BANDYA - GUNDI

Submitted by Pritam19 on 8 August, 2016 - 05:25

उपोद्घात
- साबरी दिक्षितांच्या मायावी जगात आपले स्वागत असो. जादू आणि चमत्कार या जगातून संपलेले नाहीत. साहसवीरांच्या अदभुत कथा आजही घडताहेत. शोधा म्हणजे सापडेल. वाचा म्हणजे समजेल.
* अलख निरंजन. *
हे कथानक हॅरी पॉटर पासून प्रेरणा घेऊन रचलेले आहे. हॅरी पॉटरच्या वाचकांना मिळणारा आनंद आणि थरार आमच्या मराठीतील वाचकांना त्यांच्या भाषेत, सभोवतालच्या वातावरणात, संस्कृतीच्या पठडीत मिळावा याचा मी प्रयत्न केला आहे. आपण वेळ व भेट दिल्याबद्दल आभार.
- समिर बागायतकर
जोरदार पाऊस चालू होता. पावसाच्या थडीच्या थडी वाजत होत्या. बंडया त्या अंगावर घेत पावसात चिंब भिजत होता. शाळेत जाण्यासाठी बसची वाट पाहत तो रस्त्यावर उभा होता. पाणी त्याच्या गुडघ्याच्या वर चढले होते. त्याला खात्री होती आज त्याची शाळेची बस येणार नाही. शहरभरचा कारभार असे पाणी तुंबले की ठप्प पडतो हे त्याला ठाउक होते. त्याचा शाळासोबती नितिन घराबाहेर पडला नव्हता. आई, बाबा त्यांच्या कामावर अडकणार. त्यांना लवकर सोडले तरी ते दुपारपर्यंत घरी पोहोचणार नव्हते. तो उभा होता त्या कोपर्यावर दोन रिक्क्षा बंद पडून होत्या. काही आया त्यांच्या मुलांना घेवून तिथे गेल्या. त्या रिक्क्षावाल्यांना राजी करण्याचा निष्फळ प्रयत्न करून परतल्या. आज कोणतेच वाहन चालू शकणार नाही, असे रिक्क्षावाले छातीठोकपणे एकमेकांना सांगत होते. त्यांना खोटे पाडण्यासाठी समोरच्या वळणावरून ती पिवळीशार बस येताना दिसली. तीचे पुढचे दिवे उजळले होते. त्यांनी बंडयाचे डोळे दिपले. या दिव्यांपुढून एक छोटी आकृती पुढे सरकून त्या बसमध्ये चढली. बसच्या दारावर वाहकाने मारलेल्या जोरदार थापेचा आवाज बंडयाच्या कानापर्यंत आला. बस चालू झाली आणि त्याच्या बाजूने पाण्याची कारंजी उडवत निघून गेली. या असल्या पावसात व रस्ता कुठेच न दिसणार्या पाण्यात चालणारी बस, एखादी जादूचीच बस असायला हवी. रिक्क्षावाले आपापसात यावर मतैक्य झाल्याचे बोलले. ते बंडयाने ऐकले.
जादूची बस! बंडयाला त्या बसविषयी असा संशय फार आधीपासून होता. बंडयाचे त्यांच्याशी एकमत आहे हे कळते तर खूश होऊन, त्यांनी आपल्याबरोबर त्यालाही एक कप गरमागरम चहा पाजला असता. दोघे रिक्क्षावाले वीज गेलेल्या हॉटेलात शिरून रिकामा दिवस साजरा करत होते. बंडयाला त्या पिवळयाशार बसबद्दल व त्यात चढणार्या त्याच्यासारख्या त्या छोटया मुलीबद्दल नेहमी फार कुतुहल वाटे. तीनदा, चारदा त्याच्या शाळेची बस चुकायची पर्वा न करता त्याने त्या पिवळयाशार बसचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला होता. पहिल्या वेळी तो थेट तीच्या मागोमाग गेला. पण रस्त्यावरील वाहनांची. कोंडी शिताफीने चुकवत ती वेगाने पुढे निघून गेली. दुसर्या वेळी तीच्या वेगावर मात करण्यासाठी पल्याडच्या आड गल्लीने रस्त्याचे पुढचे वळण लागते, तिथे जाऊन बंडया तीची वाट पाहत थांबला. ती कुठेच नव्हती. एखादी गाडी कितीही वेगाने गेली तरी अशी झटक्यात रस्त्याचे वळण पार करून जाऊ शकली नसती. तीच्या आधी गेलेल्या गाडया अजून जेमतेम. वळण पार करून पुढे येताना बंडयाने पाहिल्या. ती बस जणू हवेत विरघळून गेली होती. तीच्यातल्या विद्यार्थ्यांसह ती बस हवेत विरघळते कशी? हे बघण्यासाठी तिसर्या वेळी बंडया पुढच्या वळणावर जाऊन थांबला होता. तिथून त्याला बस येताना आणि जातानाही दिसली असती. तशी ती येताना तर दिसली, त्यात ती छोटी मुलगी चढली देखील. बस त्याच्याच दिशेने येत होती. एवढयात बसपुढे चालणारा टेम्पो त्याच्या व बसच्या आड आला आणि बाजूने निघून गेला. एवढे निमित्त बसला गायब होण्यासाठी पुरेसे ठरले. बंड्याने डोळे चोळचोळ चोळले. छॅ! त्याच्या डोळयामध्ये काही बिघाड नव्हता.
नितिनशी त्याने यावर चर्चा केली. नितिनला त्या पिवळया बसमध्ये काही रस नव्हता. तरिही बंडयाच्या मैत्रीखातर एका दिवसासाठी शाळेची बस चुकवायचा धोका पत्करायला तो तयार झाला. वळणावर बंडया आणि त्या मुलीपाशी नितिन, असे दोघे घात लावून उभे राहिले. बसची नेहमीची वेळ ऊलटून गेली, नितिन हात हलवून ऊशिर झाल्याचा ईशारा करु लागला. नेमका घात लावून बसावे आणि शिकारीने आधीच सावध होऊन मार्ग चुकवावा, तेव्हा त्या शिकार्याचा जो चरफडाट होईल तो बंड्याचा झाला. पण नितिनचे मत वेगळे होते. त्याने बंडयाच्या समोरूनच बस वळणावरून वळून गेलेली बघितली होती. बंडया उगाचच काही चावटपणा करतो आहे, खोटं खोटं दिसली नाही सांगतोय अशी त्याची खात्री होती. नितिनला बस दिसत असताना बंड्याला मात्र दिसत नव्हती.
या जाणीवेने बंडया आतून, बाहेरून थरारून गेला. बसच्या थांब्यापाशी उभ्या माणसांना बस पुढे वळणावर वळून नजरेआड होईपर्यंत दिसत होती, पण दूर वळणावर उभ्या माणसांना थांब्यापाशी पण दिसत नव्हती. एकाचवेळी भूत अर्ध्या माणसांना दिसतं, अर्ध्या माणसांना दिसत नसतं तसं हे म्हणजे भुताटकीसारखं काही होतं. दिवसाढवळ्या त्याच्या डोळ्यासमोर भुताटकी घडत होती आणि या कामाच्या भाऊगर्दीत दंग झालेल्या शहरात, तिच्याकडे लक्ष दयायला कोणाला फुरसद मिळत नव्हती.
बरेच वेळा त्याच्या मनात येई की त्या छोटया मुलीला हटकावे. तीला काही विचारावे. प्रत्यक्षात त्या दणकेबाज मुलीकडे बघताच त्याचे मन कच खात असे. एकदा तो असाच तीच्या पाठीकडे रोखून बघत होता. जणू ते कळल्यागत तीने एकदम वळून त्याच्याकडे पाहिले मात्र ! भुवया उंचावत, “काय? " या अर्थाने तिने त्याच्याकडे पाहीले. काही नाही, काही नाही अशी मान हलवत चोरी पकडल्यासारखा तो ओशाळला होता. फार काय? विचार केल्यावर बंडयाला कधी कधी स्वतःचाच अविश्वास वाटे की त्याला एकट्यालाच ते भास होत असतील. पण आज रिक्षावाल्याच्या बोलण्याने त्याच्या डोक्यात कुठेतरी जोरदार घंटी वाजली. हां! तोच बरोबर होता.
बंडयाने आजपर्यंत कधीही न केलेली गोष्ट त्यादिवशी करायचे ठरवले. नियतीचा हा काहीतरी विचित्र संकेत होता. त्याच्यासारख्या दहा वर्षाच्या मुलासाठी असा हट्ट योग्य नव्हता. त्या पावसात, त्या पाण्यात हट्टीपणे ती बस परतेपर्यंत तीची वाट पाहत बंडया थांबणार होता. त्या छोटया मुलीला भेटणार होता. तरच तो नावाचा बंडया बंडे होता. आर या पार!
जर तो घराकडे परतला असता, तर त्याला तिथे इमारतीच्या दारापाशी दोन बायका ताटकळत उभ्या असलेल्या दिसल्या असत्या. लालभडक साडया नेसलेल्या केस मोकळे सोडलेल्या, तेज तर्रार नजरेच्या, त्याची वाट पाहून चिडलेल्या. त्याला वाटले होते त्यापेक्षा असे वाट पाहणे फारच जड गेले. पाऊस थांबल्यावर नितिन एकदा पाण्याची गंमत बघायला खाली उतरला होता. त्याच्याबरोबर गप्पाटप्पात विरंगुळयाचे एक दोन तास गेले असतील तेवढेच, त्यात बंडयाला नितिनच्या मदतीने डबा खाता आला. रस्त्यावरच्या दाजी किराणा दुकानवाल्याने हा मुलगा असा सकाळपासून रस्त्यावर उभा का आहे? याच्या चौकशीसाठी मध्येच एकदा पोर्या पाठवला होता. हाच काय तो अडथळा. जसा शहराच्या गर्दीला त्या पिवळयाशार बसमध्ये काही रस नव्हता, तसाच तीची वाट पाहणार्या, तासनतास फुकट घालवणार्या रिकामटेकडया मुलाविषयी देखील काही आस्था नव्हती. बंडयाच्या सहनशक्तीचा खूप खूप अंत पाहून ती पिवळीशार बस परतली. तीच्या परतीची दिशा जातानाच्या उलटी असायला हवी होती. सकाळी नेतानाचा आणि संध्याकाळी सोडतानाचा तीचा मार्ग व दिशा एकच होती. बंडयाने तीच्या विचित्रपणाची अजून एक खूणगाठ मनाशी बांधली. ती छोटी मुलगी उतरली. बसच्या दारावरला थापेचा मोठ्ठा आवाज आला. बस धडधडत निघून गेली. तशाच धडधडत्या अंतःकरणाने बंडया मोठी हिंमत करून त्या मुलीच्या दिशेने निघाला. आज तीचा केवळ पाठलाग करून ती कुठल्या घरात शिरते एवढेच बघून घ्यावे. असा पळपुटा विचार एकवार बंडयाच्या मनात आलाही. पण बसप्रमाणेच तीसुद्धा मध्ये कुठे हवेत गायब झाली तर? असा सारासार विचार करून बंडया तीच्या रोखाने निघाला.
तोच ते घडले, एक जाडा माणूस एका काळया मांजरामागे तीच्या मार्गाला आडवा गेला. त्याला तीचा, तीला त्याचा धक्का लागला. कोणाचा तरी एकाचा पाण्याने निसरडया बनलेल्या चिखलात तोल गेला. दुसर्याला मदतीसाठी धरायच्या नादात त्यालाही चिखलात लोळवले गेले. पाणी त्या जाडयाच्या धक्क्याने जोरदार हालले. बंडया त्या मुलीला सावरायला धावला. त्याच्या धावण्याच्या खळखळाटाने चिखलाचे पाणी उडून त्या जाडयाच्या नाकातोंडात पुन्हा गेले. हिंस्र श्वापदासारखा जाडयाने चेहरा फेंदारला. जोरात मान व चेहरा झटकला. डोळयात पाणी जाऊन का कशाने त्याचे डोळे लाल खंदिगरासारखे झाले होते. त्याचा अवतार पाहून बंडया घाबरला. ती मुलगी मात्र शांतपणे उठून उभी राहीली. तीने एकवार मारक्या म्हशीच्या नजरेने त्या जाडयाकडे पाहीले. मग आपले दप्तर आणि चिखलात पडलेल्या चीजवस्तू ती गोळा करायला लागली. “ए पोरटे, “ जाडयाने उठून तीचा कान धरत खडसावले. तीने सरळ हातात करकटक व तसेच काहितरी टोकेरी साधन आले होते, ते त्याच्या गुडघ्यात खुपसून दिले. जाडयाने आकाशाच्या दिशेने तोंड वासत “आँ!”करून एक डरकाळी मारून दिली. तेव्हा त्याच्या पायावर दप्तर मारून देऊन तीने परत एकदा त्याला चिखलात लोळवला. एवढे केल्यावर बंडयाचा हात धरून तीने त्याच्यासोबत तिथून पळ काढला. पिसाळलेला जाड्या पुन्हा भानावर येईपर्यंत ती दोघं त्याच्या नजरेआड सुरक्षित ठिकाणी पोहोचली देखिल होती.
“गुंडी ठाकर” या वाघीणीबरोबर आपला परिचय देताना बंडया मनोमन लाजला. त्याला दिसले वाघीण जखमी झाली होती. तीच्या हाताच्या कोपर्यातून खरचटल्याचे रक्त येत होते.तीने त्यात काय मोठेसे म्हणून नाक उडवले.पण बंडयाने जखमेवर हळूवारपणे फुंकर घातली. “आता कसे वाटते?” विचारले. त्यावर तीने हसून बरे वाटते म्हटले. बंडयाचा जीव भांडयात पडला. याचसाठी केला होता अट्टाहास! आज तीची शाळा चालू कशी? म्हणून बंडयाने चौकशी केली. तीने परत नाक उडवले. “उं! अशीच”. शाळेवर ती नाखूष दिसली. बंडयाने साळसूदपणे तीला शाळा आवडत नाही का? विचारले. तीने अजिबात नाही या अर्थाने मान हलवली. बंडयाने सुस्कारा सोडला.त्याला एक समविचारी साथीदार मिळाला होता. नंतर बंडयाने खोदून खोदून शाळेविषयी विचारायचा बराच प्रयत्न केला. गुंडीने त्याला फारशी दाद लागू दिली नाही. मध्येच एकदा ती साबरी गुरूकुलात जाते, असे काहीतरी बोलली आणि जीभ चावून आता मी जाते म्हणत निघाली. बंडयाने आजच्या दिवसाला इतके तर इतके म्हणत समाधान मानले. बंडया तसा अल्पसंतुष्ट प्राणी होता. अर्थात बंडयाच्या गरजा ज्यांना भागवाव्या लागत, त्या त्याच्या आईबाबांना ही गोष्ट मान्य झाली नसती. असो.
दुसर्या दिवशी कधी नव्हे तो वेळेच्या आधीच बंडया शाळेच्या बससाठी आला. लवकर येण्यामुळे तीला भेटण्याची नामी संधी त्याला मिळाली. काल पडली होती त्या जागी गुंडी काहितरी शोधत होती. ती फारच घाबघुबरी झालेली दिसत होती. कालची वाघीण आज एक म्याँव झाली होती. बंडयाला पाहताच ती आशेने त्याच्याकडे घाईघाईने आली. त्याने काल तिथे चपटी पोलादी कुपी पडताना पाहिली होती का? तीने विचारले.बंडयाला तीची निराशा करताना फार जीवावर आले. तोही गुंडीबरोबर त्या चिखलात ती कुपी शोधू लागला. अजून शोधाशोध पुरीही झाली नव्हती की तीची बस आली. बंडयाने पाहिले एका पान खाऊन रंगणार्या तोंडासारख्या लालजर्द जीभेच्या उग्र बसवाहकाने तीला ओढून आत घेतले. दारावर दणक्यात थाप थोपटली आणि बस सुरू झाली. सुरू होताना बसच्या चाकाने चिखल भुर्र बंडयाच्या कपडयावर उडवला. बंडया मनोमन जाम उखडला. तोच टायर पुढे सरकल्यावर चिखल बाजूला झाल्याने त्या खड्डयात उघडी पडलेली, बंदुकीच्या गोळीच्या आकाराची, चांदीसारखी चमचमणारी कुपी बंडयाच्या नजरेस पडली. बंडयाचे डोळे लखलखले. त्याने ती उचलून घेतली. चांदीची वाटण्यापेक्षा तीच्यात सोन्याची झलक बंड्याला जास्त वाटू लागली. बंडया ती निरखत असतानाच त्याच्या बोकांडी कोणाची तरी मजबूत पकड बसली. बंडयाला बखोट उचलून कोणीतरी वर धरले आणि सात आसमान दाखविले. कालच्याच जाडयाने, त्या हिंस्र श्वापदाने, बंडयाच्या हातातून ती कुपी हिसकावून घेतली. बंडयाला त्याने परत चिखलात फेकला. वाघाने पायापाशी पडलेल्या मेलेल्या उंदराकडे टाकावी तशी तुच्छ नजर त्याने बंडयावर टाकली. बंडयाला पायाखाली चिरडून टाकण्यासाठी त्याने पाय उचलला. एका लालभडक साडी नेसलेल्या बाईने त्याचा तो पाय आपल्या छत्रीच्या मुठीने मागच्या मागे ओढला. तो गेंडा धडामकन् चिखलात तोंडघशी पडला. दातावर आपटला, पण किती दात पडले हे त्याला मोजता आले नाही. दोन लालभडक साडया नेसलेल्या आणि साडयांपेक्षा लालीलाल झालेल्या बायकांच्या छत्र्यांचा छडिमार त्याच्यावर सुरू झाला. त्याने पळ काढला तरीही त्याचा मार चुकला नाही. त्या दोघी त्याच्यामागे हात धुवून लागल्या.
बंडया त्याच्या जाण्याचा अदमास घेऊन खात्री झाल्यावर उठून उभा राहिला. या असल्या चिखल भरल्या अवतारात शाळेत जाणं त्याला शक्यच नव्हत. मग तो आता काय करणार होता? त्याला आठवलं गुंडीला त्या कुपीचं अतोनात महत्व होतं. ती परत मिळवता आली तर त्याला बघायचे होते. झालं तर त्या दोघी राक्षस संहारक देव्यांना भेटून, त्यांच्या पायावर जीव वाचवल्याबद्दल डोके ठेवायचे होते. राक्षस जाडया जर का हात, पाय शाबूत अवस्थेत नसला तर त्याला दोन, चार लाथा मारायच्या होत्या. त्यासाठी आधी जाडयाला शोधुन काढणं भाग होतं. बंडयाने जाडया पळाला होता त्याच दिशेने कूच केले. बंडयाची निराशा झाली. थोडयाच अंतरावर जाडया पानाच्या ठेल्यावर हाती, पायी सलामत धडधाकट उभा होता. लाथा हाणण्यापेक्षा लाथा वाचवण्यासाठी बंडयाला आडोसा शोधावा लागला.
जाडयाने पानवाल्या राघवला कुपी दाखवून काही विचारले. पानवाल्याच्या अंगावर एक नोट फेकली. पान घेऊन तोंडात घातले. ते चघळता चघळता जाडया आपल्या शरिराच्या दुखर्या भागांची हाताने हलके हलके चाचपडून भलामत करत होता. पानवाल्याने दुकानात बरीच शोधाशोध करून एक काळा दोरा शोधून काढला. तो घेऊन दांडगोबाने कुपी त्यात ओवली आणि स्वतःच्या गळयात बांधली. पचकन पानाची पिचकारी तिथल्या रंगलेल्या भिंतीवर मारली आणि स्वारी निघाली. एका दुचाकी गाडीवर जाऊन बसली. गाडी सुरू होऊन फुर्रकन छू सुद्धा झाली. बंडयाला केवळ बघत राहण्यापलिकडे काही करता आले नाही.
गुंडीच्या शाळेच्या बसची परतीची वेळ बंडयाला माहित झाली होती. तो तीची भेट घ्यायला परत रस्त्यावर आला. गुंडीची बस आली. गुंडी उतरली. बस निघून गेली. गुंडीचा कालचा आवेश गायब होता. तीने परत सैरभैर सगळीकडे शोधाशोध करायला सुरूवात केली. बंडया तीला भेटला. त्या जाडया दांडगटाबद्दल सांगितले. तीचे डोळे चमकले. बंडया तीला दुकानापाशी घेऊन गेला. तीने सरळ पानवाल्या राघवला कुपीबद्दल विचारले. त्याने दोघांनाही वाटेला लावले. गुंडी जाम घायकुतीला आली. हातवारे करत मोठयामोठयाने ती काहीबाही बरळू लागली. ती काय बडबड करतेय? मध्येच दुसर्याच कसल्या भाषेत बडबडतेय, बंडयाला काही कळले नाही.
“एका कुपीचे ते काय? असेना सोनेरी.”
“सोनेरी नव्हे चंदेरी, “गुंडीने त्याला फटकारले. बंडया जरा तिरमिरला.
“मातीत मला ती चंदेरी वाटली होती, पण मी हातात धरली तेव्हा ती सोन्यासारखी पिवळी दिसत होती.”बंडयाने ठासून सांगितले.
“छट, पोलादी कुपी चंदेरी असते.”
“चंदेरी तर चंदेरी. “ बंडयाने हात उडवले, “ त्यात काय? आई बाबा जरा रागावतील. फार तर दोन दिवस कोंडून ठेवतील. एवढेच. त्याचे काय? एवढे आहे तरी काय त्यात? “बंडयाने तीला विचारले. त्यात काय आहे ते तर गुंडीला स्वतःलाच माहित नव्हते. पण ती कुपी मिळाली नाही तर गुंडीला शाळेतून काढून टाकणार होते.
बंडयाला विनोद करण्याची उबळ आली. “वा! हे फारच छान. मला जर माझ्या शाळेतून अशी कुपी देण्यात आली तर पहिल्या झटक्यात ती कुठेतरी फेकून देईन. शाळेतून सुटलो तर अजून काय पाहिजे?” बंडयाच्या तोंडातून जणू लाखो करोडो मुलांचे मनोगत शब्दात उतरले होते. इतके इतके खरे आणि म्हणूनच कितके कितके बोचरे. “खरेच का तुला शाळेतून काढून टाकणार असतील तर तू.. तू? “ गुंडीला तीचे वाक्य पुरे करता आले नाही. बंडयाने खरोखर स्वतःवर अशी परिस्थिती ओढवली तर काय होईल याचा विचार केला आणि तो गंभीर बनला. शाळा कितीही नावडती असली तरी त्याच्यासारख्या लहान मुलांच्या आयुष्यात शाळा नसेल तर त्यासारखे लाजिरवाणे काहीच असणार नव्हते. नुस्ते नापास झाले तर एवढा गहजब होतो. मग शाळेतून काढून टाकले तर काय? या कल्पनेने त्याचे डोके गरगरले. त्याच्या डोळयासमोर चहाच्या हॉटेलात कप,बश्या विसळणारा बाबू आला. सगळीकडे हिडूस, फिडूस होणारा बाबू. इतर मुले त्याला बाबू न म्हणता “हाड हाड बाबू” म्हणत. “हाड हाड बंडया” ऐकणं त्याला कससंच वाटलं असतं.
“तुझ्या आईबाबांना हे माहित आहे का?” बंडयाने खबर मुख्य शत्रुपक्षापर्यंत पोहोचली आहे का याचा अंदाज घेण्यासाठी विचारले. “अजून नाही.” गुंडीने रडवेल्या मुद्रेने, मरण का कधी कोणाला टळले आहे? अशा अर्थाने म्हटले.
“पण त्यात तुझा काय दोष आहे? “बंडयाने असे म्हणताच गुंडीचे डोळे भरून वाहवले. आजपर्यंत कधी कोणी असा विश्वास तीच्यावर दाखवला नव्हता. सगळे तीला उनाड, चुकार, वाया गेलेली समजत होते. कुपी तीच्या हातातून अपघाताने नव्हे, तर काही कलागतीत पडली असणार असेच सगळे समजणार होते. बाबांनी तर तीनेच खोडसाळपणे लपवलीय असे म्हणायला कमी केले नसते. बंडयाला तीला कसे शांत करावे समजेना.
बंडयाने वैतागाने समोरच्या भिंतीवर लाथ मारली. “ही त्या दांडगटाची पिचकारी,”म्हणत त्या लाल रंगाच्या पिचकारीवर बंडयाने अजून एक लाथ मारली. तो जर सापडला ना, तर त्याला अशीच एक लाथ हाणली पाहिजे. सकाळचा मानगुटी धरल्याचा अपमानास्पद प्रसंग बंडयाला आठवला.
“ही त्याची पिचकारी आहे? “ गुंडीचे डोळे लकाकले.
“ हो, का? “बंडयाला तीने असे का विचारावे याचे नवल वाटले. गुंडीने त्या पिचकारीचा काही भाग खरवडून काही पुटे आपल्या तळहातावर घेतली. अर्धवट तोंडात पुटपुटत ती काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करू लागली. तीच ती मगासची अगम्य भाषा.
“तू काय करतेस? “
“मंत्र आठवतेय.”
“मंत्र, कसला मंत्र? “
“तुला कळणार नाही.”
“हि कुठली भाषा आहे? कानडी? “
“नाही साबरी,” म्हणताच तीने कालच्यासारखी जीभ चावली.
“साबरी शाळा, साबरी भाषा हे काय आहे?”
“ते मी तुला सांगू शकत नाही.”
“मला का नाही? “
“कारण तू एक अदिक्षीत आहेस.”
“अदिक्षीत? ते काय असते बुवा अशिक्षीत सारखे?”
“मी तशी शपथ घेतलीय. आता तू जा. तुझ्या घरी वाट बघत असणार. तुला उशीर झालाय ना.” गुंडीने बंडयाला बोळवले.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users