंय )
मला चक्क आवडला. अर्थात दरवाजा बंद केल्यानंतरचा काळोख नाही.
पण कोर्टात, कामाच्या शेवटच्या दिवशी असेच असते. ( घड्याळ्यात सव्वा सहा वाजलेले आहेत )
कॅमेरा एकाच जागी, म्हणजे जिथे साक्षीदार वगैरे बसतात त्याच्याही मागे आणि स्थिर. जजसाहेब
चेंबर मधे निघून गेल्यानंतरच्या स्टाफच्या हालचाली अगदी अस्सल. हा सीन कसा चित्रीत केला
असेल त्याचे नवल वाटते. कारण हा संपूर्ण सलग शॉट आहे. कॅमेरात दिसणारी कुठलीच व्यक्ती
कॅमेरा कॉन्शियस वाटत नाही.
नारायण कांबळेचे पुढे काय झाले याबद्दल चित्रपट काही बोलतच नाही आणि तेही कोर्ट च्या बाबतीत
अगदी खरे आहे. कुणाबदद्लही कसलीही भावना न दाखवता कोर्टाचे कामकाज कसे चालते, त्याचे हे प्रतीक
आहे. ( माझा स्वतःचा अनुभव मात्र अगदी वेगळा होता. मे. न्यायाधिशांनी अत्यंत प्रेमाने माझी समजुत काढली होती,
पण तो अपवादच असावा.)
कोर्टाचे कामकाज चालते ते कोड ( सी.पी.सी ) नुसार. हे कोड अत्यंत आंधळेपणाने अनुसरले जातात.
याचे एक बोचरे उदाहरण चित्रपटात आहे. केवळ स्लीवलेस ड्रेस घातलाय, म्हणून एका केसची सुनावणी होत
नाही. मला फस्सक्न हसूच आले ( असा कोड आहे का ते माहित नाही. )
आणखी एक मुद्दा म्हणजे कायद्यातील भाषा. एका प्रसंगात सरकारी वकील आक्षेपार्ह वस्तूंची यादी वाचून
दाखवतात. बॉम्ब, केमिकल्स पासून सुरु होणारी हि यादी वगैरे वगैरे सारख्या शब्दावर थांबते. आणि त्या
शब्दांचा आधार घेत सरकारी वकील जे तर्कट लढवतात, ते तर फारच मजेशीर आहे.
आम्हाला काही कायदे सी.ए. आणि बी. कॉम. च्या अभ्यासातही होते ( त्याला दोन तपांहून अधिक काळ
लोटला ) पण त्यातील डोक्यात गेलेली काही वाक्ये तर अजूनही विसरलेलो नाही..
नथिंग कंटेण्ड हिअरइन शाल अप्लाय टु द प्रोव्हायझो ऑफ.... अॅण्ड इव्हन इफ इट अप्लाईज, इट मे बी
सब्जेक्ट टू सच कंडीशन्स अॅन्ड रेस्टीक्र्श्नस अॅज मे बी स्पेसिफाईड............ हुश्श !
आपण अनेक कायदे ब्रिटीशांच्या काळापासून बिनडोकपणे फॉलो करतो आहोत. त्याची काही उदाहरणे
पण इथे आहेत. एक कायदाच ड्रामॅटीक परफॉर्मन्सेस अॅक्ट असे नाव येते ( असा कायदा नाही बहुतेक)
तो असाच जुनापुराणा. ११० वर्षांपुर्वी बंदी घातलेल्या एका पुस्तकाचाही असाच मजेशीर उल्लेख आहे.
या जून्यापुराण्या कलमांबद्दल एक आठवण सांगायलाच पाहिजे. आम्हाला कॉन्ट्रॅक्ट अॅक्ट शिकवायला, अॅड.
गोविलकर होते. त्यांची लेक्चर्स म्हणजे नर्म विनोदांची पखरण असे. त्यांनीच सांगितलेला एक किस्सा.
ते म्हणाले या कायद्यात, स्त्री, वेडसर व्यक्ती आणि अज्ञ बालक ( वूमन, ल्यूनेटीक अॅण्ड मायनॉर ) यांच्या बाबतीत काही कलमे समान आहेत.
"ती तशी का हे मला ( म्हणजे त्यांना ) कळत नव्हते पण कायद्यात आहेत म्हणून वर्षानुवर्षे मी वर्गात शिकवत असे.
तर एका वर्षी एक मुलगी ऊभी राहून म्हणाली, सर मला याचे कारण माहीत आहे. मला नवल वाटले.मी म्हणालो,
अवश्य सांग.
तर ती मुलगी म्हणाली, स्त्रीला यांच्या सोबत ठेवलेय कारण ती एकाची पत्नी असते तर दुसर्याची माता !!!"
चित्रपटात येणारी केस तर अत्यंत विचित्र आहे. शाहीर नारायण कांबळ्यावर आरोप काय तर त्यांनी एका
गाण्यात, गटार सफाई कामगारांनी आत्महत्या करा, असे सांगितल्यावर एका कामगाराने आत्महत्या केली.
हा आरोप कुणालाही हास्यास्पद वाटत नाही. आणि तपास अधिकारी, सरकारी वकील आणि अर्थातच
न्यायाधिश.. अगदी सिरियसली या केसचे कामकाज पाहतात.
तपास अधिकारी कसे मूर्खपणे वागतात ते तर यात पदोपदी जाणवते. एकतर साक्षी पुरावे नीट गोळा
करत नाहीत. साक्षीदारांना कोर्टात सादर करत नाहीत इतकेच नव्हे तर तपास करताना देखील, अगदी
बेसिक नियमांचे ( परत कोड ) पालन करत नाहीत.
इथे सर्वच जण डोके गहाण ठेवल्यासारखे वागताना दिसतात. पोलिसांनी केस दाखल केलीय ना, मग ती
बाजू मला लढलीच पाहिजे. हा सरकारी वकिलांचा खाक्या. तपासातले साधे साधे विरोध त्या बाईंच्या नजरेत
येत नाहीत, पण स्वतःच्या आर्ग्यूमेंटस साठी मात्र अनेक पुरावे आणि संदर्भ गोळा केलेले दिसतात.
यातली एकमेक माणुसकी असलेली व्यक्ती म्हणजे तो गुजराथी वकील. त्याचे प्रामाणिक प्रयत्न या सर्व
सिस्टीम पुढे कायमच अपयशी ठरतात. त्याचे बहुतेक अर्ज विनंत्या ( कुठल्यातरी नियमावर बोट ठेवून )
मे. कोर्ट नाकारते. आणि तो ते हताशपणे मान्य करतो. हि केस वर्षानुवर्षे चालणार आहे, हे त्यालाही माहीत
आहे.
मृत व्यक्तिच्या पत्नीची साक्ष तर एकाचवेळी अत्यंत करुण आणि विनोदी आहे ( हा विनोद बोचर्या अंगाने )
पतीच्या मृत्यूनंतर तिचा उदर निर्वाह कसा चालत असेल याची या व्यवस्थेला फिकीर नाही, तिने विचारलेल्या
प्रश्नांची मात्र व्यवस्थित उत्तरे दिली पाहिजेत, हा आग्रह. तिची मानसिक तयारी आहे का याची चिंता केवळ
आरोपीच्या वकीलाला. आणि तिचा, आणखी किती वेळा कोर्टात यावं लागेल, हा प्रश्नही अगदी मार्मिक.
कोर्टातील वातावरण अगदी अस्सल पणे टिपलेय. बहुतेक चित्रण चालू कोर्टातच केले असावे अगदी त्या
प्रॉपर्टीसकट, तरीपण काही बाबी खटकल्या.
१) कुणालाही शपथ दिली जात नाही.
२) एका केसचा पुकारा करताना, प्रतिवादीचे नाव घेतले जात नाही.
३) बेलची सुनावणी होताना घड्याळात सकाळची वेळ आहे ( बेलचे अर्ज सहसा दुपारच्या सत्रात सुनावणी
साठी घेतले जातात.)
४) जज साहेब कोर्टात येण्यापुर्वी अजूनही होशिय्यार चा पुकारा होतो, तो नाही.
५) तूमच्या केसमधे दम नाही, असे जज साहेब प्रत्यक्षात थेट क्वचितच बोलतात.
६) वकील सहसा कोर्टात येताना आणि जातानाही अभिवादन करतात, तसे होताना दिसत नाही.
कोर्टाचे चित्रण फक्त कोर्ट रुम मधलेच आहे. पण त्या वातावरणाचे घटक असलेले नाझर ऑफिस, सर्टीफाइड
कॉपीज मिळण्याचे ऑफिस, बाहेरची गर्दी, आशाळभूत पक्षकार आणि वकिल यापैकी काहीच
येत नाही चित्रपटात.
यातले पोवाडे मात्र अतिशय सुंदर आणि असस्ल आहेत, पण ते पुर्ण नाहीत. दुसर्या पोवाड्यात मागच्या फलकावर
दादासाहेब फाल्के असे लिहिलेय, मराठी माणूस सहसा अशी चूक करणार नाही.
आपल्याकडच्या चित्रपटात कोर्टाबाहेरचे न्यायाधिश क्वचितच दिसतात. इथे ते दिसतात आणि त्यांच्या व्यक्तीमत्वाचे काही वेगळेच कंगोरे आपल्याला दिसतात.
कंटेप्ट ऑफ कोर्ट ( कोर्टाचा अवमान ) हा आपल्याकडे अजूनही गुन्हा मानला जातो, त्यामूळे असा बोचरा विनोद
असणारा चित्रपट तयार झाला आणि त्याला मान्यताही मिळाली, याचे मला कौतूक वाटतेय.
तो आणखी योग्य रितीने संकलित केला असता, पटकथेवर जरा जास्त मेहनत घेतली असती, तर पूर्ण चित्रपटही
आवडला असता.
मला हा चित्रपट आवडला. कथा,
मला हा चित्रपट आवडला. कथा, मांडणी, पात्र हे उत्तम आहेत. थोडा संथ आहे, पण ते खूप काही अयोग्य नाही वाटलं. भाषेबाबत मला इथे फार खटकलं नाही. हे खरं आहे की ह्यात फक्त मराठी नाही, वेगवेगळ्या भाषा आहेत. पण त्यांनी ती ती पात्रं कोणती भाषा बोलतील ती तशीच ठेवली आहेत, जे वास्तवातही बघायला मिळतं. ह्यात दाखवलेल्या प्रश्नाचं गांभीर्य जाणवण्यासाठी चित्रपट वास्तवदर्शी असणं हे अत्यावश्यक वाटलं. त्यात त्यांना वास्तवात पाहिल्या जाणाऱ्या व्यक्ती, त्यांच्या भाषा आहेत तश्या ठेवाव्याश्या वाटल्या, ह्यात मला काही वावगं वाटलं नाही.
एवढं म्हणूनसुद्धा हे मी मान्यच करतो की ह्या चित्रपटाच्या चित्रीकरणाची गुणवत्ता अजिबात चांगली नाही. कुठला तरी जुनाट चित्रपट बघतो आहोत असा भास होतो. चांगले कॅमेरे वापरले नाहीत की अजून काही कारण आहे, हे कळण्याइतकी तांत्रिक माहिती मला नाही. पण ह्याच कारणामुळे मी सिनेमागृहात जाऊन अजिबात पाहिला नसता हे नक्की! ह्याबाबत कुमार ह्यांच्याशी सहमत.
आता धागा वरती आलाच आहे तर
आता धागा वरती आलाच आहे तर लिहून टाकतो.
ज्यावेळेस आला होता तेव्हा पहायचा राहून गेला पण दिनेशदांनी लिहील्या प्रमाणे थोडा थोडा बघीतला. मी तसा भाईचे पिक्चर आवडणारा माणूस पण हा पिक्चर खूप आवडून गेला. खरे पहाता इथे जे कॅमेरे वगैरे म्हणत आहेत तसे मला अजिबात खटकले नाही. कोर्टरूम सुरू झाली की मी मागे एका खुर्चीवर बसून खटल्याचे कामकाज बघतो आहे त्रयस्था सारखे असे वाटत राहीले. पण शेवटी शेवटी मात्र त्यात गुंतायला होऊन एक अस्वस्थता भरून राहीली. आपल्याकडे कितीतरी कैदी असेच पडून असतील. मागे एकदा तर तुरूंगात असलेले कच्चे कैदी की ज्यांना ही कोर्ट तारीख पण मिळालेली नाही अशांची आकडेवारी वाचली होती जी खूपच भयावह होती.
या सिनेमातले शाहीर म्हणून काम केलेले वीरा साथीदार मागच्याच वर्षी कोव्हीडने गेले. त्यांचे काम अगदी अंगावर आणणारे वाटलेले मला. खुपच लवकर गेले आणि खंत वाटली.
त्याचबरोबर एक राजकीय कैदी स्टॅन स्वामी अगदीच या पिक्चरच्या सारखे गेले.
मला वाटते भारतीय जनतेला सनी देओल जे तारीख पे तारीख म्हणतो ते आवडते ते उगीच नाही, कारण कोर्ट सारखा चित्रपट आपल्याला या तारखा कशा पडतात आणि तो कैदी सोडून बाकी कोणालाच कशाचेच काही पडलेले नसते हे सडेतोड पणे दाखवून देतो.
स्रोत : विकीपीडिया
स्रोत : विकीपीडिया
‘कोर्ट’ या चित्रपटात एका लोककलाकाराचा प्रवास रेखाटला आहे. कार्यकर्त्याचे आयुष्य आणि लोककला यांची सांगड या चित्रपटात घातली आहे. एका कार्यकर्त्यावर त्याच्या ध्यानीमनी नसताना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहण्याची वेळ येते. या अनुषंगाने या चित्रपटात भाष्य केले आहे. चित्रपट पाहण्याची एक वेगळी दृष्टी देणारा चित्रपट म्हणूनही ‘कोर्ट’चे नाव कोरले आहे. दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांनी ‘कोर्ट’च्या पूर्वी केवळ एक लघुपट आणि एक माहितीपट केला आहे. त्यांचे हे चित्रपट दिग्दर्शनातले पहिले पाऊल आहे. कोर्ट हा मराठी सिनेमा २०१६ मध्ये पॅरिस, फ्रांस येथेही प्रदर्शित करण्यात आला. मराठीच सिनेमा पण फ्रेंच तळटीपांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आणि पॅरिस मधील चित्रपट जाणकारांनी याला भरघोस प्रतिसाद दिला. सिनेमा माध्यमाला स्वतःची भाषा आहे. या भाषेचा चपखल उपयोग चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’मध्ये केला गेलाय, त्यामुळेच ‘कोर्ट’ची जागतिक स्तरावर स्तुती झाली आहे. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘कोर्ट’ची दखल घेतली गेली. समीक्षक व चोखंदळ प्रेक्षकांनी ‘कोर्ट’ची वाहवा केली आहे. आणि भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपट असण्याचा सन्मानही त्याला मिळाला. आपल्या इथल्या सर्वसामान्य प्रेक्षकाला मात्र सिनेमाच्या या भाषेचा सराव झालेला नाही. त्यामुळेच खर्या अर्थाने सिनेमा असणार्या ‘कोर्ट’ला मराठी प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
जे प्रसंग आपल्याला पडद्यावर दिसतात ते मुंबईत घडतात. यातील काही प्रमुख पात्रं मराठी आहेत व मराठी भाषा बोलतात, म्हणून त्याला मराठी सिनेमा म्हणायचं. अन्यथा ‘कोर्ट’ हा संवादाच्या पलीकडे जाणारा दृश्यात्मक आविष्कार आहे. या दृश्यप्रतिमांतून दिग्दर्शक केवळ भारतीय न्याय व्यवस्थेचं अस्सल स्वरूपच दाखवीत नाही, तर त्याचा अविभाज्य भाग असणाऱ्या व त्यात अभावितपणे गुंतलेल्या माणसांच्या रोजच्या व्यवहाराचा व मानसिकतेचा वेध घेतो. त्यांच्या व्यवसायाव्यतिरिक्त असलेल्या सामाजिक आर्थिक व सांस्कृतिक स्तराचं दर्शनही घडवतो.
दृश्यातून दिग्दर्शकाला जे अभिप्रेत आहे ते केवळ संवादातून नव्हे, तर तपशिलातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं. अर्थात हे तपशील टिपण्याची दृष्टी आपल्याकडे हवी. त्यासाठीच संभाजी भगतांच्या दोन गीतांपलीकडे या चित्रपटात पार्श्वसंगीत नाही. नैसर्गिक ध्वनीचा सुयोग्य वापर केल्यामुळे प्रत्येक प्रसंग ठसठशीतपणा घेऊन उभा राहतो. कोर्टाचे नियम, केसचे निकाल बरेचदा हास्यास्पद असतात, याचा प्रत्ययदेखील छोट्या छोट्या प्रसंगातून दिला गेलाय.
भारतीय चित्रपटांतून आजवर असंख्य वेळा न्यायालय व तिथे चालणारे खटले, यांचं अतिरंजित चित्रण आपण पाहिलंय. ‘ऑर्डर ऑर्डर’, ‘मिलॉर्ड, मैं गीता पे हाथ रख के कसम खाता हूॅं’, ‘तारीख पे तारीख’ असे संवाद आपल्याला अतिपरिचित झालेले आहेत. टोकाचे भ्रष्ट किंवा सत्शील वृत्तीचे न्यायाधीश आणि वकील यांच्या प्रतिमा भारतीय चित्रपटांनी आपल्या मनावर बिंबवल्या आहेत. ‘कोर्ट’मध्ये न्यायाधीश, वकील, आरोपी, साक्षीदार आणि न्यायालयीन कामकाज सर्वकाही आणि त्यापलीकडचं बरंच काही आहे. पण आपण चित्रपटाच्या माध्यमातून ते पाहिलेलं नाही. आणि हेच ‘कोर्ट’चं प्रमुख वैशिष्ट्य आहे
Pages