बंडया - गुंडी ३

Submitted by Pritam19 on 9 August, 2016 - 15:33

साबरी दिक्षितांच्या मायावी जगात आपले स्वागत असो. जादू आणि चमत्कार या जगातून संपलेले नाहीत. साहसवीरांच्या अदभुत कथा आजही घडताहेत. शोधा म्हणजे सापडेल. वाचा म्हणजे समजेल.
* अलख निरंजन. *
- समिर बागायतकर Happy
घरातून धडधडत्या अंतःकरणाने निघून बंडया जिने उतरून खाली पोहोचला. तिथून रस्त्यावर आला. गोष्टीतल्या, पुस्तकांतल्या बहादुर नायकांप्रमाणे आपणही काही पराक्रम गाजवावा. जगावेगळे अनुभव घ्यावेत. असे त्याला आजपर्यंत नेहमी वाटे. आपल्या आयुष्यात काही आगळेवेगळे घडावे असे त्याला वाटे. आज ती वेळ आली होती. तो क्षण आला होता.पण मन कुठेतरी कच खात होते. त्याची नजर भिरभिरत सगळा रस्ताभर सरलकाकाचा शोध घेत होती. बंडया पळ, परत जा त्याचे मन त्याला सांगत होते. सरलकाका दिसलाच नाही, भेटलाच नाही, तर किती बरे होईल! मग त्याला घरी जाऊन आरामात पहुडता येईल. नेहमीप्रमाणे कार्टूनचे एखादे चॅनल लावता येईल. एकटयानेच कॅरम खेळत बसायची त्याला सवय झालेली होती. छॅ! किती कंटाळवाणी बाब ती. पण आज ती कल्पना त्याला रम्य वाटत होती. कोणीतरी त्याच्या खांदयावर हात ठेवला. विचारात गढलेला बंडया दचकला. बापरे सरलकाका? त्याने मागे वळून बघितले. तो चष्माधारी नितिन होता. बंडयाला हायसे वाटले.
“काय बंडया तुझा ताप गेला? आता कसं वाटतंय? बरा आहेस ना? “ नितिनने त्याची चौकशी केली.
बंडयाला काही उत्तर दयायचे होते. तोच नितिनची शाळेची बस आली. चल लवकर. म्हणून तो घाईघाईने तिथे धावला आणि चढून गेला सुद्धा. बंडयाने नितीनकडे पाहिले. नितिनने दारातून पाठमोरे वळून त्याच्याकडे पाहिले. नितिनचे चष्म्याआडचे डोळे विस्फारलेले होते. बंडया आज त्याच्या मागोमाग बसमध्ये चढला नव्हता. वाहकाने एक दोनदा दार जोरात वाजवून बंडयाकडे नवलाने पाहिले. मग दार बंद करून घेतले आणि बस निघून गेली. एकाएकी बंडयाला ती जाणीव झाली. ती बस त्याच्या जीवनातून कायमची निघून गेली होती. यापूढे कधीच त्याचे आयुष्य असे इतर मुलांसारखे असणार नव्हते. सहज आणि सोप्पे! कालपर्यंत त्याला ते आयुष्य नरकासमान वाटत होते.
त्याला आठवले, तो नितिनला म्हणत असे, “मित्रा काय कंटाळा आहे रे आपले जीवन. यातून सुटण्यासाठी मी वाट्टेल ते देईन.”
“तुझा स्टीकरचा सगळा साठा?” बोटाने चष्मा वर करीत नितिन विचारी.
“ हो सगळाच्या सगळा आणि वर शाळेचं अख्खं दप्तर, कंपास पेटीसकट फुकट.”
बंडयाला खात्री होती, त्या नव्या मुक्त जीवनात या तुच्छ वस्तूंची काही एक गरज असणार नाही. नव्या जीवनाची सुरूवात मुळी कशी तोडाफोडी, फाडाफाडी पासून सुरू होई. शाळेच्या वहया-पुस्तकांची फाडाफाड करून, जमल्यास ते तुकडे-तुकडे रस्त्यावर पसरून त्यावर नाचायला त्याला आवडले असते. दररोज हजार वेळा बंडयाच्या मनात सगळया स्वाध्यायमालांचा त्याच्या त्या चौथ्या मजल्यावरून फेकून देऊन कपाळमोक्ष करावा असे येई. हजाराव्या वेळी त्याने तसे करूनही बघितले होते. पण खालच्या सानेमामींचा कपाळमोक्ष आधी झाला. आणि मग....
नको. पुढचा भाग मुद्दामहून आठवावा असा नव्हता. ते रोज रोज सक्तीचे जाणे येणे नको. ती वर्गाच्या कोंडवाडयात दिवसभर एका जागी बसून राहायची शिक्षा नको. ते रटाळ विषय, ती पाठांतरे, ते उतारे मारणे, ते डोळयांना झापडे बांधल्यासारखे फळयाकडे एकटक बघायला लागणे, ते वैताग आणणारे शिक्षक, चिडणारे आणि चीड आणणारे. ऐकण्याची सक्ती, लिहीण्याची सक्ती, विषयांची सक्ती, अभ्यासाची सक्ती प्रत्येक गोष्टीची सक्ती. गुदमरवून टाकणारी सक्ती. प्रत्येक वेळी त्याच्या मनातून बंडाच्या उर्मी उसळून येत. याला नाही म्हणावे. मी नाही जा! म्हणून ठणकावून सांगावे. जोरदार टाहो फोडावा. बोंब ठोकून दयावी आणि काय नि काय. पण या सगळया उर्मी - भावना मनातच थंड होत. तसे काही करायची त्याची हिंमत होत नसे. तसं करण्यात काहीच कठीण नव्हतं. बोंबा मारण्यात तर त्याच्यापुढे कोणीच जाऊ शकलं नसतं. हे केवळ त्याचे स्वतःचं नाही तर त्याच्या मास्तरांचं मत होतं. तर प्रश्न होता तो त्यापुढची मारहाण, उपासमार, झोंबणारे शब्द सहन करण्याचा. तेही त्याने सहन केलं असतं. केलं असतं म्हणजे चार पाच वेळा केलं सुद्धा होतं. सर्वात भयानक होता आईबाबांचा अबोला सहन करणं. तसेही त्याचे आईबाबा दिवसाकाठी एक, दोन तासासाठी त्याच्या वाटयाला येत. जर ते एक, दोन तासही नसतील तर? एक लहान मुलगा नुसता दुध, पोळया, चॉकलेट, बिस्किटं, पेप्सी- आईस्क्रिम, केळी आणि वडे-समोसे खाऊन जगतो की काय?
जाऊ दे. तर या अशा जगण्याला कालपर्यंत तो निरर्थक समजत होता. तेच गमावण्याची आज बंडयाला हुरहुर लागली होती. त्याच्यात कसला थरार नाही, वेडं साहस नाही, म्हणून तो गिल्ला करायचा. आज तोच प्रत्यक्ष साहस सुरू व्हायच्या आधी गोंधळून, धास्तावून गेला होता. पुढे काय वाढून ठेवलेय बंडयाला माहीत नव्हते. कसलातरी विलक्षण धोका. बंडयाचा हात नकळत गळयातल्या रूद्राक्ष माळेकडे गेला. जणू काय ती गळयात आहे याची त्याचे मन खात्री करून घेत होते. आताशा त्याला तो चाळाच लागला होता. ज्या शाळेचे आमंत्रण ईतकं थरथरवणारं होतं ती शाळा प्रत्यक्षात कशी असणार होती? नेहमीची, ओळखीची सुरक्षितता त्याला सोडवत नव्हती.
एकाएकी रस्त्याच्या वळणावर गुंडी दिसली आणि बंडयाच्या मनातली धाकधूक थांबली. जर त्या शाळेत गुंडी त्याच्याबरोबर असणारच आणि गुंडीसारखी ईतर मुले, तर ती शाळा नक्कीच वाईट नसणाराय. साशंकतेचे अंधारे गडद जाळे दूर झाले. सरलकाका आणि गुंडी बोलत होते. त्याना पाहून आता बंडयाला आनंदच झाला. झपाझप पावले टाकत अंमळ पळतच तो त्यांच्यापाशी पोहोचला. “सरलकाका मी आलोय.”
गुंडीच्या पाठीवर दप्तर होते. तीने एक डोळा मारून त्याचे बिनधास्त स्वागत केले. लाडाने ती बंडयाच्या पाठीत धपका देणार तोच सरलकाका म्हणला, “गुंडी तुझी बस येतेय.”
बंडयाने पाहिले गुंडीचा चेहरा कसानुसा वाकडा झाला. “आज परत ते मला कुपीबद्दल विचारणार.” ती म्हणाली.
“हो पण तू त्यांना माझे नाव सांगू नकोस.” सरलकाकाने एका टेम्पोमागे दडता दडता बजावले.
“बंडया मी येते रे. संध्याकाळी भेट.” म्हणत ती बसमध्ये शिरली. अक्कडबाज बसवाहकाने पटकन दार लावून घेतले. गाडी सुसाटली तसा अगदी सहजपणे बाजूला झालेला सरलकाका तसाच सहज बंडयासमोर आला. बंडयाला हा प्रकार काही कळला नाही.
“बस तर गेली?” बंडयाने विचारले. त्याची कल्पना ते त्या अनोख्या बसनेच शाळेत जातील. तसल्या शाळेत जायला नेहमीची इतर मामुली वाहने चालतील हा विचार एकदाही त्याच्या डोक्यात डोकावलाही नव्हता. सरलकाकाने बंडयाचा आविर्भाव पटकन ओळखला.
“तिथे रिक्क्षाने जायचेय” म्हणताना सरलकाकाने बंडयाची नजर चुकविली. सरलकाका काहीतरी लपवतोय. बंडयाला जाणवले.
“मी रिक्क्षा करू?” बंडयाने विचारले. रिक्क्षाच्या नावाने बोंबाबोंब करून रिक्क्षा अडवायला बंडयाला नेहमीच आवडायचे. तरी एका सामान्य रिक्क्षाने जावे लागणार ही खंत त्याच्या आवाजात प्रकटलीच.
“नको रिक्क्षा तयार आहे. ती बघ आलीच” सरलकाकाने बोट दाखविले. एक नवी कोरी तीन चाकी रिक्षा त्याच्या समोर येऊन उभी राहिली. बंडयाने डोळे बारीक करून बघितले. ही काळी, पिवळी रिक्क्षा सामान्य असणार नाहीय. त्याने आपल्याशीच घोकले.
रिक्षावाल्याचे केस एकदम कुरळे आणि दाट, केसाचा टोप लावल्यासारखे होते. त्याच्या मनगटात आणि गळयात मण्याच्या माळा होत्या. कपाळावर मोठा शेंदुराचा टिळा. त्याच्या मिशाही भरघोस दाट होत्या. रिक्क्षावाल्यांचा पांढरा कोट आणि पांढरी पॅन्ट हा पोषाख त्याने केलेला होता. त्यांच्याच तर्हेने पान खात त्याने तोंड रंगवले होते. बंडयाला दिसले रिक्क्षावाल्याने गळयात चौकडीचा रूमाल बांधला होता. त्याच्या काळया कभिन्न शरीराला तो शोभत नव्हता. अशी माणसे मवाली असतात. सिनेमे पाहून तशी पक्की खुणगाठ बंडयाच्या मनात तयार झाली होती. तो कसा का असेना, सरलकाका बरोबर असताना त्याची पर्वा का करायची? रिक्षावाल्याने गळयातला रूमाल सोडला आणि मागच्या बैठकीवर असणारी ओल पुसल्यासारखे मारत म्हटले, “या बसा बंडे!”
त्याच्या तोंडून आपले नाव ऐकून बंडयाला नवल वाटले. पण बहुमानार्थी नाव घेतल्यामुळे बंडया जरा खुशालला देखिल. हं! हा माणूस अगदीच वाईट नव्हता तर. बंडयाचा अंदाज तसा चूक नव्हता.
“हे चांगदुष्ट काका! अर्धे बरे अर्धे वाईट,” सरलकाकाने ओळख करून दिली. बंडया मग पलिकडच्या बाजूला सरकला व त्याने सरलकाकाला चढायला वाट करून दिली. पण सरलकाका चढला नाही. त्याऐवजी तो वर बाहेर आकाशात बघत उभा राहिलेला. बाहेरून पावसाचा अंदाज घेत वेळ काढण्यापेक्षा तो सरळ आत बसत का नाही?
बंडयाने त्याला हाक मारली “सरलकाका.” परत सरलकाकाने नजर चुकविली.
“आत ये, “ बंडयाने म्हटले.
“मी येऊ शकणार नाही बंडया. तुम्ही जा.”
बंडयाला एकदम धसका बसला. तो घाईघाईने सरकून दारापाशी आला, खाली उतरायच्या तयारीतच त्याने विचारले, “का?”
“मला शाळेत किंवा बारा पिंपळाकडे यायची परवानगी नाही बंडया. “
“पण का?” बंडया उडी मारून रिक्क्षातून उतरणारच होता. त्याला सरलकाकाने रोखले.
“तुला एकटा नाही पाठवत आहे मी. तिथे हा माझा मित्र तुझ्याबरोबर असेल.” सरलकाकाने म्हटले आणि एकदम पांढरा फडफडाट रिक्क्षाच्या दारापाशी झाला. एक पांढराशुभ्र पक्षी तिथे उतरला होता.
“नमस्ते बंडया!” नाजूक घंटा किणकिणाव्यात तसा त्या पक्ष्याने आवाज काढला. बंडयाच्या चेहर्यावर विस्मय दाटला.
“काकाकुवा.”
“नाही. त्याचे नाव मंजुघोष.” सरलकाका म्हणाला.
तो पक्षी उडी मारून आत शिरला आणि बंडयाच्या शेजारी येऊन बसला. पण बंडया साशंक होता. माणसाची भूमिका एक पक्षी बजावू शकेल का? हा रावणासारखा चांगदुष्ट कुठे आणि हा जटायुसारखा मात्र एक पक्षी. जणू बंडयाचे मन वाचल्यासारखा मंजूघोष त्याला म्हणाला, “बंडया काही काळजी करू नकोस हो बाळ. मी आहे ना सगळे ठीक होईल बरे.”
“हे राहू देत, तशीच काही अडचण आली तर,” बंडयाला जाणवले की त्याच्या हातात सरलकाकाच्या हातातून कसलीतरी थैली सरकवलीय. त्यात बहुतेक नाणी होती. काहीतरी गोलगोल तसेच होते खरे. एव्हाना चांगदुष्टाने रिक्षाचा दांडा ओढला. रिक्क्षाची फटफट सुरू झाली. सरलकाकाने बंडयाचा हात धीर देण्यासाठी किंचित दाबला. तो थरथरत होता.
“काय बंडे? निघायचे ना?” म्हणत चांगदुष्टाने रिक्षा भरधाव सोडली.
पटपट ओळखीच्या खुणा मागं पडू लागल्या. रिक्क्षाने होणार्या थरथरीत, बंडयाच्या शरीराला सुटलेला कंप त्याच्या लक्षात आला नसता. मगासची ती सारी भीती आता दुप्पटीने परत आली होती. बंडयाने अनोळखी माणसाबरोबर रिक्क्षाचा असा एकटयाने प्रवास कधी केला नव्हता. रिक्क्षाच्या दारातून झपझप मागे जाणारी दृश्ये क्षणाक्षणाला जास्त वेगाने पळत होती. मध्येच काहीतरी चकचकले. बंडयाने क्षण एक क्षण डोळे मिटले असतील. त्याने डोळे उघडले तेव्हा काहीतरी बदल झालाय असे बंडयाला वाटू लागले. आता रिक्क्षाच्या दारातून दिसणारे दृश्य काही वेगळे होते. मानवी वस्तीच्या खुणा सांगणारे बांधकामाचे पांढरे, पिवळे, लाल रंग गायब झाले होते. हिरवाईची सगळी दृश्ये होती. त्याच्या शहराचा वा शहराबाहेरचा कुठलाच असा हा भाग नव्हता. शाळेच्या बसच्या प्रवासात कशी जादू होत असेल, याचा बंडयाला अंदाज आला. क्षणात इथे आणि डोळयांच्या उघडझापेत क्षणात तिथे.
ते कोणतेतरी जंगल होते. रस्तासुद्धा डांबरी नव्हता तर मातीचा होता. मग ते वडाच्या पारंब्यांनी बनलेल्या उंचच उंच कमानी खालून जात होते. ते एखादे वनस्पती राज्य होते आणि बारा पिंपळ तेथले राजे! असं काही असण्याची दाट शक्यता होती. बंडयाने मंजुघोषाकडे पाहिले. त्याला वाटेत बर्याच गप्पा मारायच्या होत्या. खूप काही विचारायचे होते. पण काही समजा-उमजायच्या आत मुक्काम आलाही होता.
“आपण कुठे आलोत?” बंडयाने ह्रिय्या करून विचारले. उत्तर येईलच याची त्याला खात्री नव्हती.
“नक्षत्रवनात,” चांगदुष्टाने ब्रेकवर जोरात पाय दाबत उत्तर दिले.
वडांच्या कमानीखालून ते आता झाडांच्या रिगणामधील मोकळया मैदानात आले होते. सगळीकडे मोठमोठी झाडेच दिसत होती. सगळा आसमंत माकडांच्या आरडाओरडयान दणाणून गेला होता. जंगलात नवीन आलेल्या पाहुण्यांना ती डोकावून वेडावून पाहत होती. रिक्क्षाचा आवाज थांबताच त्यांचा कर्कश्श गोंधळ कानांचे दडे बसवून गेला.
मंजुघोष उडून बाहेर पडला. जमिनीवर उतरला. म्हणाला, “बंडया तुझी पादत्राणे आतच असू देत हो. या पवित्र भूमीवर ती घालून चालू नकोस. तीचा अवमान होईल.”
बंडयाने बरे म्हणून मान डोलावली. त्याने बूट तिथेच रिक्क्षात काढले व जमिनीवर उतरला. बंडयाचा जमिनीला पाय लागताच एकदम डोक्यात सणक गेली. त्याच्या डोळयासमोर वठलेल्या सुक्याठाक झाडांचा एक समुह आला. ते भकास दृश्य पाहून बंडयाला कसेसेच वाटले. मग त्याच्या डोळयासमोरची काळोखी गेली. समोरचे दृश्य त्याच्या जागीच होते. ती वठलेली झाडे वा पिंपळाचा पार कुठेच दिसत नव्हते. बंडयाने तसे मंजुघोषाला विचारले.
“आधी आपल्याला कारकूनाकडून शाळेत दयायचा अर्ज घेतला पाहिजे बरे. मग तो भरायचा. दाखल करून घेतला कि तुला त्यांच्या परिक्षेला तोंड दयावे लागेल. समजले ना.” अगदी लहान मुलांना समजावतात तसे सावकाश प्रत्येक शब्दावर जोर देत मंजुघोष म्हणाला.
तुरूतुरू चालत तो एका झाडाच्या दिशेने निघालाही होता. बंडयाला समजले तर काहीच नाही. इथे त्याच्या शाळेसारखे कार्यालय, त्याच्या बाहेर बसलेला डुलक्या घेणारा रामा शिपाई वगैरे काहीच दिसत नव्हते. त्याच्या शाळेच्या कारकूनबाई, मुले त्यांना फर्नांडिसमॅम म्हणत तशाही कुठे नव्हत्या. तरी बंडया गुमान मान हलवून मंजुघोषापाठी चालू लागला. काही पावले चालून गेल्यावर त्याच्या डोक्यात कसलातरी विचार आला. बंडयाने मागे वळून पाहिले. रिक्क्षावाला चांगदुष्ट तंबाखुची फक्की मळत ऐसपैस त्याच्या बैठकीवर बसला होता. तो खाली उतरला नव्हता. बंडयाच्या चेहर्यावरचे भाव त्याने ताडले.
“अहो बंडे, तुम्ही खुशाल सगळा कारभार आटपून या. मी कुठे जात नाही. अवो मीच तुम्हाला परत नेणार, नाही तर मग कोण हो?”
बंडयाला काही तो हसण्यावारी न्यायचा विषय वाटला नाही. त्याच्या मनावर मोठे दडपण आले होते. त्या वठलेल्या झाडांची किचाळी त्याच्या मनात घुमत होती. एवढयात माकडांचा मोठ्ठा कचकचाट झाला. बंडयाने वर पाहिले. दहा, बारा माकडे बंडया ज्या झाडासमोर उभा होता, त्या झाडावरून त्याच्याकडे बघून किंचाळत होती. बंडया भीतीने दोन पावले मागे सरकला. ती माकडे एकदम त्याच्या अंगावर धावून आली तर?
“बंडया, या झाडाला हात लाव. एक प्रदक्षिणा गोल मारून ये आणि नमस्कार कर.” जणू बोललेले बंडयाला समजले नसेल की काय म्हणून मंजुघोषाने स्वतः त्याप्रमाणे प्रत्यक्ष करून दाखविले. अर्थात उडत.
बंडयाने पाहिले, त्या झाडाचा घेर बराच मोठा होता. मागच्या बाजूला गेलो आणि माकडांनी काही केलं म्हणजे? मनातली भीती मनातच ठेवत बंडया त्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालून आला. मंजुघोषासमोर तो आस्ते आस्ते चालला. पण झाडाच्या मागच्या बाजूला जाताच तो जीव मुठीत घेवून धावला. दुसर्या टोकाला आला. पुन्हा हळूच चालत त्याने झाडाच्या पुढयात येऊन नमस्कार केला. “आता ते झाड,” मंजुघोष म्हणाला.
असंच करता करता त्या रिंगणातील दहा,बारा झाडे झाली. बंडया जरा कंटाळला. हे काय? नुसत्या प्रदक्षिणा घालायच्या, नमस्कार करायचा.
“अजून किती झाडांना प्रदक्षिणा घालायच्यात?” त्याने किंचित त्राग्याने विचारले.
“सगळी मिळून लागली तर सत्तावीस झाडे. सत्तावीस नक्षत्रांची. बाळ तुझे जन्मनक्षत्र तुला माहित असेल तर आपले काम सोप्पे होईल हो. तुझ्या जन्मनक्षत्रासाठी ठरवलेल्या आराध्य वृक्षापाशी जायचे आणि प्रार्थना करायची.”
“जन्मनक्षत्र? ते काय असते?”डोक्याला हात लावावा तसा मंजुघोषाने आपला एक पंख डोक्यावर तुर्याला लावला. आता काय म्हणावे या घोर अज्ञानाला.
“ते तुला नंतर सांगेन हो बाळ. जरा आधी या सत्तावीस प्रदक्षिणा पुर्या करून घे बरे.”
झाल्या एकदाच्या सत्तावीस प्रदक्षिणा संपल्या. उत्तरोत्तर माकडांचा कलकलाट आणि संख्या वाढतच होती. जणू बंडयाला बघायला आमंत्रणे दिल्याप्रमाणे सगळया जंगलातील माकडे येऊन जमत होती, व त्याला निरखत होती. बंडया जरासा दमून तिथेच खाली दुर्वांच्या हिरवळीवर बसला. सत्तावीस फेर्या मारल्या तरी कारकूनबाई काही प्रसन्न झालेल्या दिसत नव्हत्या. त्यांची नामोनिशाणी कुठे दिसत नव्हती. बंडयाने आपल्या साथीदारांकडे एक नजर टाकली. मंजुघोष फडफड करीत उगीचच इथून तिथून अस्वस्थपणे फेर्या मारत होता.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users