गजनृत्य... धनगरी समाजाचं पारंपरिक नृत्य. मेंढरामागं धावत धावत जीवन उभं करणाऱ्या धनगर समाजाचा हाच एक हक्काचा विरंगुळा. पावसाळ्याच्या चार महिन्यात गावी असलेल्या धनगरांची पावलं सायंकाळी मेंढरांना वाड्यात कोंडलं की ढोलाच्या आवाजाच्या दिशेनं पडतात. मग सुरू होतं गजनृत्य आणि 'सुंभरानं मांडिलं गा, सुंभरानं माडिलं,' चा घोष! धनगरी समाजाच्या अस्मितेचं प्रतीक असणारं हे गजनृत्य आता माणदेशातील सर्व जातीधर्माची शाळकरी मुलं पुढं नेतायत. माणदेशात छोट्या-छोट्या 'बनगरवाड्या' बहुसंख्येनं आहेत. त्यामुळं धनगर समाज इथं एकवटलेला आहे. त्यामुळं माणदेशी महोत्सवाला धनगरी बाज नसता तरचं नवल.
काय आहे गजनृत्य...
मेंढपाळ असणारा धनगरी समाज हा नृत्य प्रकार सादर करतो. धनगर मेंढी, बकर्या यांचे कळप पाळतात आणि तेच त्यांच्या दैनंदिन जीवनाचं साधन असतं. त्यांचं जीवन सदाहरित हिरवी झाडं, निसर्ग यातूनच प्रेरित झालेलं असतं आणि ते ओव्यांच्या रूपानं त्यांच्या ओठी येतं. या सर्व कविता बर्याचदा त्यांचं दैवत सतोबा याच्याशी संबंधित वर्णन करणाऱ्या असतात. धनगरी नृत्य ही त्यांची पूजा आहे. म्हणजे हा समाज आपल्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी आणि त्याचे आशीर्वाद मिळवण्यासाठी धनगरी गाजा सादर करतात. हे नृत्य गोलाकार फेर धरून ढोलाच्या तालावर केलं जातं. पारंपरिक वेशभूषा या गजनृत्यासाठी धनगरी पारंपरिक वेशभूषा वापरली जाते. पायात घुंगरू चाळ, फेटे, चोळणा, रंगीत रुमाल, घाटन्या आदी वस्तू वापरल्या जातात, त्याला ढोल आणि काठीनं साथ दिली जाते.
धनगर ही शेळ्या-मेंढय़ा राखणारी जमात. गोकुळ, वृंदावन आणि मथुरेहून मजल दरमजल करीत धनगर बंधू गुजरात आणि पुढे महाराष्ट्रात आले. हटकर, व्हटकर, कुटेकर, शेंगर, अहिर, कुरुबा, भारवाड, खाटिक, कोकणी धनगर यासह धनगर समाजाचे जवळपास १४ उपघटक. शंकर, विष्णू, पार्वती, महालक्ष्मी ही त्यांची कुलदैवते. विरोबा, शिदोबा, खंडोबा, म्हसोबा, विठोबा, तुळाई, यमाई, अंबाबाई त्यांचे देव. धनगरी ओव्या गुणगुणायला लावणारया तर धनगरी नृत्य म्हणजे कुणालाही ठेका धरायला लावणारे. पावसाळ्याचे चार महिने सोडल्यास धनगरांची वर्षाचे आठ महिने भटकंती ठरलेली. त्यांचे मार्गही ठरलेले. घोडय़ावर संसार. शेळ्या-मेंढय़ा, कुत्रे, कोंबडय़ा त्यांचे सखेसोबती. ना घर ना दार, नाही शिक्षण, नाही नोकरी अशा बिकट अवस्थेत भटकंती करणारे धनगर बंधू. अजूनही सामाजिक, आर्थिकदृष्टय़ा मागासलेले आणि राजकीयदृष्टय़ा असंघटित. पारंपरिक शिक्षणापासून हा समाज वर्षानुवर्षे वंचित होता. तरीसुद्धा आपल्या कुलदैवतांची आराधना, प्रार्थना करणाऱ्या "ओव्या' मौखिक रूपात एका पिढीकडून पुढच्या पिढीला शिकविल्या गेल्या. त्या ओव्या "मौखिक वाङ्मय' या सदरात मोडतात. छापील ठोस लेखन-साहित्य आजही उपलब्ध होऊ शकले नाही, कारण "निरक्षरता'! तरीही तोंडी, पाठांतराद्वारा या सांस्कृतिक ठेव्याचे जतन हजारो वर्षे धनगरांनी केले, हे अत्यंत कौतुकास्पद आहे.
आजच्या "साक्षर' पिढीला "मौखिक वाङ्मय' हा शब्द कदाचित खटकणारा वाटेल, तरीही हा शब्दप्रयोग योग्य आहे, असे मला ठामपणे नमूद करावेसे वाटते. धनगर समाज आपल्या राज्यापुरते बोलायचे झाल्यास तो राज्यातील सर्वात मोठा मेंढपाळ, पशुपालक समाज आहे. काही धनगर शेतीसुद्धा करतात. घोंगड्या विणणाऱयांना "सनगर' म्हणतात, तर मेंढ्या पाळणाऱ्यांना "हाटकर' म्हणतात. आपल्या मेंढ्यांना बरोबर घेऊन धनगर दिवाळीनंतर चाऱ्यासाठी भटकंती करीत असत. पावसाळ्याच्या सुमारास आपापल्या गावी परतत असत. पुढे पावसाळी चार महिने गावातच राहत असत.
"खेळ' हा त्यांचा मोठा उत्सव कुलदैवतांच्या आराधनेसाठी साजरा केला जातो. प्रामुख्याने खंडोबा (जेजुरीचा), धुळोबा (विडणीचा), बिरोबा (आरेवाडीचा), मायाक्का (चिंचणीची), भिवाई (कांबळेश्वरची), शिंग्रुबा (खंडाळ्याचा)... या देव-देवतांची आराधना, स्मरण करण्यासाठी या "ओव्या' मराठीत म्हटल्या जातात. ओवीच्या सुरवातीला सूर्य, चंद्र, पृथ्वी (जमीन), नद्या, मेघ (ढग) यांना नमन करून कुलदेवतांचे स्मरण केले जाते. ढोल व झांजांच्या तालावर, ठेक्यात व ठसक्यात या ओव्या गायल्या जातात. बऱयाच वेळा बासुरी (पावा) सुद्धा वाजवली जातो.
जात्यावर गायल्या जाणाऱ्या ओव्यांपेक्षा किंवा ज्ञानेश्वरीतील ओव्यांपेक्षा धनगरी ओव्या भिन्न आहेत, वेगळ्या आहेत, हा महत्त्वाचा फरक लक्षात घेणे आवश्यक आहे. धनगरी ओवीचे ढोबळमानाने दोन भाग पडतात. पहिला भाग म्हणजे "गाणे' (पद्यरूपात सादर).
हा भाग "गाऊन' दाखविला जातो. दुसरा भाग म्हणजे "कथा'! हा भाग गोष्टीरूपाने (गद्यरूपात) सांगितला जातो. गाणारे वेगळे असतात. कथा सांगणारे वेगळे असतात. कथेच्या भागाला "सपादनी' म्हणतात. गाण्यातील माहितीच कथारूपाने पुन्हा पुन्हा सांगितली जाते. ओवीची "गायलेली' प्रत्येक ओळ किमान दोन वेळा, तर कधी कधी चार वेळा सलग म्हटली जाते. तीच ओळ दुसरा, तिसरा, चौथा आळीपाळीने म्हणतो. पहिल्याची चूक झाली असेल तर पुढचा गाणारा ती चूक सुधारून घेतो. कथा सांगणारेसुद्धा "मागच्याची चूक' सुधारून घेतात. प्रत्येक वेळेला "चाल' बदलून नव्या चालीत गाणे म्हणण्याची व कथा सांगण्याची प्रथा धनगरांनी जपली आहे. तसेच प्रत्येक वेळी "आवाज' बदलून गाणे व कथा सांगितली जाते, हे विशेष! आणि हीच खरी आगळी-वेगळी ओळख आहे धनगरांच्या "मौखिक वाङ्मयाची' म्हणजेच "ओव्यांची'! या लेखात तीन दैवतांची माहिती आपण घेऊ, ती म्हणजे बिरोबा, धुळोबा आणि शिंग्रुबा यांची!
धनगरांचे मुख्य दैवत बिरोबा! -
धनगरांचे मुख्य दैवत आहे "बिरोबा' आणि त्यांची आई सुरावंती. या ओव्यांमध्ये बिरोबांच्या आईची माहिती तपशीलवार सांगितली जाते. तसेच बिरोबांची जन्मकथासुद्धा सांगितली जाते. यानंतर बिरोबांच्या मानलेल्या बहिणीची म्हणजे पायक्काची आणि बिरोबांच्या पत्नीची म्हणजे कामाबाईची माहिती "गाण्या'त व "कथे'तून सांगितली जाते.
दुसरे दैवत धुळोबा!
धनगरांचे दुसरे दैवत धुळोबा. धुळोबांच्या आणि बिरोबांच्या कथांमध्ये एक समानता आहे. दोघेही एका विशिष्ट पद्धतीनेच जीवन जगले... म्हणजे... जन्म, बालपण, तारुण्य, विवाह, गृहस्थी जीवन आणि दुष्टांचा नाश! परंतु या दोन कथांमध्ये महत्त्वाचा भेदसुद्धा आहे.
धुळोबांच्या ओव्यात देव भक्ताला भेटायला येतो! धुळोबांच्या ओव्यात धुळोबा आणि भिवाई (नदी-देवता) या बहीण-भावांच्या नात्यावर जास्त जोर दिलेला आढळतो.
तिसरे दैवत "शिंग्रुबा'
मुंबई-पुणे मार्गावर खंडाळ्याच्या घाटात शिंग्रुबा नावाचा धनगर राहत होता. ब्रिटिशांनी मुंबई-पुणे लोहमार्ग व
रस्ता (रोड) सह्याद्रीच्या घाटातून तयार करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा "रस्ता' कसा व कोठे तयार करायचा व रूळ (रेल्वेचे रूळ) कोठल्या भागात टाकायचे, हे ब्रिटिश इंजिनिअरांना समजावून सांगणारा हा धनगर शिंग्रुबा! धनगरांची स्वतःची अस्मिता जपत शिंग्रुबाने आधुनिक तंत्रज्ञानाचे आव्हान स्वीकारून मानवजातीच्या कल्याणासाठी कसे अफाट कार्य केले, त्याची चित्तरकथा शिंग्रुबाच्या ओव्यांतून सांगितली जाते. शिंग्रुबा वर्षानुवर्षे या घाटाच्या कुशीत, डोंगरमाथ्यावर, डोंगर-कपारीत आपली मेंढरं चरायला नेत असे. त्यामुळे येथील जमिनीची, कड्याकपारींची, जमिनीच्या भुसभुशीतपणाची व दगडी-टणकपणाची खडा न् खडा माहिती त्याला होती. ही माहिती त्याने इंग्रजांना सांगितली. त्या माहितीच्या आधारेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी करून, सह्याद्रीच्या खंडाळा घाटात डोंगर फोडून रस्ता तयार केला गेला, बोगदे निर्माण केले गेले व मुंबई-पुणे जोडले गेले. म्हणूनच शिंग्रुबाला आधुनिक देव मानले जाते. परंतु निर्दयी व धोकेबाज ब्रिटिश अधिकाऱ्यांनी रस्ता तयार झाल्यावर शिंग्रुबाला बंदुकीच्या गोळ्या मारून ठार मारले. ज्या जागेवर शिंग्रुबाला ठार मारले, त्या जागेवर, घाटात, शिंग्रुबाचे स्मरणार्थ एक छोटुकले देऊळ बांधले गेले. प्रत्येक ड्रायव्हर, प्रवासी आपले वाहन क्षणभर थांबवून, शिंग्रुबाला वंदन करूनच, पुढे जातो. आजही ही प्रथा पाळली जाते. जर्मन संशोधक प्रो. सोन्थायमर यांनी मराठी भाषेत धनगरांच्या मौखिक वाङ्मयाचे "छापील' ग्रंथसंग्रहात जतन करण्याचे महान कार्य केले आहे. प्रोफेसर गुन्थर सोन्थायमर पुण्यात आले. मराठी शिकले व १९६६ ते १९९१ या काळात धनगरांच्या चालीरीती, संस्कृती, ओव्या, इतिहास, पशुपालन पद्धत यावर जागतिक कीर्तीचे संशोधन केले. प्रत्यक्ष या ओव्या कशा आहेत, याची कल्पना येण्यासाठी "शिंग्रुबा'च्या ओवीतील काही निवडक भाग.
"शिंग्रुबाची ओवी'
इठ्ठल-बिरुदेवाचं चांगभलं।
खेलु महादबुवाचं चांगभलं।।
सुंबरान मांडिलं सुंबरान मांडिलं (दोन वेळा म्हणणे)
सुंबरान मांडलं गं, सुंबरान मांडलं गं।
(सुंबरान याचा अर्थ स्मरण, इथे अर्थ शिंग्रुबा-देवाचे स्मरण)
सुंबरान मांडिलं, सुंबरान मांडिलं
पइल्या सत यौगाला आता।
खंडाळ्याच्या घाटाला खंडाळ्याच्या घाटाला। गोरा मंग सायेब
शिंग्रुबा हे नावाचा। रहात व्हता धनगर
खंडाळ्याच्या घाटाला। शेळ्या-मेंड्या राकाइला
आन गोरा मंग सायेब। रस्ता लागलं धुंडाइला
गोरा मंग सायेब। रस्ता लागलं धुंडाइला
खंडाळ्याच्या घाटाला। रस्ता नव्हता घावत
गोरा मंग सायब। शिंग्रुबाला बोलतो
रस्ता दाव आमाला। म्होरं तवा जायाला
हर हर म्हादेवाऽऽ हर हर शंकरा
आता ऐका! गोऱ्या साहेबाला शिंग्रुबा धनगराने रस्ता दाखविल्यावर काय बक्षीस गोऱ्या सायबानं शिंग्रुबाला दिलं त्याची कथा! (निर्दयी ब्रिटिशांनी शिंग्रुबाला बंदुकीच्या गोळ्या घालून ठार केलं.) गोऱ्या मंग सायबानं हो। बंदुकीला गोळी या आन् गोळी त्यानं भरले। शिंग्रुबाला मारले गोळी त्यानं भरलं। शिंग्रुबाला मारलं
गोळियांचा आवाज गं। मेंड्यांच्या ये कानाला
आन् गोळी मग आइकून। शिंग्रुबाच्या भवतनं
गोळी मग आइकून। शिंग्रुबाच्या भवतनं
शेळ्या बगा मेंड्या या। शिंग्रुबाच्या भवतनं
आन् गोळा बगा वव्हून। वर्डायाला लागल्या
आन् नाराळाचं फळ या। फळ बगा देऊन
आन् खंडाळ्याच्या या घाटाला। गाडी उबा या राहिलं
नाराळाचं फळ याऽऽ फळ बगा देऊन
गाडी गेली निगूनऽऽ पुण्याच्या हे जाग्याला
हर हर महादेवाऽऽ हर हर ये शंकरा
सुंबरान मांडिलंऽऽ सुंबरान मांडिलं.
- समीर गायकवाड.
http://sameerbapu.blogspot.in/2016/07/blog-post_56.html
(छायाचित्र सौजन्य - श्री. कल्याणजी वर्मा, माहिती संदर्भ - 'सुंबरान मांडिलं' - डॉ.श्री.सुधीरजी तारे )
वा! क्या बात है ! तुमचे लिखाण
वा! क्या बात है ! तुमचे लिखाण हे नुसते लिखाण नाहीये तर मानवी समाजाचा प्रत्येक पैलु तुम्ही अतीशय उत्कटतेने आणी निर्मळपणे उलगडुन दाखवता. खूपच छान माहिती. असाच एक लेख ( या लेखाच्या मानाने त्रोटक माहिती देणारा पण स्वतचे अनूभव सांगणारा ) लोकसत्ता मध्ये काही वर्शांपूर्वी वाचला होता. लेखक एक तरुण पोर्या होता, जो सहज धनगरी जीवन अनूभवावे म्हणून एका धनगर पाड्यावर राहीला होता. त्याचे अनूभव पण छान होते.
सहीच.. धनगर समाजाविषयी
सहीच..
धनगर समाजाविषयी पहिल्यांदा एवढी माहिती कळाली.
धनगरी ढोल मला फार आवडतात. तो
धनगरी ढोल मला फार आवडतात. तो ठेका अंगात भिनायला लागतो.
याचं ऑडिओ रेकॉर्डींग मिळेल का कुठे? कोळी गीतं कशी सर्रास मिळतात, तशी धनगरी गीतं मिळतात का?
अवांतर
>> छायाचित्र सौजन्य - श्री. कल्याणजी वर्मा,
कल्याण वर्मा हा पण एक अवलिया आहे. साधारण २० वर्षांपुर्वी जेव्हा तो बेंगळुरु मधे लिनक्स्/ओपन सोर्स वर काम करणारा होता तेव्हा पासुन तो मला माहीत आहे. सध्या तो एक नावाजलेला छायाचित्रकार आहे.
इथे मायबोलीवर अगदी टुकार फोटो देखिल वॉटरमार्क टाकुन सांभाळले(?) जातात तेव्हा कल्याणचा हा व्हिडियो मला हमखास आठवतो. नक्की बघा https://www.youtube.com/watch?v=mLf58wZEhQ4
Wildlife photographer Kalyan Varma made a radical decision when he decided to give his pictures away--for free. The result? His career took off. Varma's work was featured on the dvd of the Blockbuster movie "Snakes on a Plane", and he landed a gig photographing for "National Geographic." A former open-source programmer, in this talk Varma urges all artists to consider the benefits of making their art free.
http://kalyanvarma.net/
@ टग्या , मायाक्का आणि
@ टग्या , मायाक्का आणि बाळूमामाच्या ओव्यांची ध्वनीफित मिळते पण शिन्ग्रूबाची मुद्रित फित नाही मिळाली ..
फारच छान लेख. माझ्या आजोळी,
फारच छान लेख.
माझ्या आजोळी, पुर्वापार धनगरांचे घरी येणे जाणे असे. शुक्रवारच्या आठवडी बाजाराला येताना ते आणलेला रानमेवा, करवंदे, जांभळे, अळू, दही आणि कुणाला हव्या असतील तर कांबळी, जिन वगैरे आजीला देत असत, मग जाताना आजी त्यांना घरच्या बेकरीतले बटर देत असे.
त्यातल्या काही बायकांना मामा मावश्या आत्ती ( आत्या ) म्हणत, असे जिव्हाळ्याचे नाते होते.
नंदेश उमाप यांच्या आवाजातील
नंदेश उमाप यांच्या आवाजातील एक टेप एमटीव्हीवर आहे त्याची link देतोय ...
यातील बिरोबाचे स्तवन हे परंपरागत स्तवन आहे मात्र वाद्यमेळ पारंपारिक न वापरता आधुनिक वापरून रसभंग केला आहे,
https://youtu.be/bzeIue58kas
खालील link वर मात्र विविध गावातील धनगर मंडळींनी गायलेल्या ओव्या आहेत, त्यात तो लेहजा आणि ताल नैसर्गिक व श्रवणीय आहे ..
http://music.axomlive.com/search/dhangari-ovya.html
@ टग्या, आपली कल्याण वर्मा
@ टग्या, आपली कल्याण वर्मा यांच्या बद्दलची माहिती संग्राह्य आहे ...शेअरिंगसाठी धन्यवाद ...
छान माहिती. आमच्या जिल्ह्यात
छान माहिती.
आमच्या जिल्ह्यात किंवा कर्नाटकातच एकंदर धनगर ही स्थानिक किंवा मूळ जमात मानली जाते.
विठोबा हा सुद्धा कर्नाटकातल्या मूळ धनगरांचा /गोपाळांचा देव समजला जातो.
इकडे धनगरात दोन प्रकार आजेत.
एक बर्यापैकी स्थिरस्थावर आणि शेती वगैरे करतात त्यांना कुरुबा म्हणतात.
ते बहुदा व्हीजे किंवा एन टी त येतात.
जे अजूनही भटके आहेत त्यांना गौंन्डा म्हणतात. ते एस टी समाजात येतात.
मैलार मल्लण्णा हे इथल्या धनगरांचे मुख्य दैवत आणि आमच्या गावात त्यांचे मोठे देवस्थान आहे.
त्याच्या दोन बायका म्हाळसा आणि बानू. (यांच्यावर कोणतीशी सिरीयल मराठी चॅनेल्सवर लागते म्हणे)
यांचा एक सण चट्टी म्हणून असतो. गावातल्या प्रत्येक घरातून चट्टी खारा नावाचे एक वेगळेच भरीत, बाजरीची रोटी, खीर घेऊन एका टोपल्यात (कोटांबी) भरून घेऊन मग ते सगळं घेऊन देवाला जाऊन मग घरी नेतात. ज्या घरातून हे गोळा करतात त्या घरातील लोक या लोकांचे पाय वगैरे धुवून पूजा करून या लोकांना हे चट्टीचं सामान देतात.
वाघ्या म्हणून मुलगे सोडले जातात. इकडे त्याला वग्ग्या म्हणतात. या लोकांना देवाला सोडलेलं असलं तरी ते लग्न- संसार करू शकतात.
यांचं सगळं जीवन इथल्या स्थानिक जीवनात सरमिसळ झालेलं असलं तरी प्रत्येक सण आणि प्रथांमध्ये ते आपलं वेगळेपण जपून असतात.
आमच्या जिल्ह्यातल्या मुख्य बागेत अगदी दर्शनी भागात धनगर जोडपं आणि त्यांच्या शेळ्या यांचंच शिल्प लावलेलं आहे.
तरी या समाजात शिक्षणाबद्दल अत्यंत अनास्था आहे. अजून कित्येक कुटूंबे अशी आहेत ज्यांनी शाळेचे तोंडही पाहिले नाही.
छान माहितीपुर्ण लेख!!!
छान माहितीपुर्ण लेख!!!
मुंबईत कुर्ल्याला, स्वदेशी
मुंबईत कुर्ल्याला, स्वदेशी मिल च्या आजुबाजुला धनगर वस्ती मोठ्या प्रमाणात आहे.
पुर्वी तिथे लाल मातीचा कुस्त्यांचा आखाडा पण होता. मोठ्ठे फेटेवाले, कपाळाला जांभळा गुलाल लावलेले म्हातारे खुप दिसत. अखिल भारतिय हिंदु खाटिक समाज अशी पाटी देखील एका खोलीच्या दारावर बघितलेली आठवतेय.
सध्या त्या भागात "बाळुमामा" किंवा "यशवंत सेना" असं लिहिलेल्या रिक्शा दिसतात.
छान माहितीपूर्ण लेख
छान माहितीपूर्ण लेख
छान लिहीलेय. आवडलं. वर साती
छान लिहीलेय. आवडलं.
वर साती यांच्या प्रतिसादात उल्लेखलेला मैलार मैलण्णा म्हणजे खंडोबा.
भरीत भाकरीचा नैवेद्य खंडोबाला देखील दाखवतात. खंडोबाचा चंपाषष्ठीला उत्सव असतो. चट्टी आणि षष्ठी बहुधा एकच असावी.
छान लिहिलयं , आवडलं.
छान लिहिलयं , आवडलं.
छान माहिती. शिंगरुबांच्या
छान माहिती.
शिंगरुबांच्या सुंबरानाची रेकॉर्ड आहे. आकाशवाणीवर, विविधभारतीवर ऐकलंय.
सुंदर लेख. साती यांचा
सुंदर लेख. साती यांचा प्रतिसादही माहितीपूर्ण.
मैलार-मल्लणा म्हणजेच मल्लारि. मणि-मल्लाचा नाश करणारा खंडोबा .'दक्षिणेचा लोकदेव : खंडोबा' हे श्री. (कै. म्हणायलाही कसं तरी वाटतंय अजून) रा.चिं. ढेरे यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. यात धनगर जमातीविषयी अनेकाम्गांनी लिहिले आहे.
छान माहिती. @ टग्या, आपली
छान माहिती.
@ टग्या, आपली कल्याण वर्मा यांच्या बद्दलची माहिती संग्राह्य आहे ...शेअरिंगसाठी धन्यवाद ... >>+१
त्या डैम इट कोठारेना निरोप
त्या डैम इट कोठारेना निरोप पोहोचवा रे. कैच्याकै चालू आहे त्या शिरेलीत.
धनगर समाजाविषयी पहिल्यांदा
धनगर समाजाविषयी पहिल्यांदा एवढी माहिती कळाली.>>>>+11111
छान महितिपुर्न लेख
छान महितिपुर्न लेख
_/\_ masta V
_/\_ masta
V
मस्त लेख! ह्या गाण्यावर
मस्त लेख!
ह्या गाण्यावर शाळेच्या गॅदरिंगमधे नाच असायचाच! लहानपणी बिरोबाच्या देवळात गेलेय! धनगरी ढोलांचा नाद , ठेकाही ऐकायला आवडतो.. त्यांच्याकडुन घेतलेलं 'घोंगड' वापरतो अजुनही..
फारच छान लेख. धन्यावाद समिर
फारच छान लेख.
धन्यावाद समिर भाउ
वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर
वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर ह्यांच्या बद्दलची एक सुरेल धनगरी ओवी
https://www.youtube.com/watch?v=wL_XugUd1h8