ह्या आधीचे..........
राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो।...... भाग १ प्रवेश.
राजाराम सीताराम....... भाग २... पुढचे चार दिवस.
राजाराम सीताराम....... भाग ३... सुरवातीचे दिवस – भाग १.
राजाराम सीताराम....... भाग ४... सुरवातीचे दिवस – भाग २.
राजाराम सीताराम....... भाग ५... आयएमएतले दिवस.
राजाराम सीताराम....... भाग ६... मसुरी नाइट.
राजाराम सीताराम....... भाग ७… ड्रिलस्क्वेअर.
राजाराम सीताराम....... भाग ८....शिक्षा.
राजाराम सीताराम....... भाग ९....एक गोली एक दुश्मन।.... भाग १.
राजाराम सीताराम....... भाग १०. .एक गोली एक दुश्मन।.... भाग २.
राजाराम सीताराम....... भाग ११. .पिटी परेड.
राजाराम सीताराम....... भाग १२...कॅंपलाइफ.
राजाराम सीताराम....... भाग १३. .विस्थापित काश्मिरी हिंदू, सुनील खेर
राजाराम सीताराम....... भाग १४…मुठी शिबिर.
राजाराम सीताराम........भाग १५...सुट्टीसाठी आतूर.
राजाराम सीताराम........भाग १६...आस्थेचे बंध.
राजाराम सीताराम........भाग १७....मुंबईचा मित्र.
राजाराम सीताराम........भाग १८.....शेवटचे काही दिवस
……… ह्याच सुमारास आम्हाला आर्मीतल्या वेगवेगळ्या आर्मस् बद्दल माहिती द्यायला सुरवात झाली. फायटिंग आर्मस् कोणत्या त्या सांगितल्या व आम्हाला निवड करायला सांगितली. आम्ही प्रत्येकाने आम्हाला आवडणाऱ्या आर्मस् साठी अर्ज केले. अमितचा पेरंटेल क्लेम होता त्याने त्याच्या वडलांची युनिट मिळावी असा अर्ज केला. आर्मी मध्ये पेरंटेल क्लेमला खूप महत्त्व आहे. त्यामुळे त्याला ती मिळणार हे जवजवळ निश्तितच होते. पेरंटेल क्लेम मुळे रेजीमेंटबद्दलची आस्था धृढ होत जाते. आपले वडील ह्याच पलटनीत होते. ह्यातल्या जवानांबरोबर आपण लहानपणी खेळलो असल्या कारणाने आपण सगळ्यांना ओळखतो. अशा पलटनीत जाणे म्हणजे आपल्या घरीच जाण्यासारखे वाटते.
धुंद येथमी स्वैर झोकितो मद्याचे प्याले
पासिंग आऊट परेड (पिओपी) ची तारीख जशी जशी जवळ येऊ लागली तसतशी आमच्या वरची बंधने हळू हळू शिथिल होऊ लागली. वेळापत्रकात जास्त तास मोकळे मिळायला लागले. आमच्या सर्वांची त्या तासांमध्ये आयएमएच्या शॉपिंग सेंटरला जाऊन पिओपीची तयारी सुरू झाली. कमिशन मिळताना व पिओपिच्या परेडसाठी घालायचा नवा गणवेश तयार करायचा............. हे चालू असताना आम्हा जंटलमन कॅडेट्सना पिओपीपुर्व पार्टीचे आमंत्रण आले. आर्मी मधली आमची पहिली पार्टी. पार्टी नव्हतीच तो कोर्स संपण्या प्रीत्यर्थ कोर्स एंडिंग बॉल होता. केवढे कुतूहल. काय कल्पना की पुढे २० वर्षांच्या सैन्य सेवेत शेकडो वेगवेगळ्या पार्ट्या दिल्या, घेतल्या जाव्या लागणार आहेत म्हणून. तसे नाही म्हणायला ही काही पहिलीच पार्टी नव्हती. ह्या आधी पण पार्ट्या व्हायच्या पण सीनियर्सच हुकमावर. आयएमेत गेल्या गेल्या काहीच दिवसाने कंपनी सोशल झाले. त्यात प्रत्येकाने आपआपले गुण दाखवले. कोणी गाणे, कोणी स्टॅन्ड अप कॉमेडी शो करून दाखवला होता, कोणी इलेक्ट्रिक गिटारावरचे त्याचे कौशल्य पणाला लावले होते, तर कोणी सीनियर्सवर विडंबनात्मक छोटे नाटक बसवले होते. पण हे सगळे एकदम शिस्तीत. अमक्या वेळेला कार्यक्रम सुरू म्हणजे सुरू. एक तासाचा म्हणजे एक तासाचा. जर जास्त वेळ लागायला लागला तर आईनवेळी काही कार्यक्रमात काटछाट. वेळेचे भान ठेवणे जास्त महत्त्वाचे. त्यामुळे साहजिकच बऱ्याच वेळेला कार्यक्रमाची मजा कमी व्हायची. कोठचाही सर्जनशील कार्यक्रम जर वेळेच्या पिंजऱ्यात बांधला गेला तर सर्जनशीलता संपते. कार्यक्रमात आताच कोठे रंग चढायला लागलेला असायचा पण वेळ संपत आली म्हणून कोणाचे तरी गायन, कोणाचे तरी व्हायोलिन वादन, कोणाचे तरी नाटक असे रद्द करावे लागायचे व पटकन समारोप करून पुढच्या आयएमएतल्या शिस्तबद्ध कार्यक्रमाला हजर राहावे लागायचे. ह्या बॉलसाठी आम्ही व्यवस्थित तयार होऊन कोट, टाय, जोडे घालून ओल्ड स्पाईसचे आफ्टर शेव लावून बॉलला हजर झालो. अमित वर्माने त्याला माहीत असलेल्या ब्रिगेडियर शहाच्या मुलीला त्याच्याकडून आमंत्रण दिले होते. पार्टी मध्ये सगळे झकपक पोषाखात आले होते. पुरुष सूट बूट कोटात व त्यांच्या बायका छान छान साड्यांमध्ये. अत्तराचे भपके येत होते. त्यांची कॉलेजातली मुले व मुली वयापरत्वे व सध्याच्या फॅशन प्रमाणे अद्ययावत कपडे घातलेली अशी हजर होती.
तसे प्रत्येक पार्टीला मुलांचे येणे होत नाही. काहीच सोशल इंटरऍक्शन्स मध्ये त्यांना येता येते. बॉल हा त्यातलाच एक प्रकार. काही पार्ट्या ह्या फारच ऑफिशियल असतात. अशा पार्ट्यांना फक्त आधिकारी आणि त्याची बायको येते. मुलांना घरी ठेवावे लागते. त्यांची लुडबूड ऑफिसर्स मेस मध्ये नको म्हणून. अशा पार्ट्या साधारण कोण्या अधीकाऱ्याची बदली किंवा कोणत्या युनिट मध्ये बदलीहून आलेल्या आधिकाऱ्याचे स्वागत करण्यासाठी आयोजल्या जातात. ह्या पार्ट्या जास्त वेळे चालत नाहीत. 45 मिनटात सूप दिले जाते व मग जेवण. जेवणानंतर कमांडींग ऑफिसर कडून बदलीहून जाणाऱ्या आधिकाऱ्या बद्दल चांगले चुंगले बोलले जाते.
ह्या बॉलसाठी आम्ही जिसीज तयार होऊन दिलेल्या वेळेच्या आधीच ऑफिसर मेसच्या मुख्य खोलीत हजर राहिलो. ऑफिसर मेसच्या मेन हॉलला एन्टेरुम असे नाव असते. सरंजामी थाटाचा तो हॉल, प्रत्येक युनिटचे भूषणं असते. वेगवेगळ्या पद्धतीने तो हॉल सजवलेला असतो. काही काही युनिट्स खूप जुन्या इंग्रजांवेळच्या आहेत. त्यामुळे अशा युनिटच्या एन्टेरुमच्या सजावटीत त्या त्या युनिटच्या इतिहासाचे प्रतिबिंब दिसते. बऱ्याच वेळेला झालेली युद्ध, पकडलेले ध्वज, मारलेले प्राण्यांची तोंडे, किंवा युद्धाची तैलचित्रे असतात. अधिकाऱ्यांनी मेस ला दिलेल्या चांदीच्या ट्रॉफीज असतात. उंची गालिचे व सोफासेटने ती एन्टीरुम सजवलेली असते. कर्णमधुर संगीत, झकपक अधिकारी व त्याहीपेक्षा सजलेल्या त्यांच्या बायकांच्या परफ्यूम्सचा सुटलेला घमघमाट एक आगळीच धूंदी चढवून देतो.
त्यातच तरुण वयाची आम्ही पोरं, एक नजर आलेल्या मुलींवर होती. गमतीने आम्ही त्यांना SODA - सीनियर ऑफिसरर्स डॉटरर्स असोशिएशन असे संबोधायचो. म्हणतातना - एका लग्नात अनेक लग्न जुळतात तसेच आहे हे. जिसी अमित वर्माने बोलावलेल्या व आलेल्या ब्रिगेडियरच्या छान मुली बरोबर त्याचे बोलणे व वागणे आमच्या तिरक्या नजरेतून सुटत नव्हते. मधून मधून सगळ्यांच्या नजरा हॉलच्या मुख्य दरवाज्यावर लागलेल्या होत्या. ठरवून दिलेल्या वेळेला आयएमएचा कमांडंट येतो. आर्मी मध्ये सीनियर ज्युनिअरचे फार असते. सीनियर आल्यावर ज्युनिअर लागलीच उभे राहतात. त्यांना अभिवादन करतात. बायका सगळ्यात सीनयर मानल्या जातात. त्यामुळे कमांडंट आला तसे सगळे आधिकारी उभे राहिले होते, पण बायका बसून होत्या. लेफ्टनंटच्या बायकोला सुद्धा सीनियर आधिकारी अभिवादन करतात व ती जो पर्यंत बसत नाही तो पर्यंत तो बसत नाही. आता पार्टीला रंग चढायला लागला होता. पार्टीतले वातावरण स्वैर असलेतरी कोठलाही स्वैराचार नव्हता. मद्यपान हा टाबू मानला जात नाही येथे व – “बसुयाना एकदा प्यायला”- अशा पद्धतीची वाक्य ऐकायला मिळत नाहीत. ज्यांना मद्य प्यायची असेल ते बार मध्ये जाऊन मद्य पितात. लपून छपून नाही तर चार चौघात मिळून मिसळून. येथे काही ओढून ताणून केल्या सारखे वाटत नाही. मेस मध्ये फक्त आधिकारी वर्ग व त्यांच्या बायका मुले येऊ शकतात. त्यामुळे आधिकारी मद्य व त्यांच्या बायका मॉकटेलस् किंवा फृटज्यूसचे झोके घेतात. हे सगळे होत असताना आपण कोठे थांबायचे हे सर्वजण जाणत असल्यामुळे, मद्य पिऊन कधी तमाशा झालेला माझ्या ऐकिवात नाही. मुलींना व मुलांना कोणचे तरी फ्रूट ज्यूस देण्यात येते. मंद संगीत चाललेले असतानाच कोणी तरुण बॅचलर कोण्या लेडी वाइफला नृत्य करण्यासाठी विनंती करतो. तरुण लेफ्टनंट कॅप्टन बॅचलरने विनंती करायची व लेडीवाईफनी स्वीकारायची हा एक आर्मी कल्चरचा भाग आहे. मग मंद धुनांवर ते इंग्रजी थाटाचे नृत्य सुरू होते. हळू हळू बाकीची लोक नृत्यामध्ये शामिल होतात व सुंदर वातावरण तयार होते. मध्येच कोणी सीनियर नुसताच उभ्या असलेल्या एका बॅचलरला म्हणतोकी – व्हाय आर यू स्टॅन्डींग अलोन, गेट डान्सिंग. काही अधिकारी आपआपल्या बायकांबरोबर नृत्यात मग्न होतात. बॅचलर्सना सीनियर ऑफिसरर्सच्या बायकांबरोबर नाचायचे प्रिव्हिलेज असते. अमित आपल्या आमंत्रित केलेल्या मुलीबरोबर पाश्चिमात्य पद्धतीचे नृत्य करण्यात गुंग झालेला आम्ही पाहिला. अमित छान नृत्य करायचा – आम्ही आपले उगाचच नृत्यवजा कवायत करत त्या मंद धुनेचा अपमान करत होतो. आम्हाला एवढ्याचेच अप्रूप वाटत होते की आज कोणीतरी आपल्या बरोबर नाचताय. मी जाऊन आमच्या खूंकार डिएसच्या बायकोला विनंती केली
– मॅम, मे आय रीक्वेस्ट यू टू जॉईन मी फॉर ए डान्स.
– ओ शुअर असे म्हणत तिने आपल्या साडीचा पदर खोचला व सोफ्यावरून उठली.
मग मी तिला एस्कॉर्ट करत डान्स फ्लोअरवर घऊन आलो... पुढची पंधरा मिनिटे मी कवायत करत होतो व ती गाण्याच्या धुनेवर हळुवारपणे ठेकाधरुन नाचल्यासारखी करत होती. धून संपली, दुसरी सुरू होण्यामध्ये थोडा विराम होता. धून थांबल्या थांबल्या सगळ्या नृत्य करणाऱ्यांनी व बघ्यांनी टाळ्या वाजवून संपलेल्या धुनेचे आभार मानले. माझा नाच संपला होता. मी परत एस्कॉर्ट करत डिएसच्या बायकोला तिच्या जागे पर्यंत नेऊन सोडले. थॅन्क्यु मॅम म्हणत तिचे आभार मानले. तिने अदबीने यू आर वेलकम म्हटले.
आज आम्हाला बियर प्यायची परवानगी होती. त्यामुळे तर त्या पार्टीचे फारच अप्रूप. एक तास भर हा नृत्याचा कार्यक्रम झाला. आम्ही नेत्रसुख जेवढे घेता येईल तेवढे घेतले. अमित पूर्णं तासभर त्याच्या मैत्रिणी बरोबर नाचला. दोघांची जोडीपण पहाणाऱ्याला चांगली वाटत होती. धून संपली तसा मेस हवालदार संचलन करत आपल्या पूर्णं पोषाखात ब्रिगेडियर धिंग्रा जो मेसच्या प्रेसिडंट मेस कमिटीचा चेअरमन होता त्याच्या समोर दहा फुटांवर सावधान करून सॅल्यूट मारून आपल्या खड्या आवाजात म्हणाला
– श्रीमान. भोजन प्रस्तुत है।
सगळे आधिकारी हे होताना सावधान मध्ये उभे राहिले होते. बायका बसल्या होत्या. असे म्हटल्या बरोबर अधिकाऱ्यांच्या बायका हळूहळू डायनिंग हॉलकडे चालायला लागल्या. त्यांना एस्कॉर्ट करायला कर्नल शेखावत जो मेस सेक्रेटरी होता तो पुढे झाला. जेवण बुफे पद्धतीचे होते. आम्हा जिसीज् ना माहिती होते की बुफे पद्धतीच्या जेवणात सिनीयॉरीटी प्रमाणे जेवण मिळते. पहिल्यांदा लेडीज, मग मुले मग सीनियर ऑफिसर्स. त्यामुळे आम्हाला जेवण मिळे पर्यंत, केलेल्या चिकनच्या फक्त मानाच शिल्लक राहिल्या होत्या. पुढे बरीच वर्षे अशा पार्ट्यांमध्ये आम्ही चिकनच्या फक्त मानाच खाल्ल्या आहेत व चिकनला फक्त मानच असते अशी धारणा होऊन बसली होती. कारण युनिट मध्ये गेलो तरी आम्हा ज्युनियर्सचा नंबर लागे पर्यंत मानाच तेवढ्या उरलेल्या असायच्या. जेवण छान असून आम्हाला त्यात स्वारस्य नव्हते. एक तर इतक्या महिन्यांनी छान छान मुली बघत होतो त्यामुळे मन विचलित होऊन जेवणात लक्ष नव्हते व दुसरे म्हणजे जेवण सुरू झाले म्हणजे आता ही पार्टी संपणार होती व उद्या पासून पुन्हा आयएमएचा कार्यक्रम सुरू होणार होता.
जेवण झाले. जेवणा नंतरची स्विट डिश – डेसर्ट खाऊन झाले व त्यानंतर लागलीचच सगळ्यांना थॅन्क्यू म्हणून कमांडंट आपल्या गाडीतून निघून गेला. गेल्या बरोबर पार्टी संपली व आपापल्या सिनियॉरीटी अनुसार एकेक अधिकारी निघून गेला. पिएमसी ब्रिगेडियर धिंग्रा ने जायच्या आधी मुदपाकखान्यात जाऊन सगळ्या आचाऱ्यांचे, मसालच्यांचे व मदतनिसांचे आभार मानले. जाताना आमच्या कडे बघून म्हणाला
– यू क्लाऊन्स् . इनफ ऑफ रेवेलरी नाऊ विदाऊट वेस्टींग टाइम, गो टू युअर बरॅक्स ऍड स्लिप.
डिनर नाइट हे एकदम फॉर्मल असते. डिनर नाइटचा पोषाख असतो. तो वेगवेगळ्या रेजीमेंट्सचा वेगवेगळा असतो. त्यांच्या त्यांच्या प्रथा, इतिहासानुसार. समर युनिफॉर्म मध्ये हाफ पांढरा शर्ट, काळी पॅन्ट व कमरबंध. कमरबंधांचे डिझाइन युनिटांच्या रूढीवर अवलंबून असते. पोषाखावर नाव व रिबन्स लावायचे असतात. विंटर युनिफॉर्म बंद गळ्याचा जोधपुरी व खाली काळी पॅन्ट असते. डिनर नाइट्स मध्ये साधारणपणे नुसतेच अधिकारी असतात. क्वचित बायकांना पण बोलावणे असते कधी कधी जेव्हा भारताचा राष्ट्रपती येणार असेल तर. मिलिटरी बॅन्डच्या धुनांवर सगळे शिस्तबद्ध पद्धतीने चाललेले असते. साधारण 45 मिनटे एन्टेरुम मध्ये गप्पा, स्नॅक्स आणि ड्रिंक्स. जेव्हा जेवणाचा रिपोर्ट मिळतो तेव्हा आत डायनिंग हॉल मध्ये मोठ्या सरंजामशाही लाकडी टेबल व खुर्च्यांवर आधीच ठरलेल्या जागी बसायचे असते. टेबल लांब असते व एका टोकाला कमान अधिकारी जो युनिटाच्या सर्वेसर्वा असतो व दुसऱ्या टोकाला सगळ्यात ज्युनियर ऑफिसरने बसायचा प्रघात आहे. बाकी अधिकारी ठरवून दिलेल्या जागी बसतात. बाहेर मिलिटरी बॅन्ड धून वाजवतो व त्या तालावर सूप वाढले जाते. सगळ्यांना वाढल्यावरच कमान अधिकारी सूप सुरू करतो. बाकीचे लागलीच सुरू करतात. सूप किंवा पुढे कोणचाही कोर्स खाताना सतत डोळ्याच्या कोपऱ्यातून कमानअधिकाऱ्यावर लक्ष ठेवावे लागते त्यामुळे जेवणाऱ्यांची नजर कमानअधिकाऱ्यावर सतत असते. त्याने जेवणाचा कोर्स सुरू केल्या शिवाय कोणी जेवायला सुरुवात करत नाही व त्याने सूप संपवून सुपाचे बौल क्लोज केले म्हणजे बाकीचे त्याचे अनुसरण करतात. सूप संपल्याबरोबर बॅन्ड वाजायला लागतो व वेटर्स पहिला कोर्स उचलायला लागतात. पहिला कोर्स उचलल्या बरोबर दुसरा मेन कोर्स लावायला लागतात. हे करताना सगळ्या मध्ये यंत्रासारखी शिस्त जोपासली जाते. ज्या वेळेला अलीकडचा वेटर प्लेट ठेवेल त्याच वेळेला पलीकडचा समोरच्या अधिकाऱ्या समोर प्लेट लावतो. मेन कोर्स झाला की डेसर्ट. डेसर्ट संपल्यावर व डिशेस काढल्यावर कॉफी व चॉकलेट्स दिले जातात. त्या वेळेला कोणाला सिगारेट फुंकायची असेल तर फुंकू शकतात. हे सगळे झाले की प्रसिडेंट साठी टोस्टचा कार्यक्रम होतो. त्यासाठी वेटर रिकामे छोटे वाइन ग्लासेस सगळ्यांच्या पुढ्यात ठेवतात. मग वाइनच्या कॅन्टर मधले वाइन वा पाणी प्रत्येक अधिकारी आपल्या वाइन ग्लासा मध्ये ओततो व कॅन्टर हळूच पुढे सरकवत जवळच्या अधिकाऱ्याला देतो. उजवीकडून डावीकडे व डावीकडून उजवीकडे अशी सर्वांनी वाइन आपल्या वाइन ग्लासात ओतली की मग कमानअधिकारी आपल्या जागेवर उभा राहतो व जजकडे कशी हातोडी असते तशी त्याच्या समोर ठेवलेली असते तिने तो टेबलावर हळूच टोले देतो तसे सर्व शांत होतात मग तो उठून उभा राहतो व एका हातात भरलेला वाइनचा ग्लास घेऊन म्हणतो --- जंटलमन मिस्टर वाईस. त्या वेळेला सगळे उभे राहतात व जो सगळ्यात कनिष्ठ अधिकारी असतो तो म्हणतो जंटलमन द प्रेसिडेंट. सगळे अधिकारी मग ग्लास हातात घेऊन उभे उभे हात उंच करत म्हणतात – फॉर द प्रेसिडेंट व एका घोटात ते ओतलेले पाणी पिऊन टाकतात. त्याच वेळेला बाहेर मिलिटरी बॅन्ड आपले राष्ट्रगीत वाजवायला लागतात. पूर्वी इंग्रजांच्या वेळेला प्रेसिडेंट ऐवजी इंग्लंडच्या राज्याच्या स्वास्थ्यासाठी टोस्ट करत असत व पाण्या ऐवजी वाइन असायची, राष्ट्रगीता ऐवजी गॉड सेव्ह द क्वीन किंवा किंग हे त्यांचे राष्ट्रगीत असायचे. ह्या सगळ्या मध्ये मेस हवालदार लांबवर उभे राहून नजर ठेवून सगळे नीट चालले आहे ह्याची खात्री करत असतो. तोच वेटर्सना सांभाळतो व पुढे काय करायचे ते डोळ्यांच्या इशाऱ्याने दर्शवतो. मेस हवालदार बॅन्ड कधी धून वाजवणार व थांबवणार हेही ठरवतो. त्यामुळे जर का हे सगळे दृश्य कोणी लांबून पाहिले तर त्याला अगदी इतके छान चित्र दिसते की बघणारा एकदम भारावून जातो. प्रत्येक अधिकारी काटे सुरे वापरण्यात अगदी तरबेज असतात. मला माझे लहानपण आठवले. घरी खाली बसून हाताने कढी भात कालवून जेवणारे आम्ही, जेवायच्या आधी वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे। सहज हवन होते नाम घेता फुकाचे। ......... म्हटल्या शिवाय न जेवणारे आम्ही व आता तिथे बसून प्रेसिडेंटला टोस्ट देणारे आम्ही. जेव्हा आई भाजी नेहमी पानात उजवीकडेच वाढायची किंवा चटणी, पापड मिठाला पानात ठरलेल्या जागा आहेत ह्याचा आग्रह धरायची तेव्हा आम्हाला राग येई. आम्ही कधीतरी म्हणायचो, आई तू फारच करतेस, काय होईल जर भाजी उजवी कडच्या ऐवजी पानात डावीकडे वाढली तर. काय होईल मीठ किंवा चटणी पानात वाटेल तिथे वाढले तर. आई खूपदा समजवायचा प्रयत्न करायची की प्रत्येक गोष्टीला आपआपली जागा असते. ती त्याच जागी शोभून दिसते. प्रत्येक पद्धतीला काही कारणे असतात. काही रुढी व प्रथा अशाच घडत जातात व त्या सांभाळल्या की जवळच्या माणसा माणसात एकसंधपणा येतो. अशाच छोट्या छोट्या चांगल्या सवयीने मग माणूस ओळखला जातो. अशाच प्रघाताने एक संस्कृती बनते. प्रत्येक रुढी किंवा प्रथा घडण्या पाठीमागे एक कारण असते. अशा प्रथा देश, काल पात्राच्या चौकटीत बसवून राबवायला काहीच हरकत नसते. समाजाला स्वतःचे अस्तित्व येते. त्या वेळेला ह्या सगळ्या रूढींचा राग यायचा कारण मागची पिढी ही रुढी, परंपरा व प्रथा सांभाळणारी धार्मिक, देव देव करणारे, जात्यंध व अंधश्रद्धा जोपासणारी आहे असा आम्हा कॉलेजातील मुलांचा समज असायचा व त्याच चश्म्यातून आम्ही पाहायचो. आम्हाला आई रूढिवादी वाटायची व त्याच्या विरुद्ध पेटून उठायचो. आता इतक्या वर्षाने कळले की इंग्रजांमध्ये व पश्चिम देशात सुद्धा अशा रुढी, परंपरा व प्रघात आहेत. कशा नंतर काय खायचे. काटे चमचे कोठे लावायचे. काटा डाव्या हातात धरायचा सुरी कधी तोंडात घालायची नाही व उजव्या हातातच धरायची. काटा चमचा सुरी प्लेट मध्ये सरळ ठेवले म्हणजे प्लेट बंद केली असे वेटरला सुचवले जाते व तो काढायला मोकळा होतो. काटा चमचा एकमेकांवर फुली सारखे लावले की प्लेट मधून अजून खात आहे बोलायला मध्ये विराम घेतला आहे हे कळते. आयएमएत आईला विचारले तसे उलट प्रश्न न करता शिष्टाचार म्हणून शिकलो व आत्मसात केले. तेथे असे प्रश्न विचारले असते तर जेवण बंद होऊन तेथेच रोलिंग सुरू झाले असते. आई बिचारी आमच्या उलट प्रश्नांना उत्तर देत बसायची व आम्ही अजून चिडवायचो. आता आई नाही पण छोट्या छोट्या गोष्टींबद्दल आईला त्रास दिला त्याचे वाईट वाटते. आई परत आली तर दंडवत घालून तिला सांगेन की ती किती बरोबर होती ते. प्रत्येक जीवनशैलीत असे काही प्रघात हळू हळू तयार होतात. त्यात कमीपणा व लाज वाटून घ्यायचे काही कारण नाही. म्हणूनच भारतीय पद्धतीने जेवताना पाटावर बसून हाताने जेवण ओरपताना लाज वाटायची गरज नाही व इंग्रजी पद्धतीने जेवताना फार काही कौतुकाची गोष्ट आहे असे वाटायची पण गरज नाही. त्यांची ती शैली आहे आता आपण अनुकरण करत आहोत एवढंच. दोन्ही आपआपल्या परीने विकसित झालेल्या शैली आहेत, त्यांतूनच शिष्टाचार उत्पन्न होतो. इंग्रजांचा शिष्टाचार आत्मसात केला म्हणून आपल्या शिष्टाचाराचा तिरस्कार करून काही साधणार नाही. जे सोपे आहे, स्वच्छ आहे व परिस्थितिजन्य आहे ते आपले मानावे. पण म्हणून आपल्या वाडवडलांच्या सवयींना बोटं दाखवूनये ह्याचे तारतम्य आपल्या पिढीला शिकावे लागेल असे वाटते.
पार्टीचे हेच दोन प्रकार सैन्यात कमी अधिक प्रमाणात अधीकारीगण वापरतात. मग युनिट मधला एक ऑफिसर दुसऱ्याला मेजवानीला बोलवतो, घरी किंवा ऑफिसर मेस मध्ये. मेजवानीला बोलावले म्हणजे साधारण पहिला तास ड्रिंक्स व स्नॅक्स बरोबर बोलता बोलता संपतो व बाकीचे बोलणे पुढे जेवताना होते. युनिट मध्ये असलेले, लग्न न झालेल्या ज्युनियर ऑफिसरर्सचा हक्क असतो की त्याला मनात येईल तेव्हा कधीही तो लग्न झालेल्या सीनियर ऑफिसरच्या घरी कॉलऑन करू शकतो. असा कॉलऑन साधारण एक तासाचा असतो व ड्रिंक व स्नॅक्स बरोबर संपतो.
सैन्यातले वातावरण एकाच वेळेला ऑफिशियल व त्याच वेळेला मनमोकळेपणाचे असते. मग जर कधी कमानअधीकाऱ्याने सकाळी ऑफिसात कोण्या कनिष्ठ अधिकाऱ्याची झाड लावली तर दुपारच्या वेळेला त्या झाड पडलेल्या आधिकाऱ्याकडे कमानअधीकाऱ्याकडून निरोप येतो व संध्याकाळी ड्रिंक्स व स्नॅक्ससाठी बोलावले जाते. जो टेन्शन देतो तोच ज्याला दिले त्याचे टेन्शन कमी करू शकतो. माणसा माणसातले संबंध चांगले ठेवायचे असतील तर जो टेन्शन देतो त्याच्यावरच दिलेले टेन्शन कमी करण्याची जबाबदारी पडते. नोकरी मध्ये तर ह्या तंत्राचे अवलंबन केले नाही तर माणसातले संबंध दुरावतात व त्याचा परिणाम संस्थेच्या कामावर पडू लागतो. निमंत्रित साधारण दिलेल्या वेळेवर हजर राहतात. वेळे नुसार व वया परत्वे नमस्कार चमत्कार होतात. थोड्या गप्पा मारल्या जातात व टाटा बाय बाय होते
सैन्यातल्या गप्पा जास्ती करून – मी जेव्हा अमुक अमुक युनिटला होतो, तू कोठे कोठे होतास- किंवा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आयएमए किंवा एनडीएच्या गोष्टी करणे. कोर्समेट्स भेटले तर काही विचारूच नका. आपण एकत्र कसे रोलिंग केले आहे हे कितीही वर्षे झाली तरी हा विषय ताजाच राहतो. हल्ली सगळेच जास्त मटेरीअलीस्टीक झाले आहेत, त्यामुळे गप्पात प्रामुख्याने काय विकत घेतले, केवढ्याला आणि माझ्याकडे काय काय वस्तू आहेत ह्याच्यातच संभाषण सुरू होते व संपते. ह्याचीच सावली सैन्यात सुद्धा पडलेली आढळते. मित्र म्हणवतो व हृदयस्पर्शी बोलणे होतच नाही हे मला गाभाऱ्यात नमस्कार करायच्या ऐवजी प्रदक्षिणेची घाई झालेल्या भक्ता सारखे वाटते. जीवनाला लागणाऱ्या, प्रोत्साहन देणाऱ्या विषयांवर न बोलता, बाहेर बाहेरुन विचारपूस असते त्यामुळे जीवापाडाची मैत्री जडत नाही. जीवापाडाचे मित्र आपले पूर्वीचेच शाळेतले व लहानपणाचे स्नेही असतात. मोठे झाल्यावर होतात ते फक्त आपले सहकारी.
ह्या व्यतिरिक्त आधीकारी व जवान, सुभेदार हे वेगवेगळ्या वेळी कामा व्यतिरिक्त भेटत राहतात. हा व्यवस्थापनाचा एक भाग आहे. त्यातच रम पंच किंवा बडाखाना समाविष्ट होतो. बडाखाना – म्हणजे सहभोजन. सहभोजनाच्या दिवशी कमानअधिकारी, बाकीचे ऑफिसर्स, सुभेदार व जवान एकत्र संध्याकाळी जवानांच्या मेस मध्ये भेटतात. जवान सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात व तासा दीड तासाच्या हा कार्यक्रम सहभोजनाने संपतो. हिच गोष्ट रम पंच मध्ये असते, फक्त भोजनाचा भाग नसतो त्यात. त्यामुळे कधी कधी जेव्हा वेळ नसतो तेव्हा रमपंच करतात. सैन्यात दारू पिणेहा लपून छपून करण्याचा प्रकार नाही. रमपंच मध्ये जवान, सुभेदार व अधिकारी आपआपला हुद्दा बाजूला ठेवून जवानांबरोबर मिळून मिसळून दारू पितात. – धुंद येथमी स्वैर झोकितो मद्याचे प्याले – ह्या बाबूजींच्या गायिलेल्या भावगीता मधूनचे भाव सैन्य खरोखरीच यतार्थ करते. पण तरी सुद्धा सैन्यात काही कोणाला दारुडे किंवा दारू पिऊन तर्र् होणारी मंडळी सापडणार नाहीत. सैन्यात मद्य वाईट मानली गेलेली नाही व तिचे सेवन सुद्धा अतिरेकी पद्धतीने होत नाही. युनिट मध्ये कधीही पिऊन दंगा झाला असे चित्र दिसत नाही. प्रत्येकाला कळते कोठे थांबायचे ते. सात्त्विक, राजस तामस भावांमध्ये मद्य हे तामसी समजले जाते. तिचे सेवन करण्याने तामसी भावना जागृत होते. सैन्य हे देशाच्या रक्षणासाठी असते. त्याचा धर्म युद्ध करणे व युद्धासाठी तयार राहणे हा आहे. युद्धासाठी लागणारी तामसी वृत्ती सैन्यात जर जोपासली नाही तर युद्धाच्या वेळी अर्जूना सारखी दशा होईल व आपण गलितगात्र होऊन आपल्या राष्ट्राला धोक्यात घालू. युद्धाला पोषक तामसी वृत्ती लागते त्यामुळे दारू सैन्यात निषिद्ध मानली जात नाही.
(क्रमशः)
आपण राष्ट्रव्रत घेतले का
त्या संबंधी येथे अजून वाचा
आपण राष्ट्रव्रत घेतले का
त्या संबंधी येथे अजून वाचा
http://rashtravrat.blogspot.in/
आणि येथे
http://bolghevda.blogspot.in/
(मराठी ब्लॉग)
http://chitale-studio.blogspot.in/
एकदम डिट्टेलवार माहिती दिलीत
एकदम डिट्टेलवार माहिती दिलीत की ऑफिसर्स मेस मधल्या जेवणाची....
माझ्या ऑफिसच्या रस्त्यावर एक ऑफिसर्स मेस आहे.. ज्या दिवशी तिथे स्पेशल लायटींग असते त्या दिवशी तिथे पार्टी असते..
एकदम डिट्टेलवार माहिती दिलीत
एकदम डिट्टेलवार माहिती दिलीत की ऑफिसर्स मेस मधल्या जेवणाची....>>>>>+११११
अतिशय मस्त वाटले वाचताना...
छानच लिहिलय
छानच लिहिलय
मस्तचं
मस्तचं
छान आहे लेखमाला.
छान आहे लेखमाला.
क्रमशः आहे, मग याच्या पुढचा भाग कुठे आहे?