असे वाटताहे तुला पाहिल्यावर...

Submitted by सत्यजित... on 29 July, 2016 - 16:55

असे वाटताहे तुला पाहिल्यावर...
फुला वाटते जे,कुणा वाहिल्यावर!

कशी सांग भेटू नव्याने तुला मी...
उरी डाग गहिरा,जुना राहिल्यावर!

नको चिंब भिजण्या सरी पावसाच्या...
नदी जाहले मी धुके वाहिल्यावर!

तुझा पावसाळा फिरंगी मिठींचा...
बरसतो खरे,पण..मला दाहिल्यावर!

किती जीवना हे..सुगंधी उसासे!
नवा श्वास घेते,जुना साहिल्यावर!

—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users