- साबरी दिक्षितांच्या मायावी जगात आपले स्वागत असो. जादू आणि चमत्कार या जगातून संपलेले नाहीत. साहसवीरांच्या अदभुत कथा आजही घडताहेत. शोधा म्हणजे सापडेल. वाचा म्हणजे समजेल.
* अलख निरंजन. *
- समिर बागायत
एकतारीची नादलिपी
परतीचा प्रवास सुरवातीसारखाच झटपट झाला. आकाश लाल लाल झाले होते. सुर्य मावळायला आलाच होता. बंडया आणि मंजुघोष रिक्क्षातून उतरले. सरलकाका लगबगीने जवळ आला. दोघांनाही सलामत पाहून तो खुष झाला. सकाळी बंडयाच्या हातात ठेवली होती तशी मोहोरांची अजून एक थैली सरलकाकाने चांगदुष्टाच्या हातावर ठेवली. अलख म्हणून चांगदुष्ट रिक्क्षा घेऊन गेला. उत्तरात सरलकाका व मंजुघोष देखील “अलख” म्हणाले. बंडयाला चुटपुट लागली. त्याने देखील “अलख” म्हणायला पाहिजे होते. आता तो अदिक्षित राहिला नव्हता. त्याला दिक्षा मिळाली होती. पण ते त्याला माहित नव्हते. ते शिकायला बंडया शाळेत जाणार होता. त्याला खरेच शाळेत जाता येणार होते का? तो उदास झाला. शाळेत प्रवेश करायची गुरूकिल्ली तर तो हरवून बसलेला.
बंडयाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवीत केस कुरवाळीत सरलकाका म्हणाला, “आधी तुम्ही काही खाऊन घ्या. गुंडी तर तुझी वाट पाहून कंटाळून घरी गेली.” खाण्याचे नाव निघताच बंडयाला त्याच्या पोटातल्या आतडयांना पडणारा पीळ जाणवला. असा आख्ख्या दिवसाचा उपवास त्याने कधी केला नव्हता. समोरच्या चहाच्या टपरीवरले वास त्याच्या नाकातुन आत शिरले. सारी भूक चवताळून उठली. सरलकाका त्या दोघांना घेऊन टपरीकडेच निघाला.
“चहा, चहा” एका पोपटाचा कर्कश्श आवाज ऐकून बंडयाने चमकून मंजुघोषाकडे पाहिले. मंजुघोष सरलकाकाच्या खांदयावर बसला होता आणि हुबेहूब पोपटासारखा चोच त्याच्या पंखावर घासत होता. मंजुघोषाने आवाज बदलून आपले खरे रूप लपवले होते तर! टपरीवाल्याने कुतुहलाने वर बघितले. मंजुघोषाचे पांढरेशुभ्र देखणे रूपडे बघून तो खुश झाला.
“कक्काकुव्वा?” त्याने सस्मित विचारणा केली.
सरलकाकाने टपरीवाल्याला खोडून काढले नाही. होकारार्थी मान हलवत कौतुकाने मंजुघोषाला कुरवाळले. चहाचे दोन पेले आले. एक बंडयाच्या हातात जो अर्ध्या मिनिटात गायब झाला. दुसरा सरलकाकाच्या हातात जो अर्धा बशित उतरला आणि मंजुघोषाच्या पोटात सावकाश थंड होत घोट घोट संपू लागला. बंडयाला एक पेला पुरेसा वाटला नाही. तरी त्याला बोलायची काही गरज पडली नाही.
“खारी, खारी.” मंजुघोषाने उच्चरवाने मागणी केली. टपरीवाल्याच्या मुलाने, बाबूने लगेच मोठया कौतुकाने एका चिनीमातीच्या बशीत खारी बिस्किटांचा डोंगर रचून ती आपल्या खाश्या गिर्हाईकापुढे धरली. खाश्या गिर्हाईकाने बाबूच्या बोटांतून एक खारी चोचीने ओढून घेवून त्याला कृतकृत्य केले. प्रत्यक्ष देवाने जरी बाबूच्या हातून नैवेदय ग्रहण केला असता तरी त्याचा चेहरा असा हजार वॅटच्या दिव्यासारखा उजळला नसता. टपरीवाल्यावर देखील त्याचा परिणाम झाला. तो जी गरमागरम भजी तळत होता तीचा सारा घाणा इतर गिर्हाईकांची पर्वा न करता त्याने एका कागदावर ओतून तो मंजुघोषापुढे धरला.
“मिठू मिठू, मिरची खा.” मोठया लाडाने त्याने आपल्या हाताने मंजुघोषाला मिरचीची भजी भरवली. मग अभिमानाने छाती फुगवून आंबट चेहरा केलेल्या बाकी गिर्हाईकांकडे पाहिले. तुमची गणतीच काय? असा तुच्छ कटाक्ष फेकला. ती गिर्हाईके रागाने उठून चालू पडली. लागलेच सरलकाका आणि बंडया आता रिकाम्या झालेल्या बाकडयावर जाऊन बसले. चवीचवीने ती चवदार भजी खात ते गप्पा मारू लागले.
पोटातली आग शमू लागताच बंडयाच्या काळजातील खळबळ वर उमटू लागली. आजच्या सार्या दिवसाचा वृत्तांत कधी सरलकाकाच्या कानावर घालतो, असे त्याला झाले होते. मंजुघोष मध्येच त्याच्यासोबत येऊन बसे, मध्येच टपरीवाल्याच्या खांदयावर जाऊन बसे. टपरीवाल्याच्या कानाचा हलकेच चावा घेऊन त्याला लाडीगोडी लावे. एकदा तर बाबू समोरच्या किराणावाल्याच्या दुकानावर चहा पोहोचवायला गेला, त्याच्या खांदयावर बसून मंजुघोष रस्ता फिरून आला. सरलकाका अगदी मन लावून बंडयाची सारी कहाणी ऐकत होता. कहाणी बंडयाने हरवलेल्या ओळखपत्रापर्यंत आली.
बंडया अगदि कळवळून सांगू लागला, “मला काय माहित होते त्या खुणा म्हणजे उच्चाराची लिपी आहे. पण मंजुघोष तिथे होता. त्याला तर त्या कळतील.”
यावेळी मंजुघोष त्यांच्याबरोबरच होता. तो त्या दोघांना ऐकू जाईल अशा अगदि खालच्या पट्टीतल्या आवाजात म्हणाला, “नाही बरे बाळ. त्या खुणा तुझ्यासाठी होत्या. फक्त तुला एकटयालाच दिसणार होत्या हो.”
बंडयाचा चेहरा साफ पडला. तीन कप चहा, बशी भरून भजी व एक डझन खारी खाऊन जितका पडण्यासारखा होता तितका पडला. इतके इंधन पोटात भरल्यावर डोक्याचे इंजिन फार काळ बंद राहू शकत नाही. बंडयाचा चेहरा पुन्हा उजळला.
“मला त्या आकृती आठवतात. मी त्या काढून दाखवतो.”
चक चक करत त्यावर मंजुघोष म्हणाला, “नाही बरे बाळ. तू गुप्ततेची शपथ घेतली आहेस. ती तुला मोडता यावयाची नाही हो.” गुप्ततेची शपथ? ती आणि त्याने कधी घेतली? बंडयाने नवल केले.
“अरे बाळ तशी शपथ घेतल्यावरच तुझ्या अर्जाचा विचार सुरू झाला नाही का? मगच कुंडांना उकळी फुटली की नाही?” मंजुघोषाने बंडयाचीच साक्ष काढली.
“म्हणजे मी तुझ्या मागोमाग म्हटला होता तो मंत्र?” बंडयाने विचारले.
“मंत्र नव्हे रे बाळ शपथ. श.प.थ. म्हणजे तुला तू काय शपथ घेतली ती कळली सुद्धा नाही?” मंजुघोषाच्या प्रश्नात प्रचंड आश्चर्य होते. एवढयात सरलकाकाने बंडयाची बाजू सावरून घ्यायचा प्रयत्न केला.
“मंजु, अरे मंजु बंडयासाठी या सगळया गोष्टी नवीनच आहेत. त्याला कालच साबरी शाळेविषयी कळले. त्याला तर अजून साबरी म्हणजे काय? ते सुद्धा ठाऊक नाही.”
“काय? त्याला साबरी म्हणजे काय ते सुद्धा ठाऊक नाही. आणि त्याला त्यांनी साबरी गुरूकुलात प्रवेश सुद्धा देवू केला. शर्थ झाली हो अगदि!” एवढे बोलतानाही मंजुघोषाला चांगले चार पाच गचके आणि आवंढे गिळावे लागले. मग अगदी दमात घेतल्यासारखे मंजुघोषाने सरलकाकाला विचारले, “त्याचा तुझा संबंध तरी कसा आला?” त्याची नजर चुकवत सरलकाकाने चहाचा चौथा पेला रिकामा केला आणि आपटला.
“तो अरे... आपली ती ही रे... ती ही... त्या आपल्या गुंडीचा मित्र.”
“गुंडीचा मित्र. अस्स!” मंजुघोष जरी पक्षी होता तरी त्या अस्सं मध्ये बंडयाला शिष्ट माणसांचा तो विशिष्ट खवचट भाव अगदि हुबेहुब जाणवला. म्हणजे कावळयाच्या चोचीतून मेलेला उंदीर शेजार्याच्या अंगावर पडल्यावर एक माळकरी बुवा तुळशीमाळ ओढत नाक मुरडेल तस्सा !
त्याकडे दुर्लक्ष करून सरलकाकाने एका भिकार्याचे एकतारी वरले रडगाणे ऐकले आणि त्याला जवळ बोलावले. बंडयाच्या समोर बंडयाचा चहाचा अर्धा कप शिल्लक होता. सरलकाकाने तो उचलून घेऊन, त्या भिकार्याला मोठया प्रेमाने पाजला. भिकाजीबुवा नाव होते त्याचे. त्यानेच सांगितले. भिकाजीला समोरची बशीमधली उरलेली भिजलेली खारी देऊ केली. त्या खादयपदार्थांचा समाचार घेण्यात तो भिक्षेकरी बुवा दंग असताना त्याची एकतारी काढून आपल्या हातात घेतली. बंडया टक लावून सरलकाका एकतारीचे आता काय करतोय पाहत होता. सरलकाकाने भजीच्या कागदाचा तेलात न भिजलेला कपटा त्या तारेवर ठेवला. त्या कपटयावर चहात न भिजलेला खारीचा चुरा अगदि बारीक चुर्ण करून शिपडला. तारेवर एका ठिकाणी डाव्या हाताच्या बोटाने दाबून धरीत ती हलकेच तोलली.
“ओ” सरलकाका तोंडाने म्हणाला आणि त्याने कपटयाकडे बोट दाखविले. कपटयावरच्या खारीच्या चुर्याचे कोंडाळे झालेले. अगदि पहिल्या वाफेतून आकृती झाली होती तस्से. सरलकाकाने समजावले की कोणत्याही विशिष्ट आवाजाने कंपित केला तर त्या प्रत्येक आवाजानुसार ते हलके कण एक विशिष्ट आकृतीबंध तयार करतात. हीच झाली उच्चारलिपी. सरलकाका प्रत्येक उच्चाराचे आकृतीबंध तयार करून दाखवणार होता. बंडयाने आकृतीबंध ओळखायचा आणि त्याचा उच्चार लक्षात ठेवायचा. त्याचे ते बारा उच्चार कळले की झाले. म्हणजे गुपितही फुटायला नको. मग बंडया ध्यानपूर्वक पाहत राहिला. ते सगळे आकृतीबंध त्याला रोजच्या ओळखीतले वाटत होते. मधमाश्यांच्या पोळयासारखा षटकोनी, सापाच्या नागमोडी वळणाचा, वाघाच्या अंगावरील पट्टयांसारखा तर कधी अननसावरील काटयांसारखा. सरलकाका काय खुबीने एकतारा हाताळत होता. वाहवा!
बंडयाला त्याचे बारा उच्चार कळले एकदाचे. “ओ” ची जोडी “म” शी त्याने लगेच जोडली. ओ.म. पण बाकी सगळया अक्षरांचा क्रम उलटापालटा झालेला.
बंडयाच्या मनाला आता नवी उभारी, नवी तरारी आली. सरलकाकाने त्याला आणि एक गंमत सांगितली. जसा प्रत्येक आवाजाला एक आकार असतो तसा प्रत्येक आकाराला एक गंध. गोल कणांचा वास कापराप्रमाणे. चपटया चकतीवजा कणांना फुलांचा सुगंध. आणि सरलकाकाने न सांगताही बंडयाला आठवले. प्रत्येक गंधालाही एक त्याचा म्हणून स्पर्श असतो. बंडयाला मदत करणारा तो तरतरी आणणारा सुगंध आणि त्याचा आल्हाददायक स्पर्श आठवला. तो शाळेचा भासही आठवला. बंडयाची पूरेपूर खात्री होती, तो भास नव्हता. बंडया अगदि खरोखर त्याच्या शाळेत होता. त्याच्या बाकावरला शरद संत्र्याच्या वासाचे चिगम चघळत होता. बंडयाने तो वास बरोबर ओळखला होता. मध्येच शाळेसमोरच्या देवळीतली घंटा वाजलेलीही त्याने त्याच्या त्या अर्धजागृतीत ऐकली होती. त्या सर्व संवेदना, जाणीवा किती खर्या होत्या. बंडयाने तसं सरलकाकाला सांगितलं.
मंजुघोषाने बंडयाच्या म्हणण्याला दुजोरा दिला. बंडयाला प्रश्न पडला, असं कसं होऊ शकतं? साबरी जगात काहिही होऊ शकतं. मंजुघोषाने स्पष्टीकरण केले की साबरी आश्रमात जाण्यासाठी बंडयाच्या मनाची पूर्ण तयारी झाली नव्हती. खोलवर बंडयाच्या मनात भीती होती. त्याला त्याच्या नेहमीच्याच जगात परत जायचे होते. तिथेच कायमचे राहायचे होते. ते भास नव्हते. तीच त्याच्या मनाची परिक्षा होती. तो जर वेळीच सावध झाला नसता तर खरोखरच त्याच्या शाळेत, त्याच्या वर्गात नितिनबरोबर बसलेला असता. साबरी गुरूकुल, बारा अश्वत्थाचा पार आणि त्याविषयीच्या इतर गोष्टी कायमच्या बंडयाच्या मनातून पुसल्या गेल्या असत्या.
त्याचे मन ईतके सहज, उघड वाचू शकणार्या परीक्षकांविषयी बंडयाला मनोमन आनंद, आदर वाटला. साबरी गुरूकुल गूढ आणि रहस्यमय होते. पण ते क्रूर आणि धोकादायक नव्हते. बंडयाच्या मनात पुन्हा एक प्रश्न दाटला, “मग मला जागे करणारे कोण होते?”
“ज्या कोणाची तुला गुरूकुलात प्रवेश मिळावा अशी ईच्छा होती, असे कोणी.” मंजुघोषाने एका क्षणात उत्तर दिले.
“अं! म्हणजे सरलकाका?” बंडयाने बोट रोखत सरलकाकाला विचारले.
“कोण मी? मी नाही तर... मला कुठे जादू येते.” सरलकाकाने गडबडून साफ इन्कार केला.
“तुला येत असती तरी त्याचा उपयोग नव्हता. बारा अश्वथ्थापाशी इतर कोणत्याही मंत्रविदयेचा वा जादूतंत्राचा प्रभाव चालणार नाही.” मंजुघोषाने सरलकाकाला बजावले.
“म्हणजे मग गुंडी... ती सुद्धा नाही?” बंडया स्वतःशीच चुटपुटला.
“गुंडी तीला काय येते...” पुढे कप्पाळ शब्द म्हणणे मंजुघोषाच्या सभ्य भाषासंहितेत बसत नसावे. गुंडी ही फारशी लोकप्रिय व्यक्ति नव्हे. याची बंडयाने मनाशी खूणगाठ बांधली.
“अशी मदत करणे केवळ कोणा देवतुल्य शक्तिलाच शक्य आहे.” मंजुघोषाने वाक्य पुरे केले.
बंडयाचा श्वास वरचा वरच राहिला. त्याच्या नाकाला तो दिव्य सुगंध पुसटसा जाणवू लागला होता. बंडयाच्या समोरून बाबू त्यांचे चहाचे कप व बश्या जमा करत होता. हा? हा बाबू देवतातुल्य? छॅ छॅ. बंडयाला कसेसेच वाटले. जो चिखलात उतरून माश्यांसाठी किडे वेचत असतो तो? बाबू गटारवाला? बंडयाच्या मागाहून लक्षात आले, सुगंध बाबूला नव्हे त्याच्या गळयातल्या माळेला येत होता. जिचे मणी तो कप उचलायला त्यांच्यासमोर वाकल्यावर बंडयाच्या नाकाशी लगट करत होते. “हया माळेला तोच सुंगध आहे.” बंडया अचानक ओरडला.
बंडयाच्या ओरडण्यामुळे बाबू चपापून एकदम मागे हटला. चोरीचा आरोप झाला असल्यासारखी, बाबूने ती माळ घाईघाईने आपल्या फाटक्या बनियनच्या आत दडवली. या गडबडीत बाबूच्या हातातील एका कपाने दुसर्या कपावरून धसकन खाली उडी मारून आत्महत्या केली. त्या कपातील एक टोकदार कपचा सटकन उडून खाली बसलेल्या भिकाजी बुवाच्या बुटाला टचकन टोचला. भिकाजी बुवाचा बुडखा फटकन हलला आणि त्याच्या धक्कयाने, ते बसले होते त्या बाकडयाचा मोडका पाय कचकन मोडला. त्यामुळे बंडया टपरीवाल्यावर धपकन् पडला. टपरीवाल्याचा “आ” पटकन वासला. कारण त्याच्यापुढयातल्या गरम किटलीचा चटका त्याला चटकन लागला. ते बघून मंजुघोषाचा उघडा पिसारा गपकन मिटला आणि सरलकाका उठुन झटकन चालता बनला.
“ओ! ओ पावणं. ओ तुम्ही आधी बिलाचे पैसे देवू करा. ओ.” बेंबीच्या देठापासून टपरीवाल्याने पुकारा केला. गरगरणारे डोके सावरत उठणार्या बंडयाच्या पायाला परत एक मोठा झटका बसला. बंडयाच्या पायाला अडकून सरलकाकाला रोखण्यासाठी निघालेला टपरीवाला तोंडघशी आडवा झाला होता. काहीतरी आणीबाणी आहे, हे पाहून भिकाजीबुवा पळू पाहत होता. तो टपरीवाल्याच्या जाडजूड वजनाखाली चिरडला गेला. दुकानदारांच्या मुलांना असते त्या उपजत व्यवहार बुद्धिने बाबूने बंडयाच्या शर्टाची कॉलर मागुन खेचून घट्ट धरली. बाबूने बंडयाला ओलीस धरले आणि खुनशी नजरेने सरलकाकाकडे बघितले.
“मालक पैसे, मालक पैसे.” मंजुघोषाने बाबूच्या खांदयावर बसून उच्चारवाने सरलकाकाकडे आक्रोश केला. बंडयाला मंजूघोषाचा जाम राग आला. अशावेळी खरेतर त्याने बाबूचे डोळेच फोडायला हवे होते. तर उलट तो बाबूची बाजू घेऊन ओरडत होता. सरलकाकाच्या पायात जणू बेडी पडली.त्याने खिशात हात घालून त्यातून होती नव्हती तेवढी सगळी नाणी बाहेर काढली. बाबूच्या दिशेने उधळली.
ती मातीत पडलेली नाणी बघून बाबूने घसा खरवडून थुंकी काढली. सरलकाकाच्या दिशेने बघून तो पचकन थुंकला. ती थुंकी नेमकी भिकाजीवर पडताच आडवा झालेला भिकाजी चवताळून उठला. गरिबाला बी मान असतू. होता नव्हता तो जोर लावून टपरीवाल्याच्या शरीराखालून भिकाजी बाहेर आला. त्याने बाबूला एक ठोसा चढवून दिला. त्यामुळे बाबूची बंडयाच्या गचांडीवरील पकड ढिली झाली. बंडया एक जोरदार हिसडा मारून बाबूच्या तावडीतून सुटला. सुटका होताच सरलकाकाच्या दिशेने पळाला. टपरीवाल्याचे डोके आणि शरीर एव्हाना ठिकाणावर आले होते. त्याने एक खाशी कबड्डीतली पेचदार तंगडी भिकाजीच्या तंगडीवर फिरवून हाणली. गरिबांना बिचार्यांना पेच - डावपेच कुठले माहित असायला. भिकाजी दाणदिशी परत खाली आपटला. बाबू मोकळा झाला.
“त्या पोरटयाले पकड जा आधी.” पडलेल्या भिकाजीच्या छाताडावर स्वारी करत, भिकाजीला परत एकदा वजनाखाली चेचून टाकत, सेनापतीच्या थाटात, सगळी सुत्रे हातात घेत, टपरीवाल्याने चढाईचा हुकूम सोडला.
“जी हुजूर” म्हणून कुर्निसात करून अदबीचे दरबारी रितीरिवाज पाळायची ही वेळ नव्हती. वेळेला किंमत होती. कमीत कमी दोनशे रूपये तरी नक्की. बाबू थेट मोहीमेवर रवाना झाला. बाबूच्या कानात जणू रणशिंगे आणि तुतार्या वाजत होत्या.
इतक्या नाट्यमय घटना समोर घडत असताना आजूबाजूचा दर्दी माहौल बेपर्वा राहिला नव्हता. श्यामरावाने पानपट्टीवाल्या राघवच्या पाठीत स्फुरण चढून एक जोरकस थाप हाणून दिली होती. त्यामुळे राघवच्या हातातील अडकित्ता पुढे सरकून सुपारीऐवजी त्याचे बोट कातरले गेले आणि एक जोरदार बोंब बाबूच्या कानापर्यंत आली. बाबूला ती आरोळी म्हणजे, “सैनिक हो व्हा पुढे आमी मागं मागं येतोच.” असे प्रोत्साहन वाटले. तर दाजी किराणामालवाला त्याच्या अक्कडबाज मिशावाल्या पाटील गिर्हाईकाशी, कोण कोणाला भारी जाणार यावर पाच रूपयाची पैजही लावून मोकळा झाला होता. सदू न्हाव्याने गिर्हाईकाच्या दाढीऐवजी मिशीचा टवका उडवला होता. तर सगुणा भाजीवालीने तागडीत मापलेली भाजी खाली उपडी केली आणि वजनाचे माप शांताबाईच्या पिशवीत घातले. कोणाचे काय आणि कोणाचे काय. एवढया धामधुमीत मंजुघोष शांतपणे एक एक नाणे चोचीने जमवून आणत होता. त्या नाण्याचा टपरीवाल्याच्या हातावर ढिग झाला.
“हे पाचाचं तीन न रूपयाचं दोन. ते दोन रूपयाचं चार. पंधरा न् दोन, सतरा न् आठ, पंचवीस.” टपरीवाल्याने हिशेब केला. मग मंजुघोषाकडे बघून म्हणाला, “नाय जमायचं बघ लेकरा, धा चाचंच तीस रूपये होतात. तीन डझन खारीचे अजून तीस रूपये, भजीचे आणखीन वीस. बिलाचं झालं ऐंशी, त्यात कपाचे अन् बाकडे मोडल्याचे घाल शे-पाच. दोनशे तरी होतात. जा तुझ्या मालकाकडं अन घेवून ये.” आता टपरीवाल्याने पाखराच्या मालकाकडे नजर टाकली. समोरचे दृश्य बघून त्याच्या काळजाचा ठोका चुकला. बंडयाला बाबूने पकडण्यापेक्षा, बाबूला सरलकाकाने पकडले होते आणि बंडया बाबूला आडून आडून ठोसे लगावत होता.
पानपट्टीवाल्या राघवने श्यामरावाला दणकेबाज थाप परत करत म्हटले, “काय राव हाय का नाय बिलामत?” तर पाटील गिर्हाईकाने गुमान पाच रूपयाचे नाणे काढून दाजी दुकानदाराच्या हातात ठेवले. सदू न्हावी त्याच्या गिर्हाईकाने उठून वस्तरा हातात घेताच नाहीसा झाला आणि शांताबाईने माप पिशवीतून काढून सगुणेवर फेकले. सगुणाबाईने डोके कलते करून नेम चुकविला. ते माप सरळ भिकाजीच्या चेहर्यासमोर डबके होते त्यात येऊन पडले. त्यातला बराचसा चिखल भिकाजीच्या चेहर्यावर माखला. त्यामुळे तो गुदमरला. तरी छातीवरचे प्रचंड वजन दूर करणे त्याच्या हाताबाहेर होते. गरीबाला या जगात कुण्णी वाली नाही हेच खरे!
पोटच्या लेकराचे हाल पाहताच मानलेल्या लेकरावरची उपरी माया लगेच उडाली. टपरीवाल्याने तिरीमिरीने मंजुघोषाचे पंख उपटले आणि डाव्या हाताने मंजुघोषाची मान आवळत तो गरजला, “अरे ए भुस्काट, सोड माझ्या पोराला का आवळू मुंडी तुझ्या पोपटाची.” ते घोर दृश्य पाहताच सरलकाकाचे अवसान संपले. त्याने बाबूला सोडून दिले. बंडयाकडे एक हिंस्र नजर टाकत बाबूने पाहून घेईन सुचविले. बंडयानेही उर्मट नजरेने केस झटकत बाबूला, जा पाहून घे सुचविले.
“बाबू त्याच्याकडून उरलेले पावणेदोनशे रुपये घेवून ये.” टपरीवाल्या सेनापतीने त्याच्या पायदळाला फर्माविले. सरलकाकाने सदर्याचे दोन्ही खिसे उलटे करून दाखवले. काही नाही.
“आता तुझ्या...” दात ओठ खात टपरीवाल्याने रागाने एकदम मंजुघोषाची मुंडी मुरगळायला घेतली आणि काय की काय? त्याचे मन परत फिरले. हे असं राजस, देखणं पाखरू कुठे आणि शे-दोनशे रूपडे कुठे? पैशासाठी असं गुणाचं पाखरू मारायचं? न्हाय न्हाय. मग करायचं तरी काय? त्याच्या बुडाखाली चेपलेल्या भिकाजीच्या पोतेर्याने थोडी चुळबुळ केली. तसा टपरीवाल्याने रागाचा सगळा दणका भिकाजीच्या डोक्यावर मूठ आदळत काढला. गरीबालाच सगळीकडून मार.
“जोपर्यंत तू माझे बुडवलेले पैसे परत आणून देत नाय तोपर्यंत हे पाखरू माझ्या ताब्यात राहिल. दोन दिसाच्या आत पैसे दे नायतर हे पाखरू माझं.” टपरीवाल्याने तोड काढली. बाबू आनंदाची एक आरोळी ठोकत बापाकडे धावला.
बंडया - गुंडी - ५ ( story )
Submitted by Pritam19 on 11 August, 2016 - 15:56
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे नाय नाय म्हणता काय तो
अरे नाय नाय म्हणता काय तो गोंधळ....वाह...छान अहे...काही काही ठिकाणी चुका आहेत...दुरुस्त केल्या तर सोन्याहुन पिवळं...
छान चललिये हो गोश्ट येउद्या
छान चललिये हो गोश्ट येउद्या पुढचा भाग लवकर
Chan aahe.
Chan aahe.
वाचतेय. छान आहे हा पण भाग
वाचतेय. छान आहे हा पण भाग