पाकिस्तान, फवाद खान आणि मी.

Submitted by विद्या भुतकर on 15 July, 2016 - 10:34

गेल्या वर्षी नोकरी शोधत असताना एक वेगळाच अनुभव आला. इंटरव्ह्यूला गेले तर तिथे ज्यांनी इंटरव्ह्यू घेतला ते मॅनेजर पाकिस्तानी होते. इंटरव्ह्यू छान झाला. अर्थात सर्व बोलणं इंग्लिश मधेच होत होतं आणि तेही अमेरिकेत त्यामुळे तसा विचार करायचं काही कारण नव्हतंच. सर्व बोलणी झाल्यावर मला त्यांनी एक प्रश्न विचारला,"तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना की आमचं ऑफशोअर चं ऑफिस पाकिस्तान मध्ये आहे?" खरंतर भारतीयांनी जगात आय टी मध्ये इतकं नाव मिळवलं आहे (चांगलं आणि वाईट दोन्हीही) की पाकिस्तान वगैरे मध्ये ऑफशोअर म्हणल्यावर मला जरा हसूच आलं. कधी असा विचारच केला नव्हता. अर्थात मला काय इथे बसूनच काम करायचं होतं. आणि याआधीही मी २-३ पाकिस्तानी लोकांसोबत काम केलं आहे. त्यामुळे मला असा काही प्रॉब्लेम नव्हता. आणि मी तसं सांगितलंही.

पुढे होऊन त्यांनीच सांगितलं मग,"मी इथेच राहिलोय, वाढलोय आणि बरेच वर्षे काढलीत त्यामुळे माझे विचार जास्त विस्तारित आहेत. तिथे राहणाऱ्या लोकांची मनोवृत्ती थोडी संकुचित आहे. मी तर तिकडे टीममध्ये ३-४ हिंदू लोकांनाही घेतलं आहे. आणि त्यासाठी भांडलोही आहे. " आता हे ऐकून मात्र मला जरा भीतीशी वाटली. माझ्या आजवरच्या आयुष्यात कधीही अशी वेळ आली नव्हती जिथे कुणी केवळ हिंदू आहे म्हणून त्यांना ऑफिसमध्ये प्रॉब्लेम आला आहे. आणि त्यांचे बोलणे ऐकून लोकांना तिथे काय त्रास होत असेल असा विचार करून थोडी भीतीही वाटली. पण खरं सांगायचं तर जे माझ्याशी बोलत होते ते मात्र एकदम छान, सुसंकृत होते आणि खूपच छान बोलले होते. पुढे जाऊन तिथे मला त्यांचा दुसरा कॉलही आला. पण तोवर दुसरीकडे नोकरी पक्की झाली होती त्यामुळे तिथे काम करण्याचा प्रश्न आला नाही. पण आजही त्या अनुभवाबद्दल विचार करते. खरंच एक स्त्री म्हणून आणि तीही भारतीय, मला तिथे कसे अनुभव आले असते? कदाचित एक वेगळे जग अनुभवायचा माझा चान्स हुकला. असो.

आज त्याबद्दल बोलायचं कारण म्हणजे गेल्या १०-१५ दिवसांत एक पाकिस्तानी सिरीयल पाहिली. बऱ्याच लोकांनी बऱ्याच दिवसांपासून सांगितली होती, शेवटी पाहिलीच. नाव आहे 'जिंदगी गुलजार है." आता ती कशी वाटली हे सांगायला नकोच. फवाद खान असलेली सिरीयल काय डॉक्युमेंटरी बघायलाही मी तयार आहे. सॉलिड फॅन झाले मी त्याची. फवाद खानचे दोन्ही चित्रपट मी पाहिले आहेत. त्यामुळे ती सिरीयल एका पाठोपाठ एक करत पटापट सर्व एपिसोड्स संपवले आणि एकदम महाभारत, रामायण, DDLJ, हम दिल दे चुके सनम वगैरे संपल्यावर वाटलं तसं वाटलं. असो त्याबद्दल तर काही करू शकत नाही. पण ती सिरीयल बघून वाटलं की पाकिस्तान मध्ये कितीतरी वेगळं वातावरण आहे. अगदी मॉडर्न म्हणून असलेल्या स्त्रियांचे कपडे पण पूर्ण अंगभर होते. तेच आपल्या सिरीयल मध्ये गुढघ्याच्यावर तरी असतेच किंवा ब्लाउज तरी बिनबाह्यांचे. अर्थात सिरीयल बघून देशाचा अनुमान काढता येत नाही. तरीही फरक जाणवलाच.

दुसरी गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे आजपर्यंत मला तामिळ, तेलुगू आणि मल्याळम मुव्ही बघायलाही सबटायटल्स ची गरज पडली होती. पण ती सिरीयल पाहताना मला थोडेफार शब्द समजले नसतील पण बाकी पूर्ण समजत होते. आपण बोलतो ती भाषा इतकी सारखी असू शकते? बरेच बोलण्याचे संदर्भ, भाषा, कधी विचारच केला नव्हता की खरंच इतके साधर्म्य असेल. त्यांचे ते उच्चार ऐकून मला माझं बोलणं किती गावठी वाटत आहे असं वाटत होतं. किती सुंदर उच्चार, भाषा. गझल मला त्यामुळेच आवडत असतील. मनाला लागतात एकदम, कुठे तरी खूप आत.

पुढे माझ्या लक्षात आले की त्या सिरीयल मध्ये इस्लामाबाद, लाहोर, कराची वगैरे जे नावं घेत होते ती सर्व मला ऐकून माहीत आहेत. पण कुठल्याही नकाशात मी कधी नीट लक्ष देऊन पाहिले नाहीये की खरंच किती अंतरावर आहेत ती शहरं, किंवा त्यांच्यात विशेष असं काय आहे. यातलं मला काहीच माहीत नाहीये. बरेच ठिकाणी भाज्या करण्याचे किंवा मटण किंवा बिर्याणीचे संदर्भ होते. मग माझ्या मनात विचार आला की तिथे लोक काय खात असतील नाश्त्याला रोज? तिथेही कुणी डोसा, इडली, पोहे उपीट खात असेल का? एखाद्या शेट्टीचे तिथेही हॉटेल असेल का? की फक्त पाकिस्तानीचं जेवण खात असतील? आणि असेल तरी काय असते ते? काहीच माहीत नाही मला.

गेल्या काही दिवसांपूर्वी एक लेख वाचला होता साहिर लुधियानवी यांच्यावर. गुलजार, साहिर यांच्याकडून कितीतरी गाण्यांचा, शब्दांचा, भावनांचा खजिना आपल्याला तिकडून आणून दिला. इतक्या गझल ऐकायला मिळाल्या. आजही राहत फतेह अली खानच्या आवाज ऐकला की ऐकत बसावसं वाटतं. पहिली सिरीयल संपल्यावर अजून एक पाहिली, 'हमसफर' आणि त्यात एक गोष्ट खूप आवडली ती म्हणजे त्याचं टायटल सॉंग. काय आवाज आहे. संदीप म्हणालाही, "घंटा एक शब्द कळत नाहीये." खरंच बरेचसे उर्दू शब्द होते. पण त्या गाण्यात जे दु:खं, प्रेम ऐकलं ते केवळ शब्दांत सांगता येणार नाही. आता त्या गझल बद्दल आणि त्या गायिकेबद्दल माहिती काढायची आहे. एक ध्यासच लागलाय म्हणा ना?

आपल्या देशाला, मला माहीत नसलेल्या अशा अनेक गोष्टी आपल्याला तिकडून मिळाल्या असतील. किंवा अनेक गोष्टी आहेत ज्या अजिबात माहीत नाहीयेत. अक्खा देश भारत-पाकिस्तान मॅच बघतो, आपण हरलो की रडतो, चिडतो. ते हरले की फटाके वाजवतो. त्यातला प्रत्येक खेळाडू आपल्याला तोंडपाठ असतो. कुठल्या मॅच मध्ये किती धावांनी आपण जिंकलो यावर तासन तास गप्पा होऊ शकतात. काश्मीरमध्ये चाललेला दहशतवाद, नेहमीची भांडणं, कधीही येऊ शकतं असं युध्दाचं सावट हे सर्व बघून खूप त्रास होतो. आपल्या एका सुंदर राज्याला इतके वर्षे इतका त्रास सहन करावा लागत आहे. तिथलं वातावरण बघून लोक कसे जगत असतील असा विचार नेहमी येत राहतो. भांडण, युद्ध, मॅचनंतर चे फटाके सर्व तर करूच पण निदान ते सर्व करताना त्या देशात अजून काय काय आहे हेही बघायला पाहिजे एकदा असं आज पहिल्यांदा वाटायला लागलं आहे. आणि शिवाय मुव्ही बघायला 'फवाद खान' ची भर झालीच आहे. Wink

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उर्दू भाषा ही केवळ पाकिस्तानची मक्तेदारी नाही. भारतात उर्दू बोलणारे आणि शिकणारे खूप लोक आहेत. उर्दू ही उत्तर प्रदेशची राजभाषा आहे. मी खालील स्रोतांमधून उर्दू शिकते आहे:
१. https://www.youtube.com/watch?v=d2l-VEx7ysQ&list=PLpIoKKr38VwCp0-FEEdBV2...
अप्रतिम मालिका आहे. सरळ आणि सोपी.
२. उर्दू शिका - डॉ. श्रीपाद जोशी. (http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5711660247128474258)
छान पुस्तक आहे पण थोडे जुने आहे त्यामुळे छपाई इतकी स्पष्ट नाही. अजून मोठ्या अक्षरांत असते तर चांगले वाटले असते.
३. रेख्ता (हे उर्दू भाषेचे मूळ नाव) https://rekhta.org/ आणि https://www.facebook.com/Rekhtaforum
अप्रतिम संकेतस्थळ. उर्दू भाषेची, काव्याची गोडी असणाऱ्या व्यक्तीसाठी भुलभुलैय्या! मी खूप काळ इथे रेंगाळत असते. सगळ्यात मस्त गोष्ट म्हणजे हे संकेतस्थळ हिंदी, उर्दू, आणि इंग्रजी अशा तीनही भाषांमध्ये आहे.
४. उर्दुवालाज (उर्दू भाषा प्रेमिकांनी चालवलेला उपक्रम)
https://urduwallahs.wordpress.com/about/ आणि https://www.facebook.com/Urduwallahs-305246882852144/

पाकिस्तानबद्दल जाणून घ्यायचे असेल तर मी आधी लिहिल्याप्रमाणे डॉन (www.dawn.com) वाचा, तिथल्या लोकांना फेसबुक वर फॉलो करा, आणि भरपूर पाकिस्तानी मालिका पहा! पाकिस्तानी मालिकांसाठी मी हा ब्लॉग फॉलो करते : https://desirantsnraves.com/

पाकिस्तान वर पाकिस्तान अस्मितेच्या शोधात आणि पाकिस्तान डायरी अशी दोन प्रतिभा रानडे यांनी लिहिलेली पुस्तके आहेत. मी वाचली नाहीयेत अजून ती पण वाचायच्या यादीत आहेत माझ्या!
पाकिस्तान एक सुंदर आणि निसर्गसंपन्न देश आहे. तेथील अराजक संपून तिथे खरी लोकशाही यावी आणि शांतता नांदावी अशी माझी मनापसून इच्छा आहे.

>>> अमेरिकेत नाही येणार, पण गल्फ देशांत पाकिस्तानी लोकांशी संपर्क येतोच.
अमेरिकेत पाकिस्तानी लोकांशी संपर्क नाही येणार?! का बुवा?

ऋन्मेश, यात सिरीयस न असण्याबद्द्ल काय आहे?
>>>
मी आर यू सिरीअस नाही तर आर यू शुअर म्हणालो Happy
ते खालील कारणामुळेच, आपलेच वाक्य कोटतो,
<<भारताची परिस्थिती पाकिस्तानपेक्षा खूप चांगली आहे हे मी आजवर जितके पाकबद्दल वाचले त्यावरून काढलेला निष्कर्ष आहे>>
पाकिस्तानबद्दल वाचायचे आपले सोर्स काय आहेत यावर आपले मत अवलंबून असते. इथे तुमचा निष्कर्श चुकीचा की बरोबर हे मलाही करायचे नाही कारण खरे काय ते मलाही माहीत नाहीच, मी सुद्धा बस्स ईथे तिथे वाचूनच निष्कर्श बनवणारा आहे Happy

माझा एक हॅपीनेस इंडेक्सचा धागा होता, खाली लिंक देतो,
http://www.maayboli.com/node/59158
त्यात पाकिस्तानचा क्रमांक ९२ आणि आपला ११८ आहे Happy
आणि तो ईंडेक्स काढायचे निकष पाहता आपण जे म्हणालात ते ठामपणे बोलणे मला धाडसी वाटले ईतकेच

>>> अमेरिकेत नाही येणार, पण गल्फ देशांत पाकिस्तानी लोकांशी संपर्क येतोच.
अमेरिकेत पाकिस्तानी लोकांशी संपर्क नाही येणार?! का बुवा?
>>>

Pakistanis are second fastest growing group in US, says report Happy
http://www.dawn.com/news/732915/pakistanis-are-second-fastest-growing-ra...

त्या तसल्या इंडेक्स वरून देशातल्या लोकांची स्थिती माहित करून घ्यायची? त्यापेक्षा चांगले वाचन थोडे वाढवा, हवेतर माबो कमी करा

अमेरिकेतली पाकिस्तानी पात्रं घेऊन केलेली टीव्ही मालिका : जॅक्सन हाइट्स

'नूर बानो' मालिकेतला नायक अमेरिकेत शिकायला येतो. आणि अमेरिकेत जन्मलेल्या पाकिस्तानी मुलीशी लग्न करतो.
तेव्हा टीव्हीमालिकांतूनही अमेरिकेतल्या पाकीजना भेटता येईल Wink

त्यांचे कल्चर बर्‍यापैकी पंजाबी आहे

हीच खरी गोम अन मुख्य कारण आहे दिनेशदा त्यांच्या अधःपाताची, पूर्ण देशावर पाकिस्तानी पंजाबी भाषा (पंजाबी लहेज्यातली उर्दू) अन पंजाबी संस्कृतीची एकप्रकारे जबरदस्ती केल्यागेली आहे, इतकंच नाही तर बंगाली बोलणारी लोकसंख्या बहुमतात आहे मग पाकिस्तानची भाषा बंगाली का नको ? ह्या एका प्रश्नामुळे त्यांनी हजारो लाखो बांगलादेशी मुसलमान मारून टाकलेत!
असो कॉमेंट जरा अस्थानी वाटते आहे तस्मात आवरती घेतो

भारत - पाकिस्तान यावरुन, बहुतेक फाळणीच्या पार्श्वभूमीवर कोणीतरी एक कथा लिहीली होती ना मागे इथे?
कोणाला आठवते आहे का?

अतरन्गी, अजय, जिज्ञासा, Thank you so much.

जिज्ञासा, तुम्ची कमेन्ट सेव्ह करुन ठेवत आहे. माहिती सविस्तर वाचेन आता. Happy नावाप्रमाणे तुमच्यात जिज्ञासा दिसते खूप. Happy

विद्या.

{{{ जिज्ञासा | 17 July, 2016 - 02:27

उर्दू भाषा ही केवळ पाकिस्तानची मक्तेदारी नाही. भारतात उर्दू बोलणारे आणि शिकणारे खूप लोक आहेत. उर्दू ही स्वतःचे राज्य नसलेली आणि तरीही सर्वाधिक बोलली जाणारी भारतातली भाषा आहे }}}

हिंदीप्रमाणेच उर्दूदेखील उत्तर प्रदेश या राज्याची अधिकृत भाषा आहे.

Hindi and Urdu are the official languages of Uttar Pradesh

https://en.wikipedia.org/wiki/Uttar_Pradesh

सिंधी भाषेची लिपी सुद्धा उर्दूच आहे बहुतेक. माझ्या ओळखीच्या एक सिंधी आजी सही उर्दूत करायच्या. आताच्या सिंधी बांधव उर्दूत लिहितात का ते माहित नाही.

पुर्वी कराची आणि मुंबई, जुळ्या बहिणी मानायचे. अनेक शास्त्रीय संगीत गायक तिथे जात असत.

फाळणीनंतर लगेच काही फरक पडला नाही. त्यांच्याकडेही कथ्थक होतेच ( यू ट्यूबवर नैन से नैन मिलाये रखने को हे गाणे आवर्जून पहा ) पण सध्या मात्र त्या खुणा पुसून टाकण्याचे प्रयत्न केले जात असावेत.
https://www.youtube.com/watch?v=RzYktydmqZM ( फतेह अली, जाहिदा परवीन )

डॉ. प्रभा अत्रे यांची कलावती रागातली रचना, तन मन धन पण यू ट्यूबवर पाकिस्तानी अवतारात आहे. अवश्य ऐका.
https://www.youtube.com/watch?v=y5oKZ53-UjM ( मुखडा तोच आहे, नंतरचे शब्द अर्थातच वेगळे आहेत )

पण सर्वच चित्रपट आणि सिरियल्स सभ्य सौम्य असाव्यात असे वाटत नाही. पुश्तु चित्रपटांची पोस्टर्स अत्यंत बकवास असायची.

सिंधी भाषेची लिपी सुद्धा उर्दूच आहे बहुतेक. >>>>>बहुतेक नाही.लिपी उर्दूच आहे.अगदी खूप शतकांपूर्वी स्वतंत्र लिपी असल्यास माहीत नाही, वाचनात आले नाही.

बिपीनजी,
बरोबर.
तसेच तेलंगणाची ऑफिशीयल लँग्वेज म्हणूनही तेलुगू बरोबरच उर्दूला मान आहे.
इथेबर्‍याच (किंवा कदाचित सगळ्याच असावे, पाहिले नाही) स्टेशनांवर उर्दूतही बोर्ड्स असतात.

धन्यवाद डॉ. साती,

बायदवे,

नासिर हुसैन यांचे चित्रपट पाहिलेत का? हम किसीसे कम नही, वगैरे. त्याचं सेन्सॉर बोर्ड सर्टिफिकेट पाहा - भाषा उर्दू असं लिहिलेलं आढळेल.

बिपीन चंद्र हर, हे मला माहिती नव्हते. धन्यवाद! मी माझे विधान दुरुस्त करते.
भरत., जॅक्सन हाइट्स मस्तच मालिका आहे. एकूणच अमेरिकेचा पाकिस्तानवर किती प्रभाव आणि वरदहस्त आहे हे मालिकांमधून लगेच जाणवते. अमेरिकेत चित्रित झालेल्या अनेक पाकिस्तानी मालिका आहेत आणि आज नाही २००० च्या दशकातल्या देखील आहेत.
सोन्याबापू, तुम्ही म्हणता यात तथ्य आहे. पूर्व पाकिस्तान म्हणजेच आत्ताचा बांगलादेश हा मुस्लिमबहुल प्रदेश असूनही बंगाली भाषा बोलणारा असल्यामुळे भावनिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या कधीही पाकिस्तानशी एकरूप होऊ शकला नाही. २१ फेब्रुवारी हा दिवस जगभरात मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो त्याचे मूळ १९५२ साली ढाक्यातील विद्यार्थ्यांनी बंगाली भाषेला पाकिस्तान मध्ये राष्ट्र भाषेचा दर्जा मिळावा म्हणून केलेल्या आंदोलनात आहे. त्यानंतर २ दशकांनी पूर्व पाकिस्तान हा बांगलादेश नावाने स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला आणि त्यांनी त्यांची मातृभाषा बंगाली ही राष्ट्रभाषा घोषित केली.
पाकिस्तानी मालिकांमधून केवळ उर्दू आणि पंजाबीच नाही तर अनेक बोलीभाषा ऐकायला मिळतात. मात्र जर मालिकांमधून पाकिस्तान समजून घ्यायचा असेल तर केवळ आजच्याच मालिका बघू नका. जुन्या पण बघा.

माझा एक पाकिस्तानी मित्र पेशावर बाजूचा होता. त्यांची भाषा ऐकायला छान वाटते.
इराणी भाषा पण सुमधुर. दोन इराणी बोलत असले की नुसता ऐकत बसावेसे वाटते.

इराणी आणि पश्तु भाषेतली गाणी पण ऐकायला छान वाटतात.

हे एक ऐकून पहा.
Man amadeam

https://youtu.be/FyqUX_UDK-Q

https://youtu.be/U_DSCLqgZCo

अवांतर:- परकीय भाषेतील चित्रपटांचा बीबी आहे तसा एक गाण्यांचा आहे का ? श्रवणीय परप्रांतीय, परकीय गाणी असा एक बीबी पाहिजे.

साधनाजी, चांगले वाचन करणार्यांची माबो ही जागा नाहीये का Happy

असो, राज धन्यवाद, मी नंतर फुरसतीने वेगळा धागा काढेन यावर .. डिटेल मध्ये चर्चायचे तर ईथे ते विषयांतर होईल.

Pages