आमचं कोकणातल घर आहे जुन्या पदध्तीचं..... कौलारु.... ओटी, माजघर, देवघर, सैपाकघर आणि परसदार अशी रचना असलेलं. घर खूप मोठ असलं तरी त्या वेळच्या पद्धती प्रमाणे या घराला खोल्या तशा जास्त नाहीत. मुख्य घराच्या लेवलला एकच आहे खोली. तीच ही बोळाची खोली. बाकीच्या सगळ्या खोल्या चार पाच पायर्या खालच्या लेवलला आहेत.
या खोलीला माजघरातुन आत जायला दार आहे. एका बाजुला ओटीची भिंत आणि एका बाजुला माजघराची भित असल्याने हिला फक्त एकाच बाजूने दोन छोट्या छोट्या खिडक्या आहेत, ज्या उघडल्या तरी खोलीत फारसा प्रकाश येत नाही.माजघराच्या दारातुन प्रकाशाचा काय कवडसा येइल तेवढाच प्रकाश. पूर्वीच्या काळी काही घरातुन बाळंतीणीची खोली अशी असे काळोखी. पण ही आमची खोली बाळंतीणीची नाहिये. बाळंतीणीची दुसरी स्वतंत्र खोली आहे. ही खोली फारशी मोठी ही नाहिये. असेल आठ नऊ फूट रूंद आणि दहा अकरा फूट लांब. अश्या लांबोडक्या, बोळासारख्या रचनेमुळेच हिला बोळाची खोली हे नाव पडले असेल. तशातच माजघरतुन माळ्यावर जाणार्या जिन्याने ही ह्या खोलीचा काही भाग व्यापला आहेच.
ह्या खोलीत आहे एक माचा, ज्यावर वर भरपूर गाद्या रचुन ठेवलेल्या असतात. त्यामुळे एक छोटीशी उडी मारल्या शिवाय ह्या माच्यावर बसता येत नाही ( स्मित ) . एका भितीच्य कडेला एक छोटसं कपाट आणि एक मोठसं फडताळ आहे . एका छोट्या लाकडी स्टुलावर एक भरपूर आवाज करणारा टेबल फॅन आहे. ह्या खोलीची जमीन आम्ही कित्येक वर्ष सारवणाचीच ठेवली होती आग्रहाने, पण अलीकडेच ह्या खोलीला ही फरशी बसवून घेतली आहे. आणि हो बाकी उजेडाच्या दृष्टीने उजेडच असल्याने उजेडा साठी एक पिवळ्या प्रकाशाचा बल्ब आहे . एकंदर खोलीच्या सजावटीला तो शोभुन दिसणाराच आहे.
ह्या खोलीच्या मध्यवर्ती स्थानामुळे माझे तिकडे रहाणारे सासरे दुपारी ह्याच खोलीत झोपत असत. त्यामुळे त्यांना सगळीकडे नजर ठेवणे सोपे जाई. पण आता ते गेल्या नंतर मात्र घरातल्या बायकांनी दुपारच्या विश्रांतीसाठी हिचा ताबा घेतला आहे. दुपारी जेवणं झाली की आम्ही सगळ्याजणी ह्याच खोलीत आडव्या होतो. एक दोघी जणी माच्यावर, दोघी़ जणी खाली चटईवर, एखादी त्यांच्या पायाशी ........ कधी कधी न झोपता हळू हळु आवाजात मस्त गपा ही रंगतात आमच्या. हं पण पुरेसा उजेड नसल्याने वाचत वाचत झोपण्याचे सुख मात्र इथे मिळत नाही. उन्हाळ्यात दुपारी लाईट गेले तर मात्र एरवी बाहेर आडव्या होणार्या ही ह्याच खोलीत झोपायला धडपडतात कारण उन्हाळ्यात गार आणि हिवाळ्यात उबदार असते ही खोली. तसेच पावसाळ्यात कोकणात कितीही काही ही केलं तरी माशांचा उपद्रव असतोच. आणि त्यात लाईट गेलेले असले तर पंखा ही नसल्यामुळे तर जास्तच त्रास देतात माशा. पण ही खोली मात्र याला अपवाद आहे कारण काळोखामुळे इथे माशा जराही नसतात.
एखाद लहान मुल खूप मस्ती करायच्या नादात सैराट झाल असेल आणि झोपायच नाव घेत नसेल तर ह्या खोलीत नेऊन झोपवल की हमखास झोपत ते खोलीत असलेल्या काळोखामुळे आणि गारव्यामुळे. आमच्याकडे अजूनही सुट्टीत दुपारी मुलं डबा ऐसपैस किंवा लपंडाव खेळतात. बोळाची खोली म्हणजे मुलांचा लपण्याचा हुकमाचा एक्काच. इथल्या फडताळातत ठेवलेल्या डब्यातले दाणे, गूळ वैगेरे मस्त पैकी चरत लपून बसलेली असतात मुलं ह्या खोलीत. आम्ही कोणी त्याच वेळी खोलीत गेलो आणि दिवा लावला तर मात्र त्यांच्या डोळ्यात एकाच वेळी भिती आश्चर्य आणि " ही आत्ता का आलीय इथे " असे भाव उमटतात आणि आपसुकच तोंडावर बोट ठेउन "प्लिज, सांगु नकोस" अशी न बोलता विनंती वजा आज्ञा ही केली जाते. कोणी सर्दी तापाने वैगेरे आजारी असेल तर त्याचे ही अंथरुण ह्याच खोलीत पडते. मुख्य घराला जवळ असल्याने सतत लक्ष रहाते आणि आजार्याचं हवं नको पहाणं ही सुलभ होतं.
आमचं खूप मोठं कुटूंब आहे कोकणात. नेहमी माणसांची वर्दळ असते घरात. आणि आगरात गडी माणसं ही वावरत असतात सतत . एवढ्या माणसात नवीन लग्न झालेल्या आमच्या मुलांना शहरात मिळतो तसा मोकळेपणा नाही मिळत. पण इथे ही बोळाची खोली त्यांच्या मदतीला धावून येते . ( स्मित)
घरात काही मंगल कार्य असेल तेव्हा मात्र ह्या खोलीच रुपच बदलुन जात. खोली रंगीबेरंगी आणि एकदम कलर फुल दिसायला लागते. निरनिराळ्या प्रकारच्या रेंगीबेरंगी साड्या, दागिने प्रसाधनं , अत्तरं , फुलांचे गजरे, गप्पा, हास्याचे चित्कार यांनी खोली भरुन जाते. कारण अशा प्रसंगी बायकांची ड्रेसिंग रुम बनते ही खोली. त्या पिवळ्या दिव्याच्या प्रकाशात सगळ्यांचा नट्टापट्टा चाललेला असतो. सगळा जामानिमा झाला की हल्ली एखादा सेल्फी ही काढला जातो खोलीतुन बाहेर पडायच्या आधी. शंभरहुन अधिक वर्षापूर्वी हे घर जेव्हा बांधलं तेव्हा भविष्यात हे असं काही होईल अशी पुसटशी कल्पना तरी केली असेल का ह्या खोलीने?
एकदा एका मे महिन्यात आमच्या घरी खूप पाव्हणे मंडळी जमली होती.त्यात माझ्या एक नणंद बाई ही होत्या. दुपारच्या जेवणाची वेळ होती. आधी मुलांची पंगत मग पुरषांची आणि मग आम्ही बायका अशी पद्ध्त आहे आमच्याकडे . जेवायला वेळ होता म्हणून त्या बोळाच्या खोलीत आडव्या व्हायला गेल्या होत्या. बायकांच्या पंगतीसाठी ताटं घेताना अगदी आठ्वुन आठवून, मेळ घालत, कोण जेवलं कोण राहिलय अशी बोटं मोजुन ताटं मांडली . आम्ही जेवायला सुरवात केली . माझ्या एक सासुबाई आम्हाला अन्न गरम करुन द्यायला उभ्या होत्या गप्पा मारत मारत सावकाशपणे आमची जेवणं चालली होती. आणि अचानक ह्या माझ्या नणंद बाई येऊन उभ्या राहिल्या. आमचं तर बोलणच बंद झाल. " असे कसे ह्यांना विसरलो " ही अपराधी पणाची भावना प्रत्येकीच्या चेहर्यावर उमटली. पण त्यानीच सावरुन घेतल. ह्या गोष्टीचा अजिबात इश्यु केला नाही. माझ्या सासुबाईनी त्यांना पटकन ताट वाढुन दिल आणि त्यांनी ही काही झालचं नाहीये असं दाखवून हसत खेळत जेवायला सुरवात केली. पण तेव्हा पासुन जास्त पाव्हणे असले की शेवटच्या पंगतीच्या वेळेस बोळाच्या खोलीत कोणी नाहिये ना याची खातरजमा करुन घेण्याची सवय आमच्या अंगवळणी पडली आहे.
अशी ही आमची बोळाची खोली . माणसाच हृदय कसं त्याच्या शरीराच्या आकाराने मानाने लहानच असत तसच ही खोली ही एकंदर घराच्या आकराच्या मानाने लहान असली तरीही आमच्या घराच ह्रूदयच आहे जणु.......
छान...
छान...
सुरेख.
सुरेख.
अमितदादा , देवकी
अमितदादा , देवकी प्रतिसादासाठी खूप खूप आभार.
सुंदर लेख. राजा राजवाडे
सुंदर लेख. राजा राजवाडे ह्यांच्या "घर आमचं कोकणातलं" ह्या पुस्तकाची आठवण झाली. आमच पण घर आहे कोकणात. खूप मस्त गारवा असतो बोळाच्या (आमच्याकडे त्याला माजघर म्हणतात) खोलीत. आमच्या माजघरातच देवघर आहे त्यामुळे प्रत्येक सणाला माजघर मस्त सजवलेले असते गणपतीत तर प्रत्येक दिवस आरत्या असतात आणि शेवटचे तीन दिवस म्हणजे माजघरात आरत्यांचा पाऊस असतो. खरंच उन्हाळ्यात थंडगार आणि हिवाळ्यात उबदार. तुम्ही लिहिल्या प्रमाणेच ह्या खोलीचा उपयोग दुपारच्या विश्रांती साठी छान होतो. लेख वाचून लहानपणी उन्हाळ्यात , गणपतीत केलेली मौज मजा आठवते. अजून सुद्धा गणपतीत गावावरून निघताना एक हुरहूर वाटते.
मस्त.. अगदी त्या खोलीसकट घर
मस्त.. अगदी त्या खोलीसकट घर डोळ्यासमोर आले.
हि अशी घराची पद्धत मी मालवणला नाही बघितली. तिथे घराचे स्वरुप म्हणजे पुढे ओसरी मग त्याला लागून मोठे माजघर आणि त्याच्या मागे स्वयंपाक घर. त्या माजघराला लागून काही खोल्या, वरच्या मजल्यावर जाणारा जिना. माजघराच्या मागे न्हाणीघर आणि बाजूला बाव (विहीर )
आमचे मालवणचे घर असेच होते. ( अजूनही आहे, पण ते आता आमचे नाही. ) तिथे एक हॉटेल निघाले होते.. मी मात्र नंतर कधी त्या वाटेलाही गेलो नाही.
खूप मस्त लिहिले आहेस ग.
खूप मस्त लिहिले आहेस ग.
कोकणी घरे बाहेरून ठेंगणी ठुस्की वाटतात. बहुतेक पावसाचा मारा चुकवण्यासाठीच कि काय, त्यांची छप्परे खूप उतरती असतात. त्यामुळे आत घर किती मोठे आहे हे बाहेरून बघून पत्ता लागत नाही. आत गेल्यावरच कळते. खूप शांत वाटतात कोकणी घरे.
ममो ...काय छान लिहिलंस
ममो ...काय छान लिहिलंस गं!
आधी मी बाळाची खोली वाचलं....म्हटलं ....असेल जुन्या घरातल्या अंधार्या बाळंतिणीच्या खोलीविषयी!
आमच्या जुन्या घरात अशी एक अंधारी बाळंतिणीची खोली होती.
अजून डोळ्यापुढे आहे. ती बाज, शेजारी पाळणा, बाजेवरची डोक्यावरून पदर घेतलेली बाळंतीण!
असो...
त्या जुन्या घरात आधी सोपा. ४ पायर्या चढल्या की सोप्याचा वरचा भाग. तिथल्या खांबाला लावलेल्या तक्क्याला टेकून बसलेले आजोबा... ज्यांना आम्ही ...सगळेच हबू म्हणायचो. हरीभाऊ चा शॉर्ट्फॉर्म.
मग उजवीकडून आत शिरलं की फडताळाची खोली. याच खोलीच्या कोपर्यात एक दार होतं असेल ३ फूट उंचीचं. त्याला कुलूप आणि त्याची किल्ली आजीकडे असं अंधूक स्मरतय. वाकून आत जायला लागायचं मोठ्यां ना.
आत सगळे फराळाचे पदार्थ असत. अजून खूप काही आहे लिहिण्यासारख!
खूप सुंदर लिहिलंय.
खूप सुंदर लिहिलंय.
खूप छान लिहिलेय . साधना +१
खूप छान लिहिलेय . साधना +१
आमचंही कोकणातलं घर असच आहे .पण त्या बोळाच्या खोलीची मला लहानपणी भीतीच वाटायची . अंधारी असल्याने
ममो मस्त लिहिले आहेत. माझ्या
ममो
मस्त लिहिले आहेत. माझ्या वडिलांचे असेच घर सातार्यात होते. (आता ते पडले, कारण भावंडे भांडायला जमायची पण डागडुजी करायला कुणीच यायचे नाही, वडील करून करून थकले). पण तिथे देखील अशीच एक मस्त बोळाची खोली होती. अगदी त्याच खोलीची आठवण झाली.
हेमा.खूप मस्त लिहितेस.तुझ
हेमा.खूप मस्त लिहितेस.तुझ कोकणातल आणि मनातल घर अगदि डोळ्यासमोर उभ केल आहेस.बोळाची खोलितर खूपच मस्त.दुपारचे जेवण झल्यावर बायकाना गप्पा मरारयला अशी काळोखी खोली हवीच.कल्पनेनीच खूप आराम मिळाला.तुझ्या घरात अजून काय काय दडलय् ते तझ्य शब्दातून येऊदे आमच्याकडे..खूप मस्त..
खूप सुंदर!
खूप सुंदर!
कित्ती सुंदर लिहीतेस ममो!
कित्ती सुंदर लिहीतेस ममो!
खूपच छान लिहिलंय तुम्ही! पण
खूपच छान लिहिलंय तुम्ही! पण खरं सांगायचं तर ' बोळाची खोली ' म्हटल्यावर गानू आजींची गोष्टच डोळ्यासमोर आली
पण कुठे ती भीतीदायक खोली आणि कुठे ही तुमची प्रसन्न, निवांत आणि आनंदाच्या आठवणी करून देणारी खोली!
आमच्या कोकणातल्या घरी माजघर आणि शेजारची पडवी या दोन खोल्यांना हा मान आहे. हळू आवाजात चाललेल्या गप्पा आणि हास्याचे फवारे!
ममो..अगदी तुझं कोकणातलं घरच
ममो..अगदी तुझं कोकणातलं घरच उभं केलंस डोळ्यासमोर
खूप गोड वर्णन करतेस तू.. आवडली ही जम्माडी गम्मत करण्याची खोली..
मस्त डोळ्यासमोर आली खोली आणि
मस्त डोळ्यासमोर आली खोली
आणि एक आठवणही.. ,
आम्ही मित्र-मित्र एका मित्राच्या गावी गेलो होतो. गुहागरच्या नजीक कुठेतरी आहे. तिथेही अशीच एक अंधारी खोली आणि गंमत म्हणजे वर मोठठाला माळाही होता. आम्हाला तिथे तात्पुरते सामान ठेवायला सांगितले आणि आधी जेवून घ्या मग तुमची दुसरीकडे सोय करतो असे सांगण्यात आले. पण जेवायच्या आधी तिथे सामान ठेवणे आणि कपडे बदलणे या पाऊणेक तासांत आम्ही सर्वजण ईतके त्या खोलीच्या प्रेमात पडलो की मित्राला सांगून आम्ही तीच खोली मागून घेतली. .. पुढचे चार दिवस मुक्काम तिथेच होता
रात्री दहा वाजताच, मुंबईच्या जीवनशैलीच्या अगदी विपरीत आम्ही तो ईवलासा प्रकाशही गुडूप करून निम्मे खाली तर निम्मे वर माळ्यावर पसरायचो, आणि पडल्यापडल्या अंधारात आणि कमालीच्या शांततेत, पावसाळी वातावरणातून आलेल्या जादूई गारव्यात आणि त्या पावसाच्याच तेवढ्या रिपरिप आवाजात, आम्हाला शोभणार नाही अश्या हळूवार गप्पा मारायचो.. कमाल आठवणी आहेत
किती मस्त लिहिलंय. फोटो टाक
किती मस्त लिहिलंय. फोटो टाक ना.
फोटो टाक ना. >>> नाही हं,
फोटो टाक ना.
>>>
नाही हं, फोटो टाकला की गंमत जाते
असला तरी एवढ्यात टाकू नकाच
सगळ्या प्रतिसादकांचे मनापासुन
सगळ्या प्रतिसादकांचे मनापासुन आभार.
सगळ्यांच्याच मनातल्या बोळाच्या खोली बद्दलच्या आठवणी वाचायला किती छान वाटतय.
मामी, खोलीचा फोटो नाहीये. आणि फोटो टाकण्यासारख काय आहे त्या खोलीत? एक पलंग, एक कपाट आणि खूप सारा काळोख ( स्मित )
नाही हं, फोटो टाकला की गंमत जाते स्मित
असला तरी एवढ्यात टाकू नकाच >>> ऋ बरोबर आहे . आणि फोटो नाही सुद्धा आहे.
सुरेख.
सुरेख.
मस्त लिहयलं!
मस्त लिहयलं!
खुप सुंदर! आवडलं. मिसिंग जुनं
खुप सुंदर! आवडलं.
मिसिंग जुनं घर.
वा हेमाताई नेहमी प्रमाणेच
वा हेमाताई नेहमी प्रमाणेच सुंदर लिखाण. डोळ्यासमोर आली ती खोली.
माझ्या माहेरीही प्रत्येक खोलीला नाव होत. देवाची खोली, झोपायची खोली, कोठीची खोली आठवल्या सगळ्या.
कोठीच्या खोलीत भिंतीने बांधलेली कोठी होती त्यात वर्षभराचा तांदूळ असायचा.
किती सुंदर लिहलय..अस वाटल आपण
किती सुंदर लिहलय..अस वाटल आपण जाऊन एक झोप काढुन याव त्या बोळाच्या खोलीत.
असली घरं कीतीही प्रिय वाटली
असली घरं कीतीही प्रिय वाटली तरी कोंदट वाटतात,विषेशतः कोकणातल्या कुंद आणि दमट वातावरणात.माझ्या मावशीचे घर मात्र हवेशीर् होते,पुढे आंगण मागे पडवी ,पडवीत आंबा ,लिंबु ,जास्वंदी,पपनसाच झाड .आता तिथं त्यांनी बंगला बांधल्यामुळे ते घर राहीले नाही.
छान लिहीले आहे. पण घरे अशीच
छान लिहीले आहे.
पण घरे अशीच का बांधत? हवेशीर उजेडाच्या खोल्या नसतच का? केरळ किंवा गोव्यात वगैरे कोकण सारखी हवा असते पण तिथली घरे मोठी, हवेशीर असतात. उजेडाची कमी नसते.
ते अंधारं माजघर वगैरे एकदम धारपांच्या कथेतल्या सारखे वाट्ते. केरळ मधली लॉरी बेकर स्टाइलची झरोके वगैरे असलेली घरे काय मस्त दिसतात.
पण घरे अशीच का बांधत? हवेशीर
पण घरे अशीच का बांधत? हवेशीर उजेडाच्या खोल्या नसतच का?
>> कदाचित कोकणात बेक्कार तुफ्फान पाऊस पडत असल्याने एकही फट किंवा तिरीप ठेवणे परवडत नसेल अश्या घरांना. केरळ किंवा गोव्यात काय असते कल्पना नाही.
ममो किती छान लिहिलय. अश्या
ममो किती छान लिहिलय.
अश्या घरांची वर्णन वाचुनच एकदम गारेगार वाटत. तुम्ही खरच भाग्यवान अजुनही तुमच कोकणात घर आहे. लहानपणी नेहमी कोकणात घरी जायचे. आज्जीच माहेर. आता कोकणात जायचे ते रिसॉर्ट मधे राहायला
कोकणात असतात की मोठ्या मोठ्या
कोकणात असतात की मोठ्या मोठ्या खिडक्या. एखादी खोली अंधारी असते. बाहेरच्या पडवीला तर पुढे सर्व ओपन आणि लाकडी दांड्या असतात मोठ्या. असतात हवेशीर घरं. पुढे- मागे मोठं अंगण असते बऱ्याच ठिकाणी.
माहेरचं छान माडीचं आहे माझं, चांगला उजेड, माडीवर पण मोठ्या खिडक्या. एक खोली जरा अंधारी फक्त. सासरी आता नवीन कौलारू बांधलंय १५ वर्षापूर्वी ते माडीचं नाहीये. पण मोठ्या खिडक्या आणि हवेशीर आहे. एका खोलीत जरा कमी उजेड येतो पण अंधारी नाहीये. सगळीकडे तीन बाजूने दारं- खिडक्या आहेत. सामायिक घर आहे त्यामुळे एका बाजुला लागून चुलत दिरांचं आहे. ती बाजु मोकळी नाही.
मला स्वतःला माडीचं घर जास्त आवडतं. सासरी नाहीये ती थोडी खंत वाटते, ते उतरत्या छपराचं आहे. सासरचं आतून माळा बांधण्याएवढं उंच आहे पण माडीचं हवं होतं.
व्वा! काय सुरेख लिहीलाय...
व्वा! काय सुरेख लिहीलाय... अगदी चित्र डोळ्या समोर उभे झाले..
खुप खुप आवडला..
Pages