बंडया - गुंडी ४

Submitted by Pritam19 on 10 August, 2016 - 11:14

हे कथानक हॅरी पॉटर पासून प्रेरणा घेऊन रचलेले आहे. हॅरी पॉटरच्या वाचकांना मिळणारा आनंद आणि थरार आमच्या मराठीतील वाचकांना त्यांच्या भाषेत, सभोवतालच्या वातावरणात, संस्कृतीच्या पठडीत मिळावा याचा मी प्रयत्न केला आहे. आपण वेळ व भेट दिल्याबद्दल आभार.
- समिर बागायतकर

“असं कसं होईल? असं कसं होईल?” स्वतःशीच बडबडत होता. चांगदुष्ट देखील जरा सरसावून बसलेला.
तो ओरडला,” मी सांगतो श्रवणच असणार. नुस्ता चेहरा बघूनच मी नक्षत्र ओळखतो. आपल्याला कुंडली वगैरे मांडत बसायची गरजच नाय. माझ्या बापाच्या बापाआधीपासून आम्ही या धंद्यात आहोत. किती एकजणं, हजाराच्या वर तर मीच इथे आणलीत आणि नेल्लित. त्याने श्रावणाच्या रूईला प्रदक्षिणा घातलीच नसेल बघा. ओ बंडे जरा रूईला फेरा घाला म्हणजे अर्जाचा नमुना मिळेल बघा.”
मंजुघोष घाईघाईने पंख विस्तारून बंडयाकडे आला. “बंडया तो म्हणतोय तर बघ जरा रूईला फेरा मारून.”
“रूई म्हणजे कुठलं झाड?”
“ते तिथून तिसरं.”
“पण मी त्याला फेरी मारलीय.”
“असेल हो असेल. पण परत एकदा फेरी मारायला काही हरकत नाही हो बाळ.” मंजुघोषाने बंडयाला चुचकारले.
बंडया आळस करत उठला व प्रदक्षिणा घालून नमस्कार करून पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसला. यावेळी कशी कोण जाणे पण वरची सगळी माकडे गप्पगार होती. ती देखिल उत्सुकतेने काय होतेय पाहत होती. बंडयाला एकदम साक्षात्कार झाला. ती नुस्ती माकडे नव्हती. त्यांचा या झाडांशी काहीतरी संबंध होताच होता. काहीच घडले नाही. वरती माकडांमध्येही जणू कसली तरी चर्चा, वार्तालाप चालू झाला. हलक्या आवाजात मंजुघोष पंखात डोके खुपसून मुसमुसला,”सत्ताविसातलं एकही नाही. एकही नाही. कसं शक्य आहे?”
चांगदुष्टही आपले केस कराकरा खाजवत होता. “हां, आठवलं!” बंडयाने कान टवकारले. “शंभरेक वर्षापूर्वी माझ्या बाच्या काळात असं एकदा घडलं होतं बघा. तेव्हा रिक्क्षा न्हैय टांगा चालवायचा माझा बा, हां. कुठचाच प्रसाद मिळेना. खूप तालेवार प्रस्थ होते ते. खूप शास्त्री खर्ची घातले, तेव्हा तोड मिळाली बघा.”
“काय तोड मिळाली?” मंजुघोषाने चांगदुष्ट गप्पच झालेला बघून विचारले.
“काय का नीट आठवेना बघा.”
मंजुघोषाला त्याला काय म्हणायचेय नीट कळलं. तो हळूच बंडयाच्या खांदयावर येवून बसला. बंडयाच्या कानात कुजबुजला. बंडयाने सरलकाकाने दिलेली खिशातली थैली चाचपडली. खिशातच हात घातला. चाचपडून एक नाणं काढलं. ते खिशाबाहेर काढताच त्याची सोनेरी झळाळी बघून बंडया स्वतःच चकित झाला. ते नाणे चोचीत घेऊन मंजुघोषाने नेऊन चांगदुष्टाच्या मांडीवर टाकले.
“हां हां. आठवलं. त्याचं त्या जातकाचं अठ्ठावीसावं नक्षत्र होतं बघा. काहीतरी आक्रितच. अतिदुर्मिळ योग.”
“कुठलं नक्षत्र?” मंजुघोषाने विचारले.
अजून एक नाणं उकळल्यावर अभिजीत म्हणून चांगदुष्टाने सांगून टाकले. पण त्या नक्षत्राचा आराध्य वृक्ष कोणता ते त्याला सांगता येईना. कारकुनालाच विचारा म्हणाला.
मंजुघोषाने बंडयाकडून आधी एक नाणे नेले. मग अजून एक नाणे नेले. मग अजून एक, दोन करत हळूहळू सगळीच थैली नेवून ठेवली. ते झाड पुष्य नक्षत्राचे, नक्षत्रांच्या राजाचे होते. मग मंजुघोषाने कारकुनांना गार्हाणे घातले. “हे पवित्र नक्षत्रवनातल्या, पवित्र नक्षत्रकपींनो हा उपहार स्वीकार करा.व या जातकाचा उद्धार करा. त्याचा मार्ग सुकर करा. या अतिदुर्मिळ योगाचे तुम्ही जाणकार आहात. कृपा करून त्याचा नक्षत्रवृक्ष उद्धृत करा. तुम्हाला स्वर्गातल्या पवित्र कल्पवृक्षाची आण, पवित्र संतान वृक्षाची आण, पवित्र देवमंदाराची आण, पवित्र पारिजाताची आण, पवित्र हरिचंदनाची आण.”
“होय महाराजा.” चांगदुष्ट मागून ओरडला.
“होय महाराजा.” त्याचे बघून बंडया ओरडला.
माकडांमध्ये मोठी हुल्लड माजली आणि धावपळ उडाली. एक माणसाहुनही थोराड मोठे नरवानर झाडावरून उतरून खाली आले. खंडाळयाच्या घाटात बंडयाने काळतोंडी माकडांना चणे भरवले होते, त्या माकडांसारखेच ते होते. पण त्याच्या कपाळावर पांढरी नक्षत्रचिन्हाची खूण उमटलेली होती. ते शांतपणे पुढे आले. त्याने थैली उघडून पाहिली, चाचपडली व तिरस्काराने टाकून दिली. ते परत मागे झाडापाशी जाऊन बसले.
“अहो, वानरांना सोन्याच्या मोहोरांशी काय काम? तुमच्याकडे त्यांना देण्यासारखे दुसरे काही आणखी आहे तर बघा.” चांगदुष्ट रिक्षातुनच ओरडला.
बंडयाने खिसे उलटेपालटे करून पाहीले. काही मिळते का? खाण्यापिण्याचे त्याच्याकडे काहीच नव्हते. या वानरांना त्याची चॉकलेटं बहुतेक आवडली असती. उपासात मोह नको म्हणून बंडयाने खिशात भरली नव्हती. बाकी त्याच्याकडे दोन रूपयाचे स्वतःचे नाणे होते. त्याची माकडांना काही किंमत नव्हती.
मंजुघोष परत बंडयाच्या खांदयावर चढला. कुजबुजला. बंडयाने त्याला अलगद हातावर घेतले. त्याच्या गळयापाशी चाचपडून तिथे बांधलेली एक दोरी शोधून काढली. बरेच प्रयत्न करून तीची गाठ सोडवण्यात त्याला यश आले. त्यात एक मोती होता. टपोरा पांढरा. तो बंडयाने भीत भीत थैली होती तिथे नेऊन ठेवला. माकडांची परत वरती जोरदार धावपळ, खेचाखेच सुरू झाली. खाली बसलेले नरवानर पुढे आले. त्याने वरती सर्वांना दात विचकून दाखवले. तो मोती हातात घेतला. परखला आणि एकदम तोंडात टाकून गिळून टाकला. वरचा कोलाहल शांत झाला. मग त्या नक्षत्रकपीने बोटाने धूळीत काहीतरी गिरवले. तो मागे सरला आणि झाडापाशी जाऊन वर निघून गेला. मंजुघोष पटकन उडून त्या अक्षरावर झेपावला.
“पुत्रंजीव.” मग तो “पुत्रंजीव, पुत्रंजीव,” करत रिंगणात गरागरा फिरला. निराश होऊन बंडयाच्या समोर येऊन बसला. पुत्रंजीवाचे झाड यात तर नाही. बंडयाला तशीही त्यातली झाडे ओळखता येत नव्हती. एक माडाचे. बाकी कशाचा पत्ता लागत नव्हता.
“ते कसे असते?” बंडयाने विचारले.
“अशी चक्राकार लागलेली पाने असतात. मोठाली थोडीशी तेलकट, खोड मातकट भुर्या रंगाचे आणि....” मंजुघोषाने पुढचे बोलणे सोडून दिले. आपण एका शहरवासी, दहा वर्षाच्या मुलाबरोबर बोलतो आहोत हे तो विसरून गेला होता. यापेक्षा एखादया कारचा मेक, रंग, तीची वैशिष्टये सांगितली असती तर बंडयाने ती लगेच ओळखून काढली असती.
“मी ते झाड शोधून येतो.” म्हणाला व मंजुघोष उडाला.
“नको, नको” बंडया भीतीने थरथरत ओरडला. “मला एकटयाला सोडून जाऊ नकोस.” मंजुघोषाने परोपरीने बंडयाला समजवायचा प्रयत्न केला. पण बंडया कसाच ऐकेना.
“ओ बंडे. तुम्हाला पुत्रंजीवाचे झाडच हवे ना, मला माहीत आहे कुठेय ते. बसा लवकर. त्यात काय? असे जाऊ आणि असे येऊ. बघा आता दिवस किती चढलाय.”
मंजुघोषाला त्याचे म्हणणे पटले. चांगदुष्ट ही भलाई फुकट करणार नव्हता. त्याला ती मोहोरांची अख्खी थैली हवी झाली होती. जर जंगलातल्या माकडांना तुम्ही ती देऊ शकता. तर ती मला दयायला काय हरकत आहे. असा त्याचा बिनतोड युक्तिवाद होता. बंडया आणि मंजुघोष रिक्क्षात चढले. बंडयाने डोळयाची पापणीही झुकू न देण्याचा पण केला होता. त्याचा काही फायदा झाला नाही. एका चुकार क्षणी त्याचे डोळे मिटले. उघडले. तेवढयात ते जंगलातून एका नव्याच शहरात परतलेत असे त्याला दिसले. रिक्क्षा एका बंगलीसमोर जाऊन उभी राहिली. समोरच बंगलीच्या आवारात एक भला दांडगा वृक्ष उभा होता.
“बंडया चटकन आत जाऊन प्रदक्षिणा पूर्ण कर. कोणाचे लक्ष नाहीये.” मंजुघोषाने सुचना दिली.
बंडया शिताफीने फाटकाच्या मधल्या फटीतून आत घुसला. झाडाला हात लावुन त्याने एक प्रदक्षिणा पुर्ण केली. नमस्कार करतो तोच, “कोण आहे रे तिकडे?” म्हणून एक चढा आवाज कानावर आला. बंडया ताबडतोब सटकला. रिक्क्षा गाठेपर्यंत त्याच्या छातीत जोरात धडधडत होते. मागे वळून कोण विचारतेय एवढेही त्याने पाहिले नाही.
“इश्श! मी मंजुळा बोलतेय ना ईथे, असं काय खुळयासारखं इथे तिथे पाहायचं. इकडे, इकडे पाहा ना बाई.” बंडयाच्या कानावर मंजुघोषाचे आवाज येत होते. रिक्क्षात येऊन बसल्यावर त्याला जाम हसू आवरेना. मंजुघोषाने बंगलीच्या मालकाचे लक्ष दुसरीकडे वेधताना त्याचा पार मामा केला होता. बिच्चारा! त्याला काय माहित ही मंजुळा खरोखरची रानात उडणारी उनाड मैना होती.
चांगदुष्टाने रिक्क्षा बंगलीबाजूच्या रस्त्याच्या कडेला नेऊन लावली. मंजुघोष पुत्रंजीवाची एक एक फांदी थोडयाथोडया वेळाने घेऊन आला. बारा फांदया जमल्यावर रिक्क्षाने पुढे कुच केले.
“हे तुझ्या अर्जाचे नमुने,” म्हणून मंजुघोषाने त्या बारा फांदया बंडयाच्या हातात ठेवल्यावर बंडया उडालाच. “आपल्याकडे दुसरा आकाशमोती असता तर एवढे सायास पडले नसते. त्या नक्षत्रकपीने बदल्यात या फांदया - नमुने आणुन दिले असते. त्यांचे कामच आहे ते. प्रदक्षिणा फि भरली कि त्यांना हे नमुने दयावेच लागतात. “ मंजुघोषाने बंडयाला स्पष्टीकरण दिले.
“प्रदक्षिणेची फि? आकाशमोती?” बंडयाने अचंब्याने विचारले.
“नव्हे, नव्हे. फि म्हणजे प्रदक्षिणा बरे. तिथेच पुत्रंजीवाचे झाड असते तर त्याला तु एक प्रदक्षिणा घालणे पुरेसे होते. खरे म्हटले तर तसे असायला हवे होते हो. काय हो रिक्क्षावाले.”
“नाही कोण म्हणतो? नक्षत्रवनात सगळया प्रकारची झाडे आहेत तर पुत्रंजीवी नाही कोण म्हणतो? मला माहीत होत कुठेय ते.” चेहर्यावर लबाड भाव आणत चांगदुष्ट म्हणाला.
बंडयाचे डोळे मोठ्ठे झाले, “मग मगाशी ते का दाखवलं नाही ?” तो एकदम मोठयांमध्ये बोलून गेला.
“ओहो, बंडेना राग आला की हो, “ आणि चांगदुष्टाने एक हात चाकावरचा सोडत मोहोरांची थैली त्या हाताने वर उडवून झेलून दाखविली. बंडयाला असा संताप आलेला. सांगून सवरून वर ही बदमाषी. मंजुघोषने हलकेच बंडयाच्या वळलेल्या मुठीवर पंख घासला. जणू धीराने घे समजावले. खरोखर बंडया त्या अर्ध्या भल्या, अर्ध्या बुर्या चांगदुष्टाचे काय करू शकणार होता? बंडया गप्प बसला. या धुमसणार्या रागाने त्याची सगळी भीती मात्र दूर पळाली. त्याने चांगदुष्टावरची नजर हटवून बाहेर बघितले. ते शहरात नव्हते. हिरव्यागार नक्षत्रवनात देखिल नव्हते. एका नदीच्या काठाकाठाने रिक्क्षा पळत होती. नदीच्या तीरावर दोन्ही बाजूला वाळवंट होते. त्यापलीकडे झाडी होती. नदी अगदी संथ वाहत होती. माणसांच्या वस्तीचे इथे कुठेच सुदूर चित्र नव्हते.
“हे आले आपले ठिकाण. गुप्तगंगेचा काठ.” मंजुघोष म्हणाला. बंडयाचा हात त्याच्या नकळत गळयातल्या रुद्राक्ष माळेवर गेला.
गुप्तगंगेच्या निर्जन नदी तीरावर एका वळणावर येऊन रिक्क्षा थांबली. नदीचे शुभ्र पाणी लाटांच्या रूपात हलकेच फेसाळत होते. त्या पाण्यात पाय सोडून नाचायला मज्जा आली असती. बंडयाची ती इच्छा पुरी झाली. मंजुघोषाने बंडयाला पादप्रक्षालन करून शूचिर्भूत होऊन यायला सांगितले.
“म्हणजे काय?” बंडयाला कळलं नाही.
“बाळ अरे नदीत हात पाय धुऊन जरा साफ होऊन ये कसे.” हे सोप्या शब्दात सांगण्याआधी डोक्यावरच्या तुर्याला पंख आपटायला मंजुघोष विसरला नाही.
बंडयाने मंजुघोषाचा तो वैताग मनावर घेतला नाही. अगदि मनसोक्तपणे तो नदीच्या पाण्यात डुंबला. नदीचे पात्र काठापाशी उथळ होते. तो गुढघाभर पाण्याच्या पुढे गेल्यावर मंजुघोष काठावरूनच ओरडला, “फार पुढे जाऊ नकोस हो बाळ. आता पुरे.”
तरी बंडया पाण्याबाहेर यायला नाराज होता. पाणी कसं स्वच्छ होतं. तळ अगदी स्पष्ट दिसत होता. आईने त्याला असं मोकळेपणानं कसंच डुंबू दिलं नसतं. बंडया पायाने वाळू उकरून पाणी गढूळ करायचा आणि मग ते संथपणे नितळ होण्याची वाट बघायचा. तो खेळ खेळण्यात मग्न होता.
“बंडया आपल्याला आधीच खूप उशीर झालाय. सूर्य कलण्याआधी आपलं काम आटोपायला हवं.” मंजुघोष उडत त्याच्या खांदयावर येऊन बसला. कानाशीच म्हणाला. तसा बंडया एकदम दचकला आणि भानावर आला.
“हे बघ. आता अर्जाचा नमुना आपल्याला नक्षत्रवनातून कळला, तो आपण आणला आहे. तो आता इथे गुप्तगंगेच्या काठावर आपण भरायचा आहे. ही आपली अर्ज भरून पावती दयायची खिडकी समज.” मंजुघोष बंडयाला समजेल अशा सोप्या तर्हेने समजवायचा प्रयत्न करत होता.
हं! अर्ज भरायची खिडकी आणि पावती म्हणे. म्हणजे एक खरी खिडकी आणि खरी कागदी पावती सोडून दुसरं काहिही ते असू शकणार होतं. बंडयाची खात्री होती. बंडयाने नजर बारीक करून नदीच्या पात्रात मासे दिसतात का पाहायचा प्रयत्न केला. इथले कारकून काही मासे असू शकले असते. बंडयाची ही अटकळ सुद्धा चुकली. बारा नमुन्यांसाठी बारा कुंडे म्हणजे खड्डे, नदीतल्या वाळूत त्याला उकरावे लागले. वाळू उपसायचे काम बंडयाच्या आवडीचेच होते. या शाळेचे आपले छानपैकी जमेल. बंडया मनातल्या मनात खुषीत होता. मंजुघोषाने बंडयाला खड्डे जरा खोल काढायला सांगितले. तसे ते तयार होताच, वाळूतून पाणी झिरपून हळू हळू सगळे खड्डे भरून गेले.
मग मंजुघोषाने बंडयाला आपल्या बरोबरीने एक मंत्र म्हणायला सांगितला. घरी पूजेला भटजीबोवांच्या मागोमाग बंडयाला असंच काहीतरी म्हणावे लागायचे. मंत्र अचूक म्हटला असणार. कारण आता कुंडातले पाणी उकळायला लागले. तप्त पाण्याच्या लाटा कुंडे भरून वाहायला लागल्या. उकळते पाण्याचे प्रवाह बंडयाच्या चारही बाजूंनी त्याला घेरून टाकू लागले. सुकलेल्या पुत्रंजीवाच्या फांदया त्यात तरत होत्या. स्वप्न आता सत्यभासात बंडया जगत होता. त्याला आपोआप वातावरणातला गंभीरपणा जाणवला. बंडया ताठ सरळ झाला. त्याने अर्ज भरला होता आणि आता त्यावर विचार चालू होता.
कितीवेळ वाट बघण्यात गेला. दिवसभर बंडया उपाशी होता. वर तळपत्या सुर्याचे ऊन होते. सभोवतालून वाफा त्याला भाजून काढत होत्या. किती वेळ? किती वेळ? त्याला आता भोवळ येऊ लागली होती. त्याची शुद्ध आता हळूहळू हरपू लागली होती. तो आता तिथे नव्हता. कुठे होता? त्याच्या घरात... कोणीतरी हलवून त्याला जागे करत होते. कोण? कोण? बाबा? आई? कोण, कोण?
“बंडया ऊठ, ऊठ. सावध हो.” काय स्वप्न होते? काय सत्य होते? तो नक्की कुठे होता? त्याला कळेनासे झाले होते... आता तो त्याच्या शाळेत होता. नितिनच्या बाजूला. त्याच्या नेहमीच्या जागेवर. नितिन वहीच्या मागल्या पानावर फुल्ली- गोळयाचा खेळ मांडत होता. त्याच्याकडे पाहून हसत होता. जोशी बाईंच्या तासाला नेहमीप्रमाणे डुलकी लागून तो जागा होत होता का? आज या वेळी खरा इथेच तर असायला हवा होता तो. स्वप्न की भास की सत्य. त्याने थकून डोळे मिटले. परत कोणीतरी त्याला हाका मारल्या, “बंडया सावध हो डोळे उघड. उघड, उघड डोळे.”
आणि त्याच्या श्वासाला एक अपरिचित ताजा सुगंध जाणवला. अंगाला एक आल्हाददायक झुळूक जाणवली. त्याने खाडकन डोळे उघडले. तो शाळेत नव्हता तर, तो तिथेच होता. गुप्तगंगेच्या तीरावर भाजणार्या तप्तकुंडाच्या घेर्यात.
“बंडया पहा पहा. सातव्या कुंडातल्या फांदीला पालवी फुटलीय. लवकर, लवकर. ते पाणी ओंजळीत घे आणि इथे ताबडतोब माझ्या मागे पळत सुट.” मंजुघोष जोरात ओरडत होता.
बंडयाने पाहिले. खरेच त्या उकळत्या पाण्यात त्या वठलेल्या फांदीवर कोवळा अंकुर, पाने फुटलेली दिसत होती. त्या उकळत्या पाण्यात हात घालायला त्याचे मन धजावत नव्हते. पण मंजुघोषाच्या आवाजातली घाई, तीव्रता बंडयाला जाणवली होती. बंडयाने हिय्या करून त्या कुंडात हात घातले. त्याला वाटले होते तसे हात भाजले नाहीत. पाणी निवत चालले होते. ते ओंजळीत भरून तो धावत सुटला. मंजुघोष पुढे उडत होता. तो कुठे जातोय याची बंडयाला पर्वा नव्हती. बंडया अंगातले सगळे बळ एकटवून त्याच्यामागे धावत होता. पडत, ठेचकाळत, ओंजळ सावरत. आला. बंडयाच्या नजरेसमोर तो बारा अश्वत्थांचा पार आला. त्याची भव्यता नजरेत सामावत नव्हती. एखादया शंभर मजली गगनचुंबी इमारतीसारखा त्या झाडांचा अफाट पसारा आकाशात नजरेपलीकडे पोहोचलेला होता.
“बंडया इथे, इथे या शाळुंकेवर या पाण्याचा अभिषेक कर.” मंजुघोष म्हणाला. धावपळीत बंडयाच्या ओंजळीत काहीच पाणी शिल्लक उरले नव्हते. मंजुघोषाने बंडयाचे भाव ताडले.
“तु ओंजळ वर रिती कर हो. काल शिल्लक असेल ते पडु दे. हो पुढे.” मंजुघोषाने बंडयाला आश्वासिले. बंडया पुढे झाला. ओंजळ त्या शाळुंकेवर उपडी केली. एखादा दुसरा थेंब त्याच्या हातातून त्या दगडी शिलेवर पडला असेल, तोच चर्र चर्र आवाज करत थेंबांची वाफ झाली. ईतकी ती शिला गरम होती? बंडयाला नवल वाटले. त्या वाफेचा तरंग झाला आणि त्या तरंगाचे गोल कडे होऊन ती सारी वाफ विरून गेली. पुढे काय? बंडया मंजुघोषाकडे पाहू लागला. आता बनलेली आकृती लक्षात ठेव. त्याने बजावले. बंडयाने मान हलवली.
“चल चल आता पळ. आता अजून अकरा अभिषेक बाकी आहेत. जिथली फांदी अंकुरली असेल तिथली ओंजळ घेवून ये.” म्हणेपर्यंत मंजुघोष परत निघालासुद्धा.
बंडया हाफत, हाफत परत त्याच्या मागे निघाला. पहिल्याच फेरीत बंडयाच्या अंगातले त्राण संपलेले. अजून तब्बल अकरा! बंडया कुंडाकडे परतला तोपावेतो चार कुंडे निवु लागलेली. फांदया हिरव्यागार झालेल्या. जवळ मिळाले त्या कुंडातली ओंजळ घेऊन बंडया धावत सुटला. त्याला खात्री होती. तो बारा फेर्या पुर्या करू शकणार नाही. पण त्या झाल्या. दुसर्या, तिसर्या फेरीतच बंडयाचे पाय इतके दुखले, इतके दुखले की मग त्यांच्या दुखण्याचे काहीच वाटेनासे झाले. त्यांच्या संवेदनाच जणू मरून गेल्या. शरीराच्या सर्व क्रिया यांत्रिक लयदार होऊन गेल्या. अतिश्रमाने बंडया केव्हाच कोसळला. त्याच्या शरीराची धुगधुगी बंद पडत आली की आता परिचित होत चाललेला तो ताजा सुगंध त्याच्या श्वासात शिरे. त्याच्या अंगात नविन जोम निर्माण होई. जेव्हा बारावी फेरी पुरी झाली तेव्हाही बंडया परत निघाला. काहीतरी चुकले. बंडयासमोर होणारी मंजुघोषची पांढरी फडफड आता नव्हती. बंडया थांबला.
“आता पुरे हो बाळ झालेत बरे बारा अभिषेक पुरे.” मंजुघोषाचा आवाज इतका मंजुळ बंडयाला पूर्वी कधी वाटला नव्हता. बंडयाने तिथेच जागच्या जागी बसकण मारून दिली. मग धडामकन हातपाय पसरून आडवा झाला. त्याच्या डोळयासमोर वर निळे आकाश पसरलेले. त्यात हिरवीगार, लाल सळसळणारी पिंपळपाने, त्यांच्या पलीकडे सात डोंगरांची उंच शिखरे दिसत होती. त्याने अतीव समाधानाने डोळे मिटून घेतले. त्याच्या छातीचा भाता जोराजोराने धडधडत होता. घामाच्या धारा त्याच्या सगळया अंगभर वाहत होत्या. मंजुघोष त्याच्या जवळ आला आणि बंडयाच्या चेहर्यावर पंखाने वारा घालू लागला. बंडयाला लाज वाटली. पक्षी असला तरी मंजुघोषाने त्याच्या इतकीच दगदग केली होती.
डोळे उघडून तो मंजुघोषाला म्हणाला, “मी ठीक आहे.” बंडयाने उठून बसायचा प्रयत्नही केला. छॅ! तसे नुस्ते पडून राहण्यात इतके सुख वाटत होते. थोडया वेळाने मंजुघोषाने त्याला ताकीद दिली.
“चांगदुष्ट काही आपण ताजेतवाने होईपर्यंत आपल्यासाठी थांबणार नाही बरे! आता निघायला हवे हो.” ते कळल्यागतच रिक्क्षा चालू होण्याचा फटफट आवाज ऐकू आला. बंडया ताडकन उठला. मंजुघोषाच्याही पुढे आधी धावत तो रिक्क्षापाशी पोहोचला.
“थांबा थांबा. आम्ही येतोय.” मंजुघोषासाठी बंडयाने मागे वळून पाहिले.
“मला वाटले आज रात्री इथेच मुक्काम ठोकायचा बंडेंचा बेत दिसतोय. आता रातीला आम्ही काही इथे थांबायचो नाय आणि आमचा हयो गाडा चालायचा बी नाय.” चांगदुष्ट बडबडला.
“आम्ही.. आम्ही येतच होतो.” हाफत बंडया त्याला म्हणाला.
“मग काय प्रवेश मिळाला की नाय?” चांगदुष्टाने बंडयाला विचारले. बंडया विचारात पडला. बंडयाने मंजुघोषाकडे रोखून पाहिले.
“त्या सगळया आकृत्या नीट लक्षात ठेवल्यास ना बाळ. “मंजुघोषाने बंडयाला विचारले. “आणि त्याचे उच्चारण?”
“उच्चारण?” बंडयाने प्रश्नांकित चेहर्याने मंजुघोषाला विचारले.
“म्हणजे तुझा प्रवेशमंत्र तुला कळला नाही का?” मंजुघोषाने खात्री करून घेण्यासाठी विचारले.
“तो? मगाशी कुंडात पाणी भरल्यावर म्हटला तो? तो आता मला आठवत नाही.” बंडयाने कबुली देऊन टाकली.
“तो? तो नव्हे. अभिषेकानंतर वाफेच्या आकृती बनत होत्या तो.”
बंडयाला काहीच कळेना. “ती तर नुसती वाफ होती.”
“वाफ नव्हे रे बाळा. वाफेत उमटलेली ती लिपी होती. ती वाचली की उदया तुला शाळेत म्हणायचा प्रवेशासाठीचा परवलीचा तयार झाला. काय म्हणता तुम्ही ते, हां! ओळखपत्र बरे तुझे.”
बंडयाच्या पोटात भीतीचा गोळा उठला. म्हणजे एवढे सारे श्रम करून फुकट.
“बरे आहे हो बंडे तुमचे. शाळेचे ओळखपत्र हरवून टाकलेत. असा जातक पाहिला नव्हता पूर्वी कधी.” चांगदुष्ट खो खो हसत सुटला.
बंडयाने केविलवाणेपणाने नदी तीरावरून नजर फिरवली. बंडयाची नजर त्याने खणलेल्या बारा कुंडांवर पडली. ती सगळी जवळ जवळ वाळूने परत भरली गेली होती. त्यांत बारा अंकुरलेली रोपे तशीच पडलेली होती. “त्यांचे आता काय होणार?” बंडयाने मंजुघोषाला विचारले.
“नदीला भर आली कि ती नदीत वाहून जाणार.” बंडयाला ती कल्पना पटली नाही.
“ती दुसरीकडे जगणार नाहीत का? इतर विदयार्थी काय करतात?
“काहीजण ती नेऊन नक्षत्रवनात लावतात.”
“मी पण लावू?”
“आपल्याला आधीच खूप ऊशीर झाला आहे हो. तो पहा सुर्य वेगाने मावळतीला जातो आहे. आपले रिक्क्षावाले देखिल तयार व्हायचे नाहीत बाळ.”
बंडयाने चांगदुष्टकडे एक ओझरता कटाक्ष टाकला. मग आपल्या खिशात हात घालून ते २ रू. चे नाणे काढले. ते चांगदुष्टाला देवू करत त्याने विचारले, “न्याल का आम्हाला नक्षत्रवनात?”
चांगदुष्ट हसत सुटला. इतका हसला की त्याच्या डोळयात पाणी आले. मग म्हणाला, “मी अर्धा दुष्ट आहे हे खरे. त्याचा अनुभव तर तुम्ही घेतलात. मी अर्धा भलाही आहे. आता त्याचा अनुभव घ्या.”
बंडयाच्या चेहर्यावरून आनंद ओसंडून वाहिला. काही वेळातच ते नक्षत्रवनात पोहोचले होते. त्यांना जंगलात पाहून माकडांनी पुन्हा मोठा गलका केला. बंडया रोपे घेऊन खाली उतरलेला पाहताच तो गोंगाट काहीसा शांत झाला. माकडांनी त्यांच्याकडे सरळ दुर्लक्ष केले. आठवणीने चप्पल रिक्क्षातच काढून बंडया जमिनीवर उतरला होता. पण परत ती वठलेल्या वृक्षांची किचाळी त्याच्या कानावर आली नाही. बंडयाला धीर आला.
“ही रोपे कुठे लावूया?” त्याने मंजुघोषाला विचारले. मंजुघोषाने गोलाकार दोन, तीन घिरटया घातल्या. त्या वृक्षांच्या रिंगणात तो एका बाजुला उतरला. बंडया लगबगीने तिथे गेला. काळोख पडायच्या आत काम आटोपायला हवे होते. बंडयाने एका टोकेरी दगडाने खणायला सुरूवात केली, तोच सकाळचा महाकाय नक्षत्रकपि खाली उतरून त्यांच्यासमोर आला. नक्षत्रकपिने काही खूण केली.
“तो आपल्याला जागा दाखवतो आहे.” मंजुघोषाने खुणेची उकल केली. बंडया आणि मंजुघोष त्या कपिच्या मागे मागे बरेच दूर गेले. तिथले दृश्य बघताच दोघे चरकले. त्या वठलेल्या वृक्षांच्या समुहाकडे वानराने खूण केली. “तिथे!”
भारावलेल्या स्थितीत बंडया तिथे गेला. ती रोपे बंडयाने त्यांच्या शेजारी लावली. रोपे लावता लावता बंडयाने हळूच मागे पाहिले. तो कपि गुपचुप आपले अश्रू पुसत होता. बंडयाचा चांगदुष्टावरील सगळा राग गेला. रिक्क्षाकडे गेल्यावर, त्याच्या चेहर्याकडे बघताच चांगदुष्ट म्हणाला, “बाकी बंडे तुमचा चेहरा अगदी तुमच्या मनाचा आरसा आहे. ना राग लपतो ना लोभ.”

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users